व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोशेसारखा विश्वास उत्पन्न करा

मोशेसारखा विश्वास उत्पन्न करा

“मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले.”—इब्री ११:२४.

१, २. (क) चाळीस वर्षांचा असताना मोशेने कोणता निर्णय घेतला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) देवाच्या लोकांसोबत दुःख सोसण्याचा निर्णय मोशेने का घेतला?

इजिप्तमध्ये आपण कायकाय मिळवू शकतो याची मोशेला चांगली कल्पना होती. तेथील धनाढ्य लोकांचे मोठमोठे महाल तो नेहमीच पाहायचा. तो स्वतः राजघराण्याचा सदस्य होता. इजिप्शियन लोकांच्या “सर्व विद्यांचे शिक्षण” त्याला मिळाले होते. यांत निरनिराळ्या प्रकारच्या कला, खगोलशास्त्र, गणित व इतर शास्त्रांचा समावेश असावा. (प्रे. कृत्ये ७:२२) या कारणांमुळे, इजिप्तचा एक सर्वसामान्य नागरिक ज्या गोष्टींचे फक्त स्वप्न पाहू शकत होता, म्हणजेच धनसंपत्ती, सत्ता आणि मानसन्मान या गोष्टी मिळवणे मोशेसाठी काहीच कठीण नव्हते!

तरीसुद्धा, मोशे चाळीस वर्षांचा असताना त्याने एक असा निर्णय घेतला ज्यामुळे ज्यांनी मोशेला दत्तक घेतले होते ते इजिप्तच्या राजघराण्यातील लोक, अगदीच गोंधळून गेले असतील. मोशेने राजकुमाराला शोभेल असे जीवन तर सोडाच, पण इजिप्तच्या एखाद्या सामान्य माणसासारखे, “चारचौघांसारखे” जीवनदेखील निवडले नाही. उलट, त्याने गुलामांसोबत दुःख सोसण्याचे निवडले! का घेतला त्याने असा निर्णय? त्याच्या विश्वासामुळे. (इब्री लोकांस ११:२४-२६ वाचा.) विश्वासामुळेच मोशे त्याच्या आजूबाजूला असलेल्या आकर्षक गोष्टींच्या पलीकडे पाहू शकला. देवासोबत त्याचा जवळचा नातेसंबंध असल्यामुळे, “अदृश्य” असलेल्या यहोवा देवावर आणि त्याने दिलेली वचने नक्कीच पूर्ण होतील यावर मोशेला पूर्ण विश्वास होता.—इब्री ११:२७.

३. या लेखात कोणत्या तीन प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील?

आपणदेखील डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे पाहिले पाहिजे. म्हणजेच, आपण “विश्वास ठेवणाऱ्यांपैकी” एक असले पाहिजे. (इब्री १०:३८, ३९) आपला  विश्वास आणखी दृढ करण्यासाठी आपण इब्री लोकांस ११:२४-२६ या वचनांत मोशेविषयी जे सांगितले आहे त्याचे परीक्षण करू या. असे करत असताना पुढील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा: विश्वासामुळे मोशेला शारीरिक अभिलाषांकडे पाठ फिरवणे कसे शक्य झाले? त्याची निंदा करण्यात आली तेव्हा देवाने सोपवलेल्या जबाबदारीची कदर करण्यास विश्वासाने त्याला कशा प्रकारे साहाय्य केले? आणि मोशेने त्याला मिळणार असलेल्या प्रतिफळावर लक्ष का केंद्रित केले?

त्याने शारीरिक अभिलाषांकडे पाठ फिरवली

४. पापाचे सुख भोगण्याविषयी मोशे काय ओळखून होता?

