व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

पहिल्या शतकातील यहुदी कोणत्या आधारावर मशीहाची “वाट पाहत” होते?

बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या दिवसांत “लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्व जण योहानाविषयी आपल्या मनात विचार करत असत.” (लूक ३:१५) त्या वेळी मशीहा प्रकट होईल अशी अपेक्षा यहुदी का करत होते? याची अनेक कारणे आहेत.

येशूचा जन्म झाल्यानंतर, यहोवाचा दूत बेथलेहेमजवळ रानात आपल्या कळपांची राखण करत असलेल्या मेंढपाळांसमोर प्रकट झाला. (१) त्या देवदूताने अशी घोषणा केली: “तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभू आहे.” (लूक २:८-११) त्यानंतर, “स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, * ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”—लूक २:१३, १४.

या घोषणेमुळे नम्र मनाच्या त्या मेंढपाळांवर नक्कीच चांगला प्रभाव पडला. ते लगेच बेथलेहेमला गेले आणि जेव्हा त्यांनी योसेफ, मरीया आणि बाळ येशूला पाहिले तेव्हा “त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले.” परिणामस्वरूप, “ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले.” (लूक २:१७, १८) “ऐकणारे सर्व जण” या शब्दांवरून दिसून येते, की हे मेंढपाळ योसेफ आणि मरीया यांच्याव्यतिरिक्त इतरांशीही बोलले. त्यानंतर, “ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करत परत गेले.” (लूक २:२०) त्यांनी ख्रिस्ताविषयी ज्या चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या स्वतःजवळ न ठेवता इतरांनाही सांगितल्या.

मरीयेने तिच्या ज्येष्ठ पुत्राला, मोशेच्या नियमशास्त्रानुसार, यहोवाला समर्पित करण्यासाठी जेरूसलेमला आणले, तेव्हा हन्ना नावाच्या संदेष्ट्रीने “देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली.” (२) (लूक २:३६-३८; निर्ग. १३:१२) अशा रीतीने, मशीहाच्या प्रकट होण्याविषयीची बातमी पसरत गेली.

नंतर, “पूर्वेकडून मागी लोक [“ज्योतिषी,” NW] यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की, यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो.” (मत्त. २:१, २) “हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले; आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे?” (३) (मत्त. २:३, ४) अशा  प्रकारे, भावी मशीहा प्रकट झाला असल्याचे कित्येक लोकांना कळले होते. *

याआधी उद्धृत केलेल्या लूक ३:१५ या वचनातून सूचित होते, की काही यहुदी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला ख्रिस्त समजत होते. पण, योहानाने पुढील शब्दांतून दाखवले, की त्यांची समज बरोबर नव्हती. त्याने म्हटले: “माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.” (मत्त. ३:११) योहानाने नम्रपणे म्हटलेल्या या शब्दांमुळे मशीहाची वाट पाहणाऱ्यांची उत्कंठा आणखीनच वाढली असावी.

पहिल्या शतकातील यहुद्यांनी दानीएल ९:२४-२७ या वचनांत नमूद असलेल्या ७० सप्तकांच्या भविष्यवाणीच्या आधारावर गणना करून मशीहा कधी प्रकट होईल याचा अंदाज लावला असावा का? ही शक्यता नाकारता येत नसली, तरी याची खात्री पटवणे अशक्य आहे. खरेतर, येशूच्या दिवसांत ७० सप्तकांविषयी अनेकांची परस्परविरोधी मते होती, आणि यांपैकी एकही मत, ७० सप्तकांविषयी आपली सध्याची जी समज आहे तिच्याशी जुळत नाही. *

त्या काळात यहुद्यांचा इसीन नावाचा एक पंथ होता. या पंथाचे सदस्य एकांतात मठांमध्ये राहायचे. ते शिकवायचे की ४९० वर्षांच्या शेवटास दोन मशीहा प्रकट होतील. पण, या लोकांनी दानीएलच्या भविष्यवाणीच्या आधारावर कालगणना केली होती की नाही हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही. जरी त्यांनी तसे केले असले, तरी एकांतात राहणाऱ्या या पंथाने लावलेल्या अंदाजाचा सर्वसामान्य यहुद्यांवर कसा प्रभाव पडला असावा हे समजणे कठीण आहे.

इ.स. दुसऱ्या शतकात, काही यहुदी असे मानायचे, की ७० सप्तकांचा काळ हा इ.स.पू. ६०७ मध्ये पहिल्या मंदिराचा नाश झाला तेव्हापासून ते इ.स. ७० मध्ये दुसऱ्या मंदिराचा नाश झाला तेव्हापर्यंतच्या अवधीला सूचित करतो; तर इतर काही यहुदी या भविष्यवाणीच्या पूर्ततेचा संबंध इ.स.पू. दुसऱ्या शतकातील मक्काबींच्या कालावधीशी जोडायचे. यावरून दिसून येते, की ७० सप्तकांची कालगणना कशी करायची याबद्दल लोकांचे एकमत नव्हते.

पहिल्या शतकातील लोकांना, ७० सप्तकांच्या काळाविषयी अचूकपणे समजले असते, तर प्रतिज्ञा केलेला मशीहा, येशू ख्रिस्ताच्या रूपात अगदी वेळेवर प्रकट झाला हे सिद्ध करण्यासाठी प्रेषितांनी आणि पहिल्या शतकातील इतर ख्रिश्चनांनी याचा नक्कीच उल्लेख केला असता. पण, सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी असे केल्याचा कोणताच पुरावा सापडत नाही.

आपण आणखी एका गोष्टीचीही नक्कीच दखल घेतली पाहिजे. ती म्हणजे, शुभवर्तमान लेखकांनी अनेकदा याकडे लक्ष वेधले, की इब्री शास्त्रवचनांत असलेल्या विशिष्ट भविष्यवाण्या येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्या. (मत्त. १:२२, २३; २:१३-१५; ४:१३-१६) तरीसुद्धा, त्यांपैकी एकाही लेखकाने येशूचे पृथ्वीवर प्रकट होणे आणि ७० सप्तकांची भविष्यवाणी यांचा संबंध जोडला नाही.

सारांश: येशूच्या दिवसांतील लोकांना ७० सप्तकांची भविष्यवाणी अचूकपणे समजली असावी असे आपण खात्रीने म्हणू शकत नाही. पण, त्या काळात लोक मशीहाची वाट का पाहत होते याची अनेक ठोस कारणे शुभवर्तमानाच्या पुस्तकांत आपल्याला सापडतात.

^ परि. 4 येशूच्या जन्माच्या वेळी देवदूत “गायले” असे बायबल म्हणत नाही.

^ परि. 7 जोतिष्यांनी पूर्व दिशेला “तारा” दिसण्याचा संबंध यहुद्यांच्या राजाचा जन्म होण्याशी कसा काय लावला, असा प्रश्न कदाचित आपल्या मनात येईल. कदाचित इस्राएलमधून प्रवास करत असताना त्यांनी याबद्दलची बातमी ऐकली असावी का?

^ परि. 9 सत्तर सप्तकांच्या भविष्यवाणीविषयी आपली सध्याची जी समज आहे तिच्या माहितीकरता बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे १९७-१९९ पाहा.