व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पायनियरिंगमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो

पायनियरिंगमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो

“आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे.”—स्तो. १४७:१.

१, २. (क) आपल्या प्रिय व्यक्‍तीचा विचार करण्याद्वारे व तिच्याबद्दल बोलण्याद्वारे काय घडू शकते? (सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

 आपल्या प्रिय व्यक्‍तीचा विचार करण्याद्वारे व तिच्याबद्दल बोलण्याद्वारे तिच्यासोबतचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत होतो. यहोवा देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयीसुद्धा हेच म्हणता येईल. एक मेंढपाळ या नात्याने दाविदाने कित्येक रात्री आकाशातील तारे पाहण्यात घालवल्या आणि हे तारे निर्माण करणारा किती अतुलनीय आहे यावर मनन केले. त्याने म्हटले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे याच्याकडे पहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?” (स्तो. ८:३, ४) तसेच, आध्यात्मिक इस्राएलाविषयी असलेला यहोवाचा उद्देश किती अद्‌भुत रीत्या पूर्ण होत आहे हे पाहून प्रेषित पौलाने म्हटले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे!”—रोम. ११:१७-२६, ३३.

जेव्हा आपण सेवाकार्यात भाग घेतो तेव्हा आपण यहोवाचा विचार करतो व त्याच्याबद्दल बोलतो. असे केल्यामुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो. पूर्णवेळेची सेवा करणाऱ्‍यांपैकी कित्येकांना याची जाणीव झाली आहे की सेवाकार्यात जास्त वेळ घालवल्यामुळे देवावरचे त्यांचे प्रेम आणखी गहिरे झाले आहे. तुम्ही सध्या पूर्णवेळेची सेवा करत असाल किंवा पूर्णवेळ सेवा करण्याचे ध्येय गाठण्यासाठी कार्य करत असाल तर याचा विचार करा: पूर्णवेळेची सेवा केल्यामुळे यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध कसा मजबूत होऊ शकतो? तुम्ही जर पायनियर असाल तर स्वतःला विचारा: ‘या खास सेवेत टिकून राहण्यासाठी कोणती गोष्ट मला मदत करेल?’ तुम्ही जर पायनियर नसाल तर स्वतःला असे विचारा, ‘पायनियर सेवा सुरू करता यावी म्हणून मी कोणते फेरबदल करू शकतो?’ पूर्णवेळेची सेवा केल्यामुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध कोणकोणत्या मार्गांनी मजबूत होतो हे विचारात घेऊ या.

पूर्णवेळेची सेवा आणि देवासोबतचा आपला नातेसंबंध

३. देवाच्या राज्यात मिळणार असलेल्या आशीर्वादांबद्दल सेवाकार्यात बोलल्यामुळे आपल्यावर कसा परिणाम होतो?

भविष्यात देव मानवांना जे आशीर्वाद देणार आहे त्यांची चर्चा इतरांसोबत करण्याद्वारे आपण यहोवाच्या जवळ जातो. तुम्हाला घरोघरच्या सेवाकार्यात कोणते शास्त्रवचन दाखवायला आवडते? स्तोत्र ३७:१०, ११; दानीएल २:४४; योहान ५:२८, २९; किंवा प्रकटीकरण २१:३, ४ यांपैकी एखादे तुमचे आवडते वचन आहे का? या वचनांत दिलेली अभिवचने आपण जितक्यांदा इतरांना सांगतो, तितक्यांदा आपल्याला याची आठवण होते की यहोवा खरोखर “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा उदार देव आहे. ही गोष्ट आपल्याला त्याच्या आणखी जवळ नेते.—याको. १:१७.

४. जेव्हा आपण इतरांना सत्याबद्दल सांगतो तेव्हा देवाच्या चांगुलपणाबद्दल आपली कदर का वाढते?

