व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याची आज्ञा—आजही व्यावहारिक?

“केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याची आज्ञा—आजही व्यावहारिक?

“मला लग्नासाठी योग्य असा कोणीच मंडळीत दिसत नाही. आयुष्यभर एकटंच राहावं लागेल की काय, अशी भीती वाटते.”

“मी असेही काही पाहिलेत, जे सत्यात नसूनही खूप समंजस आणि प्रेमळ आहेत. माझ्या धर्मालाही त्यांचा काही विरोध नाही. त्यामुळे काही ख्रिस्ती बांधवांपेक्षा ते जास्त चांगले आहेत असं मला कधीकधी वाटतं.”

काही अविवाहित साक्षीदार बहिणींनी अशा प्रकारचं मत व्यक्त केलं आहे. अर्थात, लग्न “केवळ प्रभूमध्ये” म्हणजे केवळ सत्यात असलेल्या व्यक्तीशीच केलं पाहिजे, या यहोवाच्या आज्ञेविषयी त्यांना माहीत आहे. (१ करिंथ. ७:३९) तरीसुद्धा काही जण असा विचार का करतात?

शंकेची कारणं

असा विचार करणाऱ्यांपैकी काहींच्या मते, अविवाहित बांधवांपेक्षा बहिणींची संख्या जास्त आहे. आणि अनेक देशांमध्ये परिस्थिती अशीच आहे. कोरियाचं उदाहरण घ्या. तिथं अविवाहित बांधवांची संख्या ४३ टक्के तर तुलनेत बहिणींची संख्या ५७ टक्के आहे. आणि कोलंबियामध्ये बांधवांची संख्या ३४ टक्के, तर बहिणींची संख्या ६६ टक्के इतकी आहे.

काही देशांमध्ये, साक्षीदार नसलेले पालक सत्यात असलेल्या आपल्या मुलीचं लग्न ठरवताना कधीकधी पुष्कळ पैशांची किंवा अतिशय महागड्या भेटवसतूंची मागणी करतात. या अवाजवी मागण्या काही बांधव पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे, आपल्याला ख्रिस्ती जोडीदार मिळेल की नाही, अशी चिंता तिथल्या काही बहिणींना सतावते. *

यहोवावर भरवसा ठेवा

जर तुमच्या मनातही अशाच भावना असतील तर हे विसरू नका, की यहोवाला तुमची परिस्थिती कळते आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे तो समजू शकतो.—२ इति. ६:२९, ३०.

तरीसुद्धा, यहोवानं केवळ प्रभूमध्ये लग्न करा अशी आज्ञा दिली आहे. का बरं? कारण कोणत्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत हे त्याला माहीत आहे. चुकीचा निर्णय घेतल्यानं होणाऱ्या नुकसानापासून आणि दुःखद परिणामांपासून आपलं संरक्षण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. नहेम्याच्या दिवसांत कित्येक यहुदी लोक यहोवाला न मानणाऱ्या स्त्रियांशी लग्न करत होते. म्हणून नहेम्यानं शलमोनाच्या वाईट उदाहरणाची आठवण त्यांना करून दिली. त्यानं म्हटलं, “तो देवाचा आवडता असून त्याला सर्व इस्राएलावर राजा केले होते, तरी त्यालाही अन्य जातींच्या स्त्रियांनी पापात पाडले.” (नहे. १३:२३-२६) यहोवाला माहीत आहे, की त्याच्या तत्त्वांची आठवण आपल्याला करून देणं हे आपल्याच भल्यासाठी आहे. म्हणूनच तर ख्रिश्चनांना त्यानं केवळ प्रभूमध्ये लग्न करण्याची आज्ञा दिली आहे. (स्तो. १९:७-१०; यश. ४८:१७, १८) तेव्हा अशा प्रेमळ व भरवशालायक सल्ल्यासाठी आपण त्याचे आभार मानले पाहिजे. शिवाय, जेव्हा आपण यहोवाला आपला सर्वोच्च राजा म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपण काय करावं हे सांगण्याचा अधिकार त्याला आहे, असं आपण मान्य करत असतो.—नीति. १:५.

यहोवाबद्दल प्रेम नसणाऱ्या व्यक्तीशी “संबंध जोडून विजोड” होण्याची तुमची नक्कीच इच्छा नसेल. कारण पुढे जाऊन अशी व्यक्ती यहोवाच्या उपासनेच्या आड येऊ शकते. (२ करिंथ. ६:१४) म्हणून देवानं दिलेला सल्ला नेहमी योग्यच असतो, हे लक्षात असू द्या. कित्येकांनी समंजसपणे या सल्ल्याचं पालन करण्याचं ठरवलं आहे. पण काहींनी मात्र वेगळा मार्ग निवडला आहे.

