व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होते का?

तुम्हाला माहीत होते का?

बायबलच्या काळात जेव्हा एक मनुष्य मुद्दाम आपली वस्त्रे फाडायचा तेव्हा याचा काय अर्थ असायचा?

बायबलच्या वचनांमध्ये अशा बऱ्याच घटनांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांमध्ये एखाद्या मनुष्याने मुद्दामहून आपली वस्त्रे फाडली. आजच्या काळातील लोकांना हे कृत्य करणे कदाचित आश्चर्याची बाब वाटेल. पण यहुद्यांमध्ये निराशा, दुःख, अपमान, संताप, किंवा शोक यांमुळे मनात येणाऱ्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी हे कृत्य केले जायचे.

उदाहरणार्थ, जेव्हा रऊबेनाला कळले की योसेफाला त्याच्याच भावांनी विकून टाकले आहे आणि योसेफाला वाचवण्याची त्याची योजना फसली आहे तेव्हा त्याने “आपली वस्त्रे फाडली.” त्यांचे वडील याकोब यांनी जेव्हा असे गृहीत धरले की त्यांचा मुलगा योसेफ याला एका जंगली प्राण्याने खाऊन टाकले आहे तेव्हा त्यांनीदेखील “आपली वस्त्रे फाडली.” (उत्प. ३७:१८-३५) ईयोबाला जेव्हा सांगण्यात आले की त्याची सर्व मुले मरून गेली आहेत तेव्हा त्याने “आपला झगा फाडला.” (ईयो. १:१८-२०) एक निरोप्या ज्याने “आपली वस्त्रे फाडली” होती, तो महायाजक एलीकडे येतो व त्याला सांगतो, की इस्राएल लोकांचा पराजय करण्यात आला आहे, त्याची दोन्ही मुले ठार झाली आहेत आणि त्यासोबतच कराराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे. (१ शमु. ४:१२-१७) जेव्हा योशियाने त्याला वाचून दाखवलेले नियमशास्त्रामधील शब्द ऐकले आणि त्याला त्याच्या लोकांच्या चुकांची जाणीव झाली तेव्हा “त्याने आपली वस्त्रे फाडली.”—२ राजे २२:८-१३.

येशूच्या चौकशीच्या वेळेस जेव्हा कयफाने असा चुकीचा निष्कर्ष काढला की येशूने देवाची निंदा केली आहे, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. (मत्त. २६:५९-६६) रब्बींच्या परंपरेनुसार असा नियम होता, की जर कोणी देवाची निंदा होत असताना ऐकली तर त्याने आपली वस्त्रे फाडावीत. जेरूसलेमच्या मंदिराच्या नाशानंतर रब्बींनी याविषयी एक वेगळे मत मांडले. त्यांनी म्हटले की “जर यापुढे कोणी देवाची निंदा होत असताना ऐकली तर त्याला आपली वस्त्रे फाडण्याची गरज नाही, नाहीतर त्याच्या वस्त्रांच्या चिंध्या होतील.”

अर्थात, मनुष्याचे दुःख यहोवाच्या नजरेत खरे नसल्यास, वस्त्रे फाडण्याच्या या कृत्याला त्याच्या नजरेत काहीच मोल नसायचे. म्हणून यहोवाने आपल्या लोकांना सांगितले, “आपली वस्त्रे नव्हे, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याजकडे वळा.”—योए. २:१३.