व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राष्ट्रांना सुवार्ता सांगण्याचा मार्ग मोकळा झाला

राष्ट्रांना सुवार्ता सांगण्याचा मार्ग मोकळा झाला

“सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला.”—प्रे. कृत्ये १३:१२.

१-३. सर्व राष्ट्रांतील लोकांना साक्ष देणं येशूच्या शिष्यांसाठी सोपं का नव्हतं?

येशू ख्रिस्तानं आपल्या अनुयायांवर एक मोठी जबाबदारी सोपवली. त्यानं “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” करण्याची आज्ञा त्यांना दिली. या आज्ञेनुसार, सर्व राष्ट्रांतील लोकांना साक्ष मिळावी म्हणून शिष्यांनी राज्याची सुवार्ता सर्व लोकांपर्यंत पोचवायची होती.—मत्त. २४:१४; २८:१९.

शिष्यांचं येशूवर प्रेम होतं आणि सुवार्ता सांगण्याचं काम खूप महत्त्वाचं आहे याची जाणीव त्यांना होती. पण, ‘येशूनं दिलेलं हे काम आपल्याला करता येईल का?’ अशी शंका कदाचित त्यांच्या मनात आली असावी. असं त्यांना का वाटलं असावं? एक कारण म्हणजे, त्या वेळी शिष्यांची संख्या खूप कमी होती. शिवाय, येशू हा देवाचा पुत्र आहे असं ते लोकांना शिकवत होते, पण येशूला तर ठार मारण्यात आलं होतं. तसंच, अनेक जण शिष्यांना “निरक्षर व अज्ञानी” समजायचे. (प्रे. कृत्ये ४:१३) यहुदी धर्मपुढाऱ्यांचं शिक्षण प्रतिष्ठित धार्मिक शाळांमध्ये झालं होतं पण शिष्यांच्या बाबतीत असं नव्हतं. अनेक शतकांपासून धर्मपुढारी लोकांना यहुदी परंपरांविषयी शिकवत होते. पण, येशूच्या शिष्यांचा संदेश या परंपरांशी जुळणारा नव्हता. इस्राएलमधील लोक शिष्यांना मान देत नव्हते. त्यामुळे ‘शक्तिशाली रोमी साम्राज्यात आपलं कुणी ऐकेल का?’ असा प्रश्न साहजिकच त्यांच्या मनात आला असावा.

येशूनं शिष्यांना हेदेखील सांगितलं होतं की लोक त्यांचा द्वेष करतील, त्यांना छळतील आणि काहींना तर मारून टाकतील. (लूक २१:१६, १७) त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच त्यांना धरून देतील. पुढे असेही काही लोक येतील जे स्वतःला ख्रिस्ताचे शिष्य म्हणतील पण खोट्या शिकवणी पसरवतील. शिवाय, येशूच्या शिष्यांना ज्या क्षेत्रात प्रचार करायचा होता ते क्षेत्र गुन्हेगारीनं आणि हिंसेनं भरलेलं होतं. (मत्त. २४:१०-१२) तर मग “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” प्रचार करणं त्यांना कसं शक्य होणार होतं? (प्रे. कृत्ये १:८) अशा समस्या असताना आपल्याला प्रचार करणं जमेल का, असा प्रश्न नक्कीच शिष्यांच्या मनात आला असेल.

४. शिष्यांनी केलेल्या प्रचार कार्याचा काय परिणाम झाला?

येशूनं दिलेलं काम पूर्ण करणं सोपं नसणार हे माहीत असूनही शिष्यांनी येशूची आज्ञा पाळली. त्यांनी यरुशलेमेत, शोमरोनात आणि इतर अनेक देशांत जाऊन प्रचार केला. म्हणूनच हे कार्य सुरू करण्याच्या जवळजवळ ३० वर्षांनंतर पौल म्हणू शकला, “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” प्रचार करण्यात आला आहे. यामुळे वेगवेगळ्या देशांतील लोक शिष्य बनले. (कलस्सै. १:६, २३) उदाहरणार्थ, पौलानं कुप्र नावाच्या बेटावर प्रचार केला तेव्हा यहोवाच्या शिक्षणामुळे आश्चर्यचकित होऊन तिथला रोमी सुभेदारदेखील ख्रिस्ती बनला.—प्रेषितांची कृत्ये १३:६-१२ वाचा.

५. (क) येशूनं आपल्या शिष्यांना कोणतं आश्वासन दिलं? (ख) पहिल्या शतकाविषयी एका इतिहासाच्या पुस्तकात काय सांगण्यात आलं आहे?

