व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो

मृत लोक पुन्हा जिवंत होतील!

मृत लोक पुन्हा जिवंत होतील!

आधीच्या एका लेखात उल्लेख केलेल्या गेल तुम्हाला आठवत असतील. त्यांचे पती रॉब यांना गमावल्याच्या दुःखातून त्या कधीच बाहेर पडणार नाही असं त्यांना वाटतं. पण देवाने वचन दिलेल्या नवीन जगात त्यांना पुन्हा बघण्याची त्या वाट पाहत आहे. त्या म्हणतात “बायबलमधली, प्रकटीकरण २१:३, ४ ही माझी आवडती वचनं आहेत.” त्यांत असं म्हटलं आहे: “देव स्वतः ‘त्यांच्याबरोबर राहील.’ तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”

गेल म्हणतात: “या वचनांत सर्वकाही आलं. ज्यांनी आपल्या प्रिय जनांना गमावलं आहे अशा लोकांबद्दल मला फार वाईट वाटतं. कारण ते आपल्या प्रिय जनांना पुन्हा पाहू शकतील या आशेबद्दल त्यांना काहीच माहीत नाही.” गेल आपल्या विश्वासानुसार, स्वेच्छेने जास्तीत जास्त वेळ सर्वांना देवाच्या राज्याविषयी सांगण्याचं काम करतात. तसंच भविष्यात कुणीच मरणार नाही या देवाच्या अभिवचनाबद्दलही त्या सर्वांना सांगतात.

देव ईयोबाला पुन्हा जिवंत करेल यावर त्याचा पूर्ण भरवसा होता

तुम्ही म्हणाल, ‘हे कसं शक्य आहे?’ बायबलमधील ईयोब नावाच्या व्यक्तीचं उदाहरण पाहू या. तो खूप आजारी होता. (ईयोब २:७) इतका की त्याला मरण आलं असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटत होतं. पण त्याला या पृथ्वीवर पुन्हा जिवंत करण्याची देवाकडे शक्ती आहे यावर त्याचा भरवसा होता. तो आत्मविश्वासाने म्हणाला: “तू मला अधोलोकात लपवशील . . . तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृती त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१३, १५) देवाला त्याला परत जिवंत करण्याची उत्कंठा लागेल यावर ईयोबाचा पक्का विश्वास होता.

या पृथ्वीचं जेव्हा लवकरच नंदनवनात रूपांतर केलं जाईल, तेव्हा देव ईयोबाला आणि असंख्य लोकांना पुन्हा जिवंत करणार आहे. (लूक २३:४२, ४३) बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये २४:१५ या वचनात असं आश्वासन दिलं आहे की “पुनरुत्थान होईल.” येशू आपल्याला वचन देतो: “याविषयी आश्चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) ईयोब हे वचन पूर्ण झाल्याचं आपल्या डोळ्यांनी पाहील. एवढंच नव्हे तर “त्याचे शरीर बालकाच्यापेक्षा टवटवीत” होईल आणि “त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त” होतील. (ईयोब ३३:२४, २५) मृत जनांना या पृथ्वीवर पुन्हा जिवंत करण्याच्या या देवाच्या प्रेमळ व्यवस्थेबद्दल जे कुणी कदर दाखवतात त्यांनासुद्धा ईयोबाप्रमाणेच हे सर्व आशीर्वाद मिळतील.

जर तुम्हीसुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीला मृत्यूमुळे गमावलं असेल तर या लेखांतील माहितीमुळे कदाचित तुमचं दुःख पूर्णपणे नाहीसं होणार नाही. पण बायबलमध्ये देवाने जी अभिवचनं दिली आहेत त्यांवर मनन केल्यानं तुम्हाला खरी आशा आणि जीवन जगण्याचं बळ मिळेल.—१ थेस्सलनीकाकर ४:१३.

प्रिय जनांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या दुःखातून कसं सावरावं याबद्दल तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं आहे का? किंवा या विषयासंबंधी असलेला एखादा दुसरा प्रश्न जसं की, “देवाने अजूनपर्यंत दुष्टपणा व दुःख का काढून टाकले नाही?” बायबलमध्ये अशा प्रश्नांची सांत्वनदायक आणि व्यावहारिक उत्तरं दिली आहेत. हे पाहण्यासाठी कृपया jw.org/mr या आमच्या वेबसाईटला भेट द्या. (wp16-E No. 3)