व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आता तुम्ही “देवाचे लोक” आहा

आता तुम्ही “देवाचे लोक” आहा

“तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहा.”—१ पेत्र २:१०.

१, २. पेन्टेकॉस्टच्या दिवशी कोणता बदल घडून आला, आणि यहोवाच्या नव्या राष्ट्रातील सदस्य कोण बनले? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

इसवी सन ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाच्या लोकांच्या इतिहासात फार मोठा बदल घडून आला. त्या दिवशी यहोवाने आत्मिक इस्राएल, किंवा ‘देवाचे इस्राएल’ हे नवे राष्ट्र अस्तित्वात आणले. (गलती. ६:१६) यहोवाने आपला पवित्र आत्मा ओतून या नव्या राष्ट्राच्या सदस्यांची निवड केली. अब्राहामाच्या वंशजांना ज्याप्रमाणे सुंता करावी लागायची, त्याप्रमाणे या नव्या राष्ट्रातील सदस्यांना सुंता करण्याची गरज नव्हती. पौलाने त्यांच्याविषयी असे लिहिले की त्यांची सुंता ही “अंतःकरणाची” म्हणजेच आध्यात्मिक स्वरूपाची आहे.—रोम. २:२९.

जेरूसलेम येथे माडीवरच्या खोलीत एकत्र आलेले येशूचे प्रेषित, तसेच इतर शंभरहून जास्त शिष्य देवाच्या नव्या राष्ट्राचे पहिले सदस्य बनले. (प्रे. कृत्ये १:१२-१५) त्यांच्यावर पवित्र आत्मा ओतण्यात आला तेव्हा ते देवाचे अभिषिक्त पुत्र बनले. (रोम. ८:१५, १६; २ करिंथ. १:२१) यहोवाने ख्रिस्ताच्या बलिदानाचा स्वीकार केला आहे आणि नियमशास्त्राच्या कराराची जागा आता नव्या कराराने घेतली आहे हे या घटनेवरून सिद्ध झाले. (लूक २२:२०; इब्री लोकांस ९:१५ वाचा.) अशा रीतीने, हे शिष्य यहोवाच्या नव्या राष्ट्राचे सदस्य म्हणजेच त्याचे नवे लोक बनले. पेन्टेकॉस्ट या यहुदी सणासाठी सबंध रोमी साम्राज्यातून कित्येक यहुदी व यहुदी मतानुसारी जेरूसलेमला आले होते. वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या या लोकांना प्रचार करण्यास, पवित्र आत्म्याने देवाच्या नव्या राष्ट्रातील सदस्यांना साहाय्य केले. त्यामुळे, या सर्व लोकांना आपापल्या भाषेत देवाच्या अद्भुत कार्यांविषयी ऐकायला मिळाले.—प्रे. कृत्ये २:१-११.

देवाचे नवे लोक

३-५. (क) पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने यहुद्यांना काय सांगितले? (ख) सुरुवातीच्या वर्षांत नव्या राष्ट्राची कशा प्रकारे वाढ झाली?

यहुदी व यहुदी मतानुसारी यांना देवाच्या नव्या राष्ट्राचे म्हणजेच ख्रिस्ती मंडळीचे सदस्य बनण्याचे निमंत्रण देण्याकरता यहोवाने प्रेषित पेत्राचा उपयोग केला. पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने यहुद्यांना अगदी निर्भयपणे सांगितले की ज्याला त्यांनी वधस्तंभाला खिळून मारले होते, त्या येशूला त्यांनी स्वीकारले पाहिजे; कारण त्याला “देवाने प्रभू व ख्रिस्त” केले आहे. लोकांनी पेत्राला जेव्हा विचारले की आता आम्ही काय करावे, तेव्हा पेत्राने त्यांना असे उत्तर दिले: “पश्‍चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.” (प्रे. कृत्ये २:२२, २३, ३६-३८) त्या दिवशी जवळजवळ ३,००० जण नव्या राष्ट्राचे, आत्मिक इस्राएलचे सदस्य बनले. (प्रे. कृत्ये २:४१) प्रेषितांनी पुढेही आपले आवेशी प्रचार कार्य सुरू ठेवल्यामुळे शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. (प्रे. कृत्ये ६:७) देवाचे नवे राष्ट्र वाढतच चालले होते.

