व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तू आपला देव यहोवा याच्यावर प्रेम कर

तू आपला देव यहोवा याच्यावर प्रेम कर

“तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.”—मत्त. २२:३७.

१. देव आणि त्याच्या पुत्राचे एकमेकांवरचे प्रेम कशामुळे वाढले?

यहोवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने असे म्हटले: “मी पित्यावर प्रीती करतो.” (योहा. १४:३१) तसेच त्याने असेदेखील म्हटले की “पिता पुत्रावर प्रीती करतो.” (योहा. ५:२०) हे ऐकून आपल्याला नवल वाटत नाही, कारण पृथ्वीवर येण्याआधी येशू बराच काळ देवाचा “कुशल कारागीर” होता. (नीति. ८:३०) यहोवासोबत काम केल्यामुळे येशूला त्याच्या पित्याच्या गुणांबद्दल खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळे पित्यावर प्रेम करण्याची बरीच कारणे त्याच्याजवळ होती. खरेतर एकमेकांच्या निकट सहवासामुळेच त्यांच्यातील प्रेम वाढत गेले.

२. (क) प्रेमामुळे आपल्या मनात कोणती भावना निर्माण होते? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

एखाद्या व्यक्तीवर आपले प्रेम असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अतिशय जिव्हाळ्याची भावना असते. स्तोत्रकर्ता दावीद याने यहोवाबद्दल असलेली जिव्हाळ्याची भावना व्यक्त करत असे म्हटले: “हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.” (स्तो. १८:१) आपल्यालाही देवाबद्दल असेच वाटले पाहिजे. आपण जर यहोवाच्या आज्ञा पाळल्या तर तो आपल्यावर असलेले त्याचे प्रेम व्यक्त करेल. (अनुवाद ७:१२, १३ वाचा.) पण आपण देवाला पाहू शकत नाही, तर मग त्याच्यावर प्रेम करणे शक्य आहे का? यहोवावर प्रेम करण्याचा काय अर्थ होतो? आपण त्याच्यावर प्रेम का केले पाहिजे? आणि देवावरील आपले प्रेम आपण कसे दाखवू शकतो?

 आपण देवावर प्रेम का करू शकतो?

३, ४. यहोवावर प्रेम करणे आपल्यासाठी शक्य का आहे?

“देव आत्मा आहे,” त्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. (योहा. ४:२४) असे असले तरी, आपण यहोवावर प्रेम करू शकतो आणि हे प्रेम व्यक्त करण्याची आज्ञा बायबलमध्ये देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोशेने इस्राएली लोकांना असे म्हटले: “तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.”—अनु. ६:५.

आपण देवावर मनापासून प्रेम का करू शकतो? कारण त्याने आपल्याला त्याची उपासना करण्याच्या इच्छेसह व प्रेम दाखवण्याच्या क्षमतेसह निर्माण केले आहे. आपण यहोवा देवाबद्दल ज्ञान घेतो तेव्हा त्याच्यावरचे आपले प्रेम वाढते आणि आपल्याला आनंदी राहण्याचे कारणही मिळते. येशूने असे म्हटले: “ज्यांना आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव आहे ते आनंदी आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्त. ५:३, NW) मानवांत असलेल्या उपासना करण्याच्या उपजत भावनेविषयी असे म्हटले जाते: “जगभरातील लोक सर्वसमर्थ देवाचा शोध घेतात व त्याची उपासना करतात हे पाहून आपण आश्चर्यचकित होतो व आपल्यात आदरयुक्त भय निर्माण होते.”—मॅन डझ नॉट स्टँड अलोन, ए. सि. मॉरिसन यांच्याद्वारे लिखित.

५. देवाचा शोध घेणे व्यर्थ नाही असे आपण का म्हणू शकतो?

देवाचा शोध घेणे व्यर्थ आहे का? मुळीच नाही, देवाची इच्छा आहे की आपण त्याचा शोध घ्यावा. अरीयपगात जमलेल्या लोकसमुदायाला प्रचार करताना प्रेषित पौलाने हीच गोष्ट स्पष्ट केली. अरीयपगातून पार्थेनॉन हे मंदिर दिसायचे. हे मंदिर प्राचीन काळातील अथेन्सची खास देवी, अथीना हिचे होते. अशी कल्पना करा की तुम्ही तेथे उपस्थित आहात आणि पौल जमावाला असे सांगतो, की “ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो . . . हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही.” तो पुढे असे म्हणतो की देवाने “एकापासून माणसांची सर्व राषट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत; अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रे. कृत्ये १७:२४-२७) यावरून स्पष्ट होते की लोक देवाला शोधू शकतात. ७५ लाखांहून अधिक यहोवाच्या साक्षीदारांनी त्याचा शोध घेतला आहे आणि ते त्याच्यावर मनापासून प्रेम करतात.

