व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वडिलांनो, बांधवांना प्रशिक्षित करा!

वडिलांनो, बांधवांना प्रशिक्षित करा!

ज्या गोष्टी तू माझ्यापासून ऐकल्या, त्या विश्वासू माणसांना सोपवून दे.—२ तीम. २:२.

१. (क) प्रशिक्षणाच्या बाबतीत देवाचे सेवक कोणती गोष्ट ओळखतात, आणि आज यातून आपण काय शिकू शिकतो? (ख) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण किती महत्त्वाचं आहे, हे यहोवाचे लोक फार आधीपासून ओळखतात. उदाहरणार्थ, अब्रामाने लोटाची सुटका करण्याकरता त्याच्या काही सेवकांचा वापर केला होता. हे पुरुष “कामात कसलेले” होते. आणि त्यामुळे लोटाची सुटका करण्याच्या कामगिरीत ते यशस्वी ठरले. (उत्प. १४:१४-१६) दाविदाच्या काळातही यहोवाचे स्तवन करण्याकरता ज्यांना वापरण्यात आलं, ते सर्व गाण्याच्या कलेत “तरबेज झालेले” लोक होते. (१ इति. २५:७) आज आपल्याला सैतान व त्याच्या जगाविरुद्ध संघर्ष करावा लागतो. (इफिस. ६:११-१३) शिवाय, इतरांना यहोवाविषयी सांगण्यासाठी व त्याची स्तुती करण्यासाठी आपण पुष्कळ परिश्रम घेतो. (इब्री १३:१५, १६) या सर्व गोष्टींमध्ये यशस्वी होण्याकरता, पूर्वी होऊन गेलेल्या देवाच्या सेवकांप्रमाणेच आपणसुद्धा प्रशिक्षित असण्याची गरज आहे. म्हणून, मंडळीत इतरांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी यहोवाने वडिलांना दिली आहे. (२ तीम. २:२) काही वडिलांनी, बांधवांना प्रशिक्षित करताना कोणत्या पद्धती वापरल्या आहेत, याविषयी आता आपण पाहू या.

यहोवावरील प्रेम आणखी वाढवण्यास मदत करा

२. प्रशिक्षण देण्यास सुरवात करण्याआधी एक वडील काय करतील, आणि का?

वडिलांची तुलना एका शेतकऱ्याशी करता येईल. जमीन सुपीक बनवण्यासाठी शेतकऱ्याला कदाचित बी पेरण्याआधी खतांचा वापर करावा लागू शकतो. यामुळे रोपांची वाढ अगदी जोमाने होते. त्याचप्रमाणे, नवीन कौशल्ये शिकवण्यास सुरवात करण्याआधी एक वडील, शिकणाऱ्या बांधवाला काही बायबल सिद्धान्तांबद्दल सांगू शकतात. असं केल्यामुळे शिकवलेल्या गोष्टी लागू करणं या बांधवाला सोपं जाईल.—१ तीम. ४:६.

३. (क) एखाद्या बांधवाशी चर्चा करण्यासाठी मार्क १२:२९, ३० मधील येशूच्या शब्दांचा कसा वापर करता येईल? (ख) वडिलांनी केलेल्या प्रार्थनेचा शिकणाऱ्या बांधवावर कसा परिणाम होऊ शकतो?

प्रशिक्षण देण्याआधी, एखाद्या बांधवाच्या विचारांवर व भावनांवर सत्याचा कितपत परिणाम झाला आहे, हे वडिलांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी, तुम्ही त्याला विचारू शकता, की यहोवाला केलेल्या समर्पणाचा त्याच्या जीवनातील निर्णयांवर कसा परिणाम झाला आहे. असा प्रश्न विचारल्यामुळे, पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्याचा काय अर्थ होतो, या विषयावर त्या बांधवाशी चर्चा करण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल. (मार्क १२:२९, ३० वाचा.) त्यासोबतच, त्या बांधवाला यहोवाच्या पवित्र आत्म्याची मदत मिळावी म्हणून तुम्ही त्याच्यासोबत प्रार्थनादेखील करू शकता. तुम्ही केलेली प्रार्थना तो ऐकेल, तेव्हा आणखी परिश्रम घेण्यासाठी त्याला किती प्रोत्साहन मिळेल याचा जरा विचार करा!

