व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जबाबदारी हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येत आहात का?

जबाबदारी हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येत आहात का?

रॉबर्ट * नावाचा बांधव काळजीत होता. मंडळीतील दोन वडील त्याच्याशी वैयक्तिक रीत्या बोलणार होते. विभागीय पर्यवेक्षकाच्या बऱ्याच भेटींनंतर, मंडळीत आणखी जबाबदाऱ्या हाताळता याव्यात म्हणून रॉबर्टने काय केले पाहिजे हे वडिलांनी त्याला सांगितले होते. पण याच्या काही काळानंतर, आपण कधी वडील म्हणून सेवा करू शकू का हा विचार रॉबर्टच्या मनात घोळू लागला. आता विभागीय पर्यवेक्षकाने नुकतीच मंडळीला पुन्हा भेट दिली होती. या वेळी वडील त्याला काय सांगतील याची त्याला काळजी लागली होती.

वडील रॉबर्टशी बोलत असताना तो लक्ष देऊन ऐकत होता. एका वडिलाने, १ तीमथ्य ३:१ या वचनातील शब्दांचा उल्लेख करून त्याला सांगितले की मंडळीत त्याला वडील म्हणून नेमण्यात आले आहे. रॉबर्टला आश्चर्याचा धक्का बसला आणि “काय बोललात तुम्ही?” असा प्रश्न त्याने त्या वडिलाला केला. त्या वडिलाने पुन्हा त्याला सांगितले की त्याला मंडळीत वडील म्हणून नेमण्यात आले आहे आणि हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. यानंतर, जेव्हा मंडळीत याबाबत घोषणा करण्यात आली तेव्हा सर्वांना आनंद झाला.

मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्याची इच्छा बाळगणे चुकीचे आहे का? मुळीच नाही. १ तीमथ्य ३:१ या वचनानुसार “कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो.” बऱ्याच ख्रिस्ती बांधवांनी हे उत्तेजन स्वीकारले आहे आणि मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यास पात्र बनण्यासाठी आध्यात्मिक प्रगती केली आहे. आणि यामुळे देवाच्या लोकांना मंडळीत पुढाकार घेण्यासाठी हजारो सक्षम वडील व सेवा सेवक मिळाले आहेत. पण, मंडळ्यांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता आणखी बांधवांनी पुढे येण्याची गरज आहे. मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पुढे येण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? आणि जे बांधव वडील बनण्याची इच्छा बाळगतात त्यांनी याबाबत रॉबर्टसारखी सतत काळजी करत राहिली पाहिजे का?

 जबाबदारी हाताळण्यासाठी पुढे येण्याचा काय अर्थ होतो?

“काम करू पाहतो” हे बायबलमधील वाक्य ग्रीक शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ मनापासून परिश्रम करणे, अतोनात प्रयत्न करणे असा होतो. हे वाचून कदाचित तुमच्या डोळ्यांपुढे अशा एका व्यक्तीचे चित्र येईल जी झाडावरील आकर्षक दिसणारे फळ तोडण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. पण, पुढे येण्याचा अर्थ स्वार्थीपणाने “अध्यक्षाचे” पद मिळवणे असा होत नाही. कारण प्रामाणिक इच्छा बाळगणाऱ्या बांधवांच्या मनात एखादे पद मिळवण्याचे नाही, तर “चांगले काम” करण्याचे ध्येय असले पाहिजे.

वडील म्हणून जबाबदारी हाताळण्यासाठी एका व्यक्तीने कोणत्या पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत हे १ तीमथ्य ३:२-७ आणि तीत १:५-९ या वचनांत सांगण्यात आले आहे. या वचनांत दिलेल्या उच्च स्तरांविषयी बऱ्याच वर्षांपासून वडील असलेले रेमन्ड नावाचे बांधव असे म्हणतात: “आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. चांगलं बोलणं, शिकवणं हे गरजेचं आहे, पण याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे एका वडिलानं निर्दोष, मर्यादशील, समंजस, सुव्यवस्थित आणि अतिथिप्रिय असलं पाहिजे.”

मंडळीत वेगवेगळ्या मार्गांनी योगदान देण्याद्वारे पुढे येण्याचा प्रयत्न करा

वडील बनण्यासाठी प्रयत्न करणारा बांधव सर्व प्रकारची लबाडी व अशुद्धता यांपासून दूर राहून हे दाखवतो की तो निर्दोष आहे. तो बांधव मर्यादशील, समंजस आणि सुव्यवस्थित असल्यामुळे मंडळीतील इतर बांधव एखादी समस्या असल्यास मदतीसाठी त्याच्याकडे जातात. तसेच, तो मंडळीत पुढाकार घेईल हा भरवसादेखील ते बाळगतात. आदरातिथ्य दाखवताना हा बांधव इतर तरुण बांधवांना व सत्यात नवीन असलेल्यांना उत्तेजन देतो. त्याला चांगल्या कामाची आवड असल्यामुळे तो आजारी व वृद्ध बांधवांना सांत्वन देतो व त्यांना मदत करतो. तो वरील गुण आपल्याला वडील म्हणून नेमण्यात यावे यासाठी नाही, तर इतरांना मदत करण्यासाठी विकसित करतो. *

