व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण प्रत्येक व्यक्तीला कसे उत्तर द्यावे?

आपण प्रत्येक व्यक्तीला कसे उत्तर द्यावे?

“तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त . . . असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.”—कलस्सै. ४:६.

१, २. (क) विचारपूर्वक निवडलेल्या प्रश्नांचा वापर करणे किती महत्त्वाचे आहे हे कोणत्या अनुभवावरून स्पष्ट होते? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) कठीण विषयांवर चर्चा करण्यास आपल्याला भीती वाटण्याचे कारण का नाही?

बऱ्याच वर्षांआधी एक ख्रिस्ती बहीण विश्वासात नसलेल्या तिच्या पतीशी बायबलविषयी चर्चा करत होती. तिचा पती पूर्वी एका चर्चचा सदस्य होता, पण फक्त नावापुरताच. चर्चा करत असताना, तिच्या पतीने म्हटले की त्याचा त्रैक्यावर विश्वास आहे. त्रैक्याच्या शिकवणीत नेमके कायकाय समाविष्ट आहे हे कदाचित त्याला माहीत नसावे हे ओळखून बहिणीने त्याला विचारले, “देव, येशू आणि पवित्र आत्मा हे तिघंही देव आहेत आणि तरीसुद्धा तीन देव नसून एकच देव आहे, असं तुम्ही मानता का?” हे ऐकून तिच्या पतीला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला, “नाही, असं मी मानत नाही!” त्यानंतर, त्या दोघांमध्ये देव खरोखर कसा आहे या विषयावर छान चर्चा झाली.

समजूतदारपणे आणि विचारपूर्वक निवडलेल्या प्रश्नांचा वापर करणे किती महत्त्वाचे आहे हे या अनुभवावरून स्पष्ट होते. तसेच, त्यावरून एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकतो: त्रैक्य, नरक किंवा सृष्टिकर्त्याचे अस्तित्व यांसारख्या कठीण विषयांवर चर्चा करण्यास भीती वाटण्याचे कारण नाही. जर आपण यहोवावर आणि तो पुरवत असलेल्या प्रशिक्षणावर विसंबून राहिलो, तर सहसा आपल्या श्रोत्यांना पटण्याजोगे उत्तर देणे आपल्याला शक्य होईल आणि आपण जे शिकवतो  ते त्यांच्या हृदयापर्यंत पोचेल. (कलस्सै. ४:६) तर अशा विषयांवर चर्चा करताना अनुभवी प्रचारक काय करतात याचे आता आपण परीक्षण करू या. तसेच, आपण (१) श्रोत्यांच्या मनात काय आहे ते बाहेर काढण्यासाठी प्रश्न कसे विचारू शकतो, (२) शास्त्रवचनांतील माहितीवर तर्क कसा करू शकतो आणि (३) आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी उदाहरणांचा वापर कसा करू शकतो यावरही विचार करू या.

श्रोत्यांच्या मनातील विचार बाहेर काढण्यासाठी प्रश्न विचारा

३, ४. प्रश्नांचा वापर करणे महत्त्वाचे का आहे? उदाहरण द्या.

प्रश्न विचारल्यामुळे एक व्यक्ती काय मानते हे जाणून घेण्यास आपल्याला साहाय्य मिळू शकते. हे जाणून घेणे महत्त्वाचे का आहे? नीतिसूत्रे १८:१३ यात म्हटले आहे, “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” म्हणूनच, एखाद्या विषयावर बायबल काय सांगते याविषयी चर्चा करण्याआधी समोरच्या व्यक्तीचा विश्वास काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर, एखादी शिकवण कशा प्रकारे खोटी आहे हे त्यांना पटवून सांगण्यात आपण बराच वेळ खर्च करू, आणि नंतर आपल्याला कळेल की मुळात त्या शिकवणीवर त्यांचा विश्वासच नाही!—१ करिंथ. ९:२६.

