व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचे बोलणे—‘होय आणि तरी नाही?’

तुमचे बोलणे—‘होय आणि तरी नाही?’

पुढील परिस्थितीचा विचार करा: एक वडील जे इस्पितळ संपर्क समितीचे सदस्य आहेत, एका तरुण बांधवासोबत रविवारी सकाळी क्षेत्र सेवेत जाण्याची योजना करतात. पण, रविवारी सकाळी त्या वडिलांना एका बांधवाचा फोन येतो. त्या बांधवाच्या पत्नीचा अपघात झाल्यामुळे तिला इस्पितळात भरती करण्यात आले आहे. पत्नीच्या उपचारासाठी रक्त न घेण्याची आपली भूमिका समजून घेईल असा डॉक्टर शोधण्यासाठी तो बांधव वडिलांची मदत मागतो. त्यामुळे संकटात असलेल्या या कुटुंबाची मदत करण्यासाठी ते वडील, तरुण बांधवासोबत क्षेत्र सेवेत जाण्याची योजना रद्द करतात.

आणखी एका परिस्थितीचा विचार करा: आपल्या दोन मुलींची एकटी काळजी घेत असलेल्या एका आईला त्यांच्याच मंडळीतील एका जोडप्याकडून त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण मिळते. जेव्हा ती आपल्या मुलींना याबद्दल सांगते, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्या आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहू लागतात. पण, ज्या दिवशी त्यांच्या घरी जायचे असते त्याच्या एक दिवस अगोदर ते जोडपे त्या आईला कळवतात की काही कारणास्तव त्यांना त्यांचे निमंत्रण रद्द करावे लागणार आहे. नंतर तिला कळते की त्यांनी हे निमंत्रण का रद्द केले. तिला निमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या काही मित्रांनी त्याच दिवशी त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि त्या जोडप्याने ते स्वीकारले.

एक ख्रिस्ती या नात्याने आपण नेहमी आपला शब्द पाळला पाहिजे यात शंका नाही. आपले बोलणे कधीही “‘होय’ आणि तरी ‘नाही’” असे असू नये. (२ करिंथ. १:१८) पण, वरील दोन उदाहरणांवरून असे दिसते की प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी नसते. कधीकधी आपल्या योजना रद्द करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही असे वाटते. एकदा प्रेषित पौलासमोरही अशीच परिस्थिती आली होती.

पौलावर चंचल असण्याचा आळ

इ.स. ५५ साली आपल्या तिसऱ्या मिशनरी यात्रेदरम्यान जेव्हा पौल इफिसमध्ये होता, तेव्हा एजियन समुद्र पार करून करिंथला आणि त्यानंतर मासेदोनियाला जाण्याची त्याची योजना होती. जेरूसलेमला परतताना करिंथ मंडळीने जेरूसलेमधील बांधवांसाठी दिलेल्या प्रेमळ देणग्या घेण्यासाठी पौलाने करिंथला दुसऱ्यांदा भेट देण्याचे ठरवले. (१ करिंथ. १६:३) त्याचा तेथे जाण्याचा बेत होता हे २ करिंथकर १:१५, १६ या वचनांतून स्पष्ट होते, तेथे आपण असे वाचतो: “असा भरवसा बाळगून तुम्हास दोनदा कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुम्हाकडे यावे, तुम्हाकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुम्हाकडे यावे, आणि तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता.”

