व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्यात नसलेल्या नातेवाइकांच्या मनापर्यंत पोचणे

सत्यात नसलेल्या नातेवाइकांच्या मनापर्यंत पोचणे

येशू ख्रिस्ताने म्हटले: “तू आपल्या घरी स्वकीयांकडे [नातेवाइकांकडे] जा, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.” येशूचा शिष्य बनण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या एका माणसाला तो वरील शब्द बोलला. त्या वेळी कदाचित येशू गदरेकरांच्या देशात असावा, जो गालील समुद्राच्या दक्षिण-पूर्वेकडे होता. येशूच्या शब्दांवरून आपल्याला हे कळते की त्याला मानवांची एक सर्वसामान्य प्रवृत्ती माहीत होती; ती म्हणजे स्वतःला आवडणारी किंवा महत्त्वाची वाटणारी गोष्ट आपल्या नातेवाइकांना सांगण्याची इच्छा.—मार्क ५:१९.

आजही अनेकांमध्ये आपल्याला ही प्रवृत्ती पाहायला मिळते आणि काही संस्कृतींच्या लोकांमध्ये ती जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणूनच, जेव्हा एक व्यक्ती खरा देव यहोवा याची उपासना करू लागते, तेव्हा तिलाही सहाजिकच आपल्या नातेवाइकांना या नवीन विश्वासाबद्दल सांगण्याची इच्छा असते. पण, तिने हे कशा रीतीने केले पाहिजे? दुसरा धर्म पाळणाऱ्या किंवा देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नातेवाइकांच्या मनापर्यंत पोचण्यासाठी तिने काय केले पाहिजे? बायबल याबद्दल चांगला व व्यावहारिक सल्ला देते.

“आम्हाला मशीहा सापडला आहे”

पहिल्या शतकात, येशूला मशीहा म्हणून सर्वात आधी ओळखणाऱ्यांपैकी आंद्रिया एक होता. आणि त्याने लगेचच याबद्दल कोणाला सांगितले? “आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. आंद्रिया शिमोनाला म्हणाला, ‘आम्हाला मशीहा सापडला आहे.’” तो शिमोनाला म्हणजेच पेत्राला येशूकडे घेऊन गेला आणि याद्वारे त्याने त्याला येशूचा शिष्य बनण्याची संधी दिली.—योहा. १:३५-४२, ईझी-टू-रीड व्हर्शन.

या घटनेच्या सहा वर्षांनंतर जेव्हा पेत्र यापो या ठिकाणी राहत होता, तेव्हा त्याला एक निमंत्रण मिळाले. त्याला उत्तर दिशेला असलेल्या कैसरियाला जाऊन तेथे राहणाऱ्या कर्नेल्याला, जो सैन्यात अधिकारी होता, त्याला भेट देण्यास सांगण्यात आले. पेत्र जेव्हा त्याच्या घरी गेला तेव्हा तेथे कोणकोण होते? “कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची [पेत्र व त्याच्या सोबत्यांची]  वाट पाहत होता.” अशा रीतीने, कर्नेल्याने त्याच्या नातेवाइकांना पेत्राचा संदेश ऐकण्याची व त्यावर आधारित निर्णय घेण्याची संधी दिली.—प्रे. कृत्ये १०:२२-३३.

आंद्रिया व कर्नेल्य आपल्या नातेवाइकांशी ज्या प्रकारे वागले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

