व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपले आचरण नेहमी पवित्र ठेवा

आपले आचरण नेहमी पवित्र ठेवा

“तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा.”—१ पेत्र १:१५.

१, २. (क) आचरणाच्या बाबतीत देवाच्या लोकांकडून काय अपेक्षा केली जाते? (ख) या लेखात कोणत्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल?

लेवीय या पुस्तकात पवित्र असण्यावर कशा प्रकारे जोर देण्यात आला आहे याविषयी मागील लेखात आपण पाहिले. यहोवाच्या प्रेरणेने प्रेषित पेत्राने, लेवीय पुस्तकातील माहितीचा ख्रिस्ती या नात्याने असलेल्या आपल्या आचरणाशी संबंध जोडला. (१ पेत्र १:१४-१६ वाचा.) यहोवा “पवित्र” आहे आणि म्हणूनच अभिषिक्त जनांनी आणि दुसऱ्या मेंढरांतील सदस्यांनी पवित्र असण्यास झटले पाहिजे अशी तो अपेक्षा करतो. शिवाय, त्यांनी फक्त काही बाबतींतच नाही तर सर्व बाबतींत पवित्र आचरण ठेवले पाहिजे.—योहा. १०:१६.

लेवीय पुस्तकात असलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आणखी काही रत्नांचे परीक्षण केल्याने आपल्याला नक्कीच खूप फायदा होईल. तसेच, या माहितीचा अवलंब केल्यास सर्व बाबतींत आपले आचरण पवित्र ठेवण्यास आपल्याला मदत होईल. या लेखात आपण पुढील प्रश्नांवर चर्चा करणार आहोत: तडजोड करण्याच्या बाबतीत आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा देण्यासंबंधी लेवीय पुस्तकात काय सांगितले आहे? बलिदाने अर्पण करण्याविषयीच्या आज्ञेवरून आपण काय शिकू शकतो?

तडजोड करू नका

३, ४. (क) ख्रिश्चनांनी बायबलमधील नियमांशी किंवा तत्त्वांशी तडजोड का करू नये? (ख) आपण सूड का उगवू नये किंवा मनात राग का बाळगू नये?

आपल्याला जर यहोवाचे मन आनंदित करायचे असेल तर आपण त्याच्या नियमांनुसार आणि तत्त्वांनुसार जगले पाहिजे. तसेच, देवाच्या नजरेत अपवित्र असलेली, तडजोड करण्याची वृत्ती आपल्यात कधीही येऊ नये याचीही आपण खबरदारी बाळगली पाहिजे. आपण नियमशास्त्राच्या अधीन नसलो, तरी कोणत्या गोष्टी यहोवाला मान्य आहेत आणि कोणत्या नाहीत हे त्यातील माहितीमुळे आपल्या लक्षात येते. उदाहरणार्थ, इस्राएली लोकांना अशी आज्ञा देण्यात आली: “सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नको, [“मनात द्वेष बाळगू नको,” NW] तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर; मी परमेश्वर आहे.”—लेवी. १९:१८.

आपण कोणावरही सूड उगवू नये अशी अपेक्षा यहोवा करतो. तसेच, आपण कोणाविषयी मनात द्वेष बाळगू नये अशीही तो अपेक्षा करतो. (रोम. १२:१९) जर आपण देवाच्या नियमांचे आणि तत्त्वांचे उल्लंघन केले तर दियाबलाला निश्‍चितच आनंद होईल. शिवाय, यहोवाच्या नावालाही कलंक लागेल. खरेतर, आपण अपरिपूर्ण असतानाही देवाने आपल्याला त्याची सेवा करण्याचा बहुमान दिला आहे; जणू “मातीच्या भांड्यांत” त्याने मौल्यवान संपत्ती ठेवली आहे. (२ करिंथ. ४:१, ७) तर मग, या भांड्यात द्वेषासारखी विषारी गोष्ट साठवून ठेवणे योग्य ठरेल का? निश्‍चितच नाही. म्हणूनच आपण आपल्या मनात कधीही द्वेषाला थारा देऊ नये. मग कोणी आपले मन जाणूनबुजून दुखावले असले तरीही.

