व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नवीन जगातील जीवनाची आत्ताच तयारी करा

नवीन जगातील जीवनाची आत्ताच तयारी करा

चांगलं ते करा म्हणजे खरं जीवन बळकट धरण्यास चांगला आधार होईल.—१ तीम. ६:१८, १९.

गीत क्रमांक: ४३, ४०

१, २. (क) नंदनवनात तुम्हाला काय करायला आवडेल? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) नवीन जगात कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आनंद देणारी असेल?

सार्वकालिक जीवनाची आपण सर्व जण अगदी आतुरतेनं वाट पाहत आहोत. प्रेषित पौलानं याला “खरे जीवन” असं म्हटलं. (१ तीमथ्य ६:१२, १९ वाचा.) बहुतेकांसाठी हे खरं जीवन म्हणजे पृथ्वीवरील नंदनवनातील सार्वकालिक जीवन असेल. दररोज सकाळी उठल्यावर निरोगी, आनंदी आणि समाधानी असण्याचा अनुभव घेणं कसं असेल, याची कल्पना करणं आज आपल्यासाठी सोपं नाही. (यश. ३५:५, ६) आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवणं किती आनंद देणारं असेल याची कल्पना करा, ज्यात पुनरुत्थान झालेल्यांचाही समावेश असेल! (योहा. ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५) नवनवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी तुमच्याजवळ भरपूर वेळ असेल. तसंच, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही आणखी निपुण व्हाल. उदाहरणार्थ, विज्ञानाविषयी तुम्हाला आणखी शिकता येईल, एखादं वाद्य वाजवायलादेखील तुम्हाला शिकता येईल किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे तुम्हाला घराची रूपरेषा बनवता येईल.

या सर्व चांगल्या गोष्टींची जरी आपण वाट पाहत असलो, तरी यहोवाच्या उपासनेत मिळणाऱ्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येणार नाही. सर्व जण यहोवाच्या नावाला पवित्र मानतील आणि त्याला शासक म्हणून स्वीकारतील तेव्हा तो काळ कसा असेल याची कल्पना करा. (मत्त. ६:९, १०) देवाच्या उद्देशानुसार, परिपूर्ण मानवांनी संपूर्ण पृथ्वी भरून जाताना पाहणं आपल्यासाठी खरंच खूप रोमांचक असेल. तसंच, आपण हळूहळू परिपूर्ण होत जाऊ तेव्हा यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घनिष्ठ करणं आपल्यासाठी किती सोपं जाईल याचाही विचार करा.—स्तो. ७३:२८; याको. ४:८.

३. कोणत्या गोष्टीची तयारी आत्ताच करणं गरजेचं आहे?

आपल्याला याची पूर्ण खात्री आहे की यहोवा या सर्व चांगल्या गोष्टी करू शकतो. कारण, “देवाला तर सर्व शक्य आहे.” (मत्त. १९:२५, २६) आपल्याला नवीन जगात कायम जगायचं असेल, तर सार्वकालिक जीवनावरील आपली पकड “बळकट” करण्याची आत्ताच वेळ आहे. म्हणजे, आपण ज्या प्रकारे जीवन जगतो त्यावरून अंत कोणत्याही क्षणी येईल, अशी अपेक्षा आपल्याला असल्याचं दिसून आलं पाहिजे. तसंच, नवीन जगातील जीवनाची तयारी करण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते सर्व आपण आत्ताच केलं पाहिजे. पण आपल्याला हे कसं करता येईल?

कशी कराल तयारी?

४. आपण आत्ताच नवीन जगातील जीवनाची तयारी कशी करू शकतो? उदाहरण द्या.

नवीन जगात राहण्याची तयारी आपण कशी करू शकतो? असं समजा की आपण दुसऱ्या देशात जाऊन राहण्याच्या विचारात आहोत. तेव्हा, त्यासाठी आपण आधीच काही गोष्टींची तयारी करू. जसं की, कदाचित तिथली भाषा शिकून घेण्याचा, तिथले रीतिरिवाज समजून घेण्याचा किंवा तिथलं जेवण कसं आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू. अगदी त्याच प्रकारे नवीन जगात राहण्याचीही आपण आत्ताच तयारी करू शकतो. जणू आपण तिथं राहतच आहोत अशा प्रकारे जीवन जगण्याचा आपण होताहोईल तितका प्रयत्न केला पाहिजे. असं आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी करता येईल ते आता आपण पाहू या.

