व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे?

विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे?

“ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा कोण?”—मत्त. २४:४५.

१, २. येशू आज कोणाद्वारे आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे, आणि हा दास कोण आहे हे ओळखणे अत्यंत गरजेचे का आहे?

 “बांधवांनो, कित्येकदा असं घडलं आहे की मला नेमक्या ज्या माहितीची गरज होती आणि नेमक्या ज्या वेळी गरज होती अगदी त्याच वेळी आपल्या नवीन लेखांतून तुम्ही ती माहिती पुरवली.” आपल्या जागतिक मुख्यालयात काम करणाऱ्‍या बांधवांना लिहिलेल्या पत्रात एका बहिणीने वरील शब्दांत तिची कृतज्ञता व्यक्‍त केली. तुम्हालाही कधी असे वाटले आहे का? आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना असे वाटते. याचे आपल्याला आश्‍चर्य वाटावे का? खरे पाहता नाही.

आपल्याला अगदी योग्य वेळी जे आध्यात्मिक अन्‍न मिळत आहे त्यावरून याची खातरी पटते की मंडळीचे मस्तक येशू, आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याबद्दल त्याने दिलेले वचन पूर्ण करत आहे. यासाठी तो कोणाचा उपयोग करत आहे? येशूने आपल्या उपस्थितीच्या चिन्हाविषयी सांगताना असे म्हटले होते की आपल्या परिवाराला “यथाकाळी खावयास” देण्यासाठी तो “विश्‍वासू व बुद्धिमान” दासाचा उपयोग करेल. * (मत्तय २४:४५-४७ वाचा.) या शेवटल्या काळात आपल्या खऱ्‍या अनुयायांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी येशू याच विश्‍वासू दासाचा उपयोग करत आहे. हा विश्‍वासू दास कोण, हे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, आपले आध्यात्मिक आरोग्य आणि देवासोबतचा आपला नातेसंबंध या दासाद्वारे मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नावर अवलंबून आहे.—मत्त. ४:४; योहा. १७:३.

३. विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या दृष्टान्ताविषयी आपल्या प्रकाशनांत काय म्हणण्यात आले होते?

तर मग, विश्‍वासू व बुद्धिमान दासाबद्दल येशूने दिलेल्या दृष्टान्ताचा काय अर्थ होतो? गतकाळात, आपल्या प्रकाशनांमध्ये पुढीलप्रमाणे म्हणण्यात आले होते: येशूने इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी विश्‍वासू दासाला त्याच्या परिवारावर नेमले; तेव्हापासून, हा दास एक समूह या नात्याने, कोणत्याही कालावधीत पृथ्वीवर असलेल्या सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सूचित करतो; तर, परिवार हा त्याच अभिषिक्‍त जनांतील वैयक्‍तिक सदस्यांना सूचित करतो. तसेच, पूर्वी प्रकाशनांत असेही म्हणण्यात आले होते, की येशूने १९१९ मध्ये विश्‍वासू दासाला “आपल्या सर्वस्वावर,” म्हणजे राज्याशी संबंधित पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर नेमले. पण, आणखी काळजीपूर्वक अभ्यास आणि प्रार्थनापूर्वक मनन केल्यानंतर हे दिसून येते की येशूने विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी दिलेल्या दृष्टान्ताबद्दल आपला जो समज होता त्यात सुधार करण्याची गरज आहे. (नीति. ४:१८) आता आपण त्या दृष्टान्ताचे परीक्षण करू या आणि त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो ते पाहू या, मग आपली आशा स्वर्गातील जीवनाची असो वा पृथ्वीवरील जीवनाची.

दृष्टान्ताची पूर्णता केव्हा होते?

४-६. विश्‍वासू दासाबद्दल येशूने दिलेल्या दृष्टान्ताची पूर्तता १९१४ नंतरच व्हायला सुरू झाली असा निष्कर्ष आपण का काढू शकतो?

विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या दृष्टान्ताच्या संदर्भावरून दिसते की या दृष्टान्ताची पूर्तता इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून नव्हे, तर शेवटल्या दिवसांत म्हणजे आपल्या काळात व्हायला सुरुवात झाली. शास्त्रवचनांच्या साहाय्याने आपण या निष्कर्षावर कसे पोचतो ते पाहू या.

येशूने त्याच्या येण्याच्या व या युगाच्या समाप्तीच्या चिन्हाविषयी भविष्यवाणी केली होती; विश्‍वासू दासाचा दृष्टान्त हा त्याच भविष्यवाणीचा भाग आहे. (मत्त. २४:३) मत्तय २४:४-२२ या वचनांत नमूद असलेल्या या भविष्यवाणीच्या पहिल्या भागाच्या दोन पूर्तता आहेत. पहिली पूर्तता, इ.स. ३३ ते इ.स. ७० या वर्षांदरम्यान, आणि दुसरी पूर्तता अधिक मोठ्या प्रमाणावर आपल्या काळात. तर मग, विश्‍वासू दासाविषयी येशूने जे म्हटले होते त्याच्याही दोन पूर्तता असतील असा याचा अर्थ होतो का? नाही.

मत्तय २४:२९ या वचनापासून पुढे येशूने प्रामुख्याने आपल्या काळात घडणार असलेल्या गोष्टींबद्दल सांगितले. (मत्तय २४:३०, ४२, ४४ वाचा.) मोठ्या संकटादरम्यान काय घडेल याविषयी बोलताना त्याने म्हटले, की लोक “मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन . . . येताना पाहतील.” त्यानंतर, त्याने खास शेवटल्या काळात जगणाऱ्‍यांना सतर्क राहण्यास आर्जवले. त्याने म्हटले: “कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही,” आणि “तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” * याच संदर्भात, म्हणजेच शेवटल्या दिवसांत घडणार असलेल्या घटनांविषयी बोलताना येशूने विश्‍वासू दासाचा दृष्टान्त सांगितला. म्हणून, आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की विश्‍वासू दासाबद्दल त्याने जे म्हटले ते १९१४ मध्ये शेवटल्या दिवसांची सुरुवात झाल्यानंतरच पूर्ण व्हायला सुरू झाले. असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत आहे असे आपण का म्हणू शकतो?

७. कापणीचा काळ सुरू झाला तेव्हा कोणता महत्त्वाचा प्रश्‍न उद्‌भवला, आणि का?

पुढील प्रश्‍नाचा जरा विचार करा: “ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने . . . नेमले आहे असा कोण?” पहिल्या शतकात, असा प्रश्‍न विचारण्याची खरेतर गरज नव्हती. मागील लेखात आपण पाहिले, की प्रेषितांना देवाची स्वीकृती आहे याचा पुरावा म्हणून ते चमत्कार करू शकत होते आणि इतरांनांही चमत्कार करण्याचे दान देऊ शकत होते. (प्रे. कृत्ये ५:१२) तेव्हा, पुढाकार घेण्यासाठी ख्रिस्ताने कोणाला नेमले आहे असा प्रश्‍न उद्‌भवण्याचे कारणच नव्हते. पण, १९१४ मध्ये परिस्थिती खूपच वेगळी होती. त्या वर्षी कापणीच्या काळाची सुरुवात झाली. सरतेशेवटी गव्हापासून निदण वेगळे करण्याची वेळ आली होती. (मत्त. १३:३६-४३) कापणीचा काळ सुरू झाला तेव्हा हा महत्त्वाचा प्रश्‍न उद्‌भवला: अनेक नकली ख्रिस्ती येशूचे खरे अनुयायी असण्याचा दावा करत असताना, गव्हाला म्हणजे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना ओळखणे कसे शक्य होणार होते? याचे उत्तर विश्‍वासू दासाच्या दृष्टान्तात सापडते. ज्यांचे आध्यात्मिक रीत्या चांगल्या प्रकारे पोषण होत होते तेच ख्रिस्ताचे अभिषिक्‍त अनुयायी असणार होते.

विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे?

८. विश्‍वासू दास हा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा बनलेला का असायला हवा?

