व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या सूचना भरवशालायक आहेत

यहोवाच्या सूचना भरवशालायक आहेत

“परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करतो.”—स्तो. १९:७.

१. देवाचे लोक कोणत्या विषयांवर वेळोवेळी चर्चा करतात, आणि या विषयांचा पुन्हापुन्हा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?

 टेहळणी बुरूज अंकातील एखाद्या अभ्यास लेखाची तयारी करत असताना, ‘याविषयी तर आपण आधीही चर्चा केली होती’ असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? तुम्ही ख्रिस्ती सभांना काही काळापासून येत असाल, तर तुमच्या लक्षात आले असेल की काही विषयांवर पुन्हापुन्हा चर्चा केली जाते. देवाचे राज्य, खंडणी बलिदान, शिष्य बनवण्याचे कार्य, तसेच प्रीती व विश्‍वास यांसारखे गुण, अशा सर्व विषयांचा आपण सभांमध्ये वेळोवेळी अभ्यास करतो. या विषयांचा वारंवार अभ्यास केल्यामुळे आपल्याला विश्‍वासात सुदृढ राहण्यासच नव्हे, तर वचन ऐकून त्याप्रमाणे “आचरण” करण्यासही साहाय्य मिळते.—याको. १:२२.

२. (क) देवाचे “निर्बंध” काय आहेत? (ख) देवाच्या सूचना आणि मानवांचे कायदे यांत कोणता फरक आहे?

“निर्बंध” असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ देव त्याच्या लोकांना देत असलेले कायदे, नियम व सूचना असा होतो. मानवी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने बऱ्‍याचदा बदल करावे लागतात, पण यहोवाचे कायदेकानून हे नेहमीच भरवशालायक असतात. यांपैकी काही कायदे एखाद्या विशिष्ट काळात किंवा परिस्थितीत राहणाऱ्‍या लोकांना देण्यात आलेले असले, तरी ते कधीच चुकीचे किंवा निरुपयोगी ठरत नाहीत. स्तोत्र लिहिणाऱ्‍याने म्हटले: “तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत.”—स्तो. ११९:१४४.

३, ४. (क) यहोवाच्या सूचनांमध्ये काही वेळा कशाचा समावेश होतो? (ख) या सूचनांचे पालन केल्यास इस्राएली लोकांना कोणता फायदा होणार होता?

यहोवा देत असलेल्या सूचनांमध्ये काही वेळा इशारेवजा संदेशांचाही समावेश होतो. इस्राएल राष्ट्राला देवाच्या संदेष्ट्यांकडून वेळोवेळी असे इशारेवजा संदेश देण्यात आले. उदाहरणार्थ, इस्राएली लोक प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना मोशेने त्यांना हा इशारा दिला: “तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल. तसे केले तर परमेश्‍वराचा कोप तुमच्यावर [भडकेल].” (अनु. ११:१६, १७) देवाने त्याच्या लोकांना दिलेल्या अशा कितीतरी सूचना आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात.

इतरही अनेक प्रसंगी, यहोवाने इस्राएली लोकांना त्याचे भय मानण्याचा, त्याची वाणी ऐकण्याचा आणि त्याचे नाव पवित्र करण्याचा आर्जव केला. (अनु. ४:२९-३१; ५:२८, २९) त्यांनी देवाच्या या सूचनांचे पालन केल्यास त्यांना खात्रीने अनेक आशीर्वाद मिळणार होते.—लेवी. २६:३-६; अनु. २८:१-४.

इस्राएली लोकांनी देवाच्या सूचना पाळल्या का?

५. देव हिज्कीया राजाच्या बाजूने का लढला?

इस्राएल राष्ट्राच्या इतिहासात अनेक चढउतार आले, पण देव आपल्या लोकांना दिलेले वचन कधीही विसरला नाही. उदाहरणार्थ, अश्‍शूरी राजा सन्हेरीब याने यहुदावर हल्ला केला आणि हिज्कीया राजाचे राज्य उलथून पाडण्याची धमकी दिली, तेव्हा यहोवाने हिज्कीयाचे साहाय्य करण्यासाठी एका देवदूताला पाठवले. केवळ एकाच रात्री, देवाच्या या दूताने अश्‍शूरी सैन्यातील सर्व शूरवीरांचा विनाश केला. यामुळे, सन्हेरीबाची लाजिरवाणी स्थिती झाली आणि त्याला माघारी परतणे भाग पडले. (२ इति. ३२:२१; २ राजे १९:३५) देव हिज्कीया राजाच्या बाजूने का बरे लढला? कारण हिज्कीया “परमेश्‍वराला धरून राहिला. त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही; परमेश्‍वराने . . . ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या.”—२ राजे १८:१, ५, ६.

