व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगभरात चाललेल्या शैक्षणिक कार्यावर यहोवाचा आशीर्वाद

जगभरात चाललेल्या शैक्षणिक कार्यावर यहोवाचा आशीर्वाद

“तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यश. ४८:१७.

१. कोणकोणत्या कारणांमुळे प्रचार करणं यहोवाच्या लोकांसाठी अवघड होतं?

आजपासून १३० पेक्षा जास्त वर्षांआधी बायबल विद्यार्थ्यांनी सुवार्तेचा प्रचार करण्यास सुरवात केली, तेव्हा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. * उदाहरणार्थ, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणेच त्यांची संख्या खूप कमी होती. आणि त्यांचा संदेशही अनेकांना आवडत नव्हता. शिवाय, काहींच्या नजरेत हे लोक सुशिक्षित नव्हते. नंतर, जेव्हा सैतानाला पृथ्वीवर टाकण्यात आलं तेव्हापासून तर यहोवाच्या लोकांना अनेक प्रकारे छळाचा सामना करावा लागला. (प्रकटी. १२:१२) असं असलं तरी तेव्हापासून आतापर्यंत, ‘शेवटल्या काळातील या कठीण दिवसांत’ ते प्रचार करतच आहेत.—२ तीम. ३:१.

२. प्रचार करण्यासाठी यहोवा आपली मदत कशी करतो?

या सबंध काळात, यहोवा आपल्या लोकांची मदत करत आला आहे. त्याच्या सेवकांनी संपूर्ण पृथ्वीवर सुवार्तेचा प्रचार करावा अशी त्याची इच्छा आहे. आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यापासून कोणतीच गोष्ट त्याला रोखू शकत नाही. पूर्वी त्यानं ज्याप्रमाणे इस्राएली लोकांना बॅबिलॉनच्या गुलामीतून मुक्त करून खोट्या उपासनेपासून वेगळं केलं, त्याचप्रमाणे आजही त्याच्या सेवकांना त्यानं खोट्या उपासनेपासून वेगळं केलं आहे. आणि अशा प्रकारे त्याला मान्य असलेल्या पद्धतीनं उपासना करण्यासाठी त्यानं त्यांची मदत केली आहे. (प्रकटी. १८:१-४) शिवाय, यहोवा आपल्याला जे शिकवतो त्याचा आपल्याला व्यक्तिगत रीत्या फायदा होतो. जसं की, एकमेकांसोबत शांतीनं राहण्यास, इतरांना त्याच्याविषयी शिकवण्यास तो आपल्याला प्रशिक्षण देत आहे. (यशया ४८:१६-१८ वाचा.) यहोवा आपल्या कार्याचं मार्गदर्शन करतो हे खरं असलं, तरी प्रचार करणं आपल्याला सोपं जावं म्हणून तो नेहमीच जगातील परिस्थिती बदलतो असा याचा अर्थ होत नाही. हे खरं आहे की जगातील काही परिस्थितींमुळे प्रचार करणं आपल्याला आणखी सोपं झालं आहे. पण, अजूनही आपला छळ होत आहे आणि सैतानाच्या या जगात इतर समस्यांनाही आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. म्हणून, हे स्पष्ट आहे की आपण केवळ यहोवाच्या मदतीनंच प्रचार करू शकतो.—यश. ४१:१३; १ योहा. ५:१९.

३. दानीएलानं केलेली भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?

शेवटल्या काळी अनेकांना बायबलमधील सत्य समजेल अशी भविष्यवाणी दानीएलानं केली होती. (दानीएल १२:४ वाचा.) शेवटला काळ सुरू होण्याच्या काही काळाआधी यहोवानं त्याच्या लोकांना बायबलमधील सत्य समजण्यास आणि स्वतःला ख्रिस्ती धर्मजगतातील खोट्या शिकवणींपासून वेगळं करण्यास मदत केली. आज यहोवाचे लोक संपूर्ण जगात बायबलमधील सत्य लोकांना शिकवत आहेत. यावरून दिसून येतं की दानीएलानं केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. आज जवळजवळ ऐंशी लाख लोकांनी सत्य शिकून घेतलं आहे आणि इतरांनाही ते सत्य शिकवत आहेत. तर मग, संपूर्ण जगात सुवार्ता सांगण्यासाठी कोणत्या गोष्टींमुळे यहोवाच्या सेवकांना मदत झाली आहे?