विश्‍वासू दास हा पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा बनलेला असायला हवा. अशांना “राजकीय याजकगण” असे म्हटलेले आहे. आणि ज्याने त्यांना “अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले,” त्याच्या गुणांची घोषणा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. (१ पेत्र २:९) म्हणून, इतर विश्‍वासू बांधवांना बायबलमधील सत्य शिकवण्यात राजकीय याजकगणातील सदस्यांनी थेट सहभाग घ्यावा हे योग्यच आहे.—मला. २:७; प्रकटी. १२:१७.

९. विश्‍वासू दास हा सर्वच अभिषिक्‍त जनांनी मिळून बनतो का? स्पष्ट करा.

तर मग, विश्‍वासू दास हा पृथ्वीवरील सर्वच अभिषिक्‍त जनांनी मिळून बनतो का? नाही. खरे पाहता, जगभरातील विश्‍वासू बांधवांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्यात सर्वच अभिषिक्‍त ख्रिस्ती भाग घेत नाहीत. गव्हामध्ये अशाही अभिषिक्‍त बांधवांचा समावेश आहे जे कदाचित स्थानिक मंडळीत सेवा सेवक किंवा वडील म्हणून सेवा करत असतील. ते घरोघर जाऊन व आपापल्या मंडळीत शिकवण्यात सहभाग घेतात. आणि मुख्यालयातून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचे ते एकनिष्ठपणे पालन करतात. पण, जगभरातील विश्‍वासू बांधवांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्यात ते भाग घेत नाहीत. शिवाय, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांमध्ये काही नम्र भगिनींचाही समावेश होतो. पण, मंडळीला शिकवण्याच्या कार्यात भाग घेण्याचा त्या कधीही प्रयत्न करत नाहीत.—१ करिंथ. ११:३; १४:३४.

१०. विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे?

१० तर मग, विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे? येशूने मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवले होते. त्याचप्रमाणे हा दास अभिषिक्‍त बांधवांच्या लहान गटाचा बनलेला आहे जो ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यानच्या काळात आध्यात्मिक अन्‍न तयार करण्यात आणि ते इतरांना पुरवण्यात थेटपणे सहभाग घेतो. विश्‍वासू दास ज्या अभिषिक्‍त बांधवांचा मिळून बनलेला आहे त्या बांधवांनी सबंध शेवटल्या दिवसांदरम्यान मुख्यालयात एकत्र सेवा केली आहे. हा दास म्हणजे अलीकडच्या दशकांतील यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ आहे. पण, याकडे लक्ष द्या की येशूच्या दृष्टान्तात “दास” हा शब्द एकवचनी आहे; यावरून सूचित होते, की खरेतर हा एकच दास आहे, ज्यात अनेक जणांचा समावेश होतो. त्यांना संयुक्‍तपणे दास म्हणण्यात आले आहे. नियमन मंडळाचे सदस्य नेहमी संयुक्‍तपणे निर्णय घेतात.

परिवारात कोणाचा समावेश होतो?

११, १२. (क) विश्‍वासू व बुद्धिमान दासाला कोणत्या दोन नेमणुका मिळाल्या? (ख) येशूने विश्‍वासू दासाला आपल्या परिवारावर केव्हा नेमले, आणि यासाठी त्याने कोणाची निवड केली?

११ येशूच्या दृष्टान्तातील लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, विश्‍वासू दासाला दोन वेगवेगळ्या नेमणुका मिळतात. सर्वप्रथम त्याला परिवारावर नेमले जाते; आणि दुसरी म्हणजे त्याला धन्याच्या सर्वस्वावर नेमले जाते. दृष्टान्ताची पूर्तता फक्‍त या शेवटल्या काळात होत असल्यामुळे, विश्‍वासू दासाला या दोन्ही नेमणुका १९१४ मध्ये राजा या नात्याने येशूची उपस्थिती सुरू झाल्यानंतर मिळालेल्या असायला पाहिजेत.