लोक आध्यात्मिकदृष्ट्या किती दुःखी व निराधार आहेत हे पाहून सत्याबद्दलची आपली कदर आणखी वाढते. आज जगातील लोकांना यश व आनंद प्राप्त करण्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाही. कित्येक लोक आपल्या भविष्याबद्दल चिंता करतात आणि त्यांना काहीएक आशा नाही. ते आपल्या जीवनाचा अर्थ शोधत राहतात. शिवाय जे धार्मिक आहेत त्यांनासुद्धा बायबलविषयी फार कमी माहिती आहे. हे लोक प्राचीन काळातील निनवे शहरातील लोकांसारखे आहेत. (योना ४:११ वाचा.) आपण सेवाकार्यात लोकांशी जितके जास्त बोलतो तितकीच आपल्याला याची जाणीव होते की यहोवा आपली किती चांगल्या प्रकारे काळजी घेतो! (यश. ६५:१३) पण यहोवा केवळ आपल्या लोकांची काळजी घेत नाही, तर तो सर्वांनाच सांत्वन व खरी आशा मिळवण्याची संधी देतो. यावरून आपल्याला याची आठवण होते की आपला देव यहोवा खरोखरच किती चांगला आहे!—प्रकटी. २२:१७.

५. इतरांना आध्यात्मिक रीत्या मदत केल्यामुळे आपण आपल्या समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

इतरांना आध्यात्मिक रीत्या मदत केल्यामुळे स्वतःच्या समस्यांबद्दल वाजवीपेक्षा जास्त विचार न करण्यास सोपे जाते. उदाहरणार्थ, ट्रिशाच्या आईबाबांचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा तिने हे अनुभवले. ट्रिशा एक सामान्य पायनियर आहे. ती सांगते: “तो माझ्या जीवनात सर्वात दुःखद काळ होता.” एके दिवशी ती खूप निराश होती आणि तिला घरीच राहण्याची इच्छा होत होती, पण तरीसुद्धा ती बायबल अभ्यासासाठी गेली. ट्रिशा तीन मुलांसोबत बायबलचा अभ्यास करायची ज्यांची घरची परिस्थिती खूप वाईट होती. त्यांचे बाबा त्यांना कायमचे सोडून गेले होते आणि त्यांच्या मोठ्या भावाने त्यांच्याशी दुर्व्यवहार केला होता. ती म्हणते: “त्यांच्या दुःखांसमोर माझं दुःख काहीच नव्हतं. आम्ही अभ्यास करत असताना त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक यायची व ती आनंदाने हसायची. खासकरून त्यादिवशी मला असं वाटलं जणू ती मुलं यहोवानं दिलेली एक भेट आहे.”

६, ७. (क) बायबल सत्ये शिकवल्यामुळे आपला विश्‍वास कसा मजबूत होतो? (ख) बायबल विद्यार्थ्यांनी शास्त्रवचनांतील तत्त्वांनुसार त्यांच्या जीवनात बदल केल्याचे पाहून तुम्हाला कसे वाटते?

बायबलमधील सत्ये इतरांना शिकवल्यामुळे आपला विश्‍वास आणखी दृढ होतो. प्रेषित पौलाने त्याच्या काळातील यहुदी लोकांविषयी सांगितले, जे बोलायचे एक आणि करायचे एक. पौलाने म्हटले: “दुसऱ्‍याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय?” (रोम. २:२१) पण आज पायनियर असे करत नाहीत. सहसा त्यांच्याजवळ इतरांना सत्ये शिकवण्याच्या व बायबल अभ्यास चालवण्याच्या बऱ्‍याच संधी असतात. असे परिणामकारक रीत्या करता यावे म्हणून त्यांना दररोज अभ्यास करण्याची आणि कदाचित प्रचार कार्यात लोकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे. जनीन नावाची एक पायनियर बहीण म्हणते: “मला जेव्हा लोकांना सत्ये शिकवण्याची संधी मिळते, तेव्हा ती सत्ये माझ्या मनात आणखी खोलवर रुजतात. यामुळे माझा विश्‍वास सुस्त पडत नाही तर तो वाढतच राहतो.”

