व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्त—देवाचं सामर्थ्य आहे

ख्रिस्त—देवाचं सामर्थ्य आहे

ख्रिस्त “देवाचे सामर्थ्य” आहे.—१ करिंथ. १:२४.

१. ख्रिस्त “देवाचे सामर्थ्य” आहे, असं प्रेषित पौलानं का म्हटलं?

यहोवानं येशूद्वारे आपलं सामर्थ्य आश्चर्यकारक मार्गांनी प्रदर्शित केलं. पृथ्वीवर असताना येशूनं अनेक चमत्कार केले. त्यांपैकी काही, आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात आणि त्या चमत्कारांमुळे आपला विश्वास मजबूत होऊ शकतो. (मत्त. ९:३५; लूक ९:११) यहोवानं येशूला असीम सामर्थ्य दिलं होतं. त्यामुळे प्रेषित पौलानं असं म्हटलं, की ख्रिस्त “देवाचे सामर्थ्य” आहे. (१ करिंथ. १:२४) पण मग, येशूनं केलेल्या चमत्कारांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो?

२. आपण येशूच्या चमत्कारांतून काय शिकू शकतो?

येशूनं अनेक ‘अद्भुत’ गोष्टी किंवा चमत्कार केले, असं प्रेषित पेत्रानं म्हटलं. (प्रे. कृत्ये २:२२) या चमत्कारांतून आपण काय शिकू शकतो? येशू त्याच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान कोणत्या गोष्टी करणार आहे, हे आपल्याला या चमत्कारांतून शिकायला मिळतं. त्याच्या राज्यादरम्यान तो मोठ्या प्रमाणावर चमत्कार करेल. त्याचा फायदा सर्व मानवजातीला होईल. त्याच्या चमत्कारांतून आपल्याला त्याच्या व यहोवाच्या गुणांविषयीही बरंच काही शिकायला मिळतं. या लेखात आपण येशूच्या तीन चमत्कारांवर चर्चा करू या. या चमत्कारांचा आज आपल्यावर कसा प्रभाव पडतो आणि यातून भविष्याविषयी आपल्याला काय शिकायला मिळतं हे आपण पाहू या.

उदारता शिकवणारा चमत्कार

३. (क) येशूनं हा चमत्कार का केला? (ख) येशूनं काना शहरात असताना उदारता कशी दाखवली?

येशूनं त्याचा पहिला चमत्कार काना शहरातील एका लग्नसमारंभात केला. पाहुण्यांना द्राक्षारस पुरवणं ही त्या ठिकाणाची रीत होती. पण त्या लग्नात पाहुण्यांना देण्यासाठी द्राक्षारस कमी पडला. तो का कमी पडला हे आपल्याला माहीत नाही. पण, नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यासाठी ही गोष्ट लाजिरवाणी ठरली असती. येशूची आई मरीया हीदेखील या लग्नाला आली होती. तिनं ही परिस्थिती पाहिली आणि त्याबद्दल येशूला सांगितलं. येशूकडे चमत्कार करण्याची शक्ती आहे हे माहीत असल्यामुळे तिनं येशूला मदत करण्यासाठी सांगितलं असेल का? असेलही कदाचित. कारण येशूबद्दलच्या सर्व भविष्यवाणींवर मरीयेनं नक्कीच मनन केलं असेल. शिवाय, येशूला “परात्पराचा पुत्र” म्हटलं जाईल हेदेखील तिला माहीत होतं. (लूक १:३०-३२; २:५२) कारण काहीही असो, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, ती म्हणजे मरीया व येशू या दोघांना त्या जोडप्याला मदत करायची होती. त्यामुळे येशूनं चमत्कारिक रीत्या ३८० लिटर पाण्याचं रूपांतर ‘चांगल्या द्राक्षारसात’ केलं. (योहान २:३, ६-११ वाचा.) येशूनं हा चमत्कार करणं खरंच गरजेचं होतं का? मुळीच नाही. त्यानं हा चमत्कार यासाठी केला कारण त्याला लोकांची काळजी होती आणि उदारतेचं सर्वोत्तम उदाहरण असलेल्या आपल्या पित्याचं तो अनुकरण करत होता.

