व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा

राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा

“तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल.”—योहा. २:१७.

गीत क्रमांक: १३, २१

१, २. (क) प्राचीन काळात यहोवाची उपासना करण्यासाठी त्याच्या सेवकांनी कोणकोणत्या ठिकाणांचा उपयोग केला? (ख) जेरूसलेमधील यहोवाच्या मंदिराबद्दल येशूला कसं वाटायचं? (ग) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

अगदी पूर्वीपासूनच देवाच्या सेवकांनी खऱ्या उपासनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा वापर केला आहे. उदाहरणार्थ, हाबेलानं यहोवाला बलिदानं अर्पण केली, तेव्हा कदाचित त्यानं वेदी बांधली असावी. (उत्प. ४:३, ४) नोहा, अब्राहाम, इसहाक, याकोब आणि मोशे यांनीही वेद्या बांधल्या होत्या. (उत्प. ८:२०; १२:७; २६:२५; ३५:१; निर्ग. १७:१५) तसंच, इस्राएली लोकांनाही यहोवानं निवासमंडप बांधण्यास सांगितलं होतं. (निर्ग. २५:८) पुढं त्यानं एक मंदिर बांधण्याची आज्ञा त्यांना दिली. (१ राजे ८:२७, २९) नंतर, देवाचे लोक बॅबिलोनच्या गुलामगिरीतून परतले तेव्हापासून ते उपासनेसाठी सभास्थानांत नियमित रीत्या एकत्र येऊ लागले. (मार्क ६:२; योहा. १८:२०; प्रे. कृत्ये १५:२१) पहिल्या शतकात, ख्रिस्ती लोक घरांमध्ये एकत्र जमून यहोवाची उपासना करायचे. (प्रे. कृत्ये १२:१२; १ करिंथ. १६:१९) आणि आज आपल्या काळात, जगभरामध्ये यहोवाचे सेवक राज्य सभागृहांत एकत्र येतात. या हजारो सभागृहांमध्ये ते यहोवाबद्दल शिकतात आणि त्याची उपासना करतात.

जेरूसलेममधील यहोवाच्या मंदिराबद्दल येशूच्या मनात खूप आदर होता. येशूचं मंदिराप्रती असलेलं प्रेम पाहून त्याच्या शिष्यांना स्तोत्रकर्त्याचे शब्द आठवले: “तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे.” (स्तो. ६९:९; योहा. २:१७) जेरूसलेमच्या मंदिराला ‘यहोवाचं घर’ म्हटलं जायचं. आज राज्य सभागृहांबद्दल असं म्हणता येत नसलं, तरी या ठिकाणांबद्दल आपण आदर दाखवला पाहिजे. (२ इति. ५:१३; ३३:४) या लेखात आपण अशा काही तत्त्वांवर चर्चा करणार आहोत, ज्यांमुळे सभागृहात चांगलं आचरण ठेवण्यास आपल्याला मदत होईल. तसंच, सभागृहांचा सांभाळ करण्यास आणि त्यांना नीटनेटकं ठेवण्यास हातभार लावण्यासाठीही या तत्त्वांमुळे आपल्याला मदत होईल. *

आपण सभांबद्दल आदर कसा दाखवू शकतो?

३-५. राज्य सभागृह काय आहे, आणि सभांप्रती आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?

राज्य सभागृह असं एक महत्त्वाचं ठिकाण आहे जिथं यहोवाची उपासना करण्यासाठी त्याचे लोक एकत्र येतात. आपल्या सभा खरंतर देवानं आपल्याला दिलेली एक देणगीच आहे. यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करण्यासाठी या सभा आपल्याला मदत करतात. त्याची संघटना आपल्याला लागणारं उत्तेजन आणि मार्गदर्शन सभांद्वारे पुरवते. दर आठवडी ‘यहोवाच्या मेजावर’ आध्यात्मिक अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी यहोवा आणि येशू आपल्याला आमंत्रण देत असतात. हे आमंत्रण आपल्यासाठी एक मोठा बहुमानच आहे. (१ करिंथ. १०:२१) म्हणून सभांना उपस्थित राहण्याच्या बहुमानाला आपण कधीच कमी लेखू नये.