५, ६. आत्ताच यहोवाच्या संघटनेच्या मार्गदर्शनानुसार चालत राहिल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल?

आपल्याला वाटेल ते आपण करू शकतो, असा विचार आपण करावा अशी सैतानाची इच्छा आहे. आपण स्वतः आपल्या मर्जीचे मालक आहोत आणि देवाच्या आज्ञेत राहण्याची आपल्याला गरज नाही, असं अनेकांना वाटतं. पण, अशा विचारसरणीचा काय परिणाम झाला आहे? आज जगात सर्वत्र दुःख आणि त्रासच दिसून येतो. (यिर्म. १०:२३) पण, यहोवा मात्र एक प्रेमळ शासक आहे. नवीन जगात जेव्हा सर्व जण अशा प्रेमळ शासकाच्या अधीन असतील तेव्हा ते जीवन खरंच किती सुंदर असेल!

नवीन जगात संपूर्ण पृथ्वीला सुंदर बनवण्याची आणि पुनरुत्थान झालेल्यांना शिकवण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात येईल. तेव्हा, यहोवाच्या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी पूर्ण करताना आपल्याला नक्कीच खूप आनंद होईल. नवीन जगात यहोवा आपल्याला पुष्कळ गोष्टी करण्याची संधी देईल. पण, समजा तेव्हा आपल्याला असं एखादं काम करायला सांगितलं जे आपल्याला आवडत नाही, तेव्हा काय? तेव्हाही आपण ते काम करायला तयार असू का? तेव्हासुद्धा आपल्यावर सोपवण्यात आलेलं काम आनंदानं पूर्ण करण्यासाठी आपण होताहोईल तितका प्रयत्न करू का? नक्कीच करू, तर मग आत्तासुद्धा यहोवाची संघटना जे मार्गदर्शन आपल्याला देत आहे त्याचं पालन करण्याचं आपण शिकून घेतलं पाहिजे. असं केल्यामुळे आपण नवीन जगातील जीवनाची तयारी करत आहोत हे दिसून येईल.

७, ८. (क) जे पुढाकार घेतात त्यांना सहकार्य करणं महत्त्वाचं का आहे? (ख) काही बांधवांच्या नेमणूकीमध्ये कोणते बदल झाले आहेत? (ग) नवीन जगात कोणती गोष्ट आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असेल?

आपल्याला नवीन जगात राहण्याची तयारी करायची असेल तर आपण समाधानी असण्याचं आणि यहोवाच्या संघटनेला तसंच एकमेकांना सहकार्य करण्याचं शिकून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला एखादी नवीन नेमणूक दिली जाते तेव्हा आपण ती आनंदानं स्वीकारून त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याद्वारे पुढाकार घेणाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. आज पुढाकार घेणाऱ्यांना सहकार्य करण्याचं आपण शिकून घेतलं, तर नवीन जगातही आपण तेच करण्याचा प्रयत्न करू. (इब्री लोकांस १३:१७ वाचा.) इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात गेले तेव्हा त्यांना राहण्यासाठी जागा नेमून देण्यात आल्या होत्या. (गण. २६:५२-५६; यहो. १४:१, २) नवीन जगात आपल्याला कुठं राहण्यासाठी सांगितलं जाईल हे आपल्याला माहीत नाही. पण, आज जर सहकार्य करण्याचं आपण शिकून घेतलं तर नवीन जगात आपण कुठंही राहिलो, तरी यहोवाची इच्छा पूर्ण करण्यातच आपल्याला सर्वात जास्त आनंद मिळेल.

