व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सकारात्मक दृष्टिकोन कसा टिकवून ठेवावा?

सकारात्मक दृष्टिकोन कसा टिकवून ठेवावा?

“मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावी.”—उप. ११:८.

१. यहोवाकडून मिळणाऱ्या कोणत्या आशीर्वादांमुळे आपण आनंदी होऊ शकतो?

आपण नेहमी आनंदी राहावे अशी यहोवाची इच्छा आहे आणि यासाठी तो आपल्यावर अनेक आशीर्वादांचा वर्षाव करतो. आपले जीवन हे त्यांपैकी एक आहे आणि याचा उपयोग आपण देवाची स्तुती करण्यासाठी करू शकतो कारण त्यानेच आपल्याला खऱ्या उपासनेकडे आकर्षित केले आहे. (स्तो. १४४:१५; योहा. ६:४४) आणखी एक आशीर्वाद म्हणजे, यहोवा आपल्याला त्याच्या प्रेमाची खात्री करून देतो आणि त्याच्या सेवेत टिकून राहण्यासाठी तो आपल्याला मदतदेखील करतो. (यिर्म. ३१:३; २ करिंथ. ४:१६) तसेच, आपण आध्यात्मिक नंदनवनाचा उपभोग घेत आहोत जेथे आपल्याला मुबलक प्रमाणात आध्यात्मिक अन्न मिळते व प्रेमळ बंधुसमाजाचा आनंदही घेता येतो. याशिवाय, आपल्याकडे भविष्यासाठी एक मौल्यवान आशादेखील आहे.

२. देवाच्या काही विश्वासू सेवकांना कशाचा सामना करावा लागतो?

आनंदी राहण्यासाठी ही सर्व कारणे असूनसुद्धा देवाच्या काही विश्वासू सेवकांना स्वतःविषयीच्या नकारात्मक भावनांशी झगडावे लागते. त्यांना असे वाटते की यहोवाच्या नजरेत त्यांचे व ते करत असलेल्या सेवेचे काहीच मोल नाही. ज्या लोकांच्या मनात सतत अशा नकारात्मक भावना येतात त्यांना अनेक “वर्षे” आनंदी जीवन जगणे हे एक स्वप्न वाटू शकते. अशांना त्यांच्या जीवनात फक्त काळोख आहे असे वाटू शकते.—उप. ११:८.

३. कोणत्या कारणांमुळे नकारात्मक भावना येऊ शकतात?

 अशा बंधुभगिनींच्या मनात निराशा, आजार किंवा उतारवयात येणाऱ्या मर्यादा यांमुळे नकारात्मक भावना येऊ शकतात. (स्तो. ७१:९; नीति. १३:१२; उप. ७:७) त्यासोबतच आपल्या प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव असणे गरजेचे आहे की आपले हृदय कपटी आहे आणि देवाची आपल्यावर कृपादृष्टी असूनसुद्धा आपले मन आपल्याला दोषी ठरवू शकते. (यिर्म. १७:९; १ योहा. ३:२०) सैतान देवाच्या सेवकांवर खोटा आरोप लावतो. आणि ज्या लोकांचे विचार सैतानासारखे आहेत तेसुद्धा यहोवाचा उपासक नसलेल्या अलीफजप्रमाणेच आपल्या मनात एक चुकीचा विचार पेरू शकतात; तो म्हणजे देवाच्या नजरेत आपले काहीच मोल नाही. ईयोबाच्या काळात अलीफजने जे म्हटले ते खोटे होते आणि आजही आहे.—ईयो. ४:१८, १९.

४. आपण या लेखात कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत?

