व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचं ‘अवर्णनीय दान’ तुम्हाला प्रवृत्त करो!

देवाचं ‘अवर्णनीय दान’ तुम्हाला प्रवृत्त करो!

“देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो.”—२ करिंथ. ९:१५.

गीत क्रमांक: ५३, १८

१, २. (क) देवाच्या ‘अवर्णनीय दानात’ कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत?

यहोवानं आपल्या प्रिय पुत्राला, येशूला पृथ्वीवर पाठवण्याद्वारे त्याच्या प्रेमाची अप्रतिम भेट आपल्याला दिली आहे. (योहा. ३:१६; १ योहा. ४:९, १०) प्रेषित पौलानं याला, देवाकडून मिळालेलं ‘अवर्णनीय दान’ असं म्हटलं. (२ करिंथ. ९:१५) पौलानं असे शब्द का वापरले?

पौलाला हे माहीत होतं, की येशूच्या खंडणी बलिदानामुळे देवाची सर्व अभिवचनं पूर्ण होतील, याची पक्की खात्री आपल्याला मिळते. (२ करिंथकर १:२० वाचा.) म्हणजेच देवाच्या या ‘अवर्णनीय दानात’ येशूच्या खंडणी बलिदानासोबतच, यहोवा आपल्याला जो चांगुलपणा आणि एकनिष्ठ प्रेम दाखवतो त्यांचाही समावेश होतो. तेव्हा, ही एक अशी मौल्यवान भेट आहे जिचं शब्दात वर्णन करणं मानवाला शक्य नाही. मग या अत्यंत विशेष अशा दानाबद्दल आपल्या भावना काय असल्या पाहिजेत? शिवाय बुधवार, दिनांक २३ मार्च, २०१६ रोजी येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याची तयारी करत असताना, या दानामुळे आपण काय करण्यास प्रवृत्त झालं पाहिजे?

देवाकडून मिळालेली एक मौल्यवान भेट

३, ४. (क) एखादी भेटवस्तू मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटतं? (ख) एखाद्या खास भेटीमुळे तुमच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो?

जेव्हा आपल्याला एखादी भेटवस्तू मिळते, तेव्हा आपलं मन आनंदानं अगदी भरून जातं. पण काही भेटवस्तू इतक्या खास असतात, की त्यांमुळे आपल्या जीवनाचा अक्षरशः कायापालट होऊ शकतो. उदाहरणार्थ असा विचार करा, की एखाद्या गुन्ह्यामध्ये तुमचा हात असल्यामुळे तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा झाली आहे. आणि अचानक एक अनोळखी व्यक्ती पुढं येऊन ती शिक्षा स्वतः भोगण्यास तयार होते. तुम्हाला जगता यावं म्हणून ती चक्क तुमच्याऐवजी स्वतः मरायला तयार होते! आणि असं करून ती जणू जीवनाची भेटच तुम्हाला देत असते. मग अशा खास भेटीबद्दल तुम्हाला कसं वाटेल?

अशा प्रेमळ आणि खास भेटीमुळे, आपल्या जीवनात बदल करण्यास तुम्ही प्रवृत्त होणार नाही का? साहजिकच, इतरांशी उदारतेनं आणि प्रेमानं वागावं, इतकंच नव्हे तर ज्यांनी तुमचं वाईट केलं आहे त्यांनाही माफ करावं असं तुम्हाला वाटू लागेल. पुढे संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीनं दिलेल्या बलिदानाचं कर्ज तुमच्यावर आहे, याची जाणीव तुम्हाला असेल आणि त्याची कदर असल्याचं तुम्ही दाखवत राहाल.

५. इतर कोणत्याही भेटीपेक्षा यहोवानं दिलेली भेट कैक पटीनं श्रेष्ठ आहे, असं का म्हणता येईल?

या उदाहरणातील व्यक्तीनं दिलेल्या बलिदानापेक्षा यहोवानं दिलेली खंडणीची भेट कैक पटीनं श्रेष्ठ आहे. (१ पेत्र ३:१८) आदामापासून आपल्या सर्वांनाच वारशानं पाप मिळालं आहे, आणि पापाची शिक्षा मरण आहे. (रोम. ५:१२) पण आपल्यावरील प्रेमामुळे प्रवृत्त होऊन यहोवानं आपल्या पुत्राला, येशूला “प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा” म्हणून खाली पृथ्वीवर पाठवलं. (इब्री २:९) यहोवानं केलेल्या या तरतुदीमुळे आपलं सध्याचं जीवन तर शाबूत राहीलच, पण त्यासोबत मृत्यूचं नामोनिशाणही कायमचं मिटवून टाकलं जाईल! (यश. २५:७, ८; १ करिंथ. १५:२२, २६) जे कोणी येशूवर विश्वास ठेवतील त्यांना शांतीनं आणि आनंदानं सदासर्वकाळ जगण्याची संधी मिळेल. यांपैकी काही जण एकतर ख्रिस्तासोबत स्वर्गात सहराजे म्हणून राज्य करतील, तर काही जण देवाच्या राज्याखाली या पृथ्वीवर जीवनाचा आनंद घेतील. (रोम. ६:२३; प्रकटी. ५:९, १०) यहोवानं दिलेल्या या प्रेमळ भेटीमध्ये किंवा दानामध्ये आणखी कोणत्या आशीर्वादांचा समावेश होतो?

