व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वैभवशाली राजा ख्रिस्त याचा जयजयकार करा!

वैभवशाली राजा ख्रिस्त याचा जयजयकार करा!

“प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो.”—स्तो. ४५:४.

१, २. स्तोत्र ४५ याचे आपण परीक्षण का केले पाहिजे?

एक वैभवशाली राजा सत्य व न्याय स्थापित करण्यासाठी आणि आपल्या शत्रूंना पराजित करण्यासाठी लढाई करण्यास निघतो. लढाईत अंतिम विजय मिळवल्यानंतर तो त्याच्या सुंदर वधूशी लग्न करतो. येणाऱ्या सर्व पिढ्या राजाच्या पराक्रमाची आठवण करतात व त्याचे गुणगान गातात. हाच खरेतर ४५ व्या स्तोत्राचा सारांश म्हणता येईल.

पण, ४५ वे स्तोत्र हे केवळ गोड शेवट असलेली एक रोमांचक गोष्ट नाही. या स्तोत्रात ज्या घटनांविषयी उल्लेख केला आहे त्यांचा आपल्या सध्याच्या व भविष्यातील जीवनाशी संबंध आहे. तो कसा, हे जाणून घेण्यासाठी आता आपण या स्तोत्राचे बारकाईने परीक्षण करू या.

“माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे”

३, ४. (क) आपण कशाविषयी घोषणा करतो आणि आपल्या मनावर याचा कसा परिणाम होतो? (ख) आपण कोणाविषयी लोकांना सांगतो आणि आपली जीभ कशा प्रकारे लेखणीप्रमाणे बनते?

स्तोत्र ४५:१ वाचा. ज्या “चांगल्या विचारांची” स्तोत्रकर्त्याच्या मनात “उकळी फुटली” आहे ते एका राजाच्या संबंधात आहेत. या विचारांमुळे स्तोत्रकर्ता इतका उत्साहित झाला आहे की त्याच्या हृदयात उकळी फुटली आहे आणि त्याची जीभ जणू एका “कुशल लेखकाची लेखणी” बनली आहे.

 आज आपल्या मनात कोणत्या “चांगल्या विचारांची” उकळी फुटली आहे? स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्याही मनात मशीही राज्याच्या सुवार्तेमुळे उत्साह निर्माण झाला आहे. विशेषतः १९१४ या वर्षी ही सुवार्ता अधिकच आनंददायक बनली. कारण तेव्हापासून आपण भविष्यात येणाऱ्या एका राज्याविषयी नव्हे, तर सध्या स्वर्गात राज्य करत असलेल्या एका खऱ्याखुऱ्या सरकाराविषयी घोषणा करू लागलो. हीच ती राज्याची सुवार्ता आहे जी आपण “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून . . . सर्व जगात” गाजवत आहोत. (मत्त. २४:१४) पण, राज्याच्या या संदेशामुळे आपल्या मनात खरोखरच “उकळी” फुटते का? आपण राज्याच्या सुवार्तेचा आवेशाने प्रचार करतो का? स्तोत्रकर्त्याने ज्या प्रकारे एका राजाविषयी काव्य रचले, त्याच प्रकारे आपण आपला राजा येशू ख्रिस्त याच्याविषयी लोकांना सांगतो. तो मशीही राज्याचा राजा या नात्याने सिंहासनावर आरूढ झाला आहे हे आपण सर्वांना सांगतो. तसेच, आपण जगातील सर्वांना, मग ते राजे असोत अथवा सामान्य लोक, आपण त्यांना ख्रिस्ताच्या राज्याला अधीन होण्याचे निमंत्रण देतो. (स्तो. २:१, २, ४-१२) आणि स्तोत्रकर्त्याप्रमाणेच आपलीही जीभ “कुशल लेखकाची लेखणी” बनते, ती या अर्थाने की आपल्या प्रचार कार्यात आपण देवाच्या लिखित वचनाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो.