आपले नातेवाईक आपोआपच सत्यात येतील असा आंद्रिया आणि कर्नेल्याने विचार केला नाही. याउलट, आंद्रियाने स्वतः पेत्राची येशूशी ओळख करून दिली आणि कर्नेल्याने त्याच्या नातेवाइकांना पेत्राचा संदेश ऐकता यावा म्हणून व्यवस्था केली. पण, आंद्रियाने आणि कर्नेल्याने आपल्या नातेवाइकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही किंवा त्यांनी येशूचे अनुयायी बनावे म्हणून धूर्तपणे प्रयत्न केले नाहीत. यावरून आपण काय शिकू शकतो? आपणही त्यांच्याप्रमाणे वागले पाहिजे. आपण आपल्या विश्वासांबद्दल आपल्या नातेवाइकांना सांगू शकतो आणि त्यांनी बायबल सत्याच्या व आपल्या सहविश्वासू बांधवांच्या संपर्कात यावे म्हणून आपण काही संधीही निर्माण करू शकतो. असे असले, तरी आपण हे नेहमी लक्षात ठेवतो की त्यांना निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आपण त्यांच्यावर दबाव आणत नाही. आपण आपल्या नातेवाइकांना कशी मदत करू शकतो हे समजण्यासाठी जर्मनीत राहणाऱ्या योर्गन आणि पेट्रा या विवाहित जोडप्याच्या उदाहरणाकडे लक्ष देऊ या.

पेट्राने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केला आणि कालांतराने तिने बाप्तिस्मा घेतला. तिचे पती योर्गन सैन्यात अधिकारी होते. सुरुवातीला ते आपल्या पत्नीच्या निर्णयामुळे नाखूश होते. पण, काही काळानंतर त्यांच्या लक्षात आले की साक्षीदार हे बायबलमधून सत्य शिकवतात. नंतर त्यांनीही त्यांचे जीवन यहोवाला समर्पित केले आणि आज ते मंडळीत वडील या नात्याने सेवा करत आहेत. आपला एखादा नातेवाईक दुसरा धर्म पाळत असेल तर त्याच्या मनापर्यंत पोचण्यासाठी काय करण्याची गरज आहे याविषयी योर्गन काही सल्ला देतात.

योर्गन म्हणतात: “आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत नातेवाइकांवर जोरजबरदस्ती करू नये. तसंच, सारखंसारखं त्याबद्दल सांगून आपण त्यांना बेजार करू नये. यामुळं सत्यात येण्याऐवजी ते आणखीनच दूर जातील. पण, त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर आपण अधूनमधून त्यांना थोडीथोडी माहिती देत राहिलो, तर याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. त्यासोबतच आपण आपल्या नातेवाइकांची भेट त्यांच्याच वयोगटातील व त्यांच्यासारख्याच आवडीनिवडी असणाऱ्या बांधवांशी करून दिली, तर याचाही फायदा होऊ शकतो. असं केल्यानं ते सत्याकडे आकर्षित होऊ शकतात.”

“आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत नातेवाइकांवर जोरजबरदस्ती करू नये.”—योर्गन

प्रेषित पेत्राने व कर्नेल्याच्या नातेवाइकांनी लगेचच बायबलचा संदेश स्वीकारला. पण, पहिल्या शतकातील काहींनी निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लावला.

येशूच्या भावांबद्दल काय?

येशूने जेव्हा लोकांना सत्याबद्दल साक्ष दिली तेव्हा त्याच्या अनेक नातेवाइकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. उदाहरणार्थ, प्रेषित याकोब व योहान कदाचित येशूचे मावसभाऊ असावेत आणि त्यांची आई सलोमे त्याची मावशी. सलोमे त्या पुष्कळ स्त्रियांपैकी एक असावी ज्या “आपल्या पैशाअडक्याने त्यांची [येशू व त्याच्या प्रेषितांची] सेवाचाकरी करत असत.”—लूक ८:१-३.

पण, येशूच्या कुटुंबातील काही सदस्यांनी मात्र येशूवर लगेच विश्वास ठेवला नाही. उदाहरणार्थ, येशूचा बाप्तिस्मा होऊन जवळजवळ एक वर्ष उलटल्यानंतर एके प्रसंगी त्याचा संदेश ऐकण्यासाठी अनेक लोक एका घरात जमले होते. पण, जेव्हा त्याच्या नातेवाइकांना हे कळले तेव्हा ते “त्याला धरावयाला निघाले; कारण त्याला वेड लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते.” काही काळानंतर जेव्हा येशूच्या भावांनी त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल विचारले तेव्हा त्याने त्यांना स्पष्ट उत्तर दिले नाही. त्याने असे का केले असावे? कारण त्याचे हे भाऊ “त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.”—मार्क ३:२१; योहा. ७:५.