यहोवाच्या सूचनांमुळे योशीयाला खऱ्‍या उपासनेच्या स्थापनेकरता पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळाली (परिच्छेद ६ पाहा)

६. योशीयाने यहोवावर भरवसा असल्याचे कशा प्रकारे दाखवले?

ज्याने यहोवाच्या आज्ञांचे पालन केले होते असा आणखी एक जण म्हणजे राजा योशीया. आठ वर्षांच्या कोवळ्या वयातच, “परमेश्‍वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; . . . [तो] उजवीडावीकडे वळला नाही.” (२ इति. ३४:१, २) देशातून सर्व मूर्ती काढून टाकण्याद्वारे आणि खरी उपासना पुन्हा सुरू करण्याद्वारे योशीयाने यहोवावर भरवसा असल्याचे दाखवले. असे केल्यामुळे योशीयालाच नव्हे तर सबंध राष्ट्राला आशीर्वाद मिळाले.—२ इतिहास ३४:३१-३३ वाचा.

७. इस्राएली लोकांनी यहोवाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले तेव्हा काय परिणाम झाला?

पण, दुःखाची गोष्ट म्हणजे यहोवाच्या लोकांनी त्याच्या सूचनांवर पूर्ण भरवसा असल्याचे नेहमीच दाखवले नाही. अनेक शतकांच्या काळादरम्यान त्यांनी बऱ्‍याचदा यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले. यहोवावरील त्यांचा विश्‍वास कमी होऊ लागायचा तेव्हा ते सहजासहजी इतरांच्या प्रभावाला बळी पडून खोट्या देवतांची उपासना करायचे. (इफिस. ४:१३, १४) आणि आधीच भाकीत केल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा त्यांनी देवाच्या सूचनांवर भरवसा व्यक्‍त केला नाही, तेव्हा तेव्हा त्यांना खूप दुःखदायी परिणाम भोगावे लागले.—लेवी. २६:२३-२५; यिर्म. ५:२३-२५.

८. इस्राएली लोकांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

इस्राएली लोकांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? त्यांच्याप्रमाणेच देवाच्या आधुनिक काळातील सेवकांनाही सल्ला व मार्गदर्शन दिले जाते. (२ पेत्र १:१२) आपण देवाचे प्रेरित वचन वाचतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला त्यातून अनेक सूचना मिळतात. पण, निवड करण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे आपण एकतर यहोवाच्या आदेशांचे पालन करण्याचे ठरवू शकतो किंवा स्वतःला जे योग्य वाटते त्याप्रमाणेच वागण्याचे ठरवू शकतो. (नीति. १४:१२) तेव्हा, आपण यहोवाच्या सूचनांवर नेहमी भरवसा का ठेवू शकतो याची काही कारणे पाहू या आणि त्याच्या सूचनांचे पालन केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो यावरही विचार करू या.

देवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍यांना जीवन मिळेल

९. इस्राएली लोक अरण्यात असताना यहोवाने त्यांना कशा प्रकारे याचे आश्‍वासन दिले की तो त्यांच्यासोबत होता?

इस्राएली लोकांना ४० वर्षे भयानक अरण्यातून प्रवास करावा लागला. पण, या प्रवासादरम्यान यहोवा कशा प्रकारे त्यांचे मार्गदर्शन, संरक्षण व पालनपोषण करणार होता हे त्याने आधीपासूनच त्यांना स्पष्टपणे सांगितलेले नव्हते. तरीपण, यहोवाने वारंवार त्यांना हे दाखवून दिले की त्याच्यावर व त्याच्या मार्गदर्शनावर ते भरवसा ठेवू शकत होते. दिवसा मेघस्तंभाद्वारे आणि रात्री अग्नीच्या स्तंभाद्वारे यहोवाने इस्राएली लोकांना याची आठवण करून दिली की त्या खडतर परिस्थितीतून जात असताना तो सतत त्यांच्यासोबत होता. (अनु. १:१९; निर्ग. ४०:३६-३८) त्याने त्यांच्या मूलभूत गरजादेखील पुरवल्या. “त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत; त्यांच्या पायांस सूज आली नाही.” खरोखर, त्यांना “कशाचीही वाण पडली नाही.”—नहे. ९:१९-२१.

१०. आज यहोवा कशा प्रकारे आपल्या लोकांचे मार्गदर्शन करत आहे?