यहोवा आपल्याला त्याच्या वचनातून असे स्पष्ट आश्वासन देतो की आपण “मृत्युच्छायेच्या दरीतूनही” जात असलो तरी तो आपल्यासोबत असेल. (स्तो. २३:४) एक मार्ग ज्याद्वारे यहोवा आपल्याला साहाय्य करतो तो म्हणजे बायबल. देवाचे हे वचन खोलवर रुजलेले गैरसमज आणि नकारात्मक विचारांना “जमीनदोस्त करण्यास . . . देवाच्या दृष्टीने समर्थ” आहे. (२ करिंथ. १०:४, ५) तर मग, आता आपण पाहू या की बायबलचा उपयोग करून आपण सकारात्मक दृष्टिकोन कसा उत्पन्न करू शकतो व तो कसा टिकवून ठेवू शकतो. तुम्हाला याचा वैयक्तिक रीत्या फायदा होईल, तसेच इतरांना उत्तेजन देण्यासाठीही तुम्हाला मदत होईल.

सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्न करण्यासाठी बायबलचा उपयोग करा

५. कोणती परीक्षा आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास मदत करू शकते?

प्रेषित पौलाने काही गोष्टींचा उल्लेख केला ज्यांमुळे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्न करण्यास मदत मिळू शकते. त्याने करिंथ मंडळीला असे आर्जवले: “तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा.” (२ करिंथ. १३:५) ‘विश्वास’ हा बायबलमध्ये सांगितलेल्या सर्व ख्रिस्ती शिकवणींना सूचित करतो. तेव्हा, आपले शब्द व कार्ये जर या शिकवणींनुसार असतील तर आपण विश्वासाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत व “विश्वासात” आहोत असे आपण दाखवतो. पण, आपण सर्वच बाबतींत ख्रिस्ती शिकवणींनुसार जगत आहोत की नाही हेदेखील आपण तपासून पाहिले पाहिजे. आपण त्यांतील फक्त काही पैलू निवडून इतर पैलूंकडे दुर्लक्ष करू शकत नाही.—याको. २:१०, ११.

६. आपण विश्वासात आहो किंवा नाही याचे परीक्षण का केले पाहिजे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

तुम्ही कदाचित अशा प्रकारे स्वतःची परीक्षा करण्यास कचराल, खासकरून जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्यात उत्तीर्ण होणार नाही. असे असले तरी, आपण स्वतःला ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यापेक्षा यहोवा आपल्याला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ आहेत. (यश. ५५:८, ९) तो आपल्या उपासकांना दोषी ठरवण्यासाठी त्यांचे परीक्षण करत नाही तर त्यांच्यामध्ये असलेले चांगले गुण पाहण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी त्यांचे परीक्षण करतो. आपण विश्वासात आहोत किंवा नाही हे पाहण्यासाठी जेव्हा आपण देवाच्या वचनाचा उपयोग करतो, तेव्हा आपण यहोवाच्या दृष्टिकोनाने स्वतःकडे पाहू लागतो. असे केल्यामुळे आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान नाही ही नकारात्मक भावना मनातून काढून टाकण्यास आपल्याला मदत मिळते. आणि त्याऐवजी आपण यहोवाच्या नजरेत खूप मौल्यवान आहोत हे बायबलचे आश्वासन स्वीकारणे आपल्याला शक्य होते. याचा परिणाम, एखाद्या अंधाऱ्या खोलीचे पडदे उघडून प्रकाशाला आत येऊ देण्यासारखा असू शकतो.

७. बायबलमधील विश्वासूपणाच्या उदाहरणांचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

अशा प्रकारे आत्मपरीक्षण करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बायबलमधील विश्वासू लोकांच्या उदाहरणांवर मनन करणे. त्यांच्या परिस्थितीची किंवा त्यांच्या भावनांची तुलना स्वतःच्या परिस्थितीशी व भावनांशी करा आणि तुम्ही जर त्यांच्या जागी असता तर काय केले असते याचा विचार करा. तुम्ही “विश्वासात” आहात की नाही हे तपासण्यासाठी बायबलचा उपयोग कसा करू शकता व याद्वारे स्वतःविषयी सकारात्मक दृष्टिकोन कसा उत्पन्न करू शकता, हे समजून घेण्यासाठी आता आपण तीन उदाहरणे पाहू या.

