व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या लहान मुलांना शिकवा

यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या लहान मुलांना शिकवा

“जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठवला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे.”—शास्ते १३:८.

गीत क्रमांक: ४,

१. आपण वडील होणार असं समजल्यावर मानोहानं काय केलं?

मानोहाच्या पत्नीला बऱ्याच वर्षांपासून मूल होत नव्हतं. त्यामुळे आता आपल्याला मूल होणार नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. पण अचानक एके दिवशी यहोवाच्या देवदूतानं तिला येऊन सांगितलं की तिला एक मुलगा होणार आहे. हे ऐकून तिला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. ही बातमी तिनं मानोहाला सांगितल्यावर तोदेखील खूप आनंदित झाला. पण या आनंदासोबतच त्याला माहीत होतं की आता त्याच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे. आणि यहोवा त्याच्याकडून एक वडील या नात्यानं काय अपेक्षा करतो यावर तो गंभीरतेनं विचार करू लागला. त्या काळात इस्राएलमधील बरेच लोक वाईट गोष्टी करत होते. अशा वातावरणात त्याला आपल्या मुलाला यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला शिकवायचं होतं. हे तो कसं करू शकणार होता? त्यानं यहोवाला कळकळून विनंती केली, “हे प्रभू, जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठवला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे असे कर.”—शास्ते १३:१-८.

२. मुलांना शिकवण्यात काय समाविष्ट आहे, आणि त्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? (“ तुमचे सर्वात महत्त्वाचे बायबल विद्यार्थी” ही चौकट पाहा.)

तुम्हाला मुलं असतील तर मानोहाच्या भावना तुम्ही समजू शकता. तुमच्या मुलांना यहोवाबद्दल सांगण्याची आणि त्याच्यावर प्रेम करायला शिकवण्याची जबाबदारी तुमच्यावरही आहे. (नीति. १:८) कौटुंबिक उपासनेदरम्यान तुम्ही त्यांना यहोवाबद्दल आणि बायबलबद्दल शिकण्यासाठी मदत करू शकता. पण दर आठवडी बायबलचा अभ्यास करणंच पुरेसं नाही. (अनुवाद ६:६-९ वाचा.) तुमच्या मुलांनी यहोवावर प्रेम करावं आणि त्याची सेवा करावी यासाठी आणखी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते? येशूचं उदाहरण तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतं. हे खरं आहे की येशूला मुलं नव्हती, पण त्यानं ज्या प्रकारे आपल्या शिष्यांना शिकवलं त्यावरून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता. येशूचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं आणि तो नम्र होता. शिवाय, त्यानं समजबुद्धीही दाखवली. म्हणजेच त्यानं आपल्या शिष्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना कशी मदत करायची हेदेखील त्यानं ओळखलं. आपण या बाबतीत येशूचं अनुकरण कसं करू शकतो यावर आता चर्चा करू या.

मुलांवर प्रेम करा

३. येशूचं आपल्यावर प्रेम आहे याची शिष्यांना खात्री का होती?

शिष्यांवर आपलं प्रेम असल्याचं येशूनं अनेक वेळा बोलून दाखवलं. (योहान १५:९ वाचा.) त्यानं आपल्या शिष्यांसोबत बराच वेळदेखील घालवला. (मार्क ६:३१, ३२; योहा. २:२; २१:१२, १३) येशू फक्त त्यांचा शिक्षकच नव्हता, तर तो त्यांचा मित्रदेखील होता. त्यामुळे शिष्यांना या गोष्टीची पूर्ण खात्री होती की येशूचं त्यांच्यावर प्रेम आहे. तर मग, आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

४. तुमचं मुलांवर प्रेम आहे याची जाणीव तुम्ही त्यांना कशी करून देऊ शकता? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