४, ५. (क) येशूच्या पहिल्या चमत्कारातून आपण काय शिकतो? (ख) काना शहरातील चमत्कारातून आपण भविष्याविषयी काय शिकतो?

येशूनं तिथं जमलेल्या सर्वांसाठी चमत्कार करून मोठ्या प्रमाणात चांगला द्राक्षारस पुरवला. या चमत्कारातून आपण काय शिकू शकतो? हेच की यहोवा आणि येशू हातचं राखून देत नाहीत तर अगदी उदार मनानं देतात. शिवाय, आपल्याला याचीही खात्री मिळते की त्यांना लोकांच्या भावनांची कदर आहे. तसंच, यहोवा आपल्या शक्तीचा उपयोग करून नवीन जगात भरपूर अन्न पुरवेल हेदेखील आपल्याला कळतं; मग आपण पृथ्वीच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही.—यशया २५:६ वाचा.

पुढील गोष्टींवर विचार करा: लवकरच यहोवा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तो प्रत्येकाला स्वतःचं सुंदर घर व खाण्यासाठी भरपूर अन्न देईल. नंदनवनात यहोवा अगदी उदारपणे ज्या अद्भुत गोष्टी आपल्याला देणार आहे, त्यांबद्दल विचार करून आपलं मन खरंच कृतज्ञतेनं भरून येतं.

इतरांना वेळ देण्याद्वारे आपण येशूच्या उदारतेचं अनुकरण करत असतो (परिच्छेद ६ पाहा)

६. येशूनं नेहमी आपल्या शक्तीचा उपयोग कशासाठी केला, आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

येशूनं स्वतःच्या फायद्यासाठी कधीही त्याच्या शक्तीचा उपयोग केला नाही. सैतानानं येशूची परीक्षा घेतली तेव्हा काय घडलं याचा विचार करा. त्यानं येशूला दगडाच्या भाकरी करण्यास सांगितलं. पण येशूनं मात्र आपल्या शक्तीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला नाही. (मत्त. ४:२-४) येशू इतरांसाठी त्याच्या शक्तीचा उपयोग करण्यास नेहमी तयार होता. आपण येशूच्या या निःस्वार्थ वृत्तीचं अनुकरण कसं करू शकतो? येशूनं म्हटलं की आपण नेहमी ‘देण्याची वृत्ती’ बाळगली पाहिजे. (लूक ६:३८) आपण इतरांना आपल्या घरी जेवायला बोलवू शकतो. तसंच, सभेनंतर थोडं थांबून आपण इतरांना मदत करू शकतो. जसं की, एखाद्या बांधवाला त्याच्या भाषणाची तयारी करायला आपण मदत करू शकतो. शिवाय सेवाकार्यात आणखी प्रभावी होण्यासाठी आपण इतरांना प्रशिक्षण देऊ शकतो आणि त्यांना व्यावहारिक मदतदेखील पुरवू शकतो. अशा प्रकारे आपण जेव्हा उत्सुकतेनं इतरांना मदत करतो, तेव्हा खरंतर आपण येशूच्या उदारतेचं अनुकरण करत असतो.

“सर्व जेवून तृप्त झाले”

७. सैतानाच्या जगात कोणती समस्या कायम राहील?

गरिबी हा काही नवीन विषय नाही. यहोवानं इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की “देशात गरीब लोक नेहमीच असणार.” (अनु. १५:११) याच्या कित्येक शतकांनंतर येशूनं म्हटलं, “गरीब नेहमी तुम्हाजवळ आहेत.” (मत्त. २६:११) पृथ्वीवर नेहमी गरीब लोक राहतील असं येशूला म्हणायचं होतं का? नक्कीच नाही. येशूला या ठिकाणी असं म्हणायचं होतं, की जोपर्यंत या जगावर सैतानाचं राज्य आहे तोपर्यंत या जगात गरिबी कायम राहील. पण नवीन जगात परिस्थिती किती वेगळी असेल! हे दृश्य पूर्णपणे बदललेलं असेल. तेव्हा कोणीही गरीब नसेल. प्रत्येकाला भरपूर अन्न मिळेल आणि सर्व जण तृप्त असतील!

