व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 मुख्य विषय | आपल्याला देवाची गरज का आहे?

देवाबद्दल लोकांचा दृष्टिकोन

देवाबद्दल लोकांचा दृष्टिकोन

“देवाशिवाय तुम्ही सुखी आहात का? लक्षावधी लोक आहेत.” एका नास्तिकवादी गटाने अलीकडेच लावलेल्या एका जाहिरातीवरील हे शब्द आहेत. आपल्याला देवाची गरज नाही असे बहुधा त्यांना वाटते.

दुसरीकडे पाहता, अनेक जण देवाला मानण्याचा दावा तर करतात, पण त्यांच्या निर्णयांवरून असे दिसते जणू त्यांच्यासाठी तो असून नसल्यासारखा आहे. साल्वाटोरी फीझीकेलॉ नावाच्या एका कॅथलिक धर्मगुरूने आपल्या चर्चच्या सदस्यांविषयी म्हटले: “आमच्याकडे पाहून कुणालाही असं वाटणार नाही की आम्ही ख्रिश्चन आहोत, कारण आमची जीवनशैली आणि देवाला न मानणाऱ्या लोकांची जीवनशैली यात काहीच फरक नाही.”

काही जण इतके व्यस्त असतात की देवाचा विचार करायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यांच्या मते देव खूप दूर असून त्यांच्या जीवनात त्याला फारसे काही स्थान नाही. असे लोक फक्त संकटे आल्यावर किंवा गरजेच्या वेळीच त्याचा धावा करतात, जणू तो त्यांच्या दिमतीला हजर असणारा नोकरच आहे.

तर इतर काही जण त्यांच्या धार्मिक शिकवणींनुसार जीवन जगत नाहीत, कारण त्या शिकवणी व्यावहारिक नाहीत असे त्यांना वाटते. याचे केवळ एक उदाहरण विचारात घ्या. जर्मनीतील ७६ टक्के कॅथलिक असे मानतात की स्त्री-पुरुषाने लग्न न करता एकत्र राहणे मुळीच गैर नाही. पण, हा दृष्टिकोन त्यांच्या चर्चच्या आणि बायबलच्या अगदी उलट आहे. (१ करिंथकर ६:१८; इब्री लोकांस १३:४) अर्थात इतर धर्मांतील लोकांनाही जाणवते, की आज अनेक जण देवधर्म करण्याचा दावा करतात, पण त्यांच्या जीवनशैलीवरून तसे मुळीच दिसत नाही. अनेक धर्मगुरू खेदाने असे म्हणतात, की त्यांच्या धर्माचे सदस्य “अक्षरशः नास्तिक” लोकांसारखे वागतात.

या उदाहरणांवरून साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो: आपल्याला खरेच देवाची गरज आहे का? अर्थात हा काही नव्याने उद्भवलेला प्रश्न नाही. बायबलच्या सुरुवातीच्या अहवालांत तो पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्‍नाचे उत्तर पाहण्यासाठी आपण बायबलमधील उत्पत्तिच्या पुस्तकात उपस्थित केलेल्या वादविषयांकडे लक्ष देऊ या. (w13-E 12/01)