स्वतःच्या बळावर सबंध जगात प्रचार करणं आपल्याला शक्य नाही हे शिष्यांना माहीत होतं. पण, हे कार्य करताना येशू आपल्यासोबत असेल आणि पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल हेही त्यांना माहीत होतं. येशूनं स्वतः त्यांना असं आश्वासन दिलं होतं. (मत्त. २८:२०) शिवाय, त्या काळात इतरही अशा काही परिस्थिती होत्या ज्यांमुळे शिष्यांना मदत झाली असावी. इतिहासाबद्दल माहिती देणाऱ्या एका पुस्तकानुसार, प्रचार कार्याची सुरवात करण्याकरता पहिल्या शतकाचा काळ खरंतर अत्यंत सोयीचा ठरला; आणि काही ख्रिश्चनांना नंतर असंही वाटलं जणू देवानंच त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला होता.

६. (क) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत? (ख) पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

प्रचार कार्य करणं सोपं जावं म्हणून यहोवानंच पहिल्या शतकात काही गोष्टी घडवून आणल्या होत्या का? बायबल याविषयी काही सांगत नाही. पण, एवढं मात्र खरं की सुवार्तेचा प्रचार केला जावा ही स्वतः यहोवाची इच्छा होती आणि सैतान या कार्याला थांबवू शकला नाही. या लेखात आपण अशा काही गोष्टींविषयी चर्चा करणार आहोत ज्यांमुळे पहिल्या शतकात प्रचार करणं शिष्यांना सोपं गेलं असेल. तसंच, आजच्या काळात कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला जगभरात प्रचार करण्यासाठी मदत झाली आहे त्याविषयी आपण पुढच्या लेखात चर्चा करू.

रोमी साम्राज्यात शांतता

७. पहिल्या शतकात रोमी साम्राज्यात परिस्थिती कशी होती, आणि हा काळ इतर काळांपेक्षा वेगळा का होता?

पहिल्या शतकात रोमी साम्राज्यात शांती होती. यामुळे, प्रचार करणं शिष्यांना सोपं गेलं. त्या काळात कुणी सरकारचा थोडा जरी विरोध केला तरी तो लगेच दडपून टाकला जायचा. येशूनं केलेल्या भविष्यवाणीनुसार काही लढाया लढल्या गेल्या हे खरं आहे. (मत्त. २४:६) उदाहरणार्थ, ७० साली रोमी लोकांनी जेरूसलेमचा नाश केला. तसंच, रोमी साम्राज्याच्या सीमेजवळही काही लढाया लढल्या गेल्या. असं असलं, तरी साम्राज्यात जवळजवळ सर्वच ठिकाणी शांतता होती. यामुळे, शिष्यांना प्रवास आणि प्रचार करणं सोपं गेलं. जवळपास २०० वर्षांपर्यंत असंच शांतीचं वातावरण कायम टिकून राहिलं. इतिहासात या काळाला ‘रोमन शांतता’ असं म्हणण्यात आलं. एका पुस्तकानुसार, इतक्या जास्त काळापर्यंत शांती टिकून राहण्याचं आणि इतक्या जास्त लोकांना त्यापासून फायदा मिळण्याचं हे इतिहासातलं फक्त एकच उदाहरण आहे.

८. रोमी साम्राज्यात असलेल्या शांतीमुळे शिष्यांना कशी मदत झाली?

ख्रिस्ताच्या सुमारे २५० वर्षांनंतर ओरिजेन नावाच्या एका विद्वानानं या शांतीच्या काळाविषयी लिहिलं. त्याच्या म्हणण्यानुसार रोमी साम्राज्याची अनेक देशांवर सत्ता असल्यामुळे शिष्यांना त्या सर्व देशांमध्ये प्रचार करणं सोपं गेलं. शिवाय, लढाया नसल्यामुळे लोक शांतीनं आपआपल्या गावांत राहत होते. यामुळे शिष्यांनी दिलेला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश ऐकण्याची अनेकांना संधी मिळाली, असंही ओरिजेन म्हणतो. शिष्यांचा छळ झाला हे खरं आहे; पण, या शांतीच्या काळाचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला आणि सर्वत्र सुवार्तेचा प्रचार केला.—रोमकर १२:१८-२१ वाचा.

सोयीस्कर प्रवास

९, १०. कोणकोणत्या गोष्टींमुळे प्रवास करणं शिष्यांना सोपं गेलं?