आजही व्यावहारिक

ऑस्ट्रेलियातील मॅगी नावाच्या बहिणीनं सत्यात नसलेल्या एका व्यक्तीसोबत भेटीगाठी सुरू केल्या. * ती म्हणते, “केवळ त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मी बऱ्याच सभा चुकवू लागले. आध्यात्मिक रीत्या मी अगदी अशक्त झाले.” रत्ना नावाच्या, भारतातील एका तरुण बहिणीनंही आपल्या वर्गसोबत्याशी मैत्री केली व ती त्याला भेटू लागली. त्यानं नुकताच बायबल अभ्यास सुरू केला होता. पण खरंतर, तिच्या जवळ येण्याकरताच त्यानं हा बायबल अभ्यास सुरू केला होता. याचा परिणाम पुढं असा झाला, की त्या मुलाशी लग्न करता यावं म्हणून तिनं यहोवाची उपासना करण्याचं सोडून दिलं व दुसरा धर्म स्वीकारला.

कॅमरूनमधील १९ वर्षांच्या नडेंके नावाच्या एका बहिणीनं, यहोवाचा उपासक नसलेल्या एका व्यक्तीशी विवाह केला. ती पुढेही एक साक्षीदार या नात्यानं यहोवाची उपासना करू शकेल असं वचन लग्नाआधी या व्यक्तीनं तिला दिलं. पण लग्न झाल्याच्या केवळ दोनच आठवड्यांत, तिनं मंडळीच्या सभांना जायचं नाही असं त्यानं बजावलं. ती म्हणते, “मी अगदी एकटी पडले. रडत राहण्याशिवाय मला पर्याय नव्हता. निर्णय घेणं आता माझ्या हातात नाही, हे मला जाणवलं. आता पश्‍चात्ताप करण्याशिवाय माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं.”

हे खरं आहे, की काही साक्षीदारांनी सत्यात नसलेल्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. आणि ती व्यक्ती लग्नानंतरही कदाचित प्रेमळ आणि खुल्या विचारांची असेल. पण यहोवाची उपासना करत नसलेला तुमचा जोडीदार कितीही प्रेमळ असला, तरी तुमच्या या निर्णयामुळे यहोवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होईल? यहोवानं तुमच्याच हितासाठी दिलेल्या सल्ल्याचं तुम्ही पालन केलं नाही, याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही का? शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या अशा निर्णयामुळे यहोवाला कसं वाटेल याचाही विचार करा.—नीति. १:३३.

जगभरात आज जे बंधुभगिनी “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याच्या आज्ञेचं पालन करत आहेत, त्यांना याची खात्री आहे की हाच सर्वोत्तम निर्णय आहे. या अविवाहित बांधवांचा व बहिणींचा, सत्यात असलेल्या जोडीदाराशीच लग्न करून यहोवाचं मन आनंदित करण्याचा दृढ निश्चय आहे. जपानमधील मीचीको नावाच्या बहिणीला, यहोवाला न मानणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी तिच्या नातेवाइकांनी गळ घालण्याचा प्रयत्न केला. पण, अशा परिस्थितीतही या बहिणीनं यहोवाच्या आज्ञेत राहण्याचा निर्धार केला. शिवाय, आपल्या इतर मैत्रिणींचं लग्न सत्यात होत आहे हे पाहणंदेखील तिच्याकरता इतकं सोपं नव्हतं. ती म्हणते, “मी या गोष्टीची स्वतःला नेहमी आठवण देत राहिले, की यहोवा देव एक ‘आनंदी देव’ आहे. आणि आपला आनंद, आपण विवाहित आहोत की नाही यावर मुळीच अवलंबून नाही. मला हेही माहीत आहे की तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. त्यामुळे लग्न करण्याची इच्छा असूनही जर म्हणावा तसा जोडीदार मिळाला नाही, तर काही काळासाठी एकटं राहणंच योग्य ठरेल असं मला वाटतं.” (१ तीम. १:११) काही काळानंतर मीचीकोलाही सत्यात असणारा एक चांगला जोडीदार मिळाला. आणि यहोवाच्या आज्ञेत राहिल्यामुळे ती आज खूश आहे!

असे काही बांधवही आहेत ज्यांनी योग्य जोडीदार मिळेपर्यंत थांबून राहण्याचं पसंत केलं. ऑस्ट्रेलियातील बिलचं उदाहरण घ्या. तो कबूल करतो की, कधीकधी तो साक्षीदार नसलेल्या काही मुलींकडेही आकर्षित झाला. पण, त्यांच्यापैकी कोणाशीही त्यानं मैत्री वाढवली नाही. कारण, यहोवाबद्दल प्रेम नसणाऱ्या व्यक्तीशी “संबंध जोडून विजोड” होण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. पुढे, त्याला सत्यात असणाऱ्या काही मुलीही आवडल्या, पण त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. आपल्यासारखीच ध्येयं असलेली जोडीदार मिळेपर्यंत बिलला ३० वर्षं थांबावं लागलं. तो म्हणतो, “याविषयी मला बिलकूल वाईट वाटत नाही. आज आम्ही दोघं सोबत सेवाकार्यात जातो, अभ्यास करतो, आणि एकत्र मिळून यहोवाची उपासना करतो. या गोष्टी माझ्यासाठी आशीर्वादच आहेत. आणि माझ्या पत्नीच्या मित्र-मैत्रिणींना भेटायला व त्यांच्यासोबत वेळ घालवायलाही मला आवडतं. कारण तेदेखील यहोवाचे उपासक आहेत. आमच्या विवाहाला आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही नेहमी बायबल तत्त्वांचं पालन करतो.”

