व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | चिंता! चिंता! चिंता!—कशी मात कराल यांच्यावर?

सर्वत्रच चिंता!

सर्वत्रच चिंता!

“मी खाण्याच्या काही वस्तु आणायला गेलो होतो. पण तिथं फक्त बिस्किटंच उरली होती. त्यांची किंमत पाहून तर माझी बोबडीच वळाली. नेहमीच्या किंमतीपेक्षा ती १०,००० पटीनं जास्त होती! आणि दुसऱ्या दिवशी तर कुठल्याच दुकानात खाण्याच्या वस्तु नव्हत्या.”—झिम्बाब्वेत राहणारा पॉल.

“एकदा, माझ्या नवऱ्यानं मला अचानक सांगितलं: ‘मी घर सोडून चाललोय!’ तो दुसऱ्या स्त्रीबरोबर राहायला जाणार होता. दोन मिनिटं मी तर सुन्नच झाले. काय करावं तेच समजेना. कसं सांभाळणार होते मी माझ्या मुलांना, काहीच समजलं नाही मला.”—अमेरिकेत राहणारी जॅनेट.

“बाहेर बॉम्बस्फोट होणार असतात तेव्हा सायरन वाजू लागतात आणि लपण्यासाठी जीव मुठीत धरून माझी पळापळ सुरू होते. बाहेरचं वातावरण शांत होऊन बरेच तास झाले असले तरी मी भीतीनं थरथरत असते.”—इझरायलमध्ये राहणारी अलोना.

आपण राहत असलेला काळ “कठीण” व चिंतांनी भरलेला आहे. (२ तीमथ्य ३:१) पुष्कळ लोकांना आर्थिक समस्या, कुटुंबं मोडणं, युद्धं, जीवघेण्या आजारांचं थैमान, तसंच नैसर्गिक किंवा मानव-निर्मित आपत्ती यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यातल्या त्यात त्यांच्या स्वतःच्या चिंता ह्या वेगळ्याच. “माझ्या शरीरातली ही गाठ कॅन्सरची तर नसावी?” “माझी मुलं मोठी होतील तेव्हा परिस्थिती कशी असेल?” अशा चिंतादेखील त्यांना सतावतात.

अर्थात काही प्रमाणात चिंता करणं योग्य आहे. परीक्षेला जाण्याआधी, स्टेजवर काही सादर करण्याआधी किंवा इंटरव्ह्यूला जाण्याआधी मनात येणारी चिंता ही साहजिक आहे. शिवाय, जीवाला घातक असलेल्या गोष्टींबद्दल मनात भीती असेल तर आपण सुरक्षितदेखील राहू शकतो. पण प्रमाणापेक्षा जास्त आणि सतत चिंता करणं घातक ठरू शकतं. अलिकडंच, ६८,००० प्रौढांवर अनेक अभ्यास करण्यात आले. त्यात दिसून आलं, की सतत मध्यम प्रमाणात चिंता केल्यानंसुद्धा अकाली मृत्यूचा धोका संभवू शकतो. म्हणूनच येशूनं जे म्हटलं त्यात किती तथ्यं आहे. त्यानं विचारलं, की आपल्यापैकी कुणी असा आहे का, जो चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर तरी वाढवू शकतो? कुणीच नाही. चिंता केल्यानं कुणाचंच आयुष्य वाढलेलं नाहीए. म्हणून, “चिंता करत बसू नका,” असं तो स्पष्टपणे म्हणतो. (मत्तय ६:२५, २७) पण चिंता न करणं हे शक्य तरी आहे का?

आपण जर व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग केला, देवावर खरोखर भरवसा ठेवला आणि भविष्याबद्दल मनात एक पक्की आशा बाळगली तर चिंता न करणं शक्य आहे. आज, आत्ता कदाचित आपल्यासमोर कोणत्याही मोठ्या समस्या नसतील. पण भविष्यात कदाचित त्या येऊ शकतील. तेव्हा, पॉल, जॅनेट आणि अलोना यांनी वर सांगितलेल्या तीन गोष्टी केल्यामुळं त्यांना कशी मदत मिळाली ते आपण पुढील लेखांमध्ये पाहूयात. (w15-E 07/01)