देवावर प्रेम करण्याचा काय अर्थ होतो?

६. येशूने कोणत्या आज्ञेला सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा असे म्हटले?

आपण मनापासून यहोवावर प्रेम केले पाहिजे. हीच गोष्ट येशूने स्पष्ट केली. जेव्हा एका परूश्याने येशूला विचारले की “गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.” येशूनुसार हीच आज्ञा सर्वात मोठी व पहिली आहे.—मत्त. २२:३४-३८.

७. देवावर (क) “संपूर्ण अंतःकरणाने” (ख) “संपूर्ण जिवाने” (ग) “संपूर्ण मनाने,” प्रेम करण्याचा काय अर्थ होतो?

आपण देवावर “पूर्ण अंतःकरणाने” प्रेम केले पाहिजे असे जे येशूने म्हटले त्याचा अर्थ काय होतो? त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की आपण यहोवावर आपल्या संपूर्ण अंतःकरणापासून, ज्यात आपल्या इच्छा व भावना यांचा समावेश होतो, प्रेम केले पाहिजे. आपण यहोवावर आपल्या “संपूर्ण जिवाने” प्रेम केले पाहिजे म्हणजेच आपले संपूर्ण जीवन त्याच्यासाठी समर्पित असले पाहिजे. त्यासोबतच, आपण देवावर आपल्या “संपूर्ण मनाने” म्हणजेच आपल्या संपूर्ण बुद्धीने प्रेम केले पाहिजे. वरील गोष्टींवरून हे स्पष्ट होते की आपण यहोवावर कोणत्याही अटीविना प्रेम केले पाहिजे.

८. देवावर खरे प्रेम केल्यामुळे आपण काय करण्यास प्रवृत्त होऊ?

यहोवावर पूर्ण अंतःकरणाने, जिवाने, आणि मनाने प्रेम असल्यास आपण पुढील गोष्टी करू. आपण देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करू, त्याच्या उद्देशानुरूप कार्य करण्यास झटू आणि आवेशाने लोकांना त्याच्या राज्याची सुवार्ता सांगू. (मत्त. २४:१४; रोम. १२:१, २) यहोवावर खरे प्रेम असल्यामुळे त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध आणखी घनिष्ठ होईल. (याको. ४:८) हे खरे आहे की, देवावर प्रेम करण्याच्या सर्वच कारणांवर आपण या लेखात चर्चा करू शकत नाही. तरी, त्यांतील काही कारणे कोणती आहेत ते आता आपण पाहू या.

 आपण यहोवावर प्रेम का केले पाहिजे?

९. तुम्ही यहोवावर प्रेम का करता?

यहोवा आपला निर्माणकर्ता आणि आपल्याला सर्व चांगल्या गोष्टी पुरवणारा आहे. पौलाने असे म्हटले: “आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो.” (प्रे. कृत्ये १७:२८) यहोवाने आपल्याला राहण्यासाठी एक सुंदर घर म्हणजेच पृथ्वी दिली आहे. (स्तो. ११५:१६) तो आपल्याला अन्न आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टीदेखील पुरवतो. यामुळेच पौलाने लुस्त्र येथील मूर्तिपूजक लोकांना असे म्हटले की जिवंत देवाने “स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.” (प्रे. कृत्ये १४:१५-१७) आपल्या महान निर्माणकर्त्यावर आणि प्रेमळपणे आपल्याला चांगल्या गोष्टी पुरवणाऱ्यावर प्रेम करण्याचे हे एक कारण नाही का?—उप. १२:१.

१०. पाप व मृत्यू काढून टाकण्यासाठी देवाने जी तरतूद केली आहे त्याबद्दल आपल्या मनात कोणती भावना असली पाहिजे?

१० आदामापासून वारशाने मिळालेले पाप व मृत्यू काढून टाकण्याची तरतूद यहोवाने आपल्यासाठी केली आहे. (रोम. ५:१२) खरेच, “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोम. ५:८) आपण जर पश्‍चात्ताप केला आणि येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवला तर आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळेल. यहोवाने आपल्यासाठी हे शक्य केले आहे आणि त्यामुळे त्याच्याप्रती आपल्या मनात गहिरे प्रेम निर्माण होते.—योहा. ३:१६.