रोमी साम्राज्यातल्या जवळपास सर्व भागांना जोडणारे अनेक रस्ते रोमी लोकांनी बनवले. या सर्व रस्त्यांची एकूण लांबी ८०,००० किमी पेक्षा जास्त होती. रोमच्या शक्तिशाली सैन्याला या रस्त्यांमुळे खूप मदत झाली. कारण सैनिकांना आपल्या क्षेत्राचं रक्षण करण्याकरता आणि लोकांवर नियंत्रण ठेवण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी पटकन पोचणं शक्य व्हायचं. ख्रिश्चनांनी याच रस्त्यांचा उपयोग करून जंगलांतून, वाळवंटांतून आणि डोंगरांवरून प्रवास केला आणि अनेक ठिकाणी प्रचार केला.

१० रस्त्यांसोबतच रोमी लोक जलमार्गांचाही उपयोग करायचे. साम्राज्यातील शेकडो बंदरांपर्यंत पोचण्यासाठी ते नद्यांतून, कालव्यांतून आणि समुद्रातून प्रवास करायचे. खरंतर, रोमी लोक ९०० पेक्षा जास्त समुद्री मार्गांचा उपयोग करायचे. याच मार्गांचा उपयोग करून ख्रिश्चनांनाही अनेक ठिकाणी प्रवास करता आला. त्या काळात दुसऱ्या देशांत जाताना कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांची गरज नसायची. तसंच, रोमी लोक गुन्हेगारांना खूप कठोरतेनं शिक्षा देत असल्यामुळे रस्त्यांवर चोर, लुटारूंची संख्या खूप कमी असायची. तसंच, समुद्रातून प्रवास करतानाही लुटारूंची भीती नसायची कारण रोमची अनेक सैनिकी जहाजं या मार्गांनी ये-जा करायची. पौल जहाजातून प्रवास करत असताना काही वेळा त्याचं जहाज फुटल्याचं आपण बायबलमध्ये वाचतो. तसंच, समुद्रात त्याला इतर संकटांनाही तोंड द्यावं लागलं. पण, समुद्री लुटारूंच्या हल्ल्याचा त्यानं सामना केल्याचं कुठंही सांगितलेलं नाही. या सर्व माहितीवरून हेच कळतं की त्या काळात रस्त्यावरून आणि समुद्रातून प्रवास करणं सहसा सुरक्षित होतं.—२ करिंथ. ११:२५, २६.

ग्रीक भाषा

कोडेक्सचा वापर केल्यामुळे शास्त्रवचनं शोधणं सोपं गेलं (परिच्छेद १२ पाहा)

११. शिष्यांनी ग्रीक भाषेचा उपयोग का केला?

११ रोमी लोक ज्या भागांवर राज्य करायचे त्यांपैकी अनेक भाग पूर्वी थोर सिकंदर या ग्रीक सम्राटानं जिंकले होते. त्यामुळे, या ठिकाणच्या लोकांनी ग्रीक भाषेचा एक विशिष्ट प्रकार असलेली कोइनी ही भाषा शिकून घेतली होती. याच भाषेचा वापर करून शिष्य त्या लोकांना प्रचार करू शकले. शिवाय, या लोकांना इब्री शास्त्रवचनातील उतारे सांगणंही शिष्यांना शक्य झालं. कारण, या शास्त्रवचनांचं पूर्वीच ग्रीकमध्ये भाषांतर झालं होतं. इजिप्तमध्ये राहणाऱ्या यहुदी लोकांनी केलेल्या या भाषांतराबद्दल बऱ्याच लोकांना माहीत होतं. या भाषांतराला सेप्टुअजिंट म्हटलं जायचं. बायबल लेखकांनीही, बायबलची राहिलेली पुस्तकं लिहिण्यासाठी ग्रीक भाषेचाच उपयोग केला. ग्रीक भाषेत भरपूर शब्द असल्यामुळे या भाषेत बायबलमधील शिकवणी स्पष्ट करणं त्यांना सोपं गेलं. तसंच, ग्रीक भाषेमुळे मंडळीतील बांधवांना एकमेकांशी बोलणं आणि एकता टिकवून ठेवणं सोपं गेलं.

१२. (क) कोडेक्स काय होतं आणि त्याचा वापर करणं सोपं का होतं? (ख) ख्रिस्ती लोक केव्हापासून पुस्तकांचा वापर करू लागले?

