व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा

वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा

“ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून दिला आहे.”—१ पेत्र २:२१.

१, २. (क) मेंढरांची नीट काळजी घेतली जाते तेव्हा काय परिणाम होतो? (ख) येशूच्या काळातील बरेच लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते असे का म्हणता येईल?

 मेंढपाळ आपल्या कळपातील मेंढरांकडे प्रेमाने लक्ष देतो तेव्हा मेंढरांचे आरोग्य उत्तम राहते. मेंढरांची काळजी कशी घ्यावी या विषयावरील एका पुस्तकात असे सांगितले आहे, की जो मेंढपाळ आपल्या कळपाला फक्‍त कुरणात चरण्यासाठी नेतो, पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्याची मेंढरे काही काळातच आजारी व दुबळी बनतात. पण जेव्हा मेंढपाळ प्रत्येक मेंढराची नीट काळजी घेतो तेव्हा कळपातील सर्व मेंढरे धष्टपुष्ट होतात.

त्याचप्रमाणे, देवाच्या कळपाचे मेंढपाळ जेव्हा प्रत्येक मेंढराकडे लक्ष देतात तेव्हा संपूर्ण मंडळी आध्यात्मिक रीत्या सुदृढ होते. तुम्हाला आठवत असेल, की लोकसमुदायाला पाहून येशूला त्यांचा कळवळा आला, कारण “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्त. ९:३६) त्यांची अशी दयनीय स्थिती का झाली होती? कारण लोकांना देवाचे नियमशास्त्र शिकवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, ते धार्मिक पुढारी अतिशय कठोर होते; ते लोकांकडून अवाजवी अपेक्षा करायचे आणि लोकांना जे काही शिकवायचे त्याच्या अगदी उलट वागायचे. अशा रीतीने, इस्राएल राष्ट्राच्या या धर्मपुढाऱ्‍यांनी त्यांच्या कळपातील लोकांना मदत करण्याऐवजी व त्यांची काळजी घेण्याऐवजी त्यांच्या खांद्यांवर “जड अशी ओझी” लादली.—मत्त. २३:४.

३. मंडळीतील वडिलांनी कोणती गोष्ट नेहमी मनात बाळगली पाहिजे?

आजच्या काळात ख्रिस्ती मेंढपाळांवर, म्हणजेच मंडळीतील वडिलांवर खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण, कळपातील मेंढरे ही मुळात यहोवा देवाच्या व ज्याने स्वतःला “उत्तम मेंढपाळ” म्हटले त्या येशूच्या मालकीची आहेत. (योहा. १०:११) येशूने स्वतःच्या “मूल्यवान रक्‍ताने” या मेंढरांना “विकत घेतलेले” आहे. (१ करिंथ. ६:२०; १ पेत्र १:१८, १९) त्याचे मेंढरांवर इतके प्रेम आहे की त्याने स्वखुषीने आपले जीवन त्यांच्याकरता अर्पण केले. वडिलांनी ही गोष्ट नेहमी मनात बाळगली पाहिजे, की ते देवाच्या प्रेमळ पुत्राच्या म्हणजेच, “मेंढरांचा महान मेंढपाळ” असलेल्या येशू ख्रिस्ताच्या हाताखाली मेंढपाळ म्हणून कार्य करत आहेत.—इब्री १३:२०.

४. या लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल?

तर मग, ख्रिस्ती मेंढपाळांनी कळपातील मेंढरांशी कशा प्रकारे व्यवहार करावा? मंडळीतील सदस्यांना पुढाकार घेणाऱ्‍या वडिलांच्या “आज्ञेत” राहण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. पण त्याच वेळेस वडिलांनाही अशी आज्ञा देण्यात आली आहे, की “त्यांच्या हाती सोपवलेल्या लोकांवर” त्यांनी “धनीपण” गाजवू नये. (इब्री १३:१७; १ पेत्र ५:२, ३ वाचा.) मग, वडील कळपावर धनीपण न गाजवता मंडळीत पुढाकार कसा घेऊ शकतात? दुसऱ्‍या शब्दांत, मंडळीतील वडील देवाने दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेत राहून मेंढरांची काळजी कशी घेऊ शकतात?

तो मेंढरांना “उराशी धरून वाहील”

५. यशया ४०:११ यातील उदाहरणावरून आपल्याला यहोवाबद्दल काय समजते?