आपला राजा येशू ख्रिस्त याच्याविषयीची सुवार्ता आपण आनंदाने लोकांना सांगतो

राजाच्या “मुखात प्रसाद भरला आहे”

५. (क) येशू कोणत्या अर्थाने “सुंदर” होता? (ख) राजाच्या “मुखात प्रसाद भरला” होता हे कोणत्या अर्थाने, आणि आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

स्तोत्र ४५:२ वाचा. बायबलमध्ये येशूच्या शारीरिक स्वरूपाबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. परिपूर्ण मनुष्य असल्याकारणाने तो नक्कीच “सुंदर” किंवा देखणा असावा. पण, खरेतर तो शेवटपर्यंत यहोवाला पूर्णपणे विश्वासू राहिला हेच त्याच्या अंगी असलेले सर्वात उल्लेखनीय सौंदर्य होते. शिवाय, त्याच्या “मुखात प्रसाद भरला” होता तो या अर्थाने, की त्याने अतिशय प्रभावी व कृपायुक्त शब्दांचा वापर करून राज्याच्या संदेशाचा प्रचार केला. (लूक ४:२२; योहा. ७:४६) आपणही प्रचार कार्यात त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करतो का? लोकांच्या मनाला भिडतील असे प्रभावी शब्द वापरण्याचा आपण प्रयत्न करतो का?—कलस्सै. ४:६.

६. देवाने कशा प्रकारे येशूला “सर्वकाळ धन्यवादित” केले?

येशूने अगदी मनापासून यहोवाची सेवा केल्यामुळे, त्याच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान यहोवाने त्याला आशीर्वादित केले; तसेच, त्याने बलिदान म्हणून आपले जीवन अर्पण केल्यानंतर यहोवाने त्याला मोठे प्रतिफळ दिले. प्रेषित पौलाने लिहिले: “मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन [येशूने] मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.” (फिलिप्पै. २:८-११) यहोवाने येशूचे पुनरुत्थान करून त्याला अमर जीवन बहाल केले आणि या अर्थाने त्याला “सर्वकाळ” आशीर्वादित केले.—रोम. ६:९.

राजाला त्याच्या “सोबत्यांपेक्षा” श्रेष्ठ करण्यात आले

७. कोणकोणत्या मार्गांनी येशूचा अभिषेक त्याच्या “सोबत्यांपेक्षा” श्रेष्ठ आहे?

स्तोत्र ४५:६, ७ वाचा. येशूला नीतिमत्त्व अतिशय प्रिय असल्यामुळे आणि त्याच्या पित्याचा ज्यांमुळे अनादर होईल अशा सर्व गोष्टींबद्दल त्याला द्वेष असल्यामुळे यहोवाने त्याला मशीही राज्याचा राजा म्हणून अभिषिक्त केले. येशूला त्याच्या “सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी  तेलाचा अभिषेक” करण्यात आला. हे सोबती कोण आहेत? ते दाविदाच्या वंशातील यहूदाचे राजे आहेत. कोणत्या अर्थाने येशूला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा अभिषेक करण्यात आला? पहिली गोष्ट म्हणजे येशूला स्वतः यहोवाने अभिषिक्त केले. शिवाय, त्याला केवळ राजा म्हणूनच नव्हे, तर प्रमुख याजक या नात्यानेही अभिषिक्त करण्यात आले. (स्तो. २:२; इब्री ५:५, ६) तसेच, येशूला तेलाने नव्हे तर पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला आणि त्याचे राज्य हे पृथ्वीवरील नसून स्वर्गीय राज्य आहे.

८. येशूचे राज्य न्याय्य आहे असे का म्हणता येईल, आणि त्याचे राज्य नीतिमत्त्वावर आधारित आहे असे आपण का म्हणू शकतो?

यहोवाने १९१४ साली स्वर्गात त्याच्या पुत्राला मशीही राजा या नात्याने सिंहासनावर बसवले. त्याचा “राजदंड सरळतेचा राजदंड आहे,” त्यामुळे त्याच्या राज्यात नीतिमत्त्व आणि न्याय असेल याची आपण खात्री बाळगू शकतो. त्याचा अधिकार न्याय्य आहे कारण यहोवाने स्वतः त्याला राज्य दिले आहे. शिवाय, येशूचे राजासन “युगानुयुगीचे आहे.” स्वतः देवाने नियुक्त केलेल्या अशा शक्तिशाली राजाला अधीन होऊन आपण यहोवाची सेवा करत आहोत या गोष्टीचा तुम्हाला अभिमान वाटत नाही का?

