व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवले जाते

मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवले जाते

“[येशूने] . . . भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या.”—मत्त. १४:१९.

१-३. बेथसैदाच्या जवळ येशूने कशा प्रकारे मोठ्या लोकसमुदायाला अन्‍न खायला दिले याचे वर्णन करा. (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

 हे दृश्‍य डोळ्यांसमोर आणा. (मत्तय १४:१४-२१ वाचा.) ही घटना इ.स. ३२ च्या वल्हांडण सणाच्या आधीची आहे. गालील सागराच्या उत्तरेकडील किनाऱ्‍यावर वसलेल्या बेथसैदा या गावाजवळच्या एका एकांत ठिकाणी, येशू व त्याच्या शिष्यांसोबत ५,००० पुरुष आणि अनेक स्त्रिया व मुले यांचा लोकसमुदाय जमलेला आहे.

लोकसमुदायाला पाहून येशूला लोकांचा कळवळा येतो; म्हणून तो त्यांच्यातील आजारी लोकांना बरे करतो व लोकांना देवाच्या राज्याविषयी अनेक गोष्टी शिकवतो. संध्याकाळ होऊ लागते तेव्हा, येशूचे शिष्य त्याला लोकांना निरोप देण्याची विनंती करतात, जेणेकरून लोक आसपासच्या गावांत जाऊन स्वतःकरता अन्‍न विकत घेतील. पण, येशू त्याच्या शिष्यांना सांगतो: “तुम्हीच त्यांना खावयास द्या.” त्याचे शब्द ऐकून ते गोंधळून जातात. कारण, त्यांच्याजवळ अगदीच थोडेसे अन्‍न, म्हणजे पाच भाकरी आणि दोन छोटे मासे असतात.

येशूला लोकांची दया येऊन तो एक चमत्कार करतो. हा एकच असा चमत्कार आहे ज्याबद्दल चारही शुभवर्तमान लेखकांनी लिहिले. (मार्क ६:३५-४४; लूक ९:१०-१७; योहा. ६:१-१३) येशू त्याच्या शिष्यांना, लोकांस ५० आणि १०० च्या पंक्‍तीने हिरव्यागार गवतावर बसवायला सांगतो. स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिल्यावर, येशू भाकरी मोडतो आणि मासेही वाटून देतो. मग, अहवालात सांगितल्यानुसार, येशूने भाकरी व मासे थेट लोकांना देण्याऐवजी, “शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या.” आश्‍चर्य म्हणजे, सर्वांनी भरपेट खाऊनही बरेच अन्‍न उरले! जरा विचार करा: येशूने मोजक्या लोकांद्वारे, म्हणजे त्याच्या शिष्यांद्वारे हजारो लोकांना अन्‍न खायला दिले. *

४. (क) आपल्या अनुयायांना कोणत्या प्रकारचे अन्‍न पुरवण्याबद्दल येशूला जास्त काळजी होती, आणि का? (ख) या आणि पुढील लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

  आपल्या अनुयायांना भौतिक अन्‍न पुरवण्यापेक्षा आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याबद्दल येशूला जास्त काळजी होती. त्याला माहीत होते की आध्यात्मिक अन्‍नामुळे, अर्थात देवाच्या वचनात सापडणाऱ्‍या सत्यांमुळे सार्वकालिक जीवन मिळते. (योहा. ६:२६, २७; १७:३) भुकेल्या लोकांना पाहून येशूला त्यांचा कळवळा आला आणि त्याने त्यांना भाकरी व मासे खायला दिले. त्याचप्रमाणे आपल्या अनुयायांची आध्यात्मिक स्थिती पाहून त्याला त्यांचा कळवळा आला आणि त्यांना शिकवण्यासाठी त्याने कित्येक तास खर्च केले. (मार्क ६:३४) पण, त्याला याची जाणीव होती की पृथ्वीवर त्याच्याजवळ खूप कमी वेळ उरला आहे आणि तो स्वर्गात परत जाईल. (मत्त. १६:२१; योहा. १४:१२) तर मग, येशू स्वर्गातून आपल्या अनुयायांना कशा प्रकारे भरपूर आध्यात्मिक अन्‍न पुरवणार होता? पृथ्वीवर असताना त्याने ज्या पद्धतीने अनेकांना अन्‍न पुरवले होते, त्याच पद्धतीचा अवलंब तो करणार होता. म्हणजे तो मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवणार होता. पण, हे मोजके लोक कोण असणार होते? येशूने मोजक्या लोकांचा वापर करून पहिल्या शतकातील त्याच्या अनेक अभिषिक्‍त अनुयायांना कशा प्रकारे आध्यात्मिक अन्‍न पुरवले होते ते आपण पाहू या. त्यानंतर, आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाच्या असलेल्या एका प्रश्‍नाची आपण पुढील लेखात चर्चा करणार आहोत. तो प्रश्‍न आहे: ख्रिस्त आज ज्या मोजक्या लोकांद्वारे आपल्याला अन्‍न पुरवत आहे त्यांना आपण कसे ओळखू शकतो?

मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवण्यात आले ( परिच्छेद ४ पाहा)

येशू मोजक्या लोकांना निवडतो

५, ६. (क) आपल्या मृत्यूनंतर आपल्या अनुयायांना भरपूर आध्यात्मिक अन्‍न मिळत राहावे म्हणून येशूने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? (ख) येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेषितांनी एक मुख्य भूमिका पार पाडावी म्हणून त्याने त्यांना कशा प्रकारे तयार केले?

आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाचे भरणपोषण होत राहावे म्हणून एक जबाबदार कुटुंबप्रमुख आधीच व्यवस्था करून ठेवतो. त्याच प्रकारे, भविष्यात ख्रिस्ती मंडळीचे मस्तक बनणार असलेल्या येशूने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांचे आध्यात्मिक रीत्या भरणपोषण होत राहील याची व्यवस्था केली. (इफिस. १:२२) उदाहरणार्थ, येशूचा मृत्यू होण्याच्या दोन वर्षांआधी त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो ज्या मोजक्या लोकांद्वारे पुढे पुष्कळांना अन्‍न पुरवणार होता त्यांच्यापैकी काहींची निवड त्याने केली. काय घडले ते आपण पाहू या.

येशूने संपूर्ण रात्र प्रार्थना केल्यावर आपल्या शिष्यांना गोळा केले आणि त्यांच्यापैकी १२ प्रेषितांना निवडले. (लूक ६:१२-१६) पुढील दोन वर्षे तो त्या १२ जणांच्या निकट सहवासात राहिला आणि त्याने त्यांना आपल्या शब्दांद्वारे व उदाहरणाद्वारे अनेक गोष्टी शिकवल्या. त्याला माहीत होते, की त्यांना अजूनही कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत. खरेतर, ते पुढेही ‘शिष्य’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. (मत्त. ११:१; २०:१७) त्याने त्यांना मोलाचा वैयक्‍तिक सल्ला दिला आणि सेवाकार्याचे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिले. (मत्त. १०:१-४२; २०:२०-२३; लूक ८:१; ९:५२-५५) यावरून दिसते, की येशूच्या मृत्यूनंतर तो स्वर्गात परतल्यावर शिष्यांना जी मुख्य भूमिका पार पाडायची होती त्यासाठी तो त्यांना तयार करत होता.

७. प्रेषितांची प्रमुख जबाबदारी काय असणार हे येशूने कसे सूचित केले?

प्रेषितांची भूमिका काय असणार होती? जसजसा इ.स. ३३ चा पेन्टकॉस्ट जवळ येऊ लागला, तसतसे हे स्पष्ट होत गेले की प्रेषित ‘देखरेखीच्या’ पदावर सेवा करणार होते. (प्रे. कृत्ये १:२०, पं.र.भा.) पण, त्यांची प्रमुख जबाबदारी काय असणार होती? येशूने त्याच्या पुनरुत्थानानंतर, प्रेषित पेत्राला जे सांगितले त्यातून याचे उत्तर मिळते. (योहान २१:१, २, १५-१७ वाचा.) येशूने इतर प्रेषितांच्या उपस्थितीत पेत्राला असे सांगितले: “माझी कोकरे चार.” अशा प्रकारे येशूने सूचित केले, की तो ज्या मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना आध्यात्मिक अन्‍न पुरवणार होता त्यांच्यामध्ये त्याच्या प्रेषितांचा समावेश असणार होता. येशूच्या शब्दांवरून दिसून येते, की त्याचे आपल्या ‘कोकऱ्‍यांवर’ खूप प्रेम आहे! *

