व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्या खऱ्या उपासकांना ओळखतो

यहोवा आपल्या खऱ्या उपासकांना ओळखतो

“जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.” —१ करिंथ. ८:३.

१. देवाच्या लोकांपैकी काहींनी कशा प्रकारे स्वतःची फसवणूक केली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

सकाळची वेळ आहे. यहोवाच्या दर्शनमंडपाजवळ मुख्य याजक अहरोन हातात धूप जाळण्याचे पात्र घेऊन उभा आहे. जवळच कोरह आणि त्याच्यासोबत २५० माणसेदेखील उभी आहेत. त्यांच्याही प्रत्येकाच्या हातात धूप जाळण्याचे पात्र आहे आणि तेसुद्धा यहोवासमोर धूप जाळत आहेत. (गण. १६:१६-१८) वरवर पाहिल्यास, हे सर्वच जण यहोवाचे एकनिष्ठ उपासक आहेत असे कोणालाही वाटले असते. पण अहरोनाला सोडल्यास इतर सर्व जण खरेतर गर्विष्ठ व बंडखोर इस्राएली होते, जे यहोवाने नेमलेल्या याजकाचा अधिकार बळकावण्याचा प्रयत्न करत होते. (गण. १६:१-११) देव आपली उपासना स्वीकारेल असा विचार करून ते स्वतःची फसवणूक करत होते. पण, यहोवा हृदय पारखणारा देव आहे आणि त्यांचा ढोंगीपणा त्याच्यापासून लपू शकत नव्हता. खरेतर, यहोवा आपली उपासना स्वीकारेल अशी त्यांनी अपेक्षा करणे हे त्याचा अपमान करण्यासारखे होते.—यिर्म. १७:१०.

२. मोशेने काय भाकीत केले होते, आणि त्याचे शब्द खरे ठरले का?

आदल्या दिवशी मोशेने असे भाकीत केले होते: “परमेश्वराचे कोण . . . हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवेल.” (गण. १६:५) आणि अगदी तसेच घडले. “परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने [कोरह आणि] त्या धूप जाळणाऱ्या दोनशे पन्नास  पुरुषांना भस्म केले.” अशा रीतीने, यहोवाने त्याचे खरे उपासक आणि जे त्याची उपासना करण्याचा केवळ दिखावा करत होते त्यांच्यातील फरक सर्वांसमोर स्पष्ट केला. (गण. १६:३५; २६:१०) पण, यहोवापासून आलेल्या अग्नीत अहरोनाचा नाश झाला नाही. यावरून हे दिसून आले की अहरोन हा यहोवाने नेमलेला याजक होता आणि तो मनापासून त्याची उपासना करत होता.—१ करिंथकर ८:३ वाचा.

३. (क) प्रेषित पौलाच्या काळात कोणती परिस्थिती निर्माण झाली होती? (ख) धर्मत्यागी लोकांशी यहोवा कशा प्रकारे व्यवहार करतो हे त्याने अनेक शतकांपूर्वी कसे दाखवले?

या घटनेच्या सुमारे १,५०० वर्षांनंतर, प्रेषित पौलाच्या काळातही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या काहींनी खोट्या शिकवणींचा स्वीकार केला होता. असे असूनसुद्धा ते ख्रिस्ती मंडळीसोबत सहवास करत होते. वरवर पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जरी हे धर्मत्यागी लोक मंडळीतील इतरांसारखेच वाटत असले, तरी विश्वासू ख्रिश्चनांना त्यांच्यापासून धोका होता. कारण मेंढरांच्या वेषातील हे लांडगे “कित्येकांच्या विश्वासाचा नाश” करू लागले होते. (२ तीम. २:१६-१८) पण, यहोवा त्याच्या उपासकांकडे केवळ वरवर पाहत नाही. ज्याप्रमाणे त्याने कित्येक शतकांपूर्वी कोरह आणि त्याच्या साथीदारांना शिक्षा केली होती त्याचप्रमाणे तो ख्रिस्ती मंडळीतील या धर्मत्यागी लोकांचाही न्याय करेल याची पौलाला खात्री होती. यासंदर्भात, पौलाने पुढे जे लिहिले त्याचे आता आपण परीक्षण करू या आणि या अर्थपूर्ण उताऱ्यावरून आपल्याला काय शिकायला मिळते यावर विचार करू या.

