व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | चिंता! चिंता! चिंता!—कशी मात कराल यांच्यावर?

जीव धोक्यात असल्यामुळं वाटणारी चिंता

जीव धोक्यात असल्यामुळं वाटणारी चिंता

अलोना म्हणते: “मी सायरनचा आवाज ऐकते तेव्हा माझ्या छातीत धडधडू लागतं. बॉम्ब हल्ल्यांपासून संरक्षण देणाऱ्या ठिकाणी मी पळत जाते. पण तिथंही मला सुरक्षित वाटत नाही. बाहेर असल्यावर तर विचारूच नका. सायरन वाजू लागतो तेव्हा लपायलासुद्धा जागा नसते. असंच एकदा मी रस्त्यावरून चालले होते. आणि सायरन वाजू लागला. मी इतकी घाबरले की तिथं रस्त्यावरच रडायला लागले. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. खूप वेळानंतर मी शांत झाले. शांत होते न्‌ होते तोच पुन्हा सायरन वाजू लागला.”

अलोना

युद्ध सुरू होतं तेव्हा, आपण जिवंत राहू की नाही ते सांगता येत नाही. इतकंच नाही तर, तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला एखादा जीवघेणा आजार झाल्याचं समजतं तेव्हा, आपल्यावर आभाळ कोसळलंय, असं वाटू शकतं. शिवाय, काही जण भविष्याच्या चिंतेनं निराश होतात. ‘आपल्या मुलांना किंवा नातवंडांना युद्ध, गुन्हेगारी, प्रदूषण, हवामानात बदल, रोगराई यांसारख्या गोष्टी होणाऱ्या जगात राहावं लागेल का,’ अशा चिंता त्यांना भेडसावतात. आपल्याला अशा चिंता असतील तर आपण काय करू शकतो?

या जगात वाईट गोष्टी घडतील हे माहीत असल्यामुळं “चतुर मनुष्य अरिष्ट . . . पाहून लपतो.” (नीतिसूत्रे २७:१२) स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण जसा प्रयत्न करतो तसंच, आपलं मानसिक व भावनिक आरोग्य जपण्यासाठीदेखील आपण पावलं उचलली पाहिजेत. आपण आणि आपली मुलं, हिंसक गेम्स खेळत असू किंवा भयानक दृश्ये असलेल्या बातम्या किंवा चित्रपट पाहत असू तर आपल्यावर त्याचे नक्कीच वाईट परिणाम होऊ शकतात. याचा अर्थ असा होत नाही, की आपण नेहमीच हिंसक दृश्ये पाहायचं टाळू शकतो. कधीकधी आपल्याला जीवनातील काही वास्तविक गोष्टींना तोंड द्यावंच लागतं. पण देवानं आपल्याला असं बनवलं आहे, की आपण जास्त वेळ वाईट किंवा दुःखद गोष्टी आपल्या मनात ठेवू शकत नाही. याऐवजी त्याला वाटतं, की आपण ज्या गोष्टी “सत्य, . . . शुद्ध, . . . [सद्गुणी], [स्तुत्य]” आहेत त्या आपल्या मनात भरल्या पाहिजेत. असं केल्यास, तो आपल्याला मनःशांती देईल कारण तो “शांतीदाता देव” आहे.—फिलिप्पैकर ४:८, ९.

प्रार्थनेचं महत्त्व

देवावर आपला खरोखर विश्वास असेल तर आपण चिंतांवर मात करू शकतो. “प्रार्थना करण्यासाठी सावध असा,” असं बायबलमध्ये आपल्याला आर्जवण्यात आलं आहे. (१ पेत्र ४:७) ‘मला मदत कर, आणि आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मला बुद्धी व धैर्य दे,’ अशी आपण देवाला प्रार्थना करू शकतो. “आपण जे काही मागतो ते तो ऐकतो” हा भरवसा आपण बाळगू शकतो.—१ योहान ५:१५.

