व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे

तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे

“तुम्ही . . . धुतलेले, पवित्र केलेले . . . असे झाला.”—१ करिंथ. ६:११.

१. नहेम्या जेरूसलेममध्ये आला तेव्हा त्याने काय पाहिले? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

 जेरूसलेममध्ये एकच खळबळ माजली आहे. का? कारण एक दुष्ट परदेशी मंदिरातील एका खोलीत राहत आहे. लेवी आपापल्या जबाबदाऱ्‍या सोडून जात आहेत. उपासनेत पुढाकार घेण्याऐवजी वडीलजन शब्बाथाच्या दिवशी व्यापारधंदा करत आहेत. अनेक यहुदी, गैरयहुद्यांशी लग्न करत आहेत. इ.स.पू. ४४३ नंतर नहेम्या जेरूसलेममध्ये येतो तेव्हा त्याला जे काही पाहायला मिळते त्यांपैकी या केवळ काही समस्या आहेत.—नहे. १३:६.

२. इस्राएल एक पवित्र केलेले राष्ट्र कशा प्रकारे बनले?

इस्राएल हे देवाला समर्पित असलेले राष्ट्र होते. इ.स.पू. १५१३ मध्ये इस्राएल लोकांनी यहोवाच्या सर्व आज्ञांचे पालन करण्याविषयी खूप उत्साह दाखवला होता. ते म्हणाले होते: “जी वचने परमेश्‍वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू.” (निर्ग. २४:३) त्यामुळे यहोवाने त्यांना पवित्र केले, म्हणजे आपले निवडलेले लोक म्हणून त्यांना सर्व राष्ट्रांतून वेगळे केले. त्यांच्यासाठी हा किती मोठा बहुमान होता! पुढे चाळीस वर्षांनंतर मोशेने त्यांना या गोष्टीची आठवण करून दिली. त्याने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर याची पवित्र प्रजा आहेस; तू त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्‍या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्‍वर याने तुला निवडून घेतले आहे.”—अनु. ७:६.

३. नहेम्या दुसऱ्‍यांदा जेरूसलेममध्ये आला तेव्हा यहुदी लोकांची आध्यात्मिक स्थिती कशी होती?

पण दुःखाची गोष्ट म्हणजे पवित्र राष्ट्र असण्याचा त्यांचा उत्साह फार काळ टिकला नाही. त्यांच्यापैकी काही निवडक लोक विश्‍वासूपणे देवाची सेवा करत राहिले; पण, बहुतेक यहुदी देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्याऐवजी आपण किती पवित्र किंवा धार्मिक आहोत याचा केवळ दिखावा करत होते. खऱ्‍या उपासनेची पुनःस्थापना करण्यासाठी विश्‍वासू शेषजन बॅबिलोनमधून परत आले त्याच्या शंभरएक वर्षांनंतर नहेम्या दुसऱ्‍यांदा जेरूसलेममध्ये आला. पण, यहुदी लोकांनी आध्यात्मिक गोष्टींबद्दल सुरुवातीला जो उत्साह दाखवला होता तो आता कमीकमी होत चालला होता.

४. आपल्याला पवित्र राहण्यास मदत करतील अशा कोणत्या चार गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत?

इस्राएल लोकांप्रमाणेच यहोवाच्या साक्षीदारांनासुद्धा पवित्र करण्यात आले आहे. देवाने अभिषिक्‍त ख्रिस्ती आणि “मोठा लोकसमुदाय” या दोघांनाही त्याची सेवा करण्यासाठी पवित्र किंवा वेगळे केले आहे. (प्रकटी. ७:९, १४, १५; १ करिंथ. ६:११) इस्राएल लोक देवासमोर असलेली आपली पवित्र स्थिती शेवटी गमावून बसले तसे आपल्याबाबतीत होऊ नये असे प्रत्येकाला वाटते. आपण नेहमी पवित्र राहावे आणि यहोवाने त्याच्या सेवेसाठी आपला उपयोग करावा म्हणून कोणत्या गोष्टी आपली मदत करू शकतात? या अभ्यास लेखात, नहेम्याच्या १३ व्या अध्यायात उल्लेख केलेल्या चार गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत: (१) वाईट संगती टाळणे; (२) यहोवाच्या कार्याला पाठिंबा देणे; (३) आध्यात्मिक गोष्टींना पहिले स्थान देणे; आणि (४) आपली ख्रिस्ती ओळख टिकवून ठेवणे. या प्रत्येकाचे आता आपण बारकाईने परीक्षण करू या.

