व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा

ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा

“ज्याअर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.”—मत्त. २५:४०.

१, २. (क) येशूने आपल्या जवळच्या मित्रांना कोणते दाखले सांगितले? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) शेरडांच्या व मेंढरांच्या दाखल्याबद्दल आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे?

येशू एका महत्त्वाच्या विषयावर पेत्र, आंद्रिया, याकोब आणि योहान या आपल्या जवळच्या मित्रांशी बोलत होता. त्याने त्यांना विश्वासू व बुद्धिमान दास, दहा कुमारी, आणि रुपये यांविषयीचे दाखले सांगितले. मग येशूने आपल्या मित्रांना आणखी एक दाखला सांगितला. त्यात, “मनुष्याचा पुत्र” सर्व राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी येईल त्या काळाविषयी तो बोलला. तो म्हणाला की “मनुष्याचा पुत्र” लोकांचे दोन गट करेल. यांतला एक गट शेरडांचा तर एक मेंढरांचा असेल. तसंच, त्याने आणखी एका महत्त्वपूर्ण गटाबद्दल सांगितलं. तो गट म्हणजे राजाचे ‘बंधू.’—मत्तय २५:३१-४६ वाचा.

प्रेषितांप्रमाणेच आजच्या काळात यहोवाचे सेवकही या दाखल्याचा अर्थ समजून घ्यायला उत्सुक आहेत. कारण लोकांच्या जीवन मरणाशी याचा संबंध आहे. येशूने सांगितलं की काही लोकांना सर्वकाळचं जीवन मिळेल तर काहींचा कायमचा नाश केला जाईल. त्यामुळे, या दाखल्याचा काय अर्थ होतो आणि सर्वकाळचं जीवन मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच, या लेखात आपण पुढील प्रश्नांवर चर्चा करणार आहोत: हा दाखला समजण्यासाठी यहोवाने आपल्याला कशी मदत केली आहे? या दाखल्यात प्रचारकार्यावर जोर देण्यात आला आहे हे कशावरून कळतं? प्रचार करण्याची जबाबदारी कुणाची आहे? आणि आज राजा आणि त्याचे बंधू यांच्याशी एकनिष्ठ राहणं महत्त्वाचं का आहे?

हा दाखला समजण्यासाठी यहोवाने आपल्याला कशी मदत केली आहे?

३, ४. (क) दाखल्याचा अर्थ समजून घेण्यासाठी काय माहीत असणं गरजेचं आहे? (ख) या दाखल्याचा अर्थ १८८१ च्या टेहळणी बुरूजमध्ये कसा स्पष्ट करण्यात आला होता?

शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्याचा काय अर्थ होतो हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला पुढील गोष्टी माहीत असल्या पाहिजेत: (१) “मनुष्याचा पुत्र” किंवा “राजा,” शेरडं आणि मेंढरं, आणि राजाचे बंधू कोण आहेत? (२) “मनुष्याचा पुत्र” शेरडांचा आणि मेंढरांचा न्याय किंवा त्यांना वेगळं करण्याचं काम केव्हा करेल? आणि (३) काहींना मेंढरं तर काहींना शेरडं का म्हणण्यात आलं आहे?

टेहळणी बुरूजमध्ये १८८१ साली असं सांगण्यात आलं होतं की “मनुष्याचा पुत्र” किंवा “राजा” हा येशू आहे. त्यात असं स्पष्ट करण्यात आलं की राजाच्या बंधूंमध्ये फक्त येशूसोबत स्वर्गात राज्य करणाऱ्यांचाच नाही तर परिपूर्ण झाल्यावर पृथ्वीवर राहणाऱ्यांचाही समावेश होतो. त्यात असंही सांगण्यात आलं की ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान लोकांना वेगळं केलं जाईल. आणि ज्यांनी आपल्या सर्व कार्यांत देवासारखं प्रेम दाखवलं त्यांना मेंढरांत मोजलं जाईल.

५. या दाखल्याबद्दल १९२३ साली देवाच्या लोकांची काय समज होती?