बायबल तत्त्वांना लागू केल्यामुळे बायबल विद्यार्थी त्याच्या जीवनात कशा प्रकारे बदल करतो, हे पाहून देवाच्या बुद्धीबद्दलची आपली कदर आणखी वाढते. (यश. ४८:१७, १८) यामुळे बायबल तत्त्वांना जीवनात लागू करण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो. ॲड्रीयाना नावाची एक पायनियर म्हणते: “लोक स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतात तेव्हा त्यांच्या जीवनात खूप समस्या येतात. पण, जेव्हा ते यहोवाच्या बुद्धीवर विसंबून राहतात, तेव्हा लगेच फायदे दिसून येतात.” तसेच, फिल नावाचा एक बांधव म्हणतो: “एके काळी स्वतःच्या बळावर बदलण्याचा प्रयत्न करूनही अयशस्वी ठरलेल्या लोकांमध्ये यहोवा कशा प्रकारे बदल घडवून आणतो हे आपल्याला पाहायला मिळते.”

८. सेवाकार्यात सहविश्‍वासू बंधुभगिनींसोबत कार्य केल्यामुळे आपल्यावर कसा प्रभाव पडू शकतो?

सेवाकार्यात सहविश्‍वासू बंधुभगिनींसोबत कार्य करण्याद्वारे आपण आध्यात्मिक रीत्या दृढ होतो. (नीति. १३:२०) अनेक पायनियर बराच वेळ सहविश्‍वासू बंधुभगिनींसोबत सेवाकार्य करतात. त्यामुळे त्यांना एकमेकांकडून “उत्तेजन” प्राप्त करण्याच्या जास्त संधी मिळतात. (रोम. १:१२; इब्री लोकांस १०:२४ वाचा.) लिसा नावाच्या एका पायनियर बहिणीने म्हटले: “नोकरीच्या ठिकाणी सहसा स्पर्धात्मक वृत्ती दिसून येते आणि लोकांमध्ये द्वेष असतो. ते एकमेकांविषयी वाईट बोलतात आणि घाणेरडी भाषा वापरतात. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सर्वांच्या पुढे राहण्याची इच्छा असते. केव्हाकेव्हा ख्रिस्ती असल्यामुळे ते तुमची चेष्टा-कुचेष्टाही करतात. पण सेवाकार्यात आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींसोबत कार्य केल्यामुळं खरंच खूप प्रोत्साहन मिळतं. दिवसाच्या शेवटी, मी कितीही थकलेली असले तरीसुद्धा मला टवटवीत वाटतं.”

९. पती-पत्नी सोबत मिळून पायनियर सेवा करतात तेव्हा त्यांचा विवाह कशा प्रकारे मजबूत होतो?

विवाहसोबत्याबरोबर पायनियर सेवा केल्यामुळे विवाहाची तीनपदरी दोरी आणखी मजबूत होते. (उप. ४:१२) मॅडलिन तिच्या पतीसोबत पायनियर सेवा करते. ती म्हणते: “मला आणि माझ्या पतीला सेवाकार्यात, आमचा दिवस कसा होता त्याविषयी बोलण्यास किंवा बायबल वाचनातून शिकलेल्या गोष्टी सेवाकार्यात कशा लागू करता येतील याविषयी बोलण्यास वेळ मिळतो. सोबत मिळून पायनियर सेवा केल्यामुळे आम्ही दिवसेंदिवस एकमेकांच्या आणखी जवळ येत आहोत.” तसेच, ट्रिशा म्हणते: “आम्ही पैशांवरून केव्हाही भांडत नाही कारण आम्हा दोघांना कर्जबाजारी व्हायची मुळीच इच्छा नाही. आमच्या दोघांचा सेवाकार्याचा आराखडा सारखाच असल्यामुळे, आम्ही दोघं मिळून पुनर्भेटी घेतो व बायबल अभ्यास चालवतो. यामुळं आमचा विवाह अधिक मजबूत झाला आहे.”

पूर्णवेळेच्या सेवाकार्यात आवेशाने सहभागी झाल्यामुळे समाधानी जीवन लाभते (परिच्छेद ९ पाहा)

१०. जेव्हा आपण देवाच्या राज्याला जीवनात प्रथम स्थान देतो आणि देवाचा पाठिंबा अनुभवतो, तेव्हा यहोवावरील आपल्या भरवशावर याचा काय परिणाम होतो?

१० देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिले स्थान दिल्यामुळे, आणि यहोवा आपल्याला कशा प्रकारे पाठिंबा देतो व आपल्या प्रार्थनांची उत्तरे देतो हे अनुभवल्यामुळे त्याच्यावरील आपला भरवसा आणखी वाढतो. सगळेच एकनिष्ठ ख्रिस्ती यहोवावर भरवसा ठेवतात. पण पायनियरांना याची जाणीव आहे की केवळ यहोवावर विसंबून राहिल्यानेच ते पुढेही पायनियर सेवा करत राहू शकतात. (मत्तय ६:३०-३४ वाचा.) कर्ट नावाचे बांधव आपली नोकरी सांभाळून पायनियर सेवा करतात आणि पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणूनही सेवा करतात. एकदा त्यांनी त्यांच्या घरापासून अडीच तास प्रवास करून, एका दुसऱ्‍या मंडळीला भेट देण्याची नेमणूक स्वीकारली. पण त्यांच्या कारमध्ये तिथे पोचण्याइतकेच इंधन होते, परतीच्या प्रवासासाठी नव्हते. शिवाय, त्यांचा पगार एका आठवड्यानंतर होणार होता. कर्ट म्हणतात: “मी योग्य निर्णय घेतला की नाही असा प्रश्‍न माझ्या मनात येऊ लागला.” प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर त्यांनी व त्यांच्या पायनियर पत्नीने तेथे जाऊन आपली नेमणूक पूर्ण करण्याचे ठरवले. देव आपल्या गरजा भागवेल असा भरवसा त्यांनी बाळगला. ते प्रवासासाठी निघणार तेवढ्यातच एका बहिणीने त्यांना फोन केला आणि म्हणाली की ती त्यांना एक भेट देऊ इच्छिते. या बहिणीने, त्या जोडप्याला परतीच्या प्रवासासाठी जितके पैसे लागणार होते अगदी तितकेच पैसे भेट म्हणून दिले. कर्ट म्हणतात: “जेव्हा अशा प्रकारचे अनुभव वारंवार येत राहतात तेव्हा आपल्याला ज्याची गरज असते त्या गोष्टी यहोवा पुरवतो हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो.”

११. पायनियर सेवा करणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतात?

११ पायनियर सेवा करणाऱ्‍यांना सहसा असे दिसून येते की, यहोवाची सेवा केल्यामुळे आणि त्याच्यासोबत घनिष्ट नातेसंबंध जोडल्यामुळे तो त्यांना भरभरून आशीर्वाद देतो. (अनु. २८:२) असे असले तरी पायनियर सेवा करताना काही आव्हानांचा सामना करावा लागतो. आदामाच्या बंडाळीमुळे देवाच्या प्रत्येक सेवकावर समस्या येतात. केव्हाकेव्हा समस्यांमुळे पायनियरांना काही काळाकरता पायनियर सेवा थांबवावी लागू शकते. पण सहसा या समस्या सोडवल्या किंवा टाळल्यादेखील जाऊ शकतात. पायनियरांना त्यांच्या विशेष सेवेत टिकून राहण्यासाठी कोणती गोष्ट मदत करेल?

पूर्णवेळेच्या सेवेत टिकून राहा

१२, १३. (क) एका पायनियरला तास पूर्ण करण्यास कठीण वाटत असेल तर त्याने काय केले पाहिजे? (ख) दररोज बायबलचे वाचन करणे, बायबलचा वैयक्‍तिक अभ्यास करणे आणि त्यावर मनन करणे इतके महत्त्वाचे का आहे?

