व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कसलीही शंका व भीती बाळगू नका—यहोवा आपला साहाय्यक आहे!

कसलीही शंका व भीती बाळगू नका—यहोवा आपला साहाय्यक आहे!

“कसलीही शंका व भीती न बाळगता आपल्याला म्हणता येते: ‘प्रभू माझा साहाय्यक आहे.’”—इब्री १३:६, सुबोधभाषांतर.

१, २. परदेशातील नोकरी सोडून घरी परतणाऱ्या अनेकांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

एड्वार्डो * म्हणतात, “परदेशात असताना मला चांगली नोकरी होती आणि मी पुष्कळ पैसा कमवत होतो. पण यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागल्यानंतर मला जाणीव झाली, की माझ्या कुटुंबाच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाची एक जबाबदारी माझ्यावर आहे. आणि ती म्हणजे त्यांची आध्यात्मिक दृष्टीने काळजी घेणं. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाकडे परतलो.”—इफिस. ६:४.

एड्वार्डो यांना माहीत होते की कुटुंबाकडे परतण्याद्वारे त्यांनी यहोवाचे मन आनंदित केले होते. पण याआधीच्या लेखात उल्लेख केलेल्या मेरिलीनप्रमाणेच घरी परतल्यानंतर एड्वार्डो यांच्यासमोर कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे आव्हान होते. आणि हे काही रातोरात घडणार नव्हते, त्याला बराच वेळ लागणार होता. तसेच, वाढत्या महागाईच्या व बेरोजगारीच्या दिवसांत बायको व मुलांचा सांभाळ करण्याचे आव्हानही होतेच. कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ते कोणते काम करू शकत होते? मंडळीतील बांधवांकडून ते कोणत्या मदतीची अपेक्षा करू शकत होते?

आध्यात्मिक व कौटुंबिक जीवनाची घडी पुन्हा बसवणे

३. आई किंवा वडील जवळ राहत नाहीत तेव्हा मुलांवर कोणता परिणाम होतो?

“नेमकी जेव्हा माझ्या मुलांना माझ्या मार्गदर्शनाची आणि जिव्हाळ्याची सर्वात जास्त  गरज होती, तेव्हा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं,” असे एड्वार्डो कबूल करतात. ते म्हणतात, “त्यांना बायबलच्या गोष्टी वाचून दाखवण्यासाठी, त्यांच्यासोबत प्रार्थना करण्यासाठी, खेळण्यासाठी, किंवा मायेनं त्यांना जवळ घेण्यासाठी मी त्यांच्याजवळ नव्हतो.” (अनु. ६:७) त्यांची सर्वात मोठी मुलगी, अॅना म्हणते: “पप्पा आमच्यासोबत राहत नसल्यामुळे आपल्याला कोणाचाही भावनिक आधार नाही असं मला वाटायचं. ते परदेशातलं काम सोडून घरी परत आले तेव्हा फक्त त्यांचा चेहरा आणि आवाज आम्हाला ओळखीचा होता. ते मला जवळ घ्यायचे तेव्हा मला थोडं विचित्रच वाटायचं.”

४. पती कुटुंबासोबत राहत नाही तेव्हा कुटुंबप्रमुख या नात्याने त्याच्या भूमिकेवर कोणता परिणाम होतो?

वडील आपल्या कुटुंबासोबत राहत नाहीत तेव्हा कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी पूर्ण करणेही त्यांना कठीण जाते. एड्वार्डो यांची पत्नी रूबी सांगते, “मला आई आणि बाबा अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागायच्या. आणि त्यामुळे कुटुंबाचे बहुतेक निर्णय स्वतःच्या मनानं घेण्याची मला सवय लागली. एड्वार्डो घरी परतले तेव्हा एका ख्रिस्ती पत्नीनं आपल्या पतीच्या अधीन राहण्याचा काय अर्थ होतो हे मला शिकून घ्यावं लागलं. आजसुद्धा, मला कधीकधी स्वतःला याची आठवण करून द्यावी लागते की आता माझे पती परत आले आहेत.” (इफिस. ५:२२, २३) एड्वार्डो सांगतात: “मुलींना कोणत्याही गोष्टीसाठी परवानगी हवी असल्यास त्या आईकडेच जायच्या. त्यामुळे, पालक या नात्यानं आम्ही ठरवलं की शिस्तीच्या बाबतीत आम्ही दोघंही एकजूट आहोत हे आमच्या मुलींना दिसून येणं गरजेचं होतं. तसंच, बायबलमध्ये सांगितल्यानुसार कुटुंबात पुढाकार घ्यायला मला शिकून घ्यावं लागलं.”