आपण सभांमध्ये येऊन यहोवाची उपासना करावी आणि एकमेकांना उत्तेजन द्यावं अशी स्वतः यहोवाचीच इच्छा आहे. (इब्री लोकांस १०:२४, २५ वाचा.) यहोवाप्रती आपल्याला मनापासून आदर आहे. त्यामुळे अगदी महत्त्वाचं कारण असल्याशिवाय आपण एकही सभा चुकवणार नाही. आपण जेव्हा सभांची चांगली तयारी करतो आणि त्यात सहभाग घेतो, तेव्हा सभांबद्दल आपल्याला किती कदर आहे हे दिसून येतं.—स्तो. २२:२२.

सभांमध्ये आपलं वागणं-बोलणं कसं असतं आणि सभागृहाची आपण काळजी कशी घेतो यावरून यहोवाप्रती आपल्याला किती आदर आहे हे दिसून येतं. सहसा सभागृहाच्या बाहेरील फलकावर यहोवाचं नाव असतं. (१ राजे ८:१७ पडताळून पाहा.) त्यामुळे, आपल्या वर्तनामुळे यहोवाच्या या नावाचा नेहमी गौरव व्हावा अशी आपली इच्छा असते.

६. आपल्या राज्य सभागृहांबद्दल आणि तिथल्या वातावरणाबद्दल इतरांनी काय म्हटलं आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

सभागृहांबद्दल आपल्या मनात असणारा आदर इतरांच्या नजरेतूनही लपत नाही. टर्कीमधील एका व्यक्तीचं उदाहरण घ्या. ती व्यक्ती म्हणते, “सभागृहातील स्वच्छता आणि सुव्यवस्था मला खूप विशेष वाटली. तिथल्या लोकांचा पेहराव अगदी नीटनेटका होता आणि सर्वांचे चेहरे आनंदी होते. ते अगदी प्रेमानं एकमेकांना भेटत होते. हे सगळं पाहून मला खरंच खूप छान वाटलं!” ती व्यक्ती नंतर नियमितपणे सभांना येऊ लागली आणि लवकरच तिनं बाप्तिस्मा घेतला. इंडोनेशियाच्या एका शहरात आपलं नवीन सभागृह पाहण्यासाठी तिथल्या बांधवांनी शेजाऱ्यांना, नगराध्यक्षाला आणि इतर अधिकाऱ्यांना बोलवलं. सभागृहाच्या बांधकामाचा दर्जा, त्याची रचना, आणि तिथली सुंदर बाग पाहून नगराध्यक्ष खूप प्रभावित झाले. ते म्हणाले, “सभागृहाची स्वच्छता पाहूनच तुमचा विश्वास किती खरा आहे हे दिसतंय.”

आपल्या आचरणामुळे देवाच्या नावाचा अनादर होऊ शकतो (परिच्छेद ७, ८ पाहा)

७, ८. राज्य सभागृहात असताना आपण यहोवाबद्दल आदर कसा दाखवू शकतो?

सभांना येण्याचं आमंत्रण आपल्याला दुसरं-तिसरं कुणी नाही तर स्वतः यहोवा देतो. म्हणून, सभांमध्ये आपल्या पेहरावातून आणि आपल्या वागण्याबोलण्यातून यहोवाप्रती असलेला आपला आदर दिसून आला पाहिजे. पण, कधीकधी काही जण याबाबतीत फारच कडक भूमिका घेतात. तर, काही जण अगदीच निष्काळजीपणा दाखवतात. सभांमध्ये येणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला अवघडल्यासारखं वाटू नये अशी यहोवाची इच्छा आहे. त्यामुळे यहोवाच्या नावाचा अनादर होईल असं आपण मुळीच वागणार नाही. याच कारणामुळे आपण सभेला येताना नेहमी नीटनेटके कपडे घालतो. तसंच, सभा चालू असताना फोनवरून कोणाला मेसेज पाठवत नाही, इतरांशी बोलत नाही किंवा काही खात-पीत नाही. शिवाय, मुलांनी सभागृहात इकडून-तिकडं पळू नये किंवा खेळत राहू नये याचीही आईवडील काळजी घेतात.—उप. ३:१.