बायबल भाषांतर

४. सन १८०० नंतर बायबल भाषांतरामध्ये कशी प्रगती झाली?

आज अनेकांजवळ बायबल असल्यामुळे त्यांना सत्याविषयी शिकवणं आपल्याला सोपं जात आहे. पण, परिस्थिती नेहमीच अशी नव्हती. लोकांनी बायबलचं वाचन करू नये अशी कित्येक शतकांपर्यंत ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांची इच्छा होती. त्यामुळे, बायबलचं वाचन करणाऱ्यांचा त्यांनी छळ केला. इतकंच नाही तर ज्यांनी बायबलचं भाषांतर केलं त्यांच्यापैकी काहींना तर त्यांनी मारूनही टाकलं. पण, पुढे सन १८०० नंतर शंभर वर्षांच्या काळात काही संघटनांनी जवळजवळ ४०० भाषांमध्ये संपूर्ण बायबलचं किंवा त्याच्या काही भागांचं भाषांतर केलं किंवा ते छापलं. त्यामुळे, १९०० सालापर्यंत अनेकांजवळ बायबल होतं. पण, बायबल नेमकं काय शिकवतं हे मात्र त्यांना कळत नव्हतं.

५. बायबलचं भाषांतर करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी कायकाय केलं आहे?

इतरांना बायबलमधील सत्य शिकवणं ही आपली जबाबदारी आहे हे यहोवाच्या लोकांना माहीत होतं आणि त्यांनी अगदी तेच केलं. सुरवातीला त्यांनी वेगवेगळ्या बायबल भाषांतरांचा वापर केला. तसंच, त्यांच्या प्रतीही लोकांना वाटल्या. पण, सन १९५० पासून त्यांनी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स प्रकाशित करण्यास सुरवात केली. हे संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग आज १२० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. सन २०१३ मध्ये न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या इंग्रजी बायबलची सुधारित आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली. या आवृत्तीमधील भाषा समजण्यास आणि भाषांतर करण्यास सोपी आहे. लोकांना समजेल असं बायबल जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यांना सत्य शिकवणं आणखी सोपं जातं.

शांतीचा काळ

, ७. (क) गेल्या १०० वर्षांत किती प्रमाणात युद्धे लढली गेली? (ख) काही देशांत शांती असल्यामुळे कशा प्रकारे फायदा झाला?

गेल्या शंभर वर्षांत अनेक युद्धे झाली; यांत दोन महायुद्धांचाही समावेश होतो. या युद्धांत लाखो लोकांनी आपला जीव गमावला. तर मग, कोणत्या अर्थाने शांती होती आणि या शांतीमुळे यहोवाच्या लोकांना प्रचार करण्यास कशी मदत झाली? दुसऱ्या महायुद्धाच्या काळादरम्यान, बंधू नेथन नॉर यहोवाच्या साक्षीदारांचं नेतृत्व करत होते. तेव्हा १९४२ साली झालेल्या अधिवेशनात त्यांनी एक रोमांचक भाषण दिलं. त्या भाषणाचा विषय होता “शांती टिकू शकेल का?” या भाषणात बंधू नॉर यांनी प्रकटीकरणाच्या १७ व्या अध्यायातील भविष्यवाणीचं स्पष्टीकरण दिलं आणि हर्मगिदोन इतक्यातच येणार नसल्याचं सांगितलं. युद्ध संपल्यानंतर एक शांतीचा काळ असेल असं त्यांनी या भाषणात स्पष्ट केलं.—प्रकटी. १७:३, ११.

