व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यातील तुमचा आवेश टिकवून ठेवा

सेवाकार्यातील तुमचा आवेश टिकवून ठेवा

सुवार्तेचा प्रचार करणं हे आज पृथ्वीवर होत असलेलं सर्वात महत्त्वाचं काम आहे. शिक्षण देण्याच्या या कार्यात यहोवाचे सेवक या नात्यानं काम करणं हा खरंतर एक बहुमान आहे. पण, कधीकधी अशी वेळ येते जेव्हा पायनियर आणि प्रचारक यांना सेवाकार्यात त्यांचा आवेश टिकवून ठेवणं कठीण जातं. पण, असं का होत असावं?

सेवाकार्यातील तुमचा आवेश टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला मदत करतील?

काही प्रचारकांच्या लक्षात आलं आहे की सहसा लोक घरी नसल्यामुळे जास्त लोकांना सुवार्ता सांगणं शक्य होत नाही. शिवाय, लोक घरी असले तरी काहींना सुवार्ता ऐकून घेण्याची इच्छा नसते किंवा रागही येतो. काही प्रचारकांचं क्षेत्र खूप मोठं आहे. आणि तिथले लोक जरी चांगला प्रतिसाद देत असले, तरी क्षेत्रातील सर्वांना प्रचार करणं आपल्याला शक्यच नाही अशा काळजीनं ते निराश होतात. शिवाय, काही तर असेही आहेत जे अनेक वर्षांपासून सुवार्ता सांगत आहेत, पण अजूनही अंत आला नाही म्हणून त्यांचा आवेश कमी झाला आहे.

सेवाकार्य करताना समस्या या येतीलच. या समस्यांमुळे आपला आवेश कमी होऊ शकतो. खरंतर, आज आपण अशा जगात राहत आहोत ज्यावर सैतानाचा ताबा आहे. त्यामुळे, सुवार्ता सांगणं आपल्यासाठी सोपं नसणार हे अपेक्षितच आहे.—१ योहा. ५:१९.

सेवाकार्य करताना तुमच्यासमोर कोणतीही समस्या आली, तरी यहोवा तुम्हाला तिचा सामना करण्यास मदत करेल असा भरवसा तुम्ही बाळगू शकता. पण, सेवाकार्यातील आवेश वाढवण्यासाठी काय करता येईल? आता आपण काही मार्गांचा विचार करू या.

नवीन प्रचारकांना मदत करा

दरवर्षी हजारो लोक बाप्तिस्मा घेऊन यहोवाचे साक्षीदार बनतात. तुमचा नुकताच बाप्तिस्मा झाला असेल तर जे अनेक वर्षांपासून प्रचारक आहेत त्यांच्याकडून तुम्ही बरंच काही शिकू शकता. पण, तुम्ही अनेक वर्षांपासून प्रचारक असलेल्यांपैकी आहात का? असं असेल तर तुम्ही नवीन प्रचारकांना मदत करू शकता. असं केल्यानं तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि तुमचा आवेशही वाढेल.

प्रभावी शिक्षक बनण्याकरता शिष्यांना प्रशिक्षणाची गरज आहे हे येशूला माहीत होतं. त्यामुळे, प्रचार कसा करावा हे येशूनं शिष्यांना दाखवलं. (लूक ८:१) आजदेखील नवीन लोकांना अशाच प्रकारच्या मदतीची गरज आहे. मदत मिळाल्यास तेही चांगले शिक्षक बनू शकतील.

एखादा नवीन प्रचारक सेवाकार्यात जातो याचा अर्थ तो आपोआपच सर्वकाही शिकेल असं नाही. तर, त्याला एका प्रेमळ आणि दयाळू शिक्षकाच्या वैयक्तिक मदतीची गरज असते. एक अनुभवी प्रचारक, नवीन प्रचारकाला पुढील बाबतींत मदत करू शकतो: (१) घरमालकाशी कसं बोलावं याची तयारी व सराव करण्यासाठी, (२) लोकांशी संभाषण करण्यासाठी, (३) प्रकाशनं सादर करण्यासाठी, (४) आस्थेवाईक लोकांना पुन्हा भेट देण्यासाठी आणि (५) बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी. तसंच, अनुभवी प्रचारकाच्या शिकवण्याच्या पद्धतीकडे जेव्हा नवीन प्रचारक लक्ष देतो आणि त्याचं अनुकरण करतो तेव्हा तो एक चांगला शिक्षक बनतो. (लूक ६:४०) नवीन प्रचारकाला अशा प्रकारे मदत केली जाते तेव्हा त्याची भीती कमी होते. कारण, मदतीची गरज पडल्यास आपल्याला ती मिळेल अशी खात्री त्याला असते. तसंच, नवीन प्रचारकाची प्रशंसा केल्यानं आणि काही चांगले सल्ले दिल्यानंदेखील त्याला मदत मिळू शकते.—उप. ४:९, १०.

