व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहा

देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहा

“तेही जगाचे नाहीत.”—योहा. १७:१६.

गीत क्रमांक: १८, ५४

१, २. (क) भेदभावाला खतपाणी घालणाऱ्या गोष्टींमध्ये सहभाग न घेण्याचा आणि यहोवाशी एकनिष्ठ राहण्याचा काय संबंध आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) बरेच लोक कोणत्या गोष्टींना एकनिष्ठ असतात, पण शेवटी त्याचा काय परिणाम होतो?

देश, वंश आणि संस्कृती यांसारख्या भेदभावाला खतपाणी घालणाऱ्या गोष्टींमध्ये यहोवाचे सेवक कधीच पडत नाहीत. अशा गोष्टींविषयी त्यांची भूमिका अगदी तटस्थ असते. कारण, त्यांचं यहोवावर प्रेम आहे आणि ते त्याला एकनिष्ठ राहून त्याच्या आज्ञा पाळतात. (१ योहा. ५:३) त्यामुळे यहोवाचे सेवक या नात्यानं आपण कुठंही राहत असलो किंवा आपलं मूळ ठिकाण कोणतंही असलं, तरी आपण यहोवाच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासाठी यहोवाला आणि त्याच्या राज्याला एकनिष्ठ असणं इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. (मत्त. ६:३३) या कारणामुळेच, आपण या ‘जगाचे भाग नाही’ असं अगदी योग्यपणे म्हणता येईल.—योहान १७:११, १५, १६ वाचा; यश. २:४.

आज पाहिलं तर जगात कित्येक लोक त्यांच्या देशाला, वंशाला, संस्कृतीला इतकंच काय तर कधीकधी देशासाठी खेळणाऱ्या टीमलाही एकनिष्ठ असतात. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, याचा परिणाम शेवटी एकमेकांशी स्पर्धा करण्यात, एकमेकांचा तिरस्कार करण्यात आणि अगदीच टोकाची गोष्ट म्हणजे आपल्या विरोधात असणाऱ्यांचा खून करण्यातही झाला आहे. अशा मतभेदांमध्ये आपण सहभाग घेत नसलो, तरी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर याचा परिणाम होऊ शकतो. कधीकधी तर यामुळे घोर अन्यायाचाही आपल्याला सामना करावा लागतो. जेव्हा काही राजकीय सत्ता चुकीचा निर्णय घेतात, तेव्हा आपण अगदी सहजच कोणाची तरी बाजू घेऊ शकतो. कारण योग्य काय आणि अयोग्य काय, यात फरक करण्याची क्षमता देवानं आपल्याला दिली आहे. (उत्प. १:२७; अनु. ३२:४) तेव्हा, एखादी चुकीची गोष्ट घडल्यावर तुम्हाला कसं वाटतं? अशा परिस्थितीत कुणाचीही बाजू न घेता तटस्थ राहणं तुम्हाला शक्य आहे का?

३, ४. (क) जगातील वादविवादांमध्ये आपण सहभाग का घेत नाही? (ख) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

कधीकधी राजनैतिक पक्षांमध्ये वादविवाद होतात. अशा वेळी लोकांनी आपली बाजू घ्यावी म्हणून ते त्यांच्यावर दबाव आणतात. पण आपण मात्र येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करतो. आपण राजनैतिक गोष्टींमध्ये कोणताही सहभाग घेत नाही आणि कोणतंही शस्त्र हातात घेत नाही. (मत्त. २६:५२) आपण सैतानाच्या या जगाच्या कोणत्याही एका भागाला इतर भागांपेक्षा श्रेष्ठ मानत नाही. (२ करिंथ. २:११) या जगाच्या कोणत्याही वादविवादांशी संबंध ठेवण्याची आपली मुळीच इच्छा नाही.—योहान १५:१८, १९ वाचा.

आपण मुळातच अपरिपूर्ण असल्यामुळे, इतर समाजातील लोकांविषयी आपल्यापैकी काहींच्या मनात अजूनही कुठंतरी नकारात्मक भावना असतील. (यिर्म. १७:९; इफिस. ४:२२-२४) त्यामुळे या लेखात आपण अशा काही तत्त्वांविषयी पाहू या ज्यांमुळे या प्रवृत्तीविरुद्ध लढणं आपल्याला शक्य होईल. शिवाय यहोवा आणि येशूसारखी विचारसरणी विकसित करून देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहणं कसं शक्य आहे, याविषयीही या लेखात चर्चा करू या.

