व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 आमच्या संग्रहातून

विश्वासाला पुष्टी देणाऱ्या अविस्मरणीय चित्रपटाची शताब्दी

विश्वासाला पुष्टी देणाऱ्या अविस्मरणीय चित्रपटाची शताब्दी

“पडद्यावरचे बंधू रस्सल तर खरोखरच्या बंधू रस्सलपेक्षाही जास्त खरे वाटतात!”—१९१४ मध्ये “फोटो ड्रामा” पाहिल्यावर एका प्रेक्षकाचे उद्गार.

पहिल्यांदा “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” प्रदर्शित करण्यात आला त्या गोष्टीला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हा चित्रपट, बायबल देवाचे वचन आहे यावर लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता. १०० वर्षांपूर्वी उत्क्रांतिवाद, धार्मिक विश्वासांची टीका करणे आणि त्यांविषयी शंका घेणे फार प्रचलित असल्यामुळे अनेकांचा देवावरील विश्वास कमी होत चालला होता. तशा काळात, “फोटो ड्रामा” या चित्रपटाद्वारे यहोवा देव हा सृष्टीचा निर्माणकर्ता आहे हे घोषित करण्यात आले.

त्या वेळी चार्ल्झ टी. रस्सल बायबल विद्यार्थ्यांचे नेतृत्व करायचे. बायबल सत्यांचा प्रभावीपणे व जलद प्रसार करण्यासाठी ते सतत नवनवीन मार्गांच्या शोधात असायचे. बायबल विद्यार्थी यापूर्वीच तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून छापील साहित्याचा प्रभावीपणे वापर करत होते. आता त्यांना एक नवीन मार्ग सापडला होता: तो म्हणजे चलचित्रांचा उपयोग.

चलचित्रांच्या साहाय्याने सुवार्तेचा प्रसार

अठराशे नव्वदच्या दशकात मूकपटांचा जन्म झाला. १९०३ मध्ये न्यू यॉर्क सिटीच्या एका चर्चमध्ये एक धार्मिक चित्रपट दाखवण्यात आला होता. त्याअर्थी, हा काळ चलचित्रपट उद्योगाचा अगदी सुरुवातीचा काळ होता. तरीसुद्धा, १९१२ मध्ये रस्सल यांनी मोठ्या धाडसाने “फोटो ड्रामा” या चित्रपटाचे निर्माणकार्य हाती घेतले. त्यांनी ओळखले होते, की या माध्यमातून बायबल सत्य अनेक लोकांपर्यंत पोचवता येईल जे एकट्या छापील साहित्याद्वारे शक्य नव्हते.

“फोटो ड्रामा” हा आठ तासांचा चित्रपट होता आणि सहसा चार भागांमध्ये दाखवला जायचा. त्यात त्या काळातील एका सुप्रसिद्ध वक्त्याच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेली ९६ छोटी-छोटी बायबल आधारित भाषणे होती. अनेक दृश्यांना संगीताची साथ होती. निपुण ऑपरेटर्स फोनोग्राफवर, आवाज व संगीत असलेले रेकॉर्ड्स लावायचे. रंगीत स्लाइड्स (सरकचित्रे) आणि नाट्यरूपांतर केलेल्या बायबलमधील लोकप्रिय कथांच्या दृश्यांशी, आवाज व संगीत असलेल्या रेकॉर्ड्सचा मेळ बसवला जायचा.

“ताऱ्यांच्या निर्मितीपासून ते ख्रिस्ताचे हजार वर्षांचे राज्य संपेपर्यंतचा सबंध काळ या चित्रपटात उलगडतो.”—एफ. स्टुअर्ट बार्न्स, १९१४ मध्ये वय वर्षे १४

चित्रपटातील दृश्यांचा बराच भाग आणि कित्येक काचेची स्लाइड्स व्यावसायिक स्टुडिओंमधून विकत घेण्यात आली होती. फिलाडेल्फिया, न्यू यॉर्क, पॅरिस आणि लंडन येथील व्यावसायिक चित्रकारांनी प्रत्येक काचेचे स्लाइड आणि फिल्मसवरील दृश्ये हाताने रंगवली. बेथेलच्या आर्ट रूममध्ये काम करणाऱ्या अनेक टीम्सनीदेखील चित्रे रंगवण्याचे काम केले. काही स्लाइड्स तुटल्या-फुटल्यामुळे त्यांच्या ठिकाणी नवीन स्लाइड्स बनवावी लागायची. विकत घेतलेल्या स्लाइड्सव्यतिरिक्त  न्यू यॉर्क राज्यातील याँकर्स या जवळच्याच ठिकाणी बेथेल कुटुंबातील सदस्यांवर काही दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यांनी अब्राहाम, इसहाक आणि अब्राहामाला त्याच्या पुत्राचे बलिदान करण्यापासून रोखणारा देवदूत यांच्या भूमिका केल्या.—उत्प. २२:९-१२.