८, ९. (क) येशूनं हजारो लोकांसाठी अन्न का पुरवलं? (ख) या चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं?

यहोवाबद्दल स्तोत्रकर्त्यानं असं म्हटलं, “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करतोस.” (स्तो. १४५:१६) पृथ्वीवर असताना येशूनं आपल्या पित्याचं अगदी हुबेहूब अनुकरण केलं आणि बऱ्याच वेळा इतरांच्या गरजा पुरवल्या. येशूनं हे फक्त स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी केलं नाही, तर इतरांची मनापासून काळजी असल्यामुळे केलं. आता आपण मत्तय १४:१४-२१ (वाचा.) या वचनांवर चर्चा करू या. एकदा लोकांचा मोठा समुदाय येशूचं ऐकण्याकरता त्याच्या मागं मागं शहरांपासून लांब चालत आला होता. (मत्त. १४:१३) संध्याकाळ झाली तेव्हा शिष्यांना त्या लोकांची काळजी वाटायला लागली. कारण लोकांकडे अन्न नव्हतं आणि ते थकूनही गेले होते. त्यामुळे येशूनं लोकांना अन्न विकत घेण्यासाठी पाठवावं, असं शिष्यांनी त्याला सुचवलं. पण येशूनं काय केलं?

केवळ ५ भाकरी आणि २ माशांचा वापर करून येशूनं चमत्कारिकरित्या ५,००० पुरुषांना तसंच स्त्रियांना व लहान मुलांना जेवू घातलं. येशूनं हा चमत्कार का केला? कारण त्याचं लोकांवर खूप प्रेम होतं आणि त्याला त्यांची काळजी होती. येशूनं त्या प्रसंगी नक्कीच भरपूर अन्न पुरवलं असेल, कारण बायबल सांगतं की “सर्व जण जेवून तृप्त झाले.” यामुळे लांबचा प्रवास करून आपआपल्या घरी जाण्यास लोकांना ताकद मिळाली. (लूक ९:१०-१७) शिवाय, हजारो लोक जेवूनही १२ टोपल्या अन्न उरलं होतं!

१०. भविष्यात गरिबी राहील का?

१० स्वार्थी आणि भ्रष्ट नेत्यांमुळे आज लाखो लोक गरिबीत जगत आहेत. आपल्या काही बांधवांनादेखील पुरेसं अन्न मिळत नाही. पण लवकरच यहोवाला मानणारे लोक अशा एका नवीन जगात राहतील जिथं भ्रष्टाचार आणि गरिबीचं नावदेखील नसेल. यहोवा हा सर्वशक्तिमान देव आहे आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याची त्याच्याकडे फक्त ताकदच नाही तर त्याची इच्छासुद्धा आहे. आपल्या समस्यांचा लवकरच अंत करण्याचं अभिवचन यहोवानं आपल्याला दिलं आहे.—स्तोत्र ७२:१६ वाचा.

११. येशू त्याच्या शक्तीचा वापर सर्व मानवजातीसाठी करेल याची तुम्हाला खात्री का आहे, आणि यामुळे तुम्ही काय करण्यास प्रवृत्त होता?

