व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण देवाला खुष करू शकतो का?

आपण देवाला खुष करू शकतो का?

बायबलमध्ये तुम्हाला अनेक लोकांचा उल्लेख आढळेल ज्यांची खूप स्तुती करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दलची माहिती वाचताना तुमच्या मनात असे विचार येतील, ‘मी यांच्यासारखं नाही होऊ शकत. मी कुठं धार्मिक आहे. आणि माझ्या हातून तर किती वेळा चुका होतात.’

ईयोब “सात्विक व सरळ होता.”—ईयोब १:१

बायबलमध्ये ईयोब नावाच्या एका मनुष्याबद्दल असं म्हटलं आहे, की तो “सात्विक व सरळ होता.” (ईयोब १:१) आणखी एक जण आहे ज्याचं नाव आहे लोट. त्याला “नीतिमान” म्हटलं आहे. (२ पेत्र २:८) दावीद नावाच्या व्यक्तीबद्दल म्हटलं आहे, की तो देवाच्या “दृष्टीने जे योग्य तेच” करत असे. (१ राजे १४:८) पण आता आपण या लोकांच्या जीवनात जरा डोकावून पाहू. असं केल्यास आपल्याला दिसेल, की (१) त्यांच्या हातूनही चुका झाल्या. तरीपण (२) आपण त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकतो आणि (३) आपण अपरिपूर्ण अर्थात पापी असलो तरी देवाला खुष करू शकतो.

त्यांच्या हातूनही चुका झाल्या

“अधर्मी लोकांच्या कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची [देवाने] सुटका केली.”—२ पेत्र २:७

ईयोब याच्यावर एकापाठोपाठ एक संकटं आली. त्याची काहीही चूक नसताना त्याला ही सर्व संकटं सहन करावी लागली. त्याच्यावर जणू अन्याय झाला असं त्याला वाटलं. त्याचा असा गैरसमज झाला, की आपण देवावर विश्वास ठेवला काय आणि नाही काय, देवाला काही फरक पडत नाही. (ईयोब ९:२०-२२) तो स्वतःला धार्मिक समजू लागला. त्याच्या बोलण्यावरून इतरांना असं वाटलं की तो स्वतःला देवापेक्षाही जास्त धार्मिक समजतोय.—ईयोब ३२:१, २; ३५:१, २.

सरळ व स्पष्ट निर्णय घेताना, लोट मागंपुढं पाहत होता. सदोम व गमोरा इथं राहणारे लोक अतिशय अनैतिक जीवन जगत होते. त्यांना पाहून लोटाचा “जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता.” (२ पेत्र २:८) या घाणेरड्या शहरांचा नाश करून तुला व तुझ्या कुटुंबाला यातून बाहेर काढेन, असं यहोवानं देवदूतांद्वारे लोटाला सांगितलं. लोटाला हे ऐकून किती हायसं वाटलं असेल, नाही का? तो आणि त्याचं कुटुंब हेच लोक सर्वात आधी या शहरातून बाहेर पडले असतील, असं आपल्याला वाटेल. पण तसं झालं नाही. नाशाची वेळ आली होती तरी लोटाचा पाय त्या शहरातून निघत नव्हता. शेवटी, या देवदूतांना लोटाचे आणि त्याच्या कुटुंबाचे अक्षरशः हात धरून त्यांना शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी न्यावं लागलं!—उत्पत्ति १९:१५, १६.

“दावीद . . . [देवाला] जिवे भावे धरून राहिला व [त्याच्या] दृष्टीने जे योग्य तेच तो करत” राहिला.—१ राजे १४:८

दावीद एके प्रसंगी स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही. त्यानं दुसऱ्या एका माणसाच्या पत्नीबरोबर वाईट काम केलं. आणि हे पाप झाकण्यासाठी कट रचला व दुसऱ्यांकडून तिच्या नवऱ्याला ठार मारलं. (२ शमुवेल अध्याय ११) दाविदाचं हे कृत्य “यहोवाच्या दृष्टिने [अतिशय] वाईट” होतं, असं बायबलमध्ये म्हटलं आहे.—२ शमुवेल ११:२७, पं.र.भा.

ईयोब, लोट, दावीद या सर्वांनी चुका केल्या. काही चुका तर अतिशय गंभीर होत्या. पण, देवाची सेवा आज्ञाधारकपणे करण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. ते पश्‍चात्ताप करण्यास व स्वतःमध्ये बदल करण्यास तयार होते. म्हणून देव त्यांच्यावर खुष होता. आणि एकंदरीत ते विश्वासू लोक होते, असं बायबलमध्ये त्यांच्याविषयी म्हटलं आहे.