वाईट संगती टाळा

नहेम्या यहोवाला विश्‍वासू होता हे कशावरून दिसते? (परिच्छेद ५, ६ पाहा)

५, ६. एल्याशीब आणि तोबिया कोण होते, आणि कोणत्या कारणामुळे एल्याशिबाने तोबियाशी जवळीक साधली असावी?

नहेम्या १३:४-९ वाचा. आज आपल्या अवतीभोवती अनेक वाईट प्रभाव असल्यामुळे पवित्र राहणे इतके सोपे नाही. एल्याशीब आणि तोबिया यांचे उदाहरण विचारात घ्या. एल्याशीब महायाजक होता, तर तोबिया एक अम्मोनी होता जो बहुधा पारसाच्या राजासाठी काम करत असावा. नहेम्या जेरूसलेमच्या तटांची पुनर्बांधणी करत होता तेव्हा तोबियाने आणि त्याच्या सोबत्यांनी त्याचा विरोध केला होता. (नहे. २:१०) नियमशास्त्रानुसार, अम्मोनी लोक मंदिरात येऊ शकत नव्हते. (अनु. २३:३) असे असताना महायाजकाने तोबियासारख्या मनुष्याला मंदिरातील एका कोठडीत का राहू दिले?

तोबिया हा एल्याशिबाचा जवळचा मित्र बनला होता. तोबिया आणि त्याचा मुलगा योहानान यांनी यहुदी स्त्रियांशी लग्न केले होते आणि अनेक यहुदी लोक तोबियाची खूप वाहवा करायचे. (नहे. ६:१७-१९) एल्याशिबाचा नातवांपैकी एकाने सनबल्लटाच्या मुलीशी लग्न केले होते. सनबल्लट हा शोमरोनाचा अधिपती असून तोबियाचा खास मित्र होता. (नहे. १३:२८) या नातेसंबंधांमुळेच महायाजक एल्याशीब कदाचित, गैरयहुदी व विरोधक असलेल्या तोबियाच्या प्रभावाखाली आला असावा. पण, नहेम्याने तोबियाचे सर्व सामान मंदिरातील कोठडीतून बाहेर फेकण्याद्वारे यहोवाप्रती एकनिष्ठा प्रदर्शित केली.

७. यहोवासमोर असलेली आपली पवित्र स्थिती दूषित होऊ नये म्हणून मंडळीतील वडील व इतर जण काय करतात?

आपण देवाचे समर्पित लोक आहोत. तेव्हा, आपण सर्वात प्रथम यहोवाला विश्‍वासू राहिले पाहिजे. देवाच्या नीतिमान स्तरांचे उल्लंघन करून आपण कधीच पवित्र राहू शकत नाही. कौटुंबिक नातेसंबंधांसाठी आपण केव्हाही बायबलच्या तत्त्वांचे उल्लंघन करू नये. मंडळीत कोणतेही निर्णय घेताना ख्रिस्ती वडील स्वतःची मते किंवा भावना नव्हे, तर यहोवाची विचारसरणी विचारात घेतात. (१ तीम. ५:२१) मंडळीतील वडील असे काहीच करत नाहीत ज्यामुळे यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध बिघडेल.—१ तीम. २:८.

८. संगतीचा प्रश्‍न येतो तेव्हा यहोवाच्या सर्वच समर्पित सेवकांनी काय लक्षात ठेवले पाहिजे?