पुढे यहोवाने आपल्या लोकांना हा दाखला आणखी स्पष्टपणे समजून घ्यायला मदत केली. १५ ऑक्टोबर १९२३ च्या टेहळणी बुरूजमध्ये सांगण्यात आलं की “मनुष्याचा पुत्र” येशू आहे. पण, या अंकात इतर वचनांचा वापर करून हे सांगण्यात आलं की दाखल्यातील ‘बंधू’ केवळ येशूसोबत स्वर्गात राज्य करणारेच आहेत आणि हजार वर्षांच्या राज्यादरम्यान ते सर्व स्वर्गात असतील. त्यात असंही सांगण्यात आलं की मेंढरं अशा लोकांना सूचित करतात, जे येशू आणि त्याच्या बंधूंच्या शासनाखाली या पृथ्वीवर राहतील. ते राजाच्या बंधूंना मदत करतात असं दाखल्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे, शेरडांना व मेंढरांना वेगळं करण्याचं काम ख्रिस्ताचे बांधव पृथ्वीवर असतानाच, म्हणजे हजार वर्षांचं राज्य सुरू होण्याआधी केलं जाईल असं त्यात सांगण्यात आलं होतं. तसंच, या लेखात हेही सांगण्यात आलं होतं, की जे येशूवर विश्वास ठेवतात आणि त्याच्या राज्यामुळे एक चांगली परिस्थिती येईल असा भरवसा बाळगतात त्यांचा मेंढरांमध्ये समावेश केला जाईल.

६. दाखल्याबद्दलची आपली समज १९९५ मध्ये कशी सुधारण्यात आली?

अनेक वर्षांपर्यंत आपण असा विचार करत होतो, की लोकांचा न्याय या शेवटल्या काळादरम्यान आपल्या प्रचारकार्याच्या आधारावर केला जात आहे. जे आपला संदेश स्वीकारतात ती मेंढरं, आणि जे स्वीकारत नाहीत ती शेरडं आहेत असं आपण समजायचो. पण, १९९५ साली या दाखल्याबद्दलची आपली समज सुधारण्यात आली. त्या वर्षी टेहळणी बुरूजमध्ये मत्तय २४:२९-३१ (वाचा.) आणि मत्तय २५:३१, ३२ (वाचा.) या वचनांची तुलना करण्यात आली आणि असं स्पष्ट करण्यात आलं की जेव्हा “मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने” मोठ्या संकटादरम्यान “येईल,” तेव्हा तो लोकांचा न्याय करेल. *

७. शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्याचा काय अर्थ आहे?

शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्याचा अर्थ आता आपल्याला अगदी स्पष्टपणे समजला आहे. आपल्याला माहीत आहे की “मनुष्याचा पुत्र” किंवा “राजा” हा येशू आहे. ज्यांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात आलं आहे ते राजाचे ‘बंधू’ आहेत आणि ते येशूसोबत स्वर्गात राज्य करतील. (रोम. ८:१६, १७) ‘शेरडं आणि मेंढरं’ सर्व राष्ट्रांतील लोकांना सूचित करतात. लवकरच येणाऱ्या मोठ्या संकटाच्या शेवटास त्यांचा न्याय केला जाईल. तसंच, अजून पृथ्वीवर जिवंत असलेल्या अभिषिक्तांशी त्यांनी कशा प्रकारे व्यवहार केला याच्या आधारावर येशू त्यांचा न्याय करेल हेदेखील आपल्याला समजलं आहे. या दाखल्याचा आणि मत्तय २४ आणि २५ मधील इतर दाखल्यांचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला मदत केल्याबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत!

या दाखल्यात प्रचारकार्यावर भर देण्यात आला आहे

८, ९. येशूने मेंढरांसमान लोकांना “नीतिमान” का म्हटलं?

शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्यात येशूने प्रचारकार्याचा एकदाही उल्लेख केला नाही. तर मग, या दाखल्यात प्रचारकार्यावर भर देण्यात आला आहे हे कशावरून म्हणता येईल?