तुमचं मुलांवर प्रेम आहे हे त्यांना बोलून दाखवा आणि तुमच्यासाठी ते किती मोलाचे आहेत याची जाणीव त्यांना करून द्या. (नीति. ४:३; तीत २:४) ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा सॅम्युएल सांगतो, की तो लहान असताना त्याचे बाबा त्याला दररोज संध्याकाळी बायबल कथांचं माझं पुस्तक यातून गोष्टी वाचून दाखवायचे. तो त्यांना जे काही प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर ते द्यायचे. ते त्याला जवळ घ्यायचे, त्याला मिठी मारायचे आणि त्याचा खूप लाड करायचे. ते त्याला रात्री झोपवायचेसुद्धा. तो म्हणतो: “मोठं झाल्यावर जेव्हा मला कळलं की माझ्या आजीआजोबांनी बाबांच्या बाबतीत असं केलं नाही, तेव्हा मला याचं खूप आश्चर्य वाटलं. जरी बाबांचं संगोपन अशा वातावरणात झालं नसलं, तरी माझ्यावरचं त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. असं केल्यामुळे माझं त्यांच्यासोबतचं नातं खूप जवळचं झालं आणि मला याचं खूप समाधान वाटतं.” तुम्हीदेखील मुलांवर प्रेम असल्याचं त्यांना वारंवार बोलून दाखवाल, तर त्यांनाही सॅम्युएलसारखंच वाटणार नाही का? तेव्हा त्यांना जवळ घ्या, त्यांचा लाड करा, त्यांच्यासोबत बोला, त्यांच्यासोबत खेळा आणि त्यांना फिरायला घेऊन जा.

५, ६. (क) येशूचं शिष्यांवर प्रेम असल्यामुळे त्यानं काय केलं? (ख) मुलांना शिस्त कशी लावली पाहिजे?

येशूनं म्हटलं: “जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो.” * (प्रकटी. ३:१९) उदाहरणार्थ, आपल्यापैकी कोण मोठा आहे यावर येशूच्या शिष्यांमध्ये बऱ्याच वेळा वाद व्हायचा. येशूनं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट त्यानं धीरानं अनेक वेळा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं हे नेहमी दयाळूपणे केलं आणि त्यांना समज देण्यासाठी योग्य वेळ व ठिकाण निवडलं.—मार्क ९:३३-३७.

खरंतर, मुलांवर प्रेम असल्यामुळेच तुम्ही त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असता. असं करताना काही वेळा, एखादी गोष्ट चुकीची का आहे किंवा बरोबर का आहे, हे सांगणंच पुरेसं असतं. पण तरीही मुलांनी ऐकलं नाही तर काय? (नीति. २२:१५) अशा वेळी येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करा. धीर दाखवून मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. त्यांचं मार्गदर्शन करा, त्यांना प्रशिक्षण द्या आणि त्यांची चूक सुधारा. त्यांना शिस्त लावण्यासाठी योग्य वेळ आणि ठिकाण निवडा. आणि असं करत असताना त्यांच्याशी प्रेमानं वागा. दक्षिण आफ्रिकामध्ये राहणाऱ्या इलेन नावाच्या बहिणीला तिच्या आईवडिलांनी कशी शिस्त लावली याबद्दल ती सांगते. तिचे आईवडील तिच्याकडून काय अपेक्षा करायचे याबद्दल ते नेहमी तिला सांगायचे. आणि एखादी गोष्ट तिनं ऐकली नाही तर तिला शिक्षा मिळेल, असं जर तिच्या आईवडिलांनी तिला सांगितलं तर ते तसं करायचेसुद्धा. पण ती म्हणते: “त्यांनी मला कधीच रागाच्या भरात किंवा कारण न सांगता, शिक्षा केली नाही.” असं केल्यामुळे तिला नेहमी या गोष्टीची जाणीव व्हायची की तिच्या आईवडिलांचं तिच्यावर खूप प्रेम आहे.

नम्रता दाखवा

७, ८. (क) येशूच्या प्रार्थनांवरून त्याचे शिष्य कोणती गोष्ट शिकले? (ख) यहोवावर विसंबून राहण्यासाठी तुमची प्रार्थना मुलांना कशी मदत करू शकते?

येशूला ठार मारण्यात येणार होतं, तेव्हा त्यानं आपल्या पित्याला कळकळीची प्रार्थना केली. तो म्हणाला: “अब्बा, बापा, तुला सर्व काही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” * (मार्क १४:३६) येशूच्या शिष्यांनी ही प्रार्थना प्रत्यक्ष ऐकली असेल किंवा त्याबद्दल नंतर ऐकलं असेल, तेव्हा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला असेल? परिपूर्ण असूनसुद्धा येशूनं आपल्या पित्याला मदत मागितली, या गोष्टीची त्यांना जाणीव झाली असेल. यामुळे आपण नम्र असलं पाहिजे आणि मदतीसाठी नेहमी यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे हे ते शिकले.