मोशेचा विश्वास दृढ असल्यामुळे, पापाचे सुख केवळ तात्पुरते असते हे त्याने ओळखले. त्या काळातील इतर लोकांनी कदाचित असा तर्क केला असेल, की इजिप्त जरी पूर्णपणे मूर्तिपूजा आणि भूतविघेच्या विळख्यात असले, तरी ते एक जागतिक महासत्ता बनले आहे! दुसरीकडे पाहता, यहोवाचे लोक मात्र गुलाम आहेत आणि अत्याचार सोसत आहेत. लोक जरी असा विचार करत असले, तरी मोशेला माहीत होते की देव या परिस्थितीच्या अगदी उलटदेखील घडवून आणू शकतो. स्वतःच्याच इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यात मग्न असणाऱ्यांची जरी भरभराट होत असली, तरी दुष्ट लोक फार काळ टिकणार नाहीत असा विश्वास मोशेला होता. म्हणूनच “पापाचे क्षणिक सुख” भोगण्याचे त्याला जराही आकर्षण वाटले नाही.

५. “पापाचे क्षणिक सुख” भोगण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

तुम्ही “पापाचे क्षणिक सुख” भोगण्याच्या मोहाचा कशा प्रकारे प्रतिकार करू शकता? पापाचे सुख फार कमी काळ टिकणारे असते हे कधीही विसरू नका. “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत” असा विश्वास बाळगा. (१ योहा. २:१५-१७) पश्‍चात्ताप न करणाऱ्या पापी व्यक्तींचे भविष्य कसे असेल यावर मनन करा. ते “निसरड्या जागांवर” उभे आहेत आणि त्यांचा “नाश” हा ठरलेला आहे. (स्तो. ७३:१८, १९) त्यामुळे, एखादे वाईट कृत्य करण्याचा मोह होतो तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा, ‘मला कशा प्रकारचे भविष्य हवे आहे?’

६. (क) मोशेने “आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे” का नाकारले? (ख) मोशेने अगदी योग्य निर्णय घेतला होता असे तुम्हाला का वाटते?

मोशेने आपल्या भविष्याविषयी जो निर्णय घेतला, त्यावरही त्याच्या विश्वासाचा प्रभाव पडला. “प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले.” (इब्री ११:२४) त्याने असा विचार केला नाही, की ‘राजदरबाराचा सदस्य राहूनही मी देवाची सेवा करू शकतो; त्यामुळे मला माझ्या धनसंपत्तीचा आणि पदवीचा माझ्या इस्राएली बांधवांची मदत करण्यासाठी उपयोग करता येईल.’ याउलट, त्याने यहोवावर आपल्या पूर्ण मनाने, जिवाने व शक्तीने प्रेम करण्याचा दृढ निश्चय केला. (अनु. ६:५) हा निर्णय घेतल्यामुळे पुढे बऱ्याच दुःखद परिणामांपासून तो वाचला. त्याने जिचा त्याग केला होता ती इजिप्तची बरीचशी धनसंपत्ती लवकरच स्वतः इस्राएल लोकांनी लुटून नेली! (निर्ग. १२:३५, ३६) फारोची लाजिरवाणी स्थिती झाली आणि शेवटी त्याचा नाश झाला. (स्तो. १३६:१५) याउलट, मोशेचा जीव वाचला आणि एका सबंध राष्ट्राला संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी देवाने त्याचा उपयोग करून घेतला. त्याचे जीवन खरोखरच अर्थपूर्ण होते.

७. (क) मत्तय ६:१९-२१ या वचनांनुसार भविष्याचा विचार करताना आपण तात्पुरत्या गोष्टींच्या पलीकडे का पाहिले पाहिजे? (ख) धनसंपत्ती आणि देवाच्या सेवेतील आशीर्वाद यांमधील फरक स्पष्ट करणारा एक अनुभव सांगा.