६. (क) यहोवाच्या प्रेमळ भेटीमुळे मिळणाऱ्या कोणत्या आशीर्वादांची तुम्ही वाट पाहत आहात? (ख) देवाच्या भेटीमुळे कोणत्या तीन गोष्टी करण्यास आपण प्रवृत्त झालं पाहिजे?

देवाच्या या भेटीचाच एक भाग म्हणून संपूर्ण पृथ्वीचं नंदनवनात रूपांतर केलं जाईल. शिवाय, आजारपण काढून टाकलं जाईल आणि मृत प्रियजनांना पुन्हा उठवलं जाईल. (यश. ३३:२४; ३५:५, ६; योहा. ५:२८, २९) खरंच या ‘अवर्णनीय दानामुळे’ यहोवाबद्दल आणि येशूबद्दल आपल्या मनात किती प्रेम दाटून येतं! पण या भेटीमुळे आपण काय करण्यास प्रवृत्त झालं पाहिजे? यामुळे आपण (१) येशूचं अगदी जवळून अनुकरण करण्यास, (२) आपल्या बांधवांवर प्रेम करण्यास, आणि (३) इतरांना मनापासून माफ करण्यास प्रवृत्त झालं पाहिजे.

“ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते”

७, ८. येशूनं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपल्याला कसं वाटतं, आणि त्यामुळे आपण काय करण्यास प्रवृत्त होतो?

येशूचं जवळून अनुकरण करण्यासाठी त्याचं प्रेम आपल्याला प्रवृत्त करतं. पौलालाही हे माहीत होतं की आपण जर येशूनं दाखवलेलं महान प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर मनापासून प्रेम करण्यास आणि त्याचं अनुकरण करण्यास आपण प्रवृत्त होऊ. म्हणूनच त्यानं म्हटलं: “ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते.” (२ करिंथकर ५:१४, १५ वाचा. [1]) तसंच, यहोवानं आपल्यासाठी जे प्रेम दाखवलं ते जेव्हा आपण पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाही येशूचं अनुकरण करण्यास आपण प्रवृत्त होतो. मग येशूचं अनुकरण आपण कसं करू शकतो?

यहोवावरील आपलं प्रेम येशूच्या पावलांचं अगदी जवळून अनुकरण करण्यास आपल्याला प्रवृत्त करतं. (१ पेत्र २:२१; १ योहा. २:६) आपण जेव्हा देवाची आणि ख्रिस्ताची आज्ञा पाळतो, तेव्हा आपलं त्यांच्यावर खरोखरच प्रेम असल्याचं दिसून येतं. कारण येशूनं म्हटलं: “ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल; मीही त्याच्यावर प्रीती करेन व स्वतः त्याला प्रगट होईन.”—योहा. १४:२१; १ योहा. ५:३.

९. आपल्याला कोणत्या दबावाचा सामना करावा लागतो?

आपण कशा प्रकारचं जीवन जगत आहोत यावर स्मारकविधीच्या काळात मनन करणं निश्‍चितच फायद्याचं आहे. आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘मी सध्या कोणकोणत्या बाबतीत येशूच्या पावलांचं अनुकरण करत आहे? मला कोणत्या बाबतीत अजून सुधारणा करण्याची गरज आहे?’ जगाच्या चालीप्रमाणे चालण्याकरता आपल्यावर सतत दबाव येत असल्यामुळे, अशा प्रकारे स्वतःचं परीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. (रोम. १२:२) आज अनेक जण जगाच्या तत्त्वज्ञानाला बढावा देणाऱ्या लोकांना, नामांकित व्यक्तींना, आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या खेळाडूंना आपला आदर्श मानतात आणि त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. आपण याबाबतीत सावध राहिलो नाही, तर कदाचित आपणही अशा प्रसिद्ध लोकांचं अनुकरण करण्याच्या दबावाला बळी पडू. (कलस्सै. २:८; १ योहा. २:१५-१७) मग अशा दबावाचा आपण कशा प्रकारे सामना करू शकतो?

