व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कौटुंबिक उपासना—तुम्ही ती आणखी आनंददायक कशी बनवू शकता?

कौटुंबिक उपासना—तुम्ही ती आणखी आनंददायक कशी बनवू शकता?

ब्राझीलमध्ये राहणारे एक पिता असे म्हणतात: “कौटुंबिक उपासनेत आम्ही ज्या विषयांवर बोलतो त्यात आम्ही इतकं गुंतून जातो, की मी जोपर्यंत माझ्या कुटुंबातील सदस्यांना ‘आपण ही चर्चा संपवायची का’ असं म्हणत नाही तोपर्यंत, ती चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरूच राहते.” जपानमधील एक कुटुंबप्रमुख ज्यांना दहा वर्षांचा एक मुलगा आहे, ते म्हणतात की माझ्या मुलाला वेळेचे भानच राहत नाही आणि त्याला चर्चा सुरूच ठेवावीशी वाटते. असे का? ते सांगतात: “चर्चा करण्यास तो खूप उत्सुक असतो आणि यामुळे त्याला खूप आनंद मिळतो.”

साहजिकच, सर्वच मुले इतकी उत्साही नसतात; खरे पाहता काहींना तर कौटुंबिक उपासना आनंददायक वाटत नाही. असे का? टोगोमध्ये राहणाऱ्या एका पित्याने असे म्हटले: “यहोवाची उपासना आपण कंटाळवाण्या पद्धतीने करू नये.” कौटुंबिक उपासना कंटाळवाणी वाटत असेल तर ती ज्या प्रकारे चालवली जात आहे त्यामुळे असे घडत असावे का? यशयाने म्हटले की लोकांना शब्बाथामुळे आनंद मिळायचा, त्याचप्रमाणे आज बऱ्याच कुटुंबांना कौटुंबिक उपासनेमुळे आनंद मिळू शकतो.—यश. ५८:१३, १४.

आपली कौटुंबिक उपासना आनंददायक बनवायची असेल तर यासाठी निवांत वातावरणाची गरज आहे याची जाणीव ख्रिस्ती पित्यांना आहे. राल्फ यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. ते म्हणतात की त्यांची कौटुंबिक उपासना ही अभ्यास सत्रे चालवली जातात तशी नसते; तर सर्व जण मनमोकळेपणाने त्या चर्चेत भाग घेतात. पण चर्चेदरम्यान सर्वांची आवड जागृत ठेवणे व त्यांचे लक्ष विचलित न होऊ देणे केव्हाकेव्हा कठीण जाते. एक आई असे म्हणते: “मला जशी हवी तशी कौटुंबिक उपासना आनंददायक करण्याइतकी माझ्यात नेहमीच शक्ती नसते.” तुम्ही अशा समस्येवर मात कशी करू शकता?

फेरबदल करा आणि निरनिराळ्या विषयांवर चर्चा करा

जर्मनीतील दोन मुलांचे वडील असे म्हणतात: “आम्हाला फेरबदल करावाच लागतो.” नटालिया जी दोन मुलांची आई आहे ती असे म्हणते: “आमच्या कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक उपासनेच्या वेळी निरनिराळ्या विषयांवर चर्चा करायला खूप आवडतं.”  बरीच कुटुंबे कौटुंबिक उपासनेची वेगवेगळ्या भागांत वाटणी करतात. “असं केल्यामुळं अभ्यास आणखी रोचक बनतो आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यात सहभाग घेऊ शकतो,” असे दोन किशोरवयीन मुलांचे वडील असलेले क्लेटॉन म्हणतात. उपासनेच्या वेळेची वेगवेगळ्या भागांत वाटणी केल्यामुळे, मुलांमध्ये वयाचे खूप अंतर असेल तर प्रत्येक मुलाच्या गरजांकडे पालक वैयक्तिक रीत्या लक्ष देऊ शकतात. पालक आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या गरजेबद्दल बोलू शकतात आणि कोणती माहिती निवडावी व ती कशी सादर करावी यात फेरबदल करू शकतात.

आपल्या कौटुंबिक उपासनेत निराळेपण आणण्याकरता काही कुटुंबे काय करतात? काही जण त्यांच्या कौटुंबिक उपासनेची सुरुवात राज्य गीते गाऊन करतात. मेक्सिकोतील ख्वॉन असे म्हणतात: “गीत गायल्यामुळं एक चांगलं वातावरण निर्माण होतं आणि उपासनेदरम्यान आम्ही ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यासाठी आमचं मन तयार होतं.” त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी ज्या विषयावर चर्चा केली जाणार आहे त्याच्याशी संबंधित गाणी निवडतात.

श्रीलंका

पुष्कळ कुटुंबे आपल्या कौटुंबिक उपासनेत एकत्र मिळून बायबलचा एक अहवाल वाचतात. त्या अहवालात वेगवेगळ्या व्यक्तींचा उल्लेख केला असेल तर कुटुंबातील सदस्य एक एक भूमिका निवडतात व त्यानुसार बायबल वाचन करतात. अशा प्रकारे ते आपल्या कौटुंबिक उपासनेत वेगळेपणा आणतात. जपानमधील एक वडील सांगतात की त्यांना “सुरुवातीला अशा प्रकारे वाचन करणं थोडं विचित्र वाटलं.” पण त्यांच्या दोन मुलांना, आपले पालक आपल्यासोबत अशा प्रकारे वाचन करत असल्याचे पाहून खूप आनंद झाला. काही कुटुंबे तर बायबल कथांवर आधारित नाटक बसवतात. दक्षिण आफ्रिकेतील दोन मुलांचे वडील असलेले रॉजर असे म्हणतात: “बायबल अहवालातील जे मुद्दे पालक या नात्यानं आमच्या नजरेतून सुटतात ते सहसा मुलांच्या लक्षात येतात.”

