व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ज्यांचा देव यहोवा आहे असे लोक

ज्यांचा देव यहोवा आहे असे लोक

“ज्या लोकांचा देव परमेश्वर [“यहोवा,” NW] आहे ते धन्य!”—स्तो. १४४:१५.

१. देवाची उपासना करणाऱ्यांबाबत काही लोकांचे काय मत आहे?

जगातील प्रमुख धर्मांनी, मग ते ख्रिस्ती धर्मजगतातील पंथ असोत किंवा इतर धर्म असोत, त्यांनी मानवजातीचे नुकसानच केले आहे असे आज बऱ्याच लोकांचे मत आहे. हे धर्म देवाबद्दलचे सत्य शिकवत नाहीत, तसेच, या धर्मांच्या नावाखाली अनेक वाईट कृत्ये केली जातात; त्यामुळे हे धर्म देवाला मान्य असू शकत नाहीत असे या लोकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, ते असेही मानतात की सर्व धर्मांत काही चांगले लोकही असतात आणि या लोकांची उपासना देव स्वीकारतो. पण, हे खरे आहे का? की आपली उपासना करणाऱ्यांनी खोट्या धर्मांपासून स्वतःला वेगळे करावे अशी देवाची अपेक्षा आहे? या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी, सबंध इतिहासातील यहोवाच्या खऱ्या उपासकांबद्दल बायबलमध्ये काय सांगितले आहे याचे आपण परीक्षण करू या.

कराराद्वारे निवडलेले लोक

२. यहोवाचे खास लोक म्हणून कोणाला निवडण्यात आले, आणि ते यहोवाचे खास लोक असल्याचे काय चिन्ह होते? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

आजपासून जवळजवळ ४,००० वर्षांपूर्वीच यहोवाने काही लोकांना आपले खास लोक म्हणून निवडले होते. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा पिता असे ज्याला म्हणण्यात आले, तो अब्राहाम शेकडो लोक असलेल्या एका मोठ्या घराण्याचा प्रमुख होता. (रोम. ४:११; उत्प. १४:१४) कनान देशातील राजे अब्राहामाला ‘देवाचा सरदार’ मानत होते आणि त्याच्याशी अतिशय आदराने व्यवहार करत होते. (उत्प. २१:२२; २३:६) यहोवाने अब्राहाम व त्याचे वंशज यांच्यासोबत एक करार केला. (उत्प. १७:१, २, १९) देव अब्राहामाला म्हणाला: “माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्‍चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हा: तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी. . . . ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल.” (उत्प. १७:१०, ११) देवाने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याच्या घराण्यातील सर्व पुरुषांची सुंता करण्यात आली. (उत्प. १७:२४-२७) सुंता ही एक शारीरिक खूण होती; यहोवा देवाने अब्राहामाच्या वंशजांशी करार करून त्यांना आपले खास लोक म्हणून निवडल्याचे ते चिन्ह होते.

३. अब्राहामाच्या वंशजांपासून एक मोठा राष्ट्रसमुदाय कसा काय बनला?

अब्राहामाचा नातू याकोब, म्हणजेच इस्राएल याला १२ पुत्र होते. (उत्प. ३५:१०, २२ख-२६) कालांतराने, ते इस्राएल राष्ट्रातील १२ वंशांचे कुलप्रमुख बनले. (प्रे. कृत्ये ७:८) याकोबाच्या पुत्रांपैकी असलेल्या योसेफाला इजिप्तला नेण्यात आले. नंतर इजिप्तचा राजा, फारो याने योसेफाला फार मोठा अधिकार दिला. एका दुष्काळादरम्यान योसेफावर सबंध देशाला अन्नपुरवठा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. याकोबाच्या कुटुंबालाही या दुष्काळाची झळ लागल्यामुळे, याकोब व त्याचे सबंध कुटुंब इजिप्तला (मिसर) राहायला आले. (उत्प. ४१:३९-४१; ४२:६) येथे याकोबाच्या वंशजांची संख्या खूप वाढली आणि त्यांना “राष्ट्रसमुदाय” असे म्हणण्यात आले.—उत्प. ४८:४; प्रेषितांची कृत्ये ७:१७ वाचा.

यहोवाने मुक्त केलेले लोक

४. सुरुवातीला इजिप्शियन लोकांचे इस्राएली लोकांसोबत कसे संबंध होते?