१२ बहुतेक पायनियर खूप व्यस्त असतात. दिवसभरातील सर्व कामे पूर्ण करणे कठीण जाऊ शकते. त्यासाठी वेळेचे चांगल्या प्रकारे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. (१ करिंथ. १४:३३, ४०) जर एखाद्या पायनियरला त्याचे तास पूर्ण करणे कठीण जात असेल, तर तो त्याचा वेळ कसा खर्च करत आहे याचे परीक्षण त्याने केले पाहिजे. (इफिस. ५:१५, १६) तो स्वतःला विचारू शकतो: ‘मी मनोरंजनासाठी व आरामासाठी किती वेळ घालवतो आहे? स्वतःला शिस्त लावण्याची मला आणखी गरज आहे का? माझ्या नोकरीच्या वेळेत मी काही फेरबदल करू शकतो का?’ कधीकधी आपण स्वतःहून आपली कामे वाढवत असतो, याच्याशी सर्वच सहमत होतील. म्हणून, पूर्णवेळेच्या सेवेत असलेल्यांनी वरील प्रश्‍न नियमितपणे स्वतःला विचारले पाहिजेत आणि गरज असल्यास फेरबदल केले पाहिजेत.

१३ दररोज बायबल वाचन करणे, वैयक्‍तिक बायबल अभ्यास करणे आणि त्यावर मनन करणे या गोष्टींचा एका पायनियरच्या आराखड्यात समावेश असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी, पायनियरने महत्त्वाच्या गोष्टींसाठी राखून ठेवलेल्या वेळेत, कमी महत्त्वाच्या गोष्टी न करण्याची खबरदारी बाळगली पाहिजे. (फिलिप्पै. १:१०) उदाहरणार्थ असा विचार करा की एक पायनियर, दिवसभर प्रचार कार्य करून घरी परतला आहे. संध्याकाळी तो सभेची तयारी करण्याचे ठरवतो. पण सर्वात पहिले तो त्याला आलेली पत्रे वाचतो. मग तो कंप्युटर लावतो आणि त्याला आलेल्या ई-मेल्सची उत्तरे लिहितो. इंटरनेटवर असताना, तो एका साईटवर जातो. त्याला जी गोष्ट घ्यायची आहे त्याच्या किंमती कमी झाल्या आहेत की नाही हे तो पाहू लागतो. असे करताकरता जवळजवळ दोन तास जातात. आणि संध्याकाळी अभ्यास करण्याचे त्याने जे ठरवले होते, त्याची सुरुवातदेखील तो करू शकत नाही. ही एक समस्या आहे असे आपण का म्हणू शकतो? जर एका धावपटूला धावणे हे त्याचे कायमचे करियर बनवायचे असेल, तर त्याने नियमितपणे पौष्टिक आहार घेतलाच पाहिजे. तसेच, पायनियर सेवेत टिकून राहण्यासाठी एका पायनियरने नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास करत राहणे गरजेचे आहे.—१ तीम. ४:१६.

१४, १५. (क) पायनियरांनी त्यांचे जीवन साधे ठेवणे गरजेचे का आहे? (ख) एका पायनियरच्या समोर आव्हाने येतात तेव्हा त्याने काय केले पाहिजे?

१४ यशस्वी पायनियर साधे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. येशूने त्याच्या अनुयायांना भौतिक गोष्टींच्या मागे न लागता साधे जीवन जगण्याचे उत्तेजन दिले. (मत्त. ६:२२) त्याने स्वतः त्याचे जीवन साधे ठेवले जेणेकरून तो त्याचे सेवाकार्य विचलित न होता करू शकला. आणि त्यामुळेच तो म्हणू शकला: “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (मत्त. ८:२०) येशूचे अनुकरण करणारे पायनियर हे लक्षात ठेवतात की त्यांच्याकडे जितक्या भौतिक गोष्टी असतील तितकाच वेळ त्यांना या गोष्टींचा सांभाळ व दुरुस्ती करण्यासाठी द्यावा लागेल.

१५ पायनियर सेवा एक खास सेवा आहे या गोष्टीची जाणीव पायनियरांना आहे, पण आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत असा ते कधीही विचार करत नाहीत. उलट, आपल्याला जी देणगी किंवा जो विशेषाधिकार मिळतो तो यहोवाच्या अगाध कृपेमुळेच मिळतो याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे, पायनियर सेवेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक पायनियरने यहोवावर विसंबून राहणे महत्त्वाचे आहे. (फिलिप्पै. ४:१३) अर्थात, आव्हाने आणि समस्या येतील. (स्तो. ३४:१९) पण अशा वेळी, पायनियरांनी लगेचच हार न मानता यहोवाकडे मार्गदर्शन मागितले पाहिजे आणि त्याची मदत स्वीकारली पाहिजे. (स्तोत्र ३७:५ वाचा.) जेव्हा पायनियर देवाची प्रेमळ मदत अनुभवतील तेव्हा त्यांच्या प्रेमळ पित्यासोबतचा त्यांचा नातेसंबंध आणखी मजबूत होईल.—यश. ४१:१०.