आपण तटस्थ भूमिका का घेतो?

५, ६. पृथ्वीवर असताना मानवांच्या वेगवेगळ्या गटांविषयी येशूचा काय दृष्टिकोन होता, आणि का?

या जगात कुणाचीही बाजू न घेता तटस्थ राहणं तुम्हाला कठीण वाटतं का? असेल तर अशा परिस्थितीत येशूनं काय केलं याचा विचार करा. येशू पृथ्वीवर होता तेव्हा यहुदीया, गालील आणि शोमरोन इथल्या लोकांमध्ये आपसात बरेच वाद आणि मतभेद होते. यहुदी आणि शोमरोनी एकमेकांशी बोलायचे नाहीत. (योहा. ४:९) तर परूशी आणि सदूकी यांच्यात बऱ्याच बाबतीत मतभेद असायचे. (प्रे. कृत्ये २३:६-९) नियमशास्त्रात ज्ञानी असणाऱ्या यहुद्यांनाही असं वाटायचं की आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत. (योहा. ७:४९) तसंच, अनेकांना रोमी लोकांचा आणि जकातदारांचा खूप तिरस्कार वाटायचा. (मत्त. ९:११) या सर्व गोष्टींमध्ये येशूनं मात्र कोणाचीच बाजू घेतली नाही. पण, देवाच्या खऱ्या शिकवणींचं त्यानं पूर्ण समर्थन केलं. इस्राएल हे देवाचं निवडलेलं राष्ट्र आहे हे येशूला माहीत होतं. तरी, शिष्यांनी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजावं असं येशूनं त्यांना शिकवलं नाही. (योहा. ४:२२) याउलट, सर्व लोकांशी आपण प्रेमानं वागावं असं त्यानं आपल्या शिष्यांना शिकवलं.—लूक १०:२७.

येशूनं कोणत्याही मानवी गटाला श्रेष्ठ का मानलं नाही? कारण त्याचा दृष्टिकोनही त्याच्या पित्यासारखाच होता. संपूर्ण पृथ्वी मानवजातीच्या वेगवेगळ्या वंशांनी भरून जावी या उद्देशानंच यहोवानं मानवाला बनवलं होतं. (उत्प. १:२७, २८) त्यामुळे ठरावीक वंशाला, राष्ट्राला किंवा भाषेला यहोवा आणि येशू इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत नाहीत. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५; प्रकटी. ७:९, १३, १४) तेव्हा, आपणही त्यांच्या उत्तम उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे.—मत्त. ५:४३-४८.

७, ८. (क) आपण कोणाची बाजू घेतो, आणि का? (ख) मानवजातीच्या समस्या कोण सोडवेल?

आज आपण कोणत्याही मानवी शासकाला किंवा राजकीय सत्तेला पाठिंबा का देत नाही? कारण आपण आधीच यहोवाची बाजू निवडली आहे आणि तोच आपला शासक आहे. पण यहोवा एक चांगला शासक नाही असं सैतानानं एदेन बागेत म्हटलं होतं. याउलट आपलीच शासन करण्याची पद्धत योग्य आहे हे सर्व मानवजातीनं कबूल करावं, अशी सैतानाची इच्छा आहे. त्यामुळे कोणाची बाजू घ्यावी याबद्दल आपण स्वतः निर्णय घेतला पाहिजे, असं यहोवाला वाटतं. पण तुमच्याबद्दल काय? यहोवाचीच शासन करण्याची पद्धत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? केवळ त्याच्याच राज्याद्वारे सर्व समस्यांना काढून टाकलं जाईल या गोष्टीवर तुमचा पक्का भरवसा आहे का? की, मानव देवाच्या मदतीशिवाय स्वतःच यशस्वी रीत्या राज्य करू शकतात, असं तुम्हाला वाटतं?—उत्प. ३:४, ५.

एखाद्या वादग्रस्त मुद्द्याविषयी तुमचं मत विचारल्यास, तुमची प्रतिक्रिया काय असेल हे वरील प्रश्नांच्या उत्तरांवरून दिसून येईल. उदाहरणार्थ, एखाद्या राजकीय पक्षाबद्दल, सामाजिक कार्यकत्यांच्या गटाबद्दल, किंवा अशाच एखाद्या संघटनेबद्दल तुमचं मत काय आहे, असं विचारलं जातं तेव्हा काय? हो, हे खरं आहे, की एखादा गट कदाचित प्रामाणिकपणे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असेल. पण केवळ यहोवाचं राज्यच मानवजातीच्या समस्यांना आणि अन्यायाला काढून टाकेल हे आपण जाणतो. त्यामुळे, अशा सामाजिक आणि राजकीय गोष्टींविषयी विचार करत बसण्यापेक्षा ही गोष्ट थेट यहोवाच्या हातात सोपवून देणंच योग्य आहे. प्रत्येकानं आपआपल्या इच्छेनुसार करत राहण्यापेक्षा मंडळीत मिळणाऱ्या यहोवाच्या मार्गदर्शनाला स्वीकारणंच योग्य ठरेल. यामुळे मंडळीतील ऐक्य टिकून राहील.

९. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांमध्ये कोणती समस्या होती, आणि त्यांना काय करण्याची गरज होती?

पहिल्या शतकात करिंथमधील काही ख्रिस्ती, “मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा” तर “मी ख्रिस्ताचा आहे” असा वाद एकमेकांशी घालायचे. जेव्हा पौलाला ही गोष्ट माहीत झाली तेव्हा त्याला धक्का बसला. कारण ही अतिशय गंभीर गोष्ट होती. आणि त्यामुळे मंडळीची शांती धोक्यात होती. म्हणून पौलानं तिथल्या बंधुभगिनींना असा प्रश्न केला: “ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय?” मग त्यानं सल्ला देत त्यांना असं म्हटलं: “बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हास विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.” पौलाचा हा सल्ला आपल्याला आजही लागू होतो. मंडळीत कोणत्याही बाबतीत तट आणि फुटी असणं योग्य नाही.—१ करिंथ. १:१०-१३; रोमकर १६:१७, १८ वाचा.

१०. पौलानं ख्रिश्चनांना कशाची आठवण करून दिली, आणि यातून आपण काय शिकतो?

१० अभिषिक्त ख्रिश्चनांना पौलानं या गोष्टीची आठवण करून दिली, की त्यांचं नागरिकत्व स्वर्गात असल्यामुळे त्यांनी “ऐहिक गोष्टींवर” म्हणजे पृथ्वीवरील गोष्टींवर लक्ष देऊ नये. (फिलिप्पै. ३:१७-२०) * अभिषिक्त जन खरंतर देवाचे आणि ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहेत. जेव्हा एखाद्या देशाचा प्रतिनिधी दुसऱ्या देशात जातो, तेव्हा तो तिथल्या कोणत्याही सामाजिक समस्यांमध्ये किंवा राजकीय बाबींमध्ये भाग घेत नाही; त्याचप्रमाणे या जगाच्या कोणत्याच समस्यांमध्ये आणि राजकीय बाबींमध्ये अभिषिक्त जनांनी सहभाग घेणं योग्य नाही. (२ करिंथ. ५:२०) तसंच, ज्यांना या पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा आहे ते देवाच्या राज्याशी एकनिष्ठ आहेत. म्हणून, त्यांनीही जगाच्या कोणत्याच वादविवादात सहभाग घेणं योग्य नाही.

यहोवाच्या राज्याला एकनिष्ठ राहा

११, १२. (क) देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहताना कोणती मनोवृत्ती आपण टाळली पाहिजे? (ख) एका बहिणीनं स्वतःमध्ये कसा बदल केला?

११ जगात बहुतेक ठिकाणी असं पाहायला मिळतं, की लोकांना आपल्या सारख्याच पार्श्वभूमीच्या, संस्कृतीच्या आणि भाषेच्या लोकांप्रती जास्त ओढ असते. आपल्या मूळ ठिकाणाचा त्यांना सहसा खूप गर्व असतो. पण अशा मनोवृत्तीचा आपल्यावर परिणाम होता कामा नये. उलट, आपल्या विचारसरणीत बदल करून आपण आपल्या विवेकाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे सर्व परिस्थितीत आपल्याला तटस्थ राहणं शक्य होईल. पण आपण हे कसं करू शकतो?