यहोवा कधीही बदलत नाही

४. पौलाला कशाविषयी खात्री होती, आणि तीमथ्याला लिहिलेल्या पत्रात त्याने हा भरवसा कशा प्रकारे व्यक्त केला?

जे लोक यहोवाची उपासना करण्याचा केवळ दिखावा करतात त्यांचा ढोंगीपणा त्याच्या नजरेतून सुटत नाही हे पौलाला चांगले ठाऊक होते. दुसरीकडे पाहता, जे मनापासून यहोवाच्या आज्ञा पाळतात त्यांना तो ओळखतो, याचीही पौलाला खात्री होती. देवाच्या प्रेरणेने तीमथ्याला पत्र लिहिताना पौलाने काही खास शब्दांचा वापर करून हा भरवसा व्यक्त केला. धर्मत्यागी लोक मंडळीतील काही जणांना कशा प्रकारे विश्वासापासून बहकवत आहेत याविषयी सांगितल्यानंतर पौलाने लिहिले: “तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे ‘प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,’ आणि ‘जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.’”—२ तीम. २:१८, १९.

५, ६. “देवाने घातलेला स्थिर पाया” या वाक्यांशाद्वारे पौल काय सांगू इच्छित होता, आणि पौलाने वापरलेल्या शब्दांचा तीमथ्यावर कसा परिणाम झाला असावा?

या वचनांत पौलाने जे विशिष्ट शब्द निवडले त्यांतून तो काय सांगू इच्छित होता? “देवाने घातलेला स्थिर पाया” असा वाक्यांश बायबलमध्ये फक्त या एकाच ठिकाणी आढळतो. तसे पाहिल्यास, बायबलमध्ये “पाया” हा शब्द अनेक गोष्टींच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. उदाहरणार्थ, प्राचीन इस्राएलची राजधानी असलेल्या जेरूसलेम शहराला “परमेश्वराचे अधिष्ठान” म्हणजेच पाया असे म्हणण्यात आले आहे. (स्तो. ८७:१, २) तसेच, यहोवाच्या उद्देशात येशूची जी भूमिका आहे तिचे वर्णन करण्यासाठीही पाया हा शब्द वापरण्यात आला आहे. (१ करिंथ. ३:११; १ पेत्र २:६) पण, “देवाने घातलेला स्थिर पाया” असे तीमथ्याला लिहिताना पौलाच्या मनात नेमके काय होते?

“देवाने घातलेला स्थिर पाया” असा उल्लेख केल्यानंतर त्याच वचनात पौलाने कोरह व त्याच्या साथीदारांबद्दल गणना १६:५ येथे नमूद असलेले मोशेचे शब्द उद्धृत केले. पौलाने तीमथ्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोशेच्या काळात घडलेल्या घटनांविषयी सांगितले. तो तीमथ्याला याची आठवण करून देऊ इच्छित होता, की मंडळीत केली जाणारी धर्मत्यागी कृत्ये यहोवाच्या नजरेतून सुटत नाहीत आणि अशी कृत्ये करणाऱ्यांपासून मंडळीचे संरक्षण करण्यास तो समर्थ आहे. अनेक शतकांपूर्वी ज्या प्रकारे यहोवाने कोरहचे प्रयत्न हाणून पाडले होते, त्याच प्रकारे आताही तो धर्मत्यागी लोकांच्या प्रयत्नांमुळे आपला उद्देश नक्कीच विफल होऊ देणार नाही. “देवाने घातलेला स्थिर पाया” नेमके कशास सूचित करतो यावर पौलाने प्रकाश टाकला नाही. तरीसुद्धा, त्याने वापरलेल्या या शब्दांमुळे तीमथ्याला यहोवाच्या गतकाळातील व्यवहाराची आठवण होऊन यहोवावरील त्याचा भरवसा व विश्वास दृढ झाला असेल.