उत्तरासाठी सर्वात आधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की या ठिकाणी येशू एका दाखल्याच्या साहाय्याने शिकवत होता. तो खरोखरच्या शेरडांविषयी किंवा मेंढरांविषयी बोलत नव्हता. त्याचप्रमाणे, ज्यांना मेंढरांत मोजलं जाईल त्यांपैकी प्रत्येकाने खरोखरच अभिषिक्तांना अन्न आणि कपडे दिले पाहिजे किंवा आजारी असताना त्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा तुरुंगात असल्यास त्यांना भेटायला गेलं पाहिजे असं येशूला म्हणायचं नव्हतं. तर, त्याने मेंढरांसमान लोकांना “नीतिमान” म्हटलं, कारण अभिषिक्त जन येशूचे बंधू आहेत हे ते ओळखतात. तसंच, या शेवटल्या कठीण काळात ते अभिषिक्त जनांना एकनिष्ठपणे पाठिंबा देतात.—मत्त. १०:४०-४२; २५:४०, ४६; २ तीम. ३:१-५.

१०. मेंढरं ख्रिस्ताच्या बंधूंना कोणत्या मार्गाने मदत करू शकतात?

१० शेरडांचा आणि मेंढरांचा दाखला देण्याआधी, येशू शेवटल्या काळात जे घडेल त्याविषयी बोलत होता. (मत्त. २४:३) उदाहरणार्थ, तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल.” (मत्त. २४:१४) शेरडांचा व मेंढरांचा दाखला देण्याच्या थोड्याच वेळाआधी त्याने रुपयांचा दाखला दिला होता. या दाखल्याच्या साहाय्याने त्याने अभिषिक्त जनांना प्रचाराच्या कार्यात मेहनत घेण्याचा सल्ला दिला. पण, आता या अभिषिक्तांपैकी फार कमी लोक पृथ्वीवर उरले आहेत आणि अजून प्रचाराचं भरपूर काम बाकी आहे! अंत येण्यापूर्वी अभिषिक्तांना “सर्व राष्ट्रांस” सुवार्ता घोषित करण्यास सांगण्यात आलं आहे. शेरडांच्या आणि मेंढरांच्या दाखल्यात, “मेंढरे” येशूच्या बंधूंना मदत करतात असं सांगितलं आहे. आणि असं करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्यांना प्रचाराच्या कार्यात साहाय्य करणं. पण, यात नेमकं काय गोवलेलं आहे? फक्त या कार्यासाठी आर्थिक मदत देणं किंवा अभिषिक्तांना प्रचार करण्याचं प्रोत्साहन देणं इतकंच पुरेसं आहे का?

प्रचार करण्याची जबाबदारी कुणाची?

११. काही लोक कदाचित कोणता प्रश्न विचारतील, आणि का?

११ आज जवळजवळ ८० लाख लोक येशूचे शिष्य असले, तरी त्यांपैकी बहुतेक जण अभिषिक्त नाहीत. येशूने ‘रुपये’ म्हणजेच प्रचारकार्याची जबाबदारी अभिषिक्त बांधवांवर सोपवली होती. (मत्त. २५:१४-१८) त्यामुळे, काही जण कदाचित म्हणतील, ‘रुपयांचा दाखला अभिषिक्त बांधवांना लागू होतो, तर मग आपण प्रचारकार्य करणं खरंच गरजेचं आहे का?’ हो, नक्कीच. याची काही कारणं आपण पाहू या.

१२. मत्तय २८:१९, २० मध्ये येशूने जे सांगितलं त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१२ येशूने सर्वच शिष्यांना प्रचार करण्याची आज्ञा दिली. पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने आपल्या अनुयायांना शिष्य बनवण्याची आणि त्याने सांगितलेल्या “सर्व” गोष्टी त्यांना शिकवण्याची आज्ञा दिली. याचा अर्थ, या शिष्यांनीही प्रचार करण्याच्या आज्ञेचं पालन करायचं होतं. (मत्तय २८:१९, २० वाचा.) यावरून हेच स्पष्ट होतं की प्रचार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे; मग आपली आशा स्वर्गात जाण्याची असो किंवा या पृथ्वीवर जगण्याची.—प्रे. कृत्ये १०:४२.