१२ या बाबतीत मेरीटाचं * उदाहरण घेता येईल. पूर्वी युगोस्लाव्हिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात मेरीटाचा जन्म झाला. जिथं ती लहानाची मोठी झाली, तिथले लोक सर्बियातील लोकांचा द्वेष करायचे. पण यहोवाबद्दल तिला शिकायला मिळालं तेव्हा तिला याची जाणीव झाली, की अशा प्रकारचा भेदभाव यहोवाला मुळीच आवडत नाही. उलट लोकांनी एकमेकांचा तिरस्कार करावा अशी सैतानाची इच्छा आहे. हे समजल्यावर तिनं स्वतःमध्ये बदल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ती राहत असलेल्या ठिकाणी वेगवेगळ्या वांशिक गटांमध्ये लढाया सुरू झाल्या. तेव्हा मेरीटाच्या मनात, सर्बियातील लोकांविषयी असणारी द्वेषाची भावना पुन्हा मूळ धरू लागली. त्यांना प्रचार करण्याचीदेखील तिची इच्छा नव्हती. आपण चुकतोय हे तिला माहीत होतं. म्हणून आपल्या मनातून ही चुकीची भावना काढून टाकण्यासाठी तिनं यहोवाकडे कळकळीनं प्रार्थना केली. आणि पायनियरिंग सुरू करण्यासाठीही तिनं यहोवाकडे मदत मागितली. मेरीटा म्हणते: “सर्वात चांगली मदत मला माझ्या क्षेत्रसेवेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे झाली. कारण क्षेत्रात असताना यहोवाच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचं अनुकरण करण्याचा मी प्रयत्न करायचे. त्यामुळे आपोआपच माझ्या मनातील द्वेषाची भावना हळूहळू नाहीशी होत गेली.”

१३. (क) सायलाच्या बाबतीत काय घडलं, आणि तिनं काय केलं? (ख) सायलाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१३ मेक्सिकोची सायला नावाची एक बहीण युरोपमध्ये राहायला गेली. तिच्या मंडळीत, लॅटीन अमेरिकेतून आलेले भाऊ-बहीणही होते. त्यांच्यापैकी काहींनी एकदा तिच्या देशाबद्दल, तिथल्या संगीताबद्दल, आणि तिथल्या रीतिरिवाजांबद्दल चेष्टा केली. या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटलं. पण यामुळे अपमानाची भावना तिच्या मनात येऊ नये म्हणून तिनं यहोवाला प्रार्थना केली. तिच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? हे खरं आहे, की आपल्या ठिकाणाविषयी जेव्हा लोक काहीतरी वाईट बोलतात, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. आणि अशा भावनांचा आजही आपल्या काही बांधवांना सामना करावा लागतो. तेव्हा भेदभाव दिसून येईल अशी कोणतीही गोष्ट बोलण्यापासून किंवा करण्यापासून आपण खबरदारी बाळगली पाहिजे. आपल्या मंडळीत किंवा कुठंही फूट पाडण्याची आपली मुळीच इच्छा नाही.—रोम. १४:१९; २ करिंथ. ६:३.

१४. इतरांविषयी यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

१४ आपण हे जाणतो, की यहोवाचे सर्व सेवक भेदभाव न मानता एकजूटीनं कार्य करतात. त्यामुळे एक देश दुसऱ्याहून श्रेष्ठ आहे, असं आपण मानत नाही. पण कदाचित तुम्ही राहता त्या ठिकाणाबद्दल मनात अभिमान बाळगण्याविषयी, कुटुंबातून आणि समाजातून तुम्हाला प्रोत्साहन मिळालं असेल. त्यामुळे इतर देशाच्या, संस्कृतीच्या किंवा भाषेच्या लोकांविषयी तुमच्या मनात अजूनही नकारात्मक भावना असण्याची शक्यता आहे. तेव्हा, अशा मनोवृत्तीत बदल करण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? ज्या लोकांच्या मनात देशाविषयी अभिमान असतो किंवा इतरांविषयी द्वेषाची भावना असते त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं, यावर खोलवर विचार करा. तुमच्या व्यक्तिगत अभ्यासादरम्यान किंवा कौटुंबिक उपासनेदरम्यान या विषयावर आणखी संशोधन करण्याचा प्रयत्न करा. तसंच, यहोवाचा लोकांविषयी जसा दृष्टिकोन आहे तसाच तुम्हालाही बाळगता यावा म्हणून त्याच्याकडे मदत मागा.—रोमकर १२:२ वाचा.

इतरांना काहीही वाटत असलं, तरी यहोवाला एकनिष्ठ राहून त्याची आज्ञा पाळणं महत्त्वाचं आहे (परिच्छेद १५, १६ पाहा)

१५, १६. (क) आपण इतरांपेक्षा वेगळे असल्यामुळे काही जण कशी प्रतिक्रिया दाखवतात? (ख) यहोवाला एकनिष्ठ राहण्याकरता पालक आपल्या मुलांना कशी मदत करू शकतात?