यहोवाच्या संदर्भात यशया संदेष्ट्याने म्हटले: “मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्‍यांस संभाळून नेईल.” (यश. ४०:११) या उदाहरणावरून आपल्याला समजते की मंडळीत जे दुर्बळ व असहाय असतात त्यांची यहोवा विशेष काळजी घेतो. ज्याप्रमाणे मेंढपाळाला आपल्या कळपातील प्रत्येक मेंढराच्या विशिष्ट गरजांची जाणीव असते आणि ज्याप्रमाणे तो लगेच त्या गरजा पूर्ण करतो; त्याचप्रमाणे यहोवालाही मंडळीतील सर्वांच्या गरजांची जाणीव आहे आणि तो त्यांना आवश्‍यक मदत पुरवण्यास उत्सुक आहे. कधीकधी, मेंढपाळ नुकत्याच जन्मलेल्या कोकऱ्‍याला आपल्या कवेत घेतो. त्याच प्रकारे, आपण कठीण प्रसंगांना तोंड देत असतो, तेव्हा आपला दयाळू पिता यहोवा आपली विशेष काळजी घेतो. आपल्यावर एखादी कठीण परीक्षा येते किंवा आपण अडचणीत असतो तेव्हा यहोवा आपल्याला सांत्वन देतो.—२ करिंथ. १:३, ४.

६. वडील कशा प्रकारे यहोवाचे अनुकरण करू शकतात?

खरोखर, मंडळीतील वडील आपल्या स्वर्गीय पित्याकडून किती चांगला धडा शिकू शकतात! यहोवाप्रमाणेच त्यांनीही बांधवांच्या गरजांची जाणीव ठेवली पाहिजे. बांधवांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यांच्या कोणत्या गरजांकडे लगेच लक्ष पुरवण्याची गरज आहे हे वडिलांनी जाणून घेतले पाहिजे. असे केल्यास, बांधवांना आवश्‍यक प्रोत्साहन व साहाय्य देणे त्यांना शक्य होईल. (नीति. २७:२३) साहजिकच, यासाठी वडिलांनी बांधवांशी बोलण्यासाठी व त्यांचे ऐकून घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे. तसेच, मंडळीत त्यांना जे ऐकायला व पाहायला मिळते त्याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. अशा रीतीने, ते बांधवांच्या वैयक्‍तिक जीवनात लुडबूड न करता, “दुर्बळांना” प्रेमळपणे साहाय्य करू शकतील.—प्रे. कृत्ये २०:३५; १ थेस्सलनी. ४:११, १२.

७. (क) यहेज्केल व यिर्मयाच्या काळात देवाच्या मेंढरांना कशी वागणूक दिली जात होती? (ख) यहोवाने त्या काळातील मेंढपाळांचा जो निषेध केला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

पुरातन काळातील ज्या मेंढपाळांना देवाने दोषी ठरवले होते, ते कशा प्रकारची मनोवृत्ती दाखवत होते, याकडे लक्ष द्या. यहेज्केल व यिर्मया यांच्या काळात यहोवाने अशा मेंढपाळांची निंदा केली, ज्यांनी मेंढरांची काळजी घेतली नाही. या मेंढपाळांनी देवाच्या लोकांकडे लक्ष न दिल्यामुळे ते शत्रूंच्या हल्ल्यांना बळी पडले व त्यांची पांगापांग झाली. मेंढरांच्या गरजांकडे लक्ष देण्याऐवजी ते मेंढपाळ त्यांच्यावर अत्याचार करत होते आणि फक्‍त स्वतःचा स्वार्थ पाहत होते. (यहे. ३४:७-१०; यिर्म. २३:१) म्हणूनच, देवाने त्या मेंढपाळांचा निषेध केला. आज ख्रिस्ती धर्मजगताच्या पुढाऱ्‍यांबद्दलही यहोवाला तसेच वाटते. पण यावरून हेदेखील स्पष्ट होते, की मंडळीतील वडिलांनी यहोवाच्या कळपाची योग्य प्रकारे व प्रेमळपणे काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

“मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे”

८. बांधवांकडून चुका होतात तेव्हा त्यांना कशा प्रकारे सल्ला द्यावा हे येशूने त्याच्या उदाहरणावरून कसे दाखवले?