देवाच्या मंदिरात लोक व्यापार करत आहेत हे पाहून येशूला खूप राग आला आणि त्यानं त्या सर्वांना तिथून हाकलून लावलं. (योहा. २:१३-१७) राज्य सभागृहात आपण यहोवाबद्दल शिकायला आणि त्याची उपासना करायला येतो. त्यामुळे, तिथं व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट करण्याचं आपण टाळलं पाहिजे.—नहेम्या १३:७, ८ पडताळून पाहा.

सभागृहांच्या बांधकामात तुमचा हातभार

९, १०. (क) राज्य सभागृहांचं बांधकाम कसं केलं जातं, आणि याचा काय परिणाम झाला आहे? (ख) गरज असलेल्या ठिकाणी राज्य सभागृहं बांधण्यासाठी यहोवाची संघटना कशी मदत करते?

यहोवाचे सेवक जगभरात राज्य सभागृहं बांधण्यात खूप मेहनत घेतात. अनेक स्वयंसेवक सभागृहांची रचना, त्यांचं बांधकाम, आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी पुढं येतात. याचा परिणाम म्हणजे, गेल्या १५ वर्षांत आपण २८,००० पेक्षा जास्त राज्य सभागृहे बांधली आहेत. म्हणजे, दर दिवशी सरासरी पाच सभागृहं बांधण्यात आली आहेत.

१० गरज असलेल्या ठिकाणी सभागृहांच्या बांधकामासाठी यहोवाची संघटना स्वयंसेवकांना नियुक्त करते. तसंच, बांधकामासाठी मिळालेल्या अनुदानाचा उपयोग करते. या कार्यासाठी बांधव बायबलच्या तत्त्वाचं पालन करून उदारतेनं अनुदान देतात. (२ करिंथकर ८:१३-१५ वाचा.) म्हणूनच, गरज असलेल्या ठिकाणी अनेक राज्य सभागृहं बांधण्यात आली आहेत.

११. नवीन राज्य सभागृहाबद्दल काही बांधवांनी काय म्हटलं आहे, आणि याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

११ कोस्टारिका येथील एका मंडळीतील बांधवांनी असं लिहिलं, “सभागृह पाहिल्यावर असं वाटतं जणू आम्ही स्वप्नच पाहत आहोत. आम्हाला तर विश्वासच बसत नाही की आमचं सभागृह फक्त आठ दिवसांत बांधून पूर्ण झालं. यहोवाच्या आशीर्वादामुळे, त्याच्या संघटनेच्या व्यवस्थेमुळे आणि आपल्या प्रिय बांधवांच्या मदतीमुळेच हे शक्य झालं आहे. आमचं सभागृह यहोवाकडून आम्हाला मिळालेली एक मौल्यवान भेट आहे.” यहोवानं पुरवलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल बांधव त्याचे आभार मानतात, तेव्हा आपल्याला याचा नक्कीच आनंद होतो. शिवाय, जगभरातील आपल्या बंधुभगिनींना त्यांचं स्वतःच राज्य सभागृह मिळतं तेव्हाही आपलं मन आनंदानं भरून जातं. सभागृहांच्या बांधकामावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे स्पष्टच आहे. कारण, जेव्हा नवीन सभागृह बांधण्यात येतं तेव्हा यहोवाबद्दल शिकण्यासाठी तिथं अनेक लोक येतात.—स्तो. १२७:१.

१२. राज्य सभागृहं बांधण्यासाठी तुम्ही कसा हातभार लावू शकता?