११, १२. यहोवाने कोणत्या मार्गांनी आपल्याला आशा दिली आहे?

११ यहोवाने आपल्याला आशा दिली आहे ज्यामुळे आपले मन आनंदाने आणि शांतीने भरून जाते. (रोम. १५:१३) आपल्या विश्वासाची परीक्षा होते तेव्हा देवाने दिलेल्या आशेमुळे आपल्याला ती धीराने सहन करण्यास मदत मिळते. अभिषिक्त लोक जर मरेपर्यंत विश्वासू राहिले तर त्यांना स्वर्गात जीवनाचा मुकुट देण्यात येईल. (प्रकटी. २:१०) पृथ्वीवर जगण्याची आशा असणारे देवाचे एकनिष्ठ सेवक नंदनवनात असंख्य आशीर्वादांचा आनंद लुटतील. (लूक २३:४३) अशा सुंदर भविष्याच्या आशेबद्दल आपल्याला कसे वाटते? नक्कीच आपल्या मनात आनंद, शांती आणि “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणाऱ्याबद्दल प्रेम या भावना येतात.—याको. १:१७.

१२ देवाने आपल्याला पुनरुत्थानाची दिलासादायक आशा दिली आहे. (प्रे. कृत्ये २४:१५) आपली प्रिय व्यक्ती मरण पावते तेव्हा आपल्याला खूप दुःख होते. पण पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपण जगातील आशा नसलेल्या लोकांप्रमाणे दुःख व्यक्त करत नाही. (१ थेस्सलनी. ४:१३) यहोवा देवाचे मानवजातीवर प्रेम असल्यामुळे त्याला मरण पावलेल्या लोकांचे पुनरुत्थान करण्याची उत्कंठा लागली आहे, खासकरून प्रामाणिक ईयोबासारख्या विश्वासू लोकांचे. (ईयो. १४:१५) पुनरुत्थान झालेले लोक या पृथ्वीवर त्यांच्या प्रियजनांना भेटतील तो क्षण किती आनंदाचा असेल याची कल्पना करा. पुनरुत्थानाची अद्भुत आशा देणाऱ्या प्रेमळ यहोवा देवाप्रती आपले मन प्रेमाने भरून येते!

१३. देव आपली काळजी घेतो याचे कोणते पुरावे आपल्याजवळ आहेत?

१३ यहोवा खरोखर आपली काळजी घेतो. (स्तोत्र ३४:६, १८, १९; १ पेत्र ५:६, ७ वाचा.) आपला प्रेमळ देव त्याच्या विश्वासू सेवकांची मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो हे माहीत असल्यामुळे त्याच्या “कुरणातली मेंढरे” या नात्याने आपल्याला सुरक्षित वाटते. (स्तो. ७९:१३) त्यासोबतच मशीही राज्याद्वारे यहोवा आपल्यासाठी जी कार्ये करणार आहे त्यांवरूनही देवाचे प्रेम ठळकपणे दिसून येईल. देवाचा नियुक्त राजा, येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवरून हिंसा, जुलूम आणि दुष्टाई यांना पूर्णपणे काढून टाकेल तेव्हा आज्ञाधारक मानवजात कधीही न संपणारी शांती अनुभवतील आणि त्यांना अनेक आशीर्वाद मिळतील. (स्तो. ७२:७, १२-१४, १६) आपली काळजी घेणाऱ्या देवावर पूर्ण अंतःकरणाने, जिवाने आणि मनाने प्रेम करण्याचे हे एक कारण नाही का?—लूक १०:२७.

१४. देवाने आपल्याला कोणता अमूल्य बहुमान दिला आहे?

१४ यहोवाचे साक्षीदार या नात्याने त्याची सेवा करण्याचा अमूल्य बहुमान त्याने आपल्याला दिला आहे. (यश. ४३:१०-१२) आपण देवावर प्रेम करतो कारण त्याने सर्वोच्च राजा या नात्याने त्याचे समर्थन करण्याचा आणि या त्रस्त जगात लोकांना खरी आशा देण्याचा सुहक्क आपल्याला दिला आहे. त्यासोबतच, आपण लोकांना  खऱ्या देवाच्या वचनावर आधारित सुवार्ता सांगतो. देवाची आशादायक अभिवचने कधीच विफल ठरत नाहीत. यामुळे आपण विश्वासाने व खात्रीने लोकांना संदेश सांगतो. (यहोशवा २१:४५; २३:१४ वाचा.) अर्थात, यहोवाकडून मिळणारे आशीर्वाद आणि त्याच्यावर प्रेम करण्याची कारणे असंख्य आहेत. पण, त्याच्यावरचे आपले प्रेम आपण कसे व्यक्त करू शकतो?