पेन्टेकॉस्टपासून पुढे अनेकांना अन्‍न पुरवले जाते

८. आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी ख्रिस्त कोणत्या माध्यमाचा वापर करत होता हे पेन्टेकॉस्टच्या दिवशी विश्‍वास ठेवणाऱ्‍या नवीन लोकांनी स्पष्टपणे ओळखल्याचे त्यांनी कसे दाखवले?

येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर, इ.स. ३३ पासून त्याने आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने इतर अभिषिक्‍त शिष्यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवले. (प्रेषितांची कृत्ये २:४१, ४२ वाचा.) त्या दिवशी यहुद्यांपैकी व यहुदी धर्म स्वीकारलेल्या इतरांपैकी जे अभिषिक्‍त ख्रिस्ती बनले होते त्यांनी येशू वापरत असलेल्या माध्यमाला स्पष्टपणे ओळखले. ते हयगय न करता “प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, . . . तत्पर” राहिले. एका विद्वानानुसार, ज्या ग्रीक क्रियापदाचे भाषांतर “तत्पर” राहिले असे करण्यात आले आहे त्याचा अर्थ, “पूर्ण भरवशाने व एकनिष्ठपणे एखादी गोष्ट करणे” असा होऊ शकतो. विश्‍वास ठेवणाऱ्‍या या नवीन लोकांना आध्यात्मिक अन्‍नाची भूक होती, आणि हे अन्‍न नेमके कोठे मिळेल हेही त्यांना माहीत होते. म्हणून येशूने सांगितलेल्या गोष्टींचा आणि त्याने केलेल्या कार्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी व येशूविषयी असलेल्या शास्त्रवचनांच्या स्पष्टीकरणासाठी त्यांचे डोळे एकनिष्ठपणे प्रेषितांकडे लागलेले असत. *प्रे. कृत्ये २:२२-३६.

९. येशूच्या मेंढरांना अन्‍न पुरवण्याची जी जबाबदारी प्रेषितांना मिळाली होती तिच्यावर त्यांचे लक्ष केंद्रित होते हे त्यांनी कसे दाखवले?

येशूच्या मेंढरांना अन्‍न पुरवण्याची जी जबाबदारी प्रेषितांना मिळाली होती तिच्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित ठेवले. उदाहरणार्थ, नव्यानेच स्थापित झालेल्या मंडळीत एक संवेदनशील आणि फूट निर्माण करेल असा वाद उद्‌भवला. तो वाद त्यांनी कशा प्रकारे हाताळला ते आपण पाहू या. लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, हा वाद शारीरिक अन्‍नाविषयीचा होता. अन्‍न वाटपाच्या कार्यात ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या विधवांकडे दुर्लक्ष केले जात होते पण हिब्रू भाषा बोलणाऱ्‍या विधवांकडे मात्र दुर्लक्ष केले जात नव्हते. मग, प्रेषितांनी ही बिकट समस्या कशी सोडवली? “बारा प्रेषितांनी,” पात्र असलेल्या सात बांधवांना या आवश्‍यक “कामावर,” म्हणजेच अन्‍न वाटपाच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमले. येशूने लोकसमुदायाला खायला दिले होते तेव्हा लोकांना अन्‍न देण्याच्या कार्यात या प्रेषितांपैकी अनेकांनी भाग घेतला होता यात शंका नाही. पण आता त्यांनी पाहिले की लोकांना आध्यात्मिक रीत्या अन्‍न पुरवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे, ते “वचनाच्या सेवेत” तत्पर राहिले.—प्रे. कृत्ये ६:१-६.

१०. येशूने जेरूसलेमेतील प्रेषितांचा आणि वडीलवर्गाचा उपयोग कसा केला?