५. आपल्या कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी एका पित्याने काय केले आणि याचा काय परिणाम झाला?

एड्वार्डो यांनी निश्चय केला होता, की ते आपल्या कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या सुदृढ करण्यासाठी हरतहेने प्रयत्न करतील. ते म्हणतात, “माझ्या शब्दांतून आणि कृतींतूनही मी माझ्या मुलांच्या मनावर सत्याची शिकवण बिंबवावी हे माझं ध्येय होतं. यहोवावर माझं प्रेम आहे हे केवळ बोलून न दाखवता, ते मला माझ्या वागण्यातून त्यांना दाखवायचं होतं.” (१ योहा. ३:१८) यहोवावर पूर्ण विश्वास ठेवून केलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांवर त्याने आशीर्वाद दिला का? अॅना सांगते, “एक चांगला पिता होण्यासाठी आणि आमच्यातलं नातं पुन्हा एकदा घट्ट करण्यासाठी पप्पा किती खटपट करत आहेत हे पाहून आम्ही प्रभावित झालो. मंडळीत त्यांना प्रगती करताना पाहून आम्हाला त्यांचा अभिमान वाटला. हे जग आम्हाला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होतं. पण, आई व पप्पा सत्यात किती खंबीर आहेत हे पाहून आम्हीही त्यांच्यासारखंच होण्याचा प्रयत्न करू लागलो. पप्पांनी आम्हाला वचन दिलं की ते पुन्हा कधीही आम्हाला सोडून जाणार नाहीत. आणि खरोखरच ते पुन्हा गेले नाहीत. जर ते गेले असते तर आज कदाचित मी यहोवाच्या संघटनेत नसते.”

जबाबदारी स्वीकारणे

६. युद्धाच्या काळात काही आईवडिलांना काय दिसून आले?

पूर्व युरोपातील बाल्कन राष्ट्रांत युद्ध चालले होते तेव्हा तेथे राहणारी यहोवाच्या साक्षीदारांची मुले, खडतर परिस्थितीतही आनंदी होती. असे का? कारण कामाला जाणे शक्य नसल्यामुळे त्यांचे आईवडील घरीच राहून मुलांचा अभ्यास घ्यायचे, त्यांच्यासोबत खेळायचे व बोलायचे. यावरून काय दिसून येते? हेच की पैसा किंवा भेटवस्तू यांपेक्षा मुलांना त्यांच्या आईवडिलांचा सहवास जास्त हवाहवासा वाटतो. देवाच्या वचनात सांगितल्यानुसार, आईवडिलांनी मुलांना जास्त वेळ देऊन त्यांच्याकडे लक्ष पुरवल्यास व त्यांना शिकवल्यास मुलांना याचा खूप फायदा होईल.—नीति. २२:६.

७, ८. (क) परदेशातून परत आल्यावर काही आईवडील कोणती चूक करतात? (ख) आईवडील आपल्या मुलांना नकारार्थी भावनांवर मात करण्यास कशी मदत करू शकतात?

काही आईवडील परदेशातून घरी परततात, तेव्हा त्यांच्या मुलांच्या मनात त्यांच्याविषयी राग किंवा बेपर्वाईची वृत्ती असल्याचे त्यांना दिसून येते. दुःखाची गोष्ट म्हणजे हे पाहिल्यावर ते म्हणतात, “मी तिकडे तुमच्यासाठी इतका घाम गाळला, इतका त्रास सोसला आणि त्याची तुम्हाला जराही कदर नाही?” पण, मुलांची नकारार्थी वृत्ती ही नेहमीच कृतघ्नतेमुळे असते असे नाही. तर, आईवडील बराच काळ त्यांच्यापासून दूर राहिल्यामुळे सहसा त्यांच्या मनात हा राग उत्पन्न होतो. मग, नात्यांत आलेला हा दुरावा आई किंवा वडील कसा मिटवू शकतात?

तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी जास्त समजूतदारपणे वागण्यास मदत करण्याची यहोवाला विनंती करा. मग, कुटुंबाबरोबर बोलताना या समस्येसाठी काही अंशी तुम्हीदेखील जबाबदार आहात हे कबूल करा. तुम्ही त्यांची मनापासून क्षमा मागितल्यास तुमच्यातील नाती सुधारण्यास बरीच मदत होऊ शकते. झालेले नुकसान भरून काढण्याचा तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात हे जेव्हा तुमचा विवाहसोबती  आणि मुले पाहतील तेव्हा तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत याची त्यांना जाणीव होईल. दृढनिश्चयाने व धीराने प्रयत्न करत राहिल्यास हळूहळू का होईना, पण तुमच्या कुटुंबाचे प्रेम व आदर पुन्हा मिळवण्यात तुम्ही सफल व्हाल.

“घरच्यांची तरतूद”

९. “घरच्यांची तरतूद” करण्यासाठी सतत धनसंपत्ती मिळवण्यास झटण्याची गरज का नाही?

वयस्क ख्रिश्चनांना जेव्हा स्वतःच्या गरजा भागवणे शक्य होत नाही तेव्हा त्यांच्या मुलांनी व नातवंडांनी त्यांना मदत करण्याद्वारे “आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार” फेडावेत अशी आज्ञा प्रेषित पौलाने दिली होती. पण पुढे पौलाने सर्व ख्रिश्चनांना असा आर्जव केला की अन्न, वस्त्र व निवारा या दररोजच्या आवश्यक गोष्टी मिळाल्यास त्यांत त्यांनी समाधान मानावे. आपण सतत आपले राहणीमान उंचावण्यासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी झटू नये. (१ तीमथ्य ५:४, ८; ६:६-१० वाचा.) “घरच्यांची तरतूद” करण्यासाठी एका ख्रिस्ती व्यक्तीने धनसंपत्तीच्या मागे लागण्याची गरज नाही. या जगातील सर्व धनसंपत्ती लवकरच नाहीशी होणार आहे. (१ योहा. २:१५-१७) तेव्हा, पैशांच्या लोभामुळे किंवा संसाराच्या चिंतांमुळे देवाच्या नीतिमान नव्या जगातील खऱ्या जीवनावर आपल्या कुटुंबाची पकड कधीही सैल होणार नाही याची आपण काळजी घेऊ या!—मार्क ४:१९; लूक २१:३४-३६; १ तीम. ६:१९.

१०. कर्ज घेण्याच्या बाबतीत आपण कशा प्रकारे सुज्ञतेने वागू शकतो?

१० थोड्याफार प्रमाणात आपल्या सर्वांनाच पैशांची गरज आहे हे यहोवाला माहीत आहे. पण देवाकडून मिळणाऱ्या सुबुद्धीमुळे एका व्यक्तीला खरे संरक्षण व जीवन लाभते, तसे पैशामुळे लाभत नाही. (उप. ७:१२; लूक १२:१५) परदेशात जाऊन काम करण्यासाठी काही व्यक्तींना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते आणि परदेशात गेल्यावर ते भरपूर पैसा कमावू शकतील याची खातरीदेखील नसते. खरेतर, बऱ्याच जणांना अनेक गंभीर स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. परदेशी स्थलांतर केलेले कित्येक जण परत येतात तेव्हा पूर्वीपेक्षा जास्त कर्जात बुडालेले असतात. त्यामुळे, देवाची सेवा करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळण्याऐवजी, ज्यांचे कर्ज त्यांना फेडायचे असते त्यांची चाकरी त्यांना करावी लागते. (नीतिसूत्रे २२:७ वाचा.) तेव्हा कर्ज न घेणे यातच सुज्ञता आहे.

११. बजेट पाळल्यामुळे आर्थिक भार कमी करण्यास कशा प्रकारे मदत होऊ शकते?

११ एड्वार्डो यांना माहीत होते, की कुटुंबासोबतच राहण्याचा त्यांचा निर्णय सफल करण्यासाठी त्यांना पैशांचा सांभाळून वापर करावा लागेल. यासाठी, त्यांनी व त्यांच्या पत्नीने आपल्या कुटुंबाला कोणत्या गोष्टींची खरोखर गरज आहे याचा विचार करून एक बजेट तयार केले. साहजिकच या बजेटनुसार त्यांना बरीच काटकसर करावी लागणार होती, ज्याची कुटुंबाला सवय नव्हती. पण सर्वांनी सहकार्य केले आणि अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करण्याचे बंद केले. * एड्वार्डो सांगतात, “उदाहरणार्थ, मी मुलांना प्रायव्हेट शाळांतून काढून चांगल्या सार्वजनिक शाळांत घातले.” आध्यात्मिक कार्यांमध्ये अडथळा आणणार नाही अशा प्रकारचे काम मिळावे म्हणून त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने यहोवाकडे प्रार्थना केली. यहोवाने त्यांच्या प्रार्थनांचे कशा प्रकारे उत्तर दिले?