देवाच्या नवीन जगात त्याच्या राज्याच्या अधीन राहून त्याची सेवा करणं हा किती मोठा बहुमान असेल याची कल्पना करा! त्यामुळे आजदेखील आपण यहोवाच्या संघटनेला सहकार्य करतो आणि आपल्याला जी नेमणूक दिली जाते ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण, कधीकधी आपली नेमणूक बदलते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील काही बेथेल सदस्यांना बेथेल सेवेऐवजी सेवाकार्यात नेमण्यात आलं. तसंच, वय झाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे काही प्रवासी पर्यवेक्षकांना खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. त्यांच्या नेमणुकीत बदल झालेला असूनही ते खूप आनंदी आहेत आणि यहोवा त्यांना आशीर्वाद देत आहे. आपणही जर यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली, त्याची सेवा करण्यासाठी मेहनत घेतली आणि जी नेमणूक दिली जाते ती आनंदानं पार पाडली तर आपणही आनंदी राहू आणि आपल्यालाही यहोवाचे आशीर्वाद मिळतील. (नीतिसूत्रे १०:२२ वाचा.) समजा नवीन जगात एका विशिष्ट ठिकाणी राहण्याची इच्छा असूनही यहोवाच्या संघटनेनं आपल्याला दुसऱ्या ठिकाणी राहायला सांगितलं तर काय? त्या वेळी आपण कुठं राहतो किंवा काय करतो यामुळे आपल्याला खरंतर काही फरक पडणार नाही. उलट, आपण नवीन जगात आहोत याच गोष्टीचा आपल्याला सगळ्यात जास्त आनंद होईल.—नहे. ८:१०.

९, १०. (क) नवीन जगात आपल्याला धीर दाखवण्याची गरज का पडेल? (ख) आज आपण धीर कसा दाखवू शकतो?

कधीकधी आपल्याला नवीन जगात धीर दाखवण्याचीही गरज पडू शकते. उदाहरणार्थ, काही जणांच्या नातेवाइकांचं आणि मित्रांचं पुनरुत्थान झालं आहे आणि ते अगदी आनंदात आहेत अशी बातमी आपल्या कानावर येईल. पण, त्या वेळी कदाचित आपल्या प्रियजनांच्या पुनरुत्थानाची आपल्याला वाट पाहावी लागेल. आशा वेळी तुम्ही निराश व्हाल का? की धीर दाखवून जे आनंदी आहेत त्यांच्यासोबत आनंद कराल? (रोम. १२:१५) देवाच्या अभिवचनांची पूर्णता पाहण्यासाठी धीरानं वाट पाहत राहण्याचं जर आपण आत्ताच शिकून घेतलं, तर नवीन जगातही धीर दाखवणं आपल्याला शक्य होईल.—उप. ७:८.

१० बायबल सत्यांविषयी जेव्हा आपल्याला सुधारित समज दिली जाते, तेव्हाही धीर दाखवण्याद्वारे आपण नवीन जगासाठी तयारी करू शकतो. सत्याबद्दल मिळालेल्या या नवीन माहितीचा आपण अभ्यास करतो का? आणि, जेव्हा आपल्याला ती माहिती पूर्णपणे समजत नाही तेव्हा आपण धीर दाखवतो का? असं केल्यामुळे नवीन जगात जेव्हा यहोवा आपल्याला काही नवीन सूचना देईल, तेव्हा धीर दाखवणं आपल्याला सोपं जाईल.—नीति. ४:१८; योहा. १६:१२.

११. आपण आत्ताच इतरांना क्षमा करण्याचं का शिकून घेतलं पाहिजे, आणि यामुळे नवीन जगात आपल्याला कशी मदत होईल?

११ इतरांना क्षमा करण्याचं शिकून घेण्याद्वारे आपण आणखी एका मार्गानं नवीन जगाची तयारी करू शकतो. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान सर्वांनाच परिपूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. (प्रे. कृत्ये २४:१५) तेव्हा आपण प्रेमळपणे इतरांना क्षमा करण्यास तयार असू का? आपण जर आत्ताच इतरांना क्षमा करण्याचं शिकून घेतलं आणि त्यांच्यासोबत चांगला नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला, तर नवीन जगातही असं करणं आपल्याला सोपं जाईल.—इफिसकर ४:३२ वाचा.

१२. आपण आत्ताच नवीन जगाची तयारी करणं गरजेचं का आहे?