१२ बायबलचं सत्य शिकवण्याकरता पहिल्या शतकातील ख्रिस्ती कशाचा उपयोग करायचे? आधी ते गुंडाळ्यांचा वापर करायचे. पण, गुंडाळ्या वापरणं आणि दुसऱ्या ठिकाणी नेणं कठीण होतं. एखादं वचन पाहायचं झालं तर संपूर्ण गुंडाळी उघडावी लागायची आणि नंतर पुन्हा गुंडाळून ठेवावी लागायची. शिवाय, गुंडाळीच्या एकाच बाजूला लिहिलेलं असल्यामुळे जास्त माहिती बसत नव्हती. उदाहरणार्थ, फक्त मत्तयच्या पुस्तकासाठीच एक संपूर्ण गुंडाळी होती. नंतर, लोक कोडेक्स वापरू लागले. कोडेक्स हे पुस्तकाचं अगदी सुरवातीचं रूप होतं. वाचकाला सहजपणे याची पानं उलटून एखादं शास्त्रवचन शोधता येत होतं. इतिहासकार म्हणतात की ख्रिस्ती लोकांनी लगेचच या पुस्तकांचा वापर करायला सुरवात केली. आणि इ.स. १०० नंतर जवळजवळ सर्वच ख्रिस्ती लोक पुस्तकांचा वापर करू लागले.

रोमन कायदा

१३, १४. (क) पौल रोमी नागरिक असल्यामुळे त्याला संरक्षण कसं मिळालं? (ख) रोमन कायद्यामुळे ख्रिश्चनांना कसा फायदा झाला?

१३ पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना रोमन कायद्यामुळे खूप फायदा झाला. उदाहरणार्थ, पौल हा एक रोमी नागरिक असल्यामुळे प्रवास करताना त्याला अनेक वेळा रोमन कायद्याचं संरक्षण मिळालं. जेरुसलेममध्ये असताना रोमी सैनिकांनी पौलाला अटक केली आणि ते त्याला चाबकाचे फटके मारणार होते. पण, तेव्हाच पौलानं आपण रोमी नागरिक असल्याचं सांगितलं. तसंच, त्यानं सरदाराला याची आठवण करून दिली की रोमी नागरिकाची कायदेशीर पद्धतीनं चौकशी केल्याशिवाय त्याला चाबकाचे फटके मारणं चुकीचं आहे. त्यामुळे, “जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा [पौल] रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बांधविले होते.”—प्रे. कृत्ये २२:२५-२९.

१४ पौल एक रोमी नागरिक असल्यामुळे फिलिप्पैमध्ये अधिकाऱ्यांनी त्याच्याशी आदरानं व्यवहार केला. (प्रे. कृत्ये १६:३५-४०) तसंच, इफिससमध्ये काय घडलं याकडेही लक्ष द्या. एक संतप्त जमाव ख्रिश्चनांच्या विरोधात उठला, तेव्हा एका सरकारी अधिकाऱ्यानं त्यांना शांत केलं आणि ते रोमन कायदा मोडत आहेत असं त्यांना बजावून सांगितलं. (प्रे. कृत्ये १९:३५-४१) नंतर, कैसरीयात असताना पौलानं आपल्याला रोमी सम्राटासमोर फिर्याद मांडण्याची संधी दिली जावी अशी मागणी केली. या ठिकाणी तो रोमी नागरिक या नात्यानं असलेल्या आपल्या अधिकाराचा वापर करत होता. पुढे सम्राटासमोर गेल्यानंतर त्यानं सुवार्तेचं समर्थन केलं. (प्रे. कृत्ये २५:८-१२) या उदाहरणांवरून दिसून येतं की आपल्याला प्रचार करण्याचा हक्क आहे हे सिद्ध करण्यासाठी ख्रिश्चनांनी रोमन कायद्याचा वापर केला.—फिलिप्पै. १:७.

अनेक देशांत यहुदी लोक

१५. पहिल्या शतकात अनेक यहुदी लोक कुठं राहत होते?

१५ संपूर्ण पृथ्वीवर प्रचार करण्यासाठी आणखी एका गोष्टीमुळे पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना मदत झाली असावी. त्या काळात, यहुदी लोक फक्त इस्राएलमध्येच नाही तर अनेक देशांत राहत होते. कारण, शेकडो वर्षांपूर्वी यहुद्यांना बंदी बनवून अश्शूरला नेण्यात आलं होतं. आणि याच्या अनेक वर्षांनी इतर यहुद्यांना बॅबिलोनमध्ये नेण्यात आलं. पुढे जेव्हा पारस बॅबिलोनवर राज्य करू लागलं तेव्हा यहुदी लोक पारसच्या संपूर्ण साम्राज्यात राहू लागले. (एस्ते. ९:३०) नंतर, पहिल्या शतकात येशू पृथ्वीवर होता तेव्हा यहुदी लोक संपूर्ण रोमी साम्राज्यात पसरले. ते इजिप्त व उत्तर आफ्रिकेतील इतर ठिकाणी, तसंच, ग्रीस, आशिया मायनर (टर्की) आणि मेसोपोटेमिया (इराक) या ठिकाणी राहत होते. रोमच्या साम्राज्यात राहणाऱ्या सहा कोटी लोकांपैकी चाळीस लाखांपेक्षा जास्त लोक यहुदी होते असं सांगितलं जातं. ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरी त्यांनी यहुदी धर्म पाळायचं सोडलं नाही.—मत्त. २३:१५.