उदाहरणार्थ, आपण नरक या विषयावर एखाद्याशी चर्चा करत आहोत अशी कल्पना करा. सहसा असे मानले जाते की नरक हे एक खरोखरचे अग्निमय ठिकाण असून तेथे लोकांना यातना दिल्या जातात; तर इतरांची याविषयी वेगळी मते आहेत. म्हणून, नरक या विषयावर चर्चा करताना आपण असे म्हणू शकतो: “नरकाविषयी लोकांची वेगवेगळी मतं आहेत. पण याविषयी तुमचं मत काय आहे?” त्या व्यक्तीचे उत्तर ऐकून घेतल्यावर, बायबल या विषयासंबंधी काय सांगते हे तिला समजावून सांगणे आपल्याला जास्त सोपे जाईल.

५. प्रश्न विचारल्यामुळे एखादी व्यक्ती विशिष्ट शिकवण का मानते हे जाणून घेण्यास आपल्याला कशा प्रकारे मदत मिळू शकते?

विचारपूर्वक निवडलेले प्रश्न, एखादी व्यक्ती विशिष्ट शिकवण का मानते हे जाणून घेण्यासही आपल्याला मदत करू शकतात. उदाहरणार्थ, देवाला न मानणारी एखादी व्यक्ती सेवाकार्यात आपल्याला भेटली असे समजा. आपण कदाचित लगेच असा निष्कर्ष काढू की या व्यक्तीच्या मनावर उत्क्रांतीवादासारख्या देवविरोधी मतांचा पगडा आहे. (स्तो. १०:४) पण, खरे पाहता जीवनात पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या भयंकर दुःखामुळे काही लोकांचा देवावरील विश्वास उडालेला असतो. जर एक प्रेमळ सृष्टिकर्ता आहे तर मग इतके दुःख का, हा प्रश्न त्यांना सतावत असतो. त्यामुळे, जर एखादा घरमालक देवाच्या अस्तित्वाविषयी शंका व्यक्त करत असेल तर आपण त्याला असे विचारू शकतो, “तुमचं पूर्वीपासूनच असं मत आहे का?” जर ती व्यक्ती नाही असे म्हणाली, तर मग एखाद्या विशिष्ट घटनेमुळे तुमच्या मनात देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण झाली का असे आपण तिला विचारू शकतो. तिने दिलेल्या उत्तरामुळे तिला आध्यात्मिक साहाय्य देण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे ठरवणे आपल्याला शक्य होईल.—नीतिसूत्रे २०:५ वाचा.

६. एखादा प्रश्न विचारल्यानंतर आपण काय केले पाहिजे?

प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती उत्तर देते तेव्हा आपण तिचे लक्षपूर्वक ऐकून घेतले पाहिजे आणि तिच्या भावनांबद्दल कदर व्यक्त केली पाहिजे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती कदाचित आपल्याला सांगेल की तिच्या जीवनात घडलेल्या एका दुःखद घटनेमुळे देव खरोखरच आहे का आणि त्याचे आपल्यावर प्रेम आहे का अशा शंका तिच्या मनात उत्पन्न झाल्या. हे ऐकल्यावर लगेच त्या व्यक्तीसमोर देवाच्या अस्तित्वाबद्दल पुरावा मांडण्याऐवजी, सर्वात आधी आपण तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली पाहिजे. तसेच, आपल्याला दुःख का सहन करावे लागते असा प्रश्न मनात येण्यात काहीही गैर नाही असेही आपण तिला सांगितले पाहिजे. (हब. १:२, ३) अशा प्रकारे धीराने व प्रेमाने बोलल्यास त्या व्यक्तीच्या मनात आणखी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. *

 शास्त्रवचनांतील माहितीवर तर्क करा

सेवाकार्यात आपण कितपत परिणामकारक ठरू हे प्रामुख्याने कशावर अवलंबून आहे? (परिच्छेद ७ पाहा)

७. सेवाकार्यात आपण किती परिणामकारक ठरू हे प्रामुख्याने कशावर अवलंबून आहे?