१५ शुद्ध विवेकानं यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आहे. त्यामुळे कधीकधी आपल्यासोबत काम करणारे कर्मचारी, वर्गसोबती, शेजारी किंवा नातेवाईक या सर्वांपेक्षा आपण अगदीच वेगळे आहोत असं दिसून येईल. (१ पेत्र २:१९) या कारणामुळे इतर जण आपला द्वेषही करतील, असं येशूनं सांगितलं होतं. पण हे लक्षात घ्या, की जे लोक आपला द्वेष करतात त्यांना मुळात देवाच्या राज्याबद्दलच माहीत नाही. म्हणून, कोणत्याही मानवी सरकारांपेक्षा आपण देवाच्या राज्यालाच पाठिंबा का देतो हे ते समजू शकत नाहीत.

१६ इतर जण काहीही करत किंवा म्हणत असले, तरी यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आपण त्याच्या आज्ञा पाळणं आवश्यक आहे. (दानी. ३:१६-१८) इतरांपेक्षा वेगळी भूमिका घेणं खासकरून मुलांना कठीण जातं. म्हणून पालकांनो, आपल्या मुलांना शाळेत धैर्यानं बोलण्याकरता मदत करा. झेंडावंदन किंवा इतर देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास नकार देण्यासाठी कदाचित तुमची मुलं कचरत असतील. त्यामुळे या गोष्टींबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे, हे तुम्ही कौटुंबिक उपासनेदरम्यान त्यांना सांगू शकता. आपल्या विश्वासाबद्दल अगदी स्पष्टपणे पण तितक्याच आदरानं कसं बोलता येईल हे त्यांना शिकवा. (रोम. १:१६) यासोबतच, गरज पडल्यास तुम्ही स्वतः जाऊन शिक्षकांशी आपल्या विश्वासाबद्दल बोलू शकता.

यहोवाच्या सर्व निर्मितीचा आनंद घ्या

१७. आपण कोणती मनोवृत्ती टाळली पाहिजे, आणि का?

१७ सहसा जिथं आपण लहानाचं मोठं होतो, त्या ठिकाणचं खाणंपिणं, तिथली भाषा, तिथलं नैसर्गिक वातावरण आणि तिथल्या लोकांच्या चालीरिती आपल्या पसंतीच्या असतात. पण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी इतरांना आवडणाऱ्या गोष्टींपेक्षा नेहमीच चांगल्या असतात असा विचार करणं योग्य असेल का? यहोवानं निर्माण केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण आनंद घ्यावा असं त्याला वाटतं. (स्तो. १०४:२४; प्रकटी. ४:११) मग एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा चांगलीच आहे असं अडून राहण्यात काय अर्थ आहे?

१८. यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगणं आपल्यासाठी फायद्याचं का आहे?

१८ वेगवेगळ्या भागांतील लोकांमध्ये काही ना काही फरक असतोच. पण यहोवाची अशी इच्छा आहे, की सर्वांनीच त्याच्याबद्दल शिकावं, त्याची उपासना करावी, आणि कायमस्वरूपी या पृथ्वीवर जीवन जगावं. (योहा. ३:१६; १ तीम. २:३, ४) आपल्या बांधवांचे विचार आपल्यापेक्षा जरी वेगळे असले तरी जोपर्यंत ते यहोवाच्या नियमांच्या विरोधात नाहीत तोपर्यंत त्यांचं ऐकून घेण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. जर आपण असं करू, तर आपलं जीवन अर्थपूर्ण आणि आनंदी होईल आणि आपल्या बंधुभगिनींसोबत ऐक्यानं राहणंदेखील आपल्याला शक्य होईल. आपण चर्चा केल्यानुसार, यहोवा आणि त्याच्या राज्याशी एकनिष्ठ असल्यामुळे, जगातील गोष्टींमध्ये आपण कोणाचीही बाजू घेत नाही. सैतानाच्या जगातील गर्विष्ठपणाचा आणि स्पर्धात्मक वृत्तीचा आपल्याला वीट आहे. यहोवानं आपल्याला शांतीनं राहण्यास आणि नम्र मनोवृत्ती बाळगण्यास शिकवलं आहे, यासाठी आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत! खरंच आपल्यालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणेच म्हणावंस वाटेल: “पाहा, बंधूनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!”—स्तो. १३३:१.

^ परि. 10 फिलिप्पैमधील मंडळीतील काही जणांकडे रोमी नागरिकत्व असल्यामुळे इतर बांधवांपेक्षा त्यांना जास्त अधिकार होते.

^ परि. 12 काही नावं बदलण्यात आली आहेत.