तुमच्या प्रार्थना ऐकून तुमची मुलं बरंच काही शिकू शकतात. हे खरं आहे की मुलांना शिकवण्यासाठी आपण प्रार्थना करत नाही. पण ते जेव्हा तुमच्या प्रार्थना ऐकतात, तेव्हा यहोवावर विसंबून राहणं किती गरजेचं आहे हे त्यांना शिकायला मिळतं. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा यहोवानं फक्त मुलांनाच नाही तर तुम्हालादेखील मदत करावी अशी विनंती करा. ब्राझीलमध्ये राहणारी अॅना म्हणते: “आमच्या कुटुंबावर समस्या यायच्या, तेव्हा आईबाबा नेहमी यहोवाला प्रार्थना करायचे आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत मागायचे. जेव्हा माझे आजीआजोबा आजारी होते तेव्हा त्यांनी हेच केलं. योग्य निर्णय घेता यावेत म्हणून त्यांनी यहोवाला समजबुद्धी मागितली. अगदी कठीण प्रसंगातही ते पूर्णपणे यहोवावर विसंबून राहिले. यामुळे मीही यहोवावर विसंबून राहायला शिकले.” शेजाऱ्यांना प्रचार करण्यासाठी आणि अधिवेशनाकरता सुट्टी मागण्यासाठी धैर्य मिळावं म्हणून तुम्ही यहोवाला प्रार्थना कराल, तेव्हा हे ऐकून तुमच्या मुलांना याची जाणीव होईल की तुम्ही प्रत्येक प्रसंगात यहोवाला मदत मागता. याचा परिणाम असा होईल की तेही प्रत्येक प्रसंगात यहोवावर विसंबून राहायचं शिकतील.

९. (क) येशूनं आपल्या शिष्यांना नम्रता आणि निःस्वार्थ वृत्ती दाखवण्यासाठी कशी मदत केली? (ख) तुम्ही नम्रता आणि निःस्वार्थ वृत्ती दाखवल्यास मुलांवर याचा काय परिणाम होईल?

येशूनं आपल्या शिष्यांना नम्र असण्यास आणि निःस्वार्थ वृत्ती दाखवण्यास सांगितलं. आणि त्यानं स्वतः या बाबतीत उत्तम उदाहरण मांडलं. (लूक २२:२७ वाचा.) यहोवाची सेवा करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी येशूनं जे त्याग केले, ते त्याच्या शिष्यांनी पाहिले. यामुळे त्यांनादेखील असंच करण्याचं शिकायला मिळालं. तुम्हीदेखील तुमच्या चांगल्या उदाहरणाद्वारे मुलांना शिकवू शकता. दोन मुलांची आई असलेली डेबी म्हणते: “माझे पती मंडळीत वडील या नात्यानं इतरांना मदत करण्यासाठी जो वेळ देतात, त्याबद्दल मला कधीच हेवा वाटला नाही. कारण जेव्हाही कुटुंबाला त्यांची गरज असायची तेव्हा ते नेहमी आम्हाला वेळ द्यायचे.” (१ तीम. ३:४, ५) डेबी आणि तिचे पती प्रणास यांच्या चांगल्या उदाहरणामुळे त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला? प्रणास म्हणतात की त्यांची मुलं संमेलनात कोणतंही काम करण्यासाठी नेहमी उत्सुक असायची. मुलं आनंदी होती आणि त्यांना चांगले मित्र मिळाले. शिवाय, आपल्या बंधुभगिनींसोबत वेळ घालवायला त्यांना आवडायचं. आज त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य पूर्णवेळची सेवा करत आहेत. तुम्ही जर स्वतः नम्रता आणि निःस्वार्थ वृत्ती दाखवली, तर तुमची मुलंदेखील इतरांना मदत करायला शिकतील.