५. अहरोनाच्या कुटुंबात घडलेल्या दुःखद घटनेवरून आपण काय शिकू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

लेवीय १०:१-११ मध्ये अहरोनाच्या कुटुंबाने अनुभवलेला एक खूप दुःखद प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो. निवासमंडपात असताना नादाब आणि अबीहू या अहरोनाच्या पुत्रांना देवाकडून आलेल्या अग्नीने भस्म केले. त्या वेळी अहरोनाला आणि त्याच्या कुटुंबाला किती दुःख झाले असेल याची कल्पना करा. पण त्यांनी आपल्या मृत नातेवाइकांसाठी शोक करू नये असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांच्या विश्वासाची ही खरोखरच किती मोठी परीक्षा होती! तुमच्या कुटुंबातील किंवा जवळची एखादी व्यक्ती बहिष्कृत झाली असेल तर तिची कोणत्याही प्रकारे संगत न धरण्याद्वारे तुम्ही आपली पवित्रता टिकवून ठेवत आहात का?—१ करिंथकर ५:११ वाचा.

६, ७. (क) चर्चमध्ये होणाऱ्या लग्नाचे निमंत्रण मिळाल्यास आपण कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे? (तळटीप पाहा.) (ख) सत्यात नसलेल्या नातेवाइकाला आपण आपली भूमिका कशी समजावून सांगू शकतो?

अहरोनाला आणि त्याच्या कुटुंबाला ज्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागला त्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना कदाचित आपल्याला करावा लागणार नाही. पण, समजा चर्चमध्ये होणार असलेल्या एखाद्या नातेवाइकाच्या लग्नाला येण्याचे आणि त्यात सहभाग घेण्याचे निमंत्रण आपल्याला मिळाले तर काय? अशा लग्नाला न जाण्याची स्पष्ट आज्ञा बायबलमध्ये कोठेही देण्यात आलेली नाही. पण, या बाबतीत योग्य निर्णय घेण्यास बायबलमधील काही तत्त्वे आपल्याला मदत करू शकतील का? *

वर उल्लेखण्यात आलेल्या परिस्थितीत आपली पवित्रता टिकवून ठेवण्यासाठी आपण ठाम भूमिका घेतो तेव्हा सत्यात नसलेले आपले नातेवाईक गोंधळात पडू शकतात. (१ पेत्र ४:३, ४) त्यांच्या भावना दुखावण्याची आपली इच्छा नाही हे खरे आहे. तरीसुद्धा त्यांच्याशी याबद्दल नम्रपणे, पण त्याच वेळी स्पष्टपणे बोलणे गरजेचे आहे. लग्न समारंभाच्या बऱ्याच दिवसांआधी आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे. त्यांनी आपल्याला लग्नात येण्याचे व त्यात सहभाग घेण्याचे निमंत्रण दिले यासाठी आधी आपण त्यांचे आभार मानू शकतो. त्यानंतर, आपण त्यांना सांगू शकतो की लग्नातील धार्मिक प्रथांमध्ये आपण सहभागी होऊ शकत नसल्यामुळे, कदाचित आपल्या येण्याने त्यांच्या आनंदात विरजण पडू शकते. तसेच, इतर पाहुण्यांपुढे त्यांना लाजल्यासारखे वाटू शकते. हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपल्या विश्वासांसंबंधी तडजोड करण्याचे टाळू शकतो.

यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा द्या

८. लेवीय पुस्तकात यहोवाच्या सर्वोच्च अधिकारावर कशा प्रकारे जोर देण्यात आला आहे?

लेवीय पुस्तकात यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. या पुस्तकातील नियम यहोवाकडून आहेत असे त्यात ३० पेक्षा जास्त वेळा सांगण्यात आले आहे. मोशेला यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराबद्दल कदर होती आणि त्यामुळेच त्याने यहोवाकडून मिळालेल्या सर्व आज्ञांचे पालन केले. (लेवी. ८:४, ५) मोशेप्रमाणे आपणसुद्धा यहोवाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याद्वारे त्याच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा दिला पाहिजे. या बाबतीत देवाच्या संघटनेद्वारे आपल्याला साहाय्य मिळते. पण, कधीकधी एकटे असताना आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते; येशूसोबत असेच घडले होते. (लूक ४:१-१३) अशा वेळी, देवाच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा देण्यावर आपण लक्ष केंद्रित केले आणि त्याच्यावर भरवसा ठेवला, तर कोणीही आपल्याला तडजोड करण्यास किंवा भीतीपोटी चुकीचे काम करण्यास भाग पाडू शकत नाही.—नीति. २९:२५.