सेवाकार्यात आपल्या सोबत्याशी बोला

कधीकधी प्रचारकार्यात लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूनही ते आपलं ऐकून घेत नाहीत. एखाद्या दिवशी कोणाशीही चांगली चर्चा होऊ शकली नाही, तरी निराश होऊ नका. प्रचारकार्यादरम्यान तुमच्या सोबत्याशी तुम्ही जे काही बोलता त्यातूनही तुम्हाला बरंच उत्तेजन मिळू शकतं. येशूनं आपल्या शिष्यांना एकटं नाही तर “दोघे दोघे” असं पाठवलं होतं. (लूक १०:१) सोबत मिळून काम केल्यामुळे शिष्य एकमेकांना उत्तेजन आणि प्रोत्साहन देऊ शकतील हे त्याला माहीत होतं. त्याच प्रकारे आजदेखील आपण आपल्या बांधवांसोबत आणि बहिणींसोबत मिळून काम करतो. तेव्हा, आपल्याजवळही एकमेकांना प्रोत्साहन देण्याची चांगली संधी आहे.—रोम. १:१२.

सेवाकार्यादरम्यान आपल्या सोबत्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोला. जसं की: सेवाकार्यात आलेला एखादा चांगला अनुभव; वैयक्तिक किंवा कौटुंबिक अभ्यासादरम्यान शिकलेला एखादा नवीन मुद्दा किंवा सभेत ऐकलेली एखादी प्रोत्साहनदायक गोष्ट. कधीकधी ज्या प्रचारकासोबत आपण काम करत असतो त्याच्याशी आपली चांगली ओळख नसते. अशा वेळी तुम्ही त्याला विचारू शकता, की त्याला सत्य कसं मिळालं? हीच यहोवाची संघटना आहे याची खात्री त्याला कशामुळे पटली? यहोवाच्या सेवेत त्याला कोणते आशीर्वाद मिळाले आहेत? कोणते चांगले अनुभव आले आहेत? कदाचित तुम्ही यहोवाच्या सेवेतील तुमचा एखादा अनुभव त्याला सांगू शकता. प्रचार करताना क्षेत्रात कसाही प्रतिसाद मिळाला, तरी जोडीदारासोबत मिळून प्रचार करताना तुमच्याजवळ “एकमेकांची उन्नती” करण्याची अर्थात एकमेकांना उत्तेजन देण्याची चांगली संधी असते.—१ थेस्सलनी. ५:११.

तुमच्या वैयक्तिक अभ्यासाचा दर्जा वाढवा

सेवाकार्यातील आवेश टिकवून ठेवण्यासाठी वैयक्तिक अभ्यासाचा दर्जा वाढवणं गरजेचं आहे. आपण ज्यांवर अभ्यास करू शकतो अशा अनेक विषयांची माहिती “विश्वासू व बुद्धिमान” दासाद्वारे प्रकाशित केली जाते. (मत्त. २४:४५) अशा एका विषयाचे उदाहरण पाहू या: प्रचार करणं इतकं महत्त्वाचं का आहे? याची काही कारणं, “सेवाकार्यात आवेश टिकवून ठेवणं का महत्त्वाचं?” या चौकटीत दिली आहेत.

चौकटीत दिलेल्या या मुद्द्यांचं परीक्षण केल्यास आवेशानं प्रचार करत राहण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुमच्या वैयक्तिक अभ्यासामध्ये, आवेशानं प्रचार करण्याचं उत्तेजन देणारी आणखी काही शास्त्रवचनं तुम्ही शोधू शकता. त्यानंतर ही वचनं तुम्हाला कशी मदत करू शकतात यावर विचार करा. असं केल्यास, सेवाकार्यातील तुमचा आवेश आणखी वाढेल.

प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरा

सेवाकार्यातील आपली कौशल्ये वाढवण्याकरता यहोवाची संघटना आपल्याला नेहमी वेगवेगळे मार्ग सुचवत असते. उदाहरणार्थ, आपल्या घरोघरच्या साक्षकार्यासोबतच, पत्राद्वारे, टेलिफोनद्वारे, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, व्यापार क्षेत्रात किंवा अनौपचारिक साक्षकार्य करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा आपण वापर करू शकतो. कदाचित जिथं फार कमी किंवा कोणीच साक्षीदार बांधव नाहीत अशा ठिकाणी जाऊन साक्षकार्य करण्याची योजनादेखील आपण करू शकतो.

अशा नवनवीन मार्गांचा तुम्ही वापर करणार का? अशा मार्गांचा वापर ज्यांनी केला, त्यांना चांगलं यश मिळालं आहे. पुढील तीन उदाहरणांचा विचार करा.

बायबल अभ्यास कसा सुरू करावा याविषयी राज्य सेवा यातील एका लेखात काही गोष्टी सुचवण्यात आल्या होत्या. एप्रिल नावाच्या एका बहिणीनं या सूचना लागू केल्या. तिनं तिच्यासोबत काम करणाऱ्या तीन व्यक्तींना बायबल अभ्यास घेण्याविषयी विचारलं. तेव्हा त्या तिघांनी होकार दिला व त्या सर्वांनी मंडळीच्या सभांनाही यायला सुरुवात केली. हे पाहून त्या बहिणीला किती आनंद झाला असेल!