१०. स्मारकविधीच्या काळात आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत, आणि त्यामुळे कोणती गोष्ट करण्यास आपण प्रवृत्त होतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१० आपल्या कपड्यांच्या बाबतीत आपली निवड कशी आहे, आपल्याला कोणत्या प्रकारचं संगीत किंवा चित्रपट आवडतात, आणि आपल्या कंप्युटरवर, मोबाईलवर किंवा टॅबवर आपण कोणत्या गोष्टी साठवल्या आहेत, यांचंही स्मारकविधीच्या काळात परीक्षण करणं चांगली गोष्ट आहे. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘जर येशू इथं असता, तर मी घातलेल्या कपड्यांमुळे मला अवघडल्यासारखं वाटलं असतं का?’ (१ तीमथ्य २:९, १० वाचा.) ‘माझ्या कपड्यांवरून मी येशूचं अनुकरण करत असल्याचं दिसून येतं का? मला आवडणारे चित्रपट येशूलाही पाहायला आवडतील का? मला आवडणारं संगीत येशूलाही ऐकायला आवडेल का? येशूनं जर माझा मोबाईल किंवा टॅब हातात घेतला तर त्यामध्ये त्याला काय-काय पाहायला मिळेल याबद्दल माझी चलबिचल होईल का? एखादा व्हिडिओ गेम मला खेळायला का आवडतो हे येशूला सांगणं मला अवघड वाटेल का?’ ख्रिस्ती व्यक्तीकरता अयोग्य असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा, मग तिची किंमत कितीही असली तरी, तिचा त्याग करण्यास यहोवावर असणाऱ्या आपल्या प्रेमानं आपण प्रवृत्त झालं पाहिजे. (प्रे. कृत्ये १९:१९, २०) आपलं जीवन यहोवाला समर्पित करताना, आपण स्वतःकरता नाही, तर येशूकरता जगण्याचं वचन देतो. म्हणून येशूचं अनुकरण करण्यास अडखळण बनेल अशी कोणतीही गोष्ट स्वतःजवळ बाळगण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे.—मत्त. ५:२९, ३०; फिलिप्पै. ४:८.

११. (क) यहोवावर आणि येशूवर असणाऱ्या प्रेमामुळे प्रचारकार्यात आणखी जास्त करण्यासाठी आपल्याला कशी चालना मिळते? (ख) येशूवरील आपल्या प्रेमामुळे, मंडळीतील इतरांना मदत करण्यास आपण कशा प्रकारे प्रवृत्त होतो?

११ येशूवर असणारं आपलं प्रेम, इतरांना आवेशानं शिकवण्यासाठी आणि प्रचारकार्यात सहभाग घेण्यासाठीसुद्धा आपल्याला प्रवृत्त करतं. (मत्त. २८:१९, २०; लूक ४:४३) स्मारकविधीच्या काळात, साहाय्यक पायनियर या नात्यानं ३० किंवा ५० तास करण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आराखड्यात काही बदल करू शकतो का? किंवा इतरांना तसं करण्यासाठी मदत करू शकतो का? ८४ वर्षांच्या एका बांधवांचं उदाहरण घ्या. त्यांच्या पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता आणि त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे आणि वय झाल्यामुळे आपल्याला पायनियर सेवा करणं शक्य नाही असं त्यांना वाटत होतं. पण मंडळीतील काही पायनियर बंधुभगिनींनी त्यांना मदत करायचं ठरवलं. त्यांनी त्यांच्या जाण्या-येण्याची व्यवस्था केली आणि असं क्षेत्र निवडलं जिथं त्यांना सहजपणे कार्य करता येईल. याचा परिणाम म्हणजे, त्यांना ३० तासांचं आपलं ध्येय साध्य करता आलं. तुम्हीदेखील मार्च आणि एप्रिल महिन्यादरम्यान साहाय्यक पायनियर म्हणून काम करू शकता किंवा एखाद्याला तसं करण्याकरता मदत करू शकता. हे खरं आहे की प्रत्येकालाच पायनियर म्हणून काम करणं शक्य नाही, पण आपण आपला वेळ आणि शक्ती यहोवाच्या सेवेत आणखी जास्त करण्याकरता नक्कीच खर्च करू शकतो. आपण असं केलं तर पौलाप्रमाणे आपल्यालाही येशूच्या प्रेमाची कदर असल्याचं दाखवता येईल. पण यहोवाच्या प्रेमामुळे आणखी काय करण्यास आपण प्रवृत्त होतो?