१२ नवीन जगात आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी लगेचच मिळतील असं म्हणता येणार नाही. कदाचित त्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. पण, आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी त्यात समाधान मानून आनंदी राहिलं पाहिजे. खरंतर, यहोवा आता आपल्याला जे गुण दाखवण्यास शिकवत आहे तेच गुण आपल्याला भविष्यात फायद्याचे ठरतील. तेव्हा, हे गुण दाखवायला आपण शिकलं पाहिजे. यावरून हे दिसून येईल की नवीन जगाची आपल्याला खात्री आहे आणि आपण त्याची तयारीही करत आहोत. (इब्री २:५; ११:१) शिवाय, सर्व जण यहोवाला विश्वासू राहतील अशा जगात राहण्याची आपल्याला खरंच इच्छा आहे हेदेखील त्यावरून दिसून येईल.

यहोवाची सेवा करण्याकडे लक्ष द्या

सेवाकार्यात आवेशानं सहभाग घ्या

१३. नवीन जगात कोणती गोष्ट आपल्याला सर्वात जास्त आनंद देणारी असेल?

१३ नवीन जगात जीवनाचा आनंद लुटता येईल अशी हरएक गोष्ट आपल्याजवळ असेल. पण, यहोवासोबत असणारा घनिष्ठ नातेसंबंधच आपल्याला सर्वात जास्त आनंद देणारा असेल. (लूक ११:२८) त्या वेळी आपण आनंदानं यहोवाची सेवा करण्यात व्यस्त असू. (स्तो. ३७:४) म्हणून, जर आता आपण यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवलं, तर आपण नवीन जगाच्या तयारीत आहोत हे दिसून येईल.—मत्तय ६:१९-२१ वाचा.

१४. तरुण लोक यहोवाच्या सेवेत कोणती ध्येयं ठेवू शकतात?

१४ यहोवाची सेवा आणखी आनंदानं करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल? याचा एक मार्ग म्हणजे आध्यात्मिक ध्येयं ठेवणं. तरुणांनो यहोवाच्या सेवेत आपल्या जीवनाचा कसा वापर करता येईल याचा तुम्ही गंभीरतेनं विचार केला आहे का? नसेल, तर आपल्या प्रकाशनांत पूर्णवेळेच्या सेवेसाठी जे वेगवेगळे पर्याय देण्यात आले आहेत त्यांचं परीक्षण करून, त्यांपैकी एखादा पर्याय निवडण्याचं तुम्ही ध्येय ठेवू शकता. * शिवाय, जे बऱ्याच वर्षांपासून पूर्णवेळेच्या सेवेत आहेत त्यांच्याशी तुम्ही याविषयी बोलू शकता. तुम्ही जर तुमचं आयुष्य यहोवाच्या सेवेत वाहून घेतलं तर तुम्हालाही मौल्यवान प्रशिक्षण मिळेल आणि त्यामुळे नवीन जगात यहोवाची सेवा करण्यास तुम्हाला मदत होईल.

आध्यात्मिक ध्येयं ठेवा

१५. यहोवाच्या सेवेत आपण आणखी कोणती ध्येयं ठेवू शकतो?

१५ यहोवाच्या सेवेत आपल्याला अनेक ध्येयं ठेवता येतील. उदाहरणार्थ, सेवाकार्यात आपण एखादं नवीन कौशल्य शिकण्याचं ध्येय ठेवू शकतो. बायबलमधील एखादं तत्त्व चांगल्या प्रकारे समजून ते जीवनात कसं लागू करता येईल हे शिकून घेण्याचं ध्येय आपण ठेवू शकतो. तसंच, सभेत चांगल्या प्रकारे वाचन करण्याचं, भाग हाताळण्याचं आणि उत्तरं देण्याचं ध्येयदेखील आपण ठेवू शकतो. मुद्दा हाच आहे, की जेव्हा तुम्ही यहोवाच्या सेवेत एखादं ध्येय ठेवता, तेव्हा तुमचा आवेश आणखी वाढवण्यासाठी आणि नवीन जगाची तयारी करण्यासाठी तुम्हाला मदत होत असते.

जीवनाचा सर्वोत्तम मार्ग

यहोवा जे काही देत आहे त्यासाठी त्याचे आभार माना

१६. यहोवाची सेवा करणं जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं का म्हणता येईल?