१२ राज्य सभागृहाच्या बांधकामासाठी तुम्ही कसा हातभार लावू शकता? त्यासाठी कदाचित तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करू शकता. शिवाय, सभागृहांच्या बांधकामासाठी आपण सर्व जण दान देऊ शकतो. या कार्यात हातभार लावण्यासाठी आपण जितकी जास्त मेहनत घेऊ तितकाच जास्त आनंद आपल्याला मिळेल. आणि याहून महत्त्वाचं म्हणजे यामुळे यहोवाच्या नावाचा महिमा होईल. बायबलच्या काळातील देवाच्या सेवकांचं चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. उपासनेची ठिकाणं बांधण्यासाठी दान देण्याकरता ते मनापासून तयार होते.—निर्ग. २५:२; २ करिंथ. ९:७.

सभागृहांच्या स्वच्छतेचं महत्त्व

१३, १४. आपण आपलं राज्य सभागृह स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं पाहिजे, हे कोणत्या वचनाच्या आधारावर सांगता येईल?

१३ आपला देव यहोवा हा पवित्र देव आहे. तो सुव्यवस्थेचा देवा आहे. त्यामुळेच, आपण आपलं राज्य सभागृह स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं पाहिजे. (१ करिंथकर १४:३३, ४० वाचा.) यहोवासारखंच शुद्ध आणि पवित्र राहण्यासाठी आपण केवळ आपल्या उपासनेचं ठिकाण आणि आपले आचार-विचारच नाही, तर आपल्या शारीरिक शुद्धतेकडेही लक्ष दिलं पाहिजे.—प्रकटी. १९:८.

१४ आपण जर आपलं राज्य सभागृह स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं, तर लोकांना सभेसाठी आमंत्रण देताना आपल्याला जराही संकोच वाटणार नाही. लवकरच येणाऱ्या स्वच्छ आणि सुंदर नवीन जगाबद्दल आपण जो संदेश लोकांना सांगतो, त्यानुसार आपण काम करत आहोत हे लोकांना सभागृहात आल्यानंतर पाहायला मिळेल. तसंच, संपूर्ण पृथ्वीला लवकरच सुंदर नंदनवनात बदलणाऱ्या शुद्ध आणि पवित्र देवाची आपण उपासना करत आहोत, हेही ते पाहू शकतील.—यश. ६:१-३; प्रकटी. ११:१८.

१५, १६. (क) राज्य सभागृह स्वच्छ ठेवणं नेहमीच सोपं का नसतं, पण तरी आपण ते स्वच्छ का ठेवलं पाहिजे? (ख) तुमच्या राज्य सभागृहाच्या स्वच्छतेसाठी काय व्यवस्था केली जाते, आणि आपल्या सर्वांनाच कोणता बहुमान मिळाला आहे?

१५ प्रत्येक व्यक्ती एकाच वातावरणात लहानाची मोठी झालेली नसते. म्हणून स्वच्छतेबद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. काही लोक अशा ठिकाणी राहत असतील जिथं खूप धूळ असेल किंवा तिथले रस्ते मातीनं आणि चिखलानं भरलेले असतील. काहींच्या जवळ पुरेसं पाणी किंवा स्वच्छतेची साधनं कदाचित नसतील. पण, आपण कोणत्याही ठिकाणी राहत असलो आणि स्वच्छतेबद्दल तिथल्या लोकांचं मत काहीही असलं, तरी आपण मात्र आपलं राज्य सभागृह स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं पाहिजे. कारण, ते ठिकाण आपण यहोवाच्या उपासनेसाठी वापरत असतो.—अनु. २३:१४.

१६ आपलं राज्य सभागृह स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सुव्यवस्थितपणे काम करणं गरजेचं आहे. मंडळीतील वडील स्वच्छतेसाठी आराखडा बनवतात आणि त्यासाठी पुरेशी साधनं आहेत की नाही याची काळजी ते नेहमी घेतात. काही वस्तू दर सभेनंतर स्वच्छ कराव्या लागतात. पण, काही कधीकधी केल्या तरी चालतात. त्यामुळे, कोणत्याही वस्तूच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये याकडेही वडील लक्ष देतात. खरंतर, आपल्या सर्वांनाच राज्य सभागृहाच्या स्वच्छतेत हातभार लावण्याचा बहुमान मिळाला आहे.

