व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या संग्रहातून

“अत्यंत महत्त्वाचा काळ”

“अत्यंत महत्त्वाचा काळ”

१८७० साली अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया राज्यातील पिट्सबर्ग (अॅलिगेनी) इथं एका लहान गटानं वेगवेगळ्या विषयांवर बायबल काय शिकवते याचा अभ्यास करण्यास सुरवात केली. बंधू चार्ल्स टेझ रस्सल यांच्या मार्गदर्शनाखाली या गटानं येशूच्या खंडणी बलिदानाविषयी सखोल अभ्यास केला. त्यांना समजलं की यहोवाच्या उद्देशात येशूच्या खंडणी बलिदानाची खूप महत्त्वाची भूमिका आहे. या खंडणीमुळे सर्वांसाठी तारणाचा मार्ग खुला झाला आहे; ज्यांनी अजून येशूबद्दल ऐकलेलं नाही त्यांनाही खंडणीमुळे तारण मिळणं शक्य आहे हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला! खंडणीबद्दल समजलेल्या या सत्याची त्यांना मनापासून कदर वाटत असल्यामुळे त्यांनी दरवर्षी येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याचं ठरवलं.—१ करिंथ. ११:२३-२६.

पुढे बंधू रस्सल यांनी झायन्स वॉच टावर हे नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरवात केली. खंडणी बलिदान देवाच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे, या शिकवणीवर या नियतकालिकानं नेहमीच भर दिला. त्यात स्मारकविधीच्या काळाला “अत्यंत महत्त्वाचा काळ” असं म्हणण्यात आलं आणि वाचकांना स्मारकविधी साजरा करण्याचं उत्तेजन देण्यात आलं. त्यासाठी त्यांनी एकतर पिट्सबर्ग इथं येऊन किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊन तो साजरा करावा असं सांगण्यात आलं. येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास असलेली केवळ दोघं-तिघं किंवा एखादा जरी असला तरी एका अर्थानं येशू त्यांच्यासोबत असेल असंही या नियतकालिकात म्हणण्यात आलं.

दरवर्षी अधिकाधिक लोक स्मारकविधीसाठी पिट्सबर्गला येऊ लागले. “तुमचं अगदी मनापासून स्वागत केलं जाईल,” असं स्मारकविधीच्या निमंत्रण पत्रिकेत म्हणण्यात आलं. आणि खरोखरच, पिट्सबर्गमधल्या बायबल विद्यार्थ्यांनी अगदी आनंदानं आपल्या आध्यात्मिक बांधवांची आणि बहिणींची राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली. १८८६ च्या स्मारकविधीच्या काळात अनेक दिवसांचं “अधिवेशन” भरवण्यात आलं. वॉच टॉवर मध्ये लोकांना असं आर्जवण्यात आलं, “सत्यासाठी, आपल्या धन्यासाठी आणि त्याच्या बांधवांसाठी असलेल्या प्रेमानं ओतप्रोत भरलेल्या अंतःकरणानं उपस्थित राहा.”

लंडन टॅबरनॅकल या बेथेलमधल्या सभागृहात स्मारकविधीची प्रतीके कशी फिरवली जावीत ते दाखवणारा तक्ता

स्मारकविधीसाठी पिट्सबर्गला येणाऱ्या लोकांकरता बायबल विद्यार्थ्यांनी अनेक वर्षांपर्यंत अधिवेशनं भरवली. बायबल विद्यार्थ्यांच्या संख्येत जसजशी भर पडत गेली तसतसा जगभरात अनेक ठिकाणी स्मारकविधी साजरा केला जाऊ लागला आणि त्याला उपस्थित राहणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. शिकागोच्या एक्लिसियातील (मंडळीतील) रे बॉप नावाच्या बांधवानं १९१० च्या दशकात स्मारकविधी साजरा करण्याबद्दल आपल्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की तेव्हा उपस्थित लोकांमध्ये स्मारकविधीची प्रतीके फिरवायला अनेक तास लागायचे. कारण, उपस्थित असलेल्या शेकडो लोकांपैकी जवळजवळ सर्वच जण भाकरी आणि द्राक्षारस घेण्यात सहभागी व्हायचे.

स्मारकविधीसाठी कोणती प्रतीके वापरली जायची? वॉच टावर मध्ये असं म्हणण्यात आलं की येशूने सांजभोजनासाठी द्राक्षारस (वाईन) वापरला होता हे खरं आहे; तरीसुद्धा, ज्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही त्यांना जास्त प्रमाणात द्राक्षारस घेण्याचा मोह होऊ नये म्हणून स्मारकविधीत ताज्या द्राक्षांचा किंवा शिजवलेल्या मनुक्यांचा रस वापरण्यात यावा. असं असलं, तरी स्मारकविधीत “द्राक्षारसच वापरला जावा” असं ज्यांचं मत होतं त्यांच्यासाठी तो पुरवला जायचा. पण, काही काळानं बायबल विद्यार्थ्यांना हे स्पष्ट झालं की कोणत्याही प्रकारचं मिश्रण नसलेला शुद्ध लाल द्राक्षारसच येशूच्या रक्ताला योग्यपणे सूचित करतो.