नंतर, शोमरोनी लोकांनाही प्रचार करण्यात आला आणि त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. सुवार्तिक फिलिप्प याने त्यांच्यापैकी कित्येकांना बाप्तिस्मा दिला. पण, त्यांच्यावर लगेच पवित्र आत्मा आला नाही. तेव्हा, जेरूसलेममधील नियमन मंडळाने पेत्र व योहान या प्रेषितांना नव्या शोमरोनी शिष्यांकडे पाठवले. प्रेषितांनी “त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.” (प्रे. कृत्ये ८:५, ६, १४-१७) अशा प्रकारे, शोमरोनीसुद्धा आत्मिक इस्राएलचे अभिषिक्त सदस्य बनले.

पेत्राने कर्नेल्य व त्याचे घराणे यांना प्रचार केला (परिच्छेद ५ पाहा)

इसवी सन ३६ मध्ये यहोवाने पेत्राद्वारे आणखी एका गटाला आत्मिक इस्राएलचे सदस्य बनण्याचे निमंत्रण दिले. पेत्राने रोमी शताधिपती कर्नेल्य आणि त्याचे नातेवाईक व मित्र यांना प्रचार केला तेव्हा हे घडले. (प्रे. कृत्ये १०:२२, २४, ३४, ३५) बायबलमध्ये या घटनेविषयी असे सांगितले आहे: “पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले.” (प्रे. कृत्ये १०:४४, ४५) अशा प्रकारे, सुंता न झालेल्या विदेश्यांनाही आत्मिक इस्राएल या नव्या राष्ट्राचे सदस्य बनण्याची संधी देण्यात आली.

देवाच्या नावाकरता निवडलेले लोक

६, ७. यहोवाच्या नावाकरता निवडलेले लोक या नात्याने आत्मिक इस्राएलच्या सदस्यांनी काय केले?

इसवी सन ४९ या वर्षी झालेल्या नियमन मंडळाच्या एका सभेत शिष्य याकोबाने असे म्हटले: “परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने [पेत्राने] सांगितले आहे.” (प्रे. कृत्ये १५:१४) यहोवाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या लोकांत यहुद्यांचाच नव्हे, तर विदेश्यांचाही समावेश असणार होता. (रोम. ११:२५, २६क) नंतर पेत्राने असे लिहिले: “तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहा.” देवाच्या नावाकरता निवडलेले लोक या नात्याने त्यांनी काय केले पाहिजे याविषयी पेत्राने म्हटले: “तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; यासाठी की, ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” (१ पेत्र २:९, १०) ते देवाचे लोक असल्यामुळे त्यांनी देवाची स्तुती करणे आणि सर्व लोकांसमोर त्याच्या नावाचे गौरव करणे गरजेचे होते. विश्वाचा सर्वोच्च अधिकारी असलेल्या यहोवा देवाविषयी त्यांनी निर्भयपणे साक्ष द्यायची होती.

यहोवा आता त्याच्या नावाची घोषणा करण्याकरता आत्मिक इस्राएल या नव्या राष्ट्राचा उपयोग करत होता. प्राचीन इस्राएलाप्रमाणेच त्यांच्याविषयीही तो असे म्हणू शकत होता, की “मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.” (यश. ४३:२१) यहोवा हाच खरा देव आहे आणि इतर सर्व देव खोटे आहेत हे त्या सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी अगदी निर्भयपणे घोषित केले. (१ थेस्सलनी. १:९) त्यांनी “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत” यहोवाविषयी व येशूविषयी साक्ष दिली.—प्रे. कृत्ये १:८; कलस्सै. १:२३.

८. पौलाने पहिल्या शतकात कोणता इशारा दिला होता?