७. यहोवा नीतीने व विश्वासूपणे कार्य करेल अशी खात्री आपण का बाळगू शकतो?

यहोवाची नीतिमान तत्त्वे अढळ आहेत. स्तोत्र ३३:११ म्हणते, “परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्या न्‌ पिढ्या कायम राहतात.” इतर  वचनांत यहोवाचे राज्य, दया, नीतिमत्त्व आणि सत्य या गोष्टी कायम टिकून राहतील असे म्हटले आहे. (निर्ग. १५:१८; स्तो. १०६:१; ११२:९; ११७:२) मलाखी ३:६ (पं.र.भा.) यात असे म्हटले आहे: “मी यहोवा आहे, मी पालटत नाही.” त्याच प्रकारे, याकोब १:१७ (सुबोधभाषांतर) यात सांगितले आहे की यहोवा “जागा बदलणाऱ्या छायेसारखा बदलणार नाही.”

यहोवावरील विश्वास दृढ करणारा “शिक्का”

८, ९. पौलाने ज्या ‘शिक्क्याचा’ उल्लेख केला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

दुसरे तीमथ्य २:१९ यात पौलाने जे लिहिले त्यावरून आपल्या मनात एखाद्या इमारतीच्या पायाचे चित्र उभे राहते, ज्यावर शिक्का मारून काही माहिती लिहिण्यात आली आहे. प्राचीन काळात, बऱ्याचदा इमारतीच्या पायावर ती इमारत कोणी बांधली किंवा ती कोणाच्या मालकीची आहे असा मजकूर लिहिलेला असायचा. बायबलमध्ये हे विशिष्ट उदाहरण वापरणारा पौल पहिलाच लेखक होता. * देवाने घातलेल्या स्थिर पायावर जो शिक्का मारण्यात आला आहे त्यात दोन गोष्टींचा उल्लेख आहे. पहिली म्हणजे, यहोवा “आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि दुसरी म्हणजे, “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.” यावरून आपल्याला गणना १६:५ (वाचा.) यात जे सांगितले आहे त्याची आठवण होते.

पौलाने ज्या ‘शिक्क्याचा’ उल्लेख केला त्यावरून आपण काय शिकू शकतो? जे देवाचे खरे उपासक आहेत त्यांच्याकरता यहोवाच्या सर्व गुणांचे व तत्त्वांचे सार या दोन महत्त्वाच्या सत्यांत व्यक्त करता येते: (१) जे यहोवाला एकनिष्ठ राहतात त्यांच्यावर तो प्रेम करतो, आणि (२) यहोवाला अनीतीचा वीट आहे. तर मग, मंडळीतील धर्मत्यागाविषयी बोलताना या दोन गोष्टी आठवणीत ठेवणे इतके महत्त्वाचे का आहे?

१०. पौलाच्या काळातील धर्मत्यागी लोकांच्या कृत्यांमुळे विश्वासू बांधवांवर कोणता परिणाम झाला असावा?

१० धर्मत्यागी लोकांच्या वाईट कृत्यांमुळे तीमथ्य व इतर विश्वासू बांधव कदाचित अस्वस्थ झाले असतील. मंडळीत अशा लोकांना का खपवून घेतले जात आहे असा प्रश्न काही बांधवांनी उपस्थित केला असेल. विश्वासूपणे सेवा करत असलेल्यांच्या मनात कदाचित अशी शंका निर्माण झाली असेल, की आपल्या एकनिष्ठ उपासनेची यहोवा खरोखरच कदर करतो का? आणि धर्मत्यागी लोकांचा ढोंगीपणा तो खरेच पाहत आहे का?—प्रे. कृत्ये २०:२९, ३०.

धर्मत्यागी लोकांच्या प्रभावाला तीमथ्य नक्कीच बळी पडला नसेल (परिच्छेद १०-१२ पाहा)

११, १२. पौलाच्या पत्रामुळे तीमथ्याला कोणती खात्री मिळाली?

