व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वृद्धजनांची काळजी घेणे

वृद्धजनांची काळजी घेणे

“मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.”—१ योहा. ३:१८.

१, २. (क) बऱ्याच कुटुंबांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि यामुळे कोणते प्रश्न उद्भवतात? (ख) बदलत्या परिस्थितीसोबत येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आईवडील व मुले काय करू शकतात?

एकेकाळी धडधाकट आणि स्वावलंबी असलेले आपले आईवडील आता स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत नाहीत, हे पाहून आपल्याला खूप दुःख होऊ शकते. कदाचित, आईचे किंवा वडिलांचे पडल्यामुळे हाड मोडले असेल, विस्मरणामुळे किंवा मानसिक गोंधळामुळे ते वाट चुकले असतील किंवा त्यांना एखादा जीवघेणा आजार झाला असेल. वृद्धांच्या बाजूने विचार केला तर त्यांना हे स्वीकारणे खूप कठीण जाऊ शकते की शारीरिक बदलांमुळे किंवा इतर व्याधींमुळे आता त्यांना पूर्वीसारखे स्वातंत्र्य नसणार. (ईयो. १४:१) अशी परिस्थिती असल्यास आपण काय करू शकतो? आपण आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी कशी घेऊ शकतो?

वृद्धांची काळजी घेण्यासंबंधी एक लेख असे म्हणतो: “वृद्धावस्थेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करणे जरी कठीण असले, तरी ज्या कुटुंबाने वृद्धजनांची काळजी घेण्याबाबत अनेक पर्यायांवर आधीच चर्चा करून एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेतले असतील त्या कुटुंबाला येणाऱ्या कोणत्याही समस्येला तोंड देणे जास्त सोपे जाईल.” अशा प्रकारची चर्चा करण्याचे महत्त्व आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा आपण हे ओळखू की वाढत्या वयासोबत समस्या या येतीलच. असे असले, तरी आईवडिलांच्या वृद्धावस्थेला तोंड देण्यासाठी आपण पूर्वतयारी करू शकतो व त्याबाबत काही निर्णयदेखील घेऊन ठेवू शकतो. आता आपण पाहू या की कुटुंबातील सदस्य कशा प्रकारे एकमेकांना सहकार्य करून वृद्धापकाळात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी योजना करू शकतात.

 “अनिष्ट” दिवसांसाठी तयारी करणे

३. वृद्ध आईवडिलांना साहाय्य पुरवण्याची गरज दिवसेंदिवस वाढते तेव्हा कुटुंबातील सदस्य काय करू शकतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

बहुतेक वृद्धजनांच्या जीवनात अशी वेळ येते जेव्हा त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज पडते. (उपदेशक १२:१-७ वाचा.) वृद्ध पालकांना जेव्हा स्वतःची काळजी स्वतः घेणे शक्य होत नाही, तेव्हा त्यांनी व त्यांच्या प्रौढ मुलांनी हे ठरवले पाहिजे की त्यांना सर्वोत्तम आणि आर्थिक दृष्ट्या झेपेल अशी मदत कशी पुरवता येईल. अशा वेळेस पूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन आईवडिलांच्या गरजा, एकमेकांचे सहकार्य व योजना अशा विषयांवर चर्चा करणे सुज्ञपणाचे ठरेल. उपस्थित सर्वांनी, खासकरून आईवडिलांनी आपले विचार व भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या पाहिजेत आणि व्यावहारिक रीत्या त्यावर तोडगा शोधला पाहिजे. आईवडिलांना थोडीफार मदत पुरवल्यास ते पुढेही स्वतंत्रपणे स्वतःच्या घरात राहू शकतील का आणि हे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरेल का यावर ते चर्चा करू शकतात. * किंवा प्रत्येक सदस्य आपआपल्या क्षमतेनुसार जबाबदारी उचलण्यास कसा हातभार लावू शकतो यावर ते विचार करू शकतात. (नीति. २४:६) उदाहरणार्थ, काही सदस्य रोजच्या जीवनातील कामांत त्यांना मदत पुरवू शकतील तर काहींना आर्थिक दृष्ट्या मदत पुरवणे शक्य असेल. आईवडिलांची काळजी घेण्यात प्रत्येकाचा वाटा आहे या गोष्टीची जाणीव सर्वांना असली पाहिजे. असे असले, तरी काही काळाने प्रत्येकाची भूमिका बदलू शकते आणि भूमिकांमध्ये फेरबदल करण्याचीही गरज पडू शकते.