आता आपण शास्त्रवचनांतील माहितीवर तर्क कसा करावा हे पाहू या. सेवाकार्यात आपले सर्वात महत्त्वाचे हत्यार म्हणजे बायबल. ते आपल्याला “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” असण्यास मदत करते. (२ तीम. ३:१६, १७) पण, सेवाकार्यात आपण कितपत परिणामकारक ठरू हे घरमालकाला किती शास्त्रवचने वाचून दाखवली यावर अवलंबून नाही; तर, आपण जी काही शास्त्रवचने वाचली त्यांवर आपण कशा प्रकारे तर्क केला आणि ती घरमालकाला किती चांगल्या प्रकारे समजावून सांगितली यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. (प्रेषितांची कृत्ये १७:२, ३ वाचा.) उदाहरणार्थ, पुढील तीन परिस्थितींचा विचार करा.

८, ९. (क) येशूच देव आहे किंवा देवाच्या बरोबरीचा आहे असे मानणाऱ्या व्यक्तीसोबत तर्क करण्याचा एक मार्ग कोणता? (ख) या विषयावर तर्क करण्यासाठी तुम्हाला कोणती शास्त्रवचने परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे?

पहिली परिस्थिती: सेवाकार्यात आपल्याला अशी व्यक्ती भेटते जी येशूच देव आहे, किंवा तो देवाच्या बरोबरीचा आहे असे मानते. या विषयावर तर्क करण्यासाठी आपण कोणत्या शास्त्रवचनांचा उपयोग करू शकतो? आपण त्या व्यक्तीला योहान ६:३८ हे वचन वाचायला सांगू शकतो. या वचनात येशूचे पुढील शब्द दिले आहेत: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” वचन वाचल्यावर आपण त्या व्यक्तीला असे विचारू शकतो: “जर येशूच देव आहे तर मग त्याला स्वर्गातून खाली पृथ्वीवर कुणी पाठवलं? मग, हा पाठवणारा येशूपेक्षा श्रेष्ठ ठरणार नाही का? कारण, ज्याला पाठवलं जातं त्याच्यापेक्षा जो त्याला पाठवतो तो केव्हाही अधिक श्रेष्ठ असतो.”

त्याच प्रकारे, आपण फिलिप्पैकर २:९ हे वचनदेखील वाचू शकतो. या वचनात, येशूचा मृत्यू व पुनरुत्थान झाल्यानंतर देवाने काय केले याविषयी प्रेषित पौल सांगतो. तो म्हणतो, “देवाने त्याला [येशूला] अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले.” या वचनावर तर्क करण्यास मदत करण्यासाठी आपण त्या व्यक्तीला असे विचारू शकतो: “जर येशूचा मृत्यू होण्याआधी तो देवाच्या बरोबरीचा होता, आणि नंतर देवाने त्याला अत्युच्च केले, तर मग येशू देवापेक्षाही श्रेष्ठ झाला असा याचा अर्थ होणार नाही का? पण, कोणीही देवापेक्षा श्रेष्ठ कसा बनू शकतो?” जर त्या व्यक्तीला देवाच्या वचनाबद्दल आदर असेल आणि ती प्रामाणिक मनाची व्यक्ती असेल, तर अशा प्रकारे तर्क केल्यानंतर ती नक्कीच या विषयावर आणखी जाणून घेण्यास प्रवृत्त होईल.—प्रे. कृत्ये १७:११.

१०. (क) नरकात वाईट लोकांना यातना भोगाव्या लागतात असे मानणाऱ्या व्यक्तीशी आपण कशा प्रकारे तर्क करू शकतो? (ख) नरकाविषयी चर्चा करताना तुम्हाला कोणत्या पद्धतीने तर्क करणे परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे?