मानवी स्वभावामुळे कधीकधी मंडळीतील बंधुभगिनींना यहोवा त्यांच्याकडून काय अपेक्षा करतो हे स्पष्टपणे समजत नसेल. ते बायबलमधील तत्त्वांनुसार निर्णय घेत नसतील किंवा त्यांच्या वागणुकीवरून ते अजूनही आध्यात्मिक रीत्या प्रौढ नाहीत असे दिसून येत असेल. अशा वेळी वडिलांनी कशी प्रतिक्रिया दाखवावी? त्यांनी येशूचे अनुकरण केले पाहिजे. देवाच्या राज्यात आपल्यापैकी कोण सर्वात श्रेष्ठ असेल या प्रश्‍नावरून येशूच्या शिष्यांमध्ये वारंवार वाद व्हायचे. पण, त्यांच्यावर रागावण्याऐवजी येशू त्यांना योग्य प्रकारे विचार करण्यास मदत करत राहिला आणि नम्रता दाखवण्याविषयी त्यांना प्रेमळपणे सल्ला देत राहिला. (लूक ९:४६-४८; २२:२४-२७) शिष्यांचे पाय धुण्याद्वारे, नम्रता म्हणजे नेमके काय हे येशूने स्वतःच्या कृतीतून त्यांना दाखवले. आज ख्रिस्ती वडिलांनीदेखील नम्रता दाखवणे गरजेचे आहे.—योहान १३:१२-१५ वाचा; १ पेत्र २:२१.

९. प्रेषितांची अयोग्य विचारसरणी सुधारण्यासाठी येशूने काय म्हटले?

मेंढपाळ असणे म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणे असे याकोब व योहान या प्रेषितांचे मत होते. म्हणूनच, त्यांनी देवाच्या राज्यात आपल्याला श्रेष्ठ स्थान देण्यात यावे अशी येशूजवळ विनंती केली. पण त्यांची विचारसरणी अयोग्य होती हे दाखवण्यासाठी येशूने त्यांना म्हटले: “यहुदीतर लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडते आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते. पण तुमचे वागणे तसे नसावे! जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा दास झाले पाहिजे.” (मत्त. २०:२५, २६, ईझी-टू-रीड व्हर्शन) इतरांवर सत्ता गाजवण्याची किंवा इतरांवर हुकूम सोडून आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती प्रेषितांनी टाळायची होती.

१०. येशू वडिलांकडून काय अपेक्षा करतो, आणि या बाबतीत पौलाने उत्तम उदाहरण मांडले असे का म्हणता येईल?

१० येशूने आपल्या कळपाशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्याच प्रकारे ख्रिस्ती वडिलांनीही करावा अशी तो त्यांच्याकडून अपेक्षा करतो. बांधवांवर अधिकार गाजवण्याऐवजी वडिलांनी त्यांचे दास होऊन त्यांची सेवा करण्यास तयार असले पाहिजे. प्रेषित पौलाने अशा प्रकारची नम्र मनोवृत्ती दाखवली. इफिसस मंडळीच्या वडिलांना त्याने असे म्हटले: “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हाला ठाऊक आहे.” इफिसस मंडळीच्या वडिलांनीदेखील अशाच नम्र व प्रामाणिक भावनेने बांधवांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करावा अशी पौलाची इच्छा होती. म्हणूनच त्याने म्हटले: “सर्व गोष्टींत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे.” (प्रे. कृत्ये २०:१८, १९, ३५) करिंथ येथील बांधवांना पौलाने सांगितले की तो त्यांच्या विश्‍वासावर सत्ता गाजवू इच्छित नव्हता. उलट, त्यांना आनंदाने यहोवाची सेवा करता यावी म्हणून तो एक नम्र सहकारी या नात्याने कार्य करत होता. (२ करिंथ. १:२४) नम्र होऊन बांधवांसाठी परिश्रम करण्याच्या बाबतीत पौलाने आजच्या काळातील वडिलांकरता खरोखर एक उत्तम उदाहरण मांडले.

विश्‍वसनीय वचनाच्या आधारावर सल्ला द्या

११, १२. वडील एखाद्या बांधवाला निर्णय घेण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात?

११ मंडळीतील वडिलांनी बांधवांना नेहमी विश्‍वसनीय वचनाच्या म्हणजेच बायबलच्या आधारावर सल्ला दिला पाहिजे. (तीत १:९) पण, हे त्यांनी “सौम्य वृत्तीने” केले पाहिजे. (गलती. ६:१) मंडळीतील बांधवांवर विशिष्ट प्रकारे वागण्याची बळजबरी करण्याऐवजी, चांगले मेंढपाळ त्यांना मनापासून तसे वागण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, एखाद्या बांधवाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा त्याने बायबलमधील कोणती तत्त्वे विचारात घेतली पाहिजेत हे कदाचित वडील त्या बांधवाच्या लक्षात आणून देतील. त्या विषयावर संस्थेच्या प्रकाशनांत आलेल्या माहितीवर ते बांधवासोबत चर्चा करतील. तसेच, बांधवासमोर कोणकोणते पर्याय आहेत आणि ते पर्याय निवडल्यामुळे यहोवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होऊ शकेल, यावर विचार करण्याचे वडील त्या बांधवाला प्रोत्साहन देतील. शिवाय, कोणताही निर्णय घेण्याआधी प्रार्थना करून देवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे आहे यावरही वडील जोर देतील. (नीति. ३:५, ६) या सर्व गोष्टींची चर्चा केल्यानंतर, बांधवाच्या वतीने निर्णय घेण्याऐवजी वडील निर्णय घेण्याचे काम त्या बांधवावर सोडतील.—रोम. १४:१-४.

