व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्तासारखी प्रौढता प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?

ख्रिस्तासारखी प्रौढता प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?

“ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” आपण पोहचावे.—इफिस. ४:१३.

गीत क्रमांक: ११, ४२

१, २. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

तुम्ही मार्केटमध्ये कधी स्त्रियांना फळं खरेदी करताना पाहिलं आहे का? त्या नेहमीच मोठी आणि स्वस्तातली फळं घेत नाहीत, तर ताजी आणि रसाळ फळं शोधण्याचा प्रयत्न करत असतात. थोडक्यात, त्यांना परिपक्व अशी म्हणजे चांगली पिकलेली, पूर्ण वाढ झालेली फळं हवी असतात.

यहोवाबद्दल शिकून बाप्तिस्मा घेतल्यानंतर एका व्यक्तीची वाढ तेवढ्यावरच थांबत नाही, तर यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घनिष्ठ करण्याचा ती प्रयत्न करत राहते. यासाठी एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनण्याचं ध्येय ती आपल्यासमोर ठेवते. इथं ज्या प्रौढतेबद्दल आपण बोलत आहोत, ती वयानुसार होणारी वाढ नव्हे; तर एक अशी आध्यात्मिक वाढ आहे जी यहोवासोबत असणाऱ्या आपल्या जवळच्या नात्यामुळे होते. इफिसमधल्या ख्रिश्चनांनी अशीच आध्यात्मिक प्रौढता प्राप्त करावी अशी प्रेषित पौलाची इच्छा होती. त्यानं विश्वासात एक असण्याचं आणि “प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” पोचण्याकरता येशूबद्दल शिकत राहण्याचं प्रोत्साहन त्यांना दिलं.—इफिस. ४:१३.

३. इफिस मंडळीप्रमाणेच आज यहोवाच्या लोकांची परिस्थिती आहे, असं आपल्याला का म्हणता येईल?

पौलानं जेव्हा पत्राद्वारे इफिस मंडळीला ही गोष्ट कळवली, तेव्हा या मंडळीची सुरवात होऊन काही वर्षं झाली होती. त्या मंडळीत बरेच जण चांगले अनुभवी आणि प्रौढ ख्रिश्चन होते. पण तिथं असेही काही जण होते ज्यांना अजूनही प्रगती करण्याची गरज होती. म्हणजे त्यांना यहोवासोबतचं आपलं नातं आणखी मजबूत करण्याची गरज होती. आजही अनेक वर्षं विश्वासूपणे यहोवाची सेवा करून, ख्रिस्ती प्रौढतेप्रत प्रगती केलेले कित्येक बंधुभगिनी आपल्यामध्ये आहेत. पण आपल्या मंडळीत असेही काही जण आहेत ज्यांनी अजून म्हणावी तितकी प्रगती केलेली नाही. उदाहरणार्थ, दरवर्षी अशा हजारो लोकांचा बाप्तिस्मा होतो, ज्यांना अजूनही ख्रिस्ती प्रौढतेप्रत प्रगती करण्याची गरज आहे. मग तुमच्याबद्दल काय?—कलस्सै. २:६, ७.

आध्यात्मिक वाढ म्हणजे काय?

४, ५. प्रौढ ख्रिस्ती व्यक्तींमध्ये कोणकोणत्या बाबतीत फरक असतो, पण कोणत्या गोष्टी सारख्या असतात? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

मार्केटमध्ये तुम्ही फळं खरेदी करायला गेलात, तर तुम्हाला हे जाणवेल की पिकलेली सगळीच फळं एकसारखी नसतात. पण त्यांच्यामध्ये अशी काही समान वैशिष्ट्ये असतात ज्यांवरून ती पिकलेली आहेत हे आपण ओळखू शकतो. आध्यात्मिक रीत्या प्रौढ असणाऱ्या ख्रिश्चनांच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. त्यांच्यात बऱ्याच बाबतीत फरक असतो. जसं की ते वेगवेगळ्या देशांत राहत असतील किंवा त्यांची संस्कृती वेगळी असेल. कदाचित त्यांच्या वयोगटातही पुष्कळ फरक असेल आणि त्यांच्या आवडी-निवडीही कदाचित वेगळ्या असतील. पण या सर्व गोष्टी असूनही त्यांच्यात अशी काही गुणवैशिष्ट्ये मात्र सारखीच असतील ज्यांमुळे त्यांनी आध्यात्मिक प्रौढतेप्रत प्रगती केलेली आहे हे आपण ओळखू शकतो. मग ही गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत बरं?

एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती येशूच्या “पावलांवर पाऊल ठेवून” त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असते. (१ पेत्र २:२१) येशूनं म्हटलं, की एका व्यक्तीनं पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जिवानं आणि पूर्ण मनानं यहोवावर प्रेम करणं व आपल्या शेजाऱ्यावरही स्वतःसारखं प्रेम करणं फार महत्त्वाचं आहे. (मत्त. २२:३७-३९) आध्यात्मिक रीत्या प्रौढ असणारी व्यक्ती या सल्ल्याचं पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. तिच्या जीवनातून हे अगदी स्पष्टपणे दिसून येतं की तिच्यासाठी यहोवासोबत असणारं तिचं नातं आणि इतरांप्रती असणारं तिचं गाढ प्रेमच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.

आज पुढाकार घेणाऱ्या तरुण बांधवांना पाठिंबा देण्याद्वारे वृद्ध बांधव येशूच्या नम्रतेचं अनुकरण करू शकतात (परिच्छेद ६ पाहा)

६, ७. (क) प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीमध्ये आणखी कोणते गुण आपल्याला पाहायला मिळतात? (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?

एका प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीमध्ये दिसून येणाऱ्या बऱ्याच गुणांपैकी प्रेम हा एक गुण आहे. (गलती. ५:२२, २३) पण यासोबतच सौम्यता, आत्मसंयम आणि सहनशीलता यांसारखे गुणदेखील अशा व्यक्तीमध्ये दिसून येतात. कठीण परिस्थितीत असताना एका व्यक्तीचा स्वतःवरचा ताबा सुटू शकतो आणि निराश होऊन ती आपला विश्वासही गमावू शकते. पण या गुणांमुळे अशा कठीण परिस्थितीतही टिकून राहण्यास त्या व्यक्तीला मदत होते. शिवाय योग्य आणि अयोग्य गोष्टींमध्ये फरक करण्यास मदत करतील, अशी बायबल तत्त्वं शोधण्याचा प्रयत्नदेखील ती आपल्या व्यक्तिगत बायबल अभ्यासामध्ये करते. आणि आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करून योग्य तो निर्णय घेण्याचा ती प्रयत्न करते. अशा प्रकारची व्यक्ती स्वभावानं नम्र असल्यानं, यहोवा पुरवत असलेलं मार्गदर्शन आणि त्याचे स्तर, हे आपल्या स्वतःच्या स्तरांपेक्षा चांगले आहेत असा पक्का विश्वास ती बाळगते. * तसंच मंडळीतील ऐक्य कायम टिकून राहावं यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी आणि राज्याचा प्रचार आवेशानं करण्यासाठी ही व्यक्ती तयार असते.

त्यामुळे यहोवाच्या सेवेत आपण कितीही काळ घालवला, तरी आपल्यातील प्रत्येकानं स्वतःला असं विचारलं पाहिजे: ‘येशूचं आणखी जवळून अनुकरण करण्यासाठी मला स्वतःमध्ये कोणते बदल करण्याची गरज आहे? आणि मी स्वतःमध्ये कशा प्रकारे काही सुधारणा करू शकतो?’

प्रौढांसाठी असणारं जड अन्न

८. येशूला नियमशास्त्राची कितपत समज होती?

येशूला शास्त्रवचनांची चांगली समज होती. अगदी १२ वर्षांचा असतानाही त्यानं मंदिरातील शिक्षकांसोबत बोलताना नियमशास्त्रातील उताऱ्यांचा संदर्भ घेतला. त्याची ही गोष्ट पाहून, त्याचं बोलणं ऐकणारे “सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले” असं बायबल सांगते. (लूक २:४६, ४७) नंतर सुवार्तेचा प्रचार करतानाही, त्याच्या विरोधकांना निरुत्तर करण्यासाठी त्यानं देवाच्या वचनाचा वापर अगदी चतुरपणे केला.—मत्त. २२:४१-४६.