येशू ज्या प्रकारे आपल्या नातेवाइकांसोबत वागला त्यावरून आपण काय शिकू शकतो? जेव्हा त्याच्या नातेवाइकांनी म्हटले की त्याला वेड लागले आहे तेव्हा तो त्यांच्यावर रागावला नाही. येशूला  मारण्यात आले व त्याचे पुनरुत्थान झाले त्यानंतरही तो त्याच्या भावाला, याकोबाला आणखी उत्तेजन देण्यासाठी त्याच्यासमोर प्रकट झाला. यामुळे, असे दिसते की याकोबालाच नव्हे तर येशूच्या इतर भावांनाही याची खात्री पटली की तोच मशीहा आहे. आणि म्हणूनच, जेरूसलेमेतील माडीवरच्या खोलीत शिष्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला तेव्हा प्रेषितांसोबत येशूचे भाऊदेखील उपस्थित होते. काही काळानंतर याकोब, व येशूचा आणखी एक भाऊ यहूदा यांना देवाच्या सेवेत अनेक सुहक्क मिळाले.—प्रे. कृत्ये १:१२-१४; २:१-४; १ करिंथ. १५:७.

काहींना बराच वेळ लागतो

“चांगले परिणाम मिळवायचे असतील तर धीर धरा, धीर धरा आणि आणखी धीर धरा.”—रोझवीटा

पहिल्या शतकाप्रमाणे आजदेखील काही नातेवाइकांना जीवनाच्या मार्गावर येण्यासाठी बराच वेळ लागतो. रोझवीटाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. तिच्या पतीने १९७८ साली यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. त्या वेळी, रोझवीटा रोमन कॅथलिक धर्माचे प्रामाणिकपणे पालन करत असल्यामुळे तिने सुरुवातीला तिच्या पतीचा विरोध केला. पण, काही वर्षांनंतर तिला हे समजले की साक्षीदार सत्य शिकवतात आणि त्यामुळे तिने हळूहळू त्याचा विरोध करण्याचे कमी केले. २००३ साली तिने बाप्तिस्मा घेतला. तिच्यात हा बदल कसा काय घडून आला? सुरुवातीला तिने विरोध केला तेव्हा तिच्यावर रागावण्याऐवजी तिच्या पतीने तिला तिचे मत बदलण्यासाठी पुरेसा वेळ दिला. रोझवीटा आता कोणता सल्ला देते? ती म्हणते: “चांगले परिणाम मिळवायचे असतील तर धीर धरा, धीर धरा आणि आणखी धीर धरा.”

मोनिका हिने १९७४ साली बाप्तिस्मा घेतला. तिच्या बाप्तिस्म्याच्या दहा वर्षांनंतर तिची दोन मुलेही साक्षीदार बनली. तिचे पती हान्स यांनी त्यांच्या कुटुंबाचा कधीच विरोध केला नाही, तरीही त्यांनी बऱ्याच वर्षांनी, म्हणजे २००६ साली बाप्तिस्मा घेतला. या कुटुंबाला आलेल्या अनुभवावरून ते इतरांना काय सांगू इच्छितात? ते म्हणतात: “यहोवाला एकनिष्ठ राहा आणि सत्यासंबंधी कोणतीही तडजोड करू नका.” या कुटुंबातील सदस्यांनी हान्स यांना नेहमी याची जाणीव करून दिली की त्यांचे त्यांच्यावर प्रेम आहे. आणि ते कधी ना कधी सत्यात येतील ही आशा त्यांनी कधीही सोडली नाही.