४. कुटुंबातील सदस्य कोणाकडून मदत मिळवू शकतात?

आईवडिलांची काळजी घेत असताना सर्वप्रथम त्यांच्या शारीरिक व्याधींबद्दल होता होईल तितकी माहिती गोळा करा. एखाद्या आजारामुळे जर त्यांची प्रकृती खालावत चालली असेल, तर पुढे चालून काय घडू शकते याबद्दल जाणून घ्या. (नीति. १:५) अशा सरकारी संस्थांशी संपर्क साधा ज्या वृद्धजनांसाठी सेवा पुरवतात. तुमच्या भागांत सामाजिक संस्थांकडून काही सेवा पुरवल्या जात असतील तर त्यांबद्दल माहिती घ्या. यामुळे तुमचे काम थोडे हलके होऊ शकते व त्यांची काळजीही चांगल्या प्रकारे घेतली जाऊ शकते. कुटुंबातील परिस्थितीत बदल होणार आहे या विचाराने तुमच्या मनात काहीतरी गमावण्याची भावना, भीती, गोंधळ किंवा अशा प्रकारच्या अस्वस्थ करणाऱ्या भावना उत्पन्न होऊ शकतात. असे असल्यास, तुमच्या जवळच्या मित्रासोबत याबाबतीत बोला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवासमोर आपले मन मोकळे करा. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणारी मनःशांती तो तुम्हाला देऊ शकतो.—स्तो. ५५:२२; नीति. २४:१०; फिलिप्पै. ४:६, ७.

५. ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांबद्दल आधीच माहिती काढणे सुज्ञपणाचे का आहे?

ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी काही वृद्धजन व त्यांचे कुटुंब आधीच सुज्ञपणे माहिती काढून ठेवतात. जसे की आईवडिलांनी आपल्या मुलासोबत अथवा मुलीसोबत राहणे व्यावहारिक असेल का, किंवा मग स्थानिक रीत्या उपलब्ध असलेल्या इतर सोयींचा कसा उपयोग करता येईल या गोष्टींवर ते आधीच विचार करतात. पुढे येणाऱ्या ‘समस्या व दुःख’ यांचा आधीच विचार करून ते त्यासाठी मनाची तयारी करतात. (स्तो. ९०:१०) पण, बरीच कुटुंबे आधीच योजना करून ठेवत नाहीत आणि त्यामुळे जेव्हा बिकट प्रसंग ओढवतो तेव्हा त्यांना कठीण निर्णय घाईत घ्यावे लागतात. एक तज्ज्ञ याविषयी असे म्हणतात: “अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी ही मुळीच योग्य वेळ नसते.” अशा वातावरणात कुटुंबातील सदस्य तणावात असू शकतात आणि त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे पाहता आधीच सर्व गोष्टींचा विचार केल्याने प्रसंग ओढवल्यास त्याला सामोरे जाणे सोपे जाते.—नीति. २०:१८.

वृद्ध आईवडिलांची काळजी कशी घेता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी कुटुंब एकत्र येऊ शकते (परिच्छेद ६-८ पाहा)

६. वृद्धजनांच्या राहण्याच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी व मुलांनी चर्चा केल्यामुळे दोघांनाही फायदा कसा होऊ शकतो?

आईवडिलांशी त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबद्दल व त्यात काही फेरबदल करण्याबद्दल बोलणे कदाचित तुम्हाला कठीण वाटू शकते. असे असले तरी, बऱ्याच लोकांचा असा अनुभव आहे की या विषयावर चर्चा केल्यामुळे नंतर त्यांना फायदा झाला. असे का? कारण एका प्रेमळ वातावरणात समजूतदारपणे केलेल्या या चर्चांमुळे व्यावहारिक योजना करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रेम व  नम्रता हे गुण दाखवून एकमेकांचे विचार जाणून घेतल्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आल्यावर त्यांना ते निर्णय घेणे सोपे गेले. वृद्धजनांना शक्य होईल तोपर्यंत स्वतंत्र आणि स्वावलंबी राहण्याची इच्छा असली, तरी परिस्थिती बदलल्यास त्यांना कशा प्रकारची मदत आवडेल याविषयी त्यांनी आपल्या मुलांसोबत चर्चा केल्याने नक्कीच चांगले परिणाम निघतील.

