व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनात सुज्ञ निर्णय घ्या

जीवनात सुज्ञ निर्णय घ्या

“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.”—नीति. ३:५.

१, २. निर्णय घेण्याबाबत तुम्हाला कसे वाटते, आणि तुम्ही यापूर्वी घेतलेल्या काही निर्णयांबाबत तुमचे काय मत आहे?

 दररोज आपल्याला कितीतरी निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेण्याबाबत तुम्हाला कसे वाटते? काही जण आपल्या जीवनाशी संबंधित सर्व लहानमोठे निर्णय स्वतःच घेऊ इच्छितात. आपल्याला स्वतःचे सर्व निर्णय घेण्याचा हक्क आहे असे त्यांना वाटते. त्यामुळे इतरांनी त्यांच्यासाठी निर्णय घेतलेले त्यांना मुळीच आवडत नाही. दुसरीकडे पाहता, असेही काही लोक आहेत जे दररोजचे लहानमोठे निर्णय तर घेतात; पण, जीवनात महत्त्वाचे निर्णय घेण्याची मात्र त्यांना भीती वाटते. निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला मिळावा म्हणून ते मार्गदर्शक पुस्तकांची व जाणकार लोकांची मदत घेतात आणि यासाठी ते बराच पैसाही खर्च करायला तयार असतात.

आपल्यापैकी बहुतेक जण या दोन्ही गटांत बसत नाहीत. आपण हे ओळखतो की काही निर्णय घेण्याचा आपल्याला हक्क नाही; पण दुसरीकडे पाहता जीवनातील बऱ्‍याच गोष्टींबाबत आपण स्वतःच्या आवडीनुसार निर्णय घेऊ शकतो. (गल. ६:५) अर्थात, आपण घेतलेले सर्वच निर्णय सुज्ञ आणि फायदेकारक नसतात हे कदाचित आपण मान्य करू.

३. निर्णय घेण्यास आपल्याला कोणती मदत पुरवण्यात आली आहे, पण तरीसुद्धा निर्णय घेणे कधीकधी कठीण का जाऊ शकते?

यहोवाचे सेवक या नात्याने आपण खरोखर आनंदी आहोत कारण त्याने आपल्याला जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींसंबंधी सुस्पष्ट मार्गदर्शन पुरवले आहे. या मार्गदर्शनाचे पालन केल्यास आपल्याला असे निर्णय घेता येतील, ज्यांमुळे यहोवाला तर आनंद होईलच पण आपल्यालाही फायदा होईल. तरीपण, वेळोवेळी आपल्यासमोर अशा समस्या व प्रसंग येतात ज्यांबद्दल देवाच्या वचनात स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. अशा वेळी काय करावे हे आपण कसे ठरवू शकतो? उदाहरणार्थ, बायबल सांगते की आपण चोरी करू नये. (इफिस. ४:२८) पण, काहींचे असे मत आहे की एखादी वस्तू तुमची नसली, तरीही ती जास्त मौल्यवान नसल्यास किंवा तुम्हाला त्या वस्तूची खूप गरज असल्यास तुम्ही ती घेऊ शकता. ती चोरी ठरणार नाही. तर मग, एखाद्या बाबतीत कोणत्याही स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत असे वाटते, तेव्हा काय करावे हे आपण कसे ठरवू शकतो? कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकेल?

योग्य रीत्या विचार करण्याची क्षमता विकसित करा

४. निर्णय घेताना आपल्याला कदाचित कोणता सल्ला देण्यात आला असेल?

आपण एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत असे एखाद्या बांधवाला सांगितल्यास, कदाचित तो आपल्याला सांगेल की आपण नीट विचार केल्यावरच निर्णय घ्यावा. बांधवाने दिलेला हा सल्ला योग्यच आहे. कारण घाईगडबडीत निर्णय घेण्यासंबंधी बायबलमध्ये आपल्याला असा इशारा देण्यात आला आहे: “जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्‌याकडे धाव घेतो.” (नीति. २१:५) पण, योग्य निर्णय घेण्यासाठी फक्‍त पुरेसा वेळ घेणे, सर्व बाजूंनी विचार करणे, वाजवी दृष्टिकोन बाळगणे आणि सर्व माहिती नीट समजून घेणे इतकेच पुरेसे आहे का? चांगला निर्णय घेण्यासाठी या सर्व गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, पण आणखी कशाची तरी गरज आहे.

५. शंभर टक्के योग्यपणे विचार करण्याची क्षमता आपल्यापैकी कोणालाही उपजत मिळालेली नाही, असे का?

