व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बहिष्कृत करणे—एक प्रेमळ तरतूद

बहिष्कृत करणे—एक प्रेमळ तरतूद

हूल्यान आठवून सांगतात, “माझ्या मुलाला बहिष्कृत करण्यात आलंय अशी घोषणा जेव्हा मी ऐकली, तेव्हा जणू माझ्यावर आभाळच कोसळलं. तो माझा सर्वात मोठा मुलगा होता आणि माझा त्याच्यावर खूप जीव होता. आम्ही कित्येक गोष्टी सोबत मिळून केल्या होत्या. खरंतर तो खूप चांगला मुलगा होता. पण, अचानक तो अगदीच चुकीचं वागू लागला. या गोष्टीला घेऊन माझी पत्नी सतत रडत राहायची. पण तिची समजूत कशी काढायची हेच मला कळत नव्हतं. पालक म्हणून आम्हीच कुठंतरी कमी पडलोय की काय, असं सारखं वाटू लागलं.”

एखाद्याला बहिष्कृत करण्याचं दुःख जर इतकं जास्त असू शकतं, तर मग ही एक प्रेमळ तरतूद आहे असं का म्हणता येईल? तसंच, कोणत्या शास्त्रवचनीय आधारावर हे टोकाचं पाऊल उचललं जातं? आणि बहिष्कृत होण्याकरता कोणत्या गोष्टी कारण ठरू शकतात?

बहिष्कृत होण्यास कारण ठरणाऱ्या दोन गोष्टी

बहिष्कृत होण्यामागे दोन गोष्टी कारणीभूत असतात. आणि बाप्तिस्मा झालेल्या साक्षीदाराच्या बाबतीत जेव्हा या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरतात, तेव्हा त्याला बहिष्कृत केलं जातं. पहिली, जेव्हा ती व्यक्ती गंभीर पाप करते. आणि दुसरी, आपल्या चुकीबद्दल ती पश्‍चात्ताप दाखवत नाही.

आपल्या सेवकांच्या हातून कोणतीच चूक होता कामा नये अशी अपेक्षा यहोवा करत नाही. तरीपण, त्याचे काही पवित्र नैतिक दर्जे आहेत आणि या दर्जांचं पालन त्याच्या सेवकांनी करावं अशी तो अपेक्षा करतो. उदाहरणार्थ लैंगिक अनैतिकता, मूर्तिपूजा, चोरी, दुसऱ्याची मालमत्ता हडपणं, खून, आणि भूतविद्या यांसारख्या गंभीर पातकांपासून दूर राहण्याची अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो.—१ करिंथ. ६:९, १०; प्रकटी. २१:८.

यहोवाचे दर्जे वाजवी आहेत आणि आपल्या संरक्षणासाठीच ते देण्यात आले आहेत असं तुम्हालाही वाटत नाही का? तुम्हाला शांतिप्रिय, सभ्य आणि भरवशालायक लोकांच्या सहवासात राहायला आवडत नाही का? ख्रिस्ती मंडळीत बंधुभगिनींमध्ये आपल्याला अशाच प्रकारचं वातावरण अनुभवायला मिळतं. आणि याचं कारण म्हणजे, समर्पणाच्या वेळी आपण सर्व जण देवाच्या वचनातील नैतिक दर्जांच्या अनुरूप जीवन जगण्याचं त्याला वचन देतो.

पण, बाप्तिस्मा झालेल्या एका ख्रिस्ती व्यक्तीच्या हातून मानवी कमतरतेमुळे गंभीर पाप घडतं तेव्हा काय? बायबल काळातही यहोवाच्या विश्वासू सेवकांच्या हातून अशा चुका झाल्या होत्या. पण, म्हणून देवानं त्यांना पूर्णपणे त्यागलं नाही. या बाबतीत दाविदाचं उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. दाविदाने व्यभिचार आणि खून केला होता. पण, नाथान संदेष्ट्याने त्याला सांगितलं, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे.”—२ शमु. १२:१३.

दाविदानं खरा पश्‍चात्ताप दाखवल्यामुळे देवाने त्याच्या पापाची क्षमा केली. (स्तो. ३२:१-५) त्याच प्रकारे, आजही एखाद्या व्यक्तीला केवळ तेव्हाच बहिष्कृत केलं जातं, जेव्हा ती व्यक्ती खरा पश्‍चात्ताप न दाखवता पापी मार्गातच चालत राहते. (प्रे. कृत्ये ३:१९; २६:२०) त्यामुळे, न्यायिक समिती हाताळणाऱ्या वडिलांना एखाद्यामध्ये खरा पश्‍चात्ताप दिसून न आल्यास, त्या व्यक्तीला बहिष्कृत करण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय उरत नाही.

एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जातं तेव्हा हा निर्णय अगदीच टोकाचा किंवा कठोर वाटू शकतो. आणि खासकरून जर ती आपली जवळची व्यक्ती असेल, तर आपल्याला असं वाटण्याची जास्त शक्यता आहे. पण, खरंतर बहिष्कृत करणं ही एक प्रेमळ तरतूद आहे. आणि देवाच्या वचनात दिलेल्या अनेक कारणांच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो.

बहिष्कृत केल्यानं होणारे फायदे

येशूने सांगितलं, “ज्ञान [“बुद्धी,” NW] आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” (मत्त. ११:१९) एखाद्या अपश्‍चात्तापी व्यक्तीला बहिष्कृत करण्याचा निर्णय न्यायी होता, हे कालांतराने नक्कीच स्पष्ट होईल. कारण त्यामुळे अनेक चांगले परिणाम घडून येतात. पुढील तीन परिणामांचाच विचार करा:

चूक करणाऱ्यांना बहिष्कृत केल्यामुळे यहोवाच्या नावाला सन्मान मिळतो. आपण यहोवाच्या नावाने ओळखले जातो. त्यामुळे, साहजिकच आपल्या वागण्याचा परिणाम देवाच्या नावावर होत असतो. (यश. ४३:१०) सहसा कोणत्याही मुलाच्या वागणुकीमुळे त्याच्या पालकांच्या नावाला एकतर सन्मान मिळतो किंवा त्यांच्या नावाची बदनामी होते. त्याचप्रमाणे, यहोवाविषयी लोकांच्या मनात आदर निर्माण होईल किंवा नाही, हे काही अंशी तरी आपल्या चांगल्या किंवा वाईट वागणुकीवर अवलंबून असतं. जेव्हा यहोवाच्या नावाने ओळखले जाणारे लोक त्याच्या नैतिक दर्जांना आपलंसं करतात तेव्हा साहजिकच देवाच्या नावाचा गौरव होतो. यहेज्केलच्या दिवसांतही इतर राष्ट्रांतील लोक यहुद्यांना यहोवाचे लोक म्हणून ओळखायचे. (यहे. ३६:१९-२३) त्याचप्रमाणे आज यहोवाचे साक्षीदार त्याच्या नावाने ओळखले जातात. त्यामुळे, आपण यहोवाचे नीतिनियम पाळतो तेव्हा यहोवाच्या नावाला सन्मान मिळतो.

याउलट, आपलं वागणं अनैतिक असल्यास यहोवाच्या नावाला कलंक लागतो. म्हणून प्रेषित पेत्राने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’” (१ पेत्र १:१४-१६) खरंच, आपल्या शुद्ध आणि पवित्र वागणुकीमुळे देवाच्या नावाला सन्मान मिळतो.

जेव्हा एक यहोवाचा साक्षीदार एखादी वाईट गोष्ट करत असतो, तेव्हा ही गोष्ट त्याच्या मित्रांपासून आणि ओळखीच्या लोकांपासून लपून राहात नाही. पण, जेव्हा त्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जातं, तेव्हा यहोवाचे लोक नैतिक रीत्या शुद्ध आहेत आणि ही शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी ते बायबलमधील नियमांना जडून राहतात, हे त्यांना दिसून येतं. स्वित्झर्लंड देशातील एका राज्य सभागृहात एक अनोळखी मनुष्य सभेला आला आणि मला मंडळीचा सदस्य व्हायचं आहे, असं त्यानं सांगितलं. त्याच्या बहिणीला पूर्वी अनैतिक कृत्य केल्यामुळे बहिष्कृत करण्यात आलं होतं. या संघटनेमध्ये “कोणतंही वाईट वर्तन खपवून घेतलं जात नाही” म्हणून मला या संघटनेचा भाग व्हायचंय, असं तो म्हणाला.