एक गरीब विधवा

८, ९. (क) गरीब विधवेची परिस्थिती कशी होती? (ख) तिच्या मनात कदाचित कोणत्या नकारात्मक भावना आल्या असतील?

जेरूसलेमच्या मंदिरात येशूने एका गरीब विधवेला  पाहिले. समस्या असतानादेखील आपण सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगू शकतो हे आपण तिच्या उदाहरणावरून शिकू शकतो. (लूक २१:१-४ वाचा.) त्या विधवेची परिस्थिती लक्षात घ्या: तिला तिच्या पतीला गमावण्याचे दुःख तर होतेच पण त्यासोबतच ती अशा एका काळात राहत होती जेव्हा धार्मिक पुढारी विधवांना मदत करण्याऐवजी त्यांची “घरे गिळंकृत” करत होते. (लूक २०:४७) ती इतकी गरीब होती की एक मजूर फक्त काही मिनिटांत कमावू शकेल इतकेच पैसे ती मंदिरात दान म्हणून देऊ शकत होती.

फक्त दोन नाणी घेऊन त्या विधवेने मंदिराच्या आवारात प्रवेश केला असेल तेव्हा तिच्या मनात कोणत्या भावना आल्या असतील याची कल्पना करा. तिच्या मनात असा विचार आला असेल का की तिचे पती जिवंत असताना ती जितके दान द्यायची त्याच्या तुलनेत हे दान खूपच कमी आहे? तिच्या पुढे असलेले इतर जण दानपेटीत खूप पैसे टाकत आहेत हे पाहून तिच्या मनात कमीपणाची भावना आली असेल का? तिला असे वाटले असेल का की ती देत असलेल्या दानाचे काहीच मोल नाही? तिच्या मनात असे विचार आले असले, तरी खऱ्या उपासनेकरता तिच्याकडून जे शक्य होते ते तिने केले.

१०. देवाच्या नजरेत ती विधवा मौल्यवान होती हे येशूने कसे दाखवून दिले?

१० येशूने हे स्पष्ट केले की यहोवाच्या नजरेत ती विधवा व तिने दिलेले दान हे दोन्ही मौल्यवान होते. त्याने असे म्हटले की त्या विधवेने “सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे.” तिने दिलेले दान जरी इतरांच्या दानासोबत मोजण्यात आले असले, तरी येशूने तिचा विशेष उल्लेख केला. ती विधवा व तिने टाकलेली दोन नाणी यहोवासाठी किती मौल्यवान आहेत याची दानपेटी उघडणाऱ्यांना काहीच कल्पना नसेल. असे असले तरी, देवाचा दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचा होता; इतरांचा दृष्टिकोन इतकेच काय तर त्या विधवेचाही स्वतःविषयीचा दृष्टिकोन महत्त्वाचा नव्हता. तुम्ही विश्वासात आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही या अहवालाचा उपयोग करू शकता का?

गरीब विधवेच्या उदाहरणावरून तुम्हाला कोणती गोष्ट शिकायला मिळाली? (परिच्छेद ८-१० पाहा)

११. गरीब विधवेच्या अहवालावरून आपण काय शिकू शकतो?

११ तुम्ही यहोवाला जे देऊ शकता ते तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असते. म्हातारपणामुळे किंवा आजारामुळे तुम्ही कदाचित क्षेत्र सेवेला जास्त वेळ देऊ शकत नसाल. अशा वेळी असा विचार करणे योग्य असेल का की मी जी थोडी सेवा करत आहे तिचा अहवाल देण्यात काय अर्थ आहे? किंवा तुम्हाला कदाचित म्हातारपण किंवा आजार अशा समस्या नसतील, पण तरीसुद्धा तुम्हाला असे वाटत  असेल की जगभरातील देवाचे लोक त्याच्या उपासनेत दरवर्षी जितके तास घालवतात त्याच्या तुलनेत तुमचा सहभाग खूप क्षुल्लक आहे. पण, गरीब विधवेच्या अहवालातून आपण शिकतो की आपण यहोवासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची तो दखल घेतो व ती मौल्यवान समजतो, खासकरून आपण कठीण परिस्थितीत असे करतो तेव्हा. मागच्या वर्षी तुम्ही यहोवाच्या सेवेत जे काही केले त्याचा विचार करा. तुम्ही त्याच्या सेवेत जो वेळ घालवला त्यातील एखादा तास असा असेल ज्यासाठी तुम्हाला मोठा त्याग करावा लागला असेल. असे असल्यास तुम्ही खासकरून त्या तासात जी सेवा केली त्याची यहोवा कदर करतो ही खात्री बाळगा. गरीब विधवेप्रमाणे तुम्ही जेव्हा यहोवाच्या सेवेत शक्य तितके करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही ही खात्री बाळगू शकता की तुम्ही “विश्वासात” आहात.