राजा “तरवार कंबरेला” बांधतो

९, १०. (क) ख्रिस्ताने तरवार कंबरेला केव्हा बांधली, आणि त्याने लगेच तिचा वापर कशा प्रकारे केला? (ख) ख्रिस्त भविष्यात आपल्या तरवारीचा वापर कशा प्रकारे करणार आहे?

स्तोत्र ४५:३ वाचा. यहोवा त्याच्या नियुक्त राजाला “आपली तरवार कंबरेला बांध” असे सांगतो. याचा अर्थ, देवाच्या सर्वोच्च अधिकाराला विरोध करणाऱ्या सर्वांविरुद्ध लढाई करून त्यांच्यावर देवाचे न्यायदंड बजावण्याची अनुमती व अधिकार तो येशूला देतो. (स्तो. ११०:२) ख्रिस्ताला “हे वीरा” असे संबोधण्यात आले आहे कारण तो अजिंक्य योद्धा व राजा आहे. त्याने १९१४ साली आपली तरवार कंबरेला बांधली आणि सैतान व त्याचे दुरात्मे यांच्यावर विजय मिळवून त्यांना स्वर्गातून पृथ्वीवर टाकून दिले.—प्रकटी. १२:७-९.

१० पण ही मशीही राजाच्या विजयशाली स्वारीची केवळ सुरुवात होती. तो भविष्यात “आणखी विजयावर विजय” मिळवणार आहे. (प्रकटी. ६:२) पृथ्वीवर सैतानाच्या संपूर्ण व्यवस्थेवर यहोवाचे न्यायदंड बजावणे आणि सैतान व त्याच्या दुरात्म्यांना निष्क्रिय करणे अद्याप बाकी आहे. सर्वप्रथम, खोट्या धर्मांचे जागतिक साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलचा नाश केला जाईल. या दुष्ट “कलावंतिणीचा” नाश करण्यासाठी यहोवाने राजकीय सत्ताधीशांचा वापर करण्याचे ठरवले आहे. (प्रकटी. १७:१६, १७) यानंतर, योद्धा व राजा असलेला ख्रिस्त सैतानाच्या राजकीय यंत्रणेकडे आपले लक्ष वळवेल आणि तिचा नाश करेल. मग, ख्रिस्त ज्याला “अथांग डोहाचा दूत” म्हणण्यात आले आहे, तो सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकण्याद्वारे पूर्णार्थाने विजय मिळवेल. (प्रकटी. ९:१, ११; २०:१-३) स्तोत्र ४५ मध्ये या रोमांचक घटनांचे कशा प्रकारे वर्णन केले आहे ते आता पाहू या.

राजा सत्य स्थापित करण्यासाठी लढाई करतो

११. ख्रिस्त कशा प्रकारे सत्य स्थापित करण्यासाठी स्वारी करतो?

११ स्तोत्र ४५:४ वाचा. योद्धा व राजा असलेला ख्रिस्त नवनवीन क्षेत्रांवर कब्जा मिळवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या राष्ट्रांच्या लोकांना आपल्या अधीन करण्यासाठी लढाई लढत नाही. तर, तो चांगले हेतू साध्य करण्यासाठी एक नीतिमान युद्ध लढतो. तो “सत्य, नम्रता व न्यायपरायणता यांच्या प्रीत्यर्थ” स्वारी करतो. यहोवा सबंध विश्वाचा सर्वोच्च अधिकारी आहे हे सर्वात मोठे सत्य कायमचे सिद्ध केले जाणे गरजेचे आहे. सैतानाने यहोवाविरुद्ध बंड केले, तेव्हा त्याने यहोवाच्या शासन करण्याच्या हक्काविषयी शंका उपस्थित केली होती. तेव्हापासून, दुरात्म्यांनी व मानवांनी यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचा विरोध केला आहे. आता मात्र यहोवाचा सर्वोच्च अधिकार कायमचा सिद्ध केला जाण्याची वेळ आली आहे आणि नेमके हेच करण्यासाठी त्याचा नियुक्त राजा स्वारी करतो.

१२. राजा कशा प्रकारे नम्रतेकरता स्वारी करतो?