बहिष्कृत केल्यामुळे ख्रिस्ती मंडळी शुद्ध राहते. जाणूनबुजून पाप करणाऱ्यांना मंडळीत राहू देणं किती धोक्याचं आहे, याविषयी प्रेषित पौलानं करिंथ येथील बांधवांना लिहिलं होतं. अशा लोकांचा मंडळीवर कसा परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट करण्यासाठी त्यानं पिठाच्या सबंध गोळ्याला फुगवणाऱ्या खमिराचं उदाहरण दिलं. त्यानं म्हटलं, “थोडे खमीर सगळा गोळा फुगवते.” म्हणूनच त्यानं त्यांना असा सल्ला दिला: “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”—१ करिंथ. ५:६, ११-१३.

पौल या ठिकाणी ज्या ‘दुष्टाबद्दल’ बोलत होता, तो अगदीच निर्लज्जपणे अनैतिक आचरण करत होता. आणि मंडळीतील काही सदस्य तर त्याच्या वागणुकीचं समर्थनही करू लागले होते. (१ करिंथ. ५:१, २) पण, इतक्या गंभीर स्वरूपाच्या पापाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, इतर ख्रिश्चनांनाही अनैतिकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या त्या शहरातील चालीरितींचं अनुकरण करण्याचं प्रोत्साहन मिळण्याची शक्यता होती. जाणीवपूर्वक केलेल्या पापांकडे डोळेझाक केल्यामुळे देवाच्या शुद्ध नैतिक दर्जांना हलके लेखण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते. (उप. ८:११) शिवाय, अपश्‍चात्तापी वृत्तीने पाप करणारे हे जणू “झाकलेले खडक” असतात. समुद्रातील पाण्याखाली असलेल्या खडकांवर आदळून ज्याप्रमाणे जहाज फुटू शकतं, त्याचप्रमाणे हे लोकदेखील मंडळीतील इतरांना विश्वासातून पाडू शकतात.—यहू. ४, १२.

बहिष्कृत केल्यामुळे चूक करणाऱ्याला भानावर येण्यास मदत मिळू शकते. येशूने एकदा एका तरुण मुलाचा दाखला सांगितला होता. हा मुलगा आपल्या वडिलांचं घर सोडून निघून जातो आणि आपल्या वाट्याची मालमत्ता ऐशआरामात आणि वाईट वर्तनात उधळून टाकतो. पुढे त्या उधळ्या पुत्राला अतिशय खडतर परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आपल्या बापाच्या घराबाहेरील जीवन किती निरर्थक आहे आणि जग किती निर्दयी आहे याची जाणीव त्याला होते. शेवटी तो भानावर येतो, पश्‍चात्ताप करतो आणि स्वतःहून वडिलांच्या घरी परततो. (लूक १५:११-२४) तो घरी आल्यावर त्याचा प्रेमळ पिता त्याची पश्‍चात्तापी वृत्ती पाहून आनंदित होतो, असं येशूनं दाखल्यात पुढे सांगितलं. यावरून आपल्याला यहोवाच्या भावना काय आहेत हे समजतं. यहोवा म्हणतो, “कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे.”—यहे. ३३:११.

त्याच प्रकारे, बहिष्कृत झालेले लोक जेव्हा ख्रिस्ती मंडळीच्या, म्हणजेच त्यांच्या आध्यात्मिक कुटुंबाच्या बाहेर जातात तेव्हा आपण काय गमावलं आहे याची त्यांना जाणीव होते. त्यांच्या वाईट वर्तनाच्या दुष्परिणामांमुळे; तसंच, यहोवासोबत आणि त्याच्या लोकांसोबत चांगले संबंध असताना अनुभवलेल्या चांगल्या गोष्टींच्या आठवणींमुळे बहिष्कृत व्यक्तीला भानावर येण्यास मदत मिळू शकते.

पण, असा चांगला परिणाम घडून येण्याकरता प्रेमळपणे आणि ठामपणे परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. दाविदाने एका स्तोत्रात म्हटलं, “नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही.” (स्तो. १४१:५) हे आणखी स्पष्ट होण्याकरता एका उदाहरणाचा विचार करा: एखाद्याला साप चावतो तेव्हा हळूहळू त्याच्या शरीरात विष पसरायला सुरवात होते. त्यामुळे, त्याला गुंगी येऊ लागते. पण, झोप लागल्यास त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून डॉक्टरांची मदत मिळेपर्यंत त्याला जागं ठेवण्यासाठी कधीकधी त्याच्या गालावर चापट्या मारल्या जातात. चापट मारल्यामुळे रुग्णाला कदाचित थोडं दुखेल. पण, यामुळे त्याचा जीव वाचू शकतो. त्याचप्रमाणे, दाविदाला माहीत होतं की नीतिमान मनुष्याने त्याला ताडन केल्यास ते स्वीकारणं कदाचित कठीण जाईल; पण शेवटी ते त्याच्या भल्यासाठीच असल्यामुळे त्यानं ते स्वीकारलं पाहिजे.