“कुसंगतीने नीती बिघडते,” ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. (१ करिंथ. १५:३३) आपले काही नातेवाईक कदाचित आपल्याला देवाची सेवा करण्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतील. जेरूसलेमच्या तटांची पुनर्बांधणी करण्यात एल्याशीब नहेम्याच्या पाठीशी उभा राहिला होता आणि असे करण्याद्वारे त्याने लोकांसमोर एक चांगले उदाहरण मांडले होते. (नहे. ३:१) पण काही काळानंतर, बहुधा तोबियाच्या आणि इतरांच्या वाईट प्रभावामुळे एल्याशीब अशा काही गोष्टी करून बसला ज्यांमुळे यहोवासमोर असलेली त्याची पवित्र स्थिती दूषित झाली. चांगले मित्र आपल्याला आध्यात्मिक गोष्टी करण्याचे प्रोत्साहन देतात, जसे की बायबलचे वाचन करणे, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे आणि क्षेत्र सेवेत सहभाग घेणे. कुटुंबातील जे सदस्य आपल्याला चांगल्या गोष्टी करण्याचे प्रोत्साहन देतात अशांवर आपण विशेष प्रेम केले पाहिजे व त्यांची मनापासून कदर केली पाहिजे.

यहोवाच्या कार्याला पाठिंबा द्या

९. मंदिरातील व्यवस्था कशामुळे विस्कळीत झाली होती, आणि यासाठी नहेम्याने कोणाला जबाबदार धरले?

नहेम्या १३:१०-१३ वाचा. असे लक्षात येते, की नहेम्या जेरूसलेममध्ये परतला तोपर्यंत लोकांनी मंदिरात अनुदान देण्याचे जवळजवळ बंद केले होते. त्यामुळे लेवी आपले व आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी मंदिरातील आपल्या जबाबदाऱ्‍या सोडून शेतांवर काम करायला जाऊ लागले. यासाठी नहेम्याने अधिपतींना जबाबदार धरले. ते बहुधा आपली कर्तव्ये नीट पार पाडत नसावेत. त्यांना सांगितल्याप्रमाणे, ते एकतर लोकांकडून दशांश गोळा करत नसावेत किंवा तो मंदिरात जमा करत नसावेत. (नहे. १२:४४) त्यामुळे नहेम्याने दशांश गोळा करण्याची व्यवस्था केली. त्याने मंदिरातील भांडारांवर देखरेख करण्यासाठी व दशांशाचे वाटप करण्यासाठी भरवशाची माणसे नेमली.

१०, ११. खऱ्‍या उपासनेला पाठिंबा देण्याच्या बाबतीत देवाच्या लोकांना कोणता बहुमान मिळाला आहे?

१० यातून आपण काही शिकू शकतो का? नक्कीच; कारण आपल्यालाही आपल्या मौल्यवान वस्तूंनी यहोवाचा सन्मान करण्याचा बहुमान मिळाला आहे. (नीति. ३:९) देवाच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी आपण अनुदान देतो तेव्हा जे यहोवाचे आहे तेच आपण त्याला देत असतो. (१ इति. २९:१४-१६) आपल्याला कदाचित असे वाटत असेल की आपल्याजवळ देवाला देण्यासाठी फारसे काही नाही. पण, आपल्याला देण्याची इच्छा असेल तर आपण जे काही देऊ ते यहोवा आनंदाने स्वीकारेल.—२ करिंथ. ८:१२.

११ एक मोठे कुटुंब, खास पायनियर असलेल्या एका वयस्कर जोडप्याला आठवड्यातून एकदा आपल्या घरी जेवायला बोलवायचे. त्यांनी असे अनेक वर्षांपर्यंत केले. या कुटुंबात आठ मुले होती. पण तरीसुद्धा त्यांची आई नेहमी म्हणायची, “दहात आणखी दोन ताटांची भर पडल्यानं काय फरक पडतो?” आठवड्यातून एकदा कुणाला एकवेळचे जेवण देणे ही काही मोठी गोष्ट नाही असे एखाद्याला वाटेल. पण, या कुटुंबाने जो पाहुणचार दाखवला त्याबद्दल हे पायनियर जोडपे खूप कृतज्ञ होते. त्या कुटुंबालाही या पायनियर जोडप्याकडून खूप लाभ झाला. त्यांच्या उत्तेजनपर शब्दांमुळे आणि अनुभवांमुळे त्या कुटुंबातील मुलांना आध्यात्मिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्या सर्व मुलांनी पूर्णवेळची सेवा सुरू केली.