११ आपल्या साडेतीन वर्षांच्या सेवेत येशूनं ठरावीक क्षेत्रात चमत्कार केले. (मत्त. १५:२४) पण हजार वर्षांदरम्यान राजा या नात्यानं येशू सर्व मानवजातीला मदत करेल. (स्तो. ७२:८) येशूच्या चमत्कारांतून आपल्याला या गोष्टीची खात्री मिळते, की आपल्या भल्यासाठी तो नेहमी त्याच्या शक्तीचा उपयोग करेल. पण, आपल्याजवळ चमत्कार करण्याची शक्ती नाही, मग येशूचं अनुकरण आपण कसं करू शकतो? बायबलमध्ये भविष्याबद्दल जी सुंदर आशा दिली आहे त्याबद्दल इतरांना सांगण्यासाठी आपण आपल्या वेळेचा व शक्तीचा नक्कीच वापर करू शकतो. यहोवाचे साक्षीदार या नात्यानं ही आपली जबाबदारी आहे. (रोम. १:१४, १५) लवकरच येशू ख्रिस्त जे करणार आहे त्यावर आपण मनन केलं, तर त्यांबद्दल इतरांना सांगण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल.—स्तो. ४५:१; ४९:३.

यहोवाचा आणि येशूचा नैसर्गिक शक्तींवर ताबा आहे

१२. येशूला पृथ्वीची जडणघडण माहीत आहे असं आपण खात्रीनं का म्हणू शकतो?

१२ यहोवानं पृथ्वी व त्यावरील इतर गोष्टींना निर्माण केलं, तेव्हा येशू यहोवासोबत एक “कुशल कारागीर” म्हणून काम करत होता. (नीति. ८:२२, ३०, ३१; कलस्सै. १:१५-१७) त्यामुळे पृथ्वीची जडणघडण त्याला पूर्णपणे माहीत आहे. म्हणूनच येशू नैसर्गिक शक्तींवर ताबा मिळवू शकतो.

येशूचा हा चमत्कार इतका प्रभावी का होता? (परिच्छेद १३, १४ पाहा)

१३, १४. येशू नैसर्गिक शक्तींवर ताबा मिळवू शकतो हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येतं?

१३ पृथ्वीवर असताना येशूनं निसर्गावर ताबा मिळवून हे दाखवून दिलं, की त्याच्याकडे देवाची शक्ती आहे. येशूनं एका वादळाला कसं शांत केलं ते लक्षात घ्या. (मार्क ४:३७-३९ वाचा.) एका बायबल विद्वानानं स्पष्ट केलं, की मार्कच्या पुस्तकात “वादळ” यासाठी जो ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे, तो एका विनाशकारक चक्रीवादळाला सूचित करतो. अशा वादळात ढग काळवंडतात, सोसाट्याचा वारा सुटतो, विजांचा कडकडाट होतो आणि मुसळधार पाऊस पडतो. असं वादळ आल्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. मत्तयानं या वादळाविषयी सांगताना म्हटलं की ते एक ‘मोठं वादळ’ होतं.—मत्त. ८:२४.

१४ तिथलं दृश्य डोळ्यांपुढं आणा: मोठमोठ्या लाटा बोटीवर आदळत आहेत. पाणी बोटीत शिरत आहे. वीजा कडाडत आहेत आणि बोट हेलकावे खात आहे. पण दमल्यामुळे येशू मात्र गाढ झोपेत आहे. येशूचे शिष्य खूप घाबरले आहेत, येशूला जागं करून ते म्हणतात, “प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो.” (मत्त. ८:२५) हे ऐकून येशू काय करतो? येशू उठून त्या वादळाला म्हणतो, “उगा राहा, शांत हो.” (मार्क ४:३९) आणि ते मोठं वादळ लगेच थांबतं आणि समुद्र अगदी शांत होतो. खरंच, निसर्गाच्या शक्तींवर ताबा मिळवण्याचं किती अद्भुत उदाहरण!

१५. यहोवा नैसर्गिक शक्तींवर ताबा मिळवू शकतो हे त्यानं कसं दाखवून दिलं?