समजबुद्धी दाखवा

१०. गालीलमधील काही लोक येशूला शोधत आले तेव्हा येशूनं समजबुद्धीचा उपयोग कसा केला?

१० येशू परिपूर्ण असल्यामुळे तो प्रत्येक प्रसंगी समजबुद्धी दाखवू शकला. लोक काय करत आहेत फक्त यावरच त्यानं लक्ष केंद्रित केलं नाही, तर त्यामागचं कारण काय आहे हेदेखील त्यानं समजून घेतलं. तो इतरांच्या मनात काय आहे हे ओळखू शकत होता. जसं की, एकदा गालील प्रांतातील काही लोक त्याला शोधत-शोधत आले. (योहा. ६:२२-२४) पण त्याला शोधण्याचं मुख्य कारण त्याच्याकडून शिकून घेणं नव्हतं तर अन्न मिळवणं होतं हे येशूनं ओळखलं. (योहा. २:२५) त्यांच्या मनात काय आहे हे येशू समजू शकला आणि मग त्यानं त्यांचा चुकीचा दृष्टिकोन प्रेमळपणे सुधारला. तसंच, त्यांनी काय बदल करण्याची गरज आहे हेदेखील त्यानं सांगितलं.—योहान ६:२५-२७ वाचा.

मुलांना प्रचारकार्यात आनंद मिळावा म्हणून त्यांना मदत करा (परिच्छेद ११ पाहा)

११. (क) मुलांना प्रचारकार्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कसा करू शकता? (ख) मुलांना प्रचारकार्यात आनंद मिळावा म्हणून तुम्ही काय करू शकता?

११ इतरांच्या मनात काय आहे हे तर आपण ओळखू शकत नाही. पण आपणसुद्धा समजबुद्धी दाखवू शकतो. ती कशी? उदाहरणार्थ, तुमच्या मुलांना प्रचारकार्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतःला विचारा: ‘माझ्या मुलांना खरंच प्रचारकार्य आवडतं का, की प्रचारानंतर खाण्यापिण्यासाठी आम्ही बाहेर जातो तेच त्यांना आवडतं?’ तुम्हाला जर जाणवलं की तुमच्या मुलांना प्रचारकार्य करायला जास्त आवडत नाही, तर त्यात त्यांना आनंद मिळेल असं काही करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांच्यावर छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या सोपवू शकता. यामुळे त्यांनाही सहभाग घेतल्यासारखं वाटेल.

१२. (क) येशूनं आपल्या शिष्यांना कोणता इशारा दिला? (ख) शिष्यांना हा इशारा देण्याची गरज का होती?

१२ येशूनं आणखी कशा प्रकारे समजबुद्धीचा वापर केला? त्याला माहीत होतं की एका छोट्या चुकीमुळे दुसरी चुकदेखील होऊ शकते आणि यामुळे कालांतरानं एखाद्याच्या हातून गंभीर पापदेखील घडू शकतं. यामुळे त्यानं आपल्या शिष्यांना इशारा दिला. उदाहरणार्थ, शिष्यांना माहीत होतं की अनैतिक लैंगिक वर्तन चुकीचं आहे. पण येशूनं त्यांना अशा गोष्टीबद्दल ताकीद दिली ज्यामुळे त्यांच्या हातून ही मोठी चूक होऊ शकते. त्यानं म्हटलं: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे.” (मत्त. ५:२७-२९) येशूच्या काळातील रोमी लोकांना अश्‍लील दृश्ये आणि घाणेरडी भाषा असलेली नाटकं पाहायला आवडायची. आणि येशूचे शिष्य अशा वातावरणात राहत असल्यामुळे त्यानं हा प्रेमळ इशारा त्यांना दिला होता. कारण देवाच्या नजरेत योग्य ते करण्यासाठी शिष्यांनी अशा चुकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे येशूला माहीत होतं.

१३, १४. अश्‍लील मनोरंजनापासून दूर राहण्यासाठी तुम्ही मुलांना कशी मदत करू शकता?