१० इ.स. ४९ मध्ये प्रेषितांचे व इतर पात्र वडिलांचे मिळून बनलेले एक नियमन मंडळ कार्यरत होते. (प्रेषितांची कृत्ये १५:१, २ वाचा.) बायबलमध्ये यांचा उल्लेख “यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग” असा करण्यात आला आहे. मंडळीचे मस्तक या नात्याने येशूने या लहान गटाचा उपयोग बायबलच्या शिकवणींशी संबंधित असलेले मुद्दे सोडवण्यासाठी आणि राज्य प्रचाराच्या व शिकवण्याच्या कामाची देखरेख करण्यासाठी केला.—प्रे. कृत्ये १५:६-२९; २१:१७-१९; कलस्सै. १:१८.

११, १२. (क) पहिल्या शतकातील मंडळ्यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी येशूने ज्या माध्यमाचा उपयोग केला त्यावर यहोवाचा आशीर्वाद होता हे कसे दिसून येते? (ख) पहिल्या शतकात येशू वापरत असलेले माध्यम स्पष्टपणे ओळखणे का शक्य होते?

११ येशूने पहिल्या शतकातील मंडळ्यांना ज्या माध्यमाद्वारे आध्यात्मिक अन्‍न पुरवले त्यावर यहोवाचा आशीर्वाद होता का? हो, नक्कीच! आपण हे इतक्या खातरीने कसे म्हणू शकतो? प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात आपल्याला असे वाचायला मिळते: “तेव्हा त्यांनी [प्रेषित पौल आणि त्याचे प्रवासी सोबती] नगरांमधून जाता जाता यरुशलेमेतील प्रेषित व वडील यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळण्यास नेमून दिले. यावरून मंडळ्या विश्‍वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.” (प्रे. कृत्ये १६:४, ५) हे लक्षात घ्या की या मंडळ्यांची संख्या वाढत गेली कारण त्यांनी जेरूसलेममध्ये असलेल्या नियमन मंडळाला एकनिष्ठपणे सहकार्य केले. यावरून हे दिसून येत नाही का, की येशूने ज्या माध्यमाचा उपयोग करून मंडळ्यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवले त्यावर यहोवाचा विपुल आशीर्वाद होता? आपण हे नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे की आपली आध्यात्मिक वाढ ही फक्‍त यहोवाच्या विपुल आशीर्वादामुळेच शक्य आहे.—नीति. १०:२२; १ करिंथ. ३:६, ७.

 १२ आतापर्यंत आपण पाहिले की येशूने आपल्या अनुयायांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरली, ती म्हणजे त्याने मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवले. त्याने ज्या माध्यमाचा उपयोग केला त्याला त्या काळातील ख्रिश्‍चन स्पष्टपणे ओळखू शकत होते. कारण नियमन मंडळातील सुरुवातीचे सदस्य, म्हणजेच प्रेषित या गोष्टीचा दृश्‍य पुरावा देऊ शकत होते की त्यांना येशूचा पाठिंबा आहे. प्रेषितांची कृत्ये ५:१२ यात असे सांगितले आहे: “प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्‌भुते घडत असत.” * यामुळे, ‘येशू आपल्या कोकऱ्‍यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी नेमका कोणाचा उपयोग करत आहे?’ असा प्रश्‍न ख्रिस्ती बनलेल्यांच्या मनात कधीच आला नसेल. पण पहिल्या शतकाच्या शेवटी परिस्थिती बदलली.

मंडळीला आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी येशू कोणाचा उपयोग करत आहे हे पहिल्या शतकात अगदी स्पष्ट होते ( परिच्छेद १२ पाहा)

निदणाच्या तुलनेत खूप कमी गहू

१३, १४. (क) ख्रिस्ती मंडळ्यांवर होणाऱ्‍या हल्ल्याविषयी येशूने काय सांगितले, आणि त्याचे हे शब्द पूर्ण होण्यास कधी सुरुवात झाली? (ख) हा हल्ला कोण लोक करणार होते? (टीप पाहा.)