“माझा अंत कर”

१२-१४. (क) नकारात्मक भावनांचा एलीयावर कसा प्रभाव पडला? (ख) एलीयाच्या मनात अशा भावना का आल्या?

१२ संदेष्टा एलीया यहोवाला एकनिष्ठ होता आणि त्याचा विश्वास भक्कम होता. असे असले तरी, त्याच्या जीवनात एक अशी वेळ आली जेव्हा अगदी हताश झाल्यामुळे त्याला जगणे नकोसे वाटले. त्याने असे म्हटले, “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर.” (१ राजे १९:४) जे लोक जीवनात एलीयाइतके निराश झाले नसतील त्यांना कदाचित त्याचे बोलणे “मर्यादेबाहेर” होते असे वाटेल. (ईयो. ६:३) पण त्याच्या भावना खऱ्या होत्या. आणि आपल्याला मरण यावे असे जेव्हा एलीया बोलला तेव्हा यहोवाने त्याचे ताडन करण्याऐवजी त्याची मदत केली.

१३ एलीया इतका हताश कशामुळे झाला होता? थोड्याच काळाआधी, त्याने इस्राएलमध्ये झालेल्या एका निर्णायक परीक्षेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या परीक्षेतून हे स्पष्ट झाले होते की यहोवाच खरा देव आहे आणि परिणामस्वरूप बआलाच्या ४५० संदेष्ट्यांचा संहार झाला होता. (१ राजे १८:३७-४०) एलीयाला वाटले की आतातरी देवाचे लोक खरी उपासना पुन्हा सुरू करतील, पण असे घडले नाही. त्यासोबतच, दुष्ट राणी ईजबेल हिने एलीयाकडे असा संदेश पाठवला की ती त्याला ठार मारणार आहे. आपला जीव मुठीत घेऊन एलीया यहूदातून दक्षिणेकडील ओसाड रानात पळून गेला.—१ राजे १९:२-४.

१४ संदेष्टा म्हणून केलेल्या आपल्या कार्यावर एकांतात विचार करत असताना एलीयाला असे भासले की त्याने केलेली सेवा निष्फळ ठरली आहे. त्याने यहोवाला असे म्हटले: “मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही.” त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की त्याच्या मृत वाडवडिलांच्या अस्थी व त्यांच्या मृतदेहांची झालेली माती ज्याप्रमाणे व्यर्थ आहे त्याप्रमाणे तोदेखील अगदी कवडीमोल आहे. त्याने स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःचे परीक्षण केले व तो विफल ठरला आहे असा निष्कर्ष काढला. यहोवाच्या व इतरांच्या नजरेत त्याचे काहीच मोल नाही असा त्याने विचार केला.

१५. यहोवाने एलीयाला हे आश्वासन कसे दिले की तो अजूनही त्याच्या नजरेत मौल्यवान आहे?