११ पौलाच्या पत्रामुळे नक्कीच तीमथ्याचा विश्वास दृढ झाला असेल. कारण पौलाने त्याला याची आठवण करून दिली की प्राचीन काळी विश्वासूपणे सेवा करणाऱ्या अहरोनाबद्दल यहोवाने सर्वांसमक्ष आपली संमती व्यक्त केली होती; तसेच, कोरह व त्याच्या साथीदारांचा ढोंगीपणा त्याने उघडकीस आणून त्यांचा नाश केला होता. दुसऱ्या शब्दांत पौल असे सांगू इच्छित होता की मंडळीत जरी काही ढोंगी ख्रिस्ती असले, तरीसुद्धा मोशेच्या काळाप्रमाणेच आताही जे यहोवाचे खरे उपासक आहेत त्यांना तो  ओळखतो आणि तो नक्कीच त्यांच्याबद्दल आपली पसंती दर्शवेल.

१२ यहोवा कधीही बदलत नाही; आपण त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. त्याला अनीतीचा वीट आहे. त्यामुळे, जे वाईट कृत्ये करतात आणि त्यांबद्दल पश्‍चात्ताप करत नाहीत अशांना तो योग्य वेळी शिक्षा ही देतोच. तसेच, पौलाने तीमथ्याला याचीही आठवण करून दिली, की त्याने यहोवाचा खरा उपासक या नात्याने ढोंगी ख्रिश्चनांच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्याची काळजी घेतली पाहिजे. *

मनापासून केलेली उपासना कधीही व्यर्थ ठरत नाही

१३. आपण कोणती खात्री बाळगू शकतो?

१३ पौलाच्या देवप्रेरित शब्दांतून आपलाही विश्वास दृढ होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या एकनिष्ठ उपासनेची यहोवा दखल घेतो हे जाणून आपल्याला दिलासा मिळतो. आणि यहोवा नुसतीच दखल घेत नाही; तर, त्याच्या खऱ्या उपासकांबद्दल त्याला मनापासून कळकळ आहे. बायबल सांगते: “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.” (२ इति. १६:९) त्यामुळे, आपण शुद्ध अंतःकरणाने यहोवासाठी जे काही करतो ते कधीही व्यर्थ जाणार नाही याची पूर्ण खात्री आपण बाळगू शकतो.—१ तीम. १:५; १ करिंथ. १५:५८.

१४. यहोवा कशा प्रकारची उपासना खपवून घेत नाही?

१४ तसेच, ढोंगीपणाने केलेली उपासना यहोवा कधीही खपवून घेत नाही हेही आपल्याला समजले आहे. ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. यहोवा “अखिल पृथ्वीचे निरीक्षण” करतो, तेव्हा जे “सात्त्विक चित्ताने” त्याची उपासना करत नाहीत ते त्याच्या नजरेतून सुटत नाहीत. नीतिसूत्रे ३:३२ म्हणते, “परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे.” ही एक अशी व्यक्ती आहे जी यहोवाच्या आज्ञा पाळत असल्याचा फक्त दिखावा करते, पण गुप्तपणे वाईट गोष्टी करत असते. अशी कुटील व्यक्ती कदाचित काही काळ इतरांची फसवणूक करेलही; पण यहोवा सर्वशक्तिमान आणि नीतिप्रिय असल्यामुळे आपण ही खात्री बाळगू शकतो, की स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालणारी व्यक्ती आपल्या प्रयत्नांत कधीच यशस्वी होणार नाही.—नीति. २८:१३; १ तीमथ्य ५:२४; इब्री लोकांस ४:१३ वाचा.

१५. आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे, आणि का?

