व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण नैतिक रीत्या शुद्ध राहू शकतो

आपण नैतिक रीत्या शुद्ध राहू शकतो

“हात निर्मळ करा; . . . अंतःकरणे शुद्ध करा.”—याको. ४:८.

१. कोणती गोष्ट लोकांच्या नजरेत सर्वसामान्य बनली आहे?

आज आपण अनैतिकतेनं भरलेल्या जगात राहत आहोत. समलैंगिकता किंवा ज्यांच्याशी लग्न झालेलं नाही त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणं, आज अगदी सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. आजकाल चित्रपट, पुस्तकं, गाणी आणि जाहिराती यांमध्ये लैंगिक अनैतिकतेचा अक्षरशः भडिमार झाल्याचं दिसतं. (स्तो. १२:८) पण अशा परिस्थितीतही, यहोवाला मान्य असलेल्या मार्गानं जीवन जगण्याकरता तो आपल्याला मदत करू शकतो. थोडक्यात, अनैतिकतेत अगदी रसातळाला गेलेल्या या जगामध्ये नैतिक रीत्या शुद्ध राहणं खरंच शक्य आहे.—१ थेस्सलनीकाकर ४:३-५ वाचा.

२, ३. (क) वाईट इच्छांपासून आपण दूर का राहिलं पाहिजे? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

यहोवाचं मन आनंदित करायचं असेल, तर त्याला न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. पण, ज्याप्रमाणे एक मासा गळाकडे आकर्षित होतो, त्याचप्रमाणे अपरिपूर्ण असल्यामुळे आपण अनैतिक गोष्टींकडे आकर्षित होऊ शकतो. म्हणून अनैतिक विचार आपल्या मनात डोकावतात तेव्हा त्यांना वेळीच झटकून देणं गरजेचं आहे. जर आपण त्यांना मनात घर करू दिलं तर अनैतिक इच्छा आपल्या मनात इतक्या बळावतील की मग आपल्यासमोर मोह आल्यास आपण पाप करून बसू. यामुळेच बायबलमध्ये म्हटलं आहे, “वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.”—याकोब १:१४, १५ वाचा.

खरंच, चुकीच्या इच्छा आपल्या मनात बळावू शकतात. म्हणून आपल्या मनात कुठल्या प्रकारचे विचार येत आहेत याविषयी आपण नेहमी सावध असलं पाहिजे. आपण जर चुकीच्या इच्छांना आपल्या मनात थारा दिला नाही, तर लैंगिक अनैतिकतेला आणि त्याच्या वाईट परिणामांना टाळणं आपल्याला नक्कीच शक्य होईल. (गलती. ५:१६) या लेखात आपण अशा तीन गोष्टींवर चर्चा करणार आहोत ज्यांमुळे वाईट इच्छांविरुद्ध लढणं आपल्याला शक्य होईल. त्या आहेत: यहोवासोबतची आपली मैत्री, शास्त्रवचनांतील सल्ला, आणि प्रौढ ख्रिस्ती व्यक्तींकडून मिळणारी मदत.

“देवाजवळ या”

४. यहोवासोबत मैत्री करणं आपल्याकरता महत्त्वाचं का आहे?

ज्यांना देवासोबत मैत्री करायची आहे त्यांना बायबल असा सल्ला देते: आपले “हात निर्मळ करा” आणि “आपली अंतःकरणे शुद्ध करा.” (याको. ४:८) यहोवासोबत आपली पक्की मैत्री असते तेव्हा केवळ आपल्या वागण्या-बोलण्यातूनच नाही, तर आपल्या विचारांनीही त्याचं मन आनंदित करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपले विचार शुद्ध असतात तेव्हा आपलं अंतःकरणही शुद्ध राहतं. (स्तो. २४:३, ४; ५१:६; फिलिप्पै. ४:८) आपण अपरिपूर्ण असल्यामुळे अनैतिक गोष्टींबद्दल विचार करण्याकडे नेहमीच आपला कल असतो, याची खरंतर यहोवाला जाणीव आहे. पण, यहोवाचं मन दुःखी न करण्याची आपली मनापासून इच्छा असल्यामुळे चुकीच्या विचारांना टाळण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो. (उत्प. ६:५, ६) आणि यामुळे आपली विचारसरणी शुद्ध ठेवण्यास आपल्याला मदत होते.