दक्षिण आफ्रिका

आणखी एका पद्धतीने आपण आपल्या कौटुंबिक उपासनेत वेगळेपणा आणू शकतो; ती म्हणजे एखाद्या प्रकल्पावर एकत्र मिळून काम करणे. उदाहरणार्थ, कुटुंब मिळून आपण नोहाच्या तारवाचा किंवा शलमोनाने बांधलेल्या मंदिराचा नमुना तयार करू शकतो. यासाठी आपल्याला संशोधन करावे लागेल; असे करणे खरोखरच एक रोमांचक गोष्ट असू शकते. उदाहरणार्थ, आशियामध्ये एक पाच वर्षांची मुलगी तिच्या आईबाबांसोबत व आजीसोबत राहते. त्या सर्वांनी मिळून प्रेषित पौलाच्या मिशनरी दौऱ्यावर आधारित एक बोर्ड गेम तयार केला. इतर कुटुंबांनी निर्गम पुस्तकातील अहवालांवर आधारित बोर्ड गेम तयार केला आहे. टोगोमध्ये राहणारा १९ वर्षांचा डॉनल्ड असे म्हणतो की निरनिराळ्या विषयांवर चर्चा केल्यामुळे “आमच्या कौटुंबिक उपासनेला व आमच्या कौटुंबिक जीवनाला खरा अर्थ लाभला आहे.” तुम्ही अशा एखाद्या प्रकल्पाचा विचार करू शकता का ज्यामुळे तुमची कौटुंबिक उपासना आणखी आनंददायक बनू शकेल?

अमेरिका

तयारी करणे महत्त्वाचे

निरनिराळ्या विषयांवर बोलल्यामुळे व कुटुंबाची गरज ओळखून फेरबदल केल्यामुळे कौटुंबिक उपासना आनंददायक बनते. पण, त्यातून बोधकारक धडे घेण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी तयारी करणे गरजेचे आहे. कधीकधी लहान मुलांना उपासनेच्या वेळी कंटाळा येतो, म्हणून कौटुंबिक उपासनेत आपण कोणत्या माहितीवर चर्चा करणार आहोत याबद्दल वडिलांनी आधीच विचार करणे गरजेचे आहे. त्यांनी वेळ काढून चांगली तयारी केली पाहिजे. एक पिता असे म्हणतात: “मी जेव्हा चांगली तयारी करतो तेव्हा आमची कौटुंबिक उपासना आणखी अर्थपूर्ण बनते.” जर्मनीतील एक पिता, येणाऱ्या आठवड्यांमध्ये कौटुंबिक उपासनेत कोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे हे आधीच आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगतात. बेनिनमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबात दोन ते बारा वयोगटातील सहा मुले आहेत. त्यांचे वडील जेव्हा कौटुंबिक उपासनेत बायबल-आधारित डीव्हीडी पाहण्याचे ठरवतात तेव्हा ते आधीच आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्यावर आधारित काही प्रश्न तयार करून देतात. खरेच, चांगली तयारी केल्यामुळे आपल्या कौटुंबिक उपासनेचा दर्जा आणखी सुधारतो.

कौटुंबिक उपासनेत कशाविषयी चर्चा करण्यात येणार आहे ही गोष्ट कुटुंबातील सदस्यांना आधीच माहीत असते तेव्हा ते आठवड्यादरम्यान त्याबद्दल बोलू शकतात, ज्यामुळे त्यांचा उत्साह वाढू शकतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उपासनेसाठी जर एखादी नेमणूक मिळाली, तर प्रत्येकाला असे वाटेल की ही त्याची किंवा तिची कौटुंबिक उपासना आहे.

कौटुंबिक उपासना नियमितपणे करा

बऱ्याच कुटुंबांना नियमितपणे कौटुंबिक उपासना करत राहणे कठीण जाते.

पुष्कळ वडिलांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याकरता बरेच तास काम करावे लागते. उदाहरणार्थ, मेक्सिकोतील एक वडील सकाळी सहा वाजता घर सोडतात आणि रात्री सुमारे आठच्या आधी कधीच येत नाहीत. केव्हाकेव्हा इतर आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे आपल्याला आपल्या कौटुंबिक उपासनेच्या वेळेत फेरबदल करण्याची गरज भासू शकते.

असे असले तरी कौटुंबिक उपासना नियमितपणे करत राहण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. टोगोमध्ये राहणारी अकरा वर्षांची लोइस आपल्या कुटुंबाने केलेल्या निर्धाराविषयी असे म्हणते: “काही कारणामुळं, ठरवलेल्या दिवशी आम्हाला आमची कौटुंबिक उपासना उशिरा सुरू करावी लागली तरी आम्ही नियमितपणे कौटुंबिक उपासना करतोच.” त्यामुळे, काही कुटुंबे आठवड्याच्या सुरुवातीलाच आपली कौटुंबिक उपासना करण्याचे का ठरवतात ही गोष्ट समजण्याजोगी आहे. कारण त्या दिवशी अचानक काही अगदी महत्त्वाचे काम आले, तर त्याच आठवड्यात दुसऱ्या एखाद्या दिवशी ते आपली कौटुंबिक उपासना करू शकतात.

कौटुंबिक उपासना करणे हा यहोवाच्या उपासनेचा एक भाग आहे. तर मग तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य दर आठवडी त्याच्या “वाणीचे फळ” यहोवाला अर्पण करो. (होशे. १४:२) आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ही एक आनंदाची वेळ असो, “कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”—नहे. ८:९, १०.