४. (क) शिकणाऱ्या बांधवाला प्रगती करण्यास मदत करतील अशा काही बायबल अहवालांची उदाहरणं सांगा. (ख) इतर बांधवांना प्रशिक्षण देताना वडिलांचा हेतू काय असला पाहिजे?

बांधवाला प्रशिक्षण देण्यास सुरवात करताना, त्याच्यासोबत काही बायबल अहवालांची चर्चा करणं फायद्याचं ठरेल. या अहवालांच्या सहाय्यानं, इतरांना मदत करण्यास उत्सुक असणं, भरवशालायक व नम्र असणं किती महत्त्वाचं आहे हे समजून घेण्यास तुम्ही त्याला मदत करू शकता. (१ राजे १९:१९-२१; नहे. ७:२; १३:१३; प्रे. कृत्ये १८:२४-२६) जमिनीसाठी खत जितकं आवश्यक असतं, तितकेच हे गुण शिकणाऱ्या बांधवासाठी आवश्यक आहेत. या गुणांमुळे त्या बांधवाला लवकर प्रगती करायला मदत होईल. फ्रान्स येथील एक वडील, जाँ-क्लॉड म्हणतात, की प्रशिक्षण देताना बायबल सिद्धान्तांच्या आधारावर योग्य निर्णय कसे घ्यावेत हे त्या बांधवाला दाखवणं हा माझा मुख्य हेतू असतो. ते सांगतात, “मी त्या बांधवासोबत मिळून एखादं वचन वाचण्याची नेहमी संधी शोधत असतो, ज्यामुळे बायबलमधील ‘अद्भुत गोष्टींकडे’ त्याचं लक्ष मला वेधता येईल.” (स्तो. ११९:१८) बांधवाला प्रशिक्षण देताना आणखी कोणत्या मार्गांचा वापर करता येईल?

ध्येयं सुचवा आणि कारणं स्पष्ट करा

५. (क) यहोवाच्या सेवेतील ध्येयांविषयी बांधवासोबत बोलणं इतकं महत्त्वाचं का आहे? (ख) बाधवांना लहान वयातच प्रशिक्षण देणं का महत्त्वाचं आहे? (तळटीप पाहा.)

यहोवाच्या सेवेत तू कोणती ध्येयं ठेवली आहेत, असं बांधवाला विचारा. जर त्यानं कोणतीही ध्येयं ठेवली नसतील, तर त्याला साध्य करता येईल असं एखादं ध्येय ठेवण्यास त्याला मदत करा. तुम्ही स्वतःसमोर ठेवलेल्या एखाद्या ध्येयाबद्दल व ते साध्य केल्यानंतर तुम्हाला किती आनंद झाला याविषयी त्याला उत्साहाने सांगा. ही गोष्ट साधीशीच वाटत असली, तरी खूप प्रभावी आहे. आफ्रिकेत एक वडील आणि पायनियर म्हणून काम करणारे, व्हिक्टर म्हणतात, “मी लहान असताना एकदा एका वडिलांनी माझ्या ध्येयांविषयी मला काही प्रश्न विचारले होते. गोष्ट तशी साधीच होती, पण त्या प्रश्नांमुळे मी माझ्या सेवाकार्याविषयी गंभीरपणे विचार करू लागलो.” अनुभवी वडिलांच्या मते मंडळीतील बांधवांना लहान वयापासून, अगदी चौदा-पंधरा वर्षांच्या वयापासूनच प्रशिक्षण देणं महत्त्वाचं आहे. त्यांचं वय लक्षात घेऊन तुम्ही त्यांना मंडळीतील काही कामं नेमू शकता. जसजशी मुलं मोठी होतात तसतशा अनेक लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी त्यांच्यासमोर येऊ लागतात. पण, लहान वयातच प्रशिक्षण दिल्यास त्यांना आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणं शक्य होईल.—स्तोत्र ७१:५, १७ वाचा. *

एखाद्या बांधवाला काम सोपवताना ते का केलं पाहिजे हे स्पष्ट करा, आणि त्याच्या परिश्रमांसाठी त्याची प्रशंसा करा (परिच्छेद ५-८ पाहा)

६. इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी येशूने कोणती खास पद्धत वापरली?