बहिष्कृत करण्याद्वारे दिलं जाणारं ताडन अनेकांच्या बाबतीत उपयोगी ठरतं. लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या हूल्यान यांच्या मुलाने आपल्या वागणुकीत बदल केला व जवळपास दहा वर्षांनंतर तो मंडळीत परतला. आज तो मंडळीत वडील या नात्याने कार्य करत आहे. तो कबूल करतो, “बहिष्कृत झाल्यामुळे माझ्या चुकीच्या वागणुकीचे परिणाम मला प्रत्यक्ष भोगावे लागले. पण हे ताडन माझ्यासाठी खरंच गरजेचं होतं.”—इब्री १२:७-११.

बहिष्कृत व्यक्तींसोबत प्रेमळपणे वागा

खरंच, एखादी व्यक्ती बहिष्कृत होते तेव्हा ही एक अतिशय दुःखद घटना असते. पण, यातून त्या व्यक्तीला कधी सावरताच येणार नाही असं मुळीच नाही. खरंतर, तिला बहिष्कृत करण्याचा उद्देश साध्य व्हावा यासाठी आपण सर्व जण हातभार लावू शकतो.

पश्‍चात्तापी व्यक्तीला यहोवाकडे परतण्यास मदत करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले जातात

वडिलांसाठी, एखाद्याला बहिष्कृत करण्याचा निर्णय कळवणं नक्कीच एक फार कठीण आणि दुःखद गोष्ट असते. पण, हे करत असताना यहोवाचं प्रेम व्यक्त करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. जेव्हा बहिष्कृत करण्याचा निर्णय एखाद्याला कळवला जातो तेव्हा मंडळीत परत घेतलं जाण्याकरता त्यानं कोणती पावलं उचलावीत, हेदेखील त्याला प्रेमळपणे आणि स्पष्टपणे सांगितलं जातं. शिवाय, ज्यांनी थोडा का होईना पण पश्‍चात्ताप दाखवला आहे, अशांनी यहोवाकडे परत येण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सांगण्यासाठी वडीलजन अधूनमधून त्यांना भेटायलादेखील जाऊ शकतात. *

कुटुंबातील सदस्यसुद्धा बहिष्कृत करण्याच्या निर्णयाला गंभीरपणे घेऊन मंडळीप्रती आणि चूक करणाऱ्याप्रती प्रेम व्यक्त करू शकतात. हूल्यान म्हणतात, “तो अजूनही माझा मुलगा होता, पण त्याच्या वागणुकीमुळे आमचं पूर्वीसारखं नातं राहिलं नाही.”

मंडळीतील सदस्यसुद्धा बहिष्कृत व्यक्तीसोबत कोणताही संपर्क न ठेवण्याद्वारे आणि तिच्याशी न बोलण्याद्वारे, देवाच्या तत्त्वांवर आधारित असलेलं प्रेम दाखवू शकतात. (१ करिंथ. ५:११; २ योहा. १०, ११) असं करण्याद्वारे, यहोवाने वडिलांकडून त्या व्यक्तीला दिलेल्या ताडनाचं ते समर्थन करत असतात. बहिष्कृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनासुद्धा खूप दुःख सहन करावं लागतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी दाखवण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. बहिष्कृत व्यक्तीसोबत आपल्यालाही काढून टाकण्यात आलं आहे, असं त्यांना कधीही वाटता कामा नये.—रोम. १२:१३, १५.

हूल्यान शेवटी म्हणतात, “बहिष्कृत करण्याची तरतूद खरंच गरजेची आहे. कारण यामुळे यहोवाच्या दर्जांनुसार जगण्याचं प्रोत्साहन आपल्याला मिळतं. सुरवातीला जरी दुःख होत असलं, तरी शेवटी याचे चांगलेच परिणाम घडून येतात. मी माझ्या मुलाचं वाईट वर्तन खपवून घेतलं असतं तर तो कधीच यहोवाकडे परतला नसता.”

^ परि. 24 टेहळणी बुरूज १ फेब्रुवारी १९९२, पृष्ठे १७-१९ पाहा.