सत्याचे पाणी तजेला देते

येशूने सत्याच्या संदेशाची तुलना अशा पाण्याशी केली ज्यामुळे सार्वकालिक जीवन प्राप्त होते. (योहा. ४:१३, १४) आपल्या नातेवाइकांनी सत्याचे हे थंड व स्वच्छ पाणी प्यावे आणि तजेला प्राप्त करावा अशी आपली इच्छा आहे. पण, ज्याप्रमाणे एखाद्याला घाईघाईने खूप जास्त पाणी प्यायला लावले तर तो गुदमरू शकतो; त्याचप्रमाणे कमी वेळात एखाद्यावर सत्याबद्दलची खूप जास्त माहिती लादल्यास त्याला ती माहिती स्वीकारणे कठीण जाऊ शकते. आपल्या नातेवाइकांच्या बाबतीत असे घडावे अशी आपली मुळीच इच्छा नाही. पण, त्यांना तजेला प्राप्त होईल की ते गुदमरून जातील हे आपण ज्या प्रकारे त्यांना आपल्या विश्वासांबद्दल समजावतो त्यावर अवलंबून आहे. बायबल सांगते की “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.” आणि “ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते.” आपण या सल्ल्याचे पालन कसे करू शकतो?—नीति. १५:२८; १६:२३.

एका पत्नीला कदाचित तिच्या विश्वासांबद्दल पतीला सांगायचे असेल. तिने त्याच्याशी बोलण्यापूर्वी “विचार” केला तर ती योग्य शब्दांची निवड करू शकेल आणि घाईघाईने बोलण्याचे टाळू शकेल. तिने कधीही असे दाखवण्याचा प्रयत्न करू नये की ती खूप धार्मिक आहे किंवा त्याच्यापेक्षा वरचढ आहे. अशा प्रकारे विचारपूर्वक बोलल्यामुळे तिच्या पतीला तजेला मिळू शकतो व शांतीही टिकून राहू शकते. तिच्या पतीला निवांत वेळ कधी असतो? त्याला कोणत्या विषयावर बोलायला आणि वाचायला आवडते? त्याला विज्ञान, राजकारण किंवा खेळक्रीडा या विषयांमध्ये रस आहे का? ती त्याच्या भावना व मते लक्षात घेऊन त्याच्या मनात बायबलविषयी आवड कशी निर्माण करू शकते? वरील प्रश्नांवर विचार केल्याने तिला समजूतदारपणे बोलण्यास व वागण्यास मदत होईल.

साक्षीदार नसलेल्या आपल्या नातेवाइकांच्या मनापर्यंत पोचण्यासाठी फक्त अधूनमधून आपल्या विश्वासांबद्दल त्यांना सांगणे पुरेसे नाही. तर आपण जे सांगतो त्याला अनेक वर्षांच्या आपल्या चांगल्या वर्तणुकीचा आधार असणेही गरजेचे आहे.

चांगली वर्तणूक

वर उल्लेख करण्यात आलेले योर्गन म्हणतात: “दैनंदिन जीवनात बायबलच्या तत्त्वांचा सातत्यानं अवलंब करा. असं केल्यानं आपण आपल्या नातेवाइकाला विचार करण्यास भाग पाडतो. त्यानं जरी आपल्या व्यवहाराबद्दल आपली प्रशंसा केली नाही, तरी तो त्यावर नक्कीच विचार करेल.” हान्स यांनी आपल्या पत्नीच्या बाप्तिस्म्याच्या जवळजवळ ३० वर्षांनंतर बाप्तिस्मा घेतला. ते मान्य करतात, “उत्तम वर्तणूक खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळं नातेवाइकाला आपल्या जीवनावर सत्याचा जो चांगला परिणाम होत आहे तो पाहणं शक्य होतं.” आपल्या नातेवाइकांना हे दिसून आले पाहिजे की आपल्या विश्वासांमुळे जरी आपण इतरांपेक्षा वेगळे असलो, तरी हे बदल नकारात्मक नाहीत, तर आपल्या विश्वासांनी आपल्याला पूर्वीपेक्षा चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली आहे.

“उत्तम वर्तणूक खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळं नातेवाइकाला आपल्या जीवनावर सत्याचा जो चांगला परिणाम होत आहे तो पाहणं शक्य होतं.”—हान्स

ज्यांचे पती विश्वासात नाहीत अशा पत्नींना प्रेषित पेत्राने महत्त्वाचा सल्ला दिला. त्याने म्हटले: “तुम्हीही आपआपल्या पतीच्या अधीन असा; यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. तुमची शोभा केसाचे गुंफणे,  सोन्याचे दागिने घालणे, किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.”—१ पेत्र ३:१-४.