९. सबंध जगात देवाच्या लोकांचा द्वेष का केला जातो?

येशूचे अनुयायी आणि यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे जगातील अनेक राष्ट्रांत आपला छळ केला जातो. खरेतर हे अपेक्षितच आहे कारण येशूने त्याच्या शिष्यांना असे सांगितले होते, की “तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राषट्रे तुमचा द्वेष करतील.” (मत्त. २४:९) अशा प्रकारच्या द्वेषाचा सामना करूनही आपण सुवार्ता सांगण्याचे काम करत राहतो; तसेच, यहोवाच्या दृष्टीत पवित्र आचरण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण, आपण प्रामाणिक, शुद्ध जीवन जगणारे आणि कायद्यांचे पालन करणारे नागरिक असूनही आपला इतका द्वेष का केला जातो? (रोम. १३:१-७) कारण आपण यहोवाला आपला सर्वोच्च अधिकारी म्हणून स्वीकारले आहे! आपण “केवळ त्याचीच” उपासना करतो आणि त्याच्या नीतिमान नियमांशी आणि स्तरांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करत नाही. या कारणांमुळे आपला द्वेष केला जातो.—मत्त. ४:१०.

१०. एका बांधवाने तडजोड केली तेव्हा काय घडले?

१० आपला द्वेष केला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपण या “जगाचे नाही.” त्यामुळे आपण युद्धांत आणि राजनैतिक घडामोडींत भाग घेत नाही. (योहान १५:१८-२१; यशया २:४ वाचा.) यहोवाला जीवन समर्पित केलेल्यांपैकी काहींनी या बाबतीत तडजोड केली आहे. पण, त्यांपैकी बहुतेकांनी पश्‍चात्ताप करून आपल्या दयाळू स्वर्गीय पित्यासोबत त्यांचा नातेसंबंध पुन्हा जोडला आहे. (स्तो. ५१:१७) तर, काहींनी पश्‍चात्ताप केला नाही. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धादरम्यान हंगेरीमध्ये काही बांधवांना, कोणतीही न्यायचौकशी न करता तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांपैकी ४५ पेक्षा कमी वय असलेल्या १६० बांधवांना हंगेरीमधील एका शहरात एकत्र करण्यात आले. तेथे त्यांना लष्करी सेवा स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला. विश्वासू बांधव ही सेवा न स्वीकारण्याच्या त्यांच्या निर्धारावर अटळ राहिले. पण, नऊ जणांनी मात्र ती सेवा स्वीकारली. त्यांनी लष्करी सेवेची शपथ घेतली आणि सैनिकी पोशाख स्वीकारला. दोन वर्षांनंतर, सैनिकांच्या एका खास पथकाला विश्वासू साक्षीदारांना गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश देण्यात आला. या पथकात तडजोड केलेल्यांपैकी एक जण होता. ज्यांना ठार मारायचे होते त्या विश्वासू साक्षीदारांत त्याचा सख्खा भाऊदेखील होता! प्रत्यक्षात मात्र हा गोळीबार करण्यात आला नाही. ती केवळ एक धमकी होती.

यहोवाला तुमच्याकडे असलेले सर्वोत्तम द्या

११, १२. इस्राएली लोकांना बलिदानांसंबंधी देण्यात आलेल्या आज्ञांवरून आपण काय शिकू शकतो?

११ मोशेला देण्यात आलेल्या नियमशास्त्रानुसार, इस्राएली लोकांना काही खास बलिदाने द्यायची होती. (लेवी. ९:१-४, १५-२१) ही बलिदाने निर्दोष असण्याची गरज होती कारण ती येशूच्या परिपूर्ण बलिदानाला सूचित करत होती. इतकेच नाही तर प्रत्येक भेट किंवा बलिदान एका खास पद्धतीने देण्याची आज्ञा यहोवाने दिली होती. उदाहरणार्थ, लेवीय १२:६ मध्ये सांगितल्यानुसार बाळंतिणींसाठी पुढील आज्ञा देण्यात आली होती: “तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे घेऊन जावे.” बलिदानांसंबंधी देवाने काही खास सूचना दिल्या असल्या, तरी त्याच्या नियमांतून त्याचा प्रेमळपणा आणि समजूतदारपणा स्पष्टपणे झळकतो. आज्ञेत सांगितल्यानुसार मेंढा अर्पण करण्याची एखाद्या आईची ऐपत नसल्यास ती पारव्याची दोन पिले किंवा दोन होले देऊ शकत होती. (लेवी. १२:८) ती इतरांप्रमाणे मोठे बलिदान देऊ शकत नसली तरी तिच्यावरही यहोवाचे प्रेम होते आणि तिचे अर्पणसुद्धा त्याच्या नजरेत मौल्यवान होते. देवाच्या या प्रेमळ तरतुदीवरून आपण काय शिकू शकतो?