यहोवावर विसंबून राहताना

यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवून सत्यात असलेल्या जोडीदाराची वाट पाहत असताना तुम्हाला आणखी काय करता येईल? तुम्ही का थांबून आहात यावर विचार करा. जर यहोवाची आज्ञा पाळण्यासाठी आपण हे करत आहोत, असं तुम्हाला वाटत असेल तर खात्री बाळगा की यामुळे तुम्ही यहोवाचं मन आनंदित करत आहात. (१ शमु. १५:२२; नीति. २७:११) यासोबतच यहोवाला नेहमी प्रार्थना करत राहा, आणि आपल्या सर्व भावना त्याच्याजवळ व्यक्त करा. (स्तो. ६२:८) मोहाला आवर घालण्याचा व अयोग्य इच्छांशी लढण्याचा तुम्ही जितका प्रयत्न करत राहाल, तितकाच यहोवासोबत असणारा तुमचा नातेसंबंध दिवसेंदिवस आणखी मजबूत होत जाईल. तुम्ही यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहात आणि म्हणून तुमच्या इच्छा-आकांक्षा व गरजांविषयी त्याला काळजी आहे याचा पक्का भरवसा बाळगा. विवाह सोबती देण्याचं यहोवानं वचन दिलेलं नाही. पण लग्न करणं ही खरोखरच तुमची गरज असेल, तर तुमची ही गरज सर्वात उत्तम मार्गानं कशी पूर्ण करायची हे यहोवाला माहीत आहे.—स्तो. १४५:१६; मत्त. ६:३२.

दाविदानं एकदा यहोवाला म्हटलं, “हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा क्षय पावत आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नको.” (स्तो. १४३:५-७, १०) योग्य जोडीदाराची वाट पाहत असताना कधीकधी तुम्हालाही दाविदासारखं वाटेल. पण, धीर सोडू नका. यहोवाच्या मनात तुमच्याविषयी काय आहे, हे तो तुम्हाला दाखवेपर्यंत थांबून राहा. बायबलचं वाचन करून त्यावर खोलवर मनन करत राहा. यामुळे, तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो आणि गतकाळात त्यानं आपल्या सेवकांना कशी मदत केली हे तुम्हाला समजेल. शिवाय, त्याच्या आज्ञा पाळण्यातच शहाणपण आहे या गोष्टीची तुम्हाला खात्री पटेल.

अविवाहित बंधुभगिनींचं मंडळीत महत्त्वाचं स्थान आहे; बऱ्याच वेळा कुटुंबांना आणि लहान मुलांना त्यांच्याकडून मदत होते

अविवाहित असूनही आनंदी आणि व्यस्त राहण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता? यहोवासोबत तुमचा नातेसंबंध आणखी बळकट करण्याकरता आणि एक चांगलं नाव कमावण्याकरता तुम्ही प्रयत्न करू शकता. यासोबतच इतरांना मदत करण्याचा, कष्टाळू असण्याचा, सर्वांबरोबर मिळून मिसळून राहण्याचा आणि यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा. हे सर्व गुण आनंदी विवाहासाठी आवश्यक आहेत. (उत्प. २४:१६-२१; रूथ १:१६, १७; २:६, ७, ११; नीति. ३१:१०-२७) सेवाकार्यात आणि मंडळीच्या कार्यांत व्यस्त राहण्याद्वारे राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्या. असं केल्यानं चुकीचे निर्णय घेण्यापासून तुमचं संरक्षण होईल. याआधी उल्लेख केलेला बिल, अविवाहित होता तेव्हाचा काळ आठवून सांगतो: “ती वर्षं पाहता-पाहता निघून गेली! या सबंध काळाचा वापर मी पायनियर म्हणून यहोवाची सेवा करण्यासाठी केला.”

“केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याची यहोवाची आज्ञा पूर्वीइतकीच आजच्या काळालाही लागू होते यात काहीच शंका नाही. सत्यात असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचं निवडून आपण यहोवाचा गौरव करतो आणि यामुळे आपलं जीवनदेखील आनंदी होईल. बायबल म्हणते: “परमेशाचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते.” (स्तो. ११२:१, ३) तेव्हा, “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याच्या यहोवाच्या आज्ञेचं पालन करण्याचा पक्का निर्धार करा.

^ परि. 7 हा लेख बहिणींच्या दृष्टिकोनातून लिहिण्यात आला असला तरी त्यातील तत्वं बांधवांनाही लागू होतात.

^ परि. 13 काही नावं बदलण्यात आली आहेत.