प्रशिक्षण घेणाऱ्या बांधवाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यानं यहोवाच्या सेवेत काय करावं एवढंच सांगू नका; तर, असं करणं का महत्त्वाचं आहे, हेदेखील त्याला सांगा. महान शिक्षक असलेल्या येशूने आपल्या प्रेषितांना प्रचारकार्य करण्यास सांगितलं. पण त्यानं केवळ ही आज्ञाच त्यांना दिली नाही, तर त्यांनी हे का केलं पाहिजे याचं कारणही सांगितलं. तो म्हणाला: “स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. म्हणून सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य करा.” (मत्त. २८:१८, १९, सुबोधभाषांतर) येशूची ही पद्धत तुम्हीसुद्धा कशी वापरू शकता?

७, ८. (क) प्रशिक्षण देत असताना आज वडील येशूचं कशा प्रकारे अनुकरण करू शकतात? (ख) शिकणाऱ्या बांधवाची प्रशंसा करणं इतकं महत्त्वाचं का आहे? (ग) इतरांना प्रशिक्षण देत असताना वडिलांना कोणत्या गोष्टी मदत करतील? (“ कशी कराल इतरांना मदत?” या शीर्षकाची चौकट पाहा.)

एखाद्या बांधवाला जेव्हा तुम्ही कोणतंही काम सोपवता तेव्हा ते काम महत्त्वाचं का आहे, हे त्याला बायबलमधून दाखवा. असं केल्यानं केवळ नियम आहे म्हणून एखादं काम करण्याऐवजी, त्यामागील बायबल सिद्धान्त लक्षात घेऊन ते काम करण्यास तो शिकेल. उदाहरणार्थ, जर एका बांधवाला तुम्ही राज्य सभागृहाच्या प्रवेश मार्गाची साफसफाई करण्यासाठी व येणा-जाणाऱ्यांसाठी तो मार्ग सोईस्कर करण्यासाठी सांगितलं असेल, तर तीत. २:१० हे वचन तुम्ही त्याला दाखवू शकता. त्यानं केलेल्या कामामुळे राज्याच्या संदेशाची शोभा कशी वाढेल हे त्याला समजावून सांगा. यासोबतच मंडळीतील वयस्क भाऊ-बहिणींना त्याच्या कामामुळे कसा फायदा होईल याचाही विचार करण्यास त्याला मदत करा. अशा प्रकारे चर्चा केल्यानं, तो बांधव नियमांपेक्षा लोकांचा विचार करण्यास शिकेल. शिवाय, आपल्या कामामुळे मंडळीतील भाऊ-बहिणींना कसा फायदा होत आहे, हे जेव्हा तो पाहील तेव्हा इतरांची सेवा केल्यानं मिळणारा आनंद त्याला अनुभवता येईल.

प्रशिक्षण देत असताना, तुम्ही दिलेल्या सूचनांचं जेव्हा एक बांधव पालन करतो, तेव्हा त्याची प्रशंसा करायला विसरू नका. हे इतकं महत्त्वाचं का आहे? ज्या प्रकारे पाण्यामुळे रोपाची चांगली वाढ होऊन ते टवटवीत होतं, त्याच प्रकारे तुम्ही केलेल्या प्रशंसेमुळे शिकणाऱ्या बांधवाला यहोवाच्या सेवेत प्रगती करण्यासाठी मदत मिळेल.—मत्तय ३:१७ पडताळून पाहा.

आणखी एक समस्या

९. (क) आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील देशांत, बांधवांना प्रशिक्षण देणं वडिलांना कठीण का जाऊ शकतं? (ख) काही तरुणांच्या जीवनात देवाच्या सेवेला पहिलं स्थान का नाही?

आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील देशांमध्ये २० ते ४० वयोगटातील बाधवांना, मंडळीत जबाबदाऱ्या स्वीकारण्यास पुढे येण्याचं प्रोत्साहन देणं कधीकधी वडिलांना कठीण जातं. कारण काही तरुण मंडळीत पुढे यायला कचरतात. असं का घडतं, याविषयी जवळपास २० देशांतील अनुभवी वडिलांनी आपली मतं व्यक्त केली. त्यांपैकी बहुतेकांचं म्हणणं आहे, की जेव्हा हे बांधव लहान असतात, तेव्हा त्यांचे पालक यहोवाच्या सेवेत कोणतीही ध्येयं ठेवण्याचं प्रोत्साहन त्यांना देत नाहीत. आणि पुढे जेव्हा या बांधवांना यहोवाच्या सेवेत काहीतरी करावसं वाटतं, तेव्हा त्यांचे पालक त्यांना उच्च शिक्षण किंवा चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं प्रोत्साहन देतात. परिणाम, आध्यात्मिक ध्येयांना त्यांच्या जीवनात कधीच पहिलं स्थान मिळत नाही.—मत्त. १०:२४.

१०, ११. (क) एखाद्या बांधवाचा दृष्टिकोन बदलण्यास वडील त्याला हळूहळू कशी मदत करू शकतात? (ख) बांधवाला उत्तेजन देण्याकरता कोणती वचनं वाचता येतील, व का? (तळटीप पाहा.)

१० एखाद्या बांधवाला मंडळीच्या कामात पुढे येण्याची इच्छा नसल्यास, त्याचं मन वळवण्याकरता धीराने प्रयत्न करण्याची आणि पुष्कळ परिश्रम घेण्याची गरज पडू शकते; पण हे अशक्य नाही. रोप सरळ वाढावं म्हणून माळी त्याला हळूहळू वळण देत राहतो. त्याचप्रमाणे मंडळीत जास्त जबाबदाऱ्या स्वीकारण्याबाबत एखाद्या बांधवाचा दृष्टिकोन बदलण्यास वडील त्याला हळूहळू मदत करू शकतात. पण हे कसं करता येईल?

११ त्या बांधवासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करा. मंडळीला त्याची गरज आहे, याची जाणीव त्याला करून द्या. त्यानं यहोवाला केलेल्या समर्पणाचा गांभीरपणे विचार करावा म्हणून त्याच्यासोबत बसून वचनांच्या आधारावर तर्क करा. (उप. ५:४; यश. ६:८; मत्त. ६:२४, ३३; लूक ९:५७-६२; १ करिंथ. १५:५८; २ करिंथ. ५:१५; १३:५) त्याच्या मनास स्पर्श करतील असे प्रश्न त्याला विचारा. उदाहरणार्थ, ‘यहोवाला आपलं जीवन समर्पित करताना, तू कोणतं वचन दिलं होतंस? तू बाप्तिस्मा घेतलास, तेव्हा यहोवाला कसं वाटलं असेल?’ (नीति. २७:११) ‘सैतानाला तेव्हा कसं वाटलं असेल?’ (१ पेत्र ५:८) वर उल्लेखलेली शास्त्रवचनं अतिशय प्रभावी ठरू शकतात आणि यामुळे एखाद्याच्या अंतःकरणावर खोलवर परिणाम होऊ शकतो.—इब्री लोकांस ४:१२ वाचा. *

शिकणाऱ्या बांधवांनो, विश्वासूपणा दाखवा

१२, १३. (क) एलीयाकडून प्रशिक्षण घेताना अलीशानं कोणती मनोवृत्ती दाखवली? (ख) यहोवानं अलीशाला त्याच्या विश्वासूपणाचा काय मोबदला दिला?

१२ तरुण बांधवांनो, मंडळीला तुमची गरज आहे! यहोवाच्या सेवेत यशस्वी होण्यासाठी तुम्ही कशा प्रकारची मनोवृत्ती बाळगली पाहिजे? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी, प्रशिक्षण मिळालेल्या बायबल काळातील एका व्यक्तीच्या, म्हणजेच अलीशाच्या जीवनातील काही घडामोडींवर चर्चा करू या.