जर तुम्ही यहोवाच्या तरुण सेवकांपैकी एक असाल, तर करियरची निवड करताना विश्वास तुम्हाला कशा प्रकारे साहाय्य करेल? भविष्यासाठी आधीपासूनच योजना करणे निश्‍चितच सुज्ञपणाचे आहे. पण देवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यास तुम्ही कशा प्रकारच्या भविष्यासाठी योजना कराल, तात्पुरत्या भविष्यासाठी की कायम टिकणाऱ्या भविष्यासाठी? (मत्तय ६:१९-२१ वाचा.) सोफी नावाच्या एका तरुणीसमोर हाच प्रश्न होता. ती बॅले नृत्यात पारंगत असलेली कलाकार होती. तिला अनेक शिष्यवृत्त्यांची आणि अमेरिकेतील बऱ्याच बॅले कंपन्यांमध्ये उच्च पदव्यांची ऑफर देण्यात आली होती. ती म्हणते, “चाहत्यांचं प्रेम संपादन करणं खरोखरच खूप रोमांचक होतं! खरंतर माझ्या वयाच्या इतरांपेक्षा मी जास्त यशस्वी होते असं मला वाटायचं. पण मुळात मी जीवनात आनंदी नव्हते.” त्यानंतर सोफीने तरुणांचे प्रश्न—मी जीवनात काय करणार? (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहिला. ती म्हणते, “मला जाणीव झाली की जगात मी यश आणि चाहत्यांचं प्रेम तर मिळवलं होतं, पण त्यासाठी मला मोठी किंमत मोजावी लागली होती, मी यहोवाची मनापासून उपासना करण्याचं सोडून दिलं होतं.” ती सांगते, “मी यहोवाला कळकळीनं प्रार्थना केली. आणि मग बॅले नृत्याचं विश्व कायमचं सोडून दिलं.” तिच्या या निर्णयाबाबत आज तिला काय वाटते? “माझं पूर्वीचं जीवन सोडून दिल्याची मला जराही खंत नाही. आज मी खऱ्या  अर्थानं आनंदी आहे. माझ्या पतीसोबत मी पायनियर सेवा करत आहे. आज आमच्याजवळ पैसाअडका किंवा प्रसिद्धी नाही. पण आमच्या जीवनात यहोवा आहे, आमचे बायबल विद्यार्थी आहेत आणि अनेक आध्यात्मिक ध्येयं आहेत. मला माझ्या निर्णयाबद्दल जराही पस्तावा नाही.”

८. बायबलचा कोणता सल्ला एका तरुण व्यक्तीला भविष्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतो?

तुमचे भले कशात आहे हे यहोवाला माहीत आहे. मोशेने म्हटले: “तू आपला देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी सांगत आहे ते तू पाळावे; तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून यापेक्षा जास्त काय मागतो?” (अनु. १०:१२, १३) तरुणांनो, कमी वयातच असे करियर निवडा की ज्यामुळे तुम्हाला “पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने” यहोवावर प्रेम करणे व त्याची सेवा करणे शक्य होईल. अशी निवड करणे तुमच्या “बऱ्यासाठी” आहे याची खातरी बाळगा.

देवाच्या सेवेतील जबाबदाऱ्यांची त्याने कदर केली

९. मोशेवर सोपवण्यात आलेली जबाबदारी सोपी नव्हती असे का म्हणता येईल?

“ख्रिस्त या नात्याने निंदा सहन करणे हे इजिप्तच्या धनसंपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे असे [मोशेने] मानले.” (इब्री ११:२६, NW) मोशेला “ख्रिस्त” किंवा “अभिषिक्त” म्हणून नेमण्यात आले होते; म्हणजेच, इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासाठी यहोवाने त्याला निवडले होते. ही जबाबदारी पार पाडणे सोपे नसेल आणि यासाठी आपल्याला निंदाही सहन करावी लागेल हे मोशेला माहीत होते. इस्राएली लोकांपैकी एकाने याआधी त्याला असे म्हणून हिणवलेदेखील होते, की “तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले?” (निर्ग. २:१३, १४) काही काळाने मोशेने स्वतःदेखील यहोवाला असे विचारले होते, की “फारो माझे कसे ऐकेल?” (निर्ग. ६:१२) निंदा सहन करण्यास स्वतःला तयार करण्याकरता मोशेने आपल्या मनातील भीती आणि काळजी यहोवा देवाजवळ व्यक्त केली. मग यहोवाने ती कठीण जबाबदारी पार पाडण्यास मोशेला कशा प्रकारे मदत केली?