१२. मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेले बांधव कोणते उत्तम उदाहरण मांडतात?

१२ नहेम्याच्या अहवालावरून आपण आणखी एक धडा शिकू शकतो. तो म्हणजे: नहेम्याप्रमाणे आज मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेले बांधवसुद्धा यहोवाच्या कार्याला पाठिंबा देण्यात पुढाकार घेतात. त्यांच्या उत्तम उदाहरणामुळे मंडळीतील इतरांना खूप लाभ होतो. याबाबतीत, मंडळीतील वडील प्रेषित पौलाचेही अनुकरण करतात. पौलाने खऱ्‍या उपासनेला पाठिंबा दिला आणि उपयुक्‍त मार्गदर्शन दिले. उदाहरणार्थ, अनुदान कसे करावे याबद्दल त्याने अनेक व्यावहारिक सल्ले दिले.—१ करिंथ. १६:१-३; २ करिंथ. ९:५-७.

आध्यात्मिक गोष्टींना पहिले स्थान द्या

१३. काही यहुदी कशा प्रकारे शब्बाथाचा अनादर करत होते?

१३ नहेम्या १३:१५-२१ वाचा. आपण जर भौतिक गोष्टींमध्ये स्वतःला गुरफटून घेतले तर हळूहळू आपण आध्यात्मिक रीत्या कमजोर बनू. निर्गम ३१:१३ यात सांगितल्यानुसार, इस्राएल लोक पवित्र केलेले आहेत याची त्यांना आठवण करून देण्यासाठी साप्ताहिक शब्बाथाची तरतूद करण्यात आली होती. शब्बाथाचा हा दिवस त्यांनी कौटुंबिक उपासना, प्रार्थना आणि देवाच्या नियमशास्त्रावर मनन करण्यासाठी राखून ठेवायचा होता. पण, नहेम्याच्या काळातील काहींसाठी शब्बाथाचा दिवस इतर दिवसांसारखाच होता. इतर दिवसांप्रमाणेच शब्बाथाच्या दिवशीही ते व्यापारधंदा करायचे. यामुळे देवाची उपासना करण्याकडे लोकांचे दुर्लक्ष होऊ लागले. हे पाहून, नहेम्याने आठवड्याच्या सहाव्या दिवशी शब्बाथ सुरू होण्याआधीच परदेशी व्यापाऱ्‍यांना शहराबाहेर घालवून दिले आणि शहराच्या वेशी बंद केल्या.

१४, १५. (क) आपण वाजवीपेक्षा जास्त वेळ पैसा कमावण्यात घालवला तर काय होण्याची शक्यता आहे? (ख) आपण देवाच्या विसाव्यात प्रवेश कसा करू शकतो?

१४ नहेम्याच्या या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? हेच की, आपण वाजवीपेक्षा जास्त वेळ पैसा कमावण्यात घालवू नये. नाहीतर आध्यात्मिक गोष्टींपासून आपले लक्ष विचलित होऊन आपण आपल्या कामावर जास्त प्रेम करू लागू. आपण दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही हा जो इशारा येशूने दिला तो आपण नेहमी आठवणीत ठेवला पाहिजे. (मत्तय ६:२४ वाचा.) नहेम्यासमोर पैसा कमावण्याच्या अनेक संधी होत्या. पण, त्याने आपल्या वेळेचा उपयोग कसा केला? (नहे. ५:१४-१८) सोरच्या लोकांशी व इतर लोकांशी व्यापार करून तो भरपूर पैसा कमवू शकला असता. पण, तसे करण्याऐवजी त्याने आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी स्वतःला झोकून दिले व यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण करण्यासाठी कार्य केले. त्याचप्रमाणे आज ख्रिस्ती वडील आणि सेवा सेवक प्रामुख्याने मंडळीच्या फायद्यासाठी कार्य करतात आणि याबद्दल मंडळीतील बंधुभगिनी मनापासून त्यांच्यावर प्रेम करतात. यामुळे देवाच्या लोकांमध्ये प्रेम, शांती आणि सुरक्षितता नांदते.—यहे. ३४:२५, २८.