याकोबाचे वंशज इजिप्तमध्ये नाईल नदीजवळील गोशेन प्रांतात २०० वर्षांपेक्षा जास्त काळ राहिले. (उत्प. ४५:९, १०) यांतील जवळजवळ शंभर वर्षे इजिप्तच्या लोकांचे इस्राएली लोकांसोबत शांतिपूर्ण संबंध होते. इस्राएली लोक लहान-लहान नगरांमध्ये राहायचे आणि गुरेढोरे पाळायचे. खरे पाहता, इजिप्शियन लोक मेंढरे पाळणाऱ्यांचा तिरस्कार करायचे; पण इस्राएली लोकांना आपल्या देशात राहू देण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्यायच नव्हता. (उत्प. ४६:३१-३४) कारण, त्यांचा राजा फारो हा योसेफाचा आदर करत असल्यामुळे त्याने इस्राएली लोकांना इजिप्तला येऊन राहण्याचे निमंत्रण दिले होते.—उत्प. ४७:१-६.

५, ६. (क) इजिप्तमध्ये देवाच्या लोकांची परिस्थिती कशा प्रकारे बदलली? (ख) मोशेचा जीव कशा प्रकारे वाचला, आणि यहोवाने आपल्या लोकांसाठी काय केले?

पण, काही काळाने देवाच्या लोकांची परिस्थिती बदलली. इजिप्शियन लोकांनी इस्राएली लोकांना आपले गुलाम बनवले. बायबलमध्ये याबाबत असे सांगितले आहे: “पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. तो आपल्या लोकांना म्हणाला, पाहा, या इस्राएल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत; म्हणून मिसरी लोक इस्राएलवंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले; त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावत; आणि त्यांना हरतऱ्हेची कामे करायला लावत; असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला; कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत.”—निर्ग. १:८, ९, १३, १४.

या नव्या फारोने तर असा हुकूमदेखील काढला की कोणत्याही इब्री स्त्रीला मुलगा झाल्यास त्याला जन्मताच ठार मारले जावे. (निर्ग. १:१५, १६) याच सुमारास मोशेचा जन्म झाला. तो तीन महिन्यांचा असताना त्याच्या आईने त्याला नाईल नदीकाठच्या गवतात लपवले. तेथे फारोच्या मुलीला तो सापडला. तिने मोशेला दत्तक घेतले. मोशे लहानाचा मोठा होत असताना फारोच्या मुलीने त्याची आई, योखबेद हिला त्याचे संगोपन करण्याची परवानगी दिली. त्यामुळे, मोशे मोठा झाल्यावर तो यहोवाचा एकनिष्ठ सेवक बनला. (निर्ग. २:१-१०; इब्री ११:२३-२५) यहोवाने आपल्या लोकांच्या होत असलेल्या छळाकडे “लक्ष” दिले आणि मोशेद्वारे त्यांना इजिप्तमधून सोडवले. (निर्ग. २:२४, २५; ३:९, १०) अशा रीतीने, ते यहोवाने “उद्धरलेले,” म्हणजेच मुक्त केलेले लोक बनले.—निर्ग. १५:१३; अनुवाद १५:१५ वाचा.

देवाच्या लोकांपासून एक राष्ट्र बनले

७, ८. यहोवाचे लोक एक पवित्र राष्ट्र कसे बनले?

यहोवाने अद्याप इस्राएली लोकांना आपले नियम देऊन व याजकांची नेमणूक करून एका राष्ट्राच्या रूपात संघटित केले नव्हते. तरीसुद्धा, तो त्यांना आपले निवडलेले लोक समजत होता. म्हणूनच, यहोवाने मोशे व अहरोन यांना फारोला असे म्हणण्यास सांगितले: “इस्राएलाचा देव परमेश्वर सांगत आहे की, ‘माझ्या लोकांनी माझ्याप्रीत्यर्थ रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे.’”—निर्ग. ५:१.

पण, फारो काही केल्या इस्राएली लोकांना जाऊ देईना. तेव्हा आपल्या लोकांना सोडवण्यासाठी यहोवाने इजिप्तवर दहा पीडा आणल्या आणि नंतर फारो व त्याच्या सैन्याचा तांबड्या समुद्रात नाश केला. (निर्ग. १५:१-४) यानंतर तीन महिन्यांच्या आतच यहोवाने सीनाय पर्वताजवळ इस्राएली लोकांसोबत एक करार केला. त्या प्रसंगी त्याने त्यांना म्हटले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, . . . तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.”—निर्ग. १९:५, ६.