दोन मैल लांबीची रीळ, २६ फोनोग्राफ रेकॉर्ड्स आणि ५०० काचेची स्लाइड्स यांचे सादरीकरण करताना प्रशिक्षित ऑपरेटर्स अचूक वेळ साधायचे

बंधू रस्सल यांच्या एका सहायकाने पत्रकारांना सांगितले, की “बायबलच्या शिकवणी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी याआधी बरंच काही करण्यात आलं [होतं.] पण त्या सर्वांच्या तुलनेत हा चित्रपट हजारो लोकांच्या मनात बायबलबद्दल आवड निर्माण करण्यात अधिक प्रभावकारी ठरेल.” आध्यात्मिक रीत्या भुकेले असलेल्या हजारो लोकांच्या हृदयापर्यंत पोचू पाहणाऱ्या या नवीन माध्यमाची पाळकवर्गाने प्रशंसा केली का? नाही. याच्या अगदी उलट, ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी “फोटो ड्रामाचा” धिक्कार केला. लोकांनी हा चित्रपट पाहू नये म्हणून काही पाळकांनी अतिशय खालच्या थराला जाऊन प्रयत्न केले. एका ठिकाणी तर पाळकांच्या सांगण्यावरून विजेचा पुरवठा बंद करण्यात आला.

स्वागतासाठी उभ्या असणाऱ्या स्थानिक मंडळ्यांतील ख्रिस्ती बहिणींनी “फोटो ड्रामाची” चित्रे असलेल्या माहितीपुस्तिका लाखो प्रेक्षकांना मोफत वाटल्या

प्रेक्षकांना “Pax” (शांती) असे लिहिलेले बिल्ले दिले जायचे, ज्यावर येशूचे चित्र असायचे. या बिल्ल्यांमुळे प्रेक्षकाला “शांतीचा पुत्र” बनण्याची आठवण करून दिली जायची

इतके सर्व होऊनही, “फोटो ड्रामा” मोफत पाहण्यासाठी सिनेमागृहे प्रेक्षकांनी खचाखच भरून जायची. अमेरिकेत, दररोज जवळजवळ ८० शहरांत “फोटो ड्रामा” दाखवला जायचा. ‘बोलणारी चित्रे’ पहिल्यांदाच पाहून कितीतरी दर्शक आश्चर्यचकित व्हायचे. टाइम-लॅप्स फोटोग्राफी या तंत्राद्वारे त्यांना कोंबडीचे पिल्लू चोचीने अंड्याचे कवच फोडून बाहेर येत असल्याचे आणि फूल उमलतानाचे दृश्य पाहायला मिळाले. त्या काळातील वैज्ञानिक माहितीच्या साहाय्याने यहोवाची बुद्धी किती विस्मयकारी आहे यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे, “फोटो ड्रामाची” प्रस्तावना देताना बंधू रस्सल यांना पडद्यावर पाहिल्यावर एका प्रेक्षकाने म्हटले, की ते “खरोखरच्या बंधू रस्सलपेक्षाही जास्त खरे वाटतात!”

बायबल शिक्षणाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड

११ जानेवारी १९१४ रोजी न्यू यॉर्क सिटीतील याच नाट्यगृहात, जे त्या वेळी इंटरनॅशनल बायबल स्टुडन्ट्स असोसिएशनच्या मालकीचे होते, “फोटो ड्रामा” पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला

लेखक आणि फिल्म इतिहासकार असलेल्या टिम डर्क्स यांनी “फोटो ड्रामाचे” वर्णन करताना म्हटले, “हा सर्वात पहिला मोठा चित्रपट होता ज्यात ध्वनिमुद्रित आवाज, चलचित्रे आणि खास प्रकारच्या रंगीत स्लाइड्सच्या (मॅजिक लॅन्टर्न) प्रोजेक्टरचा वापर करण्यात आला.” “फोटो ड्रामाच्या” आधी अनेक चित्रपटांमध्ये यांपैकी काही तंत्रे वापरण्यात आली होती, पण एकाच चित्रपटात या सर्वच तंत्राचा वापर करण्यात आला नव्हता; खासकरून बायबल-आधारित विषयावर बनलेल्या चित्रपटांत तरी नाही. आणि याआधी कोणताही चित्रपट इतक्या लोकांनी पाहिला नव्हता. उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्याच वर्षी सुमारे ९० लाख लोकांनी “फोटो ड्रामा” पाहिला!

“फोटो ड्रामा,” ११ जानेवारी १९१४ रोजी न्यू यॉर्क सिटीत पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता. त्याच्या सात महिन्यांनंतर जगावर एक मोठे संकट कोसळले, ज्याला नंतर पहिले महायुद्ध असे नाव देण्यात आले. पण, अशा वातावरणातही जगभरात लोक “फोटो ड्रामा” पाहण्यासाठी एकत्र जमत राहिले. त्यात दाखवण्यात आलेली देवाच्या राज्याशी संबंधित सुंदर दृश्ये पाहून त्यांना सांत्वन मिळायचे. १९१४ हे वर्ष लक्षात घेता, “फोटो ड्रामा” ही निश्‍चितच एक अतिशय उल्लेखनीय कलाकृती होती!

सबंध उत्तर अमेरिकेत वेगवेगळ्या गटांद्वारे “फोटो ड्रामाचे” २० संच वापरण्यात आले