एकमेकांवर प्रेम करण्यास प्रवृत्त व्हा

१२. देवाचं प्रेम आपल्याला काय करण्यास प्रवृत्त करतं?

१२ दुसरी गोष्ट म्हणजे, देवाच्या प्रेमामुळे आपण आपल्या बांधवांवर प्रेम करण्यास प्रवृत्त झालं पाहिजे. प्रेषित योहानाने लिहिलं: “प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे.” (१ योहा. ४:७-११) तेव्हा, जर आपलं आपल्या बांधवांवर प्रेम नसेल, तर आपल्याला यहोवाच्या प्रेमाची कदर आहे असं म्हणता येणार नाही. (१ योहा. ३:१६) मग एकमेकांवरील आपलं प्रेम आपण कसं दाखवू शकतो?

१३. येशूनं इतरांवर प्रेम असल्याचं कसं दाखवलं?

१३ इतरांना प्रेम कसं दाखवता येईल हे आपण येशूच्या उदाहरणावरून शिकू शकतो. जेव्हा तो पृथ्वीवर होता तेव्हा त्यानं लोकांची, खासकरून नम्र लोकांची मदत केली. त्यानं रोग्यांना, अपंगांना, आंधळ्यांना, बहिऱ्यांना आणि मुक्यांना बरं केलं. (मत्त. ११:४, ५) त्या वेळच्या धर्मपुढाऱ्यांच्या अगदी उलट, देवाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना शिकवायला त्याला आवडायचं. (योहा. ७:४९) अशा नम्र लोकांवर त्याचं प्रेम होतं आणि त्यांची मदत करण्यासाठी त्यानं खूप परिश्रम घेतले.—मत्त. २०:२८

प्रचारकार्यासाठी तुम्ही वृद्ध बंधुभगिनींना मदत करू शकता का? (परिच्छेद १४ पाहा)

१४. मंडळीतील बंधुभगिनींना प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही व्यक्तिगत रीत्या काय करू शकता?

१४ मंडळीतील बंधुभगिनींना, खासकरून वृद्ध बंधुभगिनींना कशी मदत करता येईल याबद्दलही स्मारकविधीच्या काळात तुम्ही विचार करू शकता. अशांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता का? त्यांच्यासाठी जेवण तयार करण्याचा, त्यांच्या घरी जाऊन दररोजच्या कामात मदत करण्याचा, सभेला जाताना त्यांनाही आपल्यासोबत गाडीतून नेण्याचा, किंवा आपल्यासोबत त्यांना प्रचारकार्यात घेऊन जाण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता का? (लूक १४:१२-१४ वाचा.) आपल्या बांधवांना प्रेम दाखवण्यास देवाचं प्रेम तुम्हाला प्रवृत्त करो!

आपल्या बंधुभगिनींशी दयेनं वागा

१५. आदामाची संतती या नात्यानं, आपल्यातील प्रत्येकाला कोणत्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे?

१५ तिसरी गोष्ट म्हणजे, यहोवाच्या प्रेमामुळे आपण आपल्या बंधुभगिनींना क्षमा करण्यास प्रवृत्त झालं पाहिजे. आपण आदामाची संतती असल्यामुळे आपल्या सर्वांना त्याच्याकडून पाप आणि मृत्यू वारशानं मिळाला आहे. त्यामुळे आपल्यातील कोणालाही, “मला खंडणीची गरज नाही,” असं म्हणता येणार नाही. देवाच्या सर्वात विश्वासू सेवकांनाही येशूच्या खंडणीद्वारे यहोवानं दाखवलेल्या दयेची गरज आहे. त्यामुळे आपल्यातील प्रत्येकाचं, खूप मोठं कर्ज माफ करण्यात आलं आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर आपल्याला येशूच्या एका दाखल्यात मिळतं.

१६, १७. (क) येशूनं दिलेल्या दाखल्यातून आपण काय शिकू शकतो? (ख) येशूच्या दाखल्यावर मनन केल्यानंतर, तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१६ येशूनं एक दाखला दिला, ज्यात एक राजा आपल्या एका दासाचं ६,००,००,००० (सहा कोटी) रुपयांचं फार मोठं कर्ज माफ करतो. पण तोच दास, नंतर आपल्या सोबतीच्या एका दासाचं केवळ १०० रुपयांचं कर्ज माफ करत नाही. खरंतर, राजानं दाखवलेल्या दयेनं प्रवृत्त होऊन या दासानंही आपल्या सोबतीच्या दासाला माफ करायला हवं होतं. पण या दासानं इतकं क्षुल्लक कर्जही माफ केलं नाही, हे ऐकल्यावर राजाला या गोष्टीचा खूप राग आला. त्यानं या दासाला म्हटलं: “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते; मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?” (मत्त. १८:२३-३५) या दाखल्यातील राजाप्रमाणेच, यहोवानं आपलं फार मोठं कर्ज माफ केलं आहे. मग यहोवानं दाखवलेल्या प्रेमामुळे आणि दयेमुळे आपण काय करण्यास प्रवृत्त झालं पाहिजे?