अगदी शंभर टक्के योग्यपणे विचार करण्याची क्षमता आपल्यापैकी कोणालाही उपजत मिळालेली नाही. असे का? कारण आपण सर्व जण जन्मतःच पापी व अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे, आपले शरीर व बुद्धी पूर्णपणे निर्दोष आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. (स्तो. ५१:५ रोम. ३:२३) शिवाय, यहोवाबद्दल आणि त्याच्या नीतिनियमांबद्दल शिकून घेण्याअगोदर आपल्यापैकी बऱ्‍याच जणांची मने सैतानाने “आंधळी” केली होती. (२ करिंथ. ४:४; तीत ३:३) म्हणूनच, एखाद्याने बराच वेळ नीट विचार केला आणि त्याला जे योग्य व रास्त वाटते त्याच्या आधारावर निर्णय घेतला, तरीसुद्धा त्याच्या हातून चुकीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.—नीति. १४:१२.

६. योग्य रीत्या विचार करण्यास कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?

आपण जरी शरीराने व मनाने परिपूर्ण नसलो, तरी आपला स्वर्गीय पिता यहोवा सर्व दृष्टींनी परिपूर्ण आहे. (अनु. ३२:४) आनंदाची गोष्ट म्हणजे, आपल्या मनाचे रूपांतर करून योग्य रीत्या विचार करण्यास आपली मदत करण्यासाठी यहोवाने आवश्‍यक तरतुदी केल्या आहेत. (२ तीमथ्य १:७ वाचा.) ख्रिस्ती या नात्याने आपण सुज्ञपणे विचार व तर्क करू इच्छितो आणि समंजसपणे वागू इच्छितो. म्हणूनच, आपण आपल्या विचारांवर व भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि यहोवाच्या विचारांचे, भावनांचे आणि कार्यांचे अनुकरण केले पाहिजे.

७, ८. दबावांना किंवा समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा आपण चांगला निर्णय घेऊ शकतो हे कोणत्या अनुभवावरून दिसून येते?

एक उदाहरण पाहू या. दुसऱ्‍या देशात राहायला गेलेल्यांपैकी काही लोकांमध्ये, लहान बाळांना त्यांच्या मायदेशी नातेवाइकांकडे पाठवून देण्याची प्रथा आहे. असे केल्यामुळे, बाळाच्या आईबाबांना परदेशात काम करत राहणे आणि पैसा कमवणे शक्य होते. * परदेशात राहणाऱ्‍या एका स्त्रीने एका गोड मुलाला जन्म दिला. त्याच सुमारास तिने बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि तिला मिळत असलेल्या ज्ञानाचे ती आपल्या जीवनात पालनदेखील करू लागली. ओळखीचे लोक आणि नातेवाईक तिला व तिच्या पतीला सांगू लागले की प्रथेनुसार बाळाला घरी पाठवले पाहिजे, जेणेकरून आजी-आजोबा त्याचे संगोपन करू शकतील. पण या स्त्रीला बायबल अभ्यासातून समजले होते की यहोवाने बाळाचे संगोपन करण्याची जबाबदारी तिला व तिच्या पतीला दिली आहे. (स्तो. १२७:३; इफिस. ६:४) इतर जण गळ घालत असल्यामुळे तिने बाळाला मायदेशी पाठवण्याची प्रथा पाळावी का? की तिने बायबलमधून शिकलेल्या गोष्टींचे पालन करावे? असा निर्णय घेतल्यामुळे जास्त पैसा कमवता आला नाही, किंवा इतरांनी तिची टीका केली तरीसुद्धा तिने आपल्या निर्णयावर ठाम राहावे का? तुम्ही तिच्या परिस्थितीत असता तर काय केले असते?

इतरांच्या दबावामुळे ती स्त्री खूप तणावात होती. त्यामुळे तिने यहोवाला प्रार्थना केली आणि आपले मार्गदर्शन करावे अशी त्याच्याकडे विनंती केली. तसेच, तिचा बायबल अभ्यास घेणाऱ्‍या बहिणीशी आणि मंडळीतील इतर बांधवांशीही तिने याविषयी चर्चा केली. यामुळे तिला तिच्या समस्येबाबत यहोवाचा दृष्टिकोन काय आहे हे समजण्यास मदत मिळाली. शिवाय, लहान वयात मुलांना आईवडिलांपासून दूर केल्यामुळे त्यांच्या मनावर होणाऱ्‍या वाईट परिणामांचाही तिने विचार केला. बायबलमधील मार्गदर्शनाच्या आधारावर जेव्हा तिने आपल्या समस्येचा विचार केला तेव्हा ती या निष्कर्षावर पोचली की बाळाला आजीआजोबांकडे पाठवणे योग्य ठरणार नाही. मुलाची काळजी घेण्यासाठी मंडळीतील बंधुभगिनींनी या जोडप्याची खूप मदत केली. आणि यामुळे तिचे बाळ खूप आनंदी व गुटगुटीत दिसू लागले. हे सर्व पाहून त्या स्त्रीचा पती अतिशय प्रभावित झाला. तो बायबलचा अभ्यास करण्यास तयार झाला आणि आपल्या पत्नीसोबत सभांनाही येऊ लागला.