१२ तर मग, येशूने विश्‍वासू दासाला आपल्या परिवारावर केव्हा नेमले? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी आपल्याला १९१४ मध्ये, म्हणजे कापणीच्या काळाची सुरुवात झाली त्या काळात जावे लागेल. आपण याआधी पाहिल्याप्रमाणे त्या वेळी अनेक गट ख्रिस्ती असण्याचा दावा करत होते. तर मग, येशू यांपैकी कोणत्या गटातून विश्‍वासू दासाला निवडून त्याला नेमणार होता? येशू आणि त्याचा पिता १९१४ ते १९१९ च्या सुरुवातीच्या काळापर्यंत मंदिराची, म्हणजे उपासनेच्या व्यवस्थेची पाहणी करण्यास आले त्यानंतर या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. * (मला. ३:१) विश्‍वासू बायबल विद्यार्थ्यांच्या एका लहानशा गटाचे यहोवावर व त्याच्या वचनावर प्रेम आहे हे पाहून यहोवाला व येशूला आनंद झाला. अर्थातच, हे बायबल विद्यार्थी अद्यापही काही खोट्या शिकवणींना व प्रथांना धरून होते. पण, एका अल्प काळादरम्यान त्यांना कसोटीस लावण्यात आले व शुद्ध करण्यात आले तेव्हा त्यांनी नम्रपणे प्रतिसाद दिला. (मला. ३:२-४) हे विश्‍वासू बायबल विद्यार्थी खरे ख्रिस्ती अर्थात गहू होते. १९१९ मध्ये, म्हणजे आध्यात्मिक पुनरुज्जीवनाच्या काळात, येशूने त्यांच्यामधून सक्षम बांधवांना निवडून त्यांना विश्‍वासू व बुद्धिमान दास या नात्याने त्याच्या परिवारावर नेमले.

१३. परिवारात कोणाचा समावेश होतो, आणि का?

१३ तर मग, परिवारात कोणाचा समावेश होतो? सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ज्यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवले जाते त्यांचा परिवारात समावेश होतो. शेवटल्या दिवसांच्या सुरुवातीच्या काळात परिवारात समाविष्ट असलेले सर्वच जण अभिषिक्‍त होते. नंतर, परिवारात दुसऱ्‍या मेंढरांच्या मोठ्या लोकसमुदायाचा समावेश झाला. आज ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली जो “एक कळप” आहे त्यातील बहुतेक जण दुसऱ्‍या मेंढरांपैकी आहेत. (योहा. १०:१६) विश्‍वासू दासाद्वारे अगदी वेळेवर मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नापासून दोन्ही गटांना फायदा होतो. मग, आज विश्‍वासू व बुद्धिमान दास म्हणून सेवा करणाऱ्‍या नियमन मंडळाच्या सदस्यांबद्दल काय? या बांधवांनाही आध्यात्मिक अन्‍नाची गरज आहे. म्हणून, ते याची जाणीव बाळगतात, की येशूच्या इतर सर्व खऱ्‍या अनुयायांप्रमाणे तेदेखील व्यक्‍ती या नात्याने परिवाराचे सदस्य आहेत.

आपली आशा स्वर्गातील जीवनाची असो वा पृथ्वीवरील जीवनाची, आपण सर्व जण परिवाराचा भाग आहोत आणि आपल्या सर्वांना एकाच प्रकारच्या व योग्य वेळी मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाची गरज आहे

१४. (क) विश्‍वासू दासावर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, आणि यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत? (ख) येशूने विश्‍वासू व बुद्धिमान दासाला कोणती ताकीद दिली? (“जर एखादा दुष्ट दास . . . ” ही चौकट पाहा.)