१५ आज यहोवाच्या लोकांपैकी बहुतेक जण प्रामाणिक अंतःकरणाने त्याची उपासना करत आहेत. मंडळीत एखादी व्यक्ती जाणूनबुजून ढोंगीपणाने उपासना करेल असे घडण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीसुद्धा, मोशेच्या काळात आणि पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत असे घडले त्याअर्थी आजही ते घडू शकते. (२ तीम. ३:१, ५) पण मग, आपण आपल्या बांधवांबद्दल शंका घ्यावी का? ते विश्वासूपणे यहोवाची उपासना करत आहेत किंवा नाही हे ठरवण्याचा आपण प्रयत्न करावा का? मुळीच नाही! कोणताही आधार नसताना आपल्या भावांबद्दल किंवा बहिणींबद्दल शंकाकुशंका मनात आणणे चुकीचे आहे. (रोमकर १४:१०-१२; १ करिंथकर १३:७ वाचा.) इतकेच काय, तर मंडळीतील इतरांच्या विश्वासूपणाबद्दल शंका घेण्याच्या वृत्तीमुळे यहोवासोबतचा आपला स्वतःचा नातेसंबंध बिघडू शकतो.

१६. (क) आपल्यात ढोंगी वृत्ती येऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने काय केले पाहिजे? (ख) “ आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा” या शीर्षकाच्या चौकटीतून आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो?

१६ प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने “आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी.” (गलती. ६:४) अपरिपूर्णतेमुळे, नकळत आपल्या वागण्याबोलण्यात थोड्याफार प्रमाणात का होईना, पण अप्रामाणिकपणा येऊ शकतो. (इब्री ३:१२, १३) म्हणूनच, आपण कोणत्या हेतूने यहोवाची उपासना करत आहोत याचे वेळोवेळी परीक्षण केले पाहिजे. आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘माझं यहोवावर प्रेम असल्यामुळे आणि तो सबंध विश्वाचा सर्वोच्च अधिपती आहे ही जाणीव असल्यामुळे मी त्याची उपासना करतो का? की नंदनवनातील आशीर्वाद मिळवण्याच्या उद्देशानेच मी त्याची उपासना करतो?’ (प्रकटी. ४:११) नक्कीच, आपल्या स्वतःच्या कार्यांचे परीक्षण करणे आणि आपल्या मनात किंचितही ढोंगीपणा असल्याचे आढळल्यास, तो काढून टाकणे आपल्याकरता फायदेकारक ठरेल.

एकनिष्ठ उपासनेमुळे आनंद मिळतो

१७, १८. आपण मनापासून व प्रामाणिक अंतःकरणाने यहोवाची उपासना करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

१७ आपण यहोवाची मनापासून आणि प्रामाणिक  अंतःकरणाने उपासना करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. स्तोत्रकर्ता म्हणतो, “ज्याच्याकडे यहोवा अन्याय मोजत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही, तो मनुष्य सुखी आहे.” (स्तो. ३२:२, पं.र.भा.) खरोखर, जे आपल्या मनातून ढोंगीपणाची प्रवृत्ती पूर्णपणे काढून टाकतात ते जीवनात जास्त आनंदी होतात. तसेच, भविष्यात ते परिपूर्ण आनंद उपभोगण्याची आशाही बाळगू शकतात.

१८ जे वाईट कृत्ये करतात किंवा दुटप्पी जीवन जगतात त्यांची कार्ये यहोवा योग्य वेळी उघडकीस आणेल. “धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद” तो सर्वांसमोर स्पष्ट करेल. (मला. ३:१८) पण तोपर्यंत, आपण ही खात्री बाळगू शकतो की “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात.”—१ पेत्र ३:१२.

^ परि. 8 प्रकटीकरण २१:१४ या वचनात १२ “पाये” आणि त्यांवर १२ प्रेषितांची नावे लिहिण्यात आली आहे असे सांगितले आहे. प्रकटीकरणाचे पुस्तक पौलाने तीमथ्याला पत्रे लिहिल्याच्या कित्येक दशकांनंतर लिहिण्यात आले.

^ परि. 12 आपणदेखील यहोवाप्रमाणेच अनीतीचा धिक्कार कसा करू शकतो याविषयी पुढील लेखात चर्चा करण्यात आली आहे.