व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 आमच्या संग्रहातून

‘कापणीचे अद्याप बरेच कार्य बाकी आहे’

‘कापणीचे अद्याप बरेच कार्य बाकी आहे’

१९२३ साली जॉर्ज यंग रीओ द जनीरो येथे आले

सन १९२३. साऊ पाऊलू येथील नाट्य व संगीत महाविद्यालयाचे प्रेक्षागृह अगदी खचाखच भरले आहे! जॉर्ज यंग यांचा धीरगंभीर आवाज ऐकू येत आहे का तुम्हाला? त्यांच्या भाषणाच्या प्रत्येक वाक्याचा पोर्तुगीझ भाषेत अनुवाद केला जात आहे. उपस्थित असलेले एकूण ५८५ जण अगदी कान देऊन ऐकत आहेत! त्याच वेळी पोर्तुगीझ भाषेतील बायबलची वचने प्रोजेक्टरच्या साहाय्याने पडद्यावर दाखवली जात आहेत. कार्यक्रम संपल्यावर मिलियन्स नाउ लिव्हिंग विल नेव्हर डाय! या पुस्तिकेच्या शंभर प्रती उपस्थितांमध्ये वाटल्या जातात. त्यांसोबतच इंग्रजी, जर्मन व इटॅलियन भाषेतही काही पुस्तिका वाटल्या जातात. भाषणाचा कार्यक्रम अगदी यशस्वी रीत्या पार पडतो! ही बातमी सगळीकडे पसरते. दोन दिवसांनी आणखी एका भाषणाकरता प्रेक्षक पुन्हा एकदा त्याच सभागृहात गर्दी करतात. पण या सर्व घटना कशा काय घडून आल्या?

१८६७ या वर्षी सारा बेलोना फर्गसन या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेहून ब्राझीलमध्ये राहायला आल्या. १८९९ मध्ये, त्यांच्या धाकट्या भावाने अमेरिकेहून ब्राझीलला आणलेली काही बायबलवर आधारित प्रकाशने वाचल्यानंतर सारा यांची खात्री पटली की त्यांना सत्य मिळाले आहे. त्यांना वाचनाची खूप आवड असल्यामुळे त्यांनी इंग्रजीतील टेहळणी बुरूज नियतकालिकाची वर्गणी भरली. बायबलमधील संदेश समजल्यावर त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी बंधू सी.टी. रस्सल यांना याविषयी पत्र लिहून कळवले. “एखादी व्यक्ती कितीही दूरच्या ठिकाणी राहत असली, तरी तिच्यापर्यंत राज्याचा संदेश पोचवणे अशक्य नाही, याचा जिवंत पुरावा” आपण स्वतः असल्याचे त्यांनी बंधू रस्सल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले.

कॅन द लिव्हिंग टॉक विथ द डेड? (पोर्तुगीझ)

इतरांनाही बायबलमधील सत्याविषयी सांगण्याचा सारा फर्गसन यांनी आपल्या परीने प्रयत्न केला. पण, त्यांना व त्यांच्या कुटुंबाला तसेच ब्राझीलमध्ये असलेल्या सगळ्या प्रांजळ मनाच्या लोकांना पुढे कोण मदत करेल असा प्रश्न नेहमी त्यांच्या मनात यायचा. १९१२ साली ब्रुकलिन बेथेलकडून त्यांना अशी माहिती मिळाली की व्हेअर आर द डेड? असे शीर्षक असलेल्या पत्रिकेच्या पोर्तुगीझ भाषेतील हजारो प्रती घेऊन कोणीतरी साऊ पाऊलूला येत आहे. १९१५ मध्ये त्यांनी असे म्हटले की बरेच बायबल विद्यार्थी, आपल्याला लवकरच स्वर्गात घेतले जाईल अशी अपेक्षा करतात याचे त्यांना नेहमीच आश्चर्य वाटते. यासंबंधी आपला दृष्टिकोन व्यक्त करत त्यांनी असे लिहिले: “ब्राझील आणि सबंध दक्षिण अमेरिकेबद्दल काय? . . . दक्षिण अमेरिकेने या  जगाचा किती मोठा भाग व्यापला आहे याचा विचार केल्यास, कापणीचे अद्याप बरेच कार्य बाकी आहे हे तुमच्या अगदी सहज लक्षात येईल.” खरोखरच, पुढे अतिशय मोठ्या प्रमाणात कापणीचे कार्य केले जाणार होते!