१६, १७. (क) यहुदी लोक वेगवेगळ्या देशांमध्ये असल्यामुळे जे यहुदी नव्हते त्यांना कसा फायदा झाला? (ख) ख्रिश्चनांनी कशा प्रकारे यहुदी लोकांच्या उदाहरणाचं अनुकरण केलं?

१६ यहुदी लोक वेगवेगळ्या देशांत राहत असल्यामुळे यहुदी नसलेल्या अनेकांना त्यांच्याबद्दल आणि इब्री शास्त्रवचनांबद्दल माहीत झालं. तसंच, अनेकांना यहुदी विश्वासांबद्दलही माहिती मिळाली. उदाहरणार्थ, एकच खरा देव आहे आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी त्याचे नियम पाळले पाहिजेत हे त्यांना समजलं. तसंच, इब्री शास्त्रवचनं देवाकडून आहेत आणि त्यांत मशीहाबद्दलच्या अनेक भविष्यवाण्या आहेत हेदेखील त्यांना समजलं. (लूक २४:४४) यामुळे, जेव्हा ख्रिस्ती लोक प्रचार करू लागले तेव्हा बऱ्याच यहुद्यांना आणि इतरांनाही त्यांच्या काही विश्वासांबद्दल आधीपासूनच माहिती असल्याचं त्यांना दिसून आलं. पौल अशा लोकांच्या शोधात होता जे सुवार्ता ऐकून घेण्यास तयार होते. म्हणूनच, यहुदी लोक जिथं उपासना करायचे त्या सभास्थानांत तो सहसा जायचा. तिथं जाऊन तो शास्त्रवचनांचा उपयोग करून त्यांच्याशी चर्चा करायचा.—प्रेषितांची कृत्ये १७:१, २ वाचा.

१७ यहुदी लोक नियमितपणे सभास्थानांत किंवा बाहेर, मोकळ्या जागी उपासना करण्यासाठी एकत्र यायचे. या वेळी ते गीत गायचे, प्रार्थना करायचे आणि शास्त्रवचनांवर चर्चा करायचे. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनीही त्यांचं अनुकरण केलं. आणि आज आपणही आपल्या मंडळ्यांमध्ये याच पद्धतीनं उपासना करतो.

प्रचार कार्यासाठी यहोवाची मदत

१८, १९. (क) पहिल्या शतकातल्या परिस्थितींमुळे ख्रिश्चनांना कशी मदत झाली? (ख) या लेखातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

१८ खरोखर, पहिलं शतक हा इतिहासातला एक खूप खास काळ होता. त्या काळात रोमी साम्राज्यात शांती होती, अनेकांना ग्रीक भाषा येत होती आणि कायद्यामुळे लोकांना संरक्षण मिळायचं; तसंच, प्रवास करणंही सोपं होतं आणि अनेक देशांतील लोकांना यहुदी लोकांविषयी आणि इब्री शास्त्रवचनांविषयी माहीत होतं. या सर्व गोष्टींमुळे देवानं सोपवलेलं काम करत राहण्यासाठी ख्रिश्चनांना मदत झाली.

१९ येशू पृथ्वीवर येण्याच्या ४०० वर्षांपूर्वी ग्रीक तत्त्वज्ञानी प्लेटो यानं असं लिहिलं होतं की लोकांना निर्माणकर्त्याची ओळख होणं खूप कठीण आहे; आणि त्याच्याविषयी जगातल्या सर्व लोकांना सांगणं केवळ अशक्य आहे. पण, येशूनं म्हटलं: “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” (लूक १८:२७) प्रचार कार्य यहोवाच्या मदतीमुळेच शक्य झालं आहे यात काही शंका नाही. यहोवाची इच्छा आहे की “सर्व राष्ट्रांतील” लोकांना सुवार्ता ऐकण्याची आणि त्याला ओळखण्याची संधी मिळावी. (मत्त. २८:१९) तेव्हा, आज जगभरात सुवार्तेचा प्रचार कसा केला जात आहे याविषयी आपण पुढच्या लेखात पाहू या.