१० आज देवाचे सेवक एका नीतिमान नव्या जगाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. येणाऱ्‍या मोठ्या संकटातून जिवंत बचावण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची आवश्‍यकता असेल त्या यहोवा अवश्‍य पुरवेल असा भरवसा आपल्याला आहे का? (मत्त. २४:२१, २२; स्तो. ११९:४०, ४१) नव्या जगापर्यंत आपले मार्गदर्शन करण्यासाठी यहोवाने आज मेघस्तंभ किंवा अग्नीचा स्तंभ पुरवलेला नाही. पण, आज तो त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला जागृत राहण्यास साहाय्य करत आहे. उदाहरणार्थ, अलीकडच्या काळात आपल्याला वैयक्‍तिक बायबल वाचन करणे, कौटुंबिक उपासना करणे, तसेच सभांत व सेवाकार्यात नियमित रीत्या उपस्थित राहणे याविषयी वारंवार आठवण करून देण्यात आली आहे. या मार्गांनी यहोवासोबतचा आपला नातेसंबंध अधिक बळकट होतो. आपण या सूचनांचे पालन करण्यासाठी आपल्या जीवनात आवश्‍यक ते बदल केले आहेत का? असे केल्यामुळे आपल्याला दृढ विश्‍वास उत्पन्‍न करणे शक्य होईल; असा विश्‍वास, जो आपल्याला मोठ्या संकटातून जिवंत बचावून नव्या जगात प्रवेश करण्यास साहाय्य करेल.

यहोवाच्या सूचनांचे पालन केल्यामुळे राज्य सभागृहांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यास आपल्याला मदत मिळते (परिच्छेद ११ पाहा)

११. यहोवाला आपली काळजी आहे हे तो कोणकोणत्या मार्गांनी दाखवतो?

११ आपल्याला दिल्या जाणाऱ्‍या सूचना, आध्यात्मिक दृष्ट्या जागृत राहण्यास मदत करण्यासोबतच रोजच्या जीवनातही खूप उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, जीवनातील चिंता कमी करण्यासाठी आपल्याला धनसंपत्तीच्या मागे न लागण्याचा आणि साधे जीवन जगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, पेहरावासंबंधी, चांगले मनोरंजन निवडण्यासंबंधी तसेच किती प्रमाणात शिक्षण घ्यावे यासंबंधी आपल्याला बऱ्‍याच उपयोगी सूचना मिळाल्या आहेत. शिवाय, आपले घर, वाहने तसेच राज्य सभागृह सुरक्षित ठेवण्याबाबत व अचानक येणाऱ्‍या विपत्तींसाठी आधीच तयारी करण्याबाबतही बरेच उपयुक्‍त मार्गदर्शन देण्यात आले आहे. या सर्व मार्गदर्शनावरून देवाला आपली किती काळजी आहे हेच दिसून येते.

सूचनांमुळे सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना विश्‍वासू राहण्यास मदत मिळाली

१२. (क) येशू त्याच्या शिष्यांशी कोणत्या विषयावर वारंवार बोलला? (ख) कोणत्या नम्र कृत्यामुळे पेत्राच्या मनावर खोल छाप पडली आणि याचा आपल्यावर कसा परिणाम व्हायला पाहिजे?

१२ पहिल्या शतकात, देवाच्या लोकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. येशूने वारंवार त्याच्या शिष्यांना नम्रता उत्पन्‍न करण्याच्या महत्त्वाविषयी सांगितले. पण, नम्र असणे म्हणजे काय हे येशूने आपल्या शिष्यांना केवळ सांगितलेच नाही तर त्याने आपल्या कृतीतून त्यांना हे दाखवले. पृथ्वीवर एक मानव या नात्याने त्याच्या शेवटल्या दिवशी येशूने आपल्या शिष्यांना वल्हांडण साजरा करण्यासाठी एकत्र केले. त्याचे प्रेषित भोजन करत असताना येशू उठला आणि त्याने त्या सर्वांचे पाय धुतले. सहसा हे काम घरातील सेवक करत असे. (योहा. १३:१-१७) या नम्र कृत्याची शिष्यांच्या मनावर खोल छाप पडली. त्या भोजनाच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रेषित पेत्राने सुमारे ३० वर्षांनंतर आपल्या सहविश्‍वासू बांधवांना नम्रतेविषयी सल्ला दिला. (१ पेत्र ५:५) येशूच्या उदाहरणामुळे आपल्या सर्वांना एकमेकांसोबत नम्रतेने व्यवहार करण्याचे प्रोत्साहन मिळाले पाहिजे.—फिलिप्पै. २:५-८.

१३. येशूने आपल्या शिष्यांना कोणता महत्त्वाचा गुण उत्पन्‍न करण्याच्या गरजेविषयी सांगितले?