१३ येशूने भाकीत केले होते की ख्रिस्ती मंडळीवर सैतानाचा हल्ला होईल. तुम्हाला आठवत असेल की येशूने जो गहू व निदणाचा दाखला दिला त्यात त्याने म्हटले होते की नव्याने गहू (अभिषिक्‍त ख्रिस्ती) पेरलेल्या शेतात निदण (नकली ख्रिस्ती) जास्त प्रमाणात पेरण्यात येईल. त्याने पुढे म्हटले की या दोन्ही गटांना, म्हणजेच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आणि नकली ख्रिश्‍चनांना, कापणीपर्यंत एकमेकांसोबत वाढू दिले जाईल. हा कापणीचा काळ “युगाच्या समाप्तीस” येईल. (मत्त. १३:२४-३०, ३६-४३) लवकरच येशूचे हे शब्द पूर्ण होऊ लागले. *

१४ पहिल्या शतकातील मंडळ्यांमध्ये धर्मत्याग हळूहळू पाय पसरू लागला. पण येशूच्या विश्‍वासू प्रेषितांनी एका प्रतिबंधासारखे कार्य केले; त्यांनी मंडळीवर खोट्या शिकवणींचा प्रभाव होऊ दिला नाही. (२ थेस्सलनी. २:३, ६, ७) पण, शेवटल्या प्रेषिताचा मृत्यू झाल्यानंतर मंडळ्यांमध्ये धर्मत्याग सुरू झाला आणि अनेक शतकांपर्यंत तो मोठ्या प्रमाणात सुरू राहिला. त्यासोबतच या काळात गहूच्या तुलनेत निदण खूप जास्त प्रमाणात वाढले. त्या वेळी आध्यात्मिक अन्‍न नियमित रीत्या पुरवण्यासाठी कोणतेही संघटित माध्यम नव्हते. पण यात बदल होणार होता. तो केव्हा, असा प्रश्‍न कदाचित तुम्हाला पडला असेल.

कापणीच्या काळात आध्यात्मिक अन्‍न कोण पुरवणार?

१५, १६. बायबल विद्यार्थ्यांच्या परिश्रमपूर्वक अभ्यासाचे कोणते चांगले परिणाम मिळाले, आणि त्यामुळे कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

१५ कापणीचा काळ जसजसा जवळ येत होता तसतशी बायबल सत्याबद्दल बऱ्‍याच लोकांची आस्था मोठ्या प्रमाणात वाढत होती. तुम्हाला आठवत असेल की १८७० च्या दशकात प्रामाणिक मनाने सत्याचा शोध घेणाऱ्‍या लोकांचा एक छोटा गट एकत्र आला आणि त्यांनी बायबलचे वर्ग स्थापन केले. हा गट चर्च आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या इतर शाखांपासून पूर्णपणे वेगळा होता. या गटाने स्वतःला बायबल विद्यार्थी असे नाव दिले. या प्रामाणिक बायबल विद्यार्थ्यांनी अतिशय नम्रपणे आणि खुल्या मनाने देवाला प्रार्थना करून बायबलमधील वचनांचे काळजीपूर्वक परीक्षण केले.—मत्त. ११:२५.

१६ बायबल विद्यार्थ्यांनी शास्त्रवचनांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यामुळे चांगले परिणाम मिळाले. या एकनिष्ठ स्त्री-पुरुषांनी खोट्या शिकवणींचा पर्दाफाश केला आणि बायबलमधील सत्ये प्रकाशनांद्वारे जगभरात पोचवली. सत्यासाठी तहानलेल्या लोकांनी त्यांची ही प्रकाशने वाचली आणि हेच सत्य आहे याची खातरी त्यांना पटली. यामुळे एक रोचक प्रश्‍न उद्‌भवतो: ‘१९१४ सालच्या आधी असलेले बायबल विद्यार्थीच येशूने नेमून दिलेले माध्यम होते का ज्याद्वारे तो त्याच्या कोकऱ्‍यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवणार होता?’ नाही. कारण ते बायबल विद्यार्थी अजूनही वाढीच्या काळातच होते आणि आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी येशू ज्या माध्यमाचा उपयोग करणार होता तेदेखील पूर्णपणे तयार झालेले नव्हते. खऱ्‍या ख्रिश्‍चनांपासून (गहू) नकली ख्रिश्‍चनांना (निदण) वेगळे करण्याची वेळ अजून आली नव्हती.