१२ प्रेषित पौलाने सहविश्वासू बांधवांना आर्जवले की त्यांनी देवाला “स्तुतीचा यज्ञ अर्पण” करावा. (इब्री १३:१५) आपण आपल्या ओठांनी यहोवाच्या पवित्र नावाची घोषणा केली पाहिजे. ज्या बंधुभगिनींना ऐकू येत नाही ते संकेत भाषेचा वापर करून देवाला स्तुतीचा यज्ञ अर्पण करतात. ज्यांना घरातून बाहेर जाणे शक्य नाही ते पत्राद्वारे आणि टेलिफोनद्वारे साक्ष देतात. तसेच, त्यांची काळजी घेणाऱ्यांना आणि त्यांना भेटायला येणाऱ्यांना ते संदेश सांगतात. यहोवाच्या नावाची घोषणा करण्याद्वारे आणि इतरांना सुवार्ता सांगण्याद्वारे आपण यहोवाला स्तुतीचा यज्ञ अर्पण करत असतो. आपली ही सेवा आपल्या आरोग्यानुसार आणि क्षमतेनुसार असली पाहिजे. म्हणजेच, आपण यहोवाला आपल्याकडे असलेले सर्वोत्तम दिले पाहिजे.—रोम. १२:१; २ तीम. २:१५.

१३. आपण सेवाकार्याचा अहवाल का दिला पाहिजे?

१३ आपल्या सेवाकार्याद्वारे आपण यहोवाला प्रेमापोटी, स्वेच्छेने स्तुतीचा यज्ञ देतो. (मत्त. २२:३७, ३८) तर मग, या सेवेचा अहवाल द्यावा अशी अपेक्षा आपल्याकडून का केली जाते? आणि याबद्दल आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? प्रत्येक महिन्यात आपण सेवेचा जो अहवाल देतो तो आपल्या उपासनेचा एक भाग आहे. (२ पेत्र १:७) पण, फक्त जास्त तास लिहिण्याकरता जास्त सेवा केली पाहिजे असा विचार आपण कधीही करू नये. खरेतर, जे बांधव अंथरुणाला खिळलेले आहेत किंवा ज्यांना काही कारणास्तव घराबाहेर पडणे शक्य नाही ते फक्त १५ मिनिटांचा अहवालदेखील देऊ शकतात. यहोवा या मिनिटांचीही कदर करतो. कारण, त्या बांधवांनी त्यांच्या परिस्थितीनुसार देवाला अर्पण केलेली ती सर्वोत्तम भेट आहे. त्यांची ही भेट यहोवावरील त्यांच्या प्रेमाचा पुरावा आहे. तसेच, यहोवाचे साक्षीदार असण्याच्या बहुमानाची त्यांना मनापासून कदर असल्याचे ते याद्वारे दाखवतात. ज्याप्रमाणे प्राचीन इस्राएलातील गरीब लोकसुद्धा यहोवाला बलिदान अर्पण करू शकत होते, त्याचप्रमाणे जास्त सेवा करणे ज्यांना शक्य नाही ते बांधवसुद्धा आनंदाने त्यांच्या सेवेचा अहवाल देऊ शकतात. जगव्याप्त अहवाल तयार करण्यासाठी आपल्या प्रत्येकाचा अहवाल उपयोगात आणला जातो. आणि यामुळे येणाऱ्या वर्षासाठी प्रचार कार्याचे नियोजन करण्यास संघटनेला मदत होते. तर मग, आपण प्रत्येक महिन्यात सेवाकार्याचा अहवाल द्यावा ही एक अवाजवी अपेक्षा आहे का?

वैयक्तिक अभ्यास आणि स्तुतीचे यज्ञ

१४. तुम्ही आपल्या वैयक्तिक अभ्यासाचे परीक्षण का केले पाहिजे?