१०. मोशेवर सोपवण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करण्यास यहोवाने त्याला कशा प्रकारे साहाय्य केले?

१० पहिली गोष्ट, “मी तुझ्याबरोबर असेन” असे आश्वासन यहोवाने मोशेला दिले. (निर्ग. ३:१२) दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नावाचा एक अर्थ सांगण्याद्वारे यहोवाने मोशेचा आत्मविश्वास वाढवला. त्याने म्हटले, “मला जे व्हायचे असेल ते मी होईन.” * (निर्ग. ३:१४, NW) तिसरी गोष्ट, यहोवाने मोशेला चमत्कार करण्याची शक्ती दिली जेणेकरून त्याला खरोखरच यहोवाने पाठवले आहे हे तो सिद्ध करून दाखवू शकेल. (निर्ग. ४:२-५) चौथी म्हणजे, यहोवाने मोशेसोबत जाण्याकरता आणि त्याच्या वतीने बोलण्याकरता अहरोनाला नेमले. (निर्ग. ४:१४-१६) देव त्याच्या सेवकांना कोणतीही जबाबदारी सोपवतो तेव्हा ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तो त्यांना साहाय्यदेखील करतो याची मोशेला पक्की खातरी पटली होती. म्हणूनच, त्याच्या जीवनाच्या अंतिम काळात त्याने पूर्ण आत्मविश्वासाने आपला उत्तराधिकारी यहोशवा याला सांगितले: “तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे; तो तुझ्याबरोबर असेल; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही; भिऊ नकोस व कचरू नकोस.”—अनु. ३१:८.

११. मोशेने त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीला मौल्यवान का लेखले?

११ यहोवा देव स्वतः पाठीशी असल्यामुळेच, मोशेने त्याची जबाबदारी कठीण असूनही ती, “इजिप्तच्या धनसंपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे” असे मानले. कारण, सर्वसमर्थ देवाची सेवा करण्याच्या तुलनेत फारोची सेवा करणे असे कितीसे महत्त्वाचे होते? यहोवाने नेमलेला “ख्रिस्त” किंवा अभिषिक्त असण्याच्या बहुमानापुढे इजिप्तचा राजकुमार असण्याचे काय मोल होते? देवाने सोपवलेल्या जबाबदारीची अशी कदर बाळगल्यामुळे मोशेला मोठे प्रतिफळ मिळाले. त्याला यहोवासोबत अतिशय जिव्हाळ्याचा नातेसंबंध जोडता आला आणि इस्राएल लोकांना प्रतिज्ञात देशापर्यंत नेत असताना यहोवाने त्याच्या हातून अनेक “पराक्रम” घडवून आणले.—अनु. ३४:१०-१२.

१२. यहोवाकडून मिळालेल्या कोणत्या बहुमानांची आपण कदर केली पाहिजे?