काय शिकतो आपण त्यांच्याकडून?

आपण सर्व पापी आहोत आणि चुका न करता आपला एकही दिवस जात नाही. (रोमकर ३:२३) पण केलेल्या चुकांबद्दल आपल्याला पश्‍चात्ताप झाला पाहिजे आणि अशा चुका पुन्हा न करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.

ईयोब, लोट व दावीद यांनी त्यांच्या चुका कशा सुधारल्या? तसं पाहायला गेलं तर ईयोब एकनिष्ठ होता. देवानं त्याच्याबरोबर तर्क केल्यानंतर त्याचा गैरसमज दूर झाला आणि तो जे काही बोलला होता त्याबद्दल त्यानं देवाची क्षमा मागितली. (ईयोब ४२:६) सदोम व गमोरा या शहरातील त्या अनैतिक लोकांबद्दल लोटाचा देवासारखाच दृष्टिकोन होता. पण फक्त, कार्य करण्यास किंवा पाऊल उचलण्यास त्यानं उशीर लावला. देवानं नाश केलेल्या शहरातून तो सुखरूप बाहेर आला आणि त्याचा जीव वाचला. शिवाय नाश होत असताना, आपल्या शहराचं काय होतंय हे मागे वळून पाहू नका, अशी देवदूतांनी दिलेली आज्ञा त्यानं प्रामाणिकपणे पाळली. दाविदानं देवाच्या नियमशास्त्रातील आज्ञा मोडून गंभीर पाप केलं असलं तरी, त्यानं खरा पश्‍चात्ताप करून व देवाच्या दयेची भीक मागून, तो मनानं चांगला आहे हे दाखवून दिलं.—स्तोत्र ५१.

या विश्वासू लोकांवर जसं देव खुष होता तसंच आज आपणही त्याला खुष करू शकतो. आपण पापी किंवा अपरिपूर्ण आहोत अर्थात “केवळ माती आहो हे तो आठवतो.” (स्तोत्र १०३:१४) म्हणून तो आपल्याकडूनही वाजवी अपेक्षा करतो. पण काय अपेक्षा आहेत त्याच्या?

देव “आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो.”—स्तोत्र १०३:१४

अपरिपूर्ण किंवा पापी मानव देवाला खुष कसं करू शकतात?

दाविदानं त्याचा पुत्र शलमोन याला जो सल्ला दिला त्यात या प्रश्‍नाचं उत्तर दडलं आहे. त्यानं म्हटलं: “हे माझ्या पुत्रा, शलमोना तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने” अर्थात पूर्ण मनानं त्याची सेवा कर. (१ इतिहास २८:९) ‘पूर्ण मनानं’ म्हणजे नेमकं काय? पूर्ण मनानं देवाची सेवा करणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं व त्याची इच्छा व अपेक्षा काय आहेत हे जाणून घेऊन त्यानुसार वागणं. जी व्यक्ती असं करते ती देवाची सेवा आज्ञाधारकपणे करत राहते. तिला तिची चूक दाखवली जाते तेव्हा ती लगेच स्वीकारून स्वतःत बदल करते. देवावर प्रेम असल्यामुळं आणि आज्ञा पाळण्याची इच्छा असल्यामुळं ईयोब “सात्विक” अर्थात निष्कलंक होता, लोट “नीतिमान” होता आणि दाविदानं देवाच्या “दृष्टीने जे योग्य तेच” केलं. त्यांच्या हातून चुका झाल्या तरीसुद्धा ते देवाला खुष करू शकले.

पूर्ण मनानं देवाची सेवा करणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं व त्याची इच्छा व अपेक्षा काय आहेत हे जाणून घेऊन त्यानुसार वागणं

आपल्याही मनात कधी वाईट विचार आले असतील, तोंडून असं काहीतरी निघून गेलं असेल किंवा असं वागलो असू ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा झाला असेल तर आपण आत्ताच चर्चा केलेल्या त्या तीन उदाहरणांतून बरंच काही शिकू शकतो. आपण शंभर टक्के चांगलं वागू शकत नाही, हे देवालाही माहीत आहे. तो फक्त इतकीच अपेक्षा करतो की आपण त्याच्यावर पूर्ण मनानं प्रेम करावं आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचा आपल्या परीनं सर्व प्रयत्न करावा. असं जर आपण केलं तर आपण ही पूर्ण खातरी बाळगू शकतो की आपणही देवाला खुष करू शकतो. ▪ (w15-E 07/01)