स्मारकविधी हा गांभीर्यानं विचार करण्याचा प्रसंग होता. पण, काही मंडळ्यांत स्मारकविधीच्या वेळी अगदी शोकसभेसारखं वातावरण असायचं. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित लोक इतके दुःखी असायचे, की ते एकमेकांशी काही न बोलता निघून जायचे. पण, १९३४ साली प्रकाशित झालेल्या जेहोवा नावाच्या पुस्तकात असं सांगण्यात आलं, की स्मारकविधी येशूच्या वेदनादायक मृत्यूमुळे “दुःखी मनानं” नाही, तर १९१४ साली तो स्वर्गात राजा झाल्यामुळे “आनंदित मनानं” साजरा केला जावा.

१९३५ हे साल महत्त्वाचं होतं. या वर्षी प्रकटीकरण ७:९ मधील मोठ्या लोकसमुदायाविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं. हा एक मोठा बदल होता आणि पुढे होणाऱ्या स्मारकविधींवरही याचा परिणाम झाला. हे स्पष्टीकरण मिळण्याआधी मोठा लोकसमुदाय म्हणजे कमी आवेश असलेले समर्पित ख्रिस्ती, असं यहोवाचे सेवक समजायचे. पण आता त्यांना कळलं, की ‘मोठा लोकसमुदाय’ म्हणजे खरंतर पृथ्वीवरील नंदनवनात जगण्याची आशा असलेले विश्वासू उपासक आहेत. या स्पष्टीकरणाचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर आणि स्वतःचं काळजीपूर्वक परीक्षण केल्यानंतर, रस्सल पॉगन्सी नावाच्या एका बांधवानं असं कबूल केलं: “खरंतर यहोवा देवानं पवित्र आत्म्याद्वारे स्वर्गीय जीवनाची आशा माझ्या मनात घातलीच नव्हती.” हे लक्षात आल्यानंतर बंधू पॉगन्सी आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक एकनिष्ठ बांधवांनी स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेण्याचं थांबवलं. पण, स्मारकविधीला उपस्थित राहण्याचं त्यांनी थांबवलं नाही.

त्या ‘अत्यंत महत्त्वाच्या काळात’ प्रचार कार्याच्या खास मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमांमुळे सर्वांना खंडणीबद्दल आपली कदर व्यक्त करण्याची चांगली संधी मिळायची. काही जण फक्त स्मारकविधीला उपस्थित राहायचे पण प्रचार कार्यात सहभाग घ्यायला ते उत्सुक नव्हते. अशांना १९३२ साली बुलेटीन या पत्रिकेत असं प्रोत्साहन देण्यात आलं की त्यांनी फक्त स्मारकविधीला उपस्थित राहू नये, तर प्रचार कार्य करण्यातही आवेश दाखवावा. १९३४ साली अभिषिक्त जनांना जास्त प्रमाणात प्रचार करण्यासाठी पुढं येण्याचं बुलेटीन मध्ये आवाहन करण्यात आलं. “१,००० प्रचारकांची गरज आहे, तुम्ही पुढे याल का?” असा प्रश्न त्यात विचारण्यात आला. अभिषिक्तांना उद्देशून इन्फॉर्मंट यात असं म्हणण्यात आलं: “राज्य प्रचाराच्या कार्यात सहभागी झाल्यानंच त्यांचा आनंद परिपूर्ण होईल.” * पुढे जाऊन पृथ्वीवर जगण्याची आशा असणाऱ्यांनाही असंच प्रोत्साहन देण्यात आलं.

एकांत कारावासात असताना हॅरल्ड किंग यांनी स्मारकविधीबद्दल कविता आणि गीतं रचली

यहोवाच्या सर्वच उपासकांसाठी स्मारकविधीची संध्याकाळ ही वर्षभरातली सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची संध्याकाळ असते. अगदी कठीण परिस्थितीतही स्मारकविधी साजरा करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. १९३० मध्ये स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी पर्ल इंग्लिश आणि तिची बहीण ऑरा या दोघी जवळजवळ ८० किमी पायी चालत गेल्या. तसंच, चीनमध्ये एकांत कारावासात असताना हॅरल्ड किंग या मिशनरी बांधवानं स्मारकविधीबद्दल कविता आणि गीतं रचली. त्यांनी काळ्या मनुक्यांपासून आणि तांदळापासून स्मारकविधीची प्रतीके तयार केली. पूर्व युरोप, मध्य अमेरिका आणि आफ्रिका या सर्वच ठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी अगदी धैर्यानं युद्धाच्या काळात आणि बंदी असतानाही येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा केला. आजही, आपण कुठंही असलो किंवा आपली परिस्थिती कशीही असली, तरी स्मारकविधीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात यहोवा देवाचा आणि येशू ख्रिस्ताचा गौरव करण्यासाठी आपण आपल्या बांधवांसोबत एकत्र येतो.

^ परि. 10 बुलेटीन या पत्रिकेला नंतर इन्फॉर्मंट म्हणण्यात आलं. आता याला आपली राज्य सेवा म्हणून ओळखलं जातं.