व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राजा खूश झाला!

राजा खूश झाला!

आमच्या संग्रहातून

ऑगस्ट १९३६ ची गोष्ट. स्थान होते स्वाझीलँड देशाचे शाही क्रॉल (खेडे). रॉबर्ट आणि जॉर्ज निझ्बट यांनी साऊंड कारमधून (लाऊडस्पीकर बसवलेली कार) ध्वनिमुद्रित संगीत लावले व नंतर बंधू जे. एफ. रदरफर्डची ध्वनिमुद्रित भाषणे ऐकवली. तेव्हा राजा सोबूझा दुसरे भलतेच खूश झाले. जॉर्ज म्हणाले: “राजाला आमचा रेकॉर्ड प्लेयर, रेकॉर्ड्‌स आणि लाऊडस्पीकर विकत घ्यायचा होता, हे ऐकून आम्ही गोंधळात पडलो.” आता राजाला काय उत्तर द्यावे हा प्रश्‍न बांधवांना पडला.

[चित्राचे श्रेय]

रॉबर्ट यांनी पटकन विचार केला आणि दिलगिरी व्यक्‍त करून म्हटले की या गोष्टी विकण्यासाठी नाहीत. का? कारण या गोष्टी दुसऱ्‍याच्या मालकीच्या होत्या. तो कोण होता हे राजाला माहीत करून घ्यायचे होते.

रॉबर्ट यांनी त्यांना असे उत्तर दिले: “या वस्तू दुसऱ्‍या राजाच्या मालकीच्या आहेत.” तेव्हा, हा राजा कोण असे सोबूझा यांनी विचारले. रॉबर्ट म्हणाले “येशू ख्रिस्त, देवाच्या राज्याचा राजा.”

गाढ आदराने सोबूझा यांनी म्हटले, “तो खरोखरच एक थोर राजा आहे. त्याच्या मालकीच्या कोणत्याच गोष्टी मला नकोत.”

रॉबर्ट यांनी लिहिले: ‘प्रधान सरदार राजा सोबूझा यांचा स्वभाव पाहून मी खूप प्रभावित झालो. ते शुद्ध इंग्रजी बोलत होते. इतकं शुद्ध बोलता येत असल्याचा त्यांना जराही गर्व नव्हता. शिवाय ते अतिशय मनमिळाऊ होते व त्यांच्याशी संवाद करणंही अगदी सोपं होतं. मी त्यांच्यासोबत ४५ मिनिटं त्यांच्या कार्यालयात बसलो होतो. जॉर्ज बाहेर संगीत ऐकवत होता.’

रॉबर्ट पुढे म्हणतात, ‘नंतर, त्याच दिवशी आम्ही द स्वाझी नॅशनल स्कूल इथं गेलो. या ठिकाणी आम्हाला अगदी वेगळाच अनुभव आला. आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना साक्ष दिली व त्यांनी आमचं लक्षपूर्वक ऐकलं. आम्ही जेव्हा रेकॉर्ड प्लेयरचा उल्लेख केला व सगळ्या विद्यार्थ्यांना ते ऐकवण्याची इच्छा व्यक्‍त केली तेव्हा ते खूप खूश झाले. आणि त्यांनी जवळजवळ १०० विद्यार्थ्यांना बोलवलं. विद्यार्थ्यांनी गवतावर बसून ती ध्वनिमुद्रणे ऐकली. आम्हाला सांगण्यात आलं की या शाळेत मुलांना शेतकाम, बागकाम, सुतारकाम, बांधकाम, इंग्रजी व गणित शिकवलं जातं, तर मुलींना रोग्यांची शुश्रूषा करणं, घरकाम आणि अशी इतर उपयोगी कामं शिकवली जातात.’ ही शाळा राजा सोबूझा यांच्या आजीनं स्थापन केली होती. *

१९३६ साली स्वाझीलँडमध्ये एका जाहीर भाषणाला हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित राहिले