तुम्ही पायनियर बनू इच्छिता का?

१६. तुम्हाला पायनियर बनायचे असेल तर तुम्ही काय केले पाहिजे?

१६ पूर्णवेळेच्या सेवाकार्यात असणाऱ्‍यांना जे आशीर्वाद मिळतात तेच आशीर्वाद जर तुम्हालाही अनुभवायचे असतील तर तुमची इच्छा यहोवाजवळ व्यक्‍त करा. (१ योहा. ५:१४, १५) सध्या जे पायनियर आहेत त्यांच्याशी बोला. पायनियर बनण्यास मदत करतील अशी ध्येये ठेवा. हीच गोष्ट कीथ आणि एरिका यांनी केली. ते दोघेही पूर्णवेळेची नोकरी करत होते, आणि त्यांच्या वयोगटातील बऱ्‍याच जोडप्यांप्रमाणे त्यांनीही लग्न झाल्याझाल्या घर आणि नवीन कार खरेदी केली. ते म्हणतात: “या गोष्टी आपल्याला मिळाल्या की आपण खूप खूश राहू असं आम्हाला वाटलं होतं, पण तसं काही झालंच नाही.” कीथला जेव्हा नोकरीवरून काढून टाकण्यात आले तेव्हा तो साहाय्यक पायनियर म्हणून सेवा करू लागला. तो म्हणतो: “सेवाकार्य केल्यामुळं किती समाधान मिळतं याची आठवण मला पायनियरिंगने करून दिली.” त्यांची अशा एका पायनियर जोडप्यासोबत चांगली मैत्री जमली ज्यांनी त्यांना, साध्या जीवनशैलीमुळे आणि पायनियरिंगमुळे किती आनंद मिळतो याची जाणीव करून दिली. मग कीथ आणि एरिका यांनी काय केले? “आम्ही आमच्या आध्यात्मिक ध्येयांची एक यादी बनवली आणि ती फ्रिजवर चिकटवली. आणि आम्ही जसजसं एकेक ध्येय पूर्ण करायचो तसतसं आम्ही त्या यादीत ✔ अशी खूण करायचो.” काही काळानंतर ते पायनियर सेवा सुरू करू शकले.

१७. पायनियरिंग करण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात किंवा राहणीमानात काही फेरबदल करणे चांगले का राहील?

१७ तुम्ही पायनियर बनू इच्छिता का? सध्या जरी तुम्हाला ते शक्य नसले तरी तुम्ही होता होईल तितके सेवाकार्य करण्याद्वारे यहोवाशी जवळीक वाढवू शकता. प्रार्थनापूर्वक विचार केल्यावर कदाचित तुमच्या लक्षात येईल की दैनंदिन जीवनात किंवा राहणीमानात काही फेरबदल केल्यास पायनियरिंग करणे तुम्हाला सोपे जाईल. पायनियर सेवा सुरू केल्यावर तुम्हाला जे समाधान मिळेल ते तुम्ही केलेल्या त्यागापेक्षा कित्येक पटीने जास्त असेल. राज्यासंबंधी कार्यांना जीवनात प्रथम स्थानी ठेवल्यामुळे आणि इतरांना मदत केल्यामुळे तुमचा आनंद वाढत जाईल. (मत्त. ६:३३) पुढे तुम्हाला यहोवाबद्दल विचार करण्याच्या आणि त्याच्याबद्दल बोलण्याच्या अधिकाधिक संधी मिळत जातील. असे केल्याने तुमचे यहोवावरील प्रेम आणखी वाढेल आणि तुम्ही त्याचे मन आनंदित करू शकाल.