१२ आज आपल्यालाही यहोवाने एक कार्य सोपवले आहे. प्रेषित पौल आणि इतरांना ज्याप्रमाणे यहोवाने त्याच्या पुत्राद्वारे सेवाकार्याची जबाबदारी सोपवली होती, त्याचप्रमाणे त्याने आज आपल्यालाही ख्रिस्ती सेवाकार्य करण्याची जबाबदारी दिली आहे. (१ तीमथ्य १:१२-१४ वाचा.) आपल्या सर्वांनाच राज्याची सुवार्ता घोषित करण्याचा बहुमान मिळाला आहे.  (मत्त. २४:१४; २८:१९, २०) काही जण पूर्ण वेळेचे सेवक या नात्याने कार्य करतात. तसेच, बाप्तिस्मा झालेले प्रौढ बांधव मंडळीत सेवा सेवक व वडील या नात्याने इतरांची सेवा करतात. पण, सत्यात नसलेले तुमचे कुटुंबीय किंवा इतर जण कदाचित या विशेषाधिकारांना तुच्छ लेखतील किंवा त्यांसाठी तुम्ही जो आत्मत्याग करता त्याबद्दल ते तुमची निंदाही करतील. (मत्त. १०:३४-३७) त्यांच्या अशा मनोवृत्तीमुळे जर तुम्ही आपले धैर्य खचू दिले, तर काही काळाने कदाचित तुम्हाला असे वाटू लागेल की आपण करत असलेल्या त्यागाला खरोखरच काही अर्थ आहे का? किंवा, आपली जबाबदारी पार पाडणे खरोखरच आपल्याला जमेल का? असे घडल्यास, याही परिस्थितीत टिकून राहण्यास विश्वासामुळे तुम्हाला कशा प्रकारे साहाय्य मिळू शकते?

१३. ख्रिस्ती जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता यहोवा आपल्याला कशा प्रकारे साहाय्य करतो?

१३ यहोवावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्याकडे मदतीची याचना करा. तुमच्या मनातील भीती व काळजी त्याच्याजवळ व्यक्त करा. कारण, यहोवानेच तुमच्यावर जबाबदारी सोपवली आहे, त्याअर्थी ती यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी तोच तुम्हाला साहाय्य करेल. ते कसे? अगदी त्याच प्रकारे, ज्या प्रकारे त्याने मोशेला साहाय्य केले होते. पहिली गोष्ट, यहोवा तुम्हाला असे आश्वासन देतो: “मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” (यश. ४१:१०) दुसरी गोष्ट म्हणजे, तो तुम्हाला याची आठवण करून देतो की त्याने दिलेली सर्व वचने भरवशालायक आहेत: “मी बोलतो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.” (यश. ४६:११) तिसरी गोष्ट, तुमचे सेवाकार्य पार पाडण्यासाठी यहोवा तुम्हाला असाधारण सामर्थ्य देतो. (२ करिंथ. ४:७) आणि चौथी म्हणजे, तुम्हाला धीर धरण्यास साहाय्य करण्याकरता आपल्या प्रेमळ पित्याने खऱ्या उपासकांचा एक जागतिक बंधुसमाज दिला आहे, ज्यातील बांधव नेहमी एकमेकांना सांत्वन व उत्तेजन देतात. (१ थेस्सलनी. ५:११) तुमच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या पूर्ण करताना जेव्हा तुम्ही यहोवाकडील हे साहाय्य अनुभवाल, तेव्हा त्याच्यावर असलेला तुमचा विश्वास दृढ होत जाईल; आणि, त्याच्या सेवेत तुम्हाला मिळालेले बहुमान जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहेत याची तुम्हाला खातरी पटेल.

“त्याने प्रतिफळावर लक्ष केंद्रित केले”

१४. मोशेला प्रतिफळ मिळण्याविषयी खातरी का होती?

१४ मोशेने “प्रतिफळावर लक्ष केंद्रित केले.” (इब्री ११:२६, NW) त्याला भविष्याबद्दल सर्वच गोष्टी माहीत नव्हत्या. पण ज्या गोष्टी माहीत होत्या त्यांचा त्याच्या मनोवृत्तीवर प्रभाव पडला. अब्राहाम या त्याच्या पूर्वजाप्रमाणेच मोशेलाही असा विश्वास होता की यहोवा मृतांना पुन्हा जिवंत करण्यास समर्थ आहे. (लूक २०:३७, ३८; इब्री ११:१७-१९) भविष्यात अनेक आशीर्वाद मिळण्याची आशा असल्यामुळेच, मोशेने फरारी होऊन अरण्यात घालवलेली चाळीस वर्षे वाया गेली आहेत असा त्याने कधीही विचार केला नाही. देवाची वचने कशी पूर्ण होतील याबाबत मोशेला सर्व माहिती नव्हती, तरीसुद्धा त्याचा विश्वास दृढ असल्यामुळेच, तो अद्याप अदृश्य असलेले त्याचे प्रतिफळ पाहू शकला.