१२ ख्रिस्ती वडिलांना केवळ बायबलमध्ये जे सांगितले आहे तेच शिकवण्याचा अधिकार आहे. म्हणूनच त्यांनी बायबलचा निपुणतेने वापर केला पाहिजे आणि त्यात जे सांगितले आहे त्याला जडून राहिले पाहिजे. असे केल्यामुळे वडील आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्याचे टाळू शकतील. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की मेंढपाळ या नात्याने ते यहोवाच्या व येशूच्या हाताखाली कार्य करत आहेत. आणि शेवटी, मंडळीतील बंधुभगिनी जे निर्णय घेतात त्या निर्णयांबाबत त्यांना स्वतःलाच यहोवा देवाला व येशू ख्रिस्ताला जाब द्यावा लागेल.—गलती. ६:५, ७, ८.

“कळपाला कित्ते व्हा”

वडील आपल्या कुटुंबातील सदस्यांना सेवाकार्याची तयारी करण्यास साहाय्य करतात (परिच्छेद १३ पाहा)

१३, १४. वडिलांनी कोणकोणत्या बाबतींत कळपासाठी उदाहरण मांडले पाहिजे?

१३ मंडळीतील वडिलांनी त्यांच्या हाताखाली सोपवलेल्यांवर अधिकार गाजवू नये असा सल्ला दिल्यानंतर प्रेषित पेत्राने त्यांना “कळपाला कित्ते व्हा” असे प्रोत्साहन दिले. (१ पेत्र ५:३) वडील कशा रीतीने कळपाला कित्ते होऊ शकतात? “अध्यक्षाचे काम करू [पाहणाऱ्‍या]” बांधवाने ज्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत, त्यांपैकी दोन अटींचा विचार करा. पहिली, त्याने “स्वस्थचित्त” असले पाहिजे. याचा अर्थ, बायबलमधील तत्त्वांविषयी व ती जीवनात कशा प्रकारे लागू करावीत याविषयी त्याला स्पष्ट समज असली पाहिजे. तो उतावीळ नसून, त्याला शांतपणे विचार करून निर्णय घेता आले पाहिजेत. दुसरी अट ही, की तो “आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा” असा असला पाहिजे. बायबल म्हणते, “ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?” म्हणून, मंडळीतील एखाद्या वडिलाचे कुटुंब असल्यास त्याने आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे देखरेख केली पाहिजे. (१ तीम. ३:१, २, ४, ५) बांधवांना वडिलांमध्ये हे गुण दिसतात तेव्हा त्यांच्यावर भरवसा ठेवण्याची त्यांना प्रेरणा मिळते.

१४ क्षेत्र सेवेत पुढाकार घेण्याद्वारेही मंडळीतील वडील बांधवांपुढे चांगले उदाहरण ठेवतात. या बाबतीत येशूचे अनुकरणीय उदाहरण वडिलांसमोर आहे. पृथ्वीवर असताना येशूने राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराला खूप महत्त्व दिले. हे कार्य कसे करावे हे त्याने शिष्यांना आपल्या उदाहरणाद्वारे शिकवले. (मार्क १:३८; लूक ८:१) आज, जेव्हा प्रचारक वडिलांसोबत मिळून प्रचाराचे कार्य करतात तेव्हा त्यांना खूप प्रोत्साहन मिळते; या महत्त्वाच्या कार्याबद्दल वडिलांचा आवेश पाहून आणि लोकांना शिकवताना ते ज्या पद्धतींचा वापर करतात ते पाहून प्रचारकांना खूप काही शिकायला मिळते. वडिलांवर अनेक जबाबदाऱ्‍या असूनही जेव्हा ते प्रचाराच्या कार्यात आवेशाने सहभाग घेण्यासाठी परिश्रम करतात तेव्हा मंडळीतील सर्व बांधवांना असेच करण्याचे प्रोत्साहन मिळते. वडील मंडळीच्या सभांची चांगली तयारी करतात व त्यांत सहभाग घेतात. तसेच, राज्य सभागृहाची स्वच्छता व दुरुस्ती यांसारख्या इतर कार्यांतही उत्साहाने सहभाग घेतात. अशा प्रकारे, ते बांधवांकरता उत्तम उदाहरण मांडतात.—इफिस. ५:१५, १६; इब्री लोकांस १३:७ वाचा.