१६ नवीन जगाच्या तयारीसाठी आपण जेव्हा आपला वेळ खर्च करतो, तेव्हा सध्याच्या जीवनातील आनंद आपण गमावत आहोत असं म्हणता येईल का? नक्कीच नाही! कारण, यहोवाची सेवा करणं हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि त्यामुळेच आपल्याला खरा आनंद मिळू शकतो. आपण यहोवाची सेवा केवळ मोठ्या संकटातून वाचण्याकरता किंवा आपल्यावर कोणी जबरदस्ती करत आहे म्हणून करत नाही, तर यहोवावर आपलं प्रेम असल्यामुळे आपण त्याची सेवा करतो. शिवाय, यहोवासोबत आपला जवळचा नातेसंबंध असल्यामुळे आपलं जीवन चांगलं आणि आनंदी बनतं हेदेखील आपल्याला माहीत आहे. खरंतर यहोवानं अशाच प्रकारचं जीवन जगण्यासाठी आपल्याला बनवलं आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा यहोवाचं प्रेम आणि आपल्या जीवनात असणारं त्याचं मार्गदर्शन आपल्यासाठी सर्वात जास्त फायद्याचं आहे. (स्तोत्र ६३:१-३ वाचा.) पूर्ण मनानं यहोवाची सेवा करण्याचा आनंद काय असतो हे आपण सर्वच अनुभवू शकतो. ज्यांनी अनेक वर्षं यहोवाची सेवा केली आहे ते अगदी खात्रीनं म्हणतात की हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.—स्तो. १:१-३; यश. ५८:१३, १४.

बायबल आधारित मार्गदर्शन घ्या

१७. नंदनवनात आपल्या आवडीच्या गोष्टी आणि करमणूक यांना कितपत महत्त्व असेल?

१७ नंदनवनात आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आणि करमणूक करण्यासाठी वेळ घालवताना आपल्याला नक्कीच आनंद होईल. कारण, मुळात यहोवानंच आपल्याला जीवनाचा आनंद लुटण्याच्या इच्छेसोबत बनवलं आहे. शिवाय, तो सर्व “प्राणिमात्राची इच्छा पुरी” करेल असं अभिवचनही त्यानं दिलं आहे. (स्तो. १४५:१६; उप. २:२४) हे खरं आहे, की आपल्याला करमणुकीची आणि आरामाची गरज आहे. पण, जेव्हा यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाला आपण प्रथम स्थानी ठेवतो तेव्हा आपल्याला यात आणखी जास्त आनंद मिळतो. नवीन जगातही हीच गोष्ट खरी असेल. त्यामुळे, “पहिल्याने त्याचे राज्य” मिळवण्यासाठी झटणं आणि त्याची सेवा करताना मिळणाऱ्या आशीर्वादांवर लक्ष केंद्रित करणंच शहाणपणाचं ठरेल.—मत्त. ६:३३.

१८. नवीन जगासाठी आपण तयारी करत असल्याचं कशावरून दाखवू शकतो?

१८ नवीन जगातील जीवन कल्पनाही करता येणार नाही इतकं चांगलं असेल. पुढे असणाऱ्या त्या खऱ्या जीवनासाठी आत्ताच तयारी करत राहण्याद्वारे तिथं जाण्याची आपल्याला किती अतोनात इच्छा आहे हे आपण दाखवू शकतो. तोपर्यंत, यहोवा आपल्याला जे गुण दाखवायला शिकवत आहे ते आपण दाखवत राहू या आणि आवेशानं सुवार्तेचा प्रचार करत राहू या. यहोवाच्या सेवेला जीवनात प्रथम स्थानी ठेवल्यामुळे आपल्याला आत्ताही खरा आनंद अनुभवायला मिळेल. यहोवानं दिलेली सर्व अभिवचनं नवीन जगात नक्कीच पूर्ण होतील याची आपल्याला पक्की खात्री आहे. तेव्हा, आज जणू आपण नवीन जगात राहातच आहोत अशा प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करू या.

^ परि. 14 यंग पीपल आस्क, वॉल्युम २ पृष्ठे ३११-३१८ किंवा टेहळणी बुरूज १५ नोव्हेंबर २०१० पृष्ठ १२ वरील “मुलांनो—तुम्ही जीवनात काय कराल?” आणि टे.बु. १५ सप्टेंबर २०१४ पृष्ठ ३० वरील चौकट पाहा.