९, १०. यहोवाच्या विचारसरणीचे अनुकरण करण्याचा काय अर्थ होतो आणि आपण हे कसे करू शकतो?

हे तर केवळ एक उदाहरण आहे. पण, यावरून हेच स्पष्ट होते की चांगला निर्णय घेण्यासाठी फक्‍त इतरांना किंवा आपल्याला काय वाटते किंवा कोणता मार्ग योग्य किंवा सोयीचा वाटतो एवढेच लक्षात घेऊन चालणार नाही. आपले अपरिपूर्ण मन कधीकधी अशा घड्याळासारखे असते जे एकतर वेळेच्या खूप पुढे किंवा मग खूप मागे चालत असते. अशा घड्याळातील वेळेनुसार आपण चाललो तर बऱ्‍याच गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. (यिर्म. १७:९) म्हणूनच, आपले विचार व भावना देवाच्या नीतिमान दर्जांशी सुसंगत आहेत की नाही याची आपण नेहमी खात्री केली पाहिजे.—यशया ५५:८, ९ वाचा.

१० बायबलमध्ये आपल्याला हा सुज्ञ सल्ला वाचायला मिळतो: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीति. ३:५, ६) “आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको” या वाक्याकडे लक्ष द्या. त्यानंतर म्हटले आहे की “आपल्या सर्व मार्गांत [यहोवाचा] आदर कर.” केवळ यहोवाचीच बुद्धी परिपूर्ण आहे. त्यामुळे, जेव्हाही आपल्याला एखादा निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा बायबलमधून देवाचा त्याविषयी काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मग त्याच्या आधारावर निर्णय घेतला पाहिजे. असे केल्यास आपण यहोवाच्या विचारसरणीचे अनुकरण करत असू.

ज्ञानेंद्रियांचा वापर करा

११. सुज्ञ निर्णय घेण्यासाठी एका व्यक्‍तीने काय केले पाहिजे?

११ सुज्ञ निर्णय घ्यायला शिकणे आणि मग घेतलेल्या निर्णयानुसार कार्य करणे सोपे नाही. खासकरून जे नवीनच सत्यात आले आहेत किंवा ज्यांनी आताआताच आध्यात्मिक प्रगती करण्यास सुरुवात केली आहे त्यांना हे खूप कठीण जाऊ शकते. पण, अशा व्यक्‍तीदेखील प्रगती करून प्रौढ बनू शकतात. बायबलमध्ये त्यांची तुलना चालायला शिकत असलेल्या लहान मुलांशी करण्यात आली आहे. लहान मूल चालायला कसे शिकते याचा जरा विचार करा. सुरुवातीला ते छोटी-छोटी पावले टाकण्याचा वारंवार प्रयत्न करते. आध्यात्मिकदृष्ट्या जे लहान मुलांसारखे आहेत आणि सुज्ञ निर्णय घ्यायला शिकत आहेत तेदेखील असेच करत असतात. प्रेषित पौलाने म्हटले की जे प्रौढ आहेत, त्यांच्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे.” या वचनांतील “वहिवाटीने” आणि “सराव” या दोन्ही शब्दांवरून सातत्याने आणि वारंवार प्रयत्न करण्याचा अर्थ सूचित होतो. सुज्ञ निर्णय घेण्यास शिकू इच्छिणाऱ्‍या नवीन लोकांनीही सातत्याने प्रयत्न करत राहण्याची गरज आहे.—इब्री लोकांस ५:१३, १४ वाचा.

