व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 मुख्य विषय | धूम्रपानाबद्दल देवाचा दृष्टिकोन

एक जागतिक साथ

एक जागतिक साथ

धूम्रपान एक क्रूर मारेकरी आहे.

  • गेल्या शतकात त्याने दहा कोटी लोकांचा बळी घेतला.

  • दरवर्षी तो जवळजवळ साठ लाख लोकांचा बळी घेतो.

  • दर सहा सेकंदांना तो सरासरी एका व्यक्तीचा बळी घेतो.

आणि हे चित्र बदलण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.

तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, की असेच जर चालत राहिले तर २०३० पर्यंत, दरवर्षी धूम्रपानामुळे दगावणाऱ्या लोकांची संख्या ऐंशी लाखांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यांचा असाही अंदाज आहे, की २१ वे शतक उलटेपर्यंत धूम्रपानाने चक्क शंभर कोटी लोकांचा बळी घेतलेला असेल.

अर्थात, केवळ धूम्रपान करणारेच तंबाखूचे बळी ठरतात असे नाही. तर त्यांच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा याचा भावनिक व आर्थिक तडाखा बसतो. तसेच, धूम्रपान करणाऱ्यांचा धूर श्वासावाटे आत घेतल्यामुळे प्रत्यक्षात धूम्रपान न करणारे सहा लाख लोक दरवर्षी दगावतात. याशिवाय, धूम्रपानामुळे होणाऱ्या रोगांवरील वाढत्या खर्चाचा फटका सर्वांनाच बसतो.

एखाद्या रोगाची साथ सुरू होते, तेव्हा उपाय शोधण्यासाठी डॉक्टर्स लगेच कामाला लागतात. पण धूम्रपान अशा एका साथीच्या रोगासारखा आहे ज्यावर उपाय शोधण्याची गरज नाही. तो उपलब्ध आहे आणि सर्वांना माहीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालिका, डॉ. मार्गरेट चॅन यांनी म्हटले: “तंबाखूची साथ ही सर्वस्वी मानव-निर्मित आहे. त्यामुळे सरकारने व समाजाने अथक प्रयत्न केले तर ती आटोक्यात येऊ शकते.”

ही आरोग्य समस्या आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. उदाहरणार्थ, ऑगस्ट २०१२ मध्ये जवळजवळ १७५ देशांनी तंबाखूच्या वापरावर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे मंजूर केले. * पण, काही शक्तिशाली घटकांमुळे साथीचा हा रोग अजूनही फोफावत आहे. जसे की, दरवर्षी सिगारेट व तंबाखू-कंपन्या नवनवीन ग्राहकांना, खासकरून विकसनशील देशांत राहणाऱ्या स्त्रियांना व तरुणांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. धूम्रपानाच्या आहारी गेलेल्या शंभर कोटी लोकांपैकी बरेच जण या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडण्याची दाट शक्यता आहे. धूम्रपान करणारे वेळीच सावध झाले नाहीत, तर पुढील चार दशकांत बळींची संख्या झपाट्याने वाढेल.

अनेकांना या वाईट सवयीतून मुक्त होण्याची इच्छा असते. पण, जाहिरातींच्या भडीमारामुळे व तंबाखूच्या व्यसनामुळे ते त्यात अडकून राहतात. नाओको नावाच्या एका स्त्रीचा अनुभव विचारात घ्या. किशोरवयात असताना ती धूम्रपान करू लागली. धूम्रपानाच्या जाहिरातींत जे दाखवले जायचे त्याची नक्कल केल्यामुळे आपण किती प्रतिष्ठित आहोत असे तिला वाटायचे. तिचे आईवडील फुप्फुसाच्या कर्करोगामुळे दगावले होते; तरीही ती धूम्रपान करतच राहिली. शिवाय, तिच्यावर दोन मुलींचे संगोपन करण्याची जबाबदारीही होती. ती म्हणते: “मला फुप्फुसाचा कर्करोग होण्याची फार भीती वाटायची; त्यात माझ्या मुलींच्या आरोग्याचीही मला चिंता होती. पण काही केल्या मला ती सवय मोडता येत नव्हती. मला तर वाटलं मी आयुष्यात कधीच धूम्रपान करण्याचं सोडू शकणार नाही.”

पण, नाओको धूम्रपानाची सवय मोडू शकली. आज लक्षावधी लोकांना तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ज्यामुळे मदत मिळाली तीच मदत तिलाही मिळाली. तिला ही मदत कोठून मिळाली? याचे उत्तर पाहण्यासाठी पुढील लेख वाचा. (w14-E 06/01)

^ परि. 11 यात धूम्रपानाच्या धोक्यांसंबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तंबाखू-कंपन्यांच्या जाहिरातींवर बंदी घालणे, तंबाखूवरील कर वाढवणे आणि व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवणे या गोष्टी समाविष्ट आहेत.