१५, १६. (क) आपण आपल्या प्रतिफळावर लक्ष का केंद्रित केले पाहिजे? (ख) देवाच्या राज्यात तुम्ही कोणत्या आशीर्वादांचा उपभोग घेण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहात?

 १५ तुम्हीदेखील तुम्हाला मिळणार असलेल्या प्रतिफळावर “लक्ष केंद्रित” करता का? मोशेप्रमाणेच आज आपल्यालाही देवाच्या वचनांबद्दल सगळीच माहिती नाही. उदाहरणार्थ, मोठे संकट सुरू होण्याचा यहोवाने नियुक्त केलेला “समय” आपल्याला माहीत नाही. (मार्क १३:३२, ३३) पण, भविष्यातील नंदनवनाबद्दल मोशेपेक्षा आपल्याजवळ नक्कीच जास्त माहिती आहे. सगळ्याच गोष्टी माहीत नसल्या, तरीही देवाच्या राज्यात मानवांचे जीवन कसे असेल याविषयी देवाने दिलेल्या अनेक अभिवचनांमुळे त्याकडे “लक्ष केंद्रित” करणे आपल्याला शक्य आहे. नव्या जगाचे चित्र आपल्या मनात अगदी स्पष्ट असेल तर त्या राज्याला जीवनात सर्वात वरचे स्थान देण्याची आपल्याला आपोआपच प्रेरणा मिळेल. ती कशी? याचा विचार करा: एखाद्या घराबद्दल तुमच्याजवळ फार थोडी माहिती असल्यास तुम्ही ते घर विकत घ्याल का? नक्कीच नाही! त्याच प्रकारे, एका अस्पष्ट आशेसाठी आपण नक्कीच आपले जीवन वाहून घेणार नाही. म्हणूनच देवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यामुळे, त्याच्या राज्यातील जीवनाचे सुस्पष्ट चित्र आपल्याला पाहता आले पाहिजे.

मोशेसारख्या देवाच्या विश्वासू सेवकांशी बोलणे किती रोमांचक असेल! (परिच्छेद १६ पाहा)

१६ देवाच्या राज्याचे तुमच्या मनातील चित्र अधिक स्पष्ट करण्यासाठी नंदनवनात तुमचे जीवन कसे असेल यावर “लक्ष केंद्रित” करा. यासाठी आपल्या कल्पनाशक्तीचा उपयोग करा. उदाहरणार्थ, बायबलमधील ख्रिस्ताच्या काळाच्या आधी होऊन गेलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करताना, तुम्हाला त्यांचे पुनरुत्थान झाल्यावर त्यांना काय विचारावेसे वाटेल याचा विचार करा. किंवा, शेवटल्या काळातील तुमच्या जीवनाविषयी कदाचित ते तुम्हाला कोणता प्रश्न विचारतील याची कल्पना करून पाहा. कित्येक शतकांपूर्वीच्या तुमच्या वाडवडिलांना भेटणे आणि देवाने त्यांच्यासाठी कायकाय केले आहे याविषयी त्यांना शिकवणे किती रोमांचक असेल याचे चित्र डोळ्यांसमोर उभे करा. शांततापूर्ण वातावरणात अनेक जंगली पशुपक्ष्यांचे निरीक्षण करून त्यांच्याविषयी नवनवीन गोष्टी शिकून घेताना तुम्हाला किती आनंद होईल याची कल्पना करा. तसेच, दिवसेंदिवस परिपूर्णतेच्या जवळ जात असताना, यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध किती घनिष्ठ झालेला असेल याविषयी विचार करा.