१० दुसरी परिस्थिती: आपल्याला एक असा घरमालक  भेटतो जो खूप धार्मिक प्रवृत्तीचा आहे, पण वाईट लोकांना नरकात टाकले जाणार नाही हे त्याला पटत नाही. दुष्ट लोकांना त्यांच्या वाईट कृत्यांची शिक्षा मिळालीच पाहिजे असे या घरमालकाला मनापासून वाटत असेल आणि यामुळेच कदाचित तो नरकाच्या शिकवणीवर विश्वास ठेवत असेल. मग असा विचार करणाऱ्याशी आपण कशा प्रकारे तर्क करू शकतो? सर्वात आधी आपण त्याला हे आश्वासन देऊ शकतो की दुष्टांना शिक्षा ही मिळेलच. (२ थेस्सलनी. १:९, १०) त्यानंतर, आपण त्याला उत्पत्ति २:१६, १७ ही वचने वाचायला सांगू शकतो, ज्यांत पाप केल्यास मृत्यूची शिक्षा मिळेल असे आदामाला सांगण्यात आले होते. आपण समजावून सांगू शकतो, की आदामाने पाप केल्यामुळे सर्व मानव पापी म्हणूनच जन्माला येतात. (रोम. ५:१२) पण आपण या गोष्टीकडे त्याचे लक्ष वेधू शकतो, की देवाने आदामाला आज्ञा देताना नरकात यातना भोगण्याविषयी काहीही सांगितले नव्हते. मग आपण त्याला विचारू शकतो, “आदाम आणि हव्वा यांनी पाप केल्यास जर त्यांना नरकात यातना भोगाव्या लागणार होत्या, तर मग देवानं त्यांना याविषयी आधीच सांगणं योग्य नव्हतं का?” त्यानंतर आपण उत्पत्ति ३:१९ हे वचन वाचू शकतो, ज्यात आदाम व हव्वा यांनी पाप केल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली, पण नरकात यातना भोगण्याविषयी काहीही सांगण्यात आले नाही. उलट, देवाने आदामाला सांगितले की तो पुन्हा मातीस मिळेल. आपण घरमालकाला विचारू शकतो, “जर आदाम नरकात जाणार होता, तर मग तो मातीस मिळेल असं त्याला सांगणं योग्य होतं का?” जर ती खुल्या मनाने विचार करणारी व्यक्ती असेल तर अशा प्रकारचा प्रश्न तिला या विषयाचे आणखी सखोल परीक्षण करायला भाग पाडेल.

११. (क) सर्व चांगले लोक स्वर्गात जातात असे मानणाऱ्या व्यक्तीशी तर्क करण्याची एक पद्धत कोणती? (ख) स्वर्गात जाणे या विषयावर तर्क करण्यासाठी तुम्हाला कोणती पद्धत परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे?

११ तिसरी परिस्थिती: सर्व चांगले लोक स्वर्गात जातात असे मानणारी व्यक्ती आपल्याला सेवाकार्यात भेटते. कदाचित ही व्यक्ती तिच्या या विश्वासानुसारच बायबलमधील काही वचनांचा अर्थ लावेल. उदाहरणार्थ, प्रकटीकरण २१:४ (वाचा.) या वचनाची आपण चर्चा करत आहोत असे समजा. या वचनात वर्णन केलेले आशीर्वाद स्वर्गातील आशीर्वादांना सूचित करतात असा अर्थ कदाचित ती घेईल. मग आपण तिच्याशी कशा प्रकारे तर्क करू शकतो? आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी आणखी शास्त्रवचने दाखवण्याऐवजी आपण त्याच वचनात दिलेल्या एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. त्यात म्हटले आहे की “यापुढे मरण नाही.” आपण त्या व्यक्तीला विचारू शकतो, की यापुढे एखादी गोष्ट नसेल असे म्हणण्याकरता आधी ती गोष्ट अस्तित्वात असायला पाहिजे, असे तुम्हाला वाटत नाही का? साहजिकच ती व्यक्ती हो म्हणेल. मग आपण तिला सांगू शकतो की स्वर्गात कधीही मृत्यू अस्तित्वात नव्हता; मरण हे फक्त पृथ्वीवरच आहे. तेव्हा, प्रकटीकरण २१:४ यात ज्या आशीर्वादांबद्दल सांगितले आहे ते भविष्यात पृथ्वीवर मिळणारे आशीर्वादच असले पाहिजेत.—स्तो. ३७:२९.