७, ८. कुटुंबातील सदस्यांनी कोणत्या गोष्टींवर चर्चा केली पाहिजे आणि का?

आईवडिलांनो, कुटुंबासोबत होणाऱ्या चर्चेमध्ये इतर सदस्यांना तुमची आर्थिक परिस्थिती, तुमच्या इच्छा आणि तुमच्या पसंतीचे पर्याय सांगा. असे केल्यामुळे पुढे कधी जर तुम्हाला निर्णय घेणे शक्य नसेल तर मुलांना तुमच्या पसंतीचे निर्णय घेण्यास मदत होईल. बहुतेक वेळा मुले तुमच्या इच्छांचा मान राखतील आणि तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला शक्य तितके स्वातंत्र्य देण्याचादेखील प्रयत्न करतील. (इफिस. ६:२-४) तुमची अशी इच्छा आहे का की तुमच्या एका मुलाने अथवा मुलीने तुम्हाला त्यांच्या घरी राहण्यासाठी घेऊन जावे की तुमच्या मनात काही वेगळे आहे? असल्यास तुमचे विचार मुलांना सांगा. व्यावहारिक रीत्या विचार करा आणि कुटुंबातील इतर सदस्यदेखील तुमच्यासारखाच विचार करतील असे धरून चालू नका. तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाही आपल्या विचारांत फेरबदल करण्यासाठी वेळ लागू शकतो हे ओळखा.

चर्चा केल्याने व योजना आखल्याने पुढे चालून समस्या टाळता येतात याची जाणीव सर्वांना असली पाहिजे. (नीति. १५:२२) यात वैद्यकीय उपचार आणि त्यांसंबंधी तुमच्या पसंतीवर चर्चा करणेदेखील सामील आहे. या चर्चांमध्ये उपचारांसंबंधी यहोवाचे साक्षीदार जे कार्ड (डी.पी.ए. कार्ड) वापरतात त्यांतील मुद्यांवर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार आहे की तिला दिल्या जाणाऱ्या उपचाराबद्दल तिला कळवण्यात यावे आणि तो उपचार स्वीकारावा अथवा नाही हेदेखील ती ठरवू शकते. वैद्यकीय उपचारासंबंधी एका व्यक्तीच्या काय इच्छा आहेत हे एका कायदेशीर दस्तऐवजावर आधीच नोंद करून ठेवणे शक्य आहे. उपचारासंबंधी निर्णय घेणारा प्रतिनिधी (ज्या ठिकाणी कायद्याने हे शक्य व मान्य असेल) नेमल्यामुळे गरज पडल्यास ही विश्वासू व्यक्ती तुमच्या वतीने निर्णय घेईल. अशा व्यक्तींकडे सर्व आवश्यक दस्तऐवजांच्या प्रती असल्या पाहिजेत जेणेकरून गरज पडल्यास त्यांना याचा फायदा होऊ शकतो. काहींनी या दस्तऐवजांच्या प्रती मृत्युपत्र, विमा, बँकेची कागदपत्रे, आणि इतर सरकारी कागदपत्रे यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसोबत ठेवल्या आहेत.

बदलत्या परिस्थितीला तोंड देणे

९, १०. वृद्धजनांमध्ये होणाऱ्या कोणत्या बदलांमुळे त्यांना जास्त मदत देण्याची गरज पडू शकते?

बऱ्याच वेळा, वृद्धांना त्यांची परिस्थिती व क्षमता यांनुसार शक्य तितके स्वातंत्र्य असावे अशी मुलांची व त्या आईवडिलांचीदेखील इच्छा असते. त्यांना कदाचित स्वतःचे जेवण बनवणे, घराची स्वच्छता करणे, वेळच्यावेळी स्वतःहून औषधे घेणे आणि इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधणे शक्य असेल. त्यामुळे ते मुलांना याची खात्री पटवून देतात की दैनंदिन कामासाठी त्यांना मदतीची फारशी गरज नाही. पण, पुढे चालून जर आईवडिलांना बाहेर जाणेयेणे कठीण झाले, उदाहरणार्थ त्यांना बाहेर जाऊन खरेदी करणे जमत नसेल किंवा त्यांना वारंवार विस्मरण होत असेल, तर मात्र मुलांनी या बदलत्या परिस्थितीची दखल घेतली पाहिजे.