१२, १३. आपल्या कुटुंबाला साहाय्य करण्यासाठी एका पित्याने कोणती पावले उचलली आणि साधेपणाने जीवन जगण्याच्या त्यांच्या निर्धारावर यहोवाने कशा प्रकारे आशीर्वाद दिला?

१२ एड्वार्डो सांगतात, “पहिली दोन वर्षं आम्ही खूप अडचणीत काढली. जवळ असलेला पैसा हळूहळू संपत होता, मिळणाऱ्या पैशातून खर्च भागत नव्हता, शिवाय माझी भरपूर दमछाक होत होती. पण, आम्ही सर्व मिळून सभांना व सेवाकार्यासाठी जाऊ शकत होतो.” दरम्यान एड्वार्डो यांना नोकरीच्या वेगवेगळ्या ऑफर्स मिळत होत्या; पण, अनेक महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी कुटुंबाला सोडून जावे लागेल अशा नोकरीच्या ऑफर्सचा विचारही करायचा नाही असे एड्वार्डो यांनी ठरवले होते. ते म्हणतात, “त्याऐवजी, मी वेगवेगळ्या प्रकारची कामं शिकून घेतली जेणेकरून एक प्रकारचं काम मिळालं नाही तर मी दुसरं एखादं काम करू शकेन.”

तुमच्या कुटुंबाचा आर्थिक भार वाहण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या प्रकारची कामे शिकून घेऊ शकता का? (परिच्छेद १२ पाहा)

१३ एड्वार्डो यांच्यावर असलेले कर्ज ते थोडेथोडे करून फेडत असल्यामुळे त्यांना जास्त व्याज भरावे लागत होते. पण, यहोवाने आईवडिलांना आज्ञा दिल्यानुसार आपल्या कुटुंबासोबत जीवनाच्या सर्व पैलूंत सहभागी होण्यासाठी ही एक लहानशी किंमत त्यांना मोजावी लागत आहे असा त्यांनी विचार केला. एड्वार्डो सांगतात, “परदेशात असताना मी जितकं कमवत होतो त्याच्या तुलनेत आता दहा टक्केदेखील मी कमवत नाही, पण आम्हाला उपाशी राहावं लागत नाही. यहोवाचा हात ‘तोकडा’ नाही. खरंतर, आम्ही पायनियर सेवासुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि गंमत म्हणजे, पायनियरिंग सुरू केल्यापासून आमच्या आर्थिक अडचणी कमी  झाल्या आहेत आणि कुटुंबाच्या गरजा भागवणं पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे.”—यश. ५९:१.

नातेवाइकांच्या दबावाचा सामना

१४, १५. नातेवाइकांच्या दबावाला कशा प्रकारे तोंड दिले जाऊ शकते आणि चांगले उदाहरण मांडल्यामुळे कोणता परिणाम होऊ शकतो?

१४ बऱ्याच भागांत, नातेवाइकांना आणि मित्रांना पैसे व भेटवस्तू देणे हे आपले कर्तव्य आहे असे लोकांना वाटते. एड्वार्डो सांगतात, “आमची संस्कृतीच तशी आहे, आम्हाला इतरांना भेटवस्तू देण्यास आनंद वाटतो.” पण पुढे ते म्हणतात, “प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे, मी माझ्या नातेवाइकांना समजावून सांगितलं की मी त्यांच्यासाठी जमेल तितकं करेन, पण माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा आणि नित्यक्रम धोक्यात न आणता.”