१४ लेवीय पुस्तकातील काही आध्यात्मिक रत्नांचे परीक्षण केल्यानंतर तुम्ही कदाचित असे म्हणाल: “लेवीय हे पुस्तक देवाच्या वचनात का समाविष्ट करण्यात आलं आहे हे आता मला चांगलं समजलं आहे.” (२ तीम. ३:१६) शिवाय हा अभ्यास केल्यामुळे, आचरण पवित्र ठेवण्याचा तुमचा निर्धारदेखील आणखीन दृढ झाला असेल. आपण पवित्र राहावे अशी यहोवा अपेक्षा तर करतोच पण, अशी उपासना मिळवण्याचा त्याला हक्कही आहे याचीही तुम्हाला जाणीव झाली असेल. लेवीय पुस्तकाचे परीक्षण केल्यामुळे बायबलमधील इतर पुस्तकांचेही सखोल परीक्षण करण्याची इच्छा तुमच्या मनात नक्कीच जागृत झाली असेल. (नीतिसूत्रे २:१-५ वाचा.) तेव्हा, वैयक्तिक अभ्यास करताना तुम्ही बायबलचे खरोखरच सखोल परीक्षण करता का यावर विचार करा. टीव्ही कार्यक्रम, व्हिडिओ गेम्स, खेळ किंवा छंद यांना तुम्ही आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येऊ देत आहात का? असे असल्यास, प्रेषित पौलाने इब्री लोकांस जे पत्र लिहिले त्यातील काही वाक्यांवर मनन केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

तुम्ही बायबल अभ्यासाला आणि कौटुंबिक उपासनेला जीवनात प्राधान्य देत आहात का? (परिच्छेद १४ पाहा)

१५, १६. इब्री ख्रिश्चनांशी पौल इतक्या स्पष्ट शब्दांत का बोलला?

१५ प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना अतिशय स्पष्ट शब्दांत पत्र लिहिले. (इब्री लोकांस ५:७, ११-१४ वाचा.) त्याला जे सांगायचे होते ते त्याने सरळसरळ सांगितले. तुम्ही “ऐकण्यात मंद” झाला आहात असे तो त्यांना म्हणाला. पौल इतक्या स्पष्ट व सडेतोड शब्दांत का बोलला? कारण यहोवाप्रमाणेच त्याचेही या ख्रिस्ती बांधवांवर प्रेम होते. ते फक्त “दुधावर” म्हणजेच मूलभूत आध्यात्मिक ज्ञानावर समाधान मानत असल्यामुळे त्याला त्यांची काळजी वाटत होती. बायबलमधील मूलभूत शिकवणींशी परिचित होणे महत्त्वाचे असले, तरी आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आणि प्रौढ होण्यासाठी “जड अन्न” म्हणजेच बायबलमधील गहन सत्ये समजून घेणेही गरजेचे आहे.

१६ इतरांना शिकवण्यास योग्य बनण्याइतकी प्रगती करण्याऐवजी, या इब्री ख्रिश्चनांनाच इतरांनी शिकवावे अशी परिस्थिती होती. अशी परिस्थिती का निर्माण झाली होती? कारण ते “जड अन्न” सेवन करण्याचे टाळत होते. तेव्हा, स्वतःला विचारा: ‘बायबलच्या गहन सत्यांप्रती माझी योग्य मनोवृत्ती आहे का? या सत्यांचे परीक्षण करण्यास मी उत्सुक आहे का? की, बायबलचा सखोल अभ्यास आणि प्रार्थना करण्याच्या बाबतीत मी टाळाटाळ करतो? माझ्या अभ्यासाच्या सवयी योग्य नसल्यामुळे असे होत असेल का?’ असे परीक्षण करणे गरजेचे आहे कारण आपल्यावर फक्त सुवार्ता सांगण्याची जबाबदारी सोपवलेली नाही; तर लोकांना शिकवण्याचे आणि शिष्य बनवण्याचे कामदेखील आपल्यावर सोपवण्यात आले आहे.—मत्त. २८:१९, २०.

१७, १८. (क) बायबलमधील गहन सत्यांचा अभ्यास करत राहणे गरजेचे का आहे? (ख) ख्रिस्ती सभांना जाण्याआधी मद्यपान करण्याच्या बाबतीत आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?