१५ पण एलीयाकडे पाहण्याचा यहोवाचा दृष्टिकोन वेगळा होता. एलीया अजूनही यहोवाच्या नजरेत मौल्यवान होता आणि यहोवाने त्याला या गोष्टीची हमी देण्यासाठी पावले उचलली. त्याने एका देवदूताला एलीयाचे सांत्वन करण्यासाठी पाठवले. यहोवाने त्याला अन्न व पाणीदेखील पुरवले ज्यामुळे तो ४० दिवसांचा प्रवास करून दक्षिणेकडील होरेब पर्वताकडे जाऊ शकला. तसेच, एलीयाला वाटत होते की त्याच्याशिवाय दुसरा कोणीही इस्राएली यहोवाला विश्वासू राहिलेला नाही, त्याची ही समज सुधरवण्यासाठी यहोवाने त्याला प्रेमळपणे मदत दिली. विशेष म्हणजे यहोवाने एलीयाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या ज्या त्याने स्वीकारल्या. यहोवाने दिलेल्या मदतीचा एलीयाला फायदा झाला आणि तो परत जोशाने संदेष्ट्याचे काम करू लागला.—१ राजे १९:५-८, १५-१९.

१६. कोणते काही मार्ग आहेत ज्यांद्वारे यहोवाने तुमचा सांभाळ केला आहे?

१६ तुम्ही विश्वासात आहात याची खात्री करण्यास एलीयाचे उदाहरण तुम्हाला मदत करू शकते. त्यासोबतच ते सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्न करण्यासही तुम्हाला मदत करू शकते. सर्वात आधी, यहोवाने तुम्हाला आजपर्यंत कसे सांभाळले आहे याचा विचार करा. तुम्हाला गरज होती त्या प्रसंगी, यहोवाच्या एखाद्या सेवकाने कदाचित मंडळीतील वडिलाने किंवा इतर प्रौढ बंधू किंवा भगिनीने, तुम्हाला मदत केली का? (गलती. ६:२) बायबल, ख्रिस्ती प्रकाशने आणि मंडळीच्या सभा यांमुळे तुम्ही आध्यात्मिक रीत्या मजबूत झाला आहात का? पुढच्या वेळी वरील एखाद्या मार्गाने तुम्हाला मदत मिळेल तेव्हा ही मदत खरेतर यहोवाकडूनच आहे हे ओळखा व प्रार्थनेत त्याचे आभार माना.—स्तो. १२१:१, २.

१७. यहोवा कोणत्या गोष्टींमुळे त्याच्या सेवकांची कदर करतो?

 १७ दुसरी गोष्ट म्हणजे, याची जाणीव असू द्या की नकारात्मक दृष्टिकोन फसवणारा असू शकतो. यहोवा आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. (रोमकर १४:४ वाचा.) आपण जे काही साध्य करतो त्याच्या आधारावर यहोवा आपले मोल ठरवत नाही, तर तो आपल्या उपासनेची व विश्वासूपणाची कदर करतो. आणि एलीयाप्रमाणे कदाचित तुम्हीदेखील यहोवाच्या सेवेत अशा बऱ्याच गोष्टी साध्य केल्या असतील ज्यांची तुम्हाला जाणीवदेखील नसेल. तुमच्या मंडळीत असे काही लोक असतील ज्यांना तुमच्याकडून उभारी मिळाली असेल आणि क्षेत्रातही असे लोक असतील ज्यांना तुमच्या प्रयत्नांमुळे सत्याची ओळख झाली असेल.

१८. यहोवाने तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे त्यावरून काय सिद्ध होते?

१८ शेवटी, हे लक्षात असू द्या की यहोवाकडून मिळणारी प्रत्येक जबाबदारी ही एक खात्री आहे की तो तुमच्यासोबत आहे. (यिर्म. २०:११) तुमच्या सेवेतून चांगले परिणाम मिळत नसतील किंवा एखादे आध्यात्मिक ध्येय गाठणे तुम्हाला अशक्य वाटत असेल तर तुम्हीही एलीयासारखे हताश होऊ शकता. असे असले तरी, जगातील सर्वात मोठा सुहक्क म्हणजेच सुवार्ता सांगण्याचा आणि देवाचे नाव धारण करण्याचा सुहक्क अजूनही तुमच्याजवळ आहे. तेव्हा, नेहमी विश्वासू राहा. असे केल्यास येशूच्या दाखल्यातील पुढील शब्द तुम्हालाही म्हणण्यात येतील: “आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.”—मत्त. २५:२३.