प्रेषित पौल हा पहिल्या शतकात यहोवाच्या नावाकरता निवडलेल्या लोकांतील एक अत्यंत धाडसी सदस्य होता. मूर्तिपूजक विद्वानांच्या एका जमावासमोर त्याने यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराविषयी धैर्याने साक्ष दिली. यहोवा “देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले [आणि] तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू” आहे असे त्याने त्या विद्वानांना सांगितले. (प्रे. कृत्ये १७:१८, २३-२५) पौलाचा तिसरा मिशनरी दौरा संपत आला होता, तेव्हा त्याने देवाच्या नावाकरता निवडलेल्या लोकांना असा इशारा दिला: “मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रे. कृत्ये २०:२९, ३०) पहिल्या शतकाच्या अखेरपर्यंत धर्मत्यागाविषयीची ही भविष्यवाणी खरी ठरण्यास सुरुवात झाली होती.—१ योहा. २:१८, १९.

९. प्रेषितांच्या मृत्यूनंतर काय घडले?

प्रेषितांच्या मृत्यूनंतर धर्मत्याग खूपच वाढला आणि परिणामस्वरूप ख्रिस्ती धर्मजगताचे वेगवेगळे पंथ अस्तित्वात आले. यहोवाच्या नावाकरता निवडलेले लोक या नात्याने त्याचे गौरव करणे तर दूरच, पण या धर्मत्यागी ख्रिश्चनांनी बायबलच्या कित्येक भाषांतरांतून देवाचे नावदेखील काढून टाकले. त्यांनी कितीतरी मूर्तिपूजक प्रथा स्वीकारल्या आहेत. तसेच, बायबलवर आधारित नसलेल्या शिकवणी, धर्माच्या नावाखाली लढलेली युद्धे आणि त्यांचे अनैतिक वर्तन यामुळे त्यांनी देवाच्या नावाचा घोर अनादर केला आहे. धर्मत्यागाला सुरुवात झाल्यानंतर कित्येक शतकांदरम्यान यहोवाचे काही मोजकेच विश्वासू उपासक पृथ्वीवर होते; पण, यहोवाच्या नावाकरता निवडलेला असा संघटित गट मात्र पृथ्वीवर नव्हता.

देवाच्या लोकांचा नव्याने जन्म

१०, ११. (क) गहू आणि निदण यांविषयीच्या दृष्टान्तात येशूने काय भाकीत केले? (ख) येशूच्या या दृष्टान्ताची पूर्णता कशा प्रकारे झाली आणि याचा परिणाम काय झाला?

१० धर्मत्यागामुळे खरा धर्म ओळखणे कठीण होऊन बसेल हे स्पष्ट करण्यासाठी येशूने गहू आणि निदणाच्या दृष्टान्ताचा वापर केला. त्याने म्हटले की मनुष्याचा पुत्र शेतात गहू पेरतो; पण, “लोक झोपेत असताना,” दियाबल त्या शेतात निदण पेरतो. ‘युगाच्या समाप्तीपर्यंत’ गहू आणि निदण सोबत वाढतात. या दृष्टान्ताचा अर्थ स्पष्ट करताना येशूने म्हटले की “चांगले बी” हे “राज्याचे पुत्र” आहेत. तर, “निदण” हे “दुष्टाचे पुत्र आहेत.” अंतसमयात, मनुष्याचा पुत्र ‘कापणी करणाऱ्यांना’ म्हणजेच देवदूतांना पाठवून गहू व निदण एकमेकांपासून वेगळे करेल. मग, देवदूत राज्याच्या पुत्रांना गोळा करतील. (मत्त. १३:२४-३०, ३६-४३) हे कशा रीतीने घडले? आणि यामुळे पृथ्वीवर आपल्या उपासकांना पुन्हा एकदा संघटित करणे यहोवाला कसे काय शक्य झाले?