वडील क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेण्याच्या बाबतीत बांधवांसमोर उत्तम उदाहरण मांडतात (परिच्छेद १४ पाहा)

“अशक्‍तांना आधार द्या”

१५. वडील बांधवांना भेटी का देतात?

१५ एखाद्या मेंढराला दुखापत होते किंवा ते आजारी पडते तेव्हा चांगला मेंढपाळ लवकरात लवकर त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्याच प्रकारे, मंडळीत जे बांधव कठीण परिस्थितीतून जात असतात किंवा ज्यांना आध्यात्मिक साहाय्याची गरज असते, त्यांना वडिलांनी लवकरात लवकर मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वयोवृद्ध व आजारी बांधवांच्या शारीरिक गरजांकडे लक्ष देण्याची गरज असू शकते, पण त्यांना विशेषतः बायबलमधील मार्गदर्शनाची व प्रोत्साहनाची गरज असते. (१ थेस्सलनी. ५:१४) मंडळीतील तरुण सदस्य निरनिराळ्या समस्यांना तोंड देत असतील; उदाहरणार्थ, कदाचित ते “तरुणपणाच्या वासनांपासून” दूर पळण्याचा प्रयत्न करत असतील. (२ तीम. २:२२) अशा सर्वांना मदत करण्यासाठी वडिलांनी वेळोवेळी मंडळीतील सदस्यांना भेटी दिल्या पाहिजेत. बांधव कोणत्या अडचणींना तोंड देत आहेत हे जाणून घेणे आणि त्यांना ज्याद्वारे प्रोत्साहन मिळेल असा उपयुक्‍त सल्ला बायबलमधून देणे हा या भेटींचा उद्देश असला पाहिजे. बांधवांना वेळीच मदत दिली जाते तेव्हा, अनेक समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याआधीच सोडवल्या जाऊ शकतात.

१६. मंडळीतील एखाद्या सदस्याला आध्यात्मिक साहाय्याची गरज असते तेव्हा वडील काय करू शकतात?

१६ पण, कधीकधी समस्या वाढून मंडळीतील एखाद्या सदस्याचे आध्यात्मिक आरोग्य धोक्यात आल्यास काय? बायबल लेखक याकोब याने लिहिले, “तुम्हापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्‍वासाची प्रार्थना दुखणाइतास वाचवील आणि प्रभू त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.” (याको. ५:१४, १५) आध्यात्मिक रीत्या रोगी असलेल्या व्यक्‍तीने जरी स्वतःहून ‘वडिलांना बोलावले’ नाही, तरी त्यांना त्या व्यक्‍तीच्या परिस्थितीबद्दल माहिती मिळताच त्यांनी तिच्या मदतीला धावून आले पाहिजे. वडील कठीण प्रसंगांना तोंड देत असलेल्या व्यक्‍तींसोबत प्रार्थना करतात व त्यांच्यासाठी प्रार्थनेत विनंती करतात आणि त्यांना आवश्‍यक साहाय्य पुरवतात; असे करण्याद्वारे ते या बांधवांना आध्यात्मिक तजेला व प्रोत्साहन देतात.—यशया ३२:१, २ वाचा.

१७. वडील “महान मेंढपाळ” येशू याचे अनुकरण करतात तेव्हा कोणता परिणाम घडून येतो?

१७ ख्रिस्ती मेंढपाळ यहोवाच्या संघटनेत जे काही करतात त्यात ते “महान मेंढपाळ” येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्यास प्रयत्नशील असतात. जबाबदारीच्या जाणिवेने सेवा करणाऱ्‍या या वडिलांच्या आध्यात्मिक साहाय्यामुळे कळपातील सदस्यांना अनेक आशीर्वाद मिळतात व ते विश्‍वासात सुदृढ राहतात. या सर्व तरतुदींकरता आपण अतुलनीय मेंढपाळ असलेल्या यहोवा देवाची स्तुती करण्यास नक्कीच प्रवृत्त होतो.