१४ येशूने विश्‍वासू व बुद्धिमान दासावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. बायबलच्या काळात, भरवशालायक दास किंवा कारभारी घराचा व्यवस्थापक असायचा. (लूक १२:४२) त्यानुसार, विश्‍वासू व बुद्धिमान दासावर विश्‍वासू जनांच्या घराण्याची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात, भौतिक साधनसंपत्तीची, प्रचार कार्याची, आणि संमेलन व अधिवेशन कार्यक्रमांची देखरेख करणे समाविष्ट आहे. तसेच, सेवाकार्यासाठी लागणारे आणि वैयक्‍तिक व मंडळीच्या अभ्यासासाठी लागणारे बायबल साहित्य निर्माण करण्याच्या कार्याची देखरेख करणेदेखील यात समाविष्ट आहे. ख्रिस्ताच्या अनुयायांचा परिवार, विश्‍वासू दासाद्वारे पुरवल्या जाणाऱ्‍या या सर्व आध्यात्मिक तरतुदींवर अवलंबून आहे.

धन्याच्या सर्वस्वावर नेमले जाणे—केव्हा?

१५, १६. येशू विश्‍वासू दासाला आपल्या सर्वस्वावर केव्हा नेमतो?

१५ येशू दुसरी नेमणूक केव्हा करतो, म्हणजेच विश्‍वासू दासाला आपल्या “सर्वस्वावर” केव्हा नेमतो? येशूने असे म्हटले: “धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल.” (मत्त. २४:४६, ४७) याकडे लक्ष द्या, की येशू जेव्हा येतो आणि दासाला “तसे करताना,” म्हणजे विश्‍वासूपणे आध्यात्मिक अन्‍न पुरवताना पाहतो त्यानंतर तो ही दुसरी नेमणूक करतो. त्याअर्थी, विश्‍वासू दासाला परिवारावर नेमले जाणे व धन्याच्या सर्वस्वावर नेमले जाणे या दोन नेमणुकांदरम्यान मधला काळ असणार होता. येशू विश्‍वासू दासाला आपल्या सर्वस्वावर कसा आणि केव्हा नेमतो हे समजण्यासाठी आपण दोन गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे. पहिली म्हणजे तो केव्हा येतो आणि दुसरी म्हणजे त्याच्या सर्वस्वात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

१६ येशूचे ‘येणे’ केव्हा घडते? याचे उत्तर संदर्भावरून मिळते. हे आठवणीत आणा की आधीच्या वचनांत येशूच्या ‘येण्याविषयी’ जे सांगितले आहे ते जगाच्या अंताच्या वेळी येशू जेव्हा न्यायदंडाची घोषणा करण्यासाठी आणि तो बजावण्यासाठी येतो त्या काळाला सूचित करते. * (मत्त. २४:३०, ४२, ४४) म्हणून, विश्‍वासू दासाच्या दृष्टान्तात उल्लेख केलेले येशूचे ‘येणे’ मोठ्या संकटादरम्यान घडते.

१७. येशूच्या सर्वस्वात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

१७ येशूच्या ‘सर्वस्वात’ कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? येशूच्या ‘सर्वस्वात’ केवळ पृथ्वीवरील गोष्टींचाच समावेश होत नाही, तर त्यात स्वर्गातील गोष्टींचाही समावेश होतो. त्याने म्हटले: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.” (मत्त. २८:१८; इफिस. १:२०-२३) त्याच्या सर्वस्वात मशीही राज्याचा समावेश होतो. १९१४ पासून या राज्याचा अधिकार त्याला मिळाला आहे आणि त्याचे अभिषिक्‍त अनुयायी त्याच्यासोबत मिळून राज्य करतील.—प्रकटी. ११:१५.

१८. विश्‍वासू दासाला आपल्या सर्वस्वावर नेमण्यात येशूला आनंद का होईल?

१८ या सर्वावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? येशू मोठ्या संकटादरम्यान न्यायदंड बजावण्यासाठी येईल तेव्हा त्याला दिसून येईल की विश्‍वासू दास एकनिष्ठपणे परिवाराला योग्य वेळी आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. तेव्हा येशू आनंदाने विश्‍वासू दासाला आपल्या सर्वस्वावर नेमेल. विश्‍वासू दासातील सदस्यांना जेव्हा त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळेल आणि ते ख्रिस्तासोबत सहराजे बनतील तेव्हा त्यांना ही नेमणूक मिळेल.