१२ मशीही राजा नम्रतेकरताही स्वारी करतो. देवाचा  एकुलता एक पुत्र या नात्याने त्याने स्वतः नम्रतेचे आणि आपल्या पित्याच्या सर्वोच्च अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन राहण्याचे उत्तम उदाहरण मांडले. (यश. ५०:४, ५; योहा. ५:१९) तेव्हा, ख्रिस्ताच्या सर्व प्रजाजनांनीही त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करून सर्व बाबतींत यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला नम्रपणे अधीन झाले पाहिजे. जे असे करतील, केवळ त्यांनाच देवाने वचन दिलेल्या नव्या जगात राहू दिले जाईल.—जख. १४:१६, १७.

१३. ख्रिस्त कशा प्रकारे नीतिमत्त्व स्थापित करण्यासाठी लढाई करतो?

१३ तसेच, “न्यायपरायणता” किंवा नीतिमत्त्व स्थापित करण्यासाठीही ख्रिस्त लढाई करतो. तो देवाच्या नीतिमत्त्वाचे, अर्थात चांगले व वाईट यांविषयी यहोवाच्या दर्जांचे समर्थन करतो. (रोम. ३:२१; अनु. ३२:४) राजा येशू ख्रिस्त याच्याविषयी यशयाने असे भाकीत केले होते: “राजा धर्माने राज्य करेल.” (यश. ३२:१) येशूच्या राज्याद्वारे, देवाच्या अभिवचनाप्रमाणे “नवे आकाश व नवी पृथ्वी” येईल ज्यांत “नीतिमत्त्व वास” करेल. (२ पेत्र ३:१३) त्या नव्या जगातील प्रत्येक रहिवाशाकडून देवाच्या दर्जांनुरूप वागण्याची अपेक्षा केली जाईल.—यश. ११:१-५.

राजा “विस्मयकारक कार्ये” करतो

१४. ख्रिस्ताचा उजवा हात कशा प्रकारे “विस्मयकारक कार्ये” करेल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

१४ राजा स्वारी करत असताना त्याची तरवार त्याच्या कंबरेला बांधलेली आहे. (स्तो. ४५:३) मग ती तरवार बाहेर काढून, उजव्या हाताने ती चालवण्याची वेळ येते. स्तोत्रकर्त्याने असे भाकीत केले: “तुझा उजवा हात विस्मयकारक कार्ये करेल.” (स्तो. ४५:४, NW) हर्मगिदोनात येशू ख्रिस्त यहोवाचे न्यायदंड बजावण्यासाठी निघेल तेव्हा त्याच्या शत्रूंविरुद्ध तो “विस्मयकारक कार्ये” करेल. सैतानाच्या व्यवस्थेचा नाश करण्यासाठी येशू नेमक्या कोणत्या माध्यमांचा वापर करेल हे आपल्याला माहीत नाही. पण, ज्यांनी ख्रिस्ताच्या राज्याला अधीन होण्याविषयीच्या देवाकडील इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही असे सर्व लोक येशूने केलेल्या कारवाईमुळे भयभीत होतील. (स्तोत्र २:११, १२ वाचा.) अंतसमयाविषयीच्या भविष्यवाणीत येशूने असे म्हटले होते, की “भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील बळे डळमळतील.” पुढे त्याने म्हटले: “त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल.”—लूक २१:२६, २७.

१५, १६. लढाईत ख्रिस्ताच्या मागोमाग जाणाऱ्या सैन्यांत कोणाकोणाचा समावेश असेल?

१५ न्यायदंड बजावण्यासाठी मशीही राजा कशा प्रकारे “पराक्रमाने व मोठ्या वैभवाने” येईल याबद्दल प्रकटीकरणाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती. त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते; तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवेल; आणि सर्वसमर्थ देव याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवतो.”—प्रकटी. १९:११, १४, १५.

१६ ख्रिस्ताच्या मागोमाग चालणाऱ्या स्वर्गातील ‘सैन्यांत’ कोणाचा समावेश असेल? येशूने जेव्हा सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून घालवण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या तरवारीचा उपयोग केला होता, तेव्हा त्याच्यासोबत “त्याचे दूत” होते. (प्रकटी. १२:७-९) त्यामुळे, हर्मगिदोनाच्या युद्धातही ख्रिस्ताच्या सैन्यांत त्याच्या पवित्र दूतांचा समावेश असेल असा निष्कर्ष आपण काढू शकतो. त्याच्या सैन्यांत आणखीही कोणाचा समावेश असेल का? येशूने त्याच्या अभिषिक्त बांधवांना असे वचन दिले होते: “जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन, आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवेल.” (प्रकटी. २:२६, २७) त्याअर्थी, ख्रिस्ताच्या  सैन्यांत त्याचे अभिषिक्त बांधवदेखील असतील ज्यांना तोपर्यंत स्वर्गीय प्रतिफळ मिळालेले असेल. सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार गाजवताना ख्रिस्त “विस्मयकारक कार्ये” करेल तेव्हा त्याचे अभिषिक्त सहराजेदेखील त्याच्यासोबत असतील.