देवावरचे आपले प्रेम आपण कसे व्यक्त करू शकतो?

१५. बायबलचा अभ्यास व शिकलेल्या गोष्टी लागू केल्यामुळे आपल्याला कशी मदत होते?

१५ देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करा व शिकलेल्या गोष्टी लागू करा. असे करण्याद्वारे आपण दाखवतो की आपले यहोवावर प्रेम आहे व त्याचे वचन आपल्या पावलांकरता दिवा बनावे अशी आपली मनस्वी इच्छा आहे. (स्तो. ११९:१०५) आपण जर एखाद्या समस्येतून जात असू तर पुढील प्रेमळ अभिवचनांतून आपण सांत्वन मिळवू शकतो: “हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” “हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.” (स्तो. ५१:१७; ९४:१८, १९) दुःखाचा सामना करणाऱ्यांना यहोवा दया दाखवतो आणि येशूलादेखील अशांप्रती कळवळा वाटतो. (यश. ४९:१३; मत्त. १५:३२) बायबलचा अभ्यास केल्यामुळे यहोवाची प्रेमळ काळजी आपण जवळून अनुभवतो आणि त्यामुळे त्याच्यावरचे आपले प्रेम आणखी गहिरे होते.

१६. नियमितपणे प्रार्थना केल्यामुळे देवावरचे आपले प्रेम कसे वाढते?

१६ देवाला नियमितपणे प्रार्थना करा. प्रार्थना केल्यामुळे आपल्याला देवाच्या आणखी जवळ जाण्यास मदत मिळते कारण तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. (स्तो. ६५:२) देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर देत आहे हे जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा त्याच्यावरचे आपले प्रेम आणखी वाढते. उदाहरणार्थ, आपण अनुभवले असेल की आपल्या शक्तीपलीकडे असलेली कोणतीही समस्या तो आपल्यावर येऊ देत नाही. (१ करिंथ. १०:१३) आपल्या मनात काही चिंता असल्यास आपण जर यहोवाला कळकळीने विनवणी केली तर आपण “देवाने दिलेली शांती” अनुभवतो ज्याची तुलना कशासोबतही करता येत नाही. (फिलिप्पै. ४:६, ७) कधीकधी आपण नहेम्यासारखी मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना करू आणि तो त्याचे उत्तर देत आहे असे आपल्याला दिसून येईल. (नहे. २:१-६) “प्रार्थनेत तत्पर” राहिल्यामुळे आणि यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देत आहे याची जाणीव बाळगल्यामुळे त्याच्यावरचे आपले प्रेम वाढते. शिवाय, भविष्यात विश्वासाची परीक्षा झाल्यास तो  आपली मदत नक्की करेल याची खात्री आपल्याला मिळते.—रोम. १२:१२.

१७. देवावर प्रेम असल्यामुळे सभांना उपस्थित राहण्याबद्दल आपण कोणता दृष्टिकोन बाळगू?

१७ ख्रिस्ती सभांना, संमेलनांना आणि अधिवेशनांना नियमितपणे उपस्थित राहा. (इब्री १०:२४, २५) यहोवाबद्दल आदरयुक्त भय बाळगता यावे आणि त्याचे नियम पाळता यावेत म्हणून इस्राएली लोक त्याच्याबद्दल शिकण्यासाठी एकत्र जमायचे. (अनु. ३१:१२) आपले जर देवावर मनापासून प्रेम असेल तर त्याच्या इच्छेनुसार कार्य करणे आपल्याला ओझे वाटणार नाही. (१ योहान ५:३ वाचा.) त्यामुळे कोणत्याही गोष्टीला सभांच्या आड येऊ देऊ नका. यहोवावरचे आपले प्रेम कमी व्हावे अशी आपली मुळीच इच्छा नाही.—प्रकटी. २:४.

१८. सुवार्तेच्या संदर्भात देवावरील आपले प्रेम आपल्याला काय करण्यास प्रवृत्त करते?

१८ इतरांना “सुवार्तेचे सत्य” आवेशाने सांगा. (गलती. २:५) देवावर आपले प्रेम असल्यामुळे त्याच्या पुत्राच्या मशीही राज्याबद्दल इतरांना सांगण्यास आपण प्रवृत्त होतो. देवाचा हा पुत्र हर्मगिदोनाच्या वेळी सत्याच्या “प्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी” करेल. (स्तो. ४५:४; प्रकटी. १६:१४, १६) देवाच्या प्रेमाबद्दल आणि वचन दिलेल्या नवीन जगाबद्दल शिकण्यास लोकांना मदत करून शिष्य बनवणे किती आनंददायी काम आहे!—मत्त. २८:१९, २०.