९, १०. (क) नियमशास्त्रामुळे इस्राएली लोक इतर राष्ट्रांपेक्षा कशा प्रकारे वेगळे ठरले? (ख) यहोवाची “खास प्रजा” होण्याकरता इस्राएली लोकांनी काय करायचे होते?

कित्येक शतकांपर्यंत यहोवाच्या सेवकांमध्ये सहसा कुलप्रमुखच आपापल्या घराण्यावर राज्य करायचे. ते न्यायनिवाडा करायचे आणि उपासनेत पुढाकार घेण्याद्वारे याजकाची भूमिकादेखील पार पाडायचे. इजिप्तमध्ये, गुलाम बनण्याआधी यहोवाच्या लोकांमध्ये हीच व्यवस्था पाळली जात होती. (उत्प. ८:२०; १८:१९; ईयो. १:४, ५) पण, त्यांना गुलामगिरीतून मुक्त केल्यावर यहोवाने त्यांना आपले नियमशास्त्र दिले. या नियमशास्त्रामुळे त्या काळच्या इतर सर्व राष्ट्रांपेक्षा इस्राएल राष्ट्र वेगळे ठरले. (अनुवाद ४:५-८ वाचा; स्तो. १४७:१९, २०) नियमशास्त्रानुसार, उपासनेत पुढाकार घेण्याकरता याजकांची नेमणूक करण्यात आली. तसेच, इस्राएल राष्ट्रात “वडीलवर्ग,” किंवा वडील जनही होते. ते ज्ञानी व अनुभवी असल्यामुळे सर्व लोक त्यांचा आदर करायचे. नियमशास्त्रानुसार, न्यायनिवाड्याचे काम या वडील जनांवर सोपवण्यात आले. (अनु. २५:७, ८) नियमशास्त्राद्वारे इस्राएली लोकांना त्यांच्या उपासनेसंबंधी व दैनंदिन जीवनासंबंधी सुस्पष्ट सूचना देण्यात आल्या.

१० इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याच्या बेतात होते तेव्हा यहोवाने पुन्हा एकदा त्याचे नियम त्यांना सांगितले. त्या प्रसंगी मोशे त्यांना म्हणाला: “परमेश्वराने आज तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हाला त्याने सांगितले आहे. इतर सर्व राष्ट्रांपेक्षा तो तुम्हाला महान करणार आहे. तो तुम्हाला प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करेल. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही त्याची खास प्रजा व्हाल.”—अनु. २६:१८, १९, ईझी-टू-रीड व्हर्शन.

परदेशीयांचाही स्वीकार

११-१३. (क) इस्राएली लोकांसोबत आणखी कोण यहोवाची उपासना करू लागले? (ख) यहोवाची उपासना करण्यास इच्छुक असलेल्या परदेशी व्यक्तीने काय करणे गरजेचे होते?

११ इस्राएली लोक हे पृथ्वीवरील यहोवाचे निवडलेले राष्ट्र असले, तरीही यहोवाने परदेशीयांना आपल्या लोकांमध्ये येऊन राहण्यास मनाई केली नाही. इस्राएलांची इजिप्तमधून सुटका करण्यात आली, तेव्हा यहोवाने इस्राएली नसलेल्या अनेक लोकांच्या ‘एका मोठ्या मिश्र समुदायाला’ त्यांच्यासोबत जाऊ दिले. यांत बरेच इजिप्शियन लोकदेखील होते. (निर्ग. १२:३८) यहोवाने इजिप्तवर आणलेल्या सातव्या पीडेच्या वेळी, “फारोच्या सेवकांपैकी” काहींनी यहोवाचे भय मानून त्याच्या आज्ञांचे पालन केले होते. साहजिकच हे लोकसुद्धा इस्राएली लोकांसोबत इजिप्तमधून बाहेर पडले असतील.—निर्ग. ९:२०.