११ येशूने ‘युगाची समाप्ती’ असे ज्याला म्हटले तो शेवटला काळ १९१४ मध्ये सुरू झाला. त्या वर्षी सुरू झालेल्या युद्धादरम्यान केवळ काही हजार अभिषिक्त ख्रिस्ती पृथ्वीवर होते. ‘राज्याचे हे पुत्र’ मोठ्या बाबेलच्या बंधनात अडकलेले होते. १९१९ मध्ये यहोवाने त्यांना खोट्या धर्माच्या बंधनातून मुक्त केले. त्या वेळी, अभिषिक्त ख्रिस्ती आणि जे बनावट ख्रिस्ती म्हणजेच “निदण” होते त्यांच्यातील फरक अगदी स्पष्टपणे दिसून आला. यहोवाने या ‘राज्याच्या पुत्रांना’ संघटित केले. यामुळे यशया संदेष्ट्याची पुढील भविष्यवाणी पूर्ण झाली: “देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय? परंतु सीयोनेने वेणा दिल्या, ती आपली मुले प्रसवली.” (यश. ६६:८) या ठिकाणी सीयोन ही आत्मिक प्राण्यांनी बनलेल्या यहोवाच्या संघटनेला सूचित करते. तिने “मुले प्रसवली” असे जे म्हटले आहे, ते केव्हा घडले? पृथ्वीवर अभिषिक्त पुत्रांना राष्ट्र या नात्याने संघटित करण्यात आले तेव्हा हे घडले.

१२. अभिषिक्त जन यहोवाच्या नावाकरता निवडलेले लोक आहेत असे का म्हणता येईल?

१२ सुरुवातीच्या ख्रिश्चनांप्रमाणेच आज “राज्याचे पुत्र” म्हणजेच अभिषिक्त जन यहोवाविषयी साक्ष देण्याकरता निवडलेले लोक आहेत. (यशया ४३:१, १०, ११ वाचा.) ते जगातील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. कारण, ते नेहमी ख्रिश्चनांना शोभेल असे वागतात आणि “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून” राज्याची सुवार्ता घोषित करतात. (मत्त. २४:१४; फिलिप्पै. २:१५) अशा रीतीने त्यांनी लाखो लोकांना यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत केली आहे.दानीएल १२:३ वाचा.

“आम्ही तुम्हाबरोबर येतो”

१३, १४. जे आत्मिक इस्राएलचे सदस्य नाहीत त्यांनी यहोवाची उपासना करायची असल्यास काय केले पाहिजे, आणि बायबलमधील भविष्यवाण्यांमध्ये याविषयी काय सांगण्यात आले होते?

१३ आपण याआधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, प्राचीन इस्राएल राष्ट्रात विदेशी लोकदेखील यहोवाची उपासना करू शकत होते. पण, त्यांनी यहोवाच्या निवडलेल्या लोकांसोबत मिळून त्याची उपासना करावी अशी एक अट होती. (१ राजे ८:४१-४३) त्याच प्रकारे, आजदेखील जे आत्मिक इस्राएलचे सदस्य नाहीत त्यांनी यहोवाच्या अभिषिक्त साक्षीदारांसोबत मिळून त्याची उपासना केली पाहिजे.

१४ अंतसमयात लोक मोठ्या संख्येने यहोवाच्या लोकांसोबत त्याची उपासना करण्यासाठी येतील हे प्राचीन काळातील दोन संदेष्ट्यांनी आधीच सांगितले होते. यशयाने अशी भविष्यवाणी केली: “देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू; कारण सीयोनेतून धर्मशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.” (यश. २:२, ३) त्याच प्रकारे जखऱ्या संदेष्ट्यानेही असे सांगितले होते, की “पुष्कळ लोक व समर्थ राषट्रे यरुशलेमेत सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास व परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील.” जखऱ्याने या लोकांचे वर्णन, “सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण” असे केले. हे लोक आत्मिक इस्राएलच्या सदस्यांसोबत यहोवाची उपासना करतील आणि असे म्हणतील: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जख. ८:२०-२३.

१५. “दुसरी मेंढरे” आत्मिक इस्राएलच्या सदस्यांबरोबर जातात, ते कोणत्या अर्थाने?

१५ “दुसरी मेंढरे” आत्मिक इस्राएलच्या सदस्यांबरोबर जातात, ते या अर्थाने की त्यांच्यासोबत मिळून ते राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतात. (मार्क १३:१०) अशा रीतीने तेदेखील देवाचे लोक बनतात. ही दुसरी मेंढरे आणि अभिषिक्त जन यांचा मिळून “एक कळप” आहे आणि “उत्तम मेंढपाळ” ख्रिस्त येशू याच्या नेतृत्वाखाली ते ऐक्याने कार्य करतात.—योहान १०:१४-१६ वाचा.

यहोवाच्या लोकांमध्ये राहून संरक्षण मिळवा

१६. हर्मगिदोनाच्या आधी यहोवा काय करेल?

१६ मोठ्या बाबेलचा नाश झाल्यानंतर देवाच्या लोकांवर एक मोठा हल्ला होईल. त्या वेळी, बचावासाठी आपल्याला यहोवाच्या संरक्षणाची नितान्त गरज असेल. यहोवाच्या लोकांवर होणाऱ्या या हल्ल्याची नेमकी वेळ तो स्वतः निवडेल आणि त्यानंतर लगेच ‘मोठ्या संकटाचा’ अंतिम टप्पा, म्हणजेच हर्मगिदोन सुरू होईल. (मत्त. २४:२१; यहे. ३८:२-४) त्या वेळी, गोग ‘राष्ट्रांतून जमा केलेल्या’ यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल. (यहे. ३८:१०-१२) गोगने हा हल्ला करताच यहोवा लगेच आपल्या लोकांचा बचाव करण्यासाठी मध्ये पडेल आणि गोग व त्याच्या सैन्याशी लढेल. अशा रीतीने यहोवा आपला सर्वोच्च अधिकार सिद्ध करेल आणि आपले नाव पवित्र करेल. यहोवा म्हणतो: “या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रगट करेन, आणि बहुत राष्ट्रांस माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांस समजेल की मी परमेश्वर [“यहोवा,” NW] आहे.”—यहे. ३८:१८-२३.

‘मोठ्या संकटादरम्यान’ आपण स्थानिक मंडळीच्या सर्व कार्यांत अगदी नियमितपणे सहभागी होत राहणे गरजेचे असेल (परिच्छेद १६-१८ पाहा)

१७, १८. (क) गोग हल्ला करेल तेव्हा यहोवा आपल्या लोकांना कोणते मार्गदर्शन देईल? (ख) यहोवाचे संरक्षण मिळवायचे असल्यास आपण काय केले पाहिजे?

१७ गोग देवाच्या लोकांवर हल्ला करेल तेव्हा यहोवा आपल्या सेवकांना सांगेल: “चला, माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” (यश. २६:२०) त्या अतिशय महत्त्वाच्या वेळी, संरक्षण मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे याबद्दल आवश्यक मार्गदर्शन यहोवा आपल्याला पुरवेल. या वचनात उल्लेख केलेल्या ‘खोल्या’ यहोवाच्या लोकांच्या स्थानिक मंडळ्यांशी संबंधित असू शकतात.

१८ त्यामुळे, जर आपल्याला मोठ्या संकटादरम्यान यहोवाचे संरक्षण मिळवायचे असेल, तर आज पृथ्वीवर यहोवाचे लोक आहेत आणि यहोवाने त्यांना मंडळ्यांमध्ये संघटित केले आहे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. तसेच, आपणदेखील यहोवाच्या लोकांसोबत आहोत हे आपण दाखवून दिले पाहिजे आणि आपल्या स्थानिक मंडळीच्या सर्व कार्यांत अगदी नियमितपणे सहभागी झाले पाहिजे. एका स्तोत्राच्या लेखकाप्रमाणे आपणही मनापासून असे म्हणू या: “तारण परमेश्वराच्या [“यहोवाच्या,”NW] हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो.”—स्तो. ३:८.