१३ जवळपास ३,००० वर्षांपूर्वी, एलीयाने आपला साहाय्यक म्हणून तरुण अलीशाला निवडलं. अलीशानंही लगेच होकार देऊन विश्वासूपणे या संदेष्ट्याची सेवा केली. (२ राजे ३:११) एलीयाने जवळजवळ सहा वर्षं अलीशाला प्रशिक्षण दिलं. जेव्हा एलीयाची इस्राएलमधील कामगिरी संपण्याच्या बेतात होती, तेव्हा त्यानं आपल्या सेवकाला, म्हणजे अलीशाला म्हटलं, ‘मला अनुसरण्याचं सोडून दे.’ पण एकदा नव्हे तर तीनदा अलीशा एलीयाला म्हणाला: “मी आपल्याला कधी सोडावयाचा नाही.” अलीशानं अगदी शेवटपर्यंत आपल्या शिक्षकाच्या सोबत राहण्याचा निर्धार केला होता. अलीशाच्या या एकनिष्ठतेचा आणि विश्वासूपणाचा यहोवानं त्याला मोबदला दिला. एलीयाला जेव्हा वादळातून चमत्कारिकपणे नेण्यात आलं तेव्हा ती अविस्मरणीय घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचा बहुमान यहोवानं अलीशाला दिला.—२ राजे २:१-१२.

१४. (क) प्रशिक्षण घेणारे बांधव अलीशाचं अनुकरण कसं करू शकतात? (ख) प्रशिक्षण घेणाऱ्यानं विश्वासू असणं का महत्त्वाचं आहे?

१४ बांधवांनो, प्रशिक्षण घेताना तुम्ही अलीशासारखी मनोवृत्ती कशी दाखवू शकता? तुमच्यावर एखादं काम सोपवण्यात येतं, तेव्हा ते लगेच स्वीकारण्यास तयार राहा; मग ते अगदी साधंसुधं काम असलं तरी! तुमचा प्रशिक्षक हा तुमचा मित्र आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठी तो जे काही परिश्रम घेत आहे, त्यांची तुम्हाला कदर आहे व त्याच्याकडून शिकत राहण्याची तुमची इच्छा आहे हे त्याला सांगा. पण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही काम तुम्हाला दिलं जाईल ते विश्वासूपणे करा. हे का महत्त्वाचं आहे? कारण जेव्हा तुम्ही विश्वासू आणि भरवशालायक असल्याचं वडिलांना दिसून येईल, तेव्हा तुमच्यावर आणखी जबाबदाऱ्या सोपवण्याची यहोवाची इच्छा आहे याची त्यांना खात्री पटेल.—स्तो. १०१:६; २ तीमथ्य २:२ वाचा.

अनुभवी वडिलांचा आदर करा

१५, १६. (क) अलीशानं आपल्या शिक्षकाला आदर कसा दिला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) इतर संदेष्ट्यांना अलीशावर विश्वास ठेवणं का सोपं गेलं?

१५ आज बांधवांनी मंडळीतील अनुभवी वडिलांना आदर दिला पाहिजे हेदेखील अलीशाच्या अहवालातून पाहायला मिळतं. यरीहोमधील संदेष्ट्यांना भेटल्यानंतर एलीया व अलीशा यार्देन नदीजवळ आले. मग “एलीयाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली, तेव्हा पाणी दुभंग झाले.” त्या दोघांनी कोरड्या जमिनीवरून नदी पार केल्यावर, ते पुढे “बोलत चालले.” एलीयानं जे काही अलीशाला सांगितलं ते सर्व त्यानं लक्षपूर्वक ऐकलं व त्या वेळीदेखील तो त्याच्यापासून शिकून घेण्यास उत्सुक होता. आपल्याला सगळंकाही माहीत आहे असा अलीशानं विचार केला नाही. मग, एलीयाला चमत्कारिक रीत्या दूर नेण्यात आलं आणि अलीशा पुन्हा एकदा यार्देन नदीकाठी आला. एलीयाचा झगा पाण्यावर मारून अलीशाने, “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” असं म्हटलं तेव्हा पाणी पुन्हा दुभंगलं.—२ राजे २:८-१४.

१६ इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? एलीयानं केलेला शेवटला चमत्कार आणि अलीशानं केलेला पहिला चमत्कार यात काहीच फरक नव्हता. यातून आपण काय शिकतो? अलीशानं असा मुळीच विचार केला नाही, की आता जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आहे; म्हणून एलीयाप्रमाणे न करता, सगळंकाही वेगळ्या पद्धतीनं करावं. उलट, एलीयाच्याच पद्धतीनं कार्य केल्यामुळे, त्याच्याबद्दल आपल्या मनात आदर असल्याचं अलीशानं दाखवलं व त्यामुळे इतर संदेष्ट्यांनाही त्याच्यावर विश्वास ठेवणं सोपं गेलं. (२ राजे २:१५) अलीशानं ६० वर्षं संदेष्टा म्हणून काम केलं, आणि या सबंध काळात एलीयापेक्षा जास्त चमत्कार करण्याचं सामर्थ्य यहोवानं त्याला दिलं. प्रशिक्षण घेणारे बांधव यातून आज कोणता धडा घेऊ शकतात?