१२ कनान देशाचा ताबा घेण्यासाठी यार्देन नदी पार करण्याच्या थोड्याच काळाआधी, मोशेने इस्राएली लोकांना सांगितले की त्यांनी आपल्यामधील “परदेशीयांवर प्रीती करावी.” (अनु. १०:१७-१९) जे विदेशी लोक मोशेने दिलेले मूलभूत नियम पाळण्यास तयार होते त्यांना आपल्यामध्ये राहू द्यावे असे देवाच्या लोकांना सांगण्यात आले होते. (लेवी. २४:२२) काही परदेशी लोक यहोवाचे उपासकदेखील बनले. उदाहरणार्थ, रूथ या मवाबी स्त्रीने यहोवाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने आपली इस्राएली सासू नामी हिला असे म्हटले, “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.” (रूथ १:१६) यहोवाची उपासना करू लागलेल्या या परदेशीयांना यहुदी मतानुसारी म्हटले जाऊ लागले. त्यांच्यातील पुरुषदेखील इस्राएली पुरुषांप्रमाणे सुंता करायचे. (निर्ग. १२:४८, ४९) यहोवाने आपल्या निवडलेल्या लोकांमध्ये या परदेशीयांचाही स्वीकार केला.—गण. १५:१४, १५.

इस्राएली लोक त्यांच्यामध्ये असलेल्या परदेशी लोकांशी प्रेमाने वागायचे (परिच्छेद ११-१३ पाहा)

१३ यहोवा परदेशी उपासकांचा स्वीकार करतो, ही गोष्ट शलमोनाने मंदिराच्या समर्पणाच्या वेळी केलेल्या प्रार्थनेतूनही दिसून येते. त्या प्रार्थनेत त्याने असे म्हटले: “तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझे मोठे नाव, बलिष्ठ हस्त व पुढे केलेला बाहू यास्तव परदेशाहून आला, आणि त्याने येऊन या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करेल ते कर; म्हणजे या भूतलावरील सर्व देशचे लोक तुझे नाव ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाव आहे हे त्यांना कळून येईल.” (२ इति. ६:३२, ३३) येशूच्या काळातही, एखाद्या परदेशी व्यक्तीला यहोवाची उपासना करण्याची इच्छा असल्यास तिने यहोवाच्या निवडलेल्या लोकांसोबत मिळून उपासना करणे गरजेचे होते.—योहा. १२:२०; प्रे. कृत्ये ८:२७.

यहोवाविषयी साक्ष देणारे राष्ट्र

१४-१६. (क) साक्षीदारांचे राष्ट्र बनण्याकरता इस्राएली लोकांनी काय करायचे होते? (ख) सध्याच्या काळातील यहोवाच्या लोकांची काय जबाबदारी आहे?

१४ इस्राएली लोक आपला देव यहोवा याची उपासना करायचे. पण, इतर राषट्रे आपापल्या देवांची उपासना करायचे. त्यामुळे, ‘खरा देव कोण आहे?’ असा प्रश्न उपस्थित झाला. यशयाच्या काळात यहोवाने म्हटले की न्यायालयात ज्याप्रमाणे न्यायिक प्रश्न सोडवले जातात त्याप्रमाणे या प्रश्‍नाचे उत्तर देण्यात यावे. जर राष्ट्रांचे देव खरे असतील तर त्यांनी ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपले साक्षीदार आणावेत. त्याने म्हटले: “सर्व राषट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत; अशा गोष्टी त्यांतला [त्यांच्या देवांपैकी] कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हाला ऐकवाव्या; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावे; त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे.”—यश. ४३:९.

१५ पण, राष्ट्रांचे देव आपले देवपण सिद्ध करू शकले नाहीत. हे देव म्हणजे केवळ मूर्ती होत्या. त्या बोलू शकत नव्हत्या आणि स्वतःहून आपल्या जागेवरून हलूही शकत नव्हत्या. (यश. ४६:५-७) दुसरीकडे पाहता, यहोवाने आपल्या लोकांना म्हणजेच इस्राएली लोकांना म्हटले: “तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात. माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. ‘मीच तो आहे,’ मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्याआधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल. . . . मी एकमेव आहे. दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. . . . तुम्हीच माझे साक्षीदार आहात.”—यश. ४३:१०-१२, ईझी-टू-रीड व्हर्शन.