राजा पूर्णार्थाने विजय मिळवतो

१७. (क) ख्रिस्त पांढऱ्या घोड्यावर स्वारी करत आहे याचा काय अर्थ होतो? (ख) तरवार आणि धनुष्य कशास सूचित करतात?

१७ स्तोत्र ४५:५ वाचा. मशीही राजा एका पांढऱ्या घोड्यावर बसून स्वारी करत आहे. याचा अर्थ यहोवाच्या दृष्टीने ही लढाई पवित्र व न्यायीपणाला धरून असलेली लढाई आहे. (प्रकटी. ६:२; १९:११) तरवारीसोबतच राजाजवळ धनुष्यदेखील आहे. अहवाल सांगतो: “मी पाहिले तो एक पांढरा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला.” तरवार आणि धनुष्य या दोन्ही गोष्टी, ख्रिस्त त्याच्या शत्रूंविरुद्ध न्यायदंड बजावण्यासाठी ज्या माध्यमांचा वापर करेल त्यांस सूचित करतात.

पृथ्वीची सफाई करण्यासाठी पक्ष्यांना बोलावले जाईल (परिच्छेद १८ पाहा)

१८. ख्रिस्ताचे “बाण” कोणत्या अर्थाने “तीक्ष्ण” असतील?

१८ स्तोत्रकर्ता आलंकारिक भाषेत असे भाकीत करतो की राजाचे “बाण तीक्ष्ण आहेत,” ते “शत्रूंच्या हृदयात शिरतात.” तसेच लोक त्याच्यापुढे “चीत होतात.” हर्मगिदोनात देवाच्या सर्व शत्रूंचा संहार केला जाईल. यिर्मयाच्या भविष्यवाणीत असे भाकीत केले आहे: “त्या दिवशी परमेश्वराने संहारलेले, पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील.” (यिर्म. २५:३३) याच संदर्भात आणखी एका भविष्यवाणीत असे म्हटले आहे: “मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले; तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरांस उच्च वाणीने म्हणाला: या, देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा; राजांचे मांस, सरदारांचे मांस, बलवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस, आणि स्वतंत्र व दास, लहानमोठे, अशा सर्वांचे मांस खावयास या.”—प्रकटी. १९:१७, १८.

१९. ख्रिस्त कशा प्रकारे “प्रतापाने स्वारी” करेल आणि तो कशा प्रकारे पूर्णार्थाने “विजयशाली” होईल?

१९ सैतानाच्या पृथ्वीवरील दुष्ट व्यवस्थेचा नाश केल्यानंतर ख्रिस्त पूर्णार्थाने “विजयशाली” होण्यासाठी “प्रतापाने स्वारी” करेल. (स्तो. ४५:४) राज्यशासनाच्या सबंध हजार वर्षांच्या काळासाठी सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकून देण्याद्वारे तो आपल्या शत्रूंवर अंतिम विजय मिळवेल. (प्रकटी. २०:२, ३) तेव्हा दियाबल व त्याचे दुरात्मे मृत्यूसारख्या निष्क्रिय अवस्थेत गेल्यामुळे पृथ्वीवरील सर्व रहिवाशी सैतानाच्या दुष्ट प्रभावापासून मुक्त होतील आणि आपल्या विजयशाली व वैभवशाली राजाला पूर्णपणे अधीन होतील. यानंतर, सबंध पृथ्वी हळूहळू एका सुंदर नंदनवनात रूपांतरित होताना ते पाहू शकतील. पण, त्याअगोदर ते राजा ख्रिस्त व १,४४,००० यांच्यासोबत एका खास घटनेचा आनंद साजरा करतील. या आनंददायक घटनेविषयी पुढील लेखात चर्चा केली जाईल.