१७. १९१४ पासून कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू लागल्या?

१७ आपण मागच्या लेखात शिकलो की कापणीचा काळ १९१४ मध्ये सुरू झाला. त्या वर्षापासून बऱ्‍याच महत्त्वाच्या घडामोडी घडू लागल्या. येशू राजासनावर विराजमान झाला आणि शेवटल्या दिवसांची सुरुवात झाली. (प्रकटी. ११:१५) १९१४ ते १९१९ च्या सुरुवातीपर्यंत येशूने आपल्या पित्यासोबत मिळून आध्यात्मिक मंदिराची पाहणी केली व ते शुद्ध केले. * (मला. ३:१-४) त्यानंतर, १९१९ पासून गहू गोळा करण्याचा काळ सुरू झाला. तर मग, ख्रिस्ताने आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी एक संघटित माध्यम नेमण्याची वेळ आली होती का? हो, हीच ती वेळ होती!

१८. येशू जी नेमणूक करणार होता त्याविषयी त्याने काय भाकीत केले, आणि शेवटले दिवस सुरू झाल्यानंतर कोणता महत्त्वाचा प्रश्‍न उद्‌भवला?

१८ जगाच्या अंताविषयी येशूने जी भविष्यवाणी केली होती त्यात त्याने भाकीत केले होते की “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी तो एक माध्यम नेमेल. (मत्त. २४:४५-४७) तो कोणत्या माध्यमाचा उपयोग करणार होता? त्याने पहिल्या शतकात जी पद्धत वापरली त्याच पद्धतीचा वापर करून तो मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना आध्यात्मिक अन्‍न पुरवणार होता. पण, शेवटले दिवस सुरू झाल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्‍न उद्‌भवला की ते मोजके लोक कोण असणार? या प्रश्‍नावर व येशूने केलेल्या भविष्यवाणीशी संबंधित इतर प्रश्‍नांवर पुढच्या लेखात चर्चा करण्यात येईल.

 

^ परिच्छेद ३: दुसऱ्‍या एका प्रसंगी येशूने ४,००० पुरुषांव्यतिरिक्‍त, अनेक स्त्रियांना व मुलांना चमत्कारिक रीत्या अन्‍न पुरवले, तेव्हादेखील त्याने भाकरी “शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या.”—मत्त. १५:३२-३८.

^ परिच्छेद ७: पेत्राच्या जीवनकाळात ज्या ‘कोकऱ्‍यांना’ आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यात आले त्या सर्वांना स्वर्गीय जीवनाची आशा होती.

^ परिच्छेद ८: अहवालात सांगितल्यानुसार नवीन ख्रिस्ती “प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, . . . तत्पर” राहिले. यावरून हे दिसून येते की प्रेषित नियमित रीत्या त्यांना शिकवत होते. प्रेषितांच्या काही शिकवणी देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या पुस्तकांमध्ये कायमच्या लिहून ठेवण्यात आल्या आहेत ज्या आज ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा भाग आहेत.

^ परिच्छेद १२: प्रेषितांव्यतिरिक्‍त इतर ख्रिश्‍चनांनाही पवित्र आत्म्याचे दान मिळाले होते; असे दिसून येते की बऱ्‍याच वेळा इतरांना हे दान प्रेषितांद्वारे किंवा प्रेषितांच्या समक्ष देण्यात आले.—प्रे. कृत्ये ८:१४-१८; १०:४४, ४५.

^ परिच्छेद १३: प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३० मधील प्रेषित पौलाचे शब्द दाखवतात की मंडळीवर दोन प्रकारे हल्ला होणार होता. सर्वप्रथम त्याने म्हटले की नकली ख्रिस्ती (“निदण”) खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये “शिरतील.” आणि दुसऱ्‍या प्रकारचा हल्ला म्हणजे, खऱ्‍या ख्रिश्‍चनांपैकी काही जण धर्मत्यागी बनतील आणि “विपरीत गोष्टी” बोलतील.

^ परिच्छेद १७: या अंकातील, “पाहा, . . . मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” हा लेख पाहा, पृष्ठ ११ परिच्छेद ६.