९. (क) बायबल अभ्यासाविषयी एका प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा केली जाते? (ख) बायबलचा अभ्यास करणं महत्त्वाचं का आहे?

ख्रिस्ती प्रौढता प्राप्त करण्याची इच्छा असणारी व्यक्ती केवळ बायबलच्या मूलभूत ज्ञानावर समाधान मानत नाही. तर येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करून, बायबलचं सखोल ज्ञान घेण्याचा होताहोईल तितका प्रयत्न ती करते. देवाच्या वचनात “प्रौढांसाठी जड अन्न” आहे याची जाणीव असल्यामुळे, शास्त्रवचनांतील गहन सत्यावर नियमितपणे संशोधन करण्याचा ती प्रयत्न करते. (इब्री ५:१४) प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीला देवाच्या वचनातील ‘परिपूर्ण ज्ञान’ प्राप्त करण्याची इच्छा असते. (इफिस. ४:१३) त्यामुळे, ‘मी दररोज बायबलचं वाचन करतो का? नियमितपणे व्यक्तिगत अभ्यास करण्याची मला सवय आहे का? माझ्या घरात दर आठवडी न चुकता कौटुंबिक उपासना होते का?’ असे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. शिवाय जेव्हा तुम्ही बायबलचा अभ्यास कराल, तेव्हा अशी तत्त्वं शोधण्याचा प्रयत्न करा ज्यांवरून यहोवाची विचारसरणी आणि त्याच्या भावना समजून घेण्यास तुम्हाला मदत होईल. आणि मग निर्णय घेताना याच तत्त्वांना लागू करण्याचा प्रयत्न करा. यामुळे यहोवाच्या आणखी जवळ जाण्यास तुम्हाला मदत होईल.

१०. प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीचा देवाच्या वचनातील तत्त्वांविषयी आणि सूचनांविषयी कसा दृष्टिकोन असतो?

१० पण प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीनं केवळ बायबलचं ज्ञान घेणंच पुरेसं नाही. कारण देवाच्या वचनातील तत्त्वं आणि सूचना माहीत असण्यासोबतच, त्यांवर तिचं प्रेम असणंदेखील महत्त्वाचं आहे. स्वतःच्या इच्छेपेक्षा यहोवाच्या इच्छेनुसार जगण्याद्वारे आणि स्वतःच्या जीवनात, विचारसरणीत एवढंच नव्हे तर कृतीतही योग्य ते बदल करण्याद्वारे एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती हे प्रेम व्यक्त करत असते. उदाहरणार्थ, येशूचं अनुकरण करून, ती स्वतःमध्ये “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता यांनी युक्त” असं नवीन व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचा प्रयत्न करते. (इफिसकर ४:२२-२४ वाचा.) हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे की देवानं बायबल लेखकांना मार्गदर्शन देण्याकरता त्याच्या पवित्र आत्म्याचा वापर केला. त्यामुळे जेव्हा एक व्यक्ती बायबलचा अभ्यास करते, तेव्हा देवाचा पवित्र आत्मा तिला आपलं ज्ञान वाढवण्यास, प्रेम विकसित करण्यास आणि देवासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट करण्यास मदत करतो.

ऐक्याला बढावा देण्याची वृत्ती

११. पृथ्वीवर असताना कोणती गोष्ट येशूला माहीत होती?