१० मानसिक गोंधळ, नैराश्य, नैसर्गिक क्रियांवर नियंत्रण नसणे, तसेच ऐकण्याची क्षमता, दृष्टी व स्मरणशक्ती क्षीण होणे ही सर्व वृद्धापकाळाची लक्षणे आहेत. पण, यांवर  वैद्यकीय उपचार करणे शक्य आहे. वरील लक्षणे दिसू लागताच वैद्यकीय सल्ला घ्या. याबाबतीत मुलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि पुढे चालून, ज्या गोष्टी आईवडील आधी स्वतः करायचे त्या गोष्टी करण्यातदेखील कदाचित मुलांना पुढाकार घेण्याची गरज पडेल. आईवडिलांना परिणामकारक मदत पुरवण्यासाठी मुलांना एका अर्थी त्यांचे वकील, सेक्रेटरी, ड्रायव्हर व अशा इतर भूमिकादेखील पार पाडाव्या लागतील.—नीति. ३:२७.

११. बदलांमुळे येणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

११ तुमच्या आईवडिलांच्या समस्या जर वाढत असतील, तर त्यांना पुरवली जाणारी मदत किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था यात फेरबदल करण्याची गरज पडू शकते. हे बदल जितके छोटे असतील तितकेच त्यांच्याशी जुळवून घेणे सोपे जाईल. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांपासून दूर राहत असाल, तर एखाद्या बांधवाने किंवा शेजाऱ्याने वेळोवेळी आईवडिलांची भेट घेऊन त्यांची परिस्थिती तुम्हाला सांगणे पुरेसे असेल का? त्यांना स्वयंपाक आणि घराची साफसफाई या बाबतींतच मदत हवी आहे का? ते राहत असलेल्या घरात जर काही फेरबदल केलेत तर त्यांना घरात चालाफिरायला, अंघोळ व इतर गोष्टी करायला मदत होईल का व सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील हे मदतीचे ठरेल का? किंवा फक्त घरकामासाठी एखादी व्यक्ती ठेवल्याने वृद्धजनांना जे स्वातंत्र्य हवे आहे ते मिळेल व त्यासोबतच त्यांची काळजीदेखील चांगल्या प्रकारे घेतली जाईल. पण, त्यांचे एकटे राहणे सुरक्षित नसेल तर मग त्यांना चोवीस तास मदत पुरवण्याची गरज पडू शकते. काहीही असो, तुमच्या भागांत उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांची माहिती काढा. *नीतिसूत्रे २१:५ वाचा.

काही जण आव्हानाचा कसा सामना करतात?

१२, १३. लांब राहणारी काही मुले आईवडिलांच्या इच्छांचा मान राखून त्यांची काळजी कशी घेतात?

१२ आपल्या आईवडिलांना कोणताही त्रास होऊ नये अशी प्रेमळ मुलांची इच्छा असते. त्यांची चांगली काळजी घेण्यात येत आहे हे पाहून मुलांना काही प्रमाणात मानसिक शांती मिळते. पण, इतर जबाबदाऱ्या असल्यामुळे बरीच प्रौढ मुले आपल्या आईवडिलांजवळ राहत नाहीत. अशा परिस्थितीत काही जण कामातून मिळणाऱ्या सुट्ट्यांचा उपयोग आईवडिलांची भेट घेण्यासाठी करतात. ते घरी जाऊन आईवडिलांना जी कामे आता करता येत नाहीत ती करण्याद्वारे त्यांना मदत करतात. मुलांनी आईवडिलांना नियमित, शक्य असल्यास दररोज फोन केल्यास, तसेच पत्र किंवा ई-मेल पाठवल्यास मुलांच्या प्रेमाची त्यांना जाणीव होत राहील.—नीति. २३:२४, २५.