आपण दररोजच्या जीवनातील लहानसहान गोष्टींत योग्य निवड करतो तेव्हा आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव मिळतो (परिच्छेद ११ पाहा)

१२. सुज्ञ निर्णय घेण्यास आपण कसे शिकू शकतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१२ याआधी उल्लेख केल्याप्रमाणे दररोज आपल्याला अनेक लहानमोठे निर्णय घ्यावे लागतात. संशोधकांचे म्हणणे आहे की आपण घेत असलेल्या निर्णयांपैकी जवळजवळ निम्मे निर्णय नीट विचार करून नव्हे, तर केवळ सवयीप्रमाणे घेत असतो. उदाहरणार्थ, दररोज सकाळी कोणते कपडे घालावेत हे कदाचित तुम्हाला ठरवावे लागत असेल. तुम्हाला ही अगदी लहानशी गोष्ट वाटत असेल. तुम्ही कदाचित जास्त विचार न करताच हा निर्णय घेत असाल, विशेषतः जेव्हा तुम्ही खूप घाईत असता तेव्हा. पण, तुम्ही जे कपडे घालणार आहात ते यहोवाच्या सेवकाला शोभणारे आहेत किंवा नाही याबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे. (२ करिंथ. ६:३, ४) तुम्ही कपडे खरेदी करायला जाता तेव्हा कदाचित तुम्ही सध्याच्या फॅशनचा विचार करत असाल; पण, शालीनता आणि किंमत यांचाही विचार करायला नको का? कपडे निवडताना योग्य निर्णय घेतल्यामुळे आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव मिळेल आणि त्यामुळे पुढे चालून आपल्याला जास्त महत्त्वाच्या बाबतींत सुज्ञ निर्णय घेणे सोपे जाईल.—लूक १६:१०; १ करिंथ. १०:३१.

योग्य ते करण्याची मनापासून इच्छा बाळगा

१३. घेतलेल्या निर्णयानुसार वागण्यास कोणती गोष्ट आपली मदत करेल?

१३ योग्य निर्णय घेतला तरीसुद्धा, त्या निर्णयानुसार वागणे नेहमीच सोपे नसते. उदाहरणार्थ, काही जणांना सिगारेट ओढण्याची सवय सोडायची असते. पण असे करण्याची तीव्र इच्छा नसल्यामुळे ती सवय सोडणे त्यांना शक्य होत नाही. योग्य मार्ग निवडल्यावर त्यानुसार चालण्यासाठी मनाचा पक्का निर्धार करणे आणि प्रामाणिक प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तर मग, घेतलेल्या निर्णयांना चिकटून राहण्यास आणि त्यानुसार वागण्यास मनाचा पक्का निर्धार करायला कोणती गोष्ट आपली मदत करेल? यहोवावर विसंबून राहिल्याने आपल्याला याबाबतीत मदत मिळेल.—फिलिप्पैकर २:१३ वाचा.

१४. पौलाला योग्य कृती करण्याचे बळ कशामुळे मिळाले?

१४ योग्य कृती करणे किती कठीण असू शकते हे पौलाला त्याच्या स्वतःच्या अनुभवावरून कळले होते. त्याने एकदा म्हटले की: “इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.” त्याला काय करावेसे वाटत होते आणि त्याने काय करायला पाहिजे हे त्याला माहीत होते, पण तरीही काही वेळा तो ते करू शकत नव्हता. त्याने कबूल केले: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.” पण, पौलाची परिस्थिती अगदीच निराशाजनक होती का? मुळीच नाही. त्याने म्हटले: “आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोम. ७:१८, २२-२५) आणखी एका ठिकाणी पौलाने असे लिहिले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पै. ४:१३.

१५. आपण योग्य निर्णय घेऊन त्यानुसार कृती का केली पाहिजे?

१५ देवाचे मन आनंदित करण्यासाठी आपण योग्य निर्णय घेऊन त्यानुसार कृती केली पाहिजे. कर्मेल पर्वतावर बआल देवतेच्या उपासकांना आणि अविश्‍वासू बनलेल्या इस्राएल लोकांना एलीयाने काय म्हटले होते हे तुम्हाला आठवत असेल: “तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्‍वर [“यहोवा,” NW] हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” (१ राजे १८:२१) इस्राएली लोकांना माहीत होते, की त्यांनी केवळ यहोवाची उपासना केली पाहिजे. पण तरीही योग्य निर्णय न घेतल्यामुळे ते दोन मतांमध्ये लटपटत होते. याउलट कित्येक वर्षांपूर्वी यहोशवाने याबाबतीत फार चांगले उदाहरण मांडले. त्याने इस्राएली लोकांना म्हटले: “यहोवाची सेवा करणे हे तुम्हाला वाईट वाटत असेल तर ज्याची तुम्ही सेवा करणार त्याला आज आपल्यासाठी निवडून घ्या; . . . मी व माझे घराणे, आम्ही तर यहोवाचीच सेवा करू.” (यहो. २४:१५, पं.र.भा.) यामुळे यहोशवा व त्याच्या घराण्याला कोणता आशीर्वाद मिळाला? त्यांना “दुधामधाचे प्रवाह वाहत” होते त्या वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याचा आशीर्वाद मिळाला.—यहो. ५:६.