१५ पूर्वी आर्थिक साहाय्य करणाऱ्या व्यक्ती जेव्हा परदेशातून परतण्याचा आणि कुटुंबाला सोडून परदेशी न जाण्याचा निर्णय घेतात, तेव्हा अनेकदा त्यांचे नातेवाईक त्यांच्यावर रागावतात, त्यांच्याशी तिरस्काराने वागतात किंवा निराश होतात. तुमचे आमच्यावर प्रेमच नाही असा आरोप काही जण लावतात. (नीति. १९:६, ७) एड्वार्डो यांची मुलगी अॅना म्हणते, “अशा परिस्थितीतही जेव्हा आपण आर्थिक फायद्यासाठी आध्यात्मिक गोष्टींचा बळी देण्यास नकार देतो तेव्हा आपल्या नातेवाइकांपैकी निदान काहींना तरी कालांतराने याची जाणीव होऊ शकते, की आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्याच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. पण, जर त्यांच्या मागण्यांपुढं नमतं घेऊन आपण आपला निर्णय बदलला तर त्यांना ही जाणीव कधीच होणार नाही.”—१ पेत्र ३:१, २ पडताळून पाहा.

देवावर विश्वास ठेवून निर्णय घ्या

१६. (क) एक व्यक्ती कशा प्रकारे “स्वतःची फसवणूक” करू शकते? (याको. १:२२) (ख) यहोवा कोणत्या प्रकारच्या निर्णयांवर आशीर्वाद देतो?

१६ आपल्या पतीला व मुलांना सोडून श्रीमंत देशात काम करायला आलेल्या एका बहिणीने मंडळीतील वडिलांना असे सांगितले: “मला इथं येता यावं म्हणून आम्हाला खूप त्याग करावे लागले. माझ्या पतीला तर मंडळीत वडील म्हणून त्यांची जबाबदारीही सोडावी लागली. एवढे त्याग केले असल्यामुळे, यहोवानं आमच्या या निर्णयावर आशीर्वाद द्यावा असं मला मनापासून वाटतं.” यहोवावर विश्वास ठेवून घेतलेल्या निर्णयांवर तो नेहमीच आशीर्वाद देतो. पण, जो निर्णय त्याच्या इच्छेच्या विरोधात आहे, विशेषतः ज्यासाठी पवित्र विशेषाधिकार विनाकारण सोडून दिले जातात अशा निर्णयावर यहोवा कसा आशीर्वाद देईल?—इब्री लोकांस ११:६; १ योहान ५:१३-१५ वाचा.

१७. निर्णय घेण्याआधी यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे आणि हे आपण कसे करू शकतो?

१७ कोणताही निर्णय घेण्याआधी यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा, निर्णय घेतल्यावर नव्हे. देवाचा पवित्र आत्मा, सुबुद्धी व मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रार्थना  करा. (२ तीम. १:७) स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘मी कुठवर यहोवाच्या आज्ञांचे पालन करायला तयार आहे? छळ सोसावा लागला तरी मी त्याला आज्ञाधारक राहीन का?’ जर असे असेल, तर मग त्याच्या आज्ञांनुसार वागण्यासाठी फक्त थोडे कमी दर्जाचे राहणीमान स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात का? (लूक १४:३३) निर्णय घेण्यापूर्वी बायबलमधील सल्ला मिळवण्यासाठी वडिलांची मदत घ्या आणि बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्याद्वारे, तुम्हाला मदत करण्याच्या यहोवाच्या अभिवचनावर विश्वास व भरवसा असल्याचे दाखवा. मंडळीतील वडील तुमच्यासाठी निर्णय घेऊ शकत नाहीत. पण, तुम्हाला जीवनात आनंद मिळेल अशा प्रकारचे निर्णय घेण्यास ते तुम्हाला साहाय्य करू शकतात.—२ करिंथ. १:२४.

१८. कुटुंबाचा खर्च भागवण्याची जबाबदारी कोणाची आहे, पण कोणत्या परिस्थितींत मदत करण्याची संधी इतरांनाही मिळू शकते?

१८ कुटुंबाचा आर्थिक “भार” वाहण्याची जबाबदारी यहोवाने कुटुंबप्रमुखावर सोपवली आहे. जे नोकरीसाठी विवाहसोबत्याला व मुलांना सोडून जाण्याच्या दबावावर व प्रलोभनावर मात करून ही जबाबदारी पार पाडतात त्यांचे आपण कौतुक केले पाहिजे व त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. विपत्ती किंवा अचानक आलेले आजारपण यांसारख्या अनपेक्षित परिस्थितींमुळे आर्थिक संकट येते, तेव्हा आपल्याला एकमेकांबद्दल असलेले ख्रिस्ती प्रेम व सहानुभूती दाखवण्याची चांगली संधी मिळते. (गलती. ६:२, ५; १ पेत्र ३:८) अशा परिस्थितीला तोंड देणाऱ्या एखाद्या बांधवाला तुम्ही आर्थिक मदत करू शकता का किंवा काम शोधण्यास त्याला मदत करू शकता का? असे केल्यास, कामासाठी आपल्या कुटुंबाला सोडून जाण्याचा त्याच्यावर असलेला दबाव तुम्ही कमी करू शकता.—नीति. ३:२७, २८; १ योहा. ३:१७.