१५ आज आपण साप्ताहिक शब्बाथ पाळत नसलो तरी पौल आपल्याला सांगतो की “देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.” पुढे तो म्हणतो: “जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही, जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा, आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.” (इब्री ४:९, १०) ख्रिस्ती या नात्याने, आपण देवाच्या प्रगतिशील उद्देशानुसार प्रामाणिकपणे कार्य करत राहून त्याच्या विसाव्यात प्रवेश करू शकतो. तुम्ही आणि तुमचे कुटुंब कौटुंबिक उपासना, मंडळीच्या सभा आणि क्षेत्र सेवा या गोष्टींना आपल्या जीवनात पहिले स्थान देता का? आपण नोकरी करतो त्या ठिकाणी आपल्या मालकाला किंवा आपल्यासोबत काम करणाऱ्‍यांना कदाचित या गोष्टींचे महत्त्व कळणार नाही. नहेम्याने ‘परदेशी व्यापाऱ्‍यांना शहराबाहेर घालवून शहराच्या वेशी बंद’ केल्या होत्या हे तुम्हाला आठवत असेल. त्याच प्रकारे, पवित्र गोष्टींना प्राधान्य व पुरेसे महत्त्व देण्यासाठी आपल्यालाही खंबीर भूमिका घ्यावी लागेल. यासाठी आपल्याला आपल्या मालकाला व सहकर्मचाऱ्‍यांना हे स्पष्टपणे सांगावे लागेल की आपल्यासाठी यहोवाचे कार्य हेच सगळ्यात महत्त्वाचे कार्य आहे. आपल्याला पवित्र करण्यात आले आहे; त्यामुळे आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, की ‘मी ज्या प्रकारे जीवन जगतो त्यावरून मी यहोवाला आपल्या जीवनात पहिले स्थान देत आहे हे दिसून येते का?’—मत्त. ६:३३.

आपली ख्रिस्ती ओळख टिकवून ठेवा

१६. नहेम्याच्या काळात इस्राएल राष्ट्र कशा प्रकारे आपली ओळख गमावण्याच्या बेतात होते?

१६ नहेम्या १३:२३-२७ वाचा. नहेम्याच्या काळात इस्राएली पुरुष विदेशी स्त्रियांशी लग्न करत होते. नहेम्याने जेरूसलेमला पहिली भेट दिली तेव्हा त्याने सर्व वडीलजनांना एका लेखी करारावर सही करण्यास आणि अशी शपथ घेण्यास सांगितले की ते मूर्तिपूजक स्त्रियांशी लग्न करणार नाहीत. (नहे. ९:३८; १०:३०) पण काही काळानंतर नहेम्याला असे दिसून आले, की यहुदी पुरुष विदेशी स्त्रियांशी लग्न तर करतच होते, पण देवाचे पवित्र लोक या नात्याने ते आपली ओळखसुद्धा गमावण्याच्या बेतात होते. या विदेशी स्त्रियांच्या मुलाबाळांना हिब्रू भाषा लिहिता किंवा बोलताही येत नव्हती. ही मुले मोठी झाल्यानंतर स्वतःची ओळख इस्राएली म्हणून करून देणार होते का? की ते स्वतःला अश्‍दोदी, अम्मोनी किंवा मवाबी समजणार होते? हिब्रू भाषा येत नसल्यामुळे त्यांना देवाचे नियमशास्त्र कितपत समजणार होते? त्यांच्या माता उपासना करायच्या त्या खोट्या दैवतांऐवजी, यहोवाला जाणून घेणे आणि त्याची उपासना करण्याचा निर्णय घेणे त्यांना कसे शक्य होणार होते? असे होऊ नये म्हणून त्वरित निर्णय घेऊन त्यानुसार कार्य करण्याची गरज होती. आणि नेमके हेच नहेम्याने केले.—नहे. १३:२८.

आपल्या मुलांना यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडण्यास मदत करा (परिच्छेद १७, १८ पाहा)

१७. पालक आपल्या मुलांना यहोवासोबत वैयक्‍तिक नातेसंबंध जोडण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात?