मुद्दा स्पष्ट करण्यासाठी उदाहरणांचा वापर करा

१२. येशूने उदाहरणांचा वापर का केला?

१२ प्रचार कार्य करताना येशू प्रश्नांसोबतच उदाहरणांचाही वापर करायचा. (मत्तय १३:३४, ३५ वाचा.) येशू जी उदाहरणे वापरायचा त्यांमुळे त्याच्या श्रोत्यांच्या मनातील खरे हेतू दिसून यायचे. (मत्त. १३:१०-१५) तसेच, या उदाहरणांमुळे लोकांना येशूकडून शिकून घेण्यास आनंद वाटायचा आणि त्याने शिकवलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहायच्या. आपण लोकांना शिकवताना उदाहरणांचा कशा प्रकारे वापर करू शकतो?

१३. देव येशूपेक्षा श्रेष्ठ आहे हे आपण उदाहरण देऊन कसे स्पष्ट करू शकतो?

१३ सहसा साधीसोपी उदाहरणेच सर्वात चांगली असतात. उदाहरणार्थ, देव येशूपेक्षा श्रेष्ठ आहे हे समजावून सांगताना आपण पुढे सांगितल्याप्रमाणे घरमालकाशी बोलू शकतो. आपण त्याला सांगू शकतो की देव आणि येशू या दोघांनीही त्यांच्यातील नात्याविषयी बोलताना एका कौटुंबिक नात्याचा उल्लेख केला. देवाने येशूबद्दल बोलताना त्याला आपला पुत्र म्हटले आणि येशूने देवाला आपला पिता म्हटले. (लूक ३:२१, २२;  योहा. १४:२८) यानंतर, आपण घरमालकाला असे विचारू शकतो: “दोन व्यक्ती बरोबरीच्या आहेत असं जर एखाद्याला पटवून द्यायचं असेल, तर तुम्ही कुटुंबातील कोणत्या दोन व्यक्तींचं उदाहरण दिलं असतं?” कदाचित घरमालक दोन भावांचा, किंवा दोन जुळ्या भावांचा उल्लेख करेल. त्याने तसे म्हटल्यास, आपण त्याला सांगू शकतो की हे उदाहरण अगदी योग्य आहे. मग आपण त्याला विचारू शकतो: “जर तुम्हाला आणि मला हे उदाहरण इतक्या सहजपणे सुचलं तर मग महान शिक्षक असलेल्या येशूनेही याच उदाहरणाचा वापर केला नसता का? पण, त्याऐवजी त्यानं देवाला आपला पिता म्हटलं. अशा रीतीनं त्यानं हे दाखवून दिलं की देव त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि त्याच्याजवळ जास्त अधिकार आहे.”

१४. देव सैतानाच्या हातून लोकांना नरकात शिक्षा देतो ही कल्पना निरर्थक आहे हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