१७. (क) आज बांधवांना अलीशाच्या मनोवृत्तीचं कशा प्रकारे अनुकरण करता येईल? (ख) येणाऱ्या काळात यहोवा प्रशिक्षण घेतलेल्या विश्वासू बांधवांचा कसा उपयोग करेल?

१७ जेव्हा मंडळीत तुमच्यावर जास्त जबाबदाऱ्या येतात, तेव्हा पूर्वी केलं जात होतं त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची गरज आहे, असा विचार करू नका. मंडळीत केवळ तुम्हाला वाटतं म्हणून बदल करणं योग्य ठरणार नाही. तर मंडळीला गरज असते किंवा यहोवाच्या संघटनेकडून तशा स्पष्ट सूचना मिळतात तेव्हाच बदल केला पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. अलीशानं एलीयाच्याच पद्धतींचा वापर केला. त्याने असं केल्यामुळे, इतर संदेष्ट्यांना त्याच्यावर भरवसा ठेवण्यास मदत झाली. शिवाय, आपल्या प्रशिक्षकाविषयी आदर असल्याचंही त्यानं दाखवलं. त्याचप्रमाणे, तुम्हीही तुमच्या प्रशिक्षकांच्या बायबल आधारित पद्धतींचं अनुकरण केलं, तर या अनुभवी वडिलांविषयी तुमच्या मनातही आदर असल्याचं तुम्हाला दाखवता येईल; आणि यामुळे बंधू-भगिनींना तुमच्यावर भरवसा ठेवणं सोपं जाईल. (१ करिंथकर ४:१७ वाचा.) पुढे जसजसे तुम्ही अनुभवी होत जाल तसतसे तुम्हाला मंडळीत आवश्यक बदल करणं शक्य होईल; असे बदल, ज्यांमुळे बांधवांना यहोवाच्या संघटनेला अनुसरण्यास मदत होईल. कोण जाणे, अलीशाला मदत केल्याप्रमाणेच कदाचित यहोवा तुम्हालादेखील तुमच्या प्रशिक्षकांपेक्षा मोठी कार्यं साध्य करण्यास मदत करेल!—योहा. १४:१२.

१८. मंडळीतील बांधवांना प्रशिक्षण देणं आज इतकं महत्त्वाचं का आहे?

१८ या व आधीच्या लेखात सुचवण्यात आलेल्या गोष्टींमुळे बांधवांना प्रशिक्षित करण्याकरता वेळ काढण्यासाठी पुष्कळ वडिलांना चालना मिळेल अशी आशा आम्ही करतो. आणि आमची हीच प्रार्थना आहे, की जास्तीतजास्त बांधव दिलेलं प्रशिक्षण स्वीकारतील आणि यहोवाच्या सेवकांची काळजी घेण्यास शिकलेल्या गोष्टी उपयोगात आणतील. यामुळे, जगभरातील मंडळ्या मजबूत होतील आणि येणाऱ्या रोमांचक काळादरम्यान विश्वासू राहण्यास प्रत्येकाला मदत मिळेल.

^ परि. 5 एखादा तरुण बांधव समंजस व नम्र आहे आणि मंडळीत सेवा करण्यासाठी आवश्यक गुण त्याच्यामध्ये आहेत असं दिसल्यास, त्याचं वय २० पेक्षा कमी असलं तरीही वडीलजन सेवा-सेवक म्हणून त्याची नेमणूक करण्यासाठी शिफारस करू शकतात.—१ तीम. ३:८-१०, १२; टेहळणी बुरूज, १ जुलै १९८९ च्या इंग्रजी अंकातील पृष्ठ २९ पाहा.

^ परि. 11 टेहळणी बुरूज, १५ एप्रिल २०१२ अंकातील पृष्ठ १४-१६ वरील परि. ८-१३ आणि “देवाच्या प्रेमात टिकून राहा,” अध्याय १६, परि. १-३ वरील मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला चर्चा करता येईल.