अर्थात, युद्ध संपल्यानंतर सगळीकडे शांतता असेल असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. तसं पाहिल्यास, दुसऱ्या महायुद्धानंतरही कित्येक युद्धे लढली गेली आणि यांत लाखो लोकांचा बळी गेला. तरीसुद्धा, अनेक देशांत शांती होती आणि त्यामुळे प्रचार करणं यहोवाच्या साक्षीदारांना सोपं गेलं. याचा काय परिणाम झाला? दुसऱ्या महायुद्धादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांची संख्या १,१०,००० पेक्षाही कमी होती. पण, आज मात्र त्यांची संख्या ८० लाखांच्या घरात गेली आहे! (यशया ६०:२२ वाचा.) खरोखर, शांतीच्या काळात आपण जास्तीतजास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोचवू शकतो.

वाहतुकीत झालेल्या सुधारणा

, ९. प्रवास करणं कशामुळे सोपं झालं आहे, आणि यामुळे आपल्याला कशी मदत होते?

यहोवाच्या लोकांनी अमेरिकेत प्रचार कार्याची सुरवात केली, तेव्हा प्रवास करणं सोपं नव्हतं. द वॉच टावर हे नियतकालिक छापण्यास सुरवात करण्याच्या जवळजवळ २१ वर्षांनंतर म्हणजे सन १९०० मध्ये सबंध अमेरिकेत फक्त सुमारे ८,००० कार होत्या आणि थोडेफार रस्तेच चांगल्या स्थितीत होते. पण त्याच्या तुलनेत, आज जगभरात १५० कोटी पेक्षाही जास्त कार आहेत आणि अनेक ठिकाणी चांगले रस्तेही आहेत. त्यामुळे, शहरापासून दूरवर असलेल्या ठिकाणी जाऊन सुवार्तेचा प्रचार करणं आपल्याला शक्य झालं आहे. पण, समजा प्रवासाची चांगली सोय नाही अशा ठिकाणी आपण राहत असू तर काय? अशा वेळी आपण दूरवर चालत जाण्यास तयार असतो. कारण, जिथं लोक असतील तिथं जाऊन सुवार्ता सांगण्याची आपली मनापासून इच्छा आहे.—मत्त. २८:१९, २०.

आपण इतर प्रकारच्या वाहतुकींचाही उपयोग करतो. बायबल आणि इतर साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी पोचवण्याकरता आपण ट्रक, जहाज आणि रेल्वे यांचा उपयोग करतो. यामुळे, दूरवर राहणाऱ्या बांधवांपर्यंत काही आठवड्यांतच प्रकाशनं पोचवता येतात. तसंच, अधिवेशनांमध्ये भाषण देण्यासाठी आणि मंडळ्यांना मदत करण्यासाठी काही देशांतील प्रवासी पर्यवेक्षक, शाखा समितीचे सदस्य, मिशनरी आणि इतर बांधव विमानानं प्रवास करतात. शिवाय, जागतिक मुख्यालयातील नियमन मंडळाचे सदस्य आणि इतर बांधवदेखील अनेक देशांत जाऊन बांधवांना आणि बहिणींना प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी विमानानं प्रवास करतात. अशा प्रकारे वाहतुकीच्या या सर्व सोयींमुळे यहोवाच्या लोकांमधील एकता टिकून राहण्यास मदत होते.—स्तो. १३३:१-३.

भाषा आणि भाषांतर

१०. जगभरात इंग्रजी भाषेचा उपयोग कसा होत आहे?

१० पहिल्या शतकात रोमी साम्राज्यातील बहुतेक जण ग्रीक भाषा बोलायचे. आणि आज जगभरातील कित्येक लोकांना इंग्रजी भाषा येते. खरंतर, इंग्लिश अॅज अ ग्लोबल लँग्वेज या पुस्तकात सांगितल्यानुसार १७० कोटी लोकांना इंग्रजी भाषा बोलता येते किंवा समजते. आज व्यापार जगतात, राजकारणात, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंग्रजी भाषेचा सर्रासपणे वापर केला जातो. त्यामुळे, अनेक जण इंग्रजी शिकून घेत आहेत.

११. इंग्रजी भाषेमुळे कोणते फायदे झाले आहेत?