१३. योहानाने पाहिलेल्या दृष्टान्तातून आपण काय शिकू शकतो?

१३ प्रकटीकरणाच्या पुस्तकातून कळतं की प्रचारकार्य फक्त अभिषिक्त जनच नाहीत तर इतरही करतील. येशूने योहानाला एक दृष्टान्त दिला. त्यात एक “वधू” लोकांना, ‘या आणि जीवनाचं पाणी प्या’ असं आमंत्रण देते. ही वधू स्वर्गात येशूसोबत राज्य करण्याची आशा असलेल्या १,४४,००० अभिषिक्त जनांना सूचित करते. (प्रकटी. १४:१, ३; २२:१७) “पाणी” येशूच्या खंडणी बलिदानाला सूचित करतं आणि यामुळे लोकांना सर्वकाळचं जीवन मिळेल. (मत्त. २०:२८; योहा. ३:१६; १ योहा. ४:९, १०) अभिषिक्त जन आवेशाने या खंडणीबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल इतरांना शिकवतात. (१ करिंथ. १:२३) पण, फक्त अभिषिक्त जन हे कार्य करत आहेत असं नाही. तर या दृष्टान्तात आणखी एका गटाबद्दल सांगितलेलं आहे. या गटातील लोकांना पृथ्वीवर जगण्याची आशा आहे. त्यांनाही या आमंत्रणाविषयी इतरांना सांगण्याची आज्ञा दिलेली आहे आणि सत्य शिकवण्याद्वारे ते या आज्ञेचं पालन करतात. अशा रीतीने, या दृष्टान्तातून स्पष्ट होतं की जे कोणी सुवार्ता स्वीकारतात त्या सर्वांनी इतरांना प्रचार केला पाहिजे.

१४. “ख्रिस्ताचा नियम” पाळण्याचा काय अर्थ होतो?

१४ “ख्रिस्ताचा नियम” पाळणाऱ्या सर्वांनीच प्रचार केला पाहिजे. (गलती. ६:२) यहोवाने आपल्या सर्व सेवकांना सारखेच नियम दिले आहेत. पूर्वीच्या काळात, इस्राएली आणि त्यांच्यासोबत राहणारे परदेशी या सर्वांनी त्याचे नियम पाळावेत अशी त्याची इच्छा होती. (निर्ग. १२:४९; लेवी. २४:२२) हे खरं आहे, की इस्राएली लोकांना देण्यात आलेले सगळेच नियम पाळण्याची आज आपल्याला गरज नाही. त्याऐवजी, आपण अभिषिक्तांपैकी असलो किंवा नसलो तरीही आपण “ख्रिस्ताचा नियम” पाळतो. येशूने आपल्याला जी सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे इतरांवर प्रेम करणं. (योहा. १३:३५; याको. २:८) म्हणून आपण यहोवावर, येशूवर आणि इतरांवर प्रेम केलं पाहिजे. आणि हे प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे इतरांना राज्याची सुवार्ता सांगणं.—योहा. १५:१०; प्रे. कृत्ये १:८.

१५. प्रचार करण्याची आज्ञा येशूने आपल्या सर्वच शिष्यांना दिली हे आपण कशावरून म्हणू शकतो?