आपल्या मासिकांतील विशिष्ट लेख ज्यांना आवडतील अशा लोकांना शोधण्याचं आपल्याला नेहमी उत्तेजन दिलं जातं. गाड्यांच्या टायरविषयी असाच एक लेख अवेक! मासिकामध्ये आला होता. तेव्हा अमेरिकेतील एका विभागीय पर्यवेक्षकानं, ठराविक भागातील प्रत्येक टायर दुकानाच्या मॅनेजरला भेटून या लेखावर चर्चा करण्याचं ठरवलं. यासोबतच ‘आपल्या डॉक्टरांना समजून घ्या’ असा विषय असलेलं अवेक! मासिक त्यांनी व त्यांच्या पत्नीनं जवळपास १०० रुग्णालयांमध्ये जाऊन दिलं. बांधव म्हणतात की अशा रीतीनं लोकांना जाऊन भेटल्यामुळे, आपल्या साक्षकार्याबद्दल आणि साहित्याबद्दल जाणून घेण्यास त्यांना मदत होते. त्या ठिकाणी असलेल्या लोकांशी ओळख करून घेतल्यामुळे त्यांना व त्यांच्या पत्नीला आणखी जास्त पुनर्भेटी करणं शक्य झालं आहे.

ज्यूडी नावाच्या बहिणीनं जागतिक मुख्यालयाला एक पत्र लिहिलं. त्यात तिनं टेलिफोनद्वारे साक्षकार्य करण्यासाठी आपल्याला जे उत्तेजन दिलं जातं त्याबद्दल आभार मानले. ती म्हणते की माझी आई ८६ वर्षांची आहे व तिला आरोग्याच्या बऱ्याच समस्या आहेत. पण तरीसुद्धा ती नियमितपणे लोकांना टेलिफोनद्वारे साक्ष देत असते. याचा परिणाम असा झाला की तिनं एका स्त्रीसोबत अभ्यास सुरू केला, जिचं वय ९२ होतं!

साक्षकार्यासाठी आपल्या प्रकाशनांमध्ये सुचवण्यात आलेले हे पर्याय खरंच फायद्याचे आहेत. त्यांचा वापर करा! त्यामुळे साक्षकार्यातील तुमचा आवेश नक्कीच टिकून राहील.

पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवा

प्रचारकार्यातील यश कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे असं तुम्हाला वाटतं? आपण प्रचारकार्यात किती प्रकाशनं देतो, किती लोकांसोबत बायबल अभ्यास करतो किंवा किती लोकांना यहोवाचे साक्षीदार बनण्याकरता मदत करतो यावर आपलं यश अवलंबून आहे का? मुळीच नाही. नोहाचा विचार करा. त्याच्या स्वतःच्या कुटुंबातील लोक सोडले तर आणखी किती लोकांना त्यानं यहोवाचे उपासक बनण्याकरता मदत केली? तरीसुद्धा तो नक्कीच एक यशस्वी प्रचारक होता. त्याच प्रकारे आपलं यशदेखील विश्वासूपणे यहोवाची सेवा करण्यावर अवलंबून आहे.—१ करिंथ. ४:२.

बऱ्याच प्रचारकांना असं लक्षात आलं आहे, की पूर्ण करता येतील अशी ध्येयं आपण ठेवली तरच प्रचारकार्यातला आपला आवेश टिकून राहतो. मग आपण अशी कोणती ध्येयं समोर ठेवू शकतो? “पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवा” असं शीर्षक असलेल्या चौकटीत काही ध्येयं सुचवण्यात आली आहेत.

तुमचं साक्षकार्य फलदायी आणि अर्थपूर्ण बनवण्याकरता यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा. तुमचं ध्येय पूर्ण झाल्यावर तुम्हाला या गोष्टीचं समाधान वाटेल की तुम्ही सुवार्तेसाठी होताहोईल तितके परिश्रम घेत आहात.

हे खरं आहे, की सुवार्तेचा प्रचार करणं हे नेहमीच सोपं नसतं. पण या कार्यात नेहमी आवेशी राहण्याकरता बरंच काही करण्यासारखं आहे. जसं की सेवाकार्यात तुमच्या सोबत्याशी उभारणीकारक गोष्टी बोलणं, न चुकता अर्थपूर्ण वैयक्तिक अभ्यास करणं, विश्वासू आणि बुद्धिमान दास सुचवत असलेल्या पद्धतींना लागू करणं आणि साध्य करता येतील अशी ध्येयं ठेवणं. पण या सर्वांहून महत्त्वाचं म्हणजे हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवा देवानं तुम्हाला त्याचा साक्षीदार या नात्यानं सुवार्ता सांगण्याचा मोठा सन्मान दिला आहे. (यश. ४३:१०) तर मग, सेवाकार्यातील आपला आवेश नेहमी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत राहा, यामुळे तुम्हाला नक्कीच खूप आनंद मिळेल!