११ इंग्रजी भाषा संपूर्ण जगभरात बोलली जात असल्यामुळे इतरांपर्यंत सत्य पोचवण्यास मदत झाली आहे. सुरवातीला आपली प्रकाशने फक्त इंग्रजी भाषेतच उपलब्ध होती. आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी इंग्रजी बोलली जात असल्यामुळे अनेकांना ती वाचता यायची. आपल्या जागतिक मुख्यालयातही इंग्रजी भाषेचा उपयोग केला जातो. शिवाय, वेगवेगळ्या देशांतील ज्या बांधवांना आणि बहिणींना इंग्रजी येते त्यांना न्यूयॉर्कमधील पॅटरसन या ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या प्रशालांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं.

१२. आपली प्रकाशनं आज किती भाषांत उपलब्ध आहेत, आणि हे कशामुळे शक्य झालं आहे?

१२ पण, ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही अशांनादेखील सुवार्ता सांगण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यामुळेच, आपण आपल्या प्रकाशनांचं ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर करतो. पण, हे भाषांतर कशाच्या साहाय्यानं केलं जातं? कंप्युटर आणि मेप्स (मल्टिलँग्वेज इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग सिस्टम) यासारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं आज भाषांतर केलं जातं. यामुळेच जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना बायबलमधील सत्याची “शुद्ध वाणी” समजण्यास आणि एकतेनं राहण्यास मदत होते.—सफन्या ३:९ वाचा.

कायदे आणि न्यायालयीन निकाल

१३, १४. कायद्यांमुळे आणि न्यायालयीन निकालांमुळे आपल्याला कशी मदत झाली आहे?

१३ रोमन कायद्यांमुळे पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना प्रचार करण्यास अनेक मार्गांनी मदत झाली. आजदेखील अनेक देशांतील कायद्यांमुळे प्रचार करण्यासाठी आपल्याला बरीच मदत होते. अमेरिकेचं उदाहरण घ्या. त्या देशातील कायद्यांमुळे धर्म निवडण्याची, स्वतःच्या विश्वासांबद्दल इतरांना सांगण्याची आणि उपासनेकरता एकत्र येण्याची लोकांना मुभा आहे. यामुळेच त्या देशातील आपल्या बांधवांना ख्रिस्ती सभा चालवण्याची आणि प्रचार करण्याची मोकळीक आहे. शिवाय, अमेरिकेतील जागतिक मुख्यालयात, संपूर्ण जगात चाललेल्या प्रचार कार्याचं नियोजन करणंही आपल्याला शक्य होतं. पण, कधीकधी असेही प्रसंग आले जेव्हा सुवार्तेचा प्रचार करण्याचा हक्क मिळवण्यासाठी आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागली. (फिलिप्पै. १:७) जेव्हा तिथं आपल्याला न्याय मिळाला नाही तेव्हा आपण उच्च न्यायालयांत अपील केलं आणि या न्यायालयांत सहसा आपल्याला यश मिळालं.

१४ इतर देशांतही, प्रचार करण्याचा आणि उपासना करण्याचा हक्क मिळवण्यासाठी आपण न्यायालयात गेलो आहोत. आणि जेव्हा तिथं आपल्याला न्याय मिळाला नाही तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. उदाहरणार्थ, आपण अनेक वेळा मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयात (ईसीएचआर) गेलो. या न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांपैकी आपण जून २०१४ पर्यंत एकूण ५७ दावे जिंकले आहेत. या न्यायालयानं जाहीर केलेले निकाल युरोपमधील बहुतेक देशांना मान्य करावेच लागतात. आज “सर्व राषट्रे” आपला “द्वेष” करत असली, तरी अनेक देशांतील कायद्यांमुळे यहोवाची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे.—मत्त. २४:९.

असे शोध ज्यांमुळे आपल्याला फायदा झाला

आपली बायबल आधारित प्रकाशनं अनेक भाषांमध्ये प्रकाशित केली जातात

१५. प्रिंटिंगच्या पद्धतींमध्ये कशा प्रकारे सुधारणा झाल्या, आणि त्यामुळे आपल्याला कशी मदत झाली?