१७. अदृश्य प्रतिफळाचे स्पष्ट चित्र मनात बाळगल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?

१७ आपले प्रतिफळ सध्या अदृश्य असले, तरी त्याचे स्पष्ट चित्र मनात बाळगल्यामुळे आपल्याला यहोवाची सेवा करत राहण्यास, आनंदी राहण्यास आणि अगदी खातरीलायक अशा सार्वकालिक भविष्याकडे पाहून जीवनात निर्णय घेण्यास साहाय्य मिळते. पौलाने अभिषिक्त ख्रिश्चनांना असे लिहिले होते: “जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.” (रोम. ८:२५) हे तत्त्व पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा बाळगणाऱ्या ख्रिश्चनांनादेखील लागू होते. आपले प्रतिफळ जरी आपल्याला अजून मिळालेले नसले, तरी आपला विश्वास इतका दृढ आहे की आपण आपल्या प्रतिफळाची धीराने वाट पाहतो. मोशेप्रमाणेच, आपणही कधीच असा विचार करत नाही की यहोवाच्या सेवेत घालवलेली वर्षे वाया गेली आहेत. उलट, आपल्याला याची खातरी आहे की “दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.”—२ करिंथकर ४:१६-१८ वाचा.

१८, १९. (क) आपला विश्वास सुदृढ राहावा म्हणून आपण जाणीवपूर्वक प्रयत्न का केले पाहिजेत? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

१८ विश्वासामुळेच, आपल्याला “न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” (इब्री ११:१) शारीरिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारी व्यक्ती, यहोवा देवाची सेवा करण्याची संधी किती मौल्यवान आहे हे समजू शकत नाही. अशा व्यक्तीला मौल्यवान आध्यात्मिक गोष्टी “मूर्खपणाच्या” वाटतात. (१ करिंथ. २:१४) आपण मात्र सार्वकालिक जीवन व पुनरुत्थान यांसारख्या गोष्टी पाहण्यास आतुर आहोत, ज्या जगातील लोकांच्या दृष्टीने अदृश्य आहेत. पौलाच्या काळातील तत्त्वज्ञान्यांनी ज्याप्रमाणे त्याला “बडबड्या” असे म्हणून मूर्ख ठरवले, त्याचप्रमाणे आजदेखील आपण सांगत असलेली आशा बहुतेक लोकांना निरर्थक वाटते.—प्रे. कृत्ये १७:१८.

१९ आपण विश्वासाचा अभाव असलेल्या जगात राहत असल्यामुळे आपला विश्वास सुदृढ राहावा म्हणून आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तुमचा “विश्वास ढळू नये” म्हणून यहोवाला कळकळीने प्रार्थना करा. (लूक २२:३२) वाईट वर्तनाचे दुष्परिणाम, यहोवा देवाची सेवा करण्याचे महत्त्व आणि तुमची सार्वकालिक आशा या गोष्टींकडे कधीही डोळेझाक करू नका. मोशेच्या विश्वासाने त्याला या गोष्टी पाहण्यास साहाय्य केले. पण त्याच्या विश्वासामुळे तो इतकेच नव्हे तर आणखीही बरेच काही पाहू शकला. मोशेला त्याच्या विश्वासामुळे “जो अदृश्य आहे त्याला” पाहणे कसे शक्य झाले याविषयी आपण पुढील लेखात पाहू या.—इब्री ११:२७.

^ परि. 10 निर्गम ३:१४ या वचनातील देवाच्या शब्दांच्या संदर्भात एका बायबल विद्वानाने असे लिहिले: “कोणतीही गोष्ट त्याला त्याचा संकल्प सिद्धीस नेण्यापासून रोखू शकत नाही . . . [यहोवा] हे नाव इस्राएलांकरता एक दृढ गड असणार होते आणि त्यापासून त्यांना निरंतर आशा व सांत्वन मिळणार होते.”