५, ६. अनैतिक इच्छांविरुद्ध लढण्यासाठी प्रार्थनेमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

अनैतिक विचारांना आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्याला मदत करतो. तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देतो आणि त्यामुळे नैतिक रीत्या शुद्ध राहण्याकरता लागणारी शक्ती आपल्याला मिळते. म्हणून त्याला मान्य असतील असेच आपले विचार असावेत, अशी प्रार्थना आपण यहोवाला करू शकतो. (स्तो. १९:१४) तसंच, पापात पाडणाऱ्या वाईट इच्छा आपल्या मनात लपल्या आहेत का, याविषयी आपल्या मनाचा शोध घेण्याची नम्र विनंतीदेखील आपण यहोवाला करू शकतो. (स्तो. १३९:२३, २४) वाईट अनैतिक इच्छांना मनातून उपटून टाकणं आणि जे योग्य आहे ते करत राहणं जरी कठीण असलं, तरी ते करत राहण्यासाठी आपण नेहमीच यहोवाला मदत मागितली पाहिजे.—मत्त. ६:१३.

यहोवाची ओळख होण्याआधी कदाचित आपलं चालचलन त्याच्या स्तरांच्या अगदी विरुद्ध असेल. आणि आजसुद्धा त्या वाईट इच्छांविरुद्ध आपल्याला लढावं लागत असेल. पण, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आणि यहोवाला आवडतील अशा गोष्टी करण्यासाठी तो आपल्याला मदत करू शकतो, हे विसरू नका. दाविदाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्यानं बथशेबेशी व्यभिचार केला. पण, नंतर मात्र त्यानं याविषयी पश्‍चात्ताप केला आणि पुन्हा “शुद्ध हृदय” आणि आज्ञाधारक अंतःकरण देण्याची यहोवाकडे अक्षरशः भीक मागितली. (स्तो. ५१:१०, १२) त्याचप्रमाणे, समजा पूर्वी आपल्यामध्ये तीव्र अनैतिक इच्छा असतील आणि आजदेखील आपल्याला त्यांच्याशी झगडावं लागत असेल तर काय? अशा वेळी यहोवाकडे मदत मागितल्यास तो त्याच्या तत्त्वांनुसार जगण्याची आणि चांगलं ते करत राहण्याची प्रबळ इच्छा आपल्या मनात घालू शकतो. खरंच, आपल्या वाईट विचारांवर ताबा ठेवण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करू शकतो.—स्तो. ११९:१३३.

जेव्हा आपल्या मनात अयोग्य इच्छा मुळावू लागतात, तेव्हा आपण त्या लगेचंच उपटून टाकल्या पाहिजेत (परिच्छेद ६ पाहा)

“वचनाप्रमाणे आचरण करणारे असा”

७. अनैतिक इच्छांचा प्रतिकार करण्यासाठी देवाच्या वचनामुळे आपल्याला कशी मदत होते?

आपण मदतीसाठी करत असलेल्या प्रार्थनांची उत्तरं, यहोवा आपल्याला बायबलमधून देतो. देवाच्या वचनात मुळातच शुद्ध असणारं देवाचं ज्ञान आहे. (याको. ३:१७) आपण बायबलचं दररोज वाचन करतो तेव्हा खरंतर आपलं अंतःकरण आपण शुद्ध विचारांनी भरत असतो. (स्तो. १९:७, ११; ११९:९, ११) शिवाय, बायबलमध्ये अनेक उदाहरणं आणि इशारे आहेत ज्यांमुळे अनैतिक विचारसरणीचा आणि वाईट इच्छांचा प्रतिकार करण्यास आपल्याला मदत होते.

८, ९. (क) नीतिसूत्रात सांगितलेल्या तरुणाच्या हातून पाप का घडलं? (ख) नीतिसूत्राच्या ७ व्या अध्यायातील उदाहरणामुळे कोणत्या गोष्टी टाळण्यास आपल्याला मदत होते?