१७ स्मारकविधीची तयारी करत असताना, आपण स्वतःला असं विचारलं पाहिजे: ‘माझ्या मनात कोणाविषयी राग आहे का? त्याला माफ करणं मला कठीण जात आहे का?’ जर असं आहे, तर ‘विपुल दया करणाऱ्या’ यहोवाचं अनुकरण करण्याची ही एक खूप चांगली संधी असेल. (नहे. ९:१७; स्तो. ८६:५) यहोवानं केलेल्या अपार दयेची जर आपल्याला खरंच कदर असेल, तर आपणही इतरांना दया दाखवून त्यांना मनापासून माफ करण्याचा प्रयत्न करू. आपण जर आपल्या बांधवांना प्रेम दाखवून क्षमा केली नाही, तर यहोवा आपल्याला प्रेम दाखवेल आणि माफ करेल अशी अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. (मत्त. ६:१४, १५) आपण इतरांना क्षमा केल्यास, त्यांनी आपल्याला दुखवलं होतं, ही वस्तुस्थिती बदलणार नाही, पण त्यामुळे पुढे आनंदी राहायला आपल्याला मदत होईल.

१८. देवाच्या प्रेमामुळे लिलीला कॅरलच्या अपरिपूर्णतेला सहन करणं कसं शक्य झालं?

१८ अपरिपूर्ण असल्यामुळे एकमेकांचं सहन करणं आपल्याला कठीण वाटू शकतं. (इफिसकर ४:३२; कलस्सैकर ३:१३, १४ वाचा.) लिली [2] नावाच्या एका बहिणीनं काय केलं याचा विचार करा. कॅरल नावाच्या एका विधवा बहिणीला ती मदत करायची. तिला जिथं कुठं जायचं असेल, तिथं ती तिला घेऊन जायची. आवश्यक त्या गोष्टी खरेदी करण्यासाठीही ती तिला मदत करायची. आणि इतरही अनेक गोष्टी तिनं तिच्यासाठी केल्या होत्या. इतकं सगळं करूनही, कॅरलचा दृष्टिकोन मात्र नेहमी नकारात्मक असायचा आणि त्यामुळे कधीकधी तिला मदत करणंही अवघड जायचं. पण तरीही लिली मात्र कॅरलच्या चांगल्या गुणांकडे पाहत राहिली आणि कॅरलचा मृत्यू होईपर्यंत तिला मदत करत राहिली. तिला मदत करणं लिलीसाठी सोपी गोष्ट नव्हती. पण तरीही ती म्हणते: “कॅरलचं पुनरुत्थान कधी होईल याची मी वाट पाहत आहे. परिपूर्ण कॅरेल कशी असेल हे मला जाणून घ्यायचं आहे.” खरंच, देवाचं प्रेम आपल्या बंधुभगिनींचं सहन करण्यास आणि मानवी अपरिपूर्णता कायमची निघून जाईल, त्या दिवसाची वाट पाहण्यास कसं प्रवृत्त करतं, हे या उदाहरणातून तुम्हाला स्पष्ट झालंच असेल.

१९. देवाच्या ‘अवर्णनीय दानाचा’ आपल्यावर कसा प्रभाव झाला पाहिजे?

१९ यहोवानं आपल्याला खरंच एक “अवर्णनीय दान” दिलं आहे. या दानाची आपण नेहमी कदर बाळगू या! यहोवा आणि येशूनं आपल्यासाठी जे काही केलं आहे, त्यावर मनन करण्यासाठी स्मारकविधीचा काळ निश्‍चितच उत्तम काळ आहे. आपल्यावरील त्यांचं प्रेम येशूचं जवळून अनुकरण करण्यास, आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करण्यास आणि त्यांना मनापासून माफ करण्यास आपल्याला प्रवृत्त करो.

^ [१] (परिच्छेद ७) २ करिंथकर ५:१४, १५ (ईझी-टू-रीड-व्हर्शन): “कारण ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला आणि म्हणून सर्व मेले. आणि तो सर्वांसाठी मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठीच जगू नये तर जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे.”

^ [२] (परिच्छेद १८) या लेखातील काही नावं बदलण्यात आली आहेत.