मंडळीतील वडील एखाद्या बांधवाला योग्य सल्ला व उत्तेजन देण्यास नेहमी तयार असतात, पण बायबलमधील पात्रता पूर्ण करण्याची जबाबदारी ही पुढे येण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांधवावरच असते. हेन्री नावाचे एक अनुभवी वडील म्हणतात: “तुम्ही जर मंडळीत पुढे येण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही ती जबाबदारी हाताळू शकता हे आपल्या कार्यातून दाखवा.” उपदेशक ९:१० या वचनाचा उल्लेख करत ते म्हणतात, की “‘जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर.’ मंडळीत तुम्हाला जे काही काम दिलं जातं, मग ते सफाई करण्याचं काम का असेना, ते पूर्ण मन लावून करा. तुमची मेहनत व तुमचे  प्रयत्न नक्कीच इतरांच्या लक्षात येतील.” तुम्हाला जर वडील म्हणून सेवा करायची असेल, तर पवित्र सेवेच्या प्रत्येक पैलूत भरवशालायक असा व दिलेले काम पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्या. तुमच्यात गर्व नाही, तर नम्रता हा गुण ठळकपणे दिसून आला पाहिजे.—मत्त. २३:८-१२.

चुकीची विचारसरणी व वागणूक टाळा

मंडळीत वडील बनण्याची इच्छा बाळगणारे कदाचित इतरांना आपली इच्छा अप्रत्यक्षपणे दर्शवतील किंवा आपल्याला वडील म्हणून नेमावे या हेतूने वडिलांना खूश करण्याचा प्रयत्न करतील. वडील काही बांधवांना एखाद्या बाबतीत सुधारणा करण्याचा सल्ला देतात तेव्हा ते बांधव आपली नापसंती दाखवतात. अशा बांधवांनी स्वतःला विचारले पाहिजे की, ‘मला स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत की यहोवाच्या मेंढरांची नम्रपणे काळजी घ्यायची आहे?’

मंडळीत वडील बनण्यासाठी पुढे येणाऱ्यांनी “कळपाला कित्ते” असले पाहिजे असेदेखील बायबल सांगते. (१ पेत्र ५:१-३) मंडळीत चांगले उदाहरण असणारा बांधव नेहमी चुकीची विचारसरणी व कृत्ये करण्याचे टाळतो. तो मंडळीत वडील असो अथवा नसो, तरी तो धीर व सहनशीलता यांसारखे गुण विकसित करतो. पण, मंडळीत वडील झाल्याने एखाद्या व्यक्तीत असलेल्या उणिवा निघून जात नाहीत. (गण. १२:३; स्तो. १०६:३२, ३३) तसेच, एका बांधवाला कदाचित वाटेल की त्याच्यात काहीच दोष नाही, पण इतरांना कदाचित त्याच्या काही उणिवा दिसत असतील. (१ करिंथ. ४:४) त्यामुळे, जेव्हा वडील तुम्हाला बायबल आधारित सल्ला देतात तेव्हा लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याबद्दल राग बाळगू नका. त्यानंतर त्यांनी दिलेला सल्ला लागू करण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला बराच काळ थांबावे लागल्यास काय?

अनेक बांधवांना बऱ्याच काळानंतर वडील म्हणून नेमण्यात येते. त्यांना कदाचित असे वाटू शकते की हा काळ खूप मोठा आहे. तुम्हीही बऱ्याच वर्षांपासून मंडळीत वडील बनण्यासाठी प्रयत्न करत असल्यास, धीराने वाट पाहत राहणे तुम्हाला कठीण जाते का? असे असल्यास पुढील देवप्रेरित शब्दांकडे लक्ष द्या: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे.”—नीति. १३:१२.

आपण एखादे ध्येय मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो पण ते मिळवणे शक्य होत नाही तेव्हा आपण निराश होतो. अब्राहामही निराश झाला होता. यहोवाने त्याला वचन दिले होते की तो त्याला एक पुत्र देईल. पण, हे वचन देण्याच्या बऱ्याच वर्षांनंतरही त्यांना मूल झाले नाही. (उत्प. १२:१-३, ७) वृद्ध असताना अब्राहामाने यहोवाला अशी प्रार्थना केली: “हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार  . . . तू मला काही संतान दिले नाही.” यहोवाने त्याला आश्वासन दिले की तो आपले वचन नक्की पूर्ण करेल. पण, यहोवाचे हे वचन जवळजवळ १४ वर्षांनंतर पूर्ण झाले.—उत्प. १५:२-४; १६:१६; २१:५.

या १४ वर्षांत अब्राहामाने यहोवाच्या सेवेतील आपला आनंद गमावला का? नाही. त्याने यहोवाच्या आश्वासनावर कधीच शंका घेतली नाही. यहोवा आपले वचन नक्की पूर्ण करेल यावर त्याने भरवसा ठेवला. प्रेषित पौलाने म्हटले: “त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला.” (इब्री ६:१५) शेवटी सर्वसमर्थ यहोवाने त्याच्या विश्वासू सेवकाला अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वाद दिले. तुम्ही अब्राहामाच्या उदाहरणावरून काय शिकू शकता?