“व्याकूळ” झालेल्या सेवकाची प्रार्थना

१९. स्तोत्र १०२ च्या लेखकाला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले?

१९ स्तोत्र १०२ चा लेखक खूप दुःखी होता. तो शारीरिक किंवा भावनिक रीत्या दुःख सोसत असल्यामुळे “व्याकूळ” होता आणि त्याच्यात समस्यांना तोंड देण्याची शक्ती उरली नव्हती. (स्तो. १०२, उपरीलेखन) त्याच्या शब्दांतून आपल्याला समजते की वेदना, एकटेपणा आणि नकारात्मक भावना या गोष्टींनी त्याला ग्रासले होते. (स्तो. १०२:३, ४, ६, ११) त्याला असे वाटले की यहोवा त्याला सोडून देणार आहे.—स्तो. १०२:१०.

२०. नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी प्रार्थना एका व्यक्तीला कशी मदत करू शकते?

२० असे असूनही, स्तोत्रकर्त्याने जीवनभर यहोवाची स्तुती केली. (स्तोत्र १०२:१९-२१ वाचा.) स्तोत्र १०२ वरून आपल्याला समजते की सत्यात असलेले बंधुभगिनीही दुःखी असू शकतात व इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागू शकतात. “धाब्यावर एकटे राहणाऱ्या चिमण्यासारखा मी झालो आहे” असे स्तोत्रकर्त्याने म्हटले, जणू काय त्याच्या अवतीभोवती फक्त समस्याच होत्या. (स्तो. १०२:७) तुमच्याही मनात जर अशा भावना आल्या तर स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवासमोर आपले मन मोकळे करा. व्याकूळ झालेल्यांची प्रार्थना, म्हणजेच तुमची प्रार्थना नकारात्मक भावनांवर मात करण्यास तुम्हाला मदत करू शकते. यहोवा आपल्याला आश्वासन देतो की “त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे; त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.” (स्तो. १०२:१७) यहोवाने दिलेल्या आश्वासनावर भरवसा ठेवा.

२१. नकारात्मक भावनांशी झगडत असलेल्या व्यक्तीला सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्न करण्यास कोणती गोष्ट मदत करू शकते?

२१ नकारात्मक भावनांवर मात करण्यासोबतच आपण सकारात्मक दृष्टिकोन कसा उत्पन्न करू शकतो हेदेखील आपल्याला स्तोत्र १०२ मध्ये पाहायला मिळते. यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित केल्यामुळे स्तोत्रकर्त्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे शक्य झाले. (स्तो. १०२:१२, २७) समस्यांचा सामना करत असलेल्या आपल्या सेवकांना मदत करण्यासाठी यहोवा सदैव त्यांच्यासोबत राहील या जाणिवेमुळे त्याला सांत्वन मिळाले. तेव्हा, जर नकारात्मक भावनांमुळे तुम्हाला काही काळासाठी देवाची सेवा जास्त प्रमाणात करणे शक्य होत नसेल तर त्याविषयी प्रार्थना करा. तुमच्या समस्येला तोंड देण्यास साहाय्य मिळावे यासाठीच नव्हे, तर “परमेश्वराच्या नावाची घोषणा” व्हावी यासाठीदेखील यहोवाला विनंती करा.—स्तो. १०२:२०, २१.

२२. आपल्यापैकी प्रत्येक जण यहोवाचे मन कसे आनंदित करू शकतो?

२२ आपण विश्वासात आहोत आणि यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत याची खात्री करण्यासाठी आपण बायबलचा उपयोग करू शकतो. नक्कीच, या जगात राहत असताना नकारात्मक भावनांना किंवा निराशेला पूर्णपणे काढून टाकणे आपल्याला शक्य होणार नाही. पण आपल्यापैकी प्रत्येक जण विश्वासूपणे व धीराने यहोवाची सेवा करून त्याचे मन आनंदित करू शकतो आणि तारण मिळवू शकतो.—मत्त. २४:१३.