१५ येशू ख्रिस्ताला यहोवानं शक्ती दिली होती, त्यामुळे यहोवाचाही नैसर्गिक शक्तींवर ताबा आहे हे आपल्याला कळतं. उदाहरणार्थ, जलप्रलयाआधी यहोवानं म्हटलं: “अजून सात दिवसांचा आवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार.” (उत्प. ७:४) तसंच, निर्गम १४:२१ या वचनात आपण वाचतो की, यहोवानं “पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटवला.” आणि योना १:४ या वचनात आपण वाचतो की, यहोवानं “समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले.” नवीन जगात यहोवा नैसर्गिक शक्तींवर नेहमी ताबा ठेवेल हे जाणून आपल्याला खरंच किती दिलासा मिळतो!

१६. यहोवा आणि येशू यांचा नैसर्गिक शक्तींवर ताबा आहे हे जाणून आपल्याला आनंद का होतो?

१६ यहोवा आणि येशू यांचं नैसर्गिक शक्तींवर नियंत्रण आहे हे जाणून आपल्याला आनंद होत नाही का? ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान पृथ्वीवरील सर्व लोक सुरक्षित असतील. वादळ, त्सुनामी, ज्वालामुखी किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे कोणालाही इजा पोचणार नाही किंवा कोणाचाही जीव जाणार नाही. कारण “देवाचा मंडप मनुष्यांजवळ” असेल. (प्रकटी. २१:३, ४) हजार वर्षांच्या राज्यादरम्यान यहोवा येशूला नैसर्गिक शक्तींवर पूर्णपणे ताबा मिळवण्याची शक्ती देईल, याची आपण खात्री बाळगू शकतो.

यहोवाचं आणि ख्रिस्ताचं अनुकरण करा

१७. आपण कोणत्या मार्गानं यहोवाचं आणि ख्रिस्ताचं अनुकरण करू शकतो?

१७ नैसर्गिक आपत्तींना थांबवणं हे आपल्या हातात नाही, केवळ यहोवा आणि येशूच हे करू शकतात. पण एक अशी गोष्ट आहे जी आपण सर्व करू शकतो. आपण नीतिसूत्रे ३:२७ (वाचा.) या वचनातील सल्ला लागू करू शकतो. आपल्या बांधवांना जेव्हा समस्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा त्यांच्या शारीरिक गरजा आपण पुरवू शकतो. तसंच, त्यांची भावनिक गरज ओळखून त्यांना सांत्वन देऊ शकतो. (नीति. १७:१७) उदाहरणार्थ, एखाद्या नैसर्गिक आपत्तीनंतर आपण आपल्या बांधवांना मदत करू शकतो. एका वादळात, आपल्या एका विधवा बहिणीच्या घराचं नुकसान झालं. ती म्हणते, “यहोवाच्या संघटनेत असल्यामुळे मला जी भौतिक आणि भावनिक रीत्या मदत मिळाली, त्याबद्दल मी यहोवाची खरंच खूप आभारी आहे.” वादळामुळे आणखी एका अविवाहित बहिणीच्या घराची नासधूस झाली होती. त्यामुळे ती खूप निराश झाली. बांधवांनी तिला तिच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी मदत केली. त्यानंतर ती म्हणते, “यहोवाचे आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत!” आपले बंधुभगिनी इतरांच्या गरजा ओळखून त्यांना पूर्ण मनानं मदत करतात हे पाहून आपल्याला खरंच खूप आनंद होतो. पण यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे यहोवाला आणि येशू ख्रिस्तालादेखील आपली काळजी आहे, या जाणीवेनं आपलं मन कृतज्ञतेनं भरून येतं.

१८. येशूनं ज्या कारणामुळे चमत्कार केले त्यातून त्याचा कोणता गुण दिसून येतो?

१८ आपल्या सेवाकार्यादरम्यान येशूनं हे दाखवून दिलं की तो देवाचं सामर्थ्य आहे. पण त्यानं केवळ इतरांना दाखवण्यासाठी किंवा स्वार्थासाठी नव्हे तर लोकांवर प्रेम असल्यामुळे आपल्या शक्तीचा उपयोग केला. पुढच्या लेखात याबद्दल आपण आणखी शिकू या.