यहोवा आपला साहाय्यक आहे हे विसरू नका!

१९, २०. यहोवा आपल्याला साहाय्य करेल असा भरवसा ख्रिस्ती का बाळगू शकतात?

१९ बायबल आपल्याला सांगते: “द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण देवाने म्हटले आहे, ‘मी तुला कधी सोडणारच नाही व तुला टाकणारच नाही.’ म्हणूनच कसलीही शंका व भीती न बाळगता आपल्याला म्हणता येते: ‘प्रभू माझा साहाय्यक आहे . . . मानवाने माझे काहीही केले तरी मी घाबरणार नाही.’” (इब्री १३:५, ६, सुबोधभाषांतर) वास्तविक जीवनात हे वचन कशा प्रकारे खरे ठरते?

२० एका विकसनशील देशात अनेक वर्षांपासून वडील म्हणून सेवा करणारे एक बांधव म्हणतात: “यहोवाचे साक्षीदार आनंदी लोक आहेत, असं लोक सहसा म्हणतात. तसंच, ते हेदेखील पाहतात की साक्षीदार गरीब असले तरी नेहमी चांगले कपडे घालतात आणि इतरांपेक्षा त्यांची परिस्थिती चांगली आहे असं भासतं.” यावरून, देवाच्या राज्याला प्रथम स्थान देणाऱ्यांना येशूने जे वचन दिले होते त्याची आपल्याला आठवण होते. (मत्त. ६:२८-३०, ३३) खरोखर, आपल्या स्वर्गीय पित्या यहोवाचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमचे व तुमच्या मुलांचे भले व्हावे असेच त्याला नेहमी वाटते. “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.” (२ इति. १६:९) त्याने आपल्याला त्याच्या आज्ञा सांगितल्या आहेत. तसेच, कौटुंबिक जीवन व भौतिक गरजा यांविषयीही त्याने आपल्याला मार्गदर्शन पुरवले आहे. हे सारे आपल्या भल्यासाठीच आहे. जेव्हा आपण त्याच्या सर्व आज्ञांचे पालन करतो तेव्हा आपण हे दाखवून देतो की आपले त्याच्यावर प्रेम आणि भरवसा आहे. “देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहा. ५:३.

२१, २२. यहोवावर भरवसा ठेवण्याची तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली आहे?

२१ एड्वार्डो म्हणतात, “पत्नी व मुलींपासून दूर राहून मी जो वेळ वाया घालवला तो कधीही भरून काढता येणार नाही याची मला जाणीव आहे. पण आता झालेल्या गोष्टींवर मला जास्त विचार करत बसायचं नाही. माझे अनेक सहकारी आज श्रीमंत आहेत पण ते जीवनात सुखी नाहीत. त्यांच्या कुटुंबांत गंभीर समस्या आहेत. पण आमचं कुटुंब खूप आनंदात आहे! आणि या देशात कित्येक बांधव गरीब असूनसुद्धा आध्यात्मिक गोष्टींना जीवनात पहिलं स्थान देत आहेत हे पाहून मला त्यांची खूप प्रशंसा करावीशी वाटते. येशूनं दिलेलं वचन किती खरं आहे हे आम्ही सर्व जण प्रत्यक्ष अनुभवत आहोत.”—मत्तय ६:३३ वाचा.

२२ तेव्हा, कसलीही शंका व भीती बाळगू नका! यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा निर्धार करा आणि त्याच्यावर पूर्ण भरवसा बाळगा. देवावर, तुमच्या विवाहसोबत्यावर आणि तुमच्या मुलांवर असलेले प्रेम तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आध्यात्मिक रीतीने काळजी घेण्यास प्रवृत्त करो. यामुळे, ‘यहोवा तुमचा साहाय्यक आहे’ हे तुम्हाला स्वतःच्या जीवनात अनुभवायला मिळेल!

^ परि. 1 नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 11 टेहळणी बुरूज जानेवारी-मार्च २०१२, पृष्ठ १० वरील “अंथरूण पाहून पाय पसरा—शक्य आहे का?” हा लेख पाहा.