१९२० च्या सुमारास, एका लढाऊ जहाजाची दुरुस्ती केली जात असताना, जहाजावर काम करणारे ब्राझीलचे आठ तरुण खलाशी न्यू यॉर्क सिटीत यहोवाच्या साक्षीदारांच्या काही सभांना उपस्थित राहिले. रीओ द जनीरोला परत गेल्यानंतर, त्यांनी बायबलमधून नुकत्याच शिकायला मिळालेल्या आशेबद्दल इतरांनाही सांगितले. याच्या थोड्याच काळानंतर, १९२३ सालच्या मार्च महिन्यात पिलग्रिम म्हणजेच प्रवासी पर्यवेक्षक असलेले जॉर्ज यंग रीओ द जनीरो येथे आले. बायबलच्या संदेशाबद्दल जाणून घेण्यास अनेक जण उत्सुक असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी अनेक प्रकाशनांचे पोर्तुगीझ भाषेत भाषांतर करून घेण्याची व्यवस्था केली. यानंतर थोड्याच काळाने बंधू यंग साऊ पाऊलूला गेले. त्या वेळी या शहराची लोकसंख्या सुमारे ६,००,००० इतकी होती. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्यानुसार साऊ पाऊलू येथे बंधू यंग यांनी एक भाषण दिले आणि मिलियन्स या पुस्तिकेचे वाटप केले. त्यांनी सांगितले, “एकटाच असल्यामुळे, मला वृत्तपत्रांतील जाहिरातींवरच पूर्णपणे अवलंबून राहावे लागले.” पुढे ते म्हणाले, “ब्राझीलमध्ये आय.बी.एस.ए. या संस्थेमार्फत अगदी पहिल्यांदाच अशी वृत्तपत्रांत जाहिरात करून जाहीर व्याख्याने देण्यात आली.” *

बंधू यंग यांच्या भाषणांदरम्यान बायबलमधील वचने प्रोजेक्टरच्या साहाय्याने पडद्यावर दाखवली जायची

१५ डिसेंबर १९२३ च्या टेहळणी बुरूज अंकात ब्राझीलमधील कार्यासंबंधी असे म्हणण्यात आले: “१ जून रोजी तेथे कार्याला सुरुवात करण्यात आली, आणि त्या वेळी कोणतेही प्रकाशन उपलब्ध नव्हते हे विचारात घेता, प्रभूने आपले कार्य कशा प्रकारे आशीर्वादित केले आहे हे पाहून आश्चर्य वाटते.” या वृत्तात पुढे असे म्हणण्यात आले की बंधू यंग यांनी १ जून ते ३० सप्टेंबर या काळात ब्राझीलमध्ये २१ भाषणे दिली, ज्यांना एकूण ३,६०० लोक उपस्थित राहिले. यांपैकी दोन भाषणे त्यांनी साऊ पाऊलू येथे दिली होती. रीओ द जनीरो येथे राज्य संदेशाचा हळूहळू प्रसार होत होता. काही महिन्यांतच पोर्तुगीझ भाषेत आपली ७,००० पेक्षा जास्त प्रकाशने लोकांना देण्यात आली होती! शिवाय, १९२३ च्या नोव्हेंबर-डिसेंबर अंकापासून टेहळणी बुरूज नियतकालिकाचे पोर्तुगीझमध्ये प्रकाशन सुरू करण्यात आले होते.

सारा बेलोना फर्गसन, ब्राझीलमधील इंग्रजी भाषेतील टेहळणी बुरूज नियतकालिकाची पहिली वर्गणीदार

जॉर्ज यंग, सारा फर्गसन यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. या भेटीविषयी टेहळणी बुरूज यात असे सांगण्यात आले: “बहीण फर्गसन दिवाणखान्यात आल्या आणि काही क्षणांसाठी जणू त्यांची वाचाच गेली. मग, बंधू यंग यांचा हात हातात घेऊन आणि डोळे भरून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत त्या शेवटी म्हणाल्या, ‘खरंच एक पिलग्रिम आमच्या घरी आलाय?’” यानंतर लवकरच सारा फर्गसन आणि त्यांच्या मुलांपैकी काहींचा बाप्तिस्मा झाला. खरेतर, बाप्तिस्मा घेण्यासाठी त्यांनी तब्बल २५ वर्षे वाट पाहिली होती! १ ऑगस्ट १९२४ च्या टेहळणी बुरूज अंकात असे सांगण्यात आले की ब्राझीलमध्ये ५० जणांचा बाप्तिस्मा झाला, ज्यांपैकी बहुतेक जण रीओ द जनीरो शहरातील होते.

आज, सुमारे ९० वर्षांनंतर, “ब्राझील आणि सबंध दक्षिण अमेरिकेबद्दल काय?” असा प्रश्न विचारण्याची गरजच उद्भवत नाही. कारण, ब्राझीलमध्ये आज ७,६०,००० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार सुवार्तेचा प्रचार करत आहेत! आणि सबंध दक्षिण अमेरिकेत राज्याचा संदेश पोर्तुगीझ, स्पॅनिश व तेथील अनेक स्थानिक बोलीभाषांत लोकांना ऐकायला मिळत आहे. १९१५ साली सारा फर्गसन यांनी जे म्हटले ते अगदी खरे होते, ‘कापणीचे अद्याप बरेच कार्य बाकी होते.’—ब्राझीलमधील आमच्या संग्रहातून.

^ परि. 6 इंटरनॅशनल बायबल स्टूडंट्स असोसिएशन (आय.बी.एस.ए.) हे यहोवाच्या साक्षीदारांचे पूर्वीचे नाव आहे.