१५ येशूने आपल्या काही शिष्यांना जे म्हटलं ते कधीकधी इतर अनेक शिष्यांनाही लागू होतं. उदाहरणार्थ, स्वर्गात आपल्याबरोबर राज्य करण्याचा करार येशूने फक्त ११ शिष्यांसोबत केला होता. पण, खरंतर १,४४,००० जण त्याच्यासोबत राज्य करणार आहेत. (लूक २२:२९, ३०; प्रकटी. ५:१०; ७:४-८) तसंच, पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने प्रचार करण्याची आज्ञा दिली तेव्हा फक्त काही शिष्य तिथं उपस्थित होते. (प्रे. कृत्ये १०:४०-४२; १ करिंथ. १५:६) पण, पहिल्या शतकातील त्याच्या सर्वच शिष्यांनी त्याची ही आज्ञा पाळली. (प्रे. कृत्ये ८:४; १ पेत्र १:८) त्याच प्रकारे, प्रचार करण्याविषयी येशूची आज्ञा आपण प्रत्यक्ष ऐकली नसली, तरी आपण प्रचार केला पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. म्हणूनच, आज जवळजवळ ८० लाख यहोवाचे साक्षीदार प्रचारकार्य करत आहेत. प्रचार करण्याद्वारे आपण हे दाखवतो की आपल्याला खरोखरच येशूवर विश्वास आहे.—याको. २:१८.

एकनिष्ठ राहण्याची हीच वेळ आहे

१६-१८. आपण ख्रिस्ताच्या बंधूंशी एकनिष्ठ राहून त्यांना मदत कशी करू शकतो, आणि आताच असं करणं का गरजेचं आहे?

१६ आज ख्रिस्ताचे जे अभिषिक्त बंधू या पृथ्वीवर आहेत त्यांचा सैतान दिवसेंदिवस जास्तच विरोध करत आहे. कारण, त्याचा “काळ थोडा आहे” हे त्याला माहीत आहे. (प्रकटी. १२:९, १२, १७) पण, सैतान कितीही विरोध करत असला तरी अभिषिक्त जन आज प्रचारकार्यात आवेशाने पुढाकार घेत आहेत. आणि त्यामुळे पूर्वी कधी नव्हे इतक्या लोकांना सुवार्ता ऐकण्याची संधी मिळत आहे. यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं की येशू अभिषिक्तांसोबत आहे आणि त्यांचं मार्गदर्शन करत आहे.—मत्त. २८:२०.

१७ प्रचार करण्याद्वारे ख्रिस्ताच्या बंधूंना मदत करणं हा आपल्यासाठी एक सन्मान आहे. तसंच, आर्थिक मदत देण्याद्वारे व राज्य सभागृहांच्या, संमेलन गृहांच्या आणि शाखा कार्यालयांच्या बांधकामात मेहनत घेण्याद्वारेही आपण अभिषिक्तांना मदत करू शकतो. “विश्वासू व बुद्धिमान” दासाने नेमलेल्या वडिलांशी आणि इतर बांधवांशी एकनिष्ठ राहण्याद्वारे आपण दाखवतो, की ख्रिस्ताच्या बंधूंना मदत करण्याची आपली मनापासून इच्छा आहे.—मत्त. २४:४५-४७; इब्री १३:१७.

आपण ख्रिस्ताच्या बंधूंना वेगवेगळ्या मार्गांनी मदत करतो (परिच्छेद १७ पाहा)

१८ आज जे अभिषिक्त जन या पृथ्वीवर आहेत त्यांच्यावर लवकरच शेवटला शिक्का मारला जाईल. त्यानंतर देवदूतांनी अडवून धरलेले “पृथ्वीचे चार वारे” ते सोडून देतील आणि मोठ्या संकटाला सुरवात होईल. (प्रकटी. ७:१-३) हर्मगिदोन सुरू होण्याआधी येशू अभिषिक्तांना स्वर्गात घेईल. (मत्त. १३:४१-४३) तर मग, येशू येईल तेव्हा आपली मोजणी मेंढरांत व्हावी अशी जर आपली इच्छा असेल, तर ख्रिस्ताच्या अभिषिक्त बंधूंशी एकनिष्ठ राहण्याची हीच वेळ आहे.

^ परि. 6 या दाखल्याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी १५ ऑक्टोबर १९९५ च्या टेहळणी बुरूज अंकातील “तुम्ही न्यायासनासमोर कसे उभे राहणार?” आणि “मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?” हे लेख पाहा.