सुज्ञ निर्णय घेतल्यास तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील

१६, १७. यहोवाच्या दृष्टीने जे योग्य ते करण्याचा निर्णय आपण घेतो तेव्हा कोणते आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात?

१६ नुकताच बाप्तिस्मा झालेल्या एका बांधवाला व त्यांच्या पत्नीला तीन लहान मुले आहेत. बांधवाला जेमतेमच पगार मिळायचा. पण, त्यांनी ही नोकरी मुद्दाम निवडली होती कारण त्यांना शनिवार-रविवारची सुटी मिळायची आणि यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासोबत सभांना व सेवाकार्याला जाणे शक्य व्हायचे. एकदा, बांधवासोबत काम करणाऱ्‍या एकाने असे सुचवले की आपण दोघेही दुसऱ्‍या कंपनीची नोकरी धरू या, जेथे आपल्याला चांगला पगार आणि इतर सवलती मिळतील. बांधवाने याविषयी विचार केला आणि प्रार्थनादेखील केली. त्यांना जाणीव झाली की नवी नोकरी धरल्यास शनिवार-रविवारची सुटी लगेच मिळणार नाही. तुम्ही या बांधवाच्या जागी असता, तर काय केले असते?

१७ या निर्णयामुळे यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कसा परिणाम होईल याचा विचार केल्यावर बांधवाने जास्त पगाराची ती नोकरी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल त्यांना नंतर पस्तावा झाला असेल असे तुम्हाला वाटते का? नाही, त्यांना मुळीच पस्तावा झाला नाही. त्यांना जाणीव झाली की केवळ आणखी पैसा मिळवण्याबद्दल विचार करण्याऐवजी, त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने यहोवासोबतचा नातेसंबंध आणखी घनिष्ट करणे जास्त महत्त्वाचे आहे. या बांधवाच्या दहा वर्षीय मुलीने जेव्हा आपल्या आईबाबांवर, बंधुभगिनींवर आणि यहोवावर खूप प्रेम असल्याचे सांगितले, आणि बाप्तिस्मा घेऊन आपले जीवन यहोवाला समर्पित करण्याची इच्छा व्यक्‍त केली, तेव्हा बांधवाला व त्यांच्या पत्नीला मनापासून आनंद झाला. या बांधवाने यहोवाच्या उपासनेला जीवनात पहिले स्थान देण्याद्वारे आपल्या मुलांसमोर उत्तम उदाहरण मांडल्यामुळेच त्यांच्या मुलीला यहोवाची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली.

सुज्ञ निर्णय घ्या आणि देवाच्या लोकांसोबत आनंदाने सेवा करा (परिच्छेद १८ पाहा)

१८. दररोजच्या जीवनात सुज्ञ निर्णय घेणे महत्त्वाचे का आहे?

१८ इस्राएली लोक अरण्यातून जात असताना ज्या प्रकारे मोशेने त्यांचे नेतृत्व केले होते त्याच प्रकारे मागील कित्येक वर्षांपासून येशू ख्रिस्त सैतानाच्या या जगात देवाच्या लोकांचे नेतृत्व करत आहे. लवकरच सैतानाच्या जगाचा नाश केला जाईल. त्यानंतर, यहोशवाने ज्या प्रकारे इस्राएली लोकांना वचन दिलेल्या देशात नेले, त्याच प्रकारे येशू आपल्या अनुयायांना वचन दिलेल्या नीतिमान नव्या जगात नेईल. (२ पेत्र ३:१३) तो दिवस खूप जवळ असल्यामुळे आपण आपली जुनी विचारसरणी, सवयी, तत्त्वे व ध्येये यांकडे परत जाणे निश्‍चितच शहाणपणाचे ठरणार नाही. आज यहोवा आपल्याकडून कशा प्रकारचे जीवन जगण्याची अपेक्षा करतो हे आपण अगदी स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे. (रोम. १२:२; २; २ करिंथ. १३:५) तेव्हा, दररोजच्या जीवनात सुज्ञ निर्णय घ्या आणि यहोवा जिला सर्वकाळ आशीर्वादित करेल अशा प्रकारची व्यक्‍ती बना.—इब्री लोकांस १०:३८, ३९ वाचा.

^ आजी-आजोबांना ओळखीच्या लोकांसमोर व नातेवाइकांसमोर नातवंडे मिरवता यावीत हेदेखील या प्रथेमागचे एक कारण आहे.