वडील बनण्यासाठी बरीच वर्षे प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला ही जबाबदारी मिळाली नसेल, तर यहोवावर पूर्णपणे विसंबून राहा. त्याच्या सेवेतील आपला आनंद कमी होऊ देऊ नका. बऱ्याच बांधवांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करणारे विल्सन नावाचे बांधव म्हणतात: “एक व्यक्ती जबाबदारी हाताळण्यास योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी वेळ लागतो. एक बांधव ज्या प्रकारे वागतो व दिलेली जबाबदारी हाताळतो त्यावरून त्याची क्षमता आणि त्याचा  दृष्टिकोन हळूहळू दिसून येतो. काहींना वाटते की त्यांना मंडळीत जबाबदारी मिळाली किंवा त्यांना नेमण्यात आले म्हणजे ते यशस्वी झालेत. असा विचार करणं चुकीचं आहे आणि हे घातक ठरू शकतं. तुम्ही जर यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असाल तर तुम्ही यशस्वी आहात; मग तुम्ही कोणत्याही ठिकाणी असला किंवा कोणतंही काम करत असला तरीही.”

एका बांधवाला वडील म्हणून जबाबदारी हाताळण्यासाठी दहापेक्षा जास्त वर्षे थांबावे लागले. यहेज्केलच्या पुस्तकातील पहिल्या अध्यायात दिलेल्या वर्णनातून जी गोष्ट ते शिकले त्याविषयी ते म्हणतात: “यहोवा आपला रथ म्हणजेच त्याची संघटना चालवतो, त्याची गती काय असली पाहिजे हे तोच ठरवतो. आपल्याला वाटतं त्या वेळेनुसार गोष्टी घडणं महत्त्वाचं नाही, तर यहोवाची वेळ महत्त्वाची आहे. वडील म्हणून सेवा करण्याची इच्छा बाळगण्यात, मला काय वाटतं किंवा मला काय व्हायचंय हे महत्त्वाचं नाही. यहोवाला माहीत आहे मला नेमकी कशाची गरज आहे, आणि मला जे हवं आहे ते कदाचित यहोवाच्या इच्छेनुसार नसेल.”

तुम्हाला जर वडील म्हणून मंडळीत सेवा करण्याची इच्छा असेल तर मंडळीचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहा. खूप काळ लोटून गेला आहे व अजूनही तुम्हाला वडील बनवण्यात आले नाही असे वाटत असल्यास अवाजवी काळजीवर मात करा व धीर सोडू नका. आधी उल्लेख करण्यात आलेले रेमन्ड म्हणतात: “अवाजवी अपेक्षा ठेवल्यामुळे तुम्ही कधीच समाधानी राहणार नाही. जे लोक अशा अपेक्षा ठेवतात व धीर धरत नाहीत अशांना यहोवाच्या सेवेतील आनंद अनुभवता येत नाही.” त्यामुळे, पवित्र आत्म्याचे फळ, खासकरून धीर उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. बायबलचा अभ्यास करण्याद्वारे स्वतःला आध्यात्मिक रीत्या आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करा. सुवार्ता सांगण्यासाठी व आवड दाखवणाऱ्यांसोबत बायबल अभ्यास चालवण्यासाठी जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबाला आध्यात्मिक कार्यांत आणि कौटुंबिक उपासनेत सहभाग घेण्यास मदत करा. आपल्या बंधुभगिनींच्या सहवासाचा आनंद घ्या. या गोष्टी करत असताना तुम्हाला यहोवाच्या सेवेत आनंद अनुभवता येईल.

मंडळीत जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी पुढे येण्याची संधी ही यहोवाकडून एक आशीर्वाद आहे. यामुळे प्रयत्न करणाऱ्यांनी निराश व्हावे किंवा सेवेतील आपला आनंद गमवावा अशी यहोवाची व त्याच्या संघटनेची मुळीच इच्छा नाही. जे बांधव योग्य हेतू ठेवून यहोवाची सेवा करतात त्यांना तो मदत करतो व त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देतो. आणि आशीर्वादांसोबत तो कधीच दुःख देत नाही.—नीति. १०:२२.

तुम्ही कदाचित काही काळापासून वडील बनण्याचा प्रयत्न करत असला तरीही तुम्ही आपली आध्यात्मिकता आणखी वाढवू शकता. जबाबदारी हाताळण्यासाठी लागणारे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करताना आणि मंडळीत परिश्रम करताना तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. असे केल्यास, तुमच्या सेवेवर यहोवाचा आशीर्वाद राहील. तुम्हाला कोणतीही जबाबदारी मिळो, यहोवाची सेवा करण्यात तुम्हाला नेहमी आनंद मिळत राहो.

^ परि. 2 लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 8 या लेखात जी तत्त्वे सांगण्यात आली आहेत ती सेवा सेवक बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या बांधवांनादेखील लागू होतात. अशांसाठी १ तीमथ्य ३:८-१०, १२, १३ या वचनांत पात्रता देण्यात आल्या आहेत.