पौलाने पूर्वीच एका पत्रात करिंथच्या बांधवांना त्याच्या या योजनेबद्दल सांगितले असावे असे दिसते. (१ करिंथ. ५:९) पण, ते पत्र लिहिण्याच्या काही काळातच  पौलाला ख्लोवे आणि त्याच्या घरच्यांकडून कळते की करिंथ मंडळीत गंभीर स्वरूपाच्या फूटी निर्माण झाल्या आहेत. (१ करिंथ. १:१०, ११) त्यामुळे पौल त्याच्या आधीच्या योजनेत फेरबदल करण्याचे ठरवतो आणि पहिले करिंथकर हे पत्र लिहितो. त्या पत्रात पौल प्रेमळ मार्गदर्शन व सुधारणुकीचा सल्ला देतो. त्यात तो हेदेखील सांगतो की त्याने त्याच्या प्रवासाचा मार्ग बदलला आहे. आता तो प्रथम मासेदोनियाला जाईल आणि त्यानंतर करिंथला येईल.—१ करिंथ. १६:५, ६. *

करिंथच्या बांधवांना जेव्हा पौलाचे पत्र मिळाले, तेव्हा तेथील काही “अतिश्रेष्ठ” अशा प्रेषितांनी त्याच्यावर चंचल असण्याचा आणि आपला शब्द न पाळण्याचा आरोप लावला. पौलाने या आरोपांचा विरोध करत असे विचारले: “तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही, अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय?”—२ करिंथ. १:१७; ११:५.

आपल्या मनात कदाचित असे येऊ शकते, की पौल खरोखरच चंचल होता का? असे मुळीच नव्हते! चंचल या शब्दावरून भरवशालायक नसणे किंवा दिलेले वचन न पाळणे हे सूचित होते. “मी जे योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय?” असा प्रश्न विचारून पौलाने करिंथच्या ख्रिश्चनांना हे दाखवले की त्याने त्याच्या योजनेत जो फेरबदल केला होता तो भरवशालायक नसल्यामुळे केला नव्हता.

पौलाने त्याच्यावर लावण्यात आलेला आरोप नाकारत असे लिहिले: “देव विश्वसनीय आहे. आमचे तुम्हाबरोबर बोलणे, होय, नाही, असे नाही.” (२ करिंथ. १:१८) पौलाने जेव्हा त्याच्या योजनेत फेरबदल केला, तेव्हा त्याच्या मनात बंधुभगिनींचे भले करण्याची इच्छा होती यात शंका नाही. २ करिंथकर १:२३ या वचनातून आपल्याला असे समजते की पौलाने आपल्या योजनेत फेरबदल करण्याद्वारे खरेतर करिंथमधील बांधवांची “गय केली.” त्याने तेथे जाण्यापूर्वी करिंथमधील बांधवांना स्वतःत बदल करण्याची संधी दिली. मासेदोनियात असताना पौलाला तीताद्वारे हे समजले की त्याने पाठवलेल्या पत्रामुळे करिंथमधील बांधवांनी शोक व पश्‍चात्ताप केला आहे. पौलाला ज्याची आशा होती तेच घडले आणि यामुळे त्याला खूप आनंद झाला.—२ करिंथ. ६:११; ७:५-७.

देवाला म्हटलेले “आमेन”

पौलावर चंचल असण्याचा जो आरोप लावण्यात आला त्यावरून कदाचित असे सूचित झाले असावे, की जर तो दैनंदिन जीवनाच्या बाबतींत भरवशालायक नाही तर तो जे साक्षकार्य करत होता तेदेखील भरवशालायक नाही. पण, पौलाने करिंथकरांना याची आठवण करून दिली की त्याने त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष दिली होती. त्याने लिहिले: “कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य यांच्याकडून, तुम्हामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती.” (२ करिंथ. १:१९) पौल ज्याचे अनुकरण करत होता तो येशू ख्रिस्त भरवशालायक होता का? निश्‍चितच तो भरवशालायक होता. पृथ्वीवरील आपल्या जीवनात व सेवाकार्यात येशू नेहमी सत्य बोलला. (योहा. १४:६; १८:३७) येशूने ज्याबद्दल प्रचार केला ते पूर्णपणे सत्य व भरवशालायक होते आणि पौलानेही तोच संदेश सांगितला. याचा अर्थ, त्याचे साक्षकार्यही भरवशालायक होते.