नीतिसूत्रे ५:८ या वचनात, आपल्याला अनैतिक गोष्टींपासून दूर राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. तसंच, नीतिसूत्राच्या ७ व्या अध्यायामध्ये, आपल्याला अशा तरुणाविषयी वाचायला मिळतं जो एकदा रात्रीच्या वेळी एका व्यभिचारी स्त्रीच्या घराजवळ फिरत असतो. तेव्हा “वेश्येचा पोषाख केलेली” एक व्यभिचारी स्त्री त्याला रस्त्यावर भेटते. ती त्याच्याकडे येते, आणि त्याला धरून त्याचे चुंबन घेते. त्यानंतर, ती त्याच्याशी अशा काही गोष्टी बोलते ज्यांमुळे त्या तरुणाच्या मनात चुकीच्या इच्छा उत्पन्न होतात. या तरुणानं त्या चुकीच्या इच्छा आपल्या मनातून लगेचच काढून टाकल्या असत्या तर बरं झालं असतं. पण, आता त्याच्या इच्छांवर त्याचा ताबा राहत नाही आणि परिणाम म्हणजे त्याच्या हातून व्यभिचार घडतो. हा तरुण पाप करण्याच्या उद्देशानं तिथं गेला नसला तरी त्याच्या हातून पाप घडतं. आणि या पापाचे वाईट परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात. खरं पाहता पुढं येणाऱ्या धोक्यांची जर त्याला जाणीव असती, तर तो त्या स्त्रीपासून लांब राहिला असता.—नीति. ७:६-२७.

पुढं येणाऱ्या धोक्यांना वेळीच ओळखलं नाही तर या तरुणासारखंच आपणही चुकीचा निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ, काही टीव्ही चॅनलवर रात्री उशीरा अश्‍लील कार्यक्रम दाखवले जातात. त्यामुळे, अशा वेळी केवळ टीव्हीवर काय चालू आहे हे पाहण्याकरता चॅनल बदलत राहणं धोकादायक ठरू शकतं. त्याचप्रमाणे, इंटरनेटचा वापर करताना काही लिंक्स कोणत्या वेबसाईटवर घेऊन जातात हे माहीत नसताना सहजच त्या क्लिक करत राहणं सुज्ञपणाचं ठरणार नाही. हीच गोष्ट वेबसाईटवर असलेल्या चॅटरूमच्या बाबतीतही खरी आहे. शिवाय, काही वेबसाईटवर तर अश्‍लील जाहिराती आणि पोर्नोग्राफीचादेखील (अश्‍लील मनोरंजन) समावेश असतो. या सर्व प्रसंगी आपण ज्या गोष्टी पाहत राहतो त्यामुळे आपल्या मनात अनैतिक इच्छा जागृत होऊ शकतात. आणि शेवटी आपल्या हातून असं काहीतरी घडू शकतं ज्यामुळे यहोवाचं मन दुखावेल.

१०. प्रेमाची भावना व्यक्त करण्यात कोणता धोका आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१० विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत आपण कसं वागलं पाहिजे याविषयीदेखील बायबल आपल्याला सांगतं. (१ तीमथ्य ५:२ वाचा.) लग्न करण्याचा विचार नसताना एखाद्या व्यक्तीकडे प्रणय भावनेनं पाहण्याविषयी बायबल अगदी स्पष्ट ताकीद देतं. केवळ लैंगिक आकर्षण आहे म्हणून अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणं निश्‍चितच चुकीचं आहे. काही जण कदाचित असं म्हणतील, की आपल्या बोलण्या-वागण्यातून किंवा आपल्या हावभावातून एखाद्या व्यक्तीला प्रेमाचे संकेत देण्यात काय हरकत आहे. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही तोपर्यंत हे चालण्यासारखं आहे. पण यात लपलेला धोका लक्षात घ्या. जेव्हा दोन व्यक्ती, एकमेकांबद्दल असणाऱ्या प्रणय भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा अनैतिक इच्छा त्यांचा मनात घर करू लागतात. आणि शेवटी व्यभिचारासारखं गंभीर पाप त्यांच्या हातून घडू शकतं. या गोष्टी आधीपासूनच घडत आल्या आहेत आणि आजही घडू शकतात.

११. योसेफाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

११ याबाबतीत योसेफाचं चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. योसेफानं आपल्याशी लैंगिक संबंध ठेवावे म्हणून पोटीफरच्या पत्नीनं त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. योसेफानं नकार देऊनही ती मात्र त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत राहिली. ती प्रत्येक दिवशी त्याला केवळ ‘तिच्यासोबत राहण्याचा’ आग्रह करत राहिली. (उत्प. ३९:७, ८, १०) एका बायबल तज्ज्ञानं स्पष्ट केल्यानुसार, एकांतात वेळ घालवल्यानं योसेफ आपल्या इच्छेला कधीतरी बळी पडेल असं कदाचित पोटीफरच्या पत्नीला वाटलं असावं. पण, तिच्या इच्छेला बळी न पडण्याचा योसेफाचा ठाम निर्णय होता. अशा प्रकारे योसेफानं मात्र स्वतःच्या मनात चुकीच्या इच्छांना रुजू दिलं नाही. आणि जेव्हा तिनं योसेफाला धरून त्याला आपल्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली, तेव्हा “तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला.”—उत्प. ३९:१२.

१२. आपण जे पाहतो त्याचा आपल्या मनावर प्रभाव पडतो हे कशावरून म्हणता येईल?

१२ आपण जे पाहतो त्याचा आपल्या मनावर प्रभाव पडू शकतो आणि त्यामुळे चुकीच्या लैंगिक इच्छा आपल्या मनात निर्माण होऊ शकतात, याविषयी येशूनं आधीच ताकीद दिली होती. त्यानं म्हटलं, “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्त. ५:२८) दावीद राजाच्या बाबतीतही हेच घडलं. एकदा त्यानं आपल्या गच्चीवरून एका स्त्रीला अंघोळ करताना पाहिलं. पण, तिथून लगेच निघून जाण्याऐवजी तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि तिच्याविषयी विचार करत राहिला. (२ शमु. ११:२) ती दुसऱ्याची बायको आहे हे माहीत असूनही तिच्याबद्दल त्याच्या मनात वाईट इच्छा निर्माण झाली आणि त्यानं तिच्याशी व्यभिचार केला.

१३. आपल्या डोळ्यांशी “करार” करण्याची आपल्याला का गरज आहे, आणि आपण ते कसं करू शकतो?

१३ आपल्यालाही जर अनैतिक विचारांचा प्रतिकार करायचा असेल, तर आपणही ईयोबाप्रमाणे केलं पाहिजे. त्यानं म्हटलं, “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे.” (ईयो. ३१:१, ७, ९) ईयोबाप्रमाणे आपणसुद्धा कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्या मनात अनैतिक विचार न बाळगण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे. आणि जेव्हा कंप्युटर स्क्रीनवर, जाहिरातींवर, मासिकांवर किंवा इतर ठिकाणी असलेलं एखादं अश्‍लील चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं, तेव्हा आपण लगेचच त्याच्यापासून आपली नजर दुसरीकडे फिरवली पाहिजे.

१४. नैतिक रीत्या शुद्ध राहण्याकरता काय करण्याची गरज आहे?

१४ आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यावरून एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आलीच असेल; अनैतिक इच्छांविरुद्ध लढा देण्यासाठी आपल्याला जास्तीतजास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणून, स्वतःमध्ये काही बदल केले पाहिजेत, असं लक्षात आल्यास ते ताबडतोब करा! जर तुम्ही यहोवाच्या आज्ञा पाळत राहिला, तर लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहून स्वतःला शुद्ध ठेवणं तुम्हाला शक्य होईल.—याकोब १:२१-२५ वाचा.

मंडळीतील वडिलांची मदत घ्या

१५. अयोग्य इच्छांशी लढणं कठीण जात असेल तर एखाद्याची मदत घेणं का महत्त्वाचं आहे?

१५ चुकीच्या इच्छांशी लढणं तुम्हाला कठीण जात असेल, तर याविषयी मंडळीतील अशा एका व्यक्तीशी बोला जी बऱ्याच काळापासून यहोवाची सेवा करत आहे आणि बायबलमधून तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकते. स्वतःच्या व्यक्तिगत समस्येबद्दल एखाद्याशी बोलणं साहजिकच सोपं नसतं. पण अशा वेळी कुणाचीतरी मदत घेणं महत्त्वाचं ठरेल. (नीति. १८:१; इब्री ३:१२, १३) मंडळीतील प्रौढ ख्रिस्ती भाऊ-बहीण तुम्हाला कोणते बदल करण्याची गरज आहे, हे समजून घेण्यास मदत करतील. तेव्हा, त्यानुसार आपल्या जीवनात आवश्यक ते बदल करा म्हणजे यहोवासोबतची तुमची मैत्री टिकून राहील.

१६, १७. (क) अनैतिक इच्छांविरुद्ध लढणं कठीण असतं तेव्हा वडील कशा प्रकारे मदत करू शकतात? उदाहरण द्या. (ख) पोर्नोग्राफीची सवय असलेल्या व्यक्तीनं वेळीच मदत घेणं गरजेचं का आहे?

१६ आपल्या मंडळीतील ख्रिस्ती वडिलांची खासकरून अशा वेळी मदत घेणं जास्त योग्य ठरेल. (याकोब ५:१३-१५ वाचा.) ब्राझीलमधील एका तरुण व्यक्तीला बऱ्याच वर्षांपासून स्वतःच्या वाईट इच्छांशी झगडणं कठीण झालं होतं. तो म्हणतो, “यहोवाला न आवडणारे विचार माझ्या मनात येत आहेत याबद्दल मला वाईट वाटायचं, पण मला जे वाटतंय त्याविषयी कुणालातरी बोलून दाखवायचं धाडस मला होत नव्हतं.” या तरुणाला मदतीची गरज आहे ही गोष्ट एका वडिलांच्या लक्षात आली आणि त्यानं मंडळीतील वडिलांची मदत घ्यावी असं प्रोत्साहन त्यांनी दिलं. हा तरुण पुढं सांगतो, “मंडळीतील वडील किती प्रेमळपणे माझ्याशी वागत आहेत हे पाहून मला आश्चर्य वाटलं! मी अपेक्षा केली होती त्याहूनही जास्त प्रेमळपणे व समंजसपणे ते माझ्याशी वागले. त्यांनी माझ्या समस्या अगदी लक्ष देऊन ऐकल्या. यहोवाचं माझ्यावर किती प्रेम आहे, हे त्यांनी मला बायबलमधून दाखवलं. आणि माझ्यासोबत मिळून प्रार्थनादेखील केली. त्यामुळे त्यांनी दिलेला सल्ला स्वीकारणं मला सोपं गेलं.” स्वतःमध्ये योग्य ते बदल केल्यानंतर तो म्हणतो, “आपलं ओझं एकट्यानंच वाहत राहण्यापेक्षा, दुसऱ्यांची मदत घेणं किती महत्त्वाचं आहे हे आता मला समजलंय.”

१७ तुम्हाला पोर्नोग्राफी पाहण्याची सवय असेल, तर तुम्हाला ताबडतोब मदतीची गरज आहे. मदत घेण्याचं तुम्ही टाळत राहीलात, तर लैंगिक अनैतिकतेत गुरफटण्याचा धोका आणखी वाढत जाईल. आणि जर असं काही झालं तर इतरांना वाईट वाटेलच, पण त्यामुळे यहोवाच्या नावाचीदेखील बदनामी होईल. पण आनंदाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी वेळीच वडिलांची मदत घेतली आणि त्यांच्याकडून मिळणारा सल्ला स्वीकारला. कारण यहोवाचं मन आनंदित करण्याची आणि ख्रिस्ती मंडळीत टिकून राहण्याची त्यांची इच्छा होती.—स्तो. १४१:५; इब्री १२:५, ६; याको. १:१५.

नैतिक रीत्या शुद्ध राहण्याचा निर्धार करा!

१८. तुम्ही काय करण्याचा निश्चय केला आहे?

१८ नैतिकतेच्या बाबतीत सैतानाचं जग आज दिवसेंदिवस घसरत चाललं आहे. पण याउलट यहोवाचे सेवक आपली अंतःकरणे शुद्ध ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. म्हणून यहोवाला त्याच्या या सेवकांचा अभिमान वाटतो. तेव्हा, नेहमी यहोवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या वचनातून आणि मंडळीतून मिळणाऱ्या सल्ल्यांचं पालन करत राहा. आपण असं केलं, तर शुद्ध विवेक बाळगणं आणि आनंदी मनानं जीवन जगणं आपल्याला शक्य होईल. (स्तो. ११९:५, ६) शिवाय, भविष्यात जेव्हा सैतानाचा कायमचा नाश केला जाईल, तेव्हा नैतिक रीत्या शुद्ध असणाऱ्या देवाच्या नवीन जगात अनंतकाळ जगण्याचा सुहक्क आपल्याला मिळेल.