१७ आज आपल्या मुलांनी ख्रिस्ती ओळख प्राप्त करावी म्हणून त्यांना मदत करण्यासाठी आपण सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे. पालकांनो स्वतःला विचारा, ‘माझी मुलं बायबल सत्याची “शुद्ध वाणी” किती चांगल्या प्रकारे बोलतात? (सफ. ३:९) माझ्या मुलांच्या बोलण्यातून कोणता आत्मा प्रतिबिंबित होतो, देवाचा की जगाचा?’ याबाबतीत तुमच्या मुलांना सुधारणा करण्याची गरज आहे असे दिसल्यास निराश होऊ नका. कोणतीही भाषा शिकण्यासाठी वेळ लागतो, विशेषतः आपल्या अवतीभोवती लक्ष विचलित करणाऱ्‍या बऱ्‍याच गोष्टी असतात तेव्हा. तुमची मुले, बायबल तत्त्वांचे उल्लंघन करण्याच्या जबरदस्त दबावाला तोंड देत आहेत. तेव्हा, आपल्या मुलांना यहोवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडण्यास मदत करण्यासाठी कौटुंबिक उपासनेचा आणि इतर संधींचा उपयोग करा. (अनु. ६:६-९) सैतानाच्या जगापासून दूर राहिल्याने कोणते फायदे होऊ शकतात ते त्यांना सांगा. (योहा. १७:१५-१७) त्यांच्या मनापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा.

१८. ख्रिस्ती पालकच आपल्या मुलांना यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास सगळ्यात चांगली मदत करू शकतात असे का म्हणता येईल?

१८ शेवटी, प्रत्येक मुलाला देवाची सेवा करण्याचा निर्णय स्वतःच घ्यावा लागेल. असे असले तरी पालक त्यांच्यासाठी बरेच काही करू शकतात. जसे की, त्यांच्यासमोर एक चांगले उदाहरण मांडणे, आचरणाच्या बाबतीत ते मुलांकडून काय अपेक्षा करतात ते त्यांना सांगणे आणि मुले जे काही निर्णय घेतील त्यांचे पुढे काय परिणाम होण्याची शक्यता आहे त्याबद्दल त्यांच्याशी बोलणे. त्यामुळे पालकांनो, तुमच्या मुलांना त्यांचे जीवन यहोवाला समर्पित करण्यास सगळ्यात चांगली मदत केवळ तुम्हीच करू शकता. ख्रिस्ती ओळख प्राप्त करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज आहे. अर्थात, आपल्या सर्वांनाच आपली “वस्त्रे” म्हणजे ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने असलेली आपली ओळख टिकवून ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी आपण देवाच्या स्तरांनुसार जीवन जगण्याचा आणि ख्रिस्ती गुण विकसित करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे.—प्रकटी. ३:४, ५; १६:१५.

चांगल्या कामाचे यहोवा “स्मरण” करतो

१९, २०. काय केल्याने यहोवा आपले स्मरण करेल?

१९ नहेम्याच्या काळात सेवा करणाऱ्‍या मलाखी संदेष्ट्याने म्हटले: “परमेश्‍वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही . . . लिहिण्यात आली.” (मला. ३:१६, १७) जे यहोवाबद्दल आदरयुक्‍त भय बाळगतात आणि त्याच्यावर प्रेम करतात अशांना तो कधीच विसरणार नाही.—इब्री ६:१०.

२० नहेम्याने अशी प्रार्थना केली: “हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.” (नहे. १३:३१) आपण वाईट संगती टाळण्याचा, यहोवाच्या कार्याला पाठिंबा देण्याचा, आध्यात्मिक गोष्टींना पहिले स्थान देण्याचा आणि आपली ख्रिस्ती ओळख टिकवून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला, तर नहेम्याप्रमाणे आपलेही नाव देवाच्या स्मरणवहीत लिहिले जाईल. तेव्हा, आपण विश्‍वासात आहोत की नाही याचे आपण परीक्षण करत राहू या. (२ करिंथ. १३:५) आपण जर यहोवासोबत असलेला आपला पवित्र नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच आपले स्मरण करेल.