यहोवा हा “सत्यस्वरूप” देव आहे यात तर कोणतीच शंका नाही. (स्तो. ३१:५) पौलाने पुढे जे सांगितले त्यावरून हे दिसून येते: “देवाची वचने कितीही असोत, त्याच्या [ख्रिस्ताच्या] ठायी होय हे आहे.” पृथ्वीवर असताना येशूने जी परिपूर्ण एकनिष्ठता दाखवली त्यामुळे यहोवाच्या अभिवचनांवर शंका घेण्यासाठी कोणतीच जागा उरली नाही. पौलाने पुढे म्हटले: “म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे [येशूद्वारे] आमेन म्हणतो.” (२ करिंथ. १:२०) येशू स्वतः या गोष्टीची खात्री आहे की यहोवाची सर्व अभिवचने पूर्ण होतील आणि म्हणून आम्ही त्याच्याद्वारे “आमेन” म्हणतो असे पौलाने म्हटले.

ज्या प्रकारे यहोवा व येशू नेहमी सत्य बोलतात त्याच प्रकारे पौलाने नेहमी दिलेला शब्द पाळला. (२ करिंथ. १:१९) तो चंचल व “देहस्वभावाप्रमाणे” वचन देणारा नव्हता. (२ करिंथ. १:१७) तर, तो  “आत्म्याच्या प्रेरणेने” चालणारा होता. (गलती. ५:१६) इतरांसोबतच्या व्यवहारांत त्याने नेहमी त्यांच्या भल्याचा विचार केला. त्याचे होय ते होयच होते!

तुमचे बोलणे होय तर होयच असते का?

जे लोक बायबलच्या तत्त्वांनुसार चालत नाहीत त्या लोकांसाठी वचन देणे, आणि नंतर समजा एखादी समस्या आली किंवा काही फायदा होणार असेल तर दिलेले वचन मोडणे हे सर्वसामान्य झाले आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात “होय” हे नेहमीच “होय” नसते. एखाद्या गोष्टीचे लेखी स्वरूपात वचन दिले असले तरी ते मोडणे आजच्या काळात लोकांना वावगे वाटत नाही. लग्नाच्या वेळी पती-पत्नी एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात, पण अनेकांना विवाहबंधन हे कायमचे बंधन आहे असे वाटत नाही. घटस्फोटाच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ हे दर्शवते की अनेकांसाठी विवाह हे तात्पुरते बंधन आहे जे केव्हाही मोडता येऊ शकते.—२ तीम. ३:१, २.

तुमच्या बाबतीत काय? तुमचे बोलणे होय तर होयच असते का? सुरुवातीला दिलेल्या दोन उदाहरणांवरून हे दिसून येते की कधीकधी तुम्हाला तुमची योजना रद्द करावी लागते. पण, चंचलपणामुळे नव्हे तर तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे तुम्ही असे करता. ख्रिस्ती या नात्याने, दिलेले वचन पाळण्याचा तुम्ही कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. (स्तो. १५:४; मत्त. ५:३७) तुम्ही जर असे केले तर लोक तुम्हाला भरवशालायक, दिलेला शब्द पाळणारा आणि नेहमी खरे बोलणारा म्हणून ओळखतील. (इफिस. ४:१५, २५; याको. ५:१२) तुम्ही भरवशालायक आहात हे जेव्हा लोकांच्या लक्षात येईल, तेव्हा ते तुम्ही सांगत असलेली राज्याची सुवार्ता ऐकण्यास जास्त उत्सुक असतील. म्हणूनच, आपले बोलणे होय तर होयच असेल याची आपण नेहमी खात्री करू या.

^ परि. 7 पहिले करिंथकर हे पत्र लिहिण्याच्या काही काळानंतर पौल त्रोवासहून मासेदोनियाला गेला जेथे त्याने दुसरे करिंथकर हे पत्र लिहिले. (२ करिंथ. २:१२; ७:५) नंतर त्याने त्याच्या योजनेनुसार करिंथला भेट दिली.