१३ यहोवाला दुःख होईल अशी गोष्ट करण्यापासून तुमच्या मुलांना वाचवण्यासाठी तुम्ही समजबुद्धीचा उपयोग करू शकता. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथं लहान मुलांसमोरसुद्धा अश्‍लील चित्रं आणि व्हिडिओ पाहण्याचा धोका आहे. अशा गोष्टी पाहणं चुकीचं आहे हे पालक या नात्यानं तुम्ही नक्कीच त्यांना सांगाल. पण त्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही आणखी काही गोष्टी करू शकता. स्वतःला विचारा: ‘पोर्नोग्राफी किंवा अश्‍लील चित्रं पाहणं इतकं हानीकारक का आहे हे माझ्या मुलांना माहीत आहे का? असे घाणेरडे चित्रं पाहण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे ती प्रवृत्त होऊ शकतात? माझं त्यांच्यासोबतचं नातं इतकं जवळचं आहे का, की ती कोणत्याही गोष्टीविषयी माझ्याशी मनमोकळेपणे बोलू शकतात? त्यांना जर पोर्नोग्राफी पाहण्याचा मोह झाला, तर ती स्वतःहून माझ्याकडे मदत मागतील का?’ मुलं लहान असली तरी तुम्ही त्यांना म्हणू शकता की, “इंटरनेट वापरताना तुला जर एखादं घाणेरडं दृश्य दिसलं तर ते काय आहे हे पाहत बसू नको. तर त्याबद्दल मला नक्की सांग, लाजू नको आणि ते सांगायला घाबरूही नको. तुझ्या मित्रांशी तू कसं बोलतोस अगदी तसंच माझ्याशी बोलत जा. मला तुला मदत करायची आहे.”

१४ शिवाय, तुम्ही जेव्हा स्वतःसाठी मनोरंजन निवडता तेव्हा तुम्ही मुलांसाठी चांगलं उदाहरण मांडत आहात का, याचा काळजीपूर्वक विचार करा. वर उल्लेख केलेले प्रणास म्हणतात: “तुम्ही बऱ्याच गोष्टींबद्दल मुलांना खूप काही सांगू शकता. पण तुम्ही जे करता ते मुलं पाहतात आणि मग तसंच वागतात.” तुम्ही जर संगीत, पुस्तकं आणि चित्रपट यांसंबंधी योग्य निवड केली, तर मुलांनाही तसं करण्याचं शिकवणं तुम्हाला सोपं जाईल.—रोम. २:२१-२४.

यहोवा तुम्हाला मदत करेल

१५, १६. (क) मुलांना शिकवण्यासाठी यहोवा तुम्हाला मदत करेल याची खात्री तुम्ही का बाळगू शकता? (ख) पुढच्या लेखात आपण काय शिकणार आहोत?

१५ चांगला पिता बनण्यासाठी मानोहानं यहोवाला मदत मागितली तेव्हा काय झालं? बायबल सांगते: “देवाने मानोहाचे म्हणणे ऐकले.” (शास्ते १३:९) पालकांनो यहोवा तुमच्याही प्रार्थना ऐकेल. मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. आणि मुलांप्रती तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, नम्र बनण्यासाठी आणि समजबुद्धी दाखवण्यासाठी तो नक्की तुम्हाला साहाय्य करेल.

१६ लहान मुलांसोबतच तरुणांना शिकवण्यासाठीही यहोवा तुम्हाला मदत करू शकतो. प्रेम, नम्रता आणि समजबुद्धी दाखवण्याच्या बाबतीत येशूचं अनुकरण करून तुम्ही तरुणांना यहोवाची सेवा करण्यासाठी कशी मदत करू शकता, हे आपण पुढच्या लेखात शिकू या.

^ परि. 5 मूळ भाषेत “शिक्षा” यासाठी जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ शिस्त लावणं असा होतो. बायबलनुसार शिस्त लावण्यात प्रेमळ मार्गदर्शन, प्रशिक्षण, सुधारणूक आणि काही वेळा शिक्षा देणंदेखील समाविष्ट आहे. पण पालकांनी या सर्व गोष्टी रागाच्या भरात कधीच करू नयेत.

^ परि. 7 येशूच्या काळात लहान मुलं त्यांच्या वडिलांना अब्बा म्हणायचे. या शब्दात आदर आणि आपुलकी या दोन्ही गोष्टी सामील होत्या.—दि इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडीया.