व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

प्रत्येक मंडळीत वडील व सेवा सेवक यांची नेमणूक कशा प्रकारे केली जाते?

पहिल्या शतकात प्रेषित पौलाने इफिस मंडळीतील वडिलांना असे सांगितले: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे.” (प्रे. कृत्ये २०:२८) तर मग, आजच्या काळात वडील व सेवा सेवक यांच्या नेमणुकीसंबंधी पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे?

पहिली गोष्ट म्हणजे, वडील व सेवा सेवक म्हणून कार्य करण्यासाठी एका बांधवाने कोणत्या पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत, याविषयी लिहिण्यास पवित्र आत्म्याने बायबलच्या लेखकांना प्रेरित केले. १ तीमथ्य ३:१-७ या वचनांत वडील म्हणून सेवा करण्यासाठी आवश्यक असलेल्या १६ गोष्टींची यादी देण्यात आली आहे. तसेच, तीत १:५-९ व याकोब ३:१७, १८ यांत आणखी काही पात्रतांविषयी सांगण्यात आले आहे. सेवा सेवक बनण्यासाठी लागणाऱ्या पात्रता १ तीमथ्य ३:८-१०, १२, १३ या वचनांत दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, जे बांधवांची शिफारस आणि नेमणूक करतात ते खासकरून यहोवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतात. एखादा बांधव बायबलमध्ये सांगितलेल्या पात्रता वाजवी प्रमाणात पूर्ण करतो किंवा नाही याचे परीक्षण करताना ते यहोवाच्या आत्म्याची मदत मागतात. तिसरी गोष्ट म्हणजे, ज्या बांधवाची शिफारस केली जाते त्याने आपल्या जीवनात देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ प्रदर्शित करणे गरजेचे आहे. (गलती. ५:२२, २३) अशा रीतीने, वडील व सेवा सेवक यांची नेमणूक करण्याच्या सर्व पैलूंत देवाच्या आत्म्याचा सहभाग असतो.

पण मग, बांधवांची नेमणूक करण्याची जबाबदारी कोणाची आहे? यापूर्वी, वडील व सेवा सेवक म्हणून नेमणूक करण्यासंबंधी सर्व शिफारशी शाखा कार्यालयाला पाठवल्या जायच्या. शाखा कार्यालयात, नियमन मंडळाने नियुक्त केलेले बांधव या शिफारशींवर विचार करून योग्य बांधवांची नेमणूक करायचे. यानंतर, शाखा कार्यालय वडीलवर्गाला याविषयी कळवायचे. वडील मग त्या बांधवांना त्यांची नेमणूक केली जात आहे हे सांगायचे आणि ही नेमणूक स्वीकारण्यास ते तयार आहेत का आणि खरोखरच पात्र आहेत का असे विचारायचे. शेवटी, अमुक बांधवाला वडील किंवा सेवा सेवक म्हणून नेमण्यात आले आहे असे मंडळीला घोषणेद्वारे कळवले जायचे.

पण, पहिल्या शतकात या नेमणुका कशा प्रकारे केल्या जायच्या? काही वेळा, प्रेषित काही बांधवांना एखादे खास कार्य करण्यासाठी नियुक्त करायचे. उदाहरणार्थ, विधवांना दररोज अन्नाचे वाटप करण्यासाठी त्यांनी सात पुरुषांना नेमले होते. (प्रे. कृत्ये ६:१-६) पण, हे पुरुष कदाचित याआधीच वडील म्हणून सेवा करत असावेत.

त्या काळी प्रत्येक नेमणूक कशा रीतीने केली जायची यासंबंधी जरी बायबलमध्ये सविस्तर वर्णन केलेले नसले, तरीसुद्धा काही अहवाल वाचल्यानंतर आपल्याला यासंबंधी थोडीफार माहिती नक्कीच मिळते. आपण असे वाचतो की पौल व बर्णबा त्यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यावरून परतत असताना, “त्यांनी . . . प्रत्येक मंडळीत वडील निवडले [“नेमले,” पं.र.भा.]; आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले.” (प्रे. कृत्ये १४:२३) अनेक वर्षांनंतर, पौलाने त्याचा प्रवासातील सोबती तीत याला असे लिहिले: “मी तुला क्रेतात यासाठी ठेवून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे.” (तीत १:५) त्याच प्रकारे तीमथ्य, ज्याने प्रेषित पौलासोबत अनेकदा प्रवास केला, त्यालादेखील पौलाने वडिलांना नेमण्याचा अधिकार दिला होता असे दिसते. (१ तीम. ५:२२) तर मग, हे स्पष्टच आहे की या नेमणुका जेरूसलेममध्ये असलेले प्रेषित व वडीलजन नव्हेत, तर प्रवासी पर्यवेक्षक करत होते.

पहिल्या शतकात नेमणुका कशा प्रकारे केल्या जायच्या हे लक्षात घेऊन यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने वडील व सेवा सेवक यांची नेमणूक करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. १ सप्टेंबर २०१४ पासून नेमणुका पुढीलप्रमाणे केल्या जात आहेत: प्रत्येक विभागीय पर्यवेक्षक त्यांच्या विभागात करण्यात येत असलेल्या शिफारशींवर काळजीपूर्वक विचार करतात. मंडळ्यांना भेटी देताना, ते शिफारस करण्यात आलेल्या बांधवांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. शक्य असल्यास, ते त्यांच्यासोबत क्षेत्रसेवेत काम करण्याचा प्रयत्न करतील. शिफारस केलेल्या बांधवांविषयी मंडळीच्या वडीलवर्गासोबत चर्चा केल्यानंतर, विभागातील मंडळ्यांत वडील व सेवा सेवक यांची नेमणूक करण्याची जबाबदारी विभागीय पर्यवेक्षकांची असेल. या पद्धतीचा अवलंब करण्याद्वारे आपण पहिल्या शतकातील पद्धतीचे अधिक जवळून अनुकरण करत आहोत.

बायबलमध्ये दिलेल्या पात्रतांच्या आधारावर एका बांधवाविषयी मंडळीतील वडील विभागीय पर्यवेक्षकांशी चर्चा करत आहेत (मलावी)

बांधवांच्या नेमणुकीसंबंधी असणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका कोण पार पाडतात? पूर्वीप्रमाणेच, परिवाराला यथाकाळी आध्यात्मिक अन्न पुरवण्याची जबाबदारी ही मुख्यतः विश्वासू व बुद्धिमान दासाची आहे. (मत्त. २४:४५-४७) यासाठी, ते पवित्र आत्म्याच्या साहाय्याने बायबलचा सखोल अभ्यास करतात; आणि जगभरातील मंडळीचे कार्य कशा प्रकारे चालवले जावे याविषयी बायबलमधील तत्त्वे लागू करण्यासंबंधी व्यावहारिक मार्गदर्शन देतात. विश्वासू दास सर्व विभागीय पर्यवेक्षकांची व शाखा समितीतील सदस्यांचीही नेमणूक करतो. शाखा कार्यालय विश्वासू दासाच्या मार्गदर्शनानुसार कार्य करण्यासंबंधी मंडळ्यांना व्यावहारिक मदत पुरवते. बांधवांची शिफारस करण्याआधी बायबलमध्ये दिलेल्या सर्व पात्रतांचे चांगल्या प्रकारे परीक्षण करण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी मंडळीतील वडीलवर्गावर आहे. मग, वडिलांनी शिफारस केलेल्या बांधवांविषयी काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर, पात्र ठरणाऱ्या बांधवांची नेमणूक करण्याची गंभीर जबाबदारी प्रत्येक विभागीय पर्यवेक्षकाची आहे.

यहोवाच्या संघटनेत बांधवांच्या नेमणुका कशा प्रकारे केल्या जातात हे जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा या सगळ्या प्रक्रियेत पवित्र आत्म्याची भूमिका आपल्याला अधिक स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे, ख्रिस्ती मंडळीत ज्यांना नेमण्यात आले आहे त्यांच्याविषयी आपल्या मनात अधिक भरवसा व आदर निर्माण होतो.—इब्री १३:७, १७.

प्रकटीकरणाच्या ११ व्या अध्यायात उल्लेख करण्यात आलेले दोन साक्षीदार कोणाला सूचित करतात?

प्रकटीकरण ११:३ यात दोन साक्षीदारांबद्दल सांगण्यात आले आहे. हे दोन साक्षीदार १,२६० दिवस संदेश सांगण्याचे काम करतील असे या वचनात सांगितले आहे. यानंतर असे म्हणण्यात आले आहे की श्वापद “त्यांस जिंकून जिवे मारेल.” पण, “साडेतीन दिवसांनंतर” या दोन साक्षीदारांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि हे पाहून सर्वांना खूप आश्चर्य होईल.—प्रकटी. ११:७, ११.

हे दोन साक्षीदार कोणाला सूचित करतात? प्रकटीकरणाच्या ११ व्या अध्यायात उल्लेख केलेल्या काही गोष्टी आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्यास मदत करतात. पहिली गोष्ट म्हणजे, त्या दोन साक्षीदारांची तुलना “जैतुनाची दोन झाडे व दोन समया” यांच्याशी करण्यात आली आहे. (प्रकटी. ११:४) यावरून आपल्याला जखऱ्याच्या भविष्यवाणीत उल्लेख करण्यात आलेल्या दीपवृक्षाची आणि दोन जैतुनाच्या झाडांची आठवण होते. ही जैतुनाची झाडे “अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे . . . दोन अभिषिक्त,” म्हणजेच प्रांताधिकारी जरूब्बाबेल आणि मुख्य याजक यहोशवा यांना सूचित करत होती. (जख. ४:१-३, १४) दुसरी गोष्ट म्हणजे, प्रकटीकरणातील दोन साक्षीदार मोशे व एलीया यांच्याप्रमाणे अद्भुत कृत्ये करतात असेही सांगण्यात आले आहे.—प्रकटीकरण ११:५, ६; गणना १६:१-७, २८-३५; आणि १ राजे १७:१; १८:४१-४५ पडताळून पाहा.

या अहवालांमध्ये कोणती समान गोष्ट आढळते? प्रत्येक अहवालात, परीक्षेच्या कठीण काळात देवाच्या लोकांचे नेतृत्व करणाऱ्या त्याच्या अभिषिक्त जनांचा उल्लेख करण्यात आला आहे. याचा अर्थ, प्रकटीकरणाच्या ११ व्या अध्यायात उल्लेख करण्यात आलेले दोन साक्षीदार हे १९१४ मध्ये देवाच्या लोकांचे नेतृत्व करत असलेल्या अभिषिक्त बांधवांना सूचित करतात. १९१४ या वर्षी स्वर्गात देवाचे राज्य स्थापित झाले त्या वेळी या अभिषिक्त बांधवांनी भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे, साडेतीन वर्षांपर्यंत “तरट पांघरून” राज्याचा संदेश घोषित केला.

तरट पांघरून राज्याचा संदेश घोषित करण्याचा साडेतीन वर्षांचा काळ संपला तेव्हा या अभिषिक्त जनांना तुरुंगात टाकण्यात आले. अशा रीतीने, लाक्षणिक अर्थाने त्यांना जिवे मारण्यात आले. त्यांना फक्त थोड्या काळापुरतेच, म्हणजे लाक्षणिक रीत्या साडेतीन दिवसांपर्यंत तुरुंगात राहावे लागले. यादरम्यान, अभिषिक्त बांधवांचे प्रचार कार्य पूर्णपणे बंद पडले आहे असे वाटून देवाच्या लोकांच्या शत्रूंना खूप आनंद झाला.—प्रकटी. ११:८-१०.

पण, भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे साडेतीन दिवसांच्या शेवटी त्या दोन साक्षीदारांना पुन्हा जिवंत करण्यात आले. हे कशा प्रकारे घडले? तुरुंगात असलेल्या अभिषिक्त बांधवांची फक्त सुटकाच झाली नाही, तर त्या परीक्षेच्या काळात जे विश्वासू राहिले त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून एका खास कार्यासाठी नियुक्तदेखील करण्यात आले. शेवटल्या काळादरम्यान देवाच्या लोकांचे आध्यात्मिक रीत्या पालनपोषण करण्यासाठी ज्यांना १९१९ मध्ये ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ म्हणून नेमण्यात आले, त्या बांधवांत त्यांचादेखील समावेश होता.—मत्त. २४:४५-४७; प्रकटी. ११:११, १२.

आणखी एक विशेष लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, प्रकटीकरण ११:१, २ या वचनांत असे सांगितले आहे की वरील घटना घडतात त्याचदरम्यान आध्यात्मिक मंदिराचे मोजमाप किंवा तपासणी केली जाते. मलाखीच्या ३ ऱ्या अध्यायातदेखील आध्यात्मिक मंदिराच्या तपासणीचा आणि त्यानंतर होणाऱ्या शुद्धीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. (मला. ३:१-४) ही तपासणी व शुद्धीकरण किती काळ चालले? ते १९१४ पासून १९१९ च्या सुरुवातीच्या काळापर्यंत चालू राहिले. या कालावधीत प्रकटीकरणाच्या ११ व्या अध्यायात उल्लेख करण्यात आलेली साडेतीन वर्षे (१,२६० दिवस, किंवा ४२ महिने) तसेच, लाक्षणिक साडेतीन दिवसदेखील समाविष्ट आहेत.

यहोवाने हे आध्यात्मिक शुद्धीकरण घडवून आणले आणि अशा रीतीने चांगल्या कामांत आवेशी असलेले खास लोक स्वतःसाठी शुद्ध केले याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! (तीत २:१४) तसेच, ज्या अभिषिक्त बांधवांनी एका परीक्षेच्या काळात देवाच्या लोकांचे नेतृत्व करण्याद्वारे, लाक्षणिक अर्थाने दोन साक्षीदारांची भूमिका पार पाडली त्यांच्या उत्तम उदाहरणाचीही आपण मनापासून कदर करतो. *

^ परि. 18 अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज १५ जुलै २०१३, पृष्ठ २२, परिच्छेद १२ पाहा.