१९३३ पासूनच राजा सोबूझा, त्यांच्या शाही क्रॉलमध्ये येणाऱ्‍या पायनियर्सचे खूप आवडीने ऐकायचे. एका प्रसंगी तर राज्य संदेशाची ध्वनिमुद्रणे ऐकण्यासाठी त्यांनी त्यांच्या शंभर अंगरक्षकांना एकत्रित केले. त्या सर्वांनी स्वेच्छेने आपल्या मासिकांची वर्गणी केली व बांधवांजवळ जी प्रकाशने होती ती स्वीकारली. काही काळातच राजाजवळ आपल्या संस्थेच्या जवळजवळ सर्वच प्रकाशनांचा संग्रह तयार झाला. इतकेच काय, तर दुसऱ्‍या विश्‍व युद्धादरम्यान आपल्या प्रकाशनांवर ब्रिटिश सरकारने बंदी घातली, तरी त्यांनी आपला हा संग्रह सांभाळून ठेवला.

बरीच वर्षे राजा सोबूझा दुसरे हे लोबाम्बा येथील त्यांच्या शाही क्रॉलमध्ये साक्षीदारांचे स्वागत करत राहिले. काही वेळा तर ते बायबल आधारित भाषणे ऐकण्यास पाळकांनासुद्धा बोलवायचे. एका प्रसंगी, हेल्वी मशॉझी हा स्थानीय साक्षीदार मत्तय अध्याय २३ वर चर्चा करत असताना काही पाळक रागात उभे राहिले आणि जबरदस्तीने बांधवाला खाली बसवण्याचा प्रयत्न करू लागले. पण राजाने हस्तक्षेप केला आणि बंधू मशॉझी यांना चर्चा सुरू ठेवण्यास सांगितले. इतकेच नव्हे, तर या सबंध भाषणात उल्लेख केली जाणारी शास्त्रवचने श्रोत्यांनी लिहून घ्यावीत असे राजाने सांगितले.

दुसऱ्‍या प्रसंगी एका पायनियर बांधवाचे भाषण ऐकल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या चार पाळकांनी आपले कॉलर मागे फिरवले व असे म्हटले: “आम्ही आता पाळक नव्हे, तर यहोवाचे साक्षीदार आहोत.” राजा सोबूझाजवळ जी पुस्तके आहेत तशी पुस्तके तुमच्याजवळ आहेत का असे त्यांनी पायनियर बांधवाला विचारले.

१९३० च्या दशकापासून ते १९८२ मध्ये मृत्यू होईपर्यंत राजाने यहोवाच्या साक्षीदारांचा आदर केला आणि ते स्वाझी संस्कृती पाळत नसल्यामुळे त्यांचा छळ करण्याची कोणालाही अनुमती दिली नाही. म्हणून साक्षीदारांजवळ त्यांचे आभार मानण्याचे चांगले कारण होते आणि त्यांचा मृत्यू झाला तेव्हा साक्षीदारांना अतोनात दुःख झाले.

२०१३ च्या सुरुवातीला स्वाझीलँडमध्ये ३,००० पेक्षा जास्त राज्य प्रचारक होते. या देशाची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा थोडी जास्त असल्यामुळे प्रचारक-लोकसंख्या प्रमाण १:३८४ इतके होते. ९० मंडळ्यांमध्ये २६० पेक्षा जास्त पायनियर प्रचार कार्यात व्यस्त होते, आणि २०१२ ची स्मारक उपस्थिती ७,४९६ इतकी होती. यावरून दिसते की भविष्यात येथे वाढीस बराच वाव आहे. १९३० च्या दशकात स्वाझीलँडला दिलेल्या त्या सुरुवातीच्या भेटींमुळे नक्कीच एक बळकट पाया घातला गेला.—दक्षिण आफ्रिकेतील आमच्या संग्रहातून.

^ द गोल्डन एज, ३० जून १९३७, पृष्ठ ६२९.