१४ आणखी एक उदाहरण विचारात घ्या. काही लोक असे मानतात की देवानेच सैतानाला नरकावर अधिकार दिला आहे. असे मानणाऱ्या घरमालकाला जर मुले असतील, तर आपण त्याला एका उदाहरणाच्या साहाय्याने हे पटवून देऊ शकतो, की देव सैतानाच्या हातून वाईट लोकांना नरकात शिक्षा देतो ही कल्पना अगदीच निरर्थक आहे. आपण त्याला असे म्हणू शकतो: “असं समजा की तुमचा मुलगा खूप हट्टी झाला आहे आणि तो खूप वाईट वागतो. अशा वेळी, तुम्ही काय कराल?” घरमालक कदाचित म्हणेल की तो त्याच्या मुलाची चूक त्याच्या लक्षात आणून देईल. मुलाने वाईट वागायचे सोडून द्यावे आणि चांगले वागावे म्हणून कदाचित तो मुलाला वारंवार मदत करण्याचा प्रयत्न करेल. (नीति. २२:१५) मग आपण त्याला असे विचारू शकतो, की तुम्ही सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करूनही जर तुमचा मुलगा वाईट वागत राहिला तर तुम्ही काय कराल? बहुतेक आईवडील म्हणतील की अशा वेळी मुलाला शिक्षा देण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरणार नाही. मग आपण त्यांना विचारू शकतो: “समजा तुम्हाला कळलं की एक दुष्ट व्यक्ती तुमच्या मुलाला असं वाईट वागायला लावत आहे, तर तुम्हाला कसं वाटेल?” साहजिकच कोणत्याही आईवडिलांना अशा व्यक्तीचा खूप राग येईल. मग आपण त्या घरमालकाला आपल्या उदाहरणाचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी असे विचारू शकतो, “एका दुष्ट व्यक्तीनं तुमच्या मुलाला वाईट वागायला लावलं होतं, हे माहीत असूनही तुम्ही त्याच व्यक्तीला तुमच्या मुलाला शिक्षा देण्यास सांगाल का?” ते नक्कीच नाही असे उत्तर देतील. तर मग, सैतान स्वतः लोकांना वाईट गोष्टी करण्यास प्रवृत्त करत असल्यामुळे देव त्याच्याच हातून लोकांना शिक्षा नक्कीच देणार नाही!

योग्य दृष्टिकोन बाळगा

१५, १६. (क) सगळेच लोक राज्य संदेश स्वीकारतील अशी अपेक्षा आपण का करू नये? (ख) सेवाकार्यात परिणामकारक ठरण्याकरता आपल्याजवळ विशेष कौशल्ये असण्याची गरज आहे का? स्पष्ट करा.

१५ आपण ज्यांना राज्याचा संदेश सांगतो ते सगळेच लोक त्याचा स्वीकार करणार नाहीत हे आपल्याला माहीत आहे. (मत्त. १०:११-१४) आपण अगदी योग्य प्रश्न विचारले, उत्तम रीत्या तर्क केला, आणि चांगल्यातली चांगली उदाहरणे दिली तरीसुद्धा. शेवटी, येशू स्वतः या पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वात महान शिक्षक असूनही त्याने शिकवलेल्या गोष्टींचे फार कमी लोकांनी पालन केले.—योहा. ६:६६; ७:४५-४८.

१६ दुसरीकडे पाहता, आपल्याजवळ काही विशेष कौशल्ये नाहीत असे कदाचित आपल्याला वाटत असेल. असे असले तरीसुद्धा आपण आपल्या सेवाकार्यात परिणामकारक ठरू शकतो. (प्रेषितांची कृत्ये ४:१३ वाचा.) देवाचे वचन आपल्याला सांगते की सार्वकालिक जीवनाप्रती ज्यांची योग्य मनोवृत्ती आहे असे सर्व जण सुवार्तेचा नक्कीच स्वीकार करतील. (प्रे. कृत्ये १३:४८) म्हणूनच आपण स्वतःबद्दल आणि ज्यांना आपण राज्याचा संदेश सांगतो त्या लोकांबद्दलही योग्य मनोवृत्ती विकसित करण्याचा आणि ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू या. यहोवा आपल्याला जे प्रशिक्षण पुरवत आहे त्याचा आपण पुरेपूर फायदा घेऊ या. असे केल्यामुळे आपल्यालाच नव्हे तर जे आपले ऐकतात त्यांनाही लाभ होईल ही खात्री आपण बाळगू शकतो. (१ तीम. ४:१६) आपण प्रत्येक व्यक्तीला कसे उत्तर द्यावे हे समजून घेण्यास यहोवा आपले साहाय्य करू शकतो. सेवाकार्यात यशस्वी होण्याचा एक मार्ग म्हणजे सुवर्ण नियम म्हटलेल्या तत्त्वाचे पालन करणे. याच विषयावर आपण पुढील लेखात चर्चा करणार आहोत.

^ परि. 6 टेहळणी बुरूज १५ जून २००० अंकातील “अदृश्य गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता का?” हा लेख पाहा.