११ येशू एक परिपूर्ण व्यक्ती होता. पण पृथ्वीवर असताना त्याच्या अवतीभोवती असणारे सर्व लोक, जसं की त्याचे पालक, त्याचे भाऊ-बहिणी हे सर्वच अपरिपूर्ण होते. येशूच्या सर्वात जवळच्या अनुयायांनीही गर्विष्ठ आणि स्वार्थी मनोवृत्ती दाखवली. उदाहरणार्थ, त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याच्या शिष्यांमध्ये सर्वात मोठा कोण, याविषयी वाद झाला होता. (लूक २२:२४) पण त्यांच्यात अशी अपरिपूर्ण मनोवृत्ती असूनही, ते लवकरच एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनतील आणि पुढे जाऊन त्यांची एक संघटित मंडळी तयार होईल ही गोष्ट येशूला माहीत होती. म्हणून त्याच रात्री येशूनं त्यांच्यातील ऐक्यासाठी प्रार्थना केली. त्यानं आपल्या स्वर्गीय पित्याला अशी विनंती केली: “हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे.”—योहा. १७:२१, २२.

१२, १३. (क) आपण कोणतं ध्येय ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे? (ख) मंडळीतील एकता टिकवून ठेवण्यासाठी एका बांधवानं काय केलं?

१२ एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती मंडळीत नेहमी एकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. (इफिसकर ४:१-६, १५, १६ वाचा.) ख्रिस्ती या नात्यानं, सर्वांनी मिळून ऐक्यानं काम करणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. पण यासाठी नम्रता फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आध्यात्मिक रीत्या प्रौढ असणाऱ्या व्यक्तीला जरी इतरांच्या अपरिपूर्णतेला तोंड द्यावं लागत असलं, तरी मंडळीचं ऐक्य कायम राखण्यासाठी ती भरपूर परिश्रम घेण्याचा प्रयत्न करते. म्हणून तुम्ही स्वतःला असं विचारू शकता: ‘मंडळीतील एखाद्या बांधवाच्या किंवा बहिणीच्या हातून चूक झाल्यास माझी प्रतिक्रिया काय असते? जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याशी अविचारीपणे वागते, तेव्हा मला कसं वाटतं? मी लगेच त्या व्यक्तीशी बोलायचं टाळतो का, की आपलं नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा मी प्रयत्न करतो?’ एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती स्वतःच एक समस्या बनण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करते.

१३ या बाबतीत युवे नावाच्या एका बांधवाचं उदाहरण घेता येईल. पूर्वी हा बांधव इतर बंधुभगिनींच्या कमतरतांमुळे लगेच निराश व्हायचा. मग त्यानं बायबल आणि इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स या पुस्तकातून दाविदाच्या जीवनावर थोडा अभ्यास करण्याचं ठरवलं. पण दाविदाच्या जीवनावरच का? कारण दाविदालाही देवाच्या काही सेवकांमुळे समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. उदाहरणार्थ, शौल राजानं दाविदाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. काही लोकांनी त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न केला. आणि एकदा तर त्याच्या स्वतःच्या पत्नीनंही त्याची थट्टा केली. (१ शमु. १९:९-११; ३०:१-६; २ शमु. ६:१४-२२) पण इतरांनी त्याला चुकीची वागणूक दिल्यानंतरही यहोवावरील त्याचं प्रेम आणि भरवसा कमी झाला नाही. तसंच, त्यानं इतरांवर दयाही दाखवली. आपल्यालाही असंच करावं लागेल हे युवेनं ओळखलं. त्यानं केलेल्या संशोधनामुळे, बांधवांच्या कमतरतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल हे युवेला समजलं. आणि बांधवांनी केलेल्या चुका लक्षात न ठेवता मंडळीतील ऐक्याला बढावा देत राहण्याचं त्यानं ठरवलं. तुमचंही असंच ध्येय आहे का?

देवाच्या इच्छेनुसार जगणारे मित्र

१४. येशूनं कशा प्रकारे आपल्या मित्रांची निवड केली?

१४ येशू सगळ्यांशी अगदी मनमिळाऊपणे वागायचा. स्त्री-पुरुषांना, तरुण-वृद्धांना आणि अगदी लहान मुलांनाही त्याच्याकडे येताना संकोच वाटत नव्हता. पण मित्र निवडताना मात्र येशूनं खूप सावधगिरी बाळगली. त्यानं आपल्या प्रेषितांना म्हटलं: “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.” (योहा. १५:१४) ज्यांनी एकनिष्ठपणे येशूला साथ दिली आणि यहोवावर प्रेम करून त्याची सेवा केली, त्यांनाच येशूनं आपले खास मित्र म्हणून निवडलं. मग तुम्हीसुद्धा यहोवावर पूर्ण अंतःकरणानं प्रेम करणाऱ्यांनाच आपले खास मित्र म्हणून निवडता का? आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे?