१३ परिस्थिती काहीही असो, आईवडिलांना रोजच्या जीवनात जी मदत पुरवली जाते त्याचे वेळोवेळी परीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांजवळ राहत नसाल आणि ते साक्षीदार असतील, तर तुम्ही त्यांच्या मंडळीतील वडिलांशी बोलू शकता आणि याबाबतीत त्यांचा सल्ला घेऊ शकता. आणि याविषयी प्रार्थना करण्याचे कधीच विसरू नका. (नीतिसूत्रे ११:१४ वाचा.) तुमचे आईवडील सत्यात नसले तरी “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख” या आज्ञेचे तुम्ही पालन केले पाहिजे. (निर्ग. २०:१२; नीति. २३:२२) प्रत्येक कुटुंब सारखाच निर्णय घेईल असे नाही. काही मुले वृद्ध आईवडिलांना आपल्या घरात किंवा आपल्या घराजवळ ठेवण्याचा निर्णय घेतात. पण, प्रत्येकालाच असे करणे शक्य नसेल. काही आईवडील आपल्या मुलांसोबत राहणे पसंत करत नाहीत; त्यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य हवे असते व मुलांवर ओझे बनायचे नसते. काही वृद्धजनांची आर्थिक परिस्थिती चांगली असू शकते आणि त्यामुळे ते स्वतःच्याच घरात राहून घरकाम व इतर सेवांसाठी पैसे देण्याचे कदाचित पसंत करतील.—उप. ७:१२.

१४. आईवडिलांची मुख्यतः काळजी घेणाऱ्या व्यक्तीसमोर कोणत्या समस्या येऊ शकतात?

१४ बऱ्याच कुटुंबांत असे दिसते की जो मुलगा किंवा जी मुलगी आईवडिलांच्या जवळ राहते तिच्यावरच त्यांची काळजी घेण्याची जास्त जबाबदारी पडते. पण, आईवडिलांची मुख्यतः काळजी घेणाऱ्या मुलाने किंवा मुलीने त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या गरजादेखील लक्षात घेतल्या पाहिजेत. वेळ व शक्ती खर्च करण्याची प्रत्येकाची एक सीमा असते. आणि जी व्यक्ती पालकांची मुख्यतः काळजी घेत आहे तिची परिस्थितीदेखील कालांतराने बदलू शकते. अशा वेळी आईवडिलांची काळजी घेण्यासाठी जी व्यवस्था केली आहे त्यात काही फेरबदल करावे लागू शकतात.  कुटुंबातील एकच व्यक्ती खूप जास्त जबाबदाऱ्या घेत आहे का? आईवडिलांची काळजी घेण्यात तिचे इतर भाऊबहीणदेखील हातभार लावू शकतील का, उदाहरणार्थ ते आळीपाळीने मदत करू शकतील का?

१५. आईवडिलांची मुख्यतः काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा ताण कमी करण्यासाठी काय केले जाऊ शकते?

१५ वृद्ध पालकांना जेव्हा सतत मदतीची गरज असते तेव्हा त्यांची मुख्यतः काळजी घेणारी व्यक्ती शारीरिक व मानसिक रीत्या पार थकून जाऊ शकते. (उप. ४:६) आपल्या आईवडिलांना सर्वोत्तम मदत पुरवण्याची प्रेमळ मुलांची इच्छा असते. पण, सतत केल्या जाणाऱ्या मागण्यांमुळे मानसिक ताण येऊ शकतो. पालकांची काळजी घेणाऱ्यांच्या बाबतीत जर असे घडत असेल तर त्यांनी व्यावहारिक रीत्या विचार करून मदत मागितली पाहिजे. अशांना जर वेळोवेळी मदत पुरवली गेली तर त्यांना आईवडिलांची काळजी घेणे सोपे जाईल.

१६, १७. वृद्ध आईवडिलांची काळजी घेताना मुलांसमोर कोणती आव्हाने येतात आणि ते त्यांचा सामना कसा करू शकतात? (“कृतज्ञतेने काळजी घेणे” ही चौकटदेखील पाहा.)