सभागृहांना चांगल्या स्थितीत ठेवणं

१७, १८. (क) प्राचीन काळात यहोवाच्या लोकांनी मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी जे केलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? (ख) आपण आपल्या राज्य सभागृहाची काळजी का घेतली पाहिजे?

१७ वेळोवेळी राज्य सभागृहाची दुरुस्ती करण्याद्वारेही आपण त्याला चांगल्या स्थितीत ठेवू शकतो. प्राचीन काळातील यहोवाच्या सेवकांनीही हेच केलं. उदाहरणार्थ, यहुदामधील यहोआश राजाच्या शासनादरम्यान लोक मंदिरात दान टाकायचे. त्या दानाचा उपयोग मंदिराच्या दुरुस्तीसाठी करण्यात यावा अशी आज्ञा राजानं याजकांना दिली होती. (२ राजे १२:४, ५) त्याच्या २०० वर्षांनंतर, मंदिराच्या दुरुस्तीसाठी योशीया राजानंही मंदिरातील दानाचा उपयोग केला.—२ इतिहास ३४:९-११ वाचा.

१८ काही देशांतील शाखा समित्यांच्या हे लक्षात आलं आहे की त्यांच्या देशांतील लोकांना इमारतींना आणि इतर साधनांना चांगल्या स्थितीत ठेवण्याची सवय नाही. कदाचित तिथल्या थोड्या लोकांनाच दुरुस्तीचं काम येत असेल किंवा दुरुस्तीसाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसेही नसतील. पण, आपण वेळच्या वेळी आपल्या राज्य सभागृहाची दुरुस्ती केली नाही, तर ते चांगल्या स्थितीत राहणार नाही आणि लोकांच्याही ते लक्षात येईल. त्यामुळे, त्यांच्यावर चांगली छाप पडणार नाही. याउलट, जेव्हा आपण राज्य सभागृहाला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा आपण यहोवाच्या नावाचा गौरव करत असतो. तसंच, बांधवांनी दिलेल्या अनुदानाची आपल्याला कदर आहे हे आपण दाखवत असतो.

आपलं राज्य सभागृह आपण नेहमी स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवलं पाहिजे (परिच्छेद १६, १८ पाहा)

१९. यहोवाची उपासना केली जाते त्या ठिकाणांबद्दल तुम्हाला आदर आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

१९ राज्य सभागृह यहोवाला समर्पित केलेलं एक ठिकाण आहे. ते कोणत्याही व्यक्तीच्या किंवा मंडळीच्या मालकीचं नाही. या लेखात चर्चा केलेल्या बायबल तत्त्वांमुळे, देवाची उपासना केली जाते त्या ठिकाणांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला मदत होईल. यहोवाप्रती मनापासून आदर असल्यामुळे, आपण सभांना आणि सभागृहांना मौल्यवान लेखतो. शिवाय, आणखी जास्त राज्य सभागृहं बांधण्यासाठी आपण आनंदानं अनुदान देतो. तसंच, त्यांना स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठीही आपण खूप मेहनत घेतो. असं करण्याद्वारे आपणही येशूप्रमाणे यहोवाची उपासना केली जाते त्या ठिकाणांबद्दल आवेश आणि आदर दाखवत असतो.—योहा. २:१७.

^ परि. 2 या लेखात विशेषकरून राज्य सभागृहांबद्दल चर्चा करण्यात आली आहे. पण तरी, यातील तत्त्वं संमेलनगृहांना आणि यहोवाची सेवा करण्यासाठी ज्या इतर ठिकाणांचा उपयोग केला जातो त्यांच्या बाबतीतही लागू होतात.