१३ येशू शिष्यांसोबत ज्या आणखी एका विषयावर बरेचदा चर्चा करायचा तो म्हणजे दृढ विश्‍वासाची गरज. एकदा शिष्यांना दुरात्म्याच्या प्रभावाखाली असलेल्या एका मुलातून भुतास काढून टाकता आले नाही तेव्हा त्यांनी येशूला विचारले, “आम्हाला ते का काढता आले नाही?” तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले: “तुमच्या अल्पविश्‍वासामुळे; कारण मी तुम्हास खचित सांगतो की, जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्‍वास असला तर . . . तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही.” (मत्त. १७:१४-२०) विश्‍वास हा किती महत्त्वाचा गुण आहे याविषयी येशूने त्याच्या सबंध सेवाकार्यादरम्यान शिष्यांना शिकवले. (मत्तय २१:१८-२२ वाचा.) आज आपल्याला अधिवेशनांत, संमेलनांत व ख्रिस्ती सभांत बरेच उभारणीकारक मार्गदर्शन दिले जाते. आपला विश्‍वास बळकट करण्याच्या या सुसंधींचा आपण पुरेपूर फायदा घेतो का? या सभा म्हणजे केवळ आपल्या बांधवांसोबत आनंदाने एकत्र येण्याचे प्रसंग नव्हेत; तर यहोवावरील आपला भरवसा व्यक्‍त करण्याचे हे प्रसंग असतात.

१४. आज ख्रिस्तासारखी प्रीती उत्पन्‍न करणे महत्त्वाचे का आहे?

१४ आपण एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे याविषयी सबंध ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत आपल्याला वारंवार आठवण करून देण्यात आली आहे. येशूने म्हटले की “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर” ही दुसरी मोठी आज्ञा आहे. (मत्त. २२:३९) त्याच प्रकारे, येशूचा सावत्र भाऊ याकोब याने प्रीतीला “राजमान्य नियम” म्हटले. (याको. २:८) प्रेषित योहानाने लिहिले: “प्रियजनहो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहीत नाही; परंतु जी आज्ञा तुम्हास प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो.” (१ योहा. २:७, ८) योहान या ठिकाणी “जुनी आज्ञा” असे कशाच्या संदर्भात म्हणत होता? तर एकमेकांवर प्रेम करा या आज्ञेच्या संदर्भात तो बोलत होता. ही आज्ञा “जुनी” या अर्थाने होती, की येशूने ती कित्येक दशकांपूर्वी म्हणजे “प्रारंभापासून” दिली होती. पण, ती “नवी” आज्ञादेखील होती, कारण या आज्ञेनुसार शिष्यांना प्रत्येक नव्या परिस्थितीत गरज पडेल त्यानुसार आपल्या बांधवांवर निःस्वार्थ प्रेम दाखवायचे होते. आज जगात सर्वत्र स्वार्थी वृत्ती दिसून येते. अशा वृत्तीमुळे शेजाऱ्‍याबद्दलचे आपले प्रेम कमी होऊ नये म्हणून आपल्याला वेळोवेळी जे इशारे दिले जातात त्यांबद्दल ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने आपण किती कृतज्ञ असले पाहिजे!

१५. पृथ्वीवर असताना येशूचे सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते होते?

१५ येशूने लोकांबद्दल व्यक्‍तिशः प्रेम दाखवले. त्याने रोग्यांना बरे केले आणि मृतांना पुन्हा जिवंत केले तेव्हा लोकांबद्दल त्याला असलेली आस्था स्पष्टपणे दिसून आली. पण लोकांना शारीरिकदृष्ट्या बरे करणे हे येशूचे सर्वात महत्त्वाचे कार्य नव्हते. लोकांच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव पडला तो त्याच्या प्रचाराच्या व शिकवण्याच्या कार्यामुळे. आपण असे का म्हणू शकतो? पहिल्या शतकात येशूने ज्यांना बरे केले होते आणि मृतांतून उठवले होते ते पुढे काही काळानंतर म्हातारे होऊन मरण पावले. पण, ज्यांनी येशूच्या शिकवणींकडे लक्ष देऊन आपल्या जीवनात बदल केले त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली.—योहा. ११:२५, २६.

१६. आज राज्य प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे कार्य किती प्रमाणात केले जात आहे?