१६ न्यायालयातील साक्षीदारांप्रमाणे यहोवाच्या लोकांनीही सर्व जगासमोर अशी साक्ष द्यायची होती, की यहोवा हाच खरा देव आहे. त्यांच्याकरता हा एक बहुमान होता. यहोवाने आपल्या लोकांविषयी म्हटले, “मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.” (यश. ४३:२१) यहोवाच्या लोकांना त्याच्या नावाने ओळखले जात होते. त्याने त्यांना इजिप्तमधून सोडवले होते. त्यामुळे, त्याची अशी अपेक्षा होती की त्यांनी स्वेच्छेने त्याच्या आज्ञा पाळाव्यात आणि त्याच्या सर्वोच्च अधिकाराचे समर्थन करावे. एका अर्थाने संदेष्टा मीखा याने सध्याच्या काळातील यहोवाच्या सेवकांविषयी नंतर जे भाकीत केले होते, त्यानुसार त्यांनी करावे अशी यहोवाची अपेक्षा होती; मीखाने असे लिहिले: “सर्व लोक, प्रत्येक आपापल्या देवाच्या नावाने असे चालतात, परंतु आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालत जाऊ.” (मीखा ४:५, पं.र.भा.) खरोखर, यहोवाच्या लोकांनी त्याच्याविषयी साक्ष देण्याच्या बहुमानाची कदर करायला हवी होती.

अविश्वासू ठरलेले लोक

१७. यहोवाच्या दृष्टीत इस्राएल ‘हीन जातीचा’ द्राक्षवेल कसे काय बनले?

१७ दुःखाची गोष्ट म्हणजे, इस्राएली लोक यहोवाला विश्वासू राहिले नाहीत. इतर राष्ट्रांचे अनुकरण करून तेसुद्धा लाकडाच्या व दगडाच्या मूर्ती तयार करून त्यांची उपासना करू लागले. खोट्या उपासनेकरता त्यांनी अनेक वेद्या उभारल्या. ख्रिस्त पृथ्वीवर येण्याच्या जवळजवळ आठशे वर्षांआधी संदेष्टा होशेय याने असे लिहिले: “इस्राएल उफाड्याने वाढणारा [हीन जातीचा] द्राक्षीचा वेल आहे, . . . त्याने जास्त वेद्या केल्या . . . त्यांचे हृदय बेइमान आहे, आता त्यांना प्रायश्‍चित्त मिळालेच पाहिजे.” (होशे. १०:१, २) याच्या जवळजवळ दीडशे वर्षांनंतर यिर्मया संदेष्ट्याने आपल्या भविष्यवाणीत, यहोवाचे त्याच्या लोकांना उद्देशून बोललेले हे शब्द लिहिले: “मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षालता लावली, ती तू माझ्यासमोर परदेशची हीन जातीची द्राक्षालता कशी झालीस? . . . तू आपणासाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला बचावतील की काय ते पाहा . . . माझे लोक . . . मला विसरले आहेत.”—यिर्म. २:२१, २८, ३२.

१८, १९. (क) यिर्मया संदेष्ट्याद्वारे यहोवाने काय भाकीत केले? (ख) पुढील लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

१८ इस्राएल राष्ट्राने चांगले फळ उत्पन्न केले नाही. दुसऱ्या शब्दांत, त्यांनी खरी उपासना करून यहोवाचे विश्वासू साक्षीदार या नात्याने त्याचे गौरव केले नाही. उलट मूर्तिपूजा करण्याद्वारे त्यांनी वाईट प्रतीचे फळ उत्पन्न केले. म्हणूनच, येशूने त्याच्या काळातील ढोंगी यहुदी धर्मपुढाऱ्यांना असे म्हटले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्त. २१:४३) यिर्मया संदेष्ट्याद्वारे यहोवाने असे भाकीत केले होते की भविष्यात तो एका नव्या राष्ट्रासोबत “नवा करार” करेल. या नव्या करारात सामील असणारे त्या नव्या राष्ट्राचे म्हणजेच आत्मिक इस्राएल राष्ट्राचे सदस्य असणार होते. त्यांच्याविषयी यहोवाने असे म्हटले: “मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”—यिर्म. ३१:३१-३३.

१९ इस्राएल राष्ट्र अविश्वासू ठरल्यानंतर, यहोवाने पहिल्या शतकात आत्मिक इस्राएल राष्ट्राला आपले खास लोक होण्याकरता निवडले. पण, आज यहोवाचे लोक कोण आहेत? आणि ज्यांना देवाची सेवा करण्याची इच्छा आहे ते त्याच्या खऱ्या उपासकांना कसे ओळखू शकतात? या प्रश्नांवर आपण पुढील लेखात चर्चा करू.