पेत्राने असे लिहिले की पत्नीच्या उत्तम वर्तणुकीमुळे एक पती सत्य स्वीकारण्यास तयार होऊ शकतो. बायबलमधील हा सल्ला लक्षात ठेवून क्रिस्टा नावाची एक बहीण १९७२ साली तिचा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून आपल्या चांगल्या वागणुकीने पतीचे मन जिंकण्याचा व त्याला सत्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, तिच्या पतीने साक्षीदारांकडून एकेकाळी बायबल अभ्यास घेतला असला, तरी त्याने अद्यापही सत्य स्वीकारलेले नाही. तो काही ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिला आहे आणि मंडळीतील बांधवांशीही त्याचे चांगले संबंध आहेत. शिवाय हे बांधवही निवड करण्याच्या त्याच्या स्वातंत्र्याची कदर करतात. मग, त्याच्या मनापर्यंत पोचण्यासाठी क्रिस्टा आज काय करत आहे?

क्रिस्टा म्हणते: “यहोवाच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी निर्धार केला आहे. त्याच वेळी शब्दांपेक्षा मी माझ्या चांगल्या वर्तणुकीद्वारे, माझ्या पतीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. त्याच्या ज्या इच्छा बायबल तत्त्वांच्या विरोधात नाहीत त्या पूर्ण करण्याचा मी होताहोईल तितका प्रयत्न करते. आणि हो, मी त्याच्या इच्छा-स्वातंत्र्याची कदर करते व बाकी सर्व काही यहोवाच्या हातात सोडून देते.”

क्रिस्टाच्या उदाहरणावरून परिस्थितीशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे हे दिसून येते. आध्यात्मिक बाबतीत तिने एक चांगला नित्यक्रम टिकवून ठेवला आहे. ती सभांना नियमित उपस्थित राहते आणि क्षेत्र सेवेतही चांगला सहभाग घेते. तरीही, तिचे प्रेम व तिचा वेळ यांवर तिच्या पतीचा हक्क आहे याची तिला जाणीव आहे आणि म्हणून ती समजूतदारपणे वागते. ज्यांचे नातेवाईक सत्यात नाहीत त्यांनी समजूतदारपणा दाखवणे व परिस्थितीशी जुळवून घेणे चांगले आहे. बायबलमध्ये सांगण्यात आले आहे की, “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो.” यात सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांसोबत आणि खासकरून जोडीदारासोबत वेळ घालवणे समाविष्ट आहे. सोबत वेळ घालवल्यामुळे चांगला संवाद साधणे शक्य होते. अनुभवावरून हे दिसून येते की चांगल्या संवादामुळे एकटेपणा व ईर्ष्येची भावना निर्माण होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतो.—उप. ३:१.

कधीच आशा सोडू नका

हॉल्गर यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा होऊन २० वर्षे झाल्यानंतर बाप्तिस्मा घेतला. हॉल्गर म्हणतात: “सत्यात नसलेल्या आपल्या कुटुंबाच्या सदस्यावर आपलं प्रेम आहे आणि आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो हे त्याला दाखवणं महत्त्वाचं आहे.” क्रिस्टा पुढे म्हणते, की तिचे पती कधी ना कधी सत्य स्वीकारण्याचा निर्णय घेतील ही आशा ती “कधीच सोडणार नाही.” सत्यात नसलेल्या नातेवाइकांबद्दल आपण नेहमीच सकारात्मक म्हणजेच आशावादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे.

आपले चांगले नातेसंबंध टिकून राहावेत, आपल्या नातेवाइकांना सत्य जाणून घेण्याची संधी मिळावी आणि आपल्याला बायबलचा संदेश त्यांच्या मनापर्यंत पोचवता यावा हे आपले ध्येय आहे. हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करताना आपण नेहमी “सौम्यतेने व भीडस्तपणाने” वागू या.—१ पेत्र ३:१५.