१६ वृद्धावस्थेमुळे आपल्या आईवडिलांच्या प्रकृतीवर होणारे दुष्परिणाम पाहणे दुःखदायक असते. वृद्धांची काळजी घेणाऱ्या बऱ्याच जणांच्या मनात निराशा, चिंता, वैफल्य, राग, दोषीपणा आणि कटुता यांसारख्या भावना येतात. कधीकधी वृद्ध पालक मनाला दुखावेल असे काही बोलून जातात किंवा मिळणाऱ्या मदतीबद्दल कृतज्ञता दाखवत नाहीत. तुमच्या बाबतीत असे घडल्यास लगेच मनाला लावून घेऊ नका. मानसिक आरोग्याचे एक तज्ज्ञ असे म्हणतात: “मनात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या भावनेवर, विशेषतः तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या भावनेवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती भावना स्वीकारणे. तुमच्या मनात ती भावना आली आहे हे नाकारू नका किंवा त्यासाठी स्वतःला दोषी ठरवू नका.” तुमच्या विवाहसोबत्याशी, कुटुंबातील इतर सदस्यांशी किंवा एका जवळच्या मित्राशी याविषयी बोलून आपले मन मोकळे करा. अशा संवादांमुळे तुम्हाला तुमच्या भावना समजून घेण्यास मदत मिळेल.

१७ काही देशांत, जेव्हा वृद्ध आईवडिलांची घरात काळजी घेणे शक्य नसते तेव्हा त्यांची प्रौढ मुले त्यांना वृद्धांची काळजी घेणाऱ्या खास संस्थांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतात. एक ख्रिस्ती बहीण तिच्या आईला भेटण्यासाठी जवळपास दररोजच अशा नर्सिंग होममध्ये जात होती. ती तिच्या कुटुंबाविषयी असे सांगते: “आईला चोवीस तास मदतीची गरज होती आणि आम्ही ती पुरवू शकलो नाही. तिला नर्सिंग होममध्ये ठेवण्याचा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. आमचं मन यासाठी तयारच होत नव्हतं. पण तिच्या जीवनातील शेवटच्या काही महिन्यांसाठी हाच पर्याय उत्तम होता आणि तिनंदेखील तो स्वीकारला.”

१८. काळजी घेणारे कोणत्या गोष्टीची हमी बाळगू शकतात?

१८ वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्याच्या जबाबदारीत बऱ्याच गोष्टी गोवलेल्या आहेत व ती पार पाडताना मानसिक ताणदेखील येऊ शकतो. वृद्धजनांची काळजी घेण्यासाठी कोणती पद्धत सर्वात उत्तम ठरेल हे प्रत्येक कुटुंबाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. असे असले, तरी सुज्ञपणे विचार करून केलेल्या योजना, एकमेकांचे सहकार्य, चांगला संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासून केलेल्या प्रार्थना या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा आदर करण्याची तुमची जबाबदारी पार पाडण्यास मदत मिळेल. यामुळे तुम्हाला याचे समाधान असेल की तुम्ही आईवडिलांना लागणारी मदत व काळजी पुरवत आहात. (१ करिंथकर १३:४-८ वाचा.) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या आईवडिलांचा मान राखणाऱ्यांना यहोवा जी मनःशांती देतो ती तुम्हीही अनुभवाल याची तुम्ही हमी बाळगू शकता.—फिलिप्पै. ४:७.

^ परि. 3 वृद्धांची काळजी घेण्याबाबत आईवडील व मुले कोणता पर्याय पसंत करतील हे स्थानिक संस्कृतीवर अवलंबून असू शकते. काही भागांत, वेगवेगळ्या वयोगटांतील कौटुंबिक सदस्यांनी एकत्र राहणे किंवा अगदी जवळचा संबंध ठेवणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. तर काही भागांत वृद्ध आईवडिलांनी वेगळे राहणे, किंवा वृद्धांची काळजी घेणाऱ्या खास संस्थांमध्ये राहणे ही सामान्य गोष्ट आहे.

^ परि. 11 तुमचे आईवडील जर अजूनही स्वतःच्या घरात राहत असतील तर त्यांची काळजी घेणाऱ्या विश्वासू व्यक्तींकडे घराच्या किल्ल्या असणे गरजेचे आहे. यामुळे तातडीच्या प्रसंगात वृद्ध व्यक्तीला मदत करणे शक्य होईल.