तिचा पती अवी, याच्याबरोबर

बायबलमध्ये सांगितलं आहे, की देव नव्हे तर सैतान “ह्या जगाचा अधिकारी” आहे व “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (योहान १२:३१; १ योहान ५:१९) म्हणून येशूनं जेव्हा, “आम्हास [त्या] वाइटापासून सोडव” अशी प्रार्थना करायला आपल्याला शिकवलं तेव्हा त्यानं दाखवून दिलं, की सैतान खरोखरची व्यक्ती आहे व आपण जर यहोवाला प्रार्थना केली तर तो नक्कीच आपल्याला त्याच्यापासून सोडवू शकतो. (मत्तय ६:१३) लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेली अलोना म्हणते: “सायरन वाजायाला लागतो तेव्हा मी लगेच यहोवाला प्रार्थना करते. यामुळं माझं मन शांत राहतं. तसंच, माझा नवरा बाहेर गेला असेल आणि जवळपास असल्यामुळं त्यानंही सायरनचा आवाज ऐकला असेल तर तो लगेच मला फोन करतो आणि आम्ही सोबत प्रार्थना करतो. प्रार्थनेमुळं मला खरंच बळ मिळतं.” बायबलमध्ये नाहीतरी म्हटलंच आहे, की जे कोणी खऱ्या भावानं यहोवा देवाचा धावा करतात, त्या सर्वांच्या तो जवळ आहे.—स्तोत्र १४५:१८.

भविष्यासाठी आपली आशा

डोंगरावरील प्रवचनात येशूनं त्याच्या अनुयायांना अशी प्रार्थना करायला शिकवलं: “तुझे राज्य येवो.” (मत्तय ६:१०) देवाचं हेच राज्य सर्व प्रकारच्या हानिकारक चिंतांना मुळापासून काढून टाकणार आहे. आणि या राज्याचा राजा येशू हा “शांतीचा अधिपती” आहे. त्याच्याद्वारे देव पृथ्वीवरील सर्व “लढाया बंद” करणार आहे. (यशया ९:६; स्तोत्र ४६:९) शिवाय, “तो देशोदेशीच्या बहुत लोकांचा न्याय करेल, . . . यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. . . . कोणी त्यांस घाबरवणार नाही.” (मीखा ४:३, ४) आनंदी कुटुंबे “घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील.” (यशया ६५:२१) “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४.

आज आपण कितीही काळजी घेतली तरी कधीकधी आपल्यावर “समय व प्रसंग” येतात. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असल्यामुळं आपल्यावर संकट कोसळू शकतं किंवा आपला अपघात होऊ शकतो. अनेक शतकांपासून युद्धे, गुन्हेगारी, रोगराई यांच्यामुळं चांगल्या लोकांचा मृत्यू झाला आहे. अगणित लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आपण अगणित म्हणतो कारण ती संख्या केवळ देवालाच माहीत आहे. मग, काहीही चूक नसताना ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी काही आशा आहे का?

होय, त्यांच्यासाठी आशा आहे. देव या लोकांना पुन्हा जिवंत करणार आहे. पण सध्या तरी ते निद्रेत आहेत. देवाच्या स्मृतीत आहेत. लवकरच, “कबरेतील सर्व माणसे . . . बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९) याला पुनरुत्थान म्हणतात. पुनरुत्थानाची ही आशा आपल्यासाठी “जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ” आहे, अशी खात्री बायबलमध्ये देण्यात आली आहे. (इब्री लोकांस ६:१९) देवानं स्वतःचा पुत्र येशू याला “मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण” दिले आहे.—प्रेषितांची कृत्ये १७:३१.

पण हा आनंदाचा काळ येईपर्यंत जे देवाच्या इच्छेनुसार चालतात त्यांनाही चिंतांचा सामना करावा लागेल. व्यावहारिक पावलं उचलण्याद्वारे, प्रार्थनेत देवाच्या जवळ जाण्याद्वारे आणि भविष्याबद्दल बायबलमध्ये असलेल्या आशेवरील आपला विश्वास वाढवण्याद्वारे पॉल, जॅनेट आणि अलोना आपल्या चिंतांवर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. देवानं जसं त्यांना मदत केली तसंच तो तुम्हालाही त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं आनंद व शांती देईल.—रोमकर १५:१३. ▪ (w15-E 07/01)