१५. प्रौढ ख्रिस्ती व्यक्तींसोबत मैत्री केल्यानं तरुणांना कसा फायदा होतो?

१५ बहुतेक फळं सूर्यप्रकाशात जास्त चांगली पिकतात. त्याचप्रमाणे आपल्या बंधुभगिनींचं उबदार प्रेम तुम्हाला एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनण्यास मदत करेल. आपल्या जीवनात आपण कोणतं ध्येय ठेवायचं, याविषयी विचार करणारी तुम्ही एक तरुण व्यक्ती असाल तर काळजीपूर्वक मित्र निवडा. बऱ्याच काळापासून जे यहोवाची सेवा करत आहेत आणि मंडळीच्या ऐक्याला हातभार लावत आहेत अशा लोकांशीच मैत्री करा. यहोवाची सेवा करताना त्यांनी अनेक समस्यांना आणि आव्हानांना तोंड दिलं असेल. त्यामुळे जीवनाचा उत्तम मार्ग निवडण्यासाठी ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. शिवाय त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे, आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठीही ते तुम्हाला मदत करतील.—इब्री लोकांस ५:१४ वाचा.

१६. मंडळीतील प्रौढ व्यक्तींमुळे एका बहिणीला तिच्या तरुणपणात कसा फायदा झाला?

१६ हेल्गा नावाची एक बहीण आठवून सांगते, की शाळेच्या शेवटल्या वर्षी, तिचे बरेच वर्गसोबती करिअरविषयी बोलत होते. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना चांगलं करिअर करण्यासाठी युनिव्हर्सिटीत जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. पण हेल्गानं आपल्या मंडळीतील काही प्रौढ ख्रिस्ती बंधुभगिनींना याविषयी विचारलं. ती म्हणते: “त्यांच्यापैकी बरेच जण वयानं माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे मला त्यांची खूप मदत झाली. त्यांनी मला पूर्णवेळच्या सेवेसाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर, मी पाच वर्षं पायनियर म्हणून सेवा केली. आता, बऱ्याच वर्षांनंतरही मला या गोष्टीचं खूप समाधान वाटतं, की मी माझ्या तरुणपणात यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित केलं. आणि त्याबद्दल आता मला तिळमात्रही पस्तावा होत नाही.”

१७, १८. यहोवाची सेवा आपण आणखी चांगल्या प्रकारे कशी करू शकतो?

१७ येशूच्या उदाहरणाचं अनुकरण केल्यामुळे आपल्याला एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनण्यास मदत होते. यामुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ जाऊ, आणि त्याची सेवा करण्याचा आपला निर्धारही आणखी पक्का होईल. एक व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक रीत्या प्रौढ बनते, तेव्हाच ती यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करू शकते. येशूनं त्याच्या शिष्यांना म्हटलं: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.”—मत्त. ५:१६.

१८ एका प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीचा मंडळीला किती फायदा होऊ शकतो, हे आपण पाहिलं. शिवाय एक व्यक्ती निर्णय घेण्यासाठी आपल्या विवेकाचा वापर कसा करते, यावरूनही तिची ख्रिस्ती प्रौढता दिसून येते. मग योग्य निर्णय घेण्यासाठी आपण आपल्या विवेकाचा वापर कसा करू शकतो? आणि इतरांच्या आवडी-निवडीचा आदर करणं आपल्याला कसं शक्य होईल? या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील लेखात पाहू या.

^ परि. 6 उदाहरणार्थ, वृद्ध आणि अनुभवी बांधवांना आपली जबाबदारी दुसऱ्यांना सोपवण्यास आणि ज्या तरुण बांधवांना ती सोपवण्यात आली आहे, त्यांना मदत करण्यास सांगितलं जाऊ शकतं.