१९. विश्‍वासू दासाला स्वर्गात इतर अभिषिक्‍त जनांपेक्षा श्रेष्ठ प्रतिफळ मिळेल का? स्पष्ट करा.

 १९ तर मग, विश्‍वासू दासाला स्वर्गात इतर अभिषिक्‍त जनांपेक्षा श्रेष्ठ प्रतिफळ मिळेल का? नाही. काही वेळा, एखाद्या लहानशा गटाला विशिष्ट प्रतिफळ देण्याचे वचन देण्यात आले असले, तरी शेवटी इतर जणही त्या प्रतिफळाचे मानकरी ठरू शकतात. उदाहरणार्थ, येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने आपल्या ११ प्रेषितांना काय म्हटले होते त्याचा विचार करा. (लूक २२:२८-३० वाचा.) येशूने त्या लहानशा गटाला वचन दिले की त्यांनी दाखवलेल्या विश्‍वासूपणासाठी त्यांच्याकरता एक उत्तम प्रतिफळ राखून ठेवलेले होते. आणि ते म्हणजे ख्रिस्तासोबत मिळून राज्य करण्याचे प्रतिफळ. पण, कितीतरी वर्षांनंतर त्याने हे सूचित केले की सर्वच १,४४,००० जण राजासनांवर बसतील आणि त्याच्यासोबत मिळून राज्य करतील. (प्रकटी. १:१; ३:२१) त्याच प्रकारे, मत्तय २४:४७ यात सांगितल्यानुसार, त्याने वचन दिले की एका लहानशा गटाला, म्हणजे विश्‍वासू दास म्हणून सेवा करणाऱ्‍या अभिषिक्‍त बांधवांना, तो आपल्या सर्वस्वावर नेमेल. खरे पाहता, सर्वच १,४४,००० जण ख्रिस्ताच्या सर्वस्वावर अधिकार चालवण्यात सहभाग घेतील.—प्रकटी. २०:४, ६.

सर्वच १,४४,००० जण येशूच्या सर्वस्वावर अधिकार चालवण्यात सहभाग घेतील ( परिच्छेद १९ पाहा)

२०. येशूने विश्‍वासू दासाला का नेमले, आणि तुम्ही कोणता दृढनिश्‍चय केला आहे?

२० येशूने पहिल्या शतकात मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवले होते. आजदेखील तो याच पद्धतीचा अवलंब करून आपल्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या माध्यमाने पुष्कळांना आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. सबंध शेवटल्या दिवसांदरम्यान आपल्या खऱ्‍या अनुयायांना—मग ते अभिषिक्‍त जन असोत वा दुसरी मेंढरे—नियमितपणे आणि अगदी वेळेवर आध्यात्मिक अन्‍न मिळत राहावे याच उद्देशाने येशूने विश्‍वासू दासाला नेमले. या तरतुदीबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी आपण या विश्‍वासू व बुद्धिमान दास म्हणून सेवा करणाऱ्‍या अभिषिक्‍त बांधवांना एकनिष्ठपणे पाठिंबा देण्याचा दृढनिश्‍चय करू या.—इब्री १३:७, १७.

 

^ परिच्छेद २: येशूने आधी एका प्रसंगी असाच दृष्टान्त सांगितला आणि त्यात त्याने ‘दासाचा’ उल्लेख “कारभारी” असा केला.—लूक १२:४२-४४.

^ परिच्छेद ६: ख्रिस्ताचे ‘येणे’ (ग्रीक भाषेत, एरखोमाइ) आणि त्याची ‘उपस्थिती’ (पारूसिया) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ख्रिस्त न्यायदंड बजावण्यासाठी येण्याआधी त्याची अदृश्‍य उपस्थिती सुरू होते.

^ परिच्छेद १२: या अंकात, “पाहा, . . . मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” असे शीर्षक असलेल्या लेखातील पृष्ठे १०-१२, परिच्छेद ५-८ पाहा.

^ परिच्छेद १६: या अंकात, “या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा” असे शीर्षक असलेल्या लेखातील पृष्ठे ७-८, परिच्छेद १४-१८ पाहा.