१५ छपाईच्या नवनवीन पद्धतींमुळे जास्तीतजास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यास आपल्याला मदत झाली आहे. १४५० च्या आसपास योहानस गुटनबर्ग यांनी एका विशिष्ट छपाई तंत्राचा शोध लावला. अनेक शतकांपर्यंत लोक याच पद्धतीचा वापर करत होते. पण, गेल्या २०० वर्षांच्या काळात छपाईच्या पद्धतींमध्ये अनेक सुधारणा झाल्या. आणि त्याचदरम्यान ऑफसेट प्रिंटिंगचा शोध लागला. त्यामुळे, जलद गतीनं चांगल्या दर्जाची छपाई करणं शक्य झालं. तसंच, पुढं पेपर बनवण्याचा आणि पुस्तक बाइंडिंग करण्याचा खर्चही कमी झाला. या सर्व सुधारणांचा आपल्याला कसा फायदा झाला? १८७९ साली इंग्रजी भाषेत पहिलं टेहळणी बुरूज छापण्यात आलं तेव्हा त्यात चित्रं नव्हती आणि त्याच्या फक्त ६,००० प्रती छापण्यात आल्या. पण, आज टेहळणी बुरूज २०० पेक्षाही जास्त भाषांमध्ये छापलं जातं. शिवाय, त्यांत रंगीबेरंगी चित्रंही असतात आणि प्रत्येक अंकाच्या ५,००,००,००० पेक्षा जास्त प्रती छापल्या जातात.

१६. जगभरात प्रचार करण्यासाठी कोणकोणत्या शोधांचा आपल्याला फायदा झाला आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१६ गेल्या २०० वर्षांत लागलेल्या नवनवीन शोधांमुळे यहोवाच्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करणं सोपं झालं आहे. आपण आधीच रेल्वे, कार आणि विमानांविषयी पाहिलं. पण, या शोधांमध्ये सायकल, टाईपरायटर, ब्रेल उपकरण, टेलिग्राफ, टेलिफोन, कॅमेरा, ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारी उपकरणं, रेडिओ, टीव्ही, चित्रपट, कंप्युटर आणि इंटरनेट यांचाही समावेश होतो. या सर्व गोष्टींचा शोध यहोवाच्या लोकांनी लावला नसला, तरी वेगवेगळ्या भाषांमध्ये बायबल आणि इतर प्रकाशनं बनवण्यासाठी आणि जगभरात प्रचार करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग त्यांनी केला. अशा प्रकारे बायबलमध्ये भविष्यवाणी केल्यानुसार या सर्व शोधांचा फायदा उठवून यहोवाचे लोक एका अर्थानं “राष्ट्रांचे दूध शोषून” घेत आहेत.—यशया ६०:१६ वाचा.

१७. (क) प्रचार कार्यासंबंधी कोणती गोष्ट स्पष्ट झाली आहे? (ख) यहोवानं आपल्याला त्याच्यासोबत काम करण्यासाठी का निवडलं आहे?

१७ या सर्व गोष्टी दाखवतात की आपल्या कार्यावर यहोवाचेच आशीर्वाद आहेत. अर्थात, त्याचा उद्देश पूर्ण करण्याकरता तो आपल्यावर अवलंबून नाही. पण, आपल्यावर त्याचं प्रेम आहे आणि त्याच्यासोबत मिळून आपण हे काम करावं अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच सुवार्ता सांगण्याची जबाबदारी त्यानं आपल्यावर सोपवली आहे. तसंच, आपण प्रचार करतो तेव्हा हे दिसून येतं की आपलंदेखील यहोवावर आणि लोकांवर प्रेम आहे. (मार्क १२:२८-३१; १ करिंथ. ३:९) जगभरात प्रचार करण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करत आहे यासाठी आपण खरोखर त्याचे किती आभारी आहोत! तेव्हा, यहोवाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल इतरांना सांगण्याच्या प्रत्येक संधीचा तुम्ही उपयोग कराल का?

^ परि. 1 १८७० पासून यहोवाच्या लोकांना बायबल विद्यार्थी म्हणून ओळखलं जायचं. पण, १९३१ पासून ते यहोवाचे साक्षीदार या नावानं ओळखले जाऊ लागले.—यश. ४३:१०.