१९. मंडळीची काळजी घेण्यासाठी यहोवाने केलेल्या तरतुदीबद्दल आपण कदर का बाळगली पाहिजे?

१९ मंडळीची काळजी घेण्यासाठी यहोवाने जी तरतूद केली आहे तिची कदर करा. (प्रे. कृत्ये २०:२८) यहोवाने आपल्याला मंडळीत ख्रिस्ती वडील दिले आहेत जे नेहमी आपल्या भल्याचा विचार करतात. ख्रिस्ती वडिलांविषयी बायबल असे म्हणते की ते “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा” असे आहेत. तसेच ते “रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया” असे आहेत. (यश. ३२:१, २) वादळात किंवा मुसळधार पावसात आपल्याला एखादा आसरा सापडतो तेव्हा त्याचे मोल किती जास्त असते! रखरखीत उन्हात एखाद्या विशाल खडकाची छाया मिळाल्यास आपल्याला किती हायसे वाटते! या भाषा अलंकारांवरून हे दिसून येते की ख्रिस्ती वडील आपल्याला लागणारी आध्यात्मिक मदत आणि तजेला पुरवतात. मंडळीत जे पुढाकार घेतात त्यांच्या अधीन राहण्याद्वारे आपण दाखवतो की यहोवाने वडिलांच्या रूपात आपल्याला जी देणगी दिली आहे तिची आपण खूप कदर करतो. तसेच याद्वारे आपण यहोवा आणि मंडळीचा मस्तक ख्रिस्त यांवरचे आपले प्रेमदेखील व्यक्त करतो.—इफिस. ४:८; ५:२३; इब्री १३:१७.

यहोवाने कळपाबद्दल मनापासून आस्था दाखवणारे ख्रिस्ती वडील दिले आहेत (परिच्छेद १९ पाहा)

देवावरील आपले प्रेम आणखी वाढवत राहा

२०. आपले जर देवावर प्रेम असेल तर याकोब १:२२-२५ या वचनांत दिलेल्या सल्ल्यानुसार आपण काय करू?

२० यहोवासोबत आपला जर प्रेमळ नातेसंबंध असेल तर आपण त्याच्या वचनाचे फक्त ऐकणारेच नाही तर ते पाळणारेदेखील बनू. (याकोब १:२२-२५ वाचा.) आज्ञा पाळणाऱ्या व्यक्तीला देवावर विश्वास असतो ज्यामुळे ती आवेशाने सेवाकार्यात आणि ख्रिस्ती सभांमध्ये सहभाग घेते. आपले यहोवावर प्रेम असल्यास आपण त्याच्या परिपूर्ण नियमांचे पालन करू ज्यांत, तो आपल्याकडून अपेक्षा करत असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश होतो.—स्तो. १९:७-११.

२१. मनापासून केलेल्या प्रार्थनेची तुलना कशाशी केली जाऊ शकते?

२१ यहोवा देवावर प्रेम असल्यामुळे आपण वारंवार त्याला प्रार्थना करण्यास प्रवृत्त होऊ. मोशेच्या नियमशास्त्रात धूप जाळण्याविषयी जी आज्ञा दिली होती, तिचा संदर्भ घेऊन स्तोत्रकर्ता दाविदाने असे म्हटले: “माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे, सादर होवो.” (स्तो. १४१:२; निर्ग. ३०:७, ८) आपण नम्रपणे, मनापासून आणि कृतज्ञतेने प्रार्थना केल्यास, आपल्या प्रार्थना सुगंधित धूपाप्रमाणे यहोवाला स्वीकारयोग्य ठरतील.—प्रकटी. ५:८.

२२. पुढील लेखात आपण कोणत्या प्रकारच्या प्रेमाबद्दल चर्चा करणार आहोत?

२२ येशूने म्हटले की आपण देवावर व आपल्या शेजाऱ्यावर प्रेम केले पाहिजे. (मत्त. २२:३७-३९) पुढील लेखात आपण प्रेम या गुणाबद्दल आणखी चर्चा करू या. त्यात आपण पाहू या की यहोवावर व त्याच्या तत्त्वांवर प्रेम असल्यामुळे आपल्याला इतरांसोबत चांगले संबंध ठेवण्यास आणि शेजाऱ्यावर प्रेम करण्यास कशी मदत मिळते.