१७ यहोवा आपल्या मनात अपराधीपणाच्या भावना निर्माण करून आपल्याला बायबल अभ्यास करण्यास प्रवृत्त करत नाही. जरी बायबलचा अभ्यास करणे आपल्याला कठीण वाटत असले, तरी आपण असे करत राहिले पाहिजे. सत्यात येऊन आपल्याला कितीही वर्षे झाली असली तरीही बायबलमधील गहन सत्यांचा अभ्यास करत राहणे गरजेचे आहे. कारण यामुळेच आपल्याला पवित्र राहण्यास मदत होईल.

१८ पवित्रता टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तसेच, देव आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या आपण पूर्ण केल्या पाहिजेत. अहरोनाचे पुत्र नादाब आणि अबीहू यांच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्यांनी “अशास्त्र अग्नी” यहोवापुढे नेला आणि तेही कदाचित नशेत असताना. (लेवी. १०:१, २) त्यानंतर देवाने अहरोनाला काय सांगितले त्याकडे लक्ष द्या. (लेवीय १०:८-११ वाचा.) ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यापूर्वी आपण मद्यपान करू नये असे या अहवालावरून सूचित होते का? पुढील गोष्टींकडे लक्ष द्या: आज आपण नियमशास्त्राच्या अधीन नाही. (रोम. १०:४) काही देशांत आपले बांधव सभांना जाण्यापूर्वी जेवताना माफक प्रमाणात मद्यपान करतात. कारण त्यांच्या देशात ही सर्वसामान्य पद्धत आहे. वल्हांडणाच्या सणातही द्राक्षारसाचे चार प्याले वापरण्याची प्रथा होती. स्मारकविधीची स्थापना करताना येशूने त्याच्या रक्ताचे प्रतीक म्हणून शिष्यांना द्राक्षारस सेवन करण्यास दिला होता. (मत्त. २६:२७) अर्थात, जास्त प्रमाणात पिणे तसेच पिण्याची सवय असणे या दोन्ही गोष्टींची बायबलमध्ये मनाई करण्यात आली आहे. (१ करिंथ. ६:१०; १ तीम. ३:८) शिवाय काही ख्रिश्चनांना कदाचित त्यांच्या विवेकामुळे, यहोवाच्या उपासनेशी संबंधित कोणत्याही कार्यात सहभाग घेण्यापूर्वी मद्यपान करणे चुकीचे वाटत असेल. पण, प्रत्येक देशातील परिस्थिती आणि संस्कृती वेगवेगळी असते. ख्रिश्चनांकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की त्यांनी पवित्र आणि अपवित्र यांतील फरक ओळखला पाहिजे. जेणेकरून त्यांना सर्व प्रसंगी पवित्रता टिकवून देवाचे मन आनंदित करता येईल.

१९. (क) आपण कौटुंबिक उपासना आणि वैयक्तिक अभ्यास आणखी अर्थपूर्ण कसा बनवू शकतो? (ख) पवित्रता टिकवून ठेवण्याचा तुमचा निर्धार पक्का आहे हे तुम्ही कसे दाखवू शकता?

१९ तुम्ही झटून शोध घेतल्यास देवाच्या वचनात तुम्हाला आणखी अनेक आध्यात्मिक रत्ने सापडतील. तेव्हा, उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून आपल्या कौटुंबिक उपासनेचा आणि वैयक्तिक अभ्यासाचा दर्जा सुधारा. यहोवाविषयी व त्याच्या उद्देशांविषयी आणखी जाणून घ्या. त्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करा. (याको. ४:८) स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवाला अशी विनवणी करा: “तू माझे नेत्र उघड. म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.” (स्तो. ११९:१८) बायबलमधील नियमांशी व तत्त्वांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नका. “पवित्र” देव यहोवा याच्या सर्वश्रेष्ठ नियमांचे मनापासून पालन करा आणि सुवार्ता सांगण्याचे पवित्र काम आवेशाने करा. (१ पेत्र १:१५; रोम. १५:१६) शेवटल्या काळातील या कठीण दिवसांत पवित्र राहण्यास झटा. आपण सर्व जण नेहमी आपले आचरण पवित्र ठेवून, आपला पवित्र देव यहोवा याच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा देऊ या.

^ परि. 6 टेहळणी बुरूज १५ मे २००२ अंकातील “वाचकांचे प्रश्न” पाहा.