१६ येशूने पहिल्या शतकात ज्याची सुरुवात केली होती ते प्रचाराचे कार्य आज अधिकच मोठ्या प्रमाणात केले जात आहे. येशूने त्याच्या शिष्यांना अशी आज्ञा दिली होती: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” (मत्त. २८:१९) या आज्ञेनुसार येशूच्या शिष्यांनी खरोखरच सर्व राष्ट्रांतील लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि आज आपणही सांगत आहोत. सत्तर लाखांपेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार आज या कार्यात सक्रिय आहेत. ते २३० पेक्षा जास्त देशांमध्ये देवाच्या राज्याबद्दल आवेशाने लोकांना सांगत आहेत आणि नियमित रीत्या लाखो लोकांसोबत बायबलचा अभ्यास करत आहेत. या प्रचार कार्यावरून स्पष्टपणे दिसून येते की आपण शेवटल्या काळात राहत आहोत.

आज यहोवावर भरवसा दाखवा

१७. पौलाने व पेत्राने कोणता सल्ला दिला?

१७ सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यांमुळे त्यांना विश्‍वासात सुदृढ राहण्यास मदत मिळाली. प्रेषित पौलाने रोममध्ये बंदिवासात असताना तीमथ्याला “ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो . . . दृढपणे राख” असे सांगितले. पौलाकडून मिळालेल्या या सूचनेमुळे तीमथ्याला किती प्रोत्साहन मिळाले असेल याची कल्पना करा. (२ तीम. १:१३) प्रेषित पेत्राने आपल्या ख्रिस्ती बांधवांना धीर, बंधुप्रेम व संयम यांसारखे गुण उत्पन्‍न करण्याचे प्रोत्साहन दिल्यावर असे म्हटले: “जरी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हास प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहा तरी तुम्हाला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी काळजी घेईन.”—२ पेत्र १:५-८, १२.

१८. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले?

१८ खरोखर, पौलाने व पेत्राने लिहिलेल्या पत्रांद्वारे, “पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची” बांधवांना आठवण करून देण्यात आली. (२ पेत्र ३:२) पहिल्या शतकातील आपल्या बांधवांना हे मार्गदर्शन देण्यात आले तेव्हा त्यांना राग आला का? नाही, कारण हे मार्गदर्शन म्हणजे देवाच्या प्रेमाचा पुरावा होता. आणि त्याद्वारे त्यांना “आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत” जाण्यास साहाय्य मिळाले.—२ पेत्र ३:१८.

१९, २०. आपण यहोवाच्या सूचनांवर भरवसा का ठेवला पाहिजे आणि असे केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?

१९ आज यहोवा त्याचे वचन, बायबल याद्वारे देत असलेल्या मार्गदर्शनावर पूर्ण भरवसा ठेवण्याची कितीतरी कारणे आपल्याजवळ आहेत. बायबलमधील माहिती नेहमीच अचूक असते. (यहोशवा २३:१४ वाचा.) देवाने अपरिपूर्ण मानवांशी हजारो वर्षांच्या काळादरम्यान कशा प्रकारे व्यवहार केला आहे याची माहिती आपल्याला बायबलमधून मिळते. हा इतिहास आपल्या फायद्याकरता लिहून ठेवण्यात आला आहे. (रोम. १५:४; १ करिंथ. १०:११) तसेच, बायबलमधील भविष्यवाण्यांची पूर्णता होताना आपण पाहिली आहे. उदाहरणार्थ, पूर्वीच भाकीत करण्यात आल्याप्रमाणे, “शेवटल्या दिवसांत” खरोखरच लाखो लोक यहोवाची शुद्ध उपासना करण्यासाठी त्याच्या संघटनेत आले आहेत. (यश. २:२, ३) जगातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवरूनही बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण होत असल्याचे दिसून येते. तसेच, यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे सबंध जगात मोठ्या प्रमाणावर चाललेले प्रचाराचे कार्यदेखील येशूच्या शब्दांची पूर्णता होत असल्याचा स्पष्ट पुरावा आहे.—मत्त. २४:१४.

२० आपल्या निर्माणकर्त्याने आजवर हे दाखवून दिले आहे की तो जे काही सांगतो त्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. मग आपण यहोवाकडून मिळणाऱ्‍या सूचनांपासून फायदा करून घेतो का? आपण यहोवाच्या सूचनांवर पूर्ण विश्‍वास ठेवला पाहिजे. रोझलिन नावाच्या एका बहिणीने असेच केले. ती सांगते: “मी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू लागले तेव्हा तो किती प्रेमळपणे माझा सांभाळ करत आहे आणि मला बळ देत आहे याची मला आणखी स्पष्टपणे जाणीव होऊ लागली.” आपणही यहोवाच्